Friday, November 20, 2026

माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक लेखनाचे व्यासपीठ




'दीपस्तंभ' ब्लॉगवरील पोस्ट्स:

'दीपस्तंभ' ब्लॉग विविध विषयांवरील माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक लेखनाचे व्यासपीठ आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे प्रमुख विषय असले तरी, सामाजिक, वैयक्तिक आणि सांस्कृतिक विषयांवरील लेख ब्लॉगला एक व्यापक दृष्टिकोन देतात. लेखनशैली शक्यतोवर माहितीपूर्ण, विश्लेषणात्मक आणि वाचकांशी संवाद साधणारी आहे, ज्यामुळे विविध प्रकारच्या वाचकांना ब्लॉग आकर्षक वाटू शकतो.
(ब्लॉग वाचण्यासाठी शीर्षकावर क्लिक करा)

शिक्षण आणि संशोधन:

विज्ञान आणि तंत्रज्ञान:

आरोग्य आणि जीवनशैली:

सामाजिक आणि प्रेरणा:

व्यक्ती विशेष:

प्रवास आणि संस्कृती:

इतर:

 
👉 तुमच्या नावासह प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका! तुमच्या अभिप्रायामुळे मला अधिक सुधारणा करण्याची प्रेरणा मिळेल आणि प्रोत्साहन लाभेल.

कर्मभूमीने दिलेली अनमोल पावती : 'गुणवंत शिक्षक'

 


सन्मानापलीकडचा माझा प्रवास

एखाद्या शिक्षकाच्या आयुष्यात 'गुणवंत शिक्षक' हा सन्मान म्हणजे केवळ त्याच्या दीर्घकालीन सेवेची नोंद नसते, तर त्याने विद्यार्थ्यांच्या मनात पेरलेल्या जिज्ञासेची, चारित्र्यघडणीच्या प्रामाणिक प्रयत्नांची आणि ज्ञानदानातील निष्ठेची ती एक अत्यंत अर्थपूर्ण पावती असते. विशेषतः जेव्हा आपण ज्या संस्थेत घडलो आणि जिथे आपले संपूर्ण व्यावसायिक आयुष्य वेचले, त्याच संस्थेकडून; तेही कोणताही अर्ज न करता; असा सन्मान मिळतो, तेव्हा त्यामागील कारणे शोधणे अधिकच अंतर्मुख करणारे ठरते. आपल्या जडणघडणीपासून ते आजच्या अध्यापन व संशोधन प्रवासापर्यंतच्या अनेक टप्प्यांवर आपण नेमके काय केले, कोणती मूल्ये जपली आणि विद्यार्थ्यांच्या व संस्थेच्या हितासाठी कोणती पावले उचलली, याचा प्रामाणिक शोध घेणारा हा लेख म्हणजे माझ्या या सन्मानामागच्या आत्मपरीक्षणाचा एक सखोल लेखाजोखा आहे.​

१८ सप्टेंबर २०२६ रोजी, अर्थात शिवाजी विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापनदिनी, विद्यापीठ प्रशासनाने अर्थात माननीय कुलगुरू महोदयांनी मला विद्यापीठ परिसरातील 'गुणवंत शिक्षक' पुरस्कार देऊन सन्मानित केले. या पुरस्कारासाठी सर्वसाधारणपणे अर्ज मागवण्याची पद्धत आहे; पण मी या पुरस्कारासाठी अर्ज न करताही मला तो कसा मिळाला, या गोष्टीचे मला मोठे आश्चर्य वाटले. अर्थात, मला पुरस्कार मिळाल्याचे आश्चर्य वाटले नाही, तर तो अर्ज न करताही मिळाल्याचे अधिक आश्चर्य वाटले.

