Saturday, August 8, 2026

नागिन

स्नायूंची कळ की ‘नागिन’? : भीती, अज्ञान ते अचूक निदानापर्यंतचा माझा पाच दिवसांचा अनुभव


आरोग्य ही मानवी जीवनातील सर्वांत मोठी पुंजी आहे, याची जाणीव आपल्याला नेहमीच असते; पण जेव्हा शरीर अचानक एखादा वेगळाच संकेत देतं, तेव्हा मन किती अस्वस्थ होतं, याचा प्रत्यक्ष अनुभव मी गेल्या आठवड्यात घेतला. रविवार, २ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते शुक्रवार, ७ ऑगस्टपर्यंतचा हा पाच दिवसांचा प्रवास माझ्यासाठी शारीरिक वेदनांचा तर होताच, पण त्याहून अधिक तो वैद्यकीय साक्षरतेचा आणि संयमाचा धडा देणारा ठरला. हा अनुभव माझ्या ‘दीपस्तंभ’ ब्लॉगच्या वाचकांसाठी आणि मित्रपरिवारासाठी आवर्जून शब्दांकन करत आहे, जेणेकरून वेळेवर घेतलेल्या योग्य निर्णयाचे महत्त्व सर्वांना कळावे.

(रविवार, २ ऑगस्ट): २ ऑगस्टच्या रात्री अचानक दोन वाजता डावा बकुटा आणि खांदा तीव्रतेने दुखू लागला. मध्यरात्री दोनच्या सुमारास डावा हात, काक आणि खांदा अचानक तीव्रतेने दुखू लागणे हे ऐकताच कोणत्याही सामान्य माणसाच्या मनात पहिली शंका येते... हृदयविकाराचा झटका तर नाही ना?

माझ्या मनातही क्षणात भीतीची पाल चुकचुकली. मी लगेच स्वतःची लक्षणे तपासली... घाम आला नव्हता, श्वास घ्यायला कोणताही त्रास होत नव्हता किंवा छातीवर दबाव नव्हता. त्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी वाटल्याने मनाला थोडा धीर मिळाला; पण वेदना मात्र असह्य होत्या. मी सौभाग्यवती डॉ प्रियाला उठवले. तिने लक्षणे ऐकून आणि परिस्थिती बघून अंदाज बांधला, "कदाचित रोजच्या खेळण्यामुळे स्नायू दुखावला असेल."

पण माझ्या मनात शंका होती.. मी बॅडमिंटन तर उजव्या हाताने खेळतो, मग डावा हात इतका का दुखावा? तरीही वेदना कमी करण्यासाठी तिने एक पेनकिलर दिली. सुदैवाने अर्ध्या तासात औषधाचा प्रभाव सुरू झाला, वेदना थांबल्या आणि मला शांत झोप लागली.

(सोमवार, ३ ऑगस्ट): दुसऱ्या दिवशी सकाळी दुखणे थांबल्यामुळे मी नेहमीप्रमाणे बॅडमिंटन खेळायला गेलो. प्रियाने सुचवले की, "जर हा स्नायूंचा ताण असेल, तर आपण अँटी-इन्फ्लेमेटरी आणि पेनकिलर गोळी एकत्र घेऊया." त्यानुसार मी डोस घेतला; परंतु रात्री घेतलेल्या पहिल्या गोळीचा असर संपताच खांदा पुन्हा तीव्रतेने दुखू लागला.

दुपारी आणि संध्याकाळी दोन डोस घेऊनही वेदना कमी होईनासे झाले. सोमवारची रात्र अत्यंत वेदनादायी गेली. डाव्या बाजूला झोपताच येत नव्हते. रात्री ४ ते ५ वेळा झोपमोड झाली, तळमळ वाढली आणि वेदनांनी तीव्र रूप धारण केले.

(मंगळवार, ४ ऑगस्ट): मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी मी बॅडमिंटनला जाणे टाळले. ऑफिसमध्ये गेलो, पण केबिनमध्ये अस्वस्थता वाढू लागली. शेवटी मी विद्यापीठाच्या हेल्थ सेंटरमध्ये डॉ. व्ही ए रानडे यांच्याकडे गेलो.

माझी लक्षणे ऐकून प्रथमदर्शनी त्यांनाही वाटले की हा स्नायूंचा खिचाव (मसल स्त्रें) किंवा डिहायड्रेशनचा प्रकार असावा. तरीही खबरदारी म्हणून त्यांनी रक्तदाब (बीपी) आणि इसीजी काढण्यास सांगितले. इसीजी काढत असताना मनात धाकधूक चालूच होती: ‘काय निघेल काय नाही?’

सुदैवाने, रक्तदाब आणि इसीजी दोन्ही पूर्णपणे नॉर्मल आले!

