Saturday, June 3, 2023

कोरिया डायरी

 कोरिया डायरी; सुवर्ण कांचन योग! (वाचन वेळ: ४० मिनिटे)

मी कोरियाहून परतल्यावर 'कशी झाली कोरिया ट्रिप ?', 'कसा वाटला देश ?', 'कुठे कुठे फिरला ?', 'तुमचे व्हाट्सअप स्टेटस छान होते', 'तिथले जेवण आवडले का ?' अशा प्रश्नांमुळे मला लिहायला भाग पाडले. मी ११ ते २० मे दरम्यान दक्षिण कोरियातील सहा विद्यापीठे आणि नऊ शहरांना भेट दिली. त्यामुळे ही माझी १० दिवसांची प्रवास वर्णनरुपी कोरिया डायरीच आहे.

बऱ्याच वर्षांपासून दक्षिण कोरिया ला भेट देण्याची माझी इच्छा होती कारण आमचे कित्येक विद्यार्थी तेथे विविध प्रयोगशाळांमध्ये दर्जेदार संशोधन करीत आहेत. अर्थात या विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या प्राध्यापकांना भेटण्याची कल्पना होती. थोडक्यात, या मिनी अमेरिका म्हणून संबोधले जाणाऱ्या देशातील संशोधन सुविधा, तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनाचे साक्षीदार व्हायचे होते. यामुळे माझ्या संशोधनातील कक्षा रुंदावू शकणार होत्या आणि भविष्यात नवीन शैक्षणिक सहयोग निर्माण होण्यास मदत होणार होती. 

माझ्या एका मुलाखतीदरम्यान परीक्षकांनी मला प्रश्न विचारला होता की 'तुम्ही कोणत्या कोणत्या देशांना भेट दिली आहेत' तर मी तेव्हा त्यांना सांगितलं की 'मी इथं हंगामी सेवेत असल्यामुळे मला रजा मिळाली नाही त्यामुळे संधी मिळूनही मी कुठल्याही देशाला भेट देऊ शकलो नाही'. तेव्हा ते म्हणाले होते किमान दक्षिण कोरियाला तरी तुम्ही जायला हवे होते. कोरिया बद्दल ची त्यांची मूळ धारणा चुकीची होती.

मला १९९९ मध्ये फ्रान्सला जाण्याची संधी आली होती, परंतु माझ्या हंगामी स्वरूपाच्या नोकरीने मला जाता आले नाही. नंतर मला सिंगापूर, जपान आणि कोरियाला भेट देण्याच्या संधी येऊन गेल्या पण काही ना काही कारणास्तव मी जाऊ शकलो नाही. निवास निधीची सोय न झाल्याने २०१८ मध्ये जेजूची भेट रद्द केली होती. कोविड महामारीपूर्वी माझी कोरियाभेट जवळपास निश्चित झाली होती पण लॉकडाऊनमुळे रद्द झाली होती. 

माझे विद्यार्थी संतोष, किरण, आणि विनायक यांनी माझ्या कोरिया भेटीचे योग्य नियोजन करीत नियोजित संस्थेतील भेटींच्या वेळा ठरवल्या होत्या. दरम्यान, तेथील भेट द्यायची ठिकाणे, अंतरे तसेच बस सुविधा इ. चा गुगल मॅपवर मी खूप अभ्यास केला. तेथली शहरे आणि संस्थांची नावे उच्चारण्याचा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. तसे हे उच्चार आपणास सुरुवातीला कठीणच वाटतात. 

विमानाचे तिकीट बुक करताना माझ्या नावांमध्ये थोडी गडबड झाली होती तसेच माझा कोविडचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस नसल्याने मुंबई विमानतळावर सुरुवातीला थोडा गोंधळ झाला होता, परंतु विद्यार्थ्यांच्या एअर इंडिया मध्ये ओळखी असल्याने त्याही अडचणींतून मार्ग निघाला. सुदैवाने रसायनशास्त्राचा अभिजित हा  विद्यार्थी सहकुटुंब त्याच फ्लाइटमध्ये प्रवास करत असल्यामुळे माझा संपूर्ण तणाव कमी झाला. १० मे च्या मध्यरात्री दिल्ली येथे कोरियाला जाणाऱ्या विमानात बसलो आणि ७ तास अखंड प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो. यापूर्वी मी विमानांमध्ये इतका वेळ प्रवास केला नव्हता, त्यामुळे  सुरुवातीला मला असे वाटले की हा प्रवास जड जाईल पण बोईंग एअरबस असल्याने  सात तासांचा प्रवास  अगदी सुखकर आणि सहज झाला. माझा प्रवासाचा मार्ग इंचॉन, योगनिन, चुंगजू, चोंगजू, इक्सान, ग्वांगजू, सेऊल आणि नंतर अंसान मार्गे इंचॉन असा ठरला होता.संतोष, सोनाली आणि अविराज यांनी विमानतळावर माझे हसतमुख स्वागत केले. मी एकाच ऋतूत भारतातून कोरियात गेलो होतो. पण तिथला उन्हाळा आपल्या मानाने आल्हाददायक वाटत होता. पहिल्या दिवशी खूप थंडी जाणवली. सूर्यप्रकाशात इन्फ्रारेड कमी पण अल्ट्राव्हायोलेट जास्त होते. त्यामुळे तिथल्या ऊन्हात  उष्मा कमी पण तीव्रता अधिक असते आणि त्वचेसाठी ते हानिकारक असते. लख्ख सूर्यप्रकाशातही भरपूर गारवा होता.  विद्यार्थ्यांसोबत कॉफी घेतल्यानंतर आम्ही योंगिन शहराच्या दिशेने प्रवास करण्यासाठी बस मध्ये चढलो, तेथील म्योंगजी विद्यापीठात माझे पहिले व्याख्यान त्याच दिवशी दुपारी ४:०० वाजता होणार होते. 
 
 

मी जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सांगतले होते की मी व्हीआयपीं नसून तुमच्या कुटुंबातील सदस्यांसारखा असल्याने स्पेशल कार गाडीने प्रवास करून हॉटेल किंवा गेस्ट हाऊसमध्ये राहण्याऐवजी मी बस, ट्रेन अशा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे आणि त्यांच्या घरी राहणे पसंत करेन.  त्यांचे जीवन जवळून पाहण्यासाठी हे मुद्दाम ठरवले होते. तिथल्या सार्वजनिक वाहतुकीबाबतीत मी परिपूर्णता, नीटनेटकेपणा आणि वक्तशीरपणाबद्दल ऐकले होते, पहिल्याच प्रवासात  ते मी अनुभवलं. केवळ दोनच प्रवासी असलो तरी, त्या एसी बस फक्त आमच्यासाठीच धावत होत्या. सर्व तिकिटे ऑनलाइन बुक केली जातात किंवा डेबिट कार्डने स्टेशनवर खरेदी केली जातात. चालनी नोटा देणंघेणं अजिबात नाही. मला सांगण्यात आले की जवळजवळ सर्व व्यवहार कॅशलेस चालतात त्यामुळे तुमच्याकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असायला हवे. 

हा देश डोंगर दऱ्यात वसलेला आहे आणि टेकड्या झाडांनी झाकोळल्या  आहेत. उघडा भूभाग दिसणे दुर्मिळ आहे. रस्ते खूप स्वच्छ आणि प्रशस्त होते. सर्व वाहने लेनचे योग्य नियम पाळत होती. दोन धावत्या वाहनांमध्ये पुरेसे अंतर होते. हॉर्न ऐकू येत नव्हते. इंचॉन च्या आग्नेयला ७५ किमी पर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सुमारे दीड तास लागला. तिथे पीएचडी करत असलेला माझा पुतण्या मनोज आम्हाला न्यायला  बस स्टॉप वर  आला होता . त्याच्या घरी मी फ्रेश झालो आणि जेवण आटोपून लगेच विद्यापीठात गेलो जिथे माझे व्याख्यान होते. मनोज ची सौ म्हणजे आमच्या सुनबाई नी उत्तम स्वयंपाक केला होता. कोरियात घरच्यासारखे जेवण मिळणार नाही हा माझा कयास फोल ठरला.  

म्योंगजी विद्यापीठातील ऊर्जा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक हर्न किम यांनी त्यांच्या रिसर्च ग्रुपसाठी थिन फिल्म ट्रान्स्परन्ट कंडक्टिव्ह ऑक्साइड या विषयावर माझे व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानाला ३० हून अधिक भारतीय तसेच इतर देशातले पदव्युत्तर आणि पदवीधर विद्यार्थी उपस्थित होते. औपचारिक स्वागत आणि सत्कार झाल्यानंतर व्याख्यान सुरू झाले, जे एक तास चालले. व्याख्यान उत्तम झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून समजत होते. खरंतर, माझा विद्यार्थी हर्षराज याने हे व्याख्यान आयोजित करण्यात पुढाकार घेतल्यानेच हे शक्य झाले.

 


त्यानंतर आम्ही कॅम्पसवर फेरफटका मारला. कोरियामधील सर्व विद्यापीठे टेकड्यांजवळ आहेत कारण सर्वच भूप्रदेश उंच सखल आहेत . कॅम्पस नीटनेटका होता. जवळपास धूळमुक्त रस्ते दिसत होते. सर्व इमारती स्थापत्यदृष्ट्या अद्वितीय आणि आकर्षक होत्या. खेळाची मैदाने, पार्किंगची जागा आणि बस स्टँड प्रशस्त आहेत. माझा पहिला मुक्काम चुंगजू या शहरात होता. हे शहर त्या ठिकाणाहून आग्नेयला सुमारे ८० किमी दूर होते, त्यामुळे आम्हाला घाईघाईत निरोप घेत चुंगजूची बस पकडावी लागली. मनोज उभयांतानी माझ्यासाठी आणलेली भेटवस्तू मनोभावी सुपूर्त केली. रात्री आठच्या सुमारास चुंगजू येथील संतोषच्या घरी पोहोचलो. अशा प्रकारे दौऱ्याची  सुरुवात उत्तम झाली होती.

संतोषने आमच्यासाठी जेवण बनवले. जर तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर सर्वप्रथम स्वयंपाक आला पाहिजे अन्यथा तुम्हाला तिथल्या अन्नपदार्थांवर चालवावे लागेल. भारतीय खाद्यपदार्थ बनवण्यासाठी लागणारे किराणा आणि भाजीपाला तिथे महाग असला तरी उपलब्ध आहे. एक मात्र सर्व विद्यार्थी स्वयंपाकात तरबेज झाले आहेत. जेवण चविष्ट होते. लांबच्या प्रवासाच्या ताणामुळे जेवल्यावर लगेच झोप लागली. टाईम झोनच्या बदलामुळे येणारा जेटलॅग मला जाणवला नाही. तेथील दळणवळण आणि खरेदीबाबत सर्व काही प्रादेशिक भाषेत इंटरनेटवर उपलब्ध आहे. पण जर तुम्हाला कोरियन वाचता येत नसेल तर ते अवघड होते. 

