Total Pageviews

Friday, December 25, 2020

शाळा बोलावत आहेतुमच्या शाळेला तुमच्या मदतीची गरज आहे

सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील बावधन हायस्कुल, बावधन हे स्वामी विवेकानंद संस्थेचे सुमारे ६० वर्ष जुने माध्यमिक विद्यालय आहे. गाव आणि बारा वाड्या मिळून आकारलेल्या या बावधन पंचक्रोशीमध्ये त्याकाळी शिकणारांची संख्या कमी असे आणि माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. गावच्या पूर्वेस असलेल्या मोकळ्या जागेवर गावाने तेव्हा २० वर्गखोल्यांची शाळा बांधली आणि स्वामी विवेकानंद संस्थेस आपली शाखा सुरु करण्यास परवानगी दिली.

पंचक्रोशीतील सर्वच विद्यार्थी गरीब शेतकरी कुटुंबातील असायचे त्यामुळे वाई येथे माध्यमिक शिक्षण घेणे त्यांना परवडणारे नसायचे. वाहतूक सुविधा सहज उपलब्ध व परवडणारी नव्हती. वाई येथे राहून तेथे शिकणे शक्य नसायचे. त्यामुळे पंचक्रोशीसाठी त्यावेळी ही शिक्षणाची फार मोठी सोय उपलब्ध झाली होती. सुरुवातीला पाचवी ते दहावीपर्यंत प्रत्येकी किमान एक तुकडी असायची. पुढे विद्यार्थी संख्या वाढल्याने आठवीच्या एकेकाळी पाच तुकड्या असायच्या. विद्यार्थी संख्यादेखील १२०० च्या घरात असायची. पात्र आणि पूर्णवेळ शिक्षक आणि सक्षम मुख्याध्यापक उपलब्ध होते. इथून शिकून कित्येक डॉक्टर, अभियंते, अधिकारी, पोलिस, शिक्षक, सैनिक, व्यापारी घडले आहेत. तरुणांना सक्षम आणि सुजाण नागरिक घडवणारी सहजसाध्य शाळा असल्याने हा काळ म्हणजे पंचक्रोशीचा शैक्षणिदृष्ट्या सुवर्णकाळ होता.

दरम्यान मुलींच्या शिक्षणासाठी समर्पित अन्य एक शाळा गावामध्ये सुरू झाली. पालकांनांही त्यांच्या मूलींच्या शिक्षणासाठी ही शाळा अधिक सोयीस्कर वाटू लागली. यामुळे मात्र बावधन हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे विभाजन सुरु झाले. दरम्यान पालकांची निवडकता, आर्थीक सक्षमता आणि सोयीस्कर वाहतुक सुविधांमुळे मुलांना गावापासून ५ किमी वर असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी ठेवणे पालकांना योग्य वाटू लागले. इकडे बावधन हायस्कूल मधील विद्यार्थी संख्या कमी होऊ लागली. विद्यार्थी संख्या टिकवणे हेच मुळी आव्हान होऊन बसले. शाळेसाठी अस्तित्वाची स्पर्धा सुरु झाली. ज्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या १२०० वरून ३०० पर्यंत कमी झाली. एका तुकडीच्या विद्यार्थ्यांची वानवा होऊ लागली. निवृत्तीमुळे रिकाम्या झालेल्या जागेवर नियुक्त्या होणे बंद झाले. हायस्कुलमधील मनुष्यबळ कमी झाले. पूर्ण बहरात असलेली शाळा एकदम अस्तित्वासाठी झगडू लागली.

कालमानपरत्वे इमारत जुनी होऊ लागली होती. बांधकाम, कौले आणि वापरलेले लाकूड कमजोर होऊन हळूहळू कोसळू लागले आणि त्यातच पावसाळ्यात गळती होऊ लागली. मागील दोन वर्षात झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळेच्या भिंती व छत कोसळण्यास सुरवात झाली. मुळातच विदयार्थी संख्या आणि मनुष्यबळासाठी वानवा असलेल्या शाळेसाठी हा म्हणजे दुष्काळात तेरावा महिना होऊन बसला होता. ग्रामस्थांनी त्यांच्याच जागेवर बांधलेल्या शाळेसाठी संस्था आर्थिक पाठबळ देण्याच्या मन:स्थितीत नव्हती. गावातील प्रतिष्ठित आपली मुले तालुक्याच्या ठिकाणी नामांकित शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे शाळेच्या झालेल्या दुरावस्थेची दखल घेत नव्हते. शेवटी अशी अवस्था आली आहे की शाळा कोसळू लागली. मार्च २०२० पर्यंत किमान पाच - सहा वर्गखोल्यांची स्थिती चांगली होती. लॉकडाऊन व त्यानंतरच्या पावसाळ्यात शाळेची दुरावस्था झाली आहे.  

