भैरवनाथ मंदिर बावधन
भारत हा संस्कृतीप्रधान देश असून वैदिक काळापासून अध्यात्माबद्दल श्रद्धा बाळगून आहे. पाशिमात्य लोक भौतिकवादाला प्राधान्य देतात. जगाची निर्मिती करणारी परमेश्वर ही प्रचंड शक्ती असून या दिव्य शक्तीची पूजा केली पाहिजे अशी बहूतांची धारणा आहे. देव-दानव, सत्य-असत्य, पाप-पुण्य, खरे-खोटे या कल्पना आध्यात्मवादाच्या मूळ आहेत. वैदिक काळात लोकांनी पंचमहाभूतांसारखी दैवते निर्माण केली व त्यांना संतुष्ट करण्याच्या पध्दती ठरवून घेतल्या. तेव्हा लोक सूर्य, नाग, वरुण, नदी, इंद्र, अग्नी, वायू इत्यादी देवतांची उपासना करत. कालांतराने मानवाचे कल्याण करणारे ब्रम्हा, विष्णू, महेश अर्थात शिव, राम, कृष्ण इत्यादी अवतारी पुरुष ही दैवते म्हणून मानली जावू लागली. अद्यापही भाविक जीवन कल्याणासाठी या देवतांची मनोभावे उपासना करताना दिसत आहेत.
भारतीय संस्कृतीत हिंदू लोक एकच देव आहे असे मानतात. गॉड इज वन या कल्पनेप्रमाणे हिंदू धर्मीयांचा महादेव किंवा शंकर हा आदी देव आहे. सृष्टीतील निर्मिती आणि लय यामधील ताळमेळ साधण्याचे काम महादेव या संकल्पनेचे मूळ आहे. त्याचे वस्तीस्थान हिमालयात बद्रीनाथ या ठिकाणी आहे अशी धारणा आहे. मानवी जीवनातील दुःखे नाहीशी करून मनुष्याला स्वर्गप्राप्ती करून देणारा देव म्हणजेच श्री शंकर. म्हणूनच शंकराची आराधना पूर्वांपार चालत आहे.
शंकर ही देवता कलियुगातील असून तीचा काळ सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचा मानतात. याबाबत एक पुराणकथा आजही सांगतात आणि अनेकांचा त्यावर विश्वास आहे. काळाच्या ओघात दक्षिणेकडे समाजात दुःख दारिद्र्य निर्माण झाले. समाजात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, दंभ या षडरीपुंनी स्वैराचार माजवून समाजाची पिळवणूक सुरू केली. अनेक राक्षशी प्रवृत्तींनी धुमाकूळ घातला आणि जनमाणसांना हैराण करून सोडले होते. म्हणून श्री शंकराला अनेक मानव रूपे धारण करावी लागली होती अशी श्रद्धा आहे. केदारेश्वर, ज्योतिबा, खळेश्वर अशी नावे धारण करून त्यांनी अनेक राक्षसांशी युद्ध केली. या युद्धात जम्मूकासुर, कोल्हासुर, रत्नासुर, करवीरसुर, महिषासुर इत्यादी राक्षसांचा नाश करविला. ही युद्धे चालू असतानाच "भैरवनाथाने" श्री शंकर उर्फ जोतीबास अत्यंत मोलाचे सहाय्य केले असे मानले जाते. श्री शंकराचे जे बत्तीस कोटी सैन्य होते त्या सैन्याचे सरसेनापतीपद भैरवनाथाकडे होते. भैरवनाथ तथा भैरोबाला शकटभैरी, काळभैरव, बालभैरव, गंडभैरव, कमलभैरव अशा अनेक नावाने ओळखतात.