पुरेशी झोप घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो. मग आम्ही संतोष संशोधन करत असलेल्या  कोंकुक विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये डोंगर चढून फिरायला गेलो. हे सुंदर ठिकाण झाडांनी वेढलेले आहे. त्यांनी इमारती तसेच प्रचंड फुटबॉल मैदान तयार करण्यासाठी लँडस्केपचा सुरेख  वापर केला आहे. सकाळी अकरा वाजता व्याख्यान असल्याने पुरेसा वेळ घालवून आम्ही घरी परतलो. यामुळे मला कॅम्पस तर बघता आलाच पण मॉर्निंग वॉक देखील झाले.

आम्ही वेळेवर विभागात पोहोचलो आणि लक्षात आले की सर्व प्राध्यापक वक्तशीर आहेत. तरुण आणि उमदे प्राध्यापक येओन्हो किम यांच्याशी ओळख झाल्यानंतर, ते माझे व्याख्यान ऐकण्यासाठी खूप आतुर झाले. त्यांनी उत्साहाने मला त्यांची प्रयोगशाळा दाखवली आणि माझ्या निवासाची आणि जेवणाची चौकशी केली. 

व्याख्याना दरम्यान मी माझे विद्यापीठ, संशोधन प्रोफाइल आणि सध्याचा संशोधन कल थोडक्यात मांडला. त्यानंतर त्यांच्या आवडीच्या विषयावर व्याख्यान दिले. इंग्रजी समजण्यात अडचण असूनही, मास्टर्सच्या सर्व विद्यार्थ्यांनी व्याख्यान लक्षपूर्वक ऐकले आणि काही प्रश्न विचारले. ऍक्टिव्हिटी यशस्वी झाल्याबद्दल प्रा किम यांना आनंद झाला. त्यांनी आम्हाला एका प्रशस्त इलेक्ट्रिक कारमधून कोरियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेले. जेवणामध्ये व्हेज बिबिंबप, गोचुजांग, कोंगनमुल मुचिम, ओई मुचिम, स्पायसी कोरियन राईस केक, सुकजू नामुल इत्यादी डिश होत्या. डिशची संख्या जास्त असली तरी मी त्यातील थोडेच पदार्थ माझ्या ताटात घेतले. आपल्या लोणच्याइतकीच किमचीही मला आवडली आणि कोशिंबीरदेखील छान होती. तळलेले फिश केकही चांगले होते. तिथले जेवण चविष्ट नसते आणि थोडेसे कच्चे असते असे ऐकले होते. पण ते जेवण तर आपल्या जेवणासारखेच होते. तृप्त आणि आनंदी मनाने आम्ही विद्यापीठात परतलो, परस्पर संशोधन हितसंबंधांवर चर्चा केली आणि सहयोगी संशोधन करण्याचा निर्धार केला. 

किया आणि ह्युंदाई कंपन्यांच्या लेफ्ट हँड ड्राईव्ह असलेल्या बहुतांशी ऑटोमॅटिक कार तिथे दिसल्या. किया ही तिथली प्रस्थापित कंपनी आहे. विशेष म्हणजे किया ही ह्युंदाई ची सिस्टर कंपनी आहे. ह्युंदाईचे आता वर्चस्व आहे. तिथे आकर्षक रंगाच्या तसेच आलिशान कारचे प्रकार बघायला मिळतात. रस्त्यावर मोजक्याच बजेट तसेच मॅन्युअल कार बघायला मिळतात. 

दुपारी आमचा दुसरा विद्यार्थी निनाद आमच्यात सामील झाला. तो आम्हाला चुंगजू येथील ह्वालोक गुहा बघायला घेऊन गेला. एकेकाळी डोलोस्टोनची समृद्ध खाण असलेले, ह्वालोक जेड केव्ह आता एक दोलायमान थीम पार्क झाले आहे. चुंगजू तलावाच्या किनाऱ्यावर असलेली ही गुहा १९०० मध्ये सापडली होती. इथे १९ व्या शतकात खणलेल्या खनिजांची वाहतूक करण्यासाठी वापरलेली महाकाय इंजिने बघायला मिळतात. या गुहेत स्वच्छ पाण्याच्या सरोवरात पारदर्शक कयाक मधून बोटिंग करण्याची मजा काही औरच असते. कायक च्या खालून जात असलेल्या माशांचे निरीक्षण करता येते. गुहेचे तापमान १० डिग्री सेल्सिअस दरम्यान असल्याने खूप थंडी वाजते. गुहेत वाइन आणि व्हिनेगर मोठ्या बॅरलमध्ये आंबवले जातात. 

तेथून परतल्यावर आम्ही चुंगजू येथील टॅंजियम लेक बघायला गेलो. चुंगजू धरण आणि त्याच्या प्रवाहाचे नियमन करणारे दुसरे धरण यांच्यामधील हा एक कृत्रिम तलाव आहे. सात मजली दगडी पॅगोडा आणि जंगंगटाप ऐतिहासिक उद्यान हे नदी तलावाच्या काठावर वसलेले आहे. त्यांनी काठावर वॉकिंग आणि सायकलिंग ट्रॅक बांधले आहेत. ते शांत पाण्यात रोइंगचा सराव करतात. लोकांना पक्षीनिरीक्षण करण्याचीही सोय आहे. अतिशय विहंगम आणि नयनरम्य दृष्य पाहून मन भारावून जाते.

   
 
  
त्या रात्री पुन्हा संतोष च्या घरी जेवणाचा बेत केला पण यावेळी खानसामा (जेवण बनवणारा) निनाद होता. त्याने अगदी हौस आणि उत्साहाने सरांना चिकन रस्सा खाऊ घालण्याच्या उद्देशाने अगदी पद्धतशीरपणे  रेसिपी केली. मला रस्सा जाम आवडला. संतोष ने दडपणात लाटलेली रुमालाच्या आकाराची रुमाली रोटी पण चविष्ट होती. पण बेत फक्कड झाला होता. सर्व विद्यार्थी स्वयंपाकाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहेत. मला जाणवले की विद्यार्थी मला भेटायला, पर्यटनास घेऊन जायला तसेच स्वतः स्वयंपाक करून खाऊ घालायलाही खूप उत्सुक होते. परदेशातील माझ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्यासाठी त्यांच्या शिक्षकांना भेटल्याचा आनंद मला अनुभवता आला.

चुंगजू येथे दोन दिवस घालवल्यानंतर, आम्हाला किरण राहत असलेल्या, चुंगजू च्या नैऋत्येस अंदाजे ६० किमी वर असणाऱ्या चोंगजू शहरात जावे लागले. दुसऱ्या दिवशी दुपारी संतोष माझ्यासोबत बसने चोंगजू येथे सोडायला आला. किरण आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी त्याच्या किया कारने बस टर्मिनलवर आला होता. किरणच्या घरी दुपारच्या जेवणाचा बेत होता. किरण ची सौ रुपालीने चपाती, पनीर, गुलाबजाम, मसाले भात, पापड, कोशिंबीर असा मस्त बेत केला होता. इंटरनॅशनल स्कुल मध्ये शिकत असलेला त्याचा मुलगा वेद मला भेटून आनंदी झाला. गावाकडील पाहुणे आल्याने त्याला खूप आनंद झाला होता. तो माझ्याशी उत्तम इंग्रजीत संवाद साधत होता. पण त्याचे काही उच्चार ओळखणे खूपच कठीण जात होते. 

तणावमुक्त वेळ घालवण्याचे ठिकाण म्हणजे कॉफीहाऊस ! तिथे आपण स्नॅक्स आणि कॉफी घेऊ शकतो. आम्ही एका कॉफी शॉपमध्ये जायचे ठरवले. थोड्या विश्रांतीनंतर संध्याकाळी किरणच्या कुटुंबासह कॅमेनारा ३२ कॅफे या कॉफी शॉपमध्ये गेलो. अर्थात कॉफी शॉपमधील पदार्थाचा आस्वाद घेण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. त्यामुळे किरणची ऑर्डर माझी पसंती ठरली. तिथे व्हर्जिन मोजिटो, हनी बटर ब्रेड, यांग्न्योम चिकन या नवीन गोष्टी टेस्ट केल्या. कॉफी शॉपमध्ये मस्त वेळ गेला. विकएंड आल्याने तसेच पुढील व्याख्याने दोन दिवसांनंतर असल्याने आम्ही चोंगजूच्या आसपासची प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा प्लॅन केला. संध्याकाळी आम्ही एका सुनियोजित आणि अतिशय सुंदर असलेल्या सेजोंग या आधुनिक शहराला भेट दिली. देशाची दुसरी राजधानी म्हणूनही ओळखले जाणारे सेजोंग हे आम्ही राहत होतो त्या चोंगजूच्या दक्षिणेला सुमारे २० किमी वर होते. ज्यूम नदीच्या काठावर वसलेले आणि तीन लाख लोकसंख्या असलेले हे शहर एक लाख एकर क्षेत्रफळावर पसरले आहे. सेजोंग या स्मार्ट सिटीचे नाव राजा सेजोंग द ग्रेटच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. संध्याकाळचे दृश्य नयनरम्य असते म्हणून सायंकाळी ७ वाजता किरण आम्हाला त्याच्या गाडीमधून घेऊन गेला. शासकीय संकुल, सिटी हॉल, पूल, नॅशनल लायब्ररी, लेक पार्क आणि विशाल गेउमगँग पादचारी पूल ही शहरातील प्रमुख आकर्षणे आहेत. या शहरात फिरताना डोळ्याचे पारणे फिटले. प्रत्येक इमारत वेगळ्या स्थापत्यरचनेत तयार केली आहे. प्रथम आम्ही दहा वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या आणि १०० एकरांवर पसरलेल्या कृत्रिम सेजोंग लेक पार्कला भेट दिली. उद्यानात चौकोनी कारंजासह विविध थीम असलेल्या सुविधा आहेत. अतिशय विहंगम आणि स्थापत्यकलेचा उत्तम नमुना या तलाव परिसरात पाहायला मिळतो. लेक परिसरात काढलेली सर्वच छयाचित्रे अगदी अप्रतिम येतात. 
 