१९९९ साली विद्यापीठाच्या सेवेत शिक्षक​ म्हणून रुजू झाल्यानंतर, विद्यापीठ परिसरातील अनेक शिक्षकांना हा पुरस्कार दिला गेला होता. त्यावेळी माझ्या मनात नेहमी कुतूहल असायचे की, ज्या शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला आहे, ती नक्कीच निष्ठावान, गुणवान आणि ज्ञानी अशी बहुआयामी व्यक्तिमत्त्वे असणार. आपण कधी गुणवंत होऊ शकू का, असे मला नेहमी वाटायचे. त्यातच भौतिकशास्त्र विभागातील माझे गुरुवर्य लोखंडे सर, भोसले सर तसेच पाटील सर यांनाही हा पुरस्कार मिळाला होता. माझ्या या गुरुवर्यांची आणि माझी कुठल्याही पातळीवर तुलना होऊ शकत नव्हती. अर्थात, त्यांची पातळी खूप वरची होती. या पार्श्वभूमीवर, मलाही हा पुरस्कार मिळाला आहे ही बातमी समजल्यावर मी अचंबितच झालो.


​​अर्थात, ज्या शिक्षकांच्या शिकवण्याने विद्यार्थ्यांचा केवळ अभ्यासक्रम पूर्ण होत नाही, तर त्यांचे चारित्र्य, जिज्ञासा आणि व्यक्तिमत्व घडते, अशा शिक्षकांना आपण गुणवान किंवा आदर्श शिक्षक मानतो. मला पुरस्कार मिळाल्यानंतर मी थोडेसे आत्मपरीक्षण केले आणि विद्यापीठ प्रशासनाने या पुरस्कारासाठी 'अर्ज न करताही माझी निवड का केली असावी', या प्रश्नाची मला भावलेली उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला.

​​अगदी शाळा, महाविद्यालय तसेच विद्यापीठस्तरीय शिक्षण घेत असताना आणि पीएचडी करत असताना एक हुशार, कष्टाळू अर्थात होतकरू विद्यार्थी म्हणून मी बिरुदावली मिरवली होती. याचा अर्थ मी फार ज्ञानी होतो असा नाही; पण वर्गात नेहमी पहिला नंबर मिळवण्याचा ध्यास आणि कुवत माझ्यात होती, हे मात्र खरे. मी शिक्षक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने विद्यार्थी झालो, कारण वर्गात पहिला नंबर मिळवणे जेवढे सोपे आहे, तेवढे वर्गात उत्कृष्टपणे शिकवणे अवघड आहे, हे मला समजले होते. उत्तम पद्धतीने शिकवण्याचे कौशल्य आत्मसात करायला मला वेळ लागला. सुरुवातीला विद्यार्थ्यांना समजेल ते मी शिकवायला लागलो; अर्थात अभ्यासक्रम शिकवण्यापेक्षा 'शिकायचे कसे' हे त्यांना शिकवण्यात मी यशस्वी झालो. माझ्या आवडीची अजून एक गोष्ट; ज्यामुळे मी विद्यार्थ्यांच्या अधिक जवळ गेलो; ती म्हणजे माझे क्रिकेटबद्दलचे प्रेम. वर्ग संपल्यानंतर संध्याकाळच्या सत्रात मी बहुतांश वेळ विद्यार्थ्यांसोबत मैदानावर घालवला आहे. यामुळेच बघता बघता मी विद्यार्थीप्रिय शिक्षक कधी झालो, हे मलाच कळले नाही.

​​सर्वसाधारणपणे बघितले तर विद्यार्थी एखादा अवघड विषय किंवा कठीण अभ्यासक्रम टाळणे पसंत करतात. तसे बघितले तर भौतिकशास्त्रासारख्या आव्हानात्मक विषयाची विद्यार्थ्यांना भीतीच वाटते. साहजिकच ते कमी कष्ट घ्यावे लागणारे, अर्थात सोपे विषय शिकताना निवडतात. तसेच असे अवघड विषय शिकवणारे शिक्षक कडक शिस्तीचे असतात; ओघाने हे शिक्षकही त्यांना आवडत नाहीत. या पार्श्वभूमीवर मी माझ्या अध्यापनाच्या पद्धतीत एक समतोल दृष्टिकोन स्वीकारला होता; ज्यामध्ये थोडे कडक, थोडे नरम अशी भूमिका घेऊन लवचिकता आणि सहानुभूती यांचा मेळ घातलेला होता. आणि हेच कारण असावे की त्यांना हा अवघड विषयही सोपा वाटायला लागला.