अशातऱ्हेने केदारनाथ उर्फ जोतिबा दक्षिणेकडे अनेक युद्धे करीत चालले होते. सरसेनापती म्हणून भैरवनाथ त्यांना सहाय्य करत होते. याच वेळी या सुरा- असुरांच्या युद्धात लक्ष्मी, यमाई, चोपडाई, तूकाई, मोकलाई, चपटा देवी, इंद्रायणी देवी इत्यादी देवतांनी जोतिबाला युद्धांमध्ये मदत केली असा उल्लेख आढळतो. या सर्व देवतांनी युद्धात रक्तभोज, जम्मूकासुर, कोल्हासुर, रत्नासुर, करवीरसुर, महिषासुर इत्यादी राक्षस ठार मारले. अर्थात ज्या ज्या ठिकाणी हे राक्षस ठार मारले त्यांच्या नावावरून त्या ठिकाणाला गावांची ती ती नावे पडल्याचे दिसते. उदा. कोल्हासुर-कोल्हापूर, कारवीरसुर- करवीर, रत्नासुर-रत्नागिरी, महिषासूर-म्हसवड इत्यादी.
अशा रितीने देव आणि राक्षस यांची तुंबळ युद्ध होऊन अनेक राक्षस मारले गेले. या युद्धाच्या वार्ता देवतांना वारंवार मिळत असत. त्यात सरसेनापती भैरवनाथ यांच्या पराक्रमामुळे देव-देवता हरखून जात आणि त्यांच्या तोंडून आपोआपच उद्गार निघत "छान, चांगला भला आहे". त्यानंतर विजयाच्या "चांगभल" अशा आरोळ्या दिल्या जात. "चांगभल " याचा अर्थ -चांगला भला- देव मिळाला. अशा तऱ्हेने सर्वत्र विजय संपादन करून केदारनाथ रत्नागिरीच्या डोंगरावर आले. त्या ठिकाणी केदारनाथांवर अभिषेक झाला. देवदेवतांनी केदारनाथाची पूजा केली. श्रावण शुद्ध षष्ठीला ही पूजा झाली. सर्व देवतांनी केदारनाथापुढे लोटांगणे घातली आणि केदारेश्वराचा जयघोष केला. अशारीतीने रत्नागिरीच्या डोंगरावर केदारेश्वर उर्फ जोतिबा यांचे ठाण निर्माण झाले.
वरील सर्व विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की देवदानवांच्या युद्धात भैरवाला सरसेनापती पद स्वीकारावे लागले होते. एका वीर योद्ध्यासारखी लढाई करून भैरवनाथाने दानवांचा पाडाव केला होता. युद्धात देव देवतांचा विजय झाला. भैरोबाच्या या पराक्रमावर खूश होऊन सर्वांनी त्याचा उदोउदो केला. चांगभले च्या आरोळ्या दिल्या. गावोगावी या देवतेची स्थापना करून त्याची मनोभावी पूजन आणि उपासना सुरू झाली. भैरोबाला अतीसांग, संहार, सुरू, ताम्र काळभैरव, महाभैरव अशी अनेक नावे असली तरी महाराष्ट्रातील सामान्य लोक या देवाला भैरोबा किंवा बहीरोबा असे म्हणतात. खरे पाहिले तर भैरोबाची गणना क्रूर देवतात होते. परंतु सामान्य माणसाच्या नवसाला पावणारा हा देव असल्याने सर्वांनाच तो प्रिय आहे. या देवाची मूर्ती उभी असून उजव्या हातात डमरू व डाव्या हातात त्रिशूळ आहे. कटीला सापाचे वेस्टन आहे. चेहरा उग्र असून चार हात आहेत.
सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील बावधन गावची ग्रामदेवता भैरोबा हीच असून गावचा मुख्य देव हाच आहे. सर्व जाती-जमातीतील लोक बगाड हा या देवतेचा वार्षिक उत्सव अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. हा उत्सव गेली कित्येक वर्षे परंपरेने साजरा होतोय व आजही हा उत्सव म्हणजे महाराष्ट्रातील एक आव्हानात्मक, रोमांचकारी, जोखीमभरा व कुतूहलपूर्ण उत्सव आहे.