गेउमगँग पादचारी पूल हा स्टील पाईप ने नदी पात्रावर बांधलेला ट्रस ब्रिज आहे ज्याची एकूण लांबी १६५० मीटर तर रुंदी ३० मीटरच्या  दरम्यान आहे . शहराच्या वर्तुळाकार रचनेनुसार त्याचे मॉडेल बनवले आहे. वर्तुळाकार रस्ता सायकल आणि पादचारी मार्गांच्या दुमजली संरचनेत विभागलेला आहे. सेजोंगला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक लोकप्रिय नयनरम्य ठिकाण आहे. ब्रिजच्या उत्तरेकडून आणखी उंच निरीक्षण बिंदू वर जाता येते आणि त्यावरून हंदुरी ब्रिज, हकनारे ब्रिज, गेउमगँग ब्रिज, सिटी हॉल आणि माउंटनची सुंदर दृश्ये दिसतात. हे सर्व कॅमेराच्या एका फ्रेममध्ये बसत नाहीत. रात्री पादचारी पुलावर चालताना वेगळी अनुभूती येते. त्या रात्री घरी पोचायला उशीर झाल्यामुळे तेथील कॉफीशॉप मध्ये थोडे जेवून नंतर  बाहेरून डिश मागवली.

 

दुसऱ्या दिवशी (१४ मे, रविवार) आम्ही चोंगजू शहराच्या पूर्वेस जवळपास ६० किमीवर असलेल्या सोंगनिसान डोंगरावरील बेपसांग बौद्ध मंदिराला भेट देण्याचा बेत केला. वाटेत मालतीजाय वेधशाळा आणि पाइन ट्री पार्कला भेट द्यायची होती. प्रवास सुरू करण्यापूर्वी आम्ही चोंगजू शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रारा कोस्टा इटालियन रेस्टॉरंटमध्ये जेवण केले. त्यामध्ये रोझ पेन पास्ता, रिकोटा चीज सलाड आणि बेसिल रोसोटो यांचा समावेश होता. हे सर्व खाद्यपदार्थ माझ्यासाठी नवीन असले तरी मला ते खूप चवदार वाटले. अन्नाचा  योग्य आदर करत, मी भुकेपेक्षा थोडे कमी जेवलो. जगभरातील लोकांची संस्कृती आणि जीवन जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या आहाराची माहिती घेणे आवश्यक असते. वेगवेगळ्या देशाची खाद्यसंस्कृती आता जगभर प्रसिद्ध झाली असल्याने कुठेही कुठल्याही प्रदेशातील खाद्यपदार्थ मिळू शकतात. नेहमीच्या जेवणाची सवय असल्याने हे जेवण जरा वेगळेच वाटले. अर्थात ते चविष्ट होते, पण मला त्याची सवय नव्हती, आधी पचनाची काळजी आणि मग आपण नक्की काय खाल्ले याची काळजी ! कोरियामध्ये अन्न आणि पाणी इतके स्वच्छ आहे की मला प्रत्येक जेवणानंतर काही तासांतच भूक लागायची. त्यामुळे जेवणाचा अजिबात त्रास झाला नाही. 

मालतीजाय वेधशाळा हे सोंगनिसान पर्वतातील पर्यटकांसाठी विसाव्याचे आकर्षक ठिकाण आहे. हन्नम आणि गेम्बुक खोऱ्यांना जोडण्यासाठी तसेच माउंट सॉन्गनिसानच्या नैसर्गिक परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी तीन मजली बोगदा तयार केला आहे. त्याला सोंगनिसन गेटवे असेही म्हणतात. अगदी वरच्या मजल्यावर टेहळणी बुरुंज आहे. तो हवेत तरंगता फोटो पॉईंट आहे. तिथे गगनाला भिडल्या सारखे फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. सुदैवाने निरभ्र आकाश व लख्ख सूर्यप्रकाशामुळे निसर्ग सौंदर्य अधिक खुलले होते. बुरुंजावरून खाली बघितले तर हिरव्यागार वनराईत लपलेल्या नागमोडी वळणाच्या घाटरस्त्याचे विहंगम दृश्य दिसते. समुद्रसपाटीपासून खूपच उंचीवर असल्याने तेथील  थंडगार वारे अंगाला झोंबते. स्वर्गाहून सुंदर ठिकाण पाहिल्याचा अनुभव !  


बेपसांग मंदिराच्या वाटेवर, सोल्ह्यांग पाइन ट्री पार्क आहे जिथे घनदाट पाइन जंगलाव्यतिरिक्त मुलांसाठी स्काय रेल आणि स्काय बाईकची सुविधा आहे. लहान मुले आणि प्रवाशांना मंदिराकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी हे उद्यान मंदिराच्या वाटेवर तयार केले असावे. सोल्ह्यांग पार्कच्या काही किलोमीटर पुढे बेपसांग बौद्ध मंदिर डोंगराच्या कपारीत वसले आहे. मंदिराच्या पायथ्याशी दोन किमी अंतरावर वाहनांचे पार्किंग आहे. तिथून आपल्याला मंदिरापर्यंत चालत जावे लागते . बेपसांग बौद्ध मंदिराची स्थापना सहाव्या शतकात भिक्षू उइसिन यांनी केली होती, त्या परिसरात ध्यानधारणा तसेच निवासासाठी साठ पेक्षा जास्त इमारती आहेत.

संस्थापक, उइसिन यांनी मंदिराला बेपजू ('धर्माचे निवासस्थान') असे नाव दिले कारण त्यांनी तेथे आपल्यासोबत आणलेली अनेक भारतीय सूत्रे (धर्मावरील शास्त्रे) ठेवली होती. मंदिरात पलसांगजेन हा कोरियातील सर्वात जुना आणि सर्वात उंच लाकडी पॅगोडा आहे. गोरीयो राजवंशाच्या काळात, मंदिरात सुमारे ३००० भिक्षू होते असे म्हटले जाते. बेपजूसा येथील सुवर्ण मैत्रेय स्टॅच्यू ऑफ नॅशनल युनिटी हा बुद्धांचा १६० टनी आणि ३३ मीटर उंचीचा पुतळा हा तेथील राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा आहे. त्या परिसरात यथेच्छ वेळ घालवल्यानंतर आणि मंदिरात दर्शन झाल्यावर पुन्हा पायी वाहनतळापर्यंत चालत आलो. वाटेत दाबयुक्त हवेची आउटलेट होती. तिथे अंगावरील तसेच शूजवरील धूळ हवेच्या प्रेशरने घालवता यायची. ही धूळ अंगावर राहून रोगराई पसरू नये तसेच त्याचे पुढे वहन होऊन वातावरणात पसरू नये हा उद्देश. मुळात कमी धूळ असताना प्रेशर झोताखाली माझे शूज तर धुतल्यासारखे स्वच्छ निघाले. यावरून त्या देशात स्वच्छतेला किती महत्व आहे याची प्रचिती येते.  

त्या दिवशी संध्याकाळी किरणची चोंगजू येथील भारतीय लॅबमेट, कॅनडा येथे पोस्ट-डॉक ला निवड झाल्याबद्दल, तिथल्या त्याच्या मित्रपरिवारास भारतीय हॉटेल मध्ये पार्टी  देणार होती. त्यानिमित्ताने माझी सर्वांची ओळख आणि भेटीचा योग येणार होता. त्यादिवशीचे डिनर चोंगजू येथिल ताजमहाल या भारतीय  रेस्टोरंट मध्ये झाले. सर्वांची ओळख झाली. त्याचे पोस्ट-डॉकचे मित्र कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश आणि ओडिशा येथील आहेत. मेन्यूमध्ये सूप, सामोसा, पनीर, मिक्स व्हेज तसेच रोटी होती . भारतीय पद्धतीच्या जेवणासोबत किरणच्या कोरियात राहणाऱ्या वेगवेगळ्या राज्यातील  भारतीय मित्रांची आणि कुटुंबीयांची ओळख  झाली. गेली बरीच वर्षे ही सर्व भारतीय कुटुंब परमुलखात एकोप्याने राहून आपली संस्कृती जतन करत सण साजरे करत असतात. महत्वाचे म्हणजे हा एकमेकांना मोठा आधार असतो.  

सोमवारी डेजॉन आणि इक्सान या दोन वेगवेगळ्या शहरातील दोन संस्थांमध्ये २ व्याख्याने नियोजित होती. डेजॉन चोंगजूच्या नैऋत्येकडे सुमारे ४० किमी तर इक्सान डेजॉनच्या नैऋत्येकडे सुमारे ६५ किमी आहे. सकाळी लवकरच आम्ही किरणच्या गाडीने निघालो कारण पहिले व्याख्यान अकरा वाजता डेजॉन येथील हॅनबॅट नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये आणि दुसरे व्याख्यान दुपारी चार वाजता जिओनबुक नॅशनल युनिव्हर्सिटी, इक्सान कॅम्पस येथे होते.

आम्‍ही हनबट नॅशनल युनिव्‍हर्सिटी च्‍या डिपार्टमेंट ऑफ मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंगचे किरणचे प्रोफेसर डॉ. जे.एस. पार्क यांना भेटलो आणि माझी ओळख करून दिली. एकमेकांना भेटून आम्हांस खूप आनंद झाला. तिथे कॉफी घेऊन आम्ही लेक्चर हॉलकडे वळलो. दिलेला विषय अगदी नेमक्या प्रकारे आणि वेळेत मांडण्याचे कौशल्य माझ्याकडे असल्यामुळे लेक्चर सुंदर झाले. आभारानंतर प्रा पार्क यांनी माझा सन्मान केला. त्यानंतर आम्ही विविध प्रयोगशाळां तसेच संशोधन सुविधांना भेटी दिल्या. तिथे उत्तम संशोधन संसाधने पाहायला मिळाली. अत्याधुनिक सुविधांसह या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये अनेक संशोधन केंद्रे आहेत.

  

प्रोफेसरने आम्हाला त्याच्या रिसर्च ग्रुपसोबत कुकू या जपानी रेस्टॉरंटमध्ये दुपारच्या जेवणासाठी नेले. त्यावेळी मी मशरूम क्रीम सूप, सुशी, फ्रेंड कोळंबी, पिझ्झा, एग फ्राईड राइस, टेंडर चिकन, उडोंग, ज्यूस, राइस केक, चीज बॉल्स, लोणचे,  क्रॅब, सॅल्मन फिश, किमची, केक्स, बटर कुकीज, आईस्क्रीम इ. पदार्थ खाल्ले. जापनीज पद्धतीचे जेवण खाण्याचाही माझा पहिलाच योग असल्याने खाताना तेव्हढा आत्मविश्वास नव्हता. पण किरण सोबत असल्याने त्याने सांगितले तेव्हढेच पदार्थ डिश मध्ये घेतले. पण पोट अगदी फुल्ल झाले.