​​माझी ग्रामीण पार्श्वभूमी, प्रतिकूल परिस्थिती आणि आयुष्यामध्ये अनुभवलेले चढ-उतार यामुळे मी माणसे; विशेषतः विद्यार्थी चांगल्या पद्धतीने पारखू शकतो आणि समजून घेऊ शकतो; याबाबतची विशेष क्षमता मला प्राप्त झाली आहे. एखादा विद्यार्थी कष्टाळू आहे, तो मनापासून प्रयत्न करण्यास तयार आहे की नाही, की केवळ वरवर प्रयत्न करतो, हे मी त्वरित ओळखू शकतो. कालांतराने अशा विद्यार्थ्यांना हेरून त्यांना आणखी प्रगल्भ करत पुढे नेण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे, हे माझ्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य बनून गेले आणि ही क्षमता माझ्यात कायमची विकसित झाली.

​​एम.एस्सी.चे विद्यार्थी तुलनेने कमी काळ माझ्या संपर्कात असतात; पण माझे संशोधक विद्यार्थी किमान तीन वर्षे तरी माझ्या सानिध्यात असतात. या सर्व विद्यार्थ्यांसोबत अत्यंत जवळून काम करण्याची माझी कार्यपद्धती आहे. त्यामध्ये त्यांना अगदी मूलभूत गोष्टींचे प्रशिक्षण देणे, मार्गदर्शन करणे, त्यांच्या चुका निदर्शनास आणून देणे, मग त्यांना योग्य दिशा दाखवणे किंवा स्वतः काही गोष्टी करून दाखवून पुढे जाण्याच्या दृष्टीने एक आराखडा तयार करणे आणि त्यानुसार त्यांच्यासोबत काम करणे, अशी माझी पद्धत आहे. कदाचित इतर शिक्षकांच्या तुलनेत हेच माझे वेगळेपण असावे, जे विद्यार्थ्यांना हवेहवेसे वाटते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घाबरवून ठेवण्याऐवजी त्यांच्यात मिळूनमिसळून काम केल्याने त्यांच्या मनात एकोप्याची भावना निर्माण होते. त्यांचा आपल्यावरील विश्वास तसेच आदर वाढतो आणि त्यामुळे विद्यार्थी म्हणून जे काम करणे अपेक्षित आहे, ते ते स्वतःहून करायला तयार होतात; आणि हेच तर अपेक्षित असते.

या सर्व बाबींबरोबरच, माझ्या अध्यापन प्रवासाचा अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे माझे संशोधन कार्य, ज्याचा उल्लेख या लेखात अद्याप व्हायचा आहे. एका विद्यापीठ शिक्षकाचे कार्य केवळ वर्गातील चार भिंतींपुरते मर्यादित नसते, तर नवनवीन ज्ञान निर्माण करणे आणि विज्ञानाच्या कक्षा रुंदावणे हे देखील त्याचे तितकेच महत्त्वाचे कर्तव्य असते. सुरुवातीपासूनच मला प्रयोगशील आणि समाजोपयोगी संशोधनाची विशेष आवड राहिली आहे. विद्यार्थ्यांना संशोधनाच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी करून घेणे, त्यांना नवनवीन संकल्पनांवर काम करण्यास प्रवृत्त करणे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शोधनिबंध प्रसिद्ध करणे, हा माझ्या दैनंदिन कार्याचा एक प्रमुख भाग राहिला आहे. अत्यंत मर्यादित साधनसामग्रीतून मार्ग काढत, उपलब्ध सुविधांमध्येच दर्जेदार संशोधन उभे करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. माझ्या मते, संशोधन हे केवळ पदोन्नतीचे किंवा संख्यात्मक आकडेवारी वाढवण्याचे साधन नसून, ते आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यास सक्षम बनवण्याचे आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांवर वैज्ञानिक उत्तरे शोधण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.