या ग्रामदेवतेचे मंदिर ऐतिहासिक आणि पुराणकालीन असून गावच्या आग्नेयेस स्थित आहे. मंदिराला भोवताली १०० फूट बाय १५० फूट जागेत घोटीव दगडांचा तट आहे. नाथांचे मंदिर दक्षिणाभिमुखि असून मुख्य दरवाजातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला भव्य आणि दिव्य अशा दीपमाळा भक्तांचे स्वागत करतात. प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला भक्तांना तात्पुरती यात्रेच्या वेळी किंवा कायमची वस्ती करण्यासाठी धर्मशाळा वजा खोल्या असून सध्या त्यापैकी काही खोल्यात बगाडाची निकामी झालेली परंतु पवित्र असलेली लाकडी ठेवलेली आहेत. मुख्य मंदिर २० फूट बाय २० फूट जागेत तर लगतचा गाभारा तितक्याच आकाराचा आहे. दर्शन मंडप अंदाजे ४० फूट लांब आहे. देवालयाच्या आवारात गेल्यावर भैरोबा देवाच्या मंडपात आपण प्रवेश करतो. सन १९७१ मध्ये या मंदिराच्या मंडपाचा जीर्णोद्धार गावकऱ्यांनी करून मंडपाचे संपूर्ण काम सागवानी लाकडांनी केले आहे. नक्षीदार वेलबुट्टी व हंड्या झुंबर यांनी देवालयाचा मंडप सजवलेला आहे. प्रशस्त मंडपात भक्तमंडळी ध्यानधारणा करतात, विश्रांती घेतात. अशा प्रकारचा प्रशस्त मंडप सहसा कोठेच पहावयास मिळत नाही.
त्यानंतर आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो. संपूर्ण गाभाऱ्याचा भाग घोटीव दगडांनी तयार केला असून सिंहासन देखील घोटीव दगडांनी बांधलेले आहे. अलीकडे गाभाऱ्याचा जीर्णोद्धार करून मार्बल बसवले असले तरी मूळ गाभारा व सिंहासन हे कोरीव दगडी कामात बांधलेले आहे. भैरोबा आणि पत्नी जोगूबाई यांच्या मूर्ती सिंहासनावर बसवलेल्या असून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला देवाची पालखी निघते. भैरोबाचे मूळ ठाण पाची देवळात आहे. पाची देऊळ गावच्या उत्तरेस असलेल्या सोनजाईच्या डोंगरात जवळजवळ एक किलोमीटरवर आहे.
गावातील सध्याच्या नाथांचे देवळाचे काम हेमाडपंती रचनेत बांधलेले, अठराव्या शतकात कानिटकरांनी केले असून कळसाचे काम नक्षीदार व साचेबंद केले आहे. भैरोबाचे देवस्थान जागृत असून भक्तांच्या नवसाला देव पावतो अशी लोकांची श्रद्धा आहे. गावातील पुजारी देवाची परंपरेने पूजा करतात. भक्तमंडळी देवाची पूजा करून देवालयातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतात. या देवालयाला पूर्वाभिमुखी एक दरवाजा असून त्या दरवाज्यातून सूर्याला नमस्कार करून बाहेर पडावे असा एक संकेत रूढ आहे. याच दरवाजावर मेघडंबरी असून पहाटे आणि सायंकाळी आरतीच्या वेळी नगारा वाजवला जातो.
देवळातील जुन्या-पुराण्या मूर्ती वारंवार बदलल्या असल्याचे दिसते. सध्या ज्या नाथाच्या मूर्ती देवळात आहेत त्या सन १९३० च्या सुमारास बसवलेल्या असून स्थापनेच्या वेळी वैदिक पद्धतीने पूजा करून मूर्तीची स्थापना केल्याचे लोक सांगतात. मंदिर आणि मंदिराचा परिसर रम्य असून अनेक भक्त रोज नियमाने दर्शनाला येत असल्याचे दिसते. देवळातून बाहेर पडताच देवळाच्या डाव्या बाजूला सटवाई या ग्रामदेवतेचे छोटेसे देऊळ असून ते सध्या पडलेल्या स्थितीत आहे. लहान मुलांना नाथाच्या देवळात नेल्यानंतर बाहेर पडताना हेच मूल सटवाईच्या पदरात ठेवतात व बाळाला उदंड आयुष्य मिळण्याची प्रार्थना बायका सटवाईला करताना दिसतात. भैरवनाथाच्या देवळाजवळ बुवासाहेबांचेही एक छोटेसे देऊळ आहे.