या जेवणावेळचा एक मजेशीर किस्सा आठवणीत आहे. किरण ने मला मिरचीच्या ठेच्या सारखा वसाबी हा पदार्थ सॉर्स मध्ये मिक्स करून थोडाच आणि जपून टेस्ट करायला सांगितला. मला वाटले मी तो सॉर्सविना सहज खाऊ शकतो कारण तो इथल्या खर्ड्यासारखाच वाटला. म्हणून चिमूटभर तोंडात टाकला. क्षणार्धात तोड बधीर आणि नाक, डोळे आणि कान यातुन जाळ आणि धूर सोबत येऊ लागला. डोळ्यातून पाणी आले. काही सेकंद काहीच सुचत नव्हते. तो सडन-स्ट्रोक होता. ती तेथील मिरची होती. पुन्हा मात्र काळजीपूर्वक घेतल्यावर असा त्रास झाला नाही. माझ्या डोक्यातील तो तेथील मिरचीचा खर्डा नव्हता तर ती तिखट मूळ असलेल्या वसाबी रोपाची पेस्ट होती. ही सुशी, साशिमी आणि सोबा सारख्या अनेक पदार्थांमध्ये मसाला म्हणून वापरली जाते.  

मस्त जेवण करून आणि प्रोफेसरचे आभार मानून निरोप घेतल्यानंतर आम्ही ताबडतोब इक्सानच्या दिशेने जाण्यासाठी गाडीत बसलो. दीड तासात इक्सानला पोहोचलो. त्या तीन दिवसांत, उत्साही किरणने मला त्याच्या कारमध्ये देजॉन आणि आसपासच्या परिसरात फिरवले होते . त्याने न थकता दोन-दोन तास नॉन-स्टॉप गाडी चालवली. जिओनबुक नॅशनल युनिव्हर्सिटीमधे महादेव आणि त्याचे प्राध्यापक जुम सुक जंग आमची वाट पाहत होते. औपचारिक परिचय आणि चहापानानंतर मी त्यांना माझ्या कोरिया भेटीचा उद्देश सांगितला. आमचे फोटोकॅटॅलीसीस हे संशोधन क्षेत्र एकच असल्याने सेमिनार आयोजित करण्यासाठी योग्य वक्ता मिळाल्याचा त्यांना आनंद झाला. आमच्या प्रवीण आणि महादेव या दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली  कष्ट उपसले आहेत. स्पष्टपणे सांगायचे तर, त्याने या दोन मुलांकडून बरेच संशोधन काम करून घेतल्यामुळेच तेथील संशोधन निर्देशांक सुधारले होते.  प्रवीणला त्यांच्या शिफारशीमुळेच अमेरिकेत आणखी एक संशोधन शिष्यवृत्ती मिळाली आहे . पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे विद्यार्थी मेहनती असावे लागतात. रुतुराज नावाचा नॅनो सायन्स विभागाचा आमचा दुसरा विद्यार्थी देखील तिथे पोस्ट डॉक म्हणून काम करतो. फोटोकॅटॅलिसिस संशोधनाशी संबंधित सर्व उपकरणे प्रयोगशाळेत ठेवण्यात आली आहेत. महादेव आणि रुतुराज यांनी आम्हाला त्यांची नवीन विकसित केलेली प्रयोगशाळा दाखवली. सर्व परिचित उपकरणांसह त्यांनी प्रयोगशाळेची झलक दिली. त्यांच्या प्रोफेसर आणि रिसर्च टीमच्या प्रयत्नांनी मी प्रभावित झालो.

 
तेथील विविध विद्यापीठांमध्ये व्याख्याने देण्यासाठी मी माझे सादरीकरण दोन भागात विभागले होते; पाहिल्यामध्ये, विद्यापीठ, संशोधन आणि माझे संशोधन प्रोफाइल समाविष्ट केले होते तर दुसऱ्या भागात त्यांच्या निवडलेल्या विषयावर सादरीकरण असायचे . मी निवडक आणि स्वयंस्पष्टीकरणात्मक स्लाइड्ससह माहिती सादर केली. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान त्यांना व्याख्यान समजल्याची पावती होती. त्यांच्या प्राध्यापकांनी चर्चेदरम्यान सक्रिय सहभाग नोंदवून व्याख्यानमाला यशस्वी केली. मी शिफारशी केलेल्या माझ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी घेवू, असे त्यांनी आश्वासन दिले. व्याख्यान झाल्यानंतर येथील प्रोफेसरने देखील जपानी कुकू रेस्टॉरंटमध्ये डिनरला नेले.  पोट फुल्ल होतेच पण त्याचा आग्रह मोडता येत नव्हता. तुम्हाला कंपनी देतो म्हणून सांगितले खरे पण पुन्हा एकदा भरपेट जेवलो. हे जेवण देखील स्वादिष्ट होतेच त्यात प्रोफेसरचा आग्रह होताच.

खरंतर आमचा इक्सानमध्ये विद्यापीठाच्या अगदी जवळ असलेल्या महादेवच्या घरी राहण्याचा विचार नव्हता कारण डेजॉनला परत जायचं होतं. आम्ही तिथे खरेदीसाठी थोडा वेळ घालवला आणि त्याच्या घरी बराच वेळ थांबलो. उशीर होत असल्याने आम्ही आमचा विचार बदलला आणि इक्सानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. 

पुढचे व्याख्यान दुसऱ्या दिवशी, १६ मे रोजी इक्सानच्या दक्षिणेस सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्वांगजू शहरातील चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आले होते. आम्ही सकाळी लवकर ऋतुराज ने बनवलेला नाश्ता केला आणि किरण, महादेव आणि रुतुराज यांनी मला ८.१५ वाजता इक्सान बस टर्मिनलवर निरोप दिला. दक्षिण कोरियाच्या त्या प्रवासात माझ्या सोबत कोणतरी विद्यार्थी असायचा. यावेळी मी एकटा प्रवास करणार होतो. स्थानिक भाषेचे अज्ञान असल्याने एकट्या प्रवासाची भीती वाटायची. पण संतोषने मला दिलेल्या मोबाईल सिमकार्डने माझा आत्मविश्वास वाढवला. त्यावरून कॉल करता येत तर होताच पण इंटरनेट सुद्धा ब्राउझ करता येत होती.

अंदाजे दोन तासानंतर म्हणजे सव्वा दहाच्या दरम्यान बस ग्वांगजू बस टर्मिनल ला पोहोचली. अपेक्षेपेक्षा दहा मिनिटं बस अगोदर पोचल्यामुळे मला तिथे  थोडी वाट पाहावी लागली. सावंता मला रिसिव्ह करायला त्याच्या गाडीतून आला होता. बस टर्मिनल पासून चार पाच किलोमीटर वर असणाऱ्या चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटीच्या गेस्ट हाऊस मध्ये त्याने मला सोडले.

सावंताच्या घरी दुपारी जेवणाचा बेत होता, जिथे सावंताची पत्नी आणि माझी विद्यार्थिनी ज्योती हिने छान भारतीय रेसिपी बनवली होती. चपाती, पापड, काकडी, पनीर मसाला, गुलाबजाम तसेच फक्कड आणि खुशखुशीत भजी !  दोघेही माझे विद्यार्थी ! त्यामुळे दोघेही माझे आदरातिथ्य आणि उत्कृष्ट भोजन देण्यास उत्सुक होते. मला पोटाची काळजी घ्यावी लागत होती तरी भरपेट जेवलो, विशेष करून भज्जी ! त्यांचे घर आणि पाहुणचार पाहून मी भारावून गेलो.

गेस्ट हाऊसवर थोडी विश्रांती घेऊन दुपारी अडीच वाजता पुढच्या कामासाठी सज्ज झालो. त्यानंतर आम्ही मटेरियल सायन्स अँड इंजिनीरिंग विभागात प्रा. जे.एच. किम यांच्या प्रयोगशाळेला भेट दिली जिथे आमचे ७ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करत आहेत. लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या बहुतेक माजी विद्यार्थ्यांनी प्रा किम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पोस्ट-डॉक केले आहे . आमच्या प्राध्यापकांनीही त्यांच्या प्रयोगशाळेत फेलोशिपवर काम केले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ आणि चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटी यांच्यामधला तो महत्त्वाचा दुवा ठरतो. आम्हीदेखील त्यांच्यासोबत १५ संशोधन लेखांद्वारे संशोधन सहकार्य केले आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर आम्ही केमिकल इंजिनीरिंग विभागात गेलो, जिथे प्रा. सी.के. हाँग यांनी माझे व्याख्यान दुपारी ४ वाजता आयोजित केले होते.माझ्या व्याख्यानाच्या आयोजनाची तसेच निवासाची व्यवस्था याबाबत संपूर्ण जबाबदारी सावंता ने घेतली होती. सावंताच्या सांगण्यावरूनच प्राध्यापक हाँग यांनीही व्याख्यान आयोजित केले होते. माझी सर्व व्याख्याने तेथे संशोधन करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांनी आयोजित केली होती. मला माहीत नसतानाही माझ्या विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून सर्व प्राध्यापकांनी माझी व्याख्याने आयोजित केली हे विशेष आणि कौतुकास्पद आहे. त्यांचे आदरातिथ्य अविस्मरणीय होते आणि माझी व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त होती. 

मी सुरुवातीला प्रोफेसर किम आणि हाँग यांचा सन्मान केला आणि त्यांना विभागाची संशोधन परिसंस्था पुस्तिका दिली. त्यानंतर प्रोफेसर हाँग यांनी मला सन्मानीत केले. दोघांनीही गळाभेट घेतल्याने स्नेहभाव दृढ झाला. माझ्या व्याख्यानाचे अगदी नेटके आयोजन केले होते. सुमारे ४० संशोधक व्याख्यानासाठी उपस्थित होते. प्रत्येकाला एक्सपीएस समजावून सांगण्यात मी यशस्वी झालो. प्रश्नोत्तराचे सत्र बराच वेळ चालले ज्यात प्रा किम यांनीही सहभाग नोंदवला. मी त्यांना माझ्या धारणेनुसार उत्तरे दिली आणि त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. प्रोफेसर हाँग यांनी दिलेली भेटवस्तू अप्रतिम आहे ज्यावर माझे नावदेखील प्रिंट केलेलं आहे. सावंताने इतकी छान तयारी केली होती की हॉलमध्ये प्रेझेंटेशन स्क्रीनच्या वरच्या बाजूस त्यांनी एक छान बोर्डही लावला होता. त्यावर माझे नाव आणि व्याख्यानाचा विषय नमूद केला होता.

