अलीकडेच आमच्या एका माजी विद्यार्थ्याचा फोन आला. लोखंडे सरांच्या कार्यावर एक 'गौरव अंक' काढला जात असल्याचे त्याने सांगितले आणि सरांच्या सहवासातील काही आठवणींना उजाळा देण्याची विनंती केली. वास्तविक, लोखंडे सरांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वावर लिहिण्याचे अनेक दिवसांपासून मनात होतेच, पण या निमित्ताने तो योग जुळून आला.
१९९२ मध्ये जेव्हा आम्ही एम.एस्सी. भाग १ ला प्रवेश घेतला, तेव्हा सरांची पहिली ओळख झाली. त्याकाळी सरांच्या कडक शिस्तीचे किस्से संपूर्ण विभागात प्रसिद्ध होते. आदरणीय प्रा. एस.एच. पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विक्रमी वेळात पीएचडी पूर्ण करून 'पोस्ट-डॉक' मिळवली होती. त्यांची पीएचडीचा प्रबंध उत्कृष्ट असल्याने त्यांना 'वायवा' (मौखिक परीक्षा) देण्याचीही गरज भासली नव्हती, हे त्यांच्या प्रतिभेचे मोठे उदाहरण आहे. भौतिकशास्त्र विभागातून परदेशात संशोधनासाठी जाणारे ते पहिलेच विद्यार्थी होते. या प्रचंड शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे त्यांच्याबद्दल आदर तर होताच, पण तितकीच भीतीही मनात दाटलेली होती.
एम.एस्सी.ला सरांनी आम्हाला 'स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स' आणि 'सॉलिड स्टेट फिजिक्स' सारखे विषय शिकवले. सर शिकवताना अगदी हळू आवाजात बोलत, त्यामुळे पहिल्या दोन-तीन रांगांतील विद्यार्थ्यांनाच ते ऐकू यायचे. पण सरांना 'आवाज येत नाहीये' असे सांगण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती! सर तल्लीन होऊन शिकवायचे आणि आम्ही सगळे मान हलवून 'समजले' असा इशारा करायचो.
सरांच्या शिस्तीचा आणि गुणदानातील चोखपणाचा अनुभव मी अगदी जवळून घेतला. परीक्षेच्या बाबतीत त्यांचा दर्जा कमालीचा कडक होता; तिथे वशिलेबाजी किंवा ओळखीला थारा नव्हता. मला आजही आठवते, प्रात्यक्षिक परीक्षेत माझा पहिला क्रमांक असूनही सरांनी मला केवळ ६०% गुण दिले होते. त्यांच्या लेखी गुणांची खैरात करणे हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. ते विद्यार्थ्याची खरी कुवत पारखूनच गुण देत असत.
पुढे जेव्हा मी एम.एस्सी.च्या चारही सत्रांत सुवर्णयश मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तेव्हा सरांचा त्यावर चटकन विश्वासच बसेना. त्यांच्या नजरेत मी सुरुवातीला कदाचित एक सरासरी विद्यार्थी होतो, त्यांच्या 'स्कॉलर'च्या व्याख्येत मी बसत नव्हतो. पण जेव्हा माझ्या यशाचे सातत्य त्यांनी पाहिले, तेव्हा त्या अविश्वासाचे रूपांतर कौतुकाच्या थापेत झाले. सरांच्या त्या 'कडक' भूमिकेमुळेच मला स्वतःला सिद्ध करण्याची खरी प्रेरणा मिळाली.
एम.एस्सी. नंतर नोकरीची संधी हुकली आणि आयुष्यापुढे 'आता पुढे काय?' हा यक्षप्रश्न उभा राहिला. साहजिकच पावले संशोधनाकडे वळली, पण 'पीएच.डी. कोणाकडे करायची?' हा मोठा पेच होता. लोखंडे सरांकडे जाण्याचा विचार मनात आला खरा, पण त्यांच्या कडक शिस्तीची अनामिक भीती आणि त्याकाळी त्यांच्याकडे प्रकल्पावरील शिष्यवृत्ती उपलब्ध नसल्याने मी काहीसा थबकलो. अखेर, आर्थिक निकड म्हणून मी प्रा ए.व्ही.राव सरांकडे पी.एचडी.साठी प्रवेश घेतला.