नाथांच्या मंदिराच्या दारात एक पिंपळ असून तो जटाधारी आहे. जटाधारी सोन्याचा पिंपळ काशीला जसा आहे तसाच रत्नागिरीला सुद्धा आहे. म्हणूनच बावधनच्या या पिंपळाला पर्यायाने बावधन या पांढरी ला काशी इतकेच पावित्र्य प्राप्त झाले आहे. गुन्हेगार किंवा पापी माणसाने या पारावर पिंपळा खाली बसून पश्चाताप व्यक्त केला तर तो शुचिर्भूत होतो, पापापासून मुक्त होतो, अशी अनेक भक्तांची धारणा आहे. पर्यायाने बावधन चा हा पिंपळ म्हणजे बोधिवृक्ष असून प्रत्यक्ष परमेश्वराचे वास्तव्य त्यावर असल्याचे लोक अनुभवाने सांगतात. भैरोबाच्या बगाडाचा गाडा याच पिंपळाखाली दर साल तयार केला जातो.
नाथांचे मूळ स्थान हे पाचीदेवळावर आहे. सोनजाईच्या डोंगरात असलेल्या गुहेमध्ये नाथांचे वास्तव्य दिसून येते. नाथ एका धनगर भक्ताला प्रसन्न होऊन पाचीदेवळवरील गुहेत प्रकट झाले. मग तो धनगर मजल दरमजल करीत डोंगर चढून येत असे. पुढे पुढे त्याचे वय झाले आणि त्याने नाथांना आपण वर चढून नाथांचे दर्शन घेणे रोज शक्य नसल्याचे सांगितले व गावातच पायथ्याला आपले मंदिर असावे अशी इच्छा नाथांकडे बोलून दाखवली असता, नाथांनी सांगितले की एक लिंबू घे आणि गावच्या दक्षिण दिशेला फेक. जिथे लिंबू पडेल, तिथे मी आनंदाने वास्तव्य करेन, व तुला रोज माझी पूजा करण्याची इच्छा देखील पूर्ण करता येईल. भक्तांच्या भक्तीपोटी हे मंदिर गावातील वेशीच्या बाहेर आत्ता आहे त्या ठिकाणी दिसून येते. सभामंडपचा जीर्णोद्धार कानिटकर यांनी केला आहे, परंतु मूळ मंदिर किती वर्षापूर्वीचे आहे याचा नेमका उल्लेख कशातही आढळून येत नाही. भैरवनाथ आणि अगस्ती दोन्ही मंदिरांचा दर्शनमंडप एकसारखाच आहे. त्यावरून दोन्ही मंदिरांचे बांधकाम एकाच वेळी पाच शतकांपूर्वी झाले असावे असे वाटते.
सभामंडपात बसवलेली फरशी, मंदिराच्या गाभाऱ्यातील व बाहेरील फरशी बसवणे व संरक्षण भिंत बांधणे असे काम हे साधारण १९७१ साली झाले आहे. जिर्णोद्धाराचे काम, लाकडी खांब, सभामंडप यांवरील नक्षीकाम मुगुटराव अण्णा शिंदे यांच्या कर्तबगारीत झाले आहे. यामध्ये अनपटवाडी व बावधन गावातील सुतार कारागीर यांचे योगदान लाभले आहे. मंदिराचा गाभारा, सभामंडप, संरक्षण भिंत यांचा जीर्णोद्धार अलीकडील काळात जरी झाला असला तरी पूर्वीच्या लोकांच्या बोलण्यावरून मूळ मंदिरास ४ ते ५ शतके झाली असावीत असे दिसून येते.