व्याख्यानानंतर आम्ही प्रो. हाँग यांच्या प्रयोगशाळेला भेट दिली जिथे सावंता आणि ज्योती पेरोव्स्काईट सोलर सेलवर संशोधन करत आहेत. सोलर सेल्स तयार करण्यासाठी आणि त्यांचे गुणधर्म तपासणीच्या दृष्टीने प्रयोगशाळा स्वयंपूर्ण आहे. त्याने मला सोलर सेलची तपासणी करून दाखवली. एकूणच सोलर सेल संशोधनात त्याने हातखंडा मिळवला आहे. या प्रयोगशाळेबरोबरच त्यांची रबर तपासणी प्रयोगशाळा देखील उत्तम आहे. वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल कार कंपन्यांचे रबर तपासणी युनिट देखील प्रभावी आहे. विशाल आणि प्रतीक हे विद्यार्थी देखील लेक्चरनंतर मला तिथे भेटले आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या.  प्रा हाँग यांनी मला तसेच त्यांच्या रिसर्च ग्रुपला डिनरसाठी विद्यापीठाजवळीलच फिगारो या इटालियन रेस्टॉरंट मध्ये आमंत्रित केले होते. मेनू मध्ये पास्ता, पिझा, मेक्षिकन ग्रील, फ्रेंच फ्राईज तसेच व्हेज सॅलड होते. तोपर्यंत मी कोरियन, इटालियन आणि जपानी अशा अनेक खाद्यपदार्थांची चाचणी केली होती. कोरियन डिनर चे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकजण संध्याकाळी सहा वाजता जेवतोच. एक तर कोरियन वेळ आपल्यापुढे (भारतीय वेळेच्या) साडेतीन तास ! त्यात डिनर सहा वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार साडे सहा तास अगोदर डिनर. त्यामुळे माझ्यासाठी डिनर ची वेळ झाली म्हणून जेवणे झाले तेव्हा.. जड झाले सर्व.   

दुसऱ्या दिवशी (१७ मे) ग्वांगजूच्या पूर्वेला ७० किमी अंतरावर असलेल्या सनचेऑन नॅशनल बे गार्डनला भेट देण्याचे आणि नंतर संध्याकाळी केटीएक्स ने ग्वांगजूहून सेऊल ला जाण्याचे नियोजन होते. सकाळी तिथे पोस्ट डॉक करणाऱ्या संग्राम च्या घरी नाश्ता  केला. साडेअकरा दरम्यान ज्योती, मी आणि सावंता त्याच्या कार मधून निघालो. हा हायवे म्हणजे बहुतांशी दरीवर बांधलेल्या पुलावरून जाणारा रस्ता आहे. झाडीझुडपांनी वेढलेल्या डोंगर भागातून प्रवास करताना नयनरम्य नैसर्गिक देखावे पाहण्यासारखे. साधारण दिड तासात आम्ही तिथे पोहोचलो.

 


विस्तीर्ण गार्डन मध्ये प्रवेश करताच मन प्रसन्न झाले. मुख्य उद्यान क्षेत्र २७५ एकर आणि सुमारे ७००० एकर खाडी आहे. आर्बोरेटम, वेटलँड सेंटर, वर्ल्ड गार्डन झोन, वेटलँड झोन असे उद्यानाचे भाग आहेत. साधारणपणे खाडीत घाण पाणी असते पण त्या खाडीत स्वच्छ पाणी होते. या नैसर्गिक प्रवाहाचा वापर करून त्यांनी त्यावर सुंदर बगीचा तयार केला आहे. सर्पिल रस्त्याने कृत्रिम शंकूच्या आकाराच्या बेटावर चढणे आणि नैसर्गिक सौंदर्याचे साक्षीदार होणे हे केवळ आश्चर्यकारक आहे. खाडीमार्गातील आकर्षक पूल हे कलेचे उत्तम नमुने आहेत. बागेत लाखो आकर्षक फुलझाडे लावली आहेत. हे उद्यान प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते. उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांची एकूण संख्या आता ४० कोटींवर पोहोचली आहे यावरून याच्या लोकप्रियतेची प्रचिती येते.
   
 

आर्बोरेटम झोनमध्ये ऑटम टिंट ट्रेल, मॅपल ट्री ट्रेल आणि मेडिटेशन ट्रेल यासह विविध मार्ग आहेत. वेटलँड सेंटर झोनमधील जुन्या शिपिंग कंटेनरवर बनवलेल्या ड्रीम ब्रिज वॉल जगभरातील मुलांनी काढलेल्या लाखो चित्रांनी सजवली आहे. येथील चालकरहित स्कायक्यूब ट्रेन मधून प्रवास करणे अगदी मजेशीर आहे. ही एक्स्पो मैदान आणि सनचेऑन बे इकोलॉजिकल पार्क दरम्यान चालते. खाडीच्या बाजूने शेतातून रेल्वे जाते. जिथे आपण यांत्रिक अवजारांसह केलेली आधुनिक शेती पाहू शकतो. वेटलँड झोन म्हणजे पर्यटकांना नैसर्गिक वातावरणाचा अनुभव घेता येतो. 

बे गार्डनची आनंददायी सहल केल्यानंतर आम्हाला सहा वाजण्यापूर्वी ग्वांगजूला पोहोचायचे होते. त्यानंतर आम्ही ज्योतीने सोबत आणलेले जेवण जेवलो. वेगाने ड्राइव्ह करत आम्ही ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या एक तास आधी ग्वांगजू शहरात पोहोचलो. मात्र गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकावर पोहोचण्यास आणखी एक तास लागला. त्यात कार पार्किंगला जागाही नव्हती. तशातच समय सूचकता दाखवत ज्योती माझी अवजड पॅसेंजर बॅग घेऊन प्लॅटफॉर्मवर थांबलेली केटिक्स ट्रेन पकडण्यासाठी माझ्यासोबत धावली. निघण्याच्या वेळेच्या दहा मिनिटे आधी आम्ही तिथे पोहोचलो. रेल्वे स्टेशनवरील रिकाम्या मिळालेल्या ठिकाणी कार पार्क करून सावंता मला निरोप देण्यासाठी वेळेत पोहोचलो. उभयतांनी मला केटीएक्स स्टेशनवर सहृदय निरोप दिला. 


  कोरिया ट्रेन एक्सप्रेस, ज्याला केटिएक्स म्हणून ओळखले जाते, ही कोरेलद्वारे संचलित दक्षिण कोरियाची हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रणाली आहे. ३५० किमी/ताशी पायाभूत सुविधा तयार केल्या असल्या तरी नियमित सेवेतील गाड्यांची सध्याची कमाल ऑपरेटिंग गती ३०५ किमी/तास आहे. ग्वांगजूपासून ३६० किमी दूर असलेल्या सेऊल च्या दिशेने प्रवास करण्यासाठी मी एकटाच केटिएक्स बुलेट ट्रेनमध्ये बसलो. खरं तर, ट्रेन न थांबता एका तासात सेऊलला पोहोचली असती, पण सेवा वेळेवर असली तरी ती अनेक स्थानकांवर थांबली होती. येथे अनेक बोगदे आहेत आणि अपघात टाळण्यासाठी रेल्वे ट्रॅक लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. ट्रॅक अशा प्रकारे जोडलेले आहेत की आम्हाला रेल्वे जॉइंट लक्षात येत नाही. विमानासारखे वाटते. वाटेत ग्रामीण भाग बघायला मिळतात. राईड स्मूथ असली तरी मला जास्त वेगाचा अनुभव घ्यायचा होता. मला अपेक्षित असलेला वेग ३०० किमी प्रति तासाच्या जवळपासही नव्हता. ट्रेन १५० किमी प्रतितास वेगाने पोहोचते तेव्हा कानात हवेचा दाब वाढतो. क्वचितच गर्दी असते. पण सेऊल ला जाणाऱ्या सर्व गाड्या आठवड्याच्या शेवटी भरलेल्या असतात.

केटीएक्स मध्ये प्रवास करण्याचा माझा पहिला वहिला अनुभव चित्तथरारक होता. बरोबर दोन तासानंतर सेऊल आले आणि दिलेल्या बोगीच्या ठिकाणी विनायक माझी वाट पाहत होता. बुलेट ट्रेन प्रवास जरी रोमांचकारी झाला असला आणि हातात कोरियन कार्ड असलेला मोबाईल असला तरी विनायक सेऊल रेल्वे स्टेशन वर दिसेपर्यंत मी काळजीत होतो. झाले काही नसते, परंतु मला सेऊल सारख्या महानगरात विनायकच्या पत्त्यावर पोहोचण्यासाठी माझे कौशल्य वापरावे लागले असते. पण विनायक अगोदरच हजर असल्याने चिंता मिटली. त्याने माझे स्वागत केले आणि आम्ही टॅक्सी मधून योन्साई परिसरातील एका डकगाल्बी रेस्टॉरंटमध्ये गेलो कारण एव्हाना डिनरची वेळ होऊन गेली होती. माझा दुसरा विद्यार्थी उमाकांत तिथे आधीच आमची वाट पाहत होता.
डकगाल्बी, किंवा डाक गाल्बी, हि एक बोनलेस चिकन, राईस केक आणि भाज्यांनी बनवलेली मसालेदार तळलेली चिकन डिश आहे. डाक म्हणजे कोंबडी आणि गाल्बी म्हणजे बरगडी. रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक टेबल खाली गॅस स्टोव्ह आणि मध्यभागी मोठे गोल ग्रिल पॅन होते. आर्डर घेतल्यानंतर थोड्याच वेळात, वेटरने लाल मसालेदार मॅरीनेट केलेले चिकन, ताजे कापलेले कोबी, रताळे आणि तांदळाच्या केक गरम केलेल्या पॅनवर टाकले. काहीच मिनिटात चिकन रटरटू लागले आणि खमंग वास सुटला होता. काही काळ ढवळत डिश शिजल्यानंतर आम्ही वाढून घेतले आणि यथेच्छ आस्वाद घेतला.  

पुढील ३ दिवसांसाठी माझी राहण्याची सोय युनिव्हर्सिटी आणि विनयच्या निवासस्थानापासून १ किमी अंतरावर असलेल्या येओनहुई जंग गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली होती. जेवणानंतर आम्ही चालत जाणे पसंद केले. माझी राहण्याची सोय झाल्यावर ते त्यांच्या घरी गेले.