मात्र, मी लोखंडे सरांकडे विद्यार्थी म्हणून नसलो, तरी त्यांचे माझ्यावर पितृतुल्य बारीक लक्ष होते. 'रजिस्ट्रेशन झाले का?', 'काम कुठवर आले?', 'किती पेपर्स प्रसिद्ध झाले?' अशा विचारपुससह 'लवकर थेसिस सबमिट करा' असा प्रेमळ आग्रह ते नेहमी धरत. दुर्दैवाने, काही अपरिहार्य कारणांमुळे राव सरांकडे माझी पी.एचडी. पूर्ण होऊ शकली नाही. तो काळ माझ्यासाठी अत्यंत कठीण होता. पण अशा संकटाच्या वेळी आदरणीय पी.एस. पाटील सरांची मोलाची मदत आणि लोखंडे सरांचे खंबीर मार्गदर्शन माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्याच पुढाकारामुळे मला सी.एच. भोसले सरांकडे शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळाला आणि माझ्या शैक्षणिक जीवनाचे खऱ्या अर्थाने कल्याण झाले. तो वळणबिंदू माझ्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला.
सरांशी आमचं नातं केवळ वर्गापुरतं मर्यादित नव्हतं, तर ते एका पत्राच्या ओळींइतकं जवळचं होतं. सर जेव्हा 'हंबोल्ड' शिष्यवृत्तीसाठी जर्मनीला गेले होते, तेव्हा आमचा संवाद पत्रांद्वारे आणि त्याकाळी नवख्या असलेल्या ईमेलद्वारे व्हायचा. त्याकाळी सरांकडून येणारी ती 'एअरमेल'ची पत्रं म्हणजे आमच्यासाठी ज्ञानाचा ठेवाच असे. विशेष म्हणजे, पत्रातील महत्त्वाचे मुद्दे सरांनी पिवळ्या हायलायटरने आवर्जून अधोरेखित केलेले असायचे; त्यावरून त्यांची कामाप्रती असलेली अचूकता आणि आमच्याबद्दलची ओढ स्पष्ट जाणवायची.
एका अनपेक्षित कारणामुळे सरांना त्यांचा परदेश दौरा अर्धवट सोडून अचानक मायदेशी परतावे लागले. त्या धांदलीत त्यांची एक ट्रॅव्हल बॅग विमान कंपनीच्या तांत्रिक घोळामुळे पाठीमागेच राहिली. ती बॅग घेण्यासाठी मी कोल्हापूरहून मुंबई गाठली. कस्टम ऑफिसमधील तो तासनतास चालणारा क्लिष्ट सोपस्कार, कागदपत्रांची जुळवाजुळव आणि मोठ्या कष्टाने ती बॅग सोडवून जेव्हा मी कोल्हापुरात आणली, तेव्हा तिथेही जकात नाक्यावर पुन्हा तीच कसरत करावी लागली.
अखेर सर्व अडथळे पार करून जेव्हा मी ती बॅग सरांच्या हाती सुपूर्द केली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक तृप्त समाधान होतं. सरांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारत अत्यंत मिश्किलपणे आणि प्रेमाने म्हटले, "राजपुरे, ही बॅग सोडवण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेतलेत आणि ज्या सरकारी प्रक्रियेतून गेलात, ते पाहता तुम्ही एक प्रकारे परदेश प्रवासच करून आलात असं म्हणायला हरकत नाही!" सरांच्या त्या एका वाक्याने माझा सर्व थकवा क्षणात पळून गेला आणि एका शिष्यासाठी ते शब्द कोणत्याही पदवीपेक्षा मोठे ठरले.
शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील 'थिन फिल्म' संशोधनाचे खरे जनक आणि भीष्माचार्य म्हणून आदरणीय लोखंडे सरांकडे पाहिले जाते. आज हे क्षेत्र ज्या उंचीवर पोहोचले आहे, त्याचा पाया सरांनी आपल्या अफाट कष्टाने आणि संशोधक वृत्तीने रचला आहे. विशेषतः 'केमिकल बाथ डिपॉझिशन' या तंत्रज्ञानामध्ये सरांचा इतका हातखंडा आहे की, या विषयात त्यांचे नाव जागतिक स्तरावर आदराने घेतले जाते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणे ही आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांसाठी भाग्याची गोष्ट ठरली. सरांनी केवळ संशोधन केले नाही, तर संशोधकांची एक अखंड पिढी घडवली; ज्याची साक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पूर्ण केलेले तब्बल ६५ विद्यार्थी देतात. सरांच्या कार्याची व्याप्ती केवळ आकड्यांत मोजणे कठीण आहे, तरीही त्यांची सांख्यिकी थक्क करणारी आहे. ६५० हून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध, ४५,००० पेक्षा जास्त सायटेशन्स (११० एच-इंडेक्स, ५६४ आय१०-इंडेक्स) आणि ५० हून अधिक पेटंट्स ही त्यांच्या बौद्धिक तपस्येची आणि निरंतर परिश्रमांची जिवंत पावती आहे.