भैरोबाची यात्रा फाल्गुन वद्य चतुर्थी, पंचमी, षष्ठी ला भरते. महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत बावधनचे जे बगाड प्रसिद्ध आहे, ते याच यात्रेचा अविभाज्य भाग आहे. बगाडाच्या या उत्सवाच्या निमित्ताने विविध समाजातील तसेच जाती जमातीतील लोक एकत्र येतात, नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतात. बगाडा सारख्या उत्सवात जातीभेद पंथ विसरून भावनेने लोक उत्सवाचा आनंद लुटतात. म्हणूनच या बगाडाच्या उत्सवाला पर्यायाने नाथाच्या यात्रेला महत्व आहे. बावधकरांसाठी भैरवनाथ हा नवसाला पावणारा देव ही संकल्पना आहे. नाथांच बगाड घेण ही आयुष्यातली फार मोठी गोष्ट, असे बावधनकर समजतात.
केदारविजय या ग्रंथामध्ये बगाडाचा उल्लेख आहे. पूर्वजांच्या सांगण्यावरून मंदिरातील मूर्ती आत्तापर्यंत दोनदा बदलल्या आहेत. एका मूर्तीचे वयोमान १२५ ते १५० वर्ष पकडले तरी दोन मूर्तींचे वयोमान अंदाजे ३०० वर्षे होते. या मूर्ती संरक्षण भिंतीच्या आत जी लहान मंदिरे होती त्यामध्ये पहिल्या असतील. तसेच सध्या असलेल्या मूर्तीच्या पूर्वी ज्या पितळीच्या मूर्ती होत्या त्यांचे वयमानदेखील जरी १५० वर्षे मानले तरी मंदिर निर्माणास अंदाजे ४०० ते ४५० वर्षे होतात. सध्याच्या पाषाणातील मूर्ती व जुन्या मूर्ती पाहिल्या तर कालभैरवनाथाचे मंदिर हे अंदाजे चार ते पाच शतकापूर्वीचे असावे असा अंदाज बांधता येईल. त्याचप्रमाणे बगाड उत्सव सुद्धा फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. दरवर्षी बगाड झाल्यावर एक नाल मंदिरातील खांबावर मारण्याची प्रथा आहे. मंदिरात खांबावर मारलेल्या नालाच्या संख्या ३१३ दिसते. यावरून बगाडास ३१३ वर्षे झाली असे आपण मानले तरी मंदिर जर चार ते पाच शतकांपूर्वी बांधले असेल तर मग बगाड उत्सव कधी सुरू झाला असा प्रश्न उभा राहतो. कारण असाही सांगण्यात येते की अशा प्रकाराचे नाल मारलेले आणखी दोन खांब पूर्वी होते, त्यावरून आताचे ३१३ वर्षे व पहिले अंदाजे २०० वर्षे अशी ५१३ वर्षे झाली असावीत असे दिसून येते. यावरून मंदिराचा व बगाडाचा कार्यकाल पाच शतकांपूर्वीचा असावा असा अंदाज बांधता येतो.