या रिपोर्टमुळे हृदयविकाराची भीती पूर्णपणे गमावली आणि हे केवळ ‘स्नायूदुखी’च आहे यावर माझा पक्का विश्वास बसला. डॉ. रानडे मॅडम यांनी दिलेल्या औषधांचा कोर्स मी सुरू केला. परंतु त्या रात्रीही वेदना कमी झाल्या नाहीत. काखेच्या खालचा भाग बधीर झाला होता, तिथे विजेसारख्या चमका येत होत्या आणि काखेच्या बाजूला प्रचंड आग-आग होत होती. मी पेन-रिलीफ स्प्रे मारला, त्यामुळे काही काळ थांबल्यासारखे वाटले.

यादरम्यान एका मित्राने सल्ला दिला, "सर, या दुखण्याला हलक्यात घेऊ नका. माझी काही मदत हवी असेल तर सांगा. माझे नातेवाईक चांगले एमडी आहेत." मलाही तसेच वाटू लागले होते, कारण पेनकिलर घेऊनही स्नायूदुखी थांबत नव्हती आणि चमका येत होत्या. मी अधूनमधून ऑक्सिमीटरवर ऑक्सिजन लेव्हल आणि पल्स रेट तपासत होतो; ते नॉर्मल येत असल्याने मनाला तेवढाच दिलासा मिळत होता.

(बुधवार, ५ ऑगस्ट): बुधवारी, ५ ऑगस्टला वेदना सहन करत मी ऑफिसला गेलो, लेक्चर घेतले. दुपारी घरी जेवायला आल्यावर विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला, पण पाठीची आग आणि चमकांमुळे झोपणे किंवा बसणे कठीण झाले होते.

विभागात आल्यावर मी बर्फाची लादी मागवून घेतली. घरी आल्यावर त्याचा तुकडा करून मुलगी स्नेहाला जिथे जिथे आग होत होती तिथे बर्फ लावायला सांगितला. बर्फ लावल्यामुळे आगीपासून तात्पुरता खूप दिलासा मिळाला.

त्याच वेळी स्नेहाच्या निदर्शनास आले की, माझ्या पाठीच्या डाव्या बाजूला छोटे-छोटे पुरळ आले आहेत.

मी प्रथम विचार केला की, कदाचित घामामुळे किंवा आधी मारलेल्या स्प्रेच्या अ‍ॅलर्जीमुळे हे आले असावेत. त्या वेळी हे पुरळ म्हणजेच या आजाराचे मुख्य लक्षण होते, हे मला समजले नाही. रात्री पुन्हा प्रचंड वेदना, झोपमोड आणि अस्वस्थता कायम राहिली.

(गुरूवार, ६ ऑगस्ट): गुरूवार, ६ ऑगस्ट रोजी दुपारी पाचवा डोस घेऊनही वेदना थांबत नव्हत्या. पुन्हा एकदा बर्फ लावण्यासाठी मी बनियन काढून थांबलो होतो.

एकूण झालेली सर्व लक्षणे, चमका, आग आणि पाठीवरील पुरळ पाहून प्रियाच्या मनात शंका आली: "हा नागिन (हर्पिस झोस्टर) प्रकार तर नाही ना?"

तिने पाठीवरील पुरळ जवळून पाहिले, तर त्या पुरळांवर पाण्याचे छोटे फोड आले होते. प्रियाला खात्री पटली की ही 'नागिन'च आहे. तोच आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचा आणि निर्णायक क्षण ठरला!

मी लगेच त्या पुरळांचा फोटो काढून डॉ. रानडे यांना पाठवला. त्यांनीही फोटो पाहून ‘नागिन’ असल्याच्या संशयाला पुष्टी दिली. माझ्या छातीच्या डाव्या बाजूला आणि पाठीवर दोन ठिकाणी पुरळांचे पुंजके आले होते. मी सर्व लक्षणे आणि फोटो जेमिनी वर अपलोड केले. तिथेही खात्री झाली आणि एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला मिळाला:

"नागिनच्या उपचारात पहिले ७२ तास (७२ तासांची गोल्डन विंडो) अत्यंत महत्त्वाचे असतात. जितक्या लवकर अँटीव्हायरल उपचार सुरू होतील, तितका हा आजार नियंत्रणात येतो."

पहिले लक्षण दिसल्यापासून ७२ तासांहून अधिक काळ लोटला होता, त्यामुळे मनात भीती वाटू लागली. या रोगाची दाहकता मी ऐकून होतो; तो फोफावण्याआधीच रोखणे गरजेचे होते. मी, माझे दोन विद्यार्थी तेजस आणि प्रताप मिळून आम्ही तातडीने राजारामपुरीतील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. नलावडे यांची वेळ घेतली आणि हास्पिटल गाठले. बाहेर तर पाऊस जोरदार होता. आमचा नंबर २३ वा. पण मधील बरेचजण फक्त नंबर लावून गेले होते. आमचा ५ वा नंबर आला आणि एकदाचे आम्ही डॉक्टरांना भेटलो.

