Total Pageviews

Wednesday, March 2, 2016

प्राधान्यक्रम

अग्रक्रम

​​दुपारी जेवण झाल्यावर द्राक्षे खात होतो. खाताना एक साधी गोष्ट लक्षात आली; ती म्हणजे आपण दिलेल्या द्राक्ष्यातून अगदी निवडून अधिक पिवळी झालेली (तुलनेने गोड) द्राक्षे अगोदर खात होतो, मग क्रमाक्रमानं थोडीशी हिरवी, मग शेवटी जास्त हिरवी म्हणजे कमी गोड. मनात विचार आला: खाताना तर मी सर्व द्राक्षे खाल्ली मग गोड द्राक्ष्याना हे प्राधान्य कशासाठी ? मी हि द्राक्षे सरसकट का खाल्ली नाहीत ? कधीतरी हि सर्व द्राक्षे एकाच पोटात जाणार होती ना ?

नंतर मला दैनंदिन जीवनात माझ्या प्राधान्यक्रमांची आठवण झाली. इस्त्री करून ठेवलेल्या ड्रेस पैकी मी सोमवार साठी सर्वात उत्तम दिसणारा ड्रेस निवडतो मग मंगळवारी पुढच्या क्रमाचा अन पुढे तसेच चालू .. .. .. , किंवा त्या आठवड्यात एखादा महत्वाचा कार्यक्रम असेल तर निवडक ड्रेस आपण त्यासाठी राखून ठेवतो. असे का ? तसेच भुईमुगाच्या शेंगा खाताना ज्या आकाराने (ठपकळ) मोठ्या आहेत त्यांचा मान पहिला ! शेंगदाणे खातानाही प्राधान्यक्रम ठरलेलाच ! सुरुवातीला आपण जर बस मध्ये चढलो तर जागेची निवड करताना विंडो-शीट पसंत करतो. अन शेवटी चढलो तर मिळेल ती शीट चालते, नसल्यास बसमध्ये उभं राहणंही चालतं, मग सुरुवातीलाच प्राधान्यक्रम कशाला ?

समजा, तुमच्यासमोर एखादा केक ठेवला असून त्यावर क्रीम आणि चेरीही आहे. आता तुम्ही आधी काय खाणार ? क्रीम, चेरी कि केक ? प्रत्येक माणूस या प्रश्नाचं वेगवेगळ उत्तर देईल. कोणी म्हणेल, मी आधी केक चा तुकडा खाईन आणि सर्वात शेवटी चेरी खाईन. जेणेकरून चेरीचा स्वाद जास्त वेळ तोंडात राहील. तर कोणी म्हणेल, आधी मी चेरी खाईन. कारण त्यावर जे आईसक्रीम आहे त्याच्या स्वादिष्ट चवीचा मला लवकरात लवकर आस्वाद घेता येईल. जेवतानीही बरेच लोक असं करतात. स्वीट डिश अगदी शेवटी किंवा सुरुवातीला किंवा मध्ये खात रहातात. प्रत्येकाची आपापली निवड असते. 'व्यक्ती तितक्या प्रकृती', त्यामुळे प्रत्येकाचे प्राधान्यक्रम निरनिराळे असतात.

आयुष्याच्या गणिताबाबतीतही असेच आहे. अगदी सोपे प्रश्न सुरुवातीला मग जरा अवघड, जादा अवघड .. .. .. .. जीवन जगत असताना सुख-दुख:चे प्राधान्यक्रम ठरवायची किल्ली जर माणसाच्या हातात असती तर त्याने कधी दु:ख निवडलेच नसते. पण वस्तुस्थिती तशी नाहीय त्याठिकाणचे प्राधान्यक्रम आपल्या हातात नाहीत.

आपल्या जीवनासाठी अत्यावश्यक असणार्‍ या बाबी म्हणजे लक्ष. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक लक्ष्ये असतात. मनातील इच्छा व डोळ्यांसमोरील ‘लक्ष्य’ जर पूर्ण झाले तरच आयुष्य सफल झाल्याचे बरेचजण मानतात. आपल्या इच्छा अनेक असतात. उदाहरणार्थ, मोठे घर, कार, चांगल्या ठिकाणी फिरायला जाणे, मुलांचे उज्जवल भवितव्य, आरोग्यदायी आणि आरामदायी निवृत्ती आदी. मर्यादित साधनांसह आपली सर्व महत्त्वाची लक्ष्ये साध्य करण्यासाठी लक्ष्यांना प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे. लक्ष्य साध्य करत असताना शक्य झाल्यास इच्छाही पूर्ण करता येतात का ते पहावे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्या लक्ष्यांसाठी प्राधान्यक्रम निश्चित करावा.

- केशव राजपुरे
९६०४२५०००६ 

No comments:

Post a Comment