केवळ कागदावरचे संशोधन न ठेवता, त्याला पेटंट्सच्या माध्यमातून जागतिक दर्जा मिळवून देण्यात सरांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या अतुलनीय योगदानामुळेच आज शिवाजी विद्यापीठाचे नाव 'मटेरिअल सायन्स'च्या जागतिक नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. भौतिकशास्त्र विभागाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणाऱ्या या महान तपस्वी गुरूच्या ऋणात राहणे, हेच आम्हा सर्व शिष्यांचे परमभाग्य आहे.
१९९९ मध्ये मी जेव्हा शिक्षक म्हणून माझ्या कारकिर्दीची नवी इनिंग सुरू केली, तेव्हा नियतीने माझ्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली. इतर विषयांसोबतच मला 'स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स' हा विषय शिकवण्याची संधी मिळाली-असा विषय जो खुद्द सरांनी आमच्या बॅचला शिकवला होता. एका अर्थाने, माझ्या गुरूंनी जिथे ज्ञानदानाचे कार्य केले, तिथेच उभे राहून शिकवणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान आणि सन्मानही होता.
माझे हे अध्यापन सुकर व्हावे आणि विद्यार्थ्यांपर्यंत अचूक ज्ञान पोहोचावे, यासाठी सरांनी त्यांच्या संग्रहातील 'एस.के. सिन्हा' यांची 'स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स'ची नवी कोरी संदर्भ प्रत माझ्या स्वाधीन केली. विशेष म्हणजे, ते पुस्तक त्या काळात 'आऊट ऑफ प्रिंट' झाले होते; परंतु सरांनी ते मला देऊन माझ्यावरील विश्वास अधोरेखित केला.
सरांचे मार्गदर्शन केवळ पुस्तकांपुरते मर्यादित राहिले नाही. २००२ मध्ये चेन्नई येथे 'हंबोल्ड' परिषदेत 'बोस-आइनस्टाईन कंडेन्सेशन' अर्थात 'व्हेन ॲटम बिकम्स वेव्ह' या विषयावर पिरी मिस्टरी यांचे अत्यंत दर्जेदार व्याख्यान झाले होते. त्या व्याख्यानाच्या मूळ नोट्स सरांनी मला दिल्या आणि त्यावर लेक्चर तयार करण्याची प्रेरणा दिली. सरांच्या त्या अमूल्य नोट्स आणि त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच, आजही मी दरवर्षी विद्यार्थ्यांना 'बोस-आइनस्टाईन कंडेन्सेशन' आणि त्यावरील नोबेल पुरस्कारप्राप्त संशोधन अतिशय प्रभावीपणे आणि सखोलतेने शिकवू शकतो. सरांनी दिलेली ती ज्ञानाची शिदोरी आजही माझ्या अध्यापनाचा मुख्य आधार आहे.
माझ्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर-मग ती गाईडशिप मिळवणे असो किंवा प्रोफेसर पदाची निवड-सरांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन नेहमीच सोबत राहिले. माझ्या संशोधन मार्गदर्शक प्रवासाची सुरुवात सरांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांनी मला त्यांच्या डीएसटी प्रकल्पात सह-संशोधक म्हणून काम करण्याची संधी दिली, ज्यामुळे माझ्यासाठी 'पीएचडी मार्गदर्शक' होण्याचे दरवाजे उघडले. त्या काळात मी हंगामी नियुक्तीवर असलेने आणि प्रशासनाने घातलेल्या तांत्रिक अटींमुळे मला एका पर्मनंट प्राध्यापकांची सह-मार्गदर्शक म्हणून जोड मिळणे आवश्यक होते. लोखंडे सरांनी मोठ्या मनाने ही जबाबदारी स्वीकारली आणि माझ्या पहिल्या विद्यार्थ्याचे सह-मार्गदर्शक होण्यास संमती दिली. पुढे मी स्वतः पर्मनंट पदावर नियुक्त झाल्यावर ती अट शिथिल झाली आणि मी स्वतंत्रपणे कार्य करू लागलो; मात्र करिअरच्या त्या सुरुवातीच्या वळणावर सरांनी दिलेला विश्वास आणि आधार माझ्यासाठी सर्वात मोलाचा आहे. त्यांच्या या पाठिंब्यामुळेच आजवर २२ विद्यार्थ्यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पीएचडी पूर्ण केली आहे. सहकाऱ्यांशी कसे वागावे आणि विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या किती खोलीपर्यंत न्यावे, हे मी त्यांच्याकडूनच शिकलो.
