Total Pageviews

Thursday, April 8, 2021

शिवाजी विद्यापीठाला नॅकचे अ++ मानांकन


शिवाजी विद्यापीठाच्या अ++ मानांकनाच्या निमित्ताने..

त्या दिवशी ३१ मार्च होता, अर्थातच त्यामुळे खातेवहीतील हिशोबाचा मेळ घालण्यासाठी सर्वांची लगबग चालू होती. दुपारचे अंदाजे २ ची वेळ असावी. त्या रखरखत्या उन्हात एक सुखद बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि विद्यापीठातील सारा माहोलच बदलला. नॅकने विद्यापीठास ४ पैकी ३.५२ गुणांसह सर्वोच्च अ++ मानांकन जाहीर केलं होतं. ती बातमी कळताच फेसबुक-व्हाट्सएप वर विद्यापीठाचे फोटो अभिमानाने झळकू लागले. विद्यापीठाशी ऋणानुबंध असलेल्या प्रत्येकासाठी हा सोनेरी दिवस होता. निस्वार्थी लोकांच्या त्यागातून काही संस्था मोठ्या होतात आणि त्या संस्थांच्या नावामुळे माणसं नावारूपाला येतात. त्यामुळे यशाच्या शिखरावर पोचलेल्या ‘शिवाजी विद्यापीठ’ या नावाशी जोडलेल्या प्रत्येकाने व्यक्त केलेल्या अभिमानाच्या पवित्र भावना स्वाभाविक होत्या. आपणा सर्वांसाठी हा क्षण म्हणजे कौतुकाने आणि स्वाभिमानाने मिरवण्याचा, उद्देशपूर्तीच्या समाधानाने मनाच्या कुपित चिरंतन जतन करण्याचा म्हटलं तर वावगं ठरू नये! शिक्षण व संशोधन क्षेत्रात विद्यापीठाने केलेल्या सर्वोच्च गुणवत्तेच्या योगदानाचा हा पुरावा आहे.

शिवाजी विद्यापीठ देशातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या क्रमवारीत द्वितीय क्रमांकावर पोचलं आहे. नॅक मूल्यांकनात शैक