शाळेची सध्याची परिस्थिती अशी आहे की वर्ग भरविण्यासाठी एकही खोली सुस्थितीत नाही. कौले फुटली आहेत, लाकडी आडी तसेच कैच्या तुटल्या आहेत, भिंती कोसळल्या आहेत. दुर्देवानं शाळा एक खंडर झाली आहे. एकतर विद्यार्थी आणि मनुष्यबळाची वानवा त्यात इमारत मोडकळीस आलेली ! काय अवस्था झाली आहे त्या विद्यामंदीराची ! हे असे मंदिर आहे जेथे गरीबांची मुलं शिकतात. खरं तर देशाच्या प्रगतीसाठी गरीब घरची मुलं साक्षर होणे काळाची गरज आहे. हीच गरीब मुले पुढे उच्च पदांवर काम करून गावचे आणि पर्यायाने देशाचे नाव उज्वल करतात. आमची मुले तिथे शिक्षण घेत नाहीत म्हणून या ज्ञानमंदिराबाबत आपली कोणतीच जबाबदारी नाही असा विचार करणे योग्य नाही. धनधान्य उत्पन्न, कला, क्रीडा, समाजकारण,अर्थकारण तसेच राजकारण क्षेत्रात अग्रणी असलेल्या गावाच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न आहे. बगाड यात्रेतून गावकरी सामाजिक ऐक्य तसेच संस्कृतीचे अनोखे दर्शन देत असतेच. खर तर हा गावच्या अस्मितेचा प्रश्न आहे ! सामाजिक जबाबदारीकडे थोडे लक्ष दिल्यास हेही अशक्य नाही.   

स्वामी विवेकानंद संस्थेने नूतनीकरणाच्या एकूण खर्चापैकी अर्ध्या खर्चामध्ये ते योगदान देतील अशी भूमिका घेतली आहे. ही सध्याची परिस्थिती आहे. नुकताच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचपैकी एका बॅचने शाळेच्या दोन खोल्यांच्या नूतनीकरणासाठी वर्गणीद्वारे निधी उभा केला आहे. पण खोल्यांचे स्वतंत्रपणे नूतनीकरण करणे शक्य नाही त्यामुळे हा निधी अपुरा वाटतो. इतर बॅचेस पुढे येऊ शकतात. हा संदेश इंटरनेट सोशल मीडियाच्या युगात पसरवणे आणि आजी माजी विद्यार्थ्यांना आवाहन करणे अवघड नाही. गरज आहे सामाजिक भान आणि कर्त्यव्य जपण्याची !

सर्व मुख्याध्यापकांनी शाळेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. शाळेच्या नूतनीकरणासाठी संस्था, लोकप्रतिनिधी तसेच विविध शासकीय संस्था यांच्या मदतीसाठीचे त्यांचे तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती यांचे प्रयत्न अपुरे पडले असे वाटते. मध्यंतरी माजी विद्यार्थ्यांचा एक मेळावा आयोजित केला होता त्यात जमा झालेला निधी त्यावेळच्या नूतनीकरणाच्या गरजा भागविण्यासाठी अपुरी पडला.

आजपर्यंत हजारो विद्यार्थी या शाळेतून शिक्षित होऊन बाहेर पडले आहेत. निव्वळ या शाळेच्या योगदानामुळेच त्यांची आर्थिक स्थिती सुयोग्य आहे. प्रत्येकाने "आपल्या कारकीर्दीच्या प्रवासात शाळा एक मैलाचा दगड ठरली आहे आणि शाळा होती म्हणून आम्ही घडलो" ही धारणा जपायला हवी. या सर्वानी सामाजिक भान ठेवून दातृत्वाच्या भावनेतून ज्ञानमंदिराप्रती आपले कर्त्यव्य निभावण्याची वेळ आली आहे असे वाटते. अजूनही वेळ गेलेली नाही. या शाळा माऊलीस पुनर्जीवित करत असताना प्रत्येक माजी विद्यार्थ्याने यथाशक्ती योगदान दिले तर इमारत पूर्ववत होऊ शकते आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुद्दा सोडविला जाऊ शकतो. आपल्या बहुमोल योगदानासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून मदत करावी हे नम्र आवाहन !

- एक माजी विद्यार्थी
No comments:

Post a Comment