सरांच्या वक्तशीरपणाबद्दल बोलायचे म्हणजे मेणबत्तीने सूर्याच्या प्रकाशाचे वर्णन करण्यासारखे आहे. सकाळी बरोबर १० वाजता सर विभागात हजर असायचे. घरातून जेवण करूनच येत असल्याने दुपारी जेवायला घरी जाण्याचा किंवा कॅम्पसवर वेळकाढूपणा करण्याचा प्रकार सरांनी कधीच केला नाही. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ते आपल्या केबिनमध्ये कामात मग्न असायचे. लेक्चर असो, पेपर सेटिंग असो किंवा निकाल लावणे-सरांचे प्रत्येक काम घड्याळाच्या काट्यावर चालायचे. आज मी स्वतः प्रोफेसर झाल्यावर सरांसारखे वक्तशीर होण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांच्या पातळीला स्पर्श करणे अद्याप तरी अशक्य वाटते.
एखादा विद्यार्थी किंवा सहकारी चुकला, तर सर त्याला फटकारल्याशिवाय सोडत नसत. त्यांच्या रागाचा पारा प्रचंड चढायचा, पण हा राग क्षणभंगुर असे. चूक लक्षात आणून दिल्यानंतर ते लगेच माफ करायचे आणि थोड्या वेळाने काही विनोदी टिप्पणी करून वातावरण पुन्हा हलकेफुलके करून टाकायचे. त्यांच्या मनात कधीही कोणाबद्दल आकस नसायचा.
सरांकडे पीएचडीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकडून शोधनिबंध लिहून घेण्याचे अजब कसब होते. तो विद्यार्थी किती हुशार आहे यापेक्षा, त्याच्याकडून काम करून घेण्यावर त्यांचा भर असे. विद्यार्थ्याचे संशोधन कार्य दोन वर्षांत पूर्ण व्हावे, यासाठी ते स्वतः जबाबदारी घ्यायचे. केवळ शैक्षणिक मार्गदर्शनच नाही, तर आपल्या प्रोजेक्टमधून फेलोशिप देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी आर्थिक मदतही केली. त्यामुळे संशोधनामध्ये कोणतीही 'चणचण' भासली नाही.
सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले विद्यार्थी आज केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील नामवंत विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सरांनी आपल्या प्रयोगशाळेत पेरलेली 'संशोधन संस्कृती' हे विद्यार्थी आज जगभर एका मशालीप्रमाणे मिरवत आहेत. हीच सरांनी आयुष्यभर कमावलेली खरी पुंजी आहे. त्यांचे विद्यार्थी आज कष्टाने काम करत पुढची पिढी घडवत आहेत.
भौतिकशास्त्र विभागातून पी.एचडी. पूर्ण केलेले १७५ हून अधिक संशोधक आज जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्वल करत आहेत. काहींनी परदेशात आपला ठसा उमटवला, तर काही मायदेशी परतून देशाच्या प्रगतीत हातभार लावत आहेत. यावरूनच सिद्ध होतं की, प्रवाहाची दिशा बदलण्यासाठी सरांनी केलेली ती 'खंबीर सुरुवात' किती मोलाची होती...
सर जेव्हा विभागप्रमुख झाले, तेव्हा विभागातील पाण्याच्या गळतीचा प्रश्न गंभीर होता. त्यासाठी त्यांनी 'भगीरथ' प्रयत्न केले. आज जो तिसरा मजला गळतीमुक्त होऊन लोखंडी शेडने सुरक्षित झाला आहे, त्याचे मूळ सरांच्या प्रयत्नांत आहे. त्यांनी विभागात साचलेली जुनी उपकरणे, रद्दी पेपर्स आणि अडगळ श्रमदानाने काढून टाकली. नियमांचे पालन करून विभाग आणि परिसर नीटनेटका, स्वच्छ आणि 'सकारात्मक वाईब्स' देणारा ठेवला.