​​मी माझ्या नोकरीच्या ठिकाणी माझ्या मातृसंस्थेने माझ्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी आणि काम अत्यंत निष्ठेने व चोखपणे पार पाडले आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी मी कधीही कामात दिरंगाई किंवा टाळटाळ केली नाही. गरज पडल्यास आणि प्रसंगी रात्री उशिरापर्यंत थांबून किंवा सुट्टीच्या दिवशीही आवर्जून हजर राहून मी अनेक महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण केलेली आहेत. संपूर्ण सेवाकाळात शक्य तितक्या कमी रजा घेत, परीक्षांच्या नियोजनापासून ते कार्यालयीन जबाबदाऱ्यांपर्यंत आणि विविध शैक्षणिक व प्रशासकीय समित्यांवर मी नेहमीच तत्परतेने व जबाबदारीने काम केलेले आहे.

​​वेळेच्या बाबतीत मी अत्यंत कडक शिस्तीचा आणि काटेकोरपणे वेळेचे पालन करणारा माणूस आहे. सर्वांच्या आधी विभागात पोहोचणे आणि सगळ्यात शेवटी विभागातून बाहेर पडणे, ही माझी गेल्या कित्येक वर्षांपासूनची सवय आहे. मी नेहमीच तास (क्लास), प्रात्यक्षिके आणि सेमिनार वेळेवर सुरू करतो आणि ठरलेल्या वेळेतच संपवतो; त्यामुळे विद्यार्थ्यांचाही वेळ वाया जात नाही आणि त्यांचा अभ्यासक्रमही नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जातो. मग ते संशोधन पेपरचे लेखन व परीक्षण असो किंवा परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन असो, मी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करतो आणि सर्व कामे वेळेत व अचूक पूर्ण होतील याची विशेष काळजी घेतो. माझ्या या वर्तनातून आणि शिस्तीतून विद्यार्थ्यांमध्येही वेळेचे महत्त्व रुजण्यास मदत होते आणि माझ्या मते, वेळेची ही जाणीव त्यांच्या भविष्यातील व्यावसायिक यश आणि सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक ठरते.

याशिवाय, विद्यापीठासारख्या मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थेत काम करताना पाळावी लागणारी संस्थात्मक शिस्त आणि नैतिकता ही देखील तितकीच महत्त्वाची असते. संपूर्ण सेवाकाळात मी विद्यापीठाचे सर्व नियम, संकेत आणि प्रोटोकॉल यांचे काटेकोरपणे पालन केले आहे. आपण ज्या संस्थेचा भाग आहोत, त्या संस्थेची प्रतिमा आणि प्रतिष्ठा सर्वोच्च स्थानी असली पाहिजे, यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा कोणत्याही कृतीमुळे किंवा वक्तव्यामुळे विद्यापीठाच्या नावाला धक्का लागेल किंवा त्याची मान खाली जाईल, असे कोणतेही कृत्य माझ्या हातून कधीही घडू नये, याची मी सदैव दक्षता घेतली आहे. त्याचप्रमाणे, कोणत्याही प्रकारच्या गटबाजीपासून किंवा अंतर्गत राजकारणापासून मी स्वतःला नेहमीच जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे. 'काम बोलू द्यावे' या तत्त्वावर विश्वास ठेवत, कोणत्याही गटातटात न अडकता केवळ विद्यार्थीहित, विभागप्रगती आणि विद्यापीठाचा नावलौकिक उंचावणे, या एकाच ध्येयाने मी आजवर कार्यरत राहिलो आहे.

​​प्रत्येक व्यक्तीने चारित्र्यसंपन्न असायला हवे. ही चारित्र्यसंपन्नता कुटुंब, समाज किंवा आपल्या कामाचे ठिकाण असो; प्रत्येक ठिकाणी ती जपली आणि टिकवून ठेवली पाहिजे. स्वार्थीपणा टाळणे, वेळेचा अपव्यय न करणे आणि इतरांच्या कमकुवतपणाचा किंवा अडचणींचा गैरफायदा न घेणे, या तत्त्वांचे मी नेहमीच जाणीवपूर्वक पालन केले आहे. माझ्या आई-वडिलांनी घालून दिलेले संस्कार आणि शिकवण; ज्यामध्ये साधेपणाची जपणूक, योग्य आचरण, स्वाभिमान, प्रामाणिकपणा आणि नैतिकता यांचा समावेश आहे; मी आजही तितक्याच निष्ठेने जपलेले आहेत. याच मौल्यवान शिकवणींमुळे माझ्या चरित्राचा पाया अत्यंत भक्कम राहिला आहे. एक संवेदनशील आणि नैतिकदृष्ट्या सुयोग्य व्यक्ती म्हणून मला घडवण्यात या जीवनमूल्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