१८ तारखेस योनसाई विद्यापीठात दुपारी ३ वाजता व्याख्यान होणार होते त्यामुळे सेऊल मधील प्रेक्षणीय स्थळे बघायला संध्याकाळी ५ नंतर जायचे ठरले. सकाळी विनायक च्या घरी नाष्टा आटोपून विद्यापीठात जाऊन प्रोफेसर पार्क यांची भेट घ्यायचे ठरले. प्रतिष्ठित योनसाई हे कोरियामधील सर्वोत्तम खाजगी विद्यापीठांपैकी एक आहे. आम्ही प्रोफेसर ची वेळ घेऊन त्यांच्या कार्यालयात भेटलो. इतर संस्थांमधील इतर प्राध्यापकांप्रमाणे त्यांनीही मला आनंदाने अभिवादन केले आणि प्रयोगशाळेतील सुविधा दाखवण्यास सांगितले. ज्या एरोजेल पदार्थावर मी २८ वर्षांपूर्वी माझे संशोधन सुरू केले होते तेच त्यांचे संशोधन क्षेत्र आहे त्यामुळे लॅब पाहण्याची मला खूप उत्सुकता होती. येथे एरोजेलवर काम केलेल्या आमच्या सहा विद्यार्थ्यांनी त्यांच्या संस्थेत पोस्ट डॉक केले आहे, त्यामुळे त्यांच्या प्रयोगशाळेशी आमचा दीर्घकाळ संबंध आहे. या संशोधनास लागणाऱ्या सर्व आधुनिक सुविधा त्यांच्याकडे आहेत. अलीकडे त्यांनी कोटिंग आणि एनर्जी स्टोरेज प्रणालीवर काम सुरू केले आहे. उमाकांत, विनायक आणि विनायकची पत्नी वर्षा, हे तीन विद्यार्थी आता त्या लॅबमध्ये काम करत आहेत. योनसाई विद्यापीठाच्या अगदी जवळ असलेल्या उमाकांतच्या घरी आम्ही दुपारचे जेवण घेतले. वडिलांसह त्याचे कुटुंब तेथे राहत आहे. तेथे प्रत्येकजण वक्तशीर असतात. व्याख्यानाच्या इमारतीकडे जाताना वाटेत हलका पाऊस लागल्याने आम्हाला थोडा उशीर झाला, पण त्याने थोडे खजील झाल्यासारखे वाटले. इतर ठिकाणांप्रमाणे या विद्यापीठातही मी विद्यापीठ, संशोधन प्रोफाइल तसेच संशोधन कल सादर केल्यावर दुसऱ्या टप्प्यात त्यांनी निवडलेल्या फोटोकॅटॅलीसीस या विषयावर व्याख्यान दिले. विद्यार्थ्यांना व्याख्यान आवडले. विद्यार्थी तसेच प्रा पार्क यांनी जिज्ञासेपोटी भरपूर प्रश्न विचारले. एकूण त्यांनी विषयात रस घेत सुसंवाद साधला. व्याख्यानानंतर, आम्ही प्रा पार्क यांना त्यांच्या कार्यालयात भेटल्यानंतर त्यांनी माझा भेटवस्तू देऊन सन्मान केला. हे माझे दक्षिण कोरियातील शेवटचे व्याख्यान होते. मी आठ दिवसांत सहा व्याख्याने दिली होती. व्याख्यानाने मला कधीच कंटाळवाणे होत नाही. पण प्रवास, फिरणे आणि वेगळे जेवण यामुळे थोडा क्षीण येतोच. त्यामुळे सेऊलमध्ये फिरायला जाण्याअगोदर त्या संध्याकाळी गेस्ट हाऊसवर विश्रांती घेणे पसंत केले. 

 

दुपारी अमर, उमाकांत आणि विनायक सोबत सेऊलमधील महत्वपूर्ण ग्योंगबोकगुंग पॅलेस, सेजॉन्ग रोड, सांडपाणी कालवा तसेच नामसान टॉवर या स्थळांना भेट दिली. यासाठी आम्ही मेट्रोने प्रवास केला. सेऊल मेट्रोपॉलिटन सबवे ही अत्यंत कार्यक्षम मेट्रो रेल्वे प्रणाली आहे. त्यांनी जवळजवळ सहा मजले खाली ७६८ भूमिगत स्टेशन्स बांधली आहेत. मेट्रोच्या २३ व्यस्त लाईन्स आहेत. शहरातून फिरण्याचा हा सर्वात सोपा, जलद आणि कमी खर्चिक मार्ग आहे. ही सेवा पाहून अचंबित व्हायला होते. हे जमिनीखालून दळणवळण आहे हे जाणवत सुद्धा नाही. स्वच्छता इतकी कि बस्स पाहत बसावे. हि सिस्टीम कमीतकमी लोकांसह स्वयंचलितपणे कार्य करते. त्याची सवय करून घेणे सुरुवातीला थोडे अवघड असते. पण एकदा तुम्हाला प्रणाली माहीत झाली आणि कोरियन लिपी वाचता आली की, सर्व गोष्टी सोप्या होतात. तुमच्याकडे इंटरनेट मोबाईल आणि बँकिंग कार्ड असले कि झाले.

 
उत्तर सेऊलच्या उत्तरेस स्थित जवळजवळ १०० एकरमध्ये पसरलेला, ग्योंगबोकगुंग पॅलेस हा राजवाडा १३९५ मध्ये बांधला होता. ग्योंगबोकगुंग हा जोसेन राजवंशाचा मुख्य राजवाडा आणि सरकारसाठी शाही महल म्हणून वापरात होता. इम्जिन युद्धादरम्यान तो जाळण्यात आला होता परंतु नंतर पुनर्संचयित केला गेला. प्राचीन कोरियन आर्किटेक्चरची तत्त्वे जोसॉन शाही दरबाराच्या बांधकामात दिसून येतात. अलीकडे राजवाड्याचे संकुल हळूहळू मूळ स्वरूपात आणले आहे. राजवाड्यातील सर्व भाग कमी वेळात पाहणे अशक्य असते परंतु चालणे थकवणारे होते. संकुलात नॅशनल पॅलेस म्युझियम आणि नॅशनल फॉल्क म्युझियम देखील आहे. यात जोसेन राजवंश आणि कोरियन साम्राज्याच्या राजवाड्यांमधील हजारो कलाकृती आणि शाही खजिना आहेत. कोरियन लोकांच्या पारंपारिक जीवनाचा इतिहास दर्शविण्यासाठी लोक संग्रहालयाने ऐतिहासिक वस्तूंच्या प्रतिकृतींचा वापर केला आहे.

 
 
सेऊल शहरात जाणारा विस्तीर्ण सेजॉन्ग रोड राजवाड्याच्या प्रवेशद्वारासमोरून सुरु होतो. जोसेनचा राजा सेजोंग द ग्रेट यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. रस्त्याची लांबी फक्त ६०० मीटर असली तरी मध्यवर्ती स्थानामुळे त्याला प्रतीकात्मक महत्त्व आहे. शाही प्रशासकीय इमारतींचे स्थान म्हणूनही यास ऐतिहासिक महत्त्व आहे आणि त्यात जोसेन राजवंशाचे अडमिरल यी सन-सिन आणि जोसेन किंग सेजॉन्ग द ग्रेट यांचे पुतळे आहेत. या रस्त्यावरून जात असताना गगनचुंबी इमारती आणि नेत्रदीपक स्थापत्यकलेचे कित्येक नमुने पाहायला मिळतात.

पाच दशलक्ष टन सांडपाणी, मलमूत्र आणि अन्न सांडपाणी स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी सेऊल चार सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवते. सेऊल शहराच्या मध्यातून गेलेल्या या सांडपाणी कालव्यातील पाणी प्रक्रिया केलेले आहे. कालव्याशेजारून पादचारी तसेच सायकलिंगसाठी रस्ते केले आहेत. सांडपाण्याची वाहिनी असूनही, योग्य प्रक्रिया केल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडते. 


मध्य सेऊल मधील नाम पर्वतावर असलेला नामसान टॉवर शहरातील महत्वाचे ठिकाण मानले जाते. शहरातील टीव्ही आणि रेडिओ प्रक्षेपणासाठी वापरात येणारा हा रेडिओ वेव्ह टॉवर आहे. २३६ मीटर उंचीचा टॉवर मुळातच शहरातील उंच डोंगराच्या माथ्यावर असल्याने निरीक्षणाचा सर्वोच्च बिंदू येथे आहे.  येथून आपण शहराचे विहंगम दृश्य पाहू शकतो. रात्रीचे शहराचे दृश्य डोळ्यांना आनंद देणारे असते. चालून थकल्याने आम्ही  सोल टॉवरवर डबल-डेक स्काय शटल लिफ्ट वापरली. 

त्या दिवशी संध्याकाळी विनायक च्या घरी जेवणाचा बेत झाला. त्याची मुलगी विमिषा खूप गोड आहे. एव्हाना दोन तीनदा त्याच्या घरी गेल्याने ओळख झाली होती. तिला माझी सवय झाली. मलाही लहान मुलं फार आवडतात. दुपारी उमाकांतच्या घरी भरपेट जेवल्याने संध्याकाळी जेवणाची परिस्थिती नव्हती. पण चालून चालून थकल्याने भूक लागली होती. मस्त जेवण झाले आणि गप्पा झाल्यानंतर पुन्हा उशीरा गेस्ट हाऊसला गेलो.

१९ तारखेला सकाळी अमर ने त्याच्या घरी नाष्टासाठी  बोलावले होते. तो देखील योनसाय विद्यापीठाच्या परिसरात राहतो. त्याची सौ आरती देखील माझी विद्यार्थिनी ! खरंतर तो मला त्याच्या घरी जेवायला बोलवत होता. पण त्या दिवशी सकाळी पोट हलके राहावे या हेतूने मला फक्त नाश्ता करावा वाटला. त्याच्या मुलाबरोबर एक तास कसा गेला समजले नाही. 

 

तिथून विनायक सोबत सेऊल मध्ये वॉर मेमोरियल बघायला गेलो. वॉर मेमोरियल ऑफ कोरिया हे एक लष्करी संग्रहालय आहे. कोरियाच्या लष्करी इतिहासाचे प्रदर्शन आणि स्मारक करण्यासाठी लष्कराच्या मुख्यालयाच्या पूर्वीच्या जागेवर १९९४ मध्ये उभारले आहे. इथे भव्य दिव्य अशी सहा इनडोअर एक्झिबिशन रूमस तसेच  बाह्य प्रदर्शन केंद्र आहे. मेमोरियल हॉल, वॉर हिस्ट्री, कोरियन वॉर, एक्सपिडिशनरी फोर्सेस, कोरिया सशस्त्र सेना आणि मोठी उपकरणे तसेच बाह्य प्रदर्शन अशा वेगवेगळ्या थीम्स अंतर्गत प्रदर्शित केल्या आहेत. कोरियन युद्धातील लष्करी शस्त्रास्त्र युद्ध सामग्रीचा विस्तृत संग्रह आहे. त्या काळातील अनेक मॉडेल्स आणि रेकॉर्ड प्रदर्शित केले आहेत आणि प्रमुख सहभागींचा इतिहास तपशीलवार आहे. प्रदर्शनातील मांडणी इतकी सुंदर आहे कि व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरेख वापर केला आहे आणि व्हिडिओ गेम विकसित केले आहेत.

 

 

ठरल्याप्रमाणे त्या दिवशी दुपारी थोडे जेवण घेतले. आम्ही हँगंग बर्गर रेस्टॉरंटमध्ये चिकन बर्गर, फिंगर चिप्स आणि शीतपेय  घेतले. संध्याकाळी आमचे सेऊल च्या आसपासचे विद्यार्थी डिनरला भेटणार होते म्हणून विश्रांतीसाठी गेस्ट हाऊसवर गेलो. त्या संध्याकाळी आम्ही योएनसाई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला. येथे अनेक इमारती आणि लँडस्केप पाहण्यासारखे आहेत. पण आकर्षण म्हणजे स्टॅच्यू ऑफ अंडरवुड आणि अंडरवुड अडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक हॉलची जुनी भव्य इमारत. 
 