बगाड उत्सवामुळे भैरवनाथ देवस्थान आणि मंदिर यांना अनन्यसाधारण महत्व लाभले आहे व एक जागृत देवस्थान असे पद प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्यात अशी भैरवनाथ देवस्थान बरीच पाहायला मिळतात, परंतु काही ठराविक ठिकाणीच बगाड उत्सव साजरा केला जातो. बावधन जवळील सुरूर, कवठे, फुलेनगर, पसरणी या गावांमध्येही बगाड उत्सव साजरा केला जातो. परंतु त्यातील बावधन गावचे बगाड याचा पहिला क्रमांक लागतो. बावधनच्या बागडाची उंची ही इतर बगाडांपेक्षा जास्त असते, व ओढणारे बैल यांचीहीं संख्या जास्त असते, त्यामुळे पंचक्रोशीतून व दूर दूरवरून लोक खास बगाडाचा उत्सव पाहण्यासाठी येतात. भैरवनाथ आणि बगाड हा बावधन व आजूबाजूची गाव यांचा जिव्हाळ्याचा व आत्मीयतेचा विषय आहे, येथील लोकांना देवाविषयी व बगाडाविषयी विशेष ओढ आणि आवड आहे. परंपरेने चालत आलेले बगाड आणि आपला नवस पूर्ण करून बगाड घेण्याची प्रथा आजही जशीच्या तशी अविरत चालू आहे. बगाडाचे साहित्य पाण्यामध्ये ठेवणारी गावची थोरली विहीर, गावातील चावडीशेजारील हनुमान मंदिर, जननीआई माता मंदिर यांच्या बांधणीची रचना व जडणघडण पाहता भैरवनाथ मंदिर व या बाकी मंदिरांचे बांधकाम सोबतच झाले असावे असे वाटते. भैरवनाथ मंदिर गावचे मूळ देवस्थान असले तरी गावामध्ये याबरोबरच जोतिबा मंदिर, जननी आईमाता मंदिर, हनुमान मंदिर, गाडेबाग मधील गणपती मंदिर, साईबाबा मंदिर अशी जुनी मंदिर देखील आपणांस पाहायला मिळतात.
विशेष म्हणजे यात्रेदरम्यान गावातील सर्व जाती, बारा बलुतेदार एकत्र येऊन आपापले काम आणि सोपवलेली मानाची जबाबदारी चोखपणे पार पाडतात. मग ते विहिरीतून बगाड उत्सवाची लाकडे बाहेर काढणे हे भोई समाजाचे काम असो, की बगाड बनवणारे सुतार असो, वा गोंधळ म्हणणारे गोंधळी असो. अठरा पगड जातीचे लोक जसे की चांभार, कुंभार, तेली, भोई, गोंधळी, सुतार, वाणी असे सर्व लोक देवाच्या उत्सवासाठी एकत्र येतात आणि एकजुटीने काम करतात. त्यामुळे याद्वारे एकता आणि समतेचा संदेश उत्सवाला येणाऱ्या लोकांस पहावयास मिळतो. मुळात यात्रा व बगाड हे बावधान गावात राहत असलेल्या या अठरा पगड जाती व त्यांच्या एकतेचे प्रतीक आहे असे मानले जाते व हे परंपरेने आजपर्यंत चालत आले आहे. भैरवनाथ यात्रा जसी बहुजन समाजातील एकीचे प्रतीक आहे तसेच तडफदार आणि रांगड्या वृत्तीचे द्योतक देखील आहे. बगाड उत्सव दरवर्षी तेवढ्याच उत्साहात व जोमात साजरा होतो. भैरवनाथ यात्रा, बगाड उत्सव याचा व्याप सांभाळण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी, तलाठी (विश्वस्त म्हणून) व अन्य गावकरी एकत्र येऊन मारुती खाशाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इ.स. १९५३ साली भैरवनाथ मंदिर ट्रस्ट ची स्थापना झाली. भैरवनाथ यात्रा व भाविक पाहता मंदिरास 'क' यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे व या तिर्थक्षेत्राला 'क' वर्ग तीर्थक्षेत्र असा दर्जा मिळालेला आहे. यात्रेच्या वेळी मिळालेली देणगी व शासनाकडून मिळालेला निधी मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिरात देवाची पूजा करण्यासाठी असलेले पुजारी व रोजची पूजा यांसाठी वापरला जातो.