विभागाच्या प्रगतीसाठी सरांनी घेतलेला आणखी एक क्रांतीकारी निर्णय म्हणजे 'फिजिक्स इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी सेंटर' (PIFC) ची स्थापना. यूजीसी आणि डीएसटी सारख्या शिखर संस्थांच्या अनुदानातून विभागाला अनेक मोठी आणि अत्याधुनिक उपकरणे प्राप्त झाली होती. मात्र, ही उपकरणे वेगवेगळ्या लॅब्समध्ये विखुरलेली असल्याने त्यांचा सर्वांना समान पद्धतीने वापर करता येत नव्हता.
सरांच्या कल्पनेतून ही सर्व उपकरणे एकाच छताखाली आणली गेली आणि त्यातून 'PIFC' नावाची एक मध्यवर्ती सुविधा लॅब अस्तित्वात आली. या सुविधेमुळे केवळ उपकरणांची निगा राखणे सोपे झाले असे नाही, तर विभागातील संशोधनाला एक नवी गती आणि दिशा मिळाली. या केंद्रामुळे संशोधनासाठी मोठा निधीही उपलब्ध झाला. इतर विभागांसाठी आणि संस्थांसाठी ही लॅब एक 'रोल मॉडेल' ठरली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सरांनी विकसित केलेली 'थिन फिल्म फिजिक्स'ची सर्व प्रात्यक्षिके आणि उपकरणे आजही एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरत आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी कधीही विद्यापीठातील आपल्या पदाचा किंवा अधिकाराचा हट्ट धरला नाही. निवृत्त झाल्यावर आपला वावर पुढच्या पिढीला अडथळा ठरू नये, हा त्यांचा व्यवहारी आणि प्रगल्भ विचार त्यांच्या थोरवीची साक्ष देतो.
भारतातील 'मटेरिअल सायन्स' क्षेत्रात संशोधन करणाऱ्या आघाडीच्या शास्त्रज्ञांच्या यादीत सी.एन.आर. राव यांच्यानंतर लोखंडे सरांचा बायोडाटा दुसऱ्या क्रमांकावर येतो, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. विज्ञानातील इतके मोठे योगदान, हजारो उद्धरणे आणि शेकडो यशस्वी विद्यार्थी घडवूनही, सरांना एखाद्या विद्यापीठाच्या 'कुलगुरू' पदाचा मान मिळाला नाही, ही खंत मनात कुठेतरी नक्कीच राहते.
पण तटस्थपणे विचार केला तर असे वाटते की, प्रशासकीय कुलगुरू पद आणि जागतिक दर्जाचा संशोधक या दोन भिन्न वाटा आहेत. कुलगुरू पद हे काळाच्या मर्यादेत असते, मात्र सरांनी संशोधनातून निर्माण केलेले साम्राज्य हे चिरंतन आहे. आज ते ज्या उंचीवर विराजमान आहेत, ती उंची कोणत्याही पदापेक्षा कितीतरी मोठी आहे. त्यांनी पदापेक्षा 'ज्ञानाला' प्राधान्य दिले आणि म्हणूनच ते आज जागतिक स्तरावर एक स्वतंत्र ओळख राखून आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील 'वासुद' सारख्या छोट्या खेड्यातून येऊन जागतिक स्तरावरील संशोधक बनण्याचा सरांचा प्रवास थक्क करणारा आहे. १० वर्षांपूर्वी विद्यापीठातून निवृत्त झाल्यावरही ते थांबले नाहीत; आजही डी.वाय. पाटील विद्यापीठात संशोधन संचालक म्हणून ते कार्यरत आहेत.
सरांनी लावलेली ही ज्ञानाची रोपे आज वटवृक्ष झाली आहेत. ते केवळ शिक्षक नाहीत, तर ते माझे मेंटर, रोल मॉडेल आणि खऱ्या अर्थाने 'दीपस्तंभ' आहेत. आदरणीय सरांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
***************************************


खुप छान...!! अगदी अचूक समर्पक शब्दात मांडले आहे. यातील बरेच अनुभव जसेच्या -तसे मलाही आले आहेत.
ReplyDeleteखूप छान लेखन केले आहे...! धन्यवाद सर!
ReplyDeleteआपल्या भौतिकशास्त्र अधिविभाग बद्दलची खूप महत्त्वपूर्ण ऐतिहासिक माहिती मिळाली!!❣️
अतिशय भावस्पर्शी, ओघवती आणि मनापासून उतरलेली ही लेखनप्रतिक्रिया केवळ आठवणींचा आलेख न राहता, एका महान गुरूच्या तपश्चर्येचा जिवंत दस्तऐवज ठरते. आदरणीय लोखंडे सरांचे व्यक्तिमत्त्व, शिस्त, संशोधननिष्ठा, पितृतुल्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांवरील अपार विश्वास — हे सारे आपण इतक्या सूक्ष्मतेने, प्रामाणिकपणे आणि अनुभवांच्या प्रकाशात उलगडले आहे की वाचक नकळत त्या काळात पोहोचतो.