 
सेऊलमधील आमच्या विद्यार्थ्यांना सिंचॉनमधील भारतीय रेस्टॉरंटमध्ये एकत्र भेटण्याचे ठरले होते कारण वेळेअभावी त्यांच्या विद्यापीठांना भेट देणे शक्य नव्हते. त्यानुसार रात्री ८ वाजता स्नेहल, सुरेंद्र, उमाकांत, प्रशांत, मनीष, दीपक, अमर, अरविंद, अविराज, कृष्णा, विनायक, रवी भेटायला आले होते. मनीषचे कौतुक यासाठी तो चार तासांचा प्रवास करून बुसान वरून आला होता. सेऊल येथे एकमेकांना भेटून आनंद झाला आणि सर्वांनी भेटवस्तू देऊन माझे स्वागत केले. त्या सर्व भेटवस्तू माझ्यासाठी मौल्यवान आहेत. त्यांच्या संशोधनाची चौकशी केल्यानंतर, मी तोपर्यंतचा माझा कोरियातील अनुभव शेअर केला. शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेत असताना केलेल्या माझ्या प्रोत्साहनाचे प्रत्येकजण कौतुक आणि आभार मानत होता. नंतर आम्ही तिथे भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला. शिंचनमध्ये सर्वांना एकत्र भेटून मला खरोखरच खूप आनंद झाला.
 
या भेटीतील शेवटचा मुक्काम २० तारखेला अंसान या शहरात माझा पीएचडी चा विद्यार्थी संभाजी याच्या घरी होता. तो मला घेण्यासाठी दुपारी येणार होता. खर तर संभाजीने त्यादिवशी आणखी दोन ठिकाणांच्या भेटीचे आयोजन केले होते. त्यामध्ये एक प्राणीसंग्रहालय तर दुसरे समुद्रातील जलविद्युत प्रकल्प होते. पण सलग दोन दिवस चालून थकल्यामुळे आणखीन चालण्याची माझी परिस्थिती नसल्याने आम्ही ते दोन पॉईंट रद्द केले. त्याचा हिरमोड झाला पण माझा नाईलाज होता. 

मग मी दीपक आणि विनायक बरोबर मॉलमध्ये खरेदीला गेलो. खरेदी करून आम्ही बारा वाजेपर्यंत परतलो. दरम्यान मनोज आमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी योग्निनहून सेऊलला आला होता. दरम्यान, संभाजी, किरण, राजेंद्र (आरसी) आणि संतोष हेही विनायकच्या घरी पोहोचले होते. आदल्या दिवशी गेटटूगेदरसाठी येऊ न शकल्याने आरसी खास मला विनायकच्या घरी भेटायला आला होता. तेथे जमल्यानंतर पिशव्या व्यवस्थित करण्याचे महत्त्वाचे काम झाले. वर्षाने आमच्यासाठी जेवण बनवले. मग दुपारच्या जेवणानंतर संभाजी, मी आणि मनोज अनसनला निघालो. सोल नॅशनल कॅपिटल एरियाचा एक भाग असलेल्या अनसान शहर सोलच्या नैऋत्येस स्थित आहे. ते सेऊलला भुयारी मार्गाने देखील जोडलेले आहे. आम्ही भुयारी मार्ग वापरला आणि तेथे पोहोचण्यासाठी ट्रॅक बदलले. मनोज सोबत होताच. सेऊलहून अनसानला पोहोचायला दोन तास लागतात. पिवळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या लाईट हाऊसला जायचे असल्याने नयनतारा रेल्वे स्टेशनवर आमची वाट पाहत होती. तिथे जाण्यासाठी आम्ही टॅक्सी घेतली. 

 

   

तिथे जाऊन बीच बघितला. लाईट हाऊस जवळील संपूर्ण समुद्रकिनारा बांधला होता. बिचवर वेगवेगळ्या प्रकारचे जिवंत मासे वॉटर कंटेनर मध्ये ठेवले होते. तेथील माणसे कच्चे मासे खाताना आम्ही पाहिले. तिथे पाहिलेले मासे आपल्या इथल्या माशांपेक्षा अगदी वेगळे होते. त्यानंतर बीचवर फोटो काढून तिथल्या मिनी ट्रेनमध्ये सफर केली. तिथल्या हवेमध्ये प्रचंड गारठा होता. म्हणून लगबगीने आम्ही घराकडे निघालो. जाता जाता तो संशोधन करत असलेल्या हणयांग युनिव्हर्सिटी प्रवेशद्वाराजवळ काही फोटो काढले. आणि त्यांच्या घरी पोहोचलो. संभाजीची बरेच दिवस समक्ष भेट नव्हती पण  फोनवर बोलणं असे. त्यामुळे बऱ्याच गप्पा रंगल्या. विद्यापीठात काढलेल्या दिवसांच्या आठवणी जागृत झाल्या. 

नयनताराने जेवणाची उत्तम तयारी केली होती ज्यामध्ये नान, कोशिंबीर, भाजी, पालक पनीर, फ्रुट सॅलड, बटाटा भाजी, पापड याचा समावेश होता. मनसोक्त जेवलो. जेवणानंतर मनोज गेला. त्यांनी आधीच अनेक भेटवस्तू आणल्या होत्या मग जेवण झाल्यावर बाकीच्या भेटवस्तू आणल्या. घरी आल्यानंतर पुन्हा गप्पा रंगल्या आणि दुसऱ्या दिवशी प्रवास असल्यामुळे लवकर झोपी गेलो. 

दुसऱ्या दिवशी संभाजींच्या योगदानाने नव्याने उभारलेल्या बॅटरी संशोधन प्रयोगशाळेला भेट दिली. त्यांनी खरोखरच जागतिक दर्जाचे बॅटरी सेंटर उभारले आहे. संभाजीने यात प्रभुत्व मिळवले आहे. या कामावर आधारित त्यांचा शोधनिबंध गेल्या वर्षी ‘नेचर’ या जगातील सर्वोत्कृष्ट जर्नल्समध्ये प्रकाशित झाला होता. प्रयोगशाळा पाहून समाधान वाटले. माझ्यासारख्या मार्गदर्शकासाठी, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळेत काम करताना पाहणे खरोखरच एक भाग्याची गोष्ट आहे. आम्ही त्यांना त्यांच्या शिक्षण प्रवासाच्या एका टप्प्यावर आवश्यक असलेला पुश देतो, पण प्रवास त्यांच्याकडूनच घडतो. त्यामुळे त्याचे सध्याचे स्थान, प्रतिष्ठा, सन्मान आणि कौशल्य हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे, असे माझे मत आहे. असा पीएचडी विद्यार्थी घडवल्याचा मला खरोखर अभिमान आहे.
 
 

विमान दुपारी एक वाजता निघणार असल्याने मग आम्ही बसने इंचॉन विमानतळाकडे निघालो. बसमध्ये मी त्यास हिताच्या गोष्टी सांगितल्या. विनायक, संतोष, अविराज मला निरोप देण्यासाठी अगोदरच विमानतळावर पोहोचले होते. आम्ही ताबडतोब चेक-इन काउंटरवर पोहोचलो आणि बॅग एअरलाइनमध्ये जमा केल्या. सर्वानी मला हसतमुख प्रवासास शुभेच्छा दिल्या आणि १० दिवसांचा दीर्घ प्रवास संपवून मी दिल्लीकडे प्रयाण केले.

 

कोरियात भेटून सर्व विद्यार्थ्यांना आनंद झाला. शिक्षक म्हणून मलाही अत्यानंद झाला.. ही भेट अविस्मरणीय ठरली. जीवनातील सुवर्ण-कांचन योग !

(जर तुम्हाला लेख आवडला असेल तर कृपया तुमच्या नावासह कमेंट करा)


49 comments:

 1. खूप छान वर्णन केले आहे. खूप आवडले.

  ReplyDelete
 2. Dnyaneshwar Suresh GaikwadJune 4, 2023 at 4:31 AM

  Sir ,
  तुमच्या First foreign कोरिया ट्रिपचे खूपच छान Inspire लेखन केले आहे. मला खूपच आवडले.

  ReplyDelete
 3. सर 🙏अप्रतिम प्रवासवर्णन!!!!!
  तुम्ही घडवलेले विद्यार्थी हेच पुढचं भविष्य👍👍
  आपल्या कार्यकारु्तृत्वास सलाम 🇮🇳🇮🇳जयहिंद ✨️✨️

  ReplyDelete
 4. Ekdam chhan anubhav वर्णन!

  ReplyDelete
 5. सुंदर व मार्गदर्शक प्रवासवर्णन सर...

  ReplyDelete
 6. Very nice Sir....

  ReplyDelete
 7. छान लेख लिहला आहे सर..शब्दांकन छान आहे

  ReplyDelete
 8. खूप छान प्रवास वर्णन सर.

  ReplyDelete
 9. प्राध्यापक राजपुरे सर आपण दक्षिण कोरिया प्रवासाचे केलेले वर्णन अतिशय सुंदर आहे प्रत्यक्ष कोरियात गेल्याची अनुभूती होते

  ReplyDelete
 10. Lay Bhari...mi pan aalo koriya firun...khup chan

  ReplyDelete
 11. सर प्रवासाची उत्तम मांडणी केलीय.

  ReplyDelete
 12. Excellent description of study tour of South Korea. Glad to see that your all students met you in Korea. Hope to have a small book of this visit. By reading this blog with fine details, you must visit many countries in coming future 😀

  ReplyDelete
 13. Manoj Rajpure (South Korea):

  लेख वाचून खूप आनंद झाला आणि याची जाणिव होते कि, आपण संपूर्ण प्रवासाचा आनंद घेतला तसेच प्रवासादरम्यान आणि कोरियामध्ये राहताना प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींचे निरीक्षण केले आहे आणि त्याचा सारांश खूप प्रभावीपणे मांडला.
  तुम्हाला प्रत्यक्षपणे कोरियात भेटून खूप आनंद झाला. तुमचा प्रवास यशस्वी झाला आहे याबद्दल मी समाधानी आहे.