पूर्वी कानीटकर देवाची शास्त्रोक्त पद्धतीने, ओल्या कपड्याने, सोहळ जपत पूजा करीत असत. कानीटकरांनी त्यांचे वय झाल्यावर त्यांच्याकडे असलेली पूजेची जबाबदारी व रोजची देवाची सेवा करण्याचा भार गावकडे सोपवला. त्यानंतर विश्वस्त पुजारी म्हणून रोज शास्त्रोक्त पद्धतीने देवाची पूजा करण्यासाठी सुरुवातीला कोणास जबाबदारी दिली याची नेमकी माहिती मिळाली नाही, परंतु नंतरच्या काळात विठोबा गुरव, कान्हा गुरव, गजानन गुरव ते आत्तापर्यंत गुरव बंधू ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत आहेत. सकाळी पहाटे ६:०० च्या आत देवास स्नान घालून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते, देवास पुष्पहार अर्पण केले जातात. तशीच संध्याकाळी ७:०० वाजता पूजा केली जाते व नित्यनियमाने आरती म्हंटली जाते. ही आरती विशिष्ट चाल व लयबद्ध स्वरूपात असते. यावेळी आपणास पुराणकाळात गेल्याचा भास होतो. भाविक सुद्धा श्रद्धामय व भावनामय होऊन जातात व रोजच्या आरतीसाठी तेवढीच गर्दी करतात.
मंदिरास जरी पाच शतके झाली असली तरी, भैरवनाथ व भक्त यांच्यामधील भक्तीच नात आजही तेवढंच पवित्र आणि समृद्ध आहे, आणि टिकून आहे. भैरवनाथ हा भक्तांच्या हाकेला धावून जाणारा देव आहे, आणि देवास केलेला नवस पूर्ण होतो, भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, अशी लोकांची धारणा आहे, आणि याचा प्रत्यय वेळोवेळी येतो, त्यामुळे भैरवनाथ हे एक जागृत देवस्थान आहे असे मानले जाते आणि लोक तेवढ्याच श्रद्धेने भक्तीने देवाची पूजा करतात. रविवार हा देवाचा, नाथसाहेबांंचा वार समजला जातो. रविवारची पूजा ही सात्विक पद्धतीने व पाहण्यासारखी असते. पहाटे ६:०० च्या आत पूजा होते, आरती केली जाते व त्यानंतर दिवसभर दर्शनास येणाऱ्या भक्तांस लाडुचा गोड प्रसाद देखील दिला जातो. दर रविवारी संध्याकाळी मंदिरात छबिना भरतो व चांगभले चा गजर होतो.
रविवारी मंदिरात भक्तांची रांग लागते, देवाचे दर्शन घेऊनच आपला दिनक्रम सुरू करायचा अशी गावातील लोकांचा आजही कल असतो, त्यामुळे लोक आजही पहाटे पासून मंदिरात दर्शनास येतात. स्त्रियांना बगाड उत्सव सोडून इतर दिवशी गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नसला तरी बाहेरून दर्शन घेण्यास स्त्रियांची गर्दी दिसून येते, बगाड उत्सवाच्या वेळी मात्र एकच दिवस स्त्रियांना दर्शन खुले केल्यामुळे विशेषकरून स्त्रियांची दर्शनासाठी मोठी रांग दिसून येते. श्रावण महिन्यात, दसऱ्याच्या वेळी तर नऊ दिवस नऊ वाहनांवर देव बसून वेगवेळ्या रुपात पाहायला मिळतात, तेव्हा तर भक्तांच्या दर्शनास उधाण येते.
असे भैरवनाथ आणि भक्तांमधील प्रेम हे दिवसेंदिवस वाढतच चालले असल्याचे दिसून येते. कोणाच्यात नसेल तो जोश आणि आत्मविश्वास फक्त नाथाच्या गजरात आहे. देव आणि भक्त यांमधील हा दुवा असाच राहो आणि सर्वांचं चांगलं भलं होवो , म्हणजेच 'काशीनाथाचं चांगभलं' या आरोळीने सर्वांचं चांगलं होवो अशी भैरवनाथ चरणी प्रार्थना...
संदर्भ: जयसिंगराव येवले पुस्तक लेखन.
माहिती संकलन- निलेश अनपट
संपादन- केशव राजपुरे
Dear Keshav, I am very happy... you are opening your inner feelings...very nice narration... all my best wishes for pink future..!
ReplyDelete