ReplyDeleteगुरू–शिष्य नात्याची खोली, संघर्षातून घडलेली जिद्द, आणि कठोरतेआड दडलेली माणुसकी — या लेखात सर्व काही आहे. विशेषतः सरांच्या कडक शिस्तीमुळेच कसे व्यक्तिमत्त्व घडते, हे आपण स्वतःच्या आयुष्याच्या उदाहरणातून दाखवून दिले आहे, ते फारच प्रभावी वाटते. संशोधनातील योगदानाबरोबरच माणूस घडवण्याची त्यांची वृत्ती या लेखाचा आत्मा आहे.
ही प्रतिक्रिया म्हणजे सरांना दिलेली केवळ सदिच्छा किंवा शुभेच्छा नाहीत, तर ज्ञानपरंपरेचा वसा पुढे नेणाऱ्या एका यशस्वी शिष्याची साक्ष आहे. शब्दांमधून आदर, कृतज्ञता आणि अभिमान तिन्ही एकत्र नितळपणे झळकतात. असा लेख वाचल्यानंतर लोखंडे सरांबद्दल आदर दुणावतोच, पण लेखक म्हणून आपल्याबद्दलही मनापासून नम्र अभिमान वाटतो.
खरोखरच — गुरू दीपस्तंभ असतो, हे या लेखाने पुन्हा एकदा सिद्ध केले. 🙏
श्री मल्हारी भजनावळे
आदरणीय सर, तुमच्या सुंदर अशा लेखातून लोखंडे सरांच्या संशोधन कार्याबद्दल खूप छान माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद.
ReplyDeleteप्राध्यापक राजपुरे सर,
ReplyDeleteआपण व्यक्त केलेल्या भावना ह्या सरांच्या जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांच्या आहेत.👍
खुपच छान लेख . AI च्या जगात असे शिक्षक व विद्यार्धी भेटने दुर्मिळ.
ReplyDeleteखूप छान लेख
ReplyDeleteखूप छान लेख आहे 🙏
ReplyDeleteखूपच भावपूर्ण, सखोल आणि प्रेरणादायी असा हा लेख आहे.
ReplyDeleteयातून लोखंडे सरांचे केवळ संशोधक म्हणूनच नव्हे, तर घडवणारे गुरु, मेंटर आणि माणूस म्हणूनचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ठळकपणे उभे राहते.
विद्यार्थ्याच्या जडणघडणीत शिस्त, प्रामाणिकपणा आणि विश्वास किती निर्णायक ठरतो, हे या अनुभवांतून प्रकर्षाने जाणवते.
गुरु-शिष्य नात्याची खरी उंची आणि त्यातील ऋणानुबंध या लेखाने अत्यंत सुंदररीत्या मांडले आहेत.
असा लेख वाचताना लोखंडे सरांबद्दल आदर तर वाढतोच, पण अशा गुरूंचा शिष्य होण्याचा अभिमानही वाटतो.
डॉ. सुरज निकते
खूप छान आणि सरांना साजेसं असं लिखाण 🙏🏻🙏🏻
ReplyDeleteI read the article...It was so nice and inspirational.. I felt I am standing at the department and seeing everything that you mentioned in this article by my nakade eyes.. thank you very much for sharing it..😊
ReplyDeleteडॉ. C. D. Lokhande सर म्हणजे शिस्त, संशोधन आणि मूल्याधिष्ठित शिक्षण यांचा परिपूर्ण संगम. थिन फिल्म व मटेरियल सायन्समध्ये त्यांनी उभारलेली संशोधन संस्कृती आज जागतिक पातळीवर चमकत आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना घडवणारा हा ज्ञाननिष्ठ दीपस्तंभ पदांपेक्षा ज्ञानाला मोठे मानतो—आणि म्हणूनच तो चिरंतन ठरतो. त्यांच्या कार्याला व प्रेरणेला मनापासून वंदन.
ReplyDelete— डॉ. Satish Mahadik
सर, लेख वाचला खूप छान लिहिला आहे. अप्रतिम लेखन.
ReplyDelete- (डॉ. संदीप वाटेगावकर)
खूप छान लेख
ReplyDelete