​​मी ज्या कुटुंबातून, समाजातून आणि भागातून आलो आहे, तसेच ज्या परिस्थितीत माझी जडणघडण झाली, याची मला सदैव जाणीव असते. आजही, एका जबाबदार पदावर कार्यरत असतानाही, समाजातील आव्हाने आणि त्रुटींची मला पूर्ण जाणीव आहे आणि या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करतो. परिणामी, माझ्या मनात जबाबदारीची तीव्र जाणीव आणि समाजाचे देणे फेडण्याची आंतरिक इच्छा आहे. माझे ज्ञान आणि अनुभव तळागाळातील लोक, गरजू व्यक्ती आणि तरुण पिढीसाठी उपयुक्त ठरतील, याकडे मी आवर्जून लक्ष देतो. विविध सामाजिक उपक्रम आणि संस्थांच्या माध्यमातून मी माझ्या गावाशी घट्ट नाते जपले आहे, तसेच मित्र आणि ग्रामस्थांशी असलेले माझे स्नेहबंधही जोपासले आहेत.

​​माझा मुख्य भर नेहमीच येणाऱ्या पिढीला सक्षम करण्यावर राहिला आहे. नव्या पिढीतील नाविन्यपूर्ण क्षमता जोपासणे आणि त्यांना अर्थपूर्ण कृती करण्यासाठी प्रेरित करणे हे माझे कायम ध्येय राहिले आहे. ते येणाऱ्या नजीकच्या भविष्याचे आधारस्तंभ असल्याने, त्यांचे खंबीर आणि सक्षम व्यक्तिमत्त्व घडवावे हाच माझा ध्यास राहिला आहे.

शिक्षकाच्या मातृसंस्थेने किंवा कर्मभूमी असलेल्या संस्थेने 'गुणवंत शिक्षक' म्हणून सन्मानित करण्यापेक्षा मोठी दुसरी कोणतीही गोष्ट नाही; त्याच्या उत्कृष्ट कार्याची ती एक प्रकारची पोचपावतीच असते.

​एकंदरीत पाहता, 'गुणवंत शिक्षक' होण्याचा प्रवास हा कोणत्याही एका दिवसात किंवा एका विशिष्ट यशात पूर्ण होणारा नसतो; तर तो रोजच्या जगण्यातून, शिकण्यातून आणि समाजाला काहीतरी परत देण्याच्या प्रामाणिक ध्यासातून घडत असतो. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेपुरते तयार न करता त्यांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्याचे बळ देणे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे आणि वेळेची, मूल्यांची व नात्यांची जपणूक करणे, याच गोष्टींनी माझ्या या प्रवासाला खरा अर्थ दिला आहे. विद्यापीठाने दिलेला हा सन्मान माझ्यासाठी समाधानाचे क्षण नक्कीच घेऊन आला आहे; पण त्याचबरोबर तो अधिक नम्र राहण्याची, अधिक जबाबदारीने काम करण्याची आणि येणाऱ्या पिढ्यांना घडवण्यासाठी नव्या जोमाने पुढे जाण्याची प्रेरणाही देणारा आहे. मातृसंस्थेने आणि कर्मभूमीने दिलेली ही पोचपावती माझ्या आयुष्यातील एक अनमोल शिदोरी असून, यापुढील काळातही ज्ञान, चारित्र्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा हा धागा असाच घट्ट धरून ठेवण्याचा माझा निर्धार आहे.

- प्रा डॉ केशव यशवंत राजपुरे


​

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...