डॉक्टरांनी पाहाताच विचारले, "कालच का नाही आलात? "मी नम्रपणे सांगितले, "सर, कालपर्यंत ही पुरळ इतकी स्पष्ट नव्हती आणि हा नागिनचा प्रकार असेल याची कल्पनाच आली नाही. आज लक्षात येताच लगेच आलो आहे."

त्यांनी तातडीने योग्य ती औषधे आणि अँटीव्हायरल उपचार सुरू केले.

एक गोष्ट मात्र नक्की घडली. निदान (डायग्नोसिस) स्पष्ट झाल्यामुळे मनातील अनिश्चिततेची भीती पूर्णपणे निघून गेली. दुखण्याचे कारण काय आहे हे कळल्यामुळे एक मानसिक बळ मिळाले. शिवाय, पूर्वी प्रियालाही असाच त्रास झाला असताना याच डॉक्टरांच्या उपचारांनी ती पूर्ण बरी झाली होती, त्यामुळे उपचारांवर पूर्ण विश्वास बसला.

गुरुवारी रात्री औषधे सुरू करूनही जळजळ चालूच होती. पण एक नवीन निरीक्षण जाणवले- जिथे पुरळ आले होते, नेमकी तिथेच आता जळजळ केंद्रित झाली होती आणि काखेतील बधीरपणा कमी झाला होता.

दरम्यान, एका परिचित व्यक्तीकडून माहिती मिळाली की, 'उमा टॉकीज'जवळ वडिलोपार्जीतपणे एक कुटुंब यावर लेप देतात. मी तो पारंपरिक लेप आणून संध्याकाळी लावला. थन्डवा जाणवला. आराम मिळाला. डॉक्टरांची अँटीव्हायरल औषधे आणि हा लेप; दोघांनी मिळून काम करायला सुरुवात केली.

हळूहळू वेदनांचा जोर ओसरू लागला. शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हातातील वेदना बऱ्यापैकी कमी झाल्या, चमका बंद झाल्या. लेप दोनदा लावून झाल्यानंतर जळजळ आणि दाह सुमारे ७५ टक्के कमी झाला.

त्यामुळेच शुक्रवारी रात्री मला चार दिवसांनंतर शांत आणि गाढ झोप लागली!

या अनुभवातून मी काय शिकलो? (वाचकांसाठी महत्त्वाचे धडे) 

[१] अस्पष्ट वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. 

[२] शरीराच्या एकाच बाजूला (डाव्या किंवा उजव्या) तीव्र वेदना, त्वचेवर बधीरपणा किंवा आगीसारखी जळजळ होत असेल, तर ती केवळ स्नायूदुखी नसून मज्जासंस्थेशी किंवा इत्तर आजारासंबंधित असू शकते. 

[३] नागिन (हर्पिस झोस्टर) मध्ये अनेकदा पुरळ किंवा पाण्याचे फोड येण्याआधी २ ते ४ दिवस तीव्र वेदना आणि चमका येतात. लक्षणे दिसताच किंवा शंका येताच ७२ तासांच्या आत त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अँटीव्हायरल औषधे सुरू करणे अत्यंत गरजेचे असते. 

[४] आजाराचे योग्य निदान होईपर्यंत अस्वस्थता असणे स्वाभाविक आहे, पण एकदा निदान झाल्यावर वैद्यकीय उपचारांवर आणि स्वतःच्या रोगप्रतिकारशक्तीवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.

औषधांचा आणि लेपाचा कोर्स पूर्ण जाईपर्यंत चालू ठेवावा लागणार आहे. अद्याप अधूनमधून पाठीच्या किंवा छातीच्या बाजूला हलक्या चमका येतात, पण आता त्या कशाच्या आहेत हे पूर्णपणे ठाऊक असल्यामुळे मनात कोणतीही भीती किंवा दडपण उरलेले नाही.

स्नायूचा ताण (मसल स्ट्रेन) ते 'नागिन' (हर्पिस झोस्टर) हे अचूक निदान होण्यासाठी पाच दिवस गेले. पण या पाच दिवसांत स्वतःला सांभाळत, वेदना सहन करत योग्य निदानापर्यंत पोहोचणे आणि उपचारांवर विश्वास ठेवणे हा एक मोठा अनुभव होता.

माझ्या या अनुभवाचा कोणातरी वाचकाला वेळेवर योग्य निर्णय घेण्यासाठी फायदा व्हावा, याच हेतूने हा लेखप्रपंच !

आपला,

प्रा. (डॉ.) केशव राजपुरे

(माझे विचार आणि अनुभव : 'दीपस्तंभ' ब्लॉग)

No comments:

Post a Comment

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...