  ReplyDelete
 14. सर तुमचे प्रवास वर्णन ऐकून अगदी स्वतः तेथे गेल्याचा भास होतो

  ReplyDelete
 15. खूप छान सर

  ReplyDelete
 16. ऊत्तम tapshlilasah

  ReplyDelete
 17. Excellent details worth reading diary

  ReplyDelete
 18. खुप सुंदर सर

  ReplyDelete
 19. आपण कोरिया प्रवास वर्णन खूपच सुंदर केले आहे. त्यामुळे कोरिया ला जाऊन आल्याचा भास होतो आहे.
  आपले विद्यार्थी त्यांनी केलेले आपले आदरातिथ्य अवर्णनीय.
  खरतर विद्यार्थी म्हणजे भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा असतात. गुरु-शिष्य नातं यावरच तर टिकून असते.
  कोरियातील महत्वाची ठिकाणे, तेथील निसर्ग सौंदर्य, खाद्यसंस्कृती सगळेच अफलातून..
  एकंदरीत आपला अभ्यास दौरा खूपच सुंदर झाला याबद्दल आपले व आपल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन..

  ReplyDelete
 20. फार छान प्रवासवर्णन लिहिले आहे. तुमच्या सोबत कोरियाचा दौरा आम्हीही केला अशी अनुभूती लेख वाचल्यामुळे आली.

  ReplyDelete
 21. प्रवास वर्णन वाचताना फोटो ची जोड हे जास्त वाचन करण्याला खिळवून ठेवते, वाचता वाचता एक नविन देश फिरून झाला .
  We all proud of you sir .

  कोल्हापूर ला आलो की भेटतो

  ReplyDelete
 22. सुहास अनपटJune 4, 2023 at 11:44 PM

  प्रवास वर्णन वाचताना फोटो ची जोड हे वाचन करण्याला खिळवून ठेवते, वाचता वाचता एक नविन देश फिरून झाला .
  We all proud of you sir .

  कोल्हापूर ला आलो की भेटतो

  ReplyDelete
 23. अतिशय सुंदर लिखाण अप्रतिम वर्णन सर आपण आपल्या या लेख द्वारे केलेले आहे.
  सुरुवातीपासूनच आपला स्वभाव हा मन मेळावा आहे त्यामुळे आपण सहज त्यांच्यामध्ये मिसळून गेलेले असतात या कामाला शंका नाही.
  हा लेख वाचताना आपल्या सहवासाची मला जाणीव झाली ओके नाईस पिक्चर थँक्यू सर...

  ReplyDelete
 24. शाहू बाबरJune 5, 2023 at 12:25 AM

  आपल्या या लेख द्वारे केलेले आहे.
  सुरुवातीपासूनच आपला स्वभाव हा मन मेळावा आहे त्यामुळे आपण सहज त्यांच्यामध्ये मिसळून गेलेले असतात या कामाला शंका नाही.
  हा लेख वाचताना आपल्या सहवासाची मला जाणीव झाली ओके नाईस पिक्चर थँक्यू सर...

  ReplyDelete
 25. अप्रतिम कोरिया चे अनुभव वर्णन केले आहे .

  ReplyDelete
  Replies
  1. Rajashree Pawar, PuneJune 5, 2023 at 7:25 AM

   अप्रतिम कोरिया अनुभवकथन केले आहे

   Delete
 26. खूप छान अनुभव कोरियन ट्रिप चा वर्णन केला आहे सर त्यातल्या त्यात म्हणजे त्या जागेची नवे तर अवघडच 👏

  ReplyDelete
 27. सर,प्रवास वर्णन खूपच छान आहे.तुमच्या सोबत प्रवास koreya ट्रिप केल्यासारखा अनुभव आला.

  ReplyDelete
 28. अतिशय सुंदर लिखाण अप्रतिम वर्णन सर आपण आपल्या या लेख द्वारे केलेले आहे.

  ReplyDelete
 29. I can see you have had a great fun there. Nice blog Sir ... Keep them coming, we are enjoying your blogs a lot.

  ReplyDelete
 30. Vishnu Pawar...डॉक्टर,
  पहिलेच वाक्य 40 मिनिटे लागतील हे वाचायला इथून जो पद्धतशीर पना चालू झाला ते अगदी लेख संपे पर्यंत.
  अगदी बारीक गोष्टींचा अचूक उल्लेख केल्याने खरेच आम्हीही त्या सफरीवर आहोत की काय असे वाटायला लागले.
  अनेक पाककृती समझल्या.
  आपल्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली आपुलकी ही आपण किती आत्मीयतेने शिकवले आहे याची पावती असावी.
  इंडियन टॅलेंट काय असते ते तू सगळ्यांसमोर मांडलेस याचा खूप अभिमान वाटतो.
  फोटोग्राफी त्याची क्लारिटी व अचूकपणा यामुळे आमच्या मनात काहीही प्रश्न राहिले नाहीत.
  इतका लेखा जोखा तूच करू शकतोस आणि आम्हालाही प्रवास वर्णन कसे करावे, कसे असावे याचा धडा मिळतो.
  अनेक स्तरावर झालेले तुझे कवतुक,विद्यार्थ्यांनी दाखवलेली आपुलकी,कोरियन बांधवांनी दिलेले प्रेम आणि तुझी मांडणी...सुंदर...अती सुंदर....
  भविष्यात अजून आम्हाला असे खूप क्षण पाहायचे आहेत...
  आणि तू ते दाखवशीलच....
  माझ्याकडून तुझ्या कार्याला सलाम...🙏🏿🙏🏿

  ReplyDelete
 31. सर आज तुमचा कोरिया डायरी ब्लॉग वाचला अतिशय छान सुंदर प्रवास आपण लिहिला आहे

  आपण खुप कामी वेळेत खुप ठिकाणी भेट देऊन तिथल्या बर्याच गोष्टी अनुभवल्या, पाहिल्या

  खुप छान वाटले

  तुमची नेहमी प्रमाणे असणारी कामाची आणखी प्रत्येक गोष्ट जाणुन घ्यायची चिकाटी हीच आम्हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देते🙏

  ReplyDelete
 32. अनपटवाडी ते कोल्हापूर( शिवाजी विद्यापीठ) ते दक्षिण कोरिया हा प्रवास खरोखरच अचंबित करणारा आहे, खूपच छान प्रवास वर्णन केले आहे, आम्हीही तुमच्या बरोबर फिरून आल्यासारखे वाटले इतकं सुंदर लिखाण केले आहे, ..

  ReplyDelete
 33. सर तुम्ही कोरियाचे अप्रतिम वर्णन आणि अनुभव कथन या ब्लॉगद्वारे केलेले आहे. प्रवास वर्णन आणि त्याला फोटोंची जोड पाहून वाटतंय की आपणच ही ट्रिप अनुभवतोय.

  ReplyDelete
 34. आदरणीय गुरुवर्य नमस्ते , आपण प्रवासाची अतिशय सुरेख अशी मांडणी केली आहे. आपल्या गुरुप्रेमाला जागून तिथे असणाऱ्या शिष्य लोकांनी आपले खूप चांगले आदरातिथ्य केले आहे. वाचनातून एक कळाले आपण तिथे भारतात च फिरत आहात असे वाटले. कारण सर्वच तुमच्या परिचयाचे असल्याने तुमच्या लिखाणातून वेगळा मुलुख व दडपण दिसले नाही. अगदी जेवणापासून ते प्रवास कसा आनंदी झाला हे वाचायला मिळाले.
  एकंदरीत अनेक विद्यापीठ व आपले विद्यापीठातील मुले आपले नाव उज्वल करत आहेत. आमच्या परिस्थिती नुसार आम्हाला जाता आले नाही याचे थोडे ....वाटले.
  फोटो पाहून आम्ही ही फिरत आहोत असे जाणवले.

  ReplyDelete
 35. आदरणीय केशवजी आप्पा सर.... अभिनंदन 💐👏 अप्रतिम साऊथ कोरिया टूर..

  ReplyDelete
 36. अद्भुत प्रवास वर्णन !!!! सर .

  ReplyDelete
 37. Respected sir, yesterday night ,I got opportunity to read,
  I had read all Korea Diary on your page,
  It was totally thrilling and adventures experience for me. Your experience about your each students was very overwhelming, it shows the pure relationship between teacher and students and respect for each other. I want to add one more thing, I had experienced the Korea visit , the places and the beauty of korea to through this article.
  Thank you very much sir for giving me this opportunity to experience Korea

  ReplyDelete
 38. आदरणीय सर,
  खूप छान भाषेत आपण कोरिया प्रवास वर्णन केले आहे. खूपच प्रेरणादायी.
  - उमेश शेंबडे

  ReplyDelete
 39. Dr. Sandeep WategaonkarJune 10, 2023 at 8:03 PM

  प्रवास वर्णने भरपूर बघितली हे प्रवास वर्णन जरा हटके आहे कारण यात विद्यार्थ्यांची शिक्षकांप्रती असणारी ओढ ध्यानात येते. स्टेशनवर पोहोचण्याआधी आपला विद्यार्थी तिथे येऊन आपली वाट बघतोय, एका शिक्षकाला आयुष्यात आणखी काय हवे? मला वाटतंय की सर, आपण दिलेली शिकवण व संस्कार ते कोरियात राहिले तरी विसरले नाहीत. बाहेरच्या जेवणापेक्षा घरातील जेवण आणि ते ही कोरियात खूप छान अनुभूती आहे. प्रत्येक भेटीतून खूप चांगला संदेश देण्याचे काम आपण केले आहे. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा सर
  डॉ.संदीप वाटेगावकर
  रिसर्च डायरेक्टर, डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे

  ReplyDelete
 40. आदरणीय सर, अतिशय सुंदर आणि परिपूर्ण प्रवासाचा आनंद देणारे तुमचे कोरिया प्रवास वर्णन प्रत्यक्षात अनुभूती देणारे आहे. तुमचे फोटो बघून आणि अनुभव वाचून आयुष्यात एकदा तरी कोरियाला जाण्याची इच्छा मनात येत आहे. विस्तृत पण गुंतवून भान विसरायला लावणारे वर्णन वाचून आनंद झाला. खूप छान

  ReplyDelete
 41. I am fortunate to be a student of an international scientist, researcher, motivational professor, energizing athlete, prolific writer, enthusiastic personality in every field of life. Despite the stress of research and lectures, your accurate observations of Korea demonstrates your world-class leadership qualities. Very nice travelogue sir.

  ReplyDelete
 42. अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैलीत आपण प्रवास वर्णन केले आहे. प्रत्येक दिवसाचे फोटोसहित आणि अतिशय बारकाईने केलेल्या या कोरिया प्रवासवर्णनाने प्रत्यक्ष जाऊन आल्याचे भासते. तेथील आपल्याच विद्यार्थ्यांनी केलेले तुमचे आदरातिथ्य पाहून तुमची विद्यार्थ्यांमधील असलेली आपुलकी दिसते. खुप छान लेख आहे सर.

  ReplyDelete
 43. Very nice article sir! I got experience about korea from your article. Excellent observation! Thank you

  ReplyDelete
 44. We are proud of you 💪.
  Best wishes for future 🙏🙏 we are became vice chancellor of shivaji University kolhapur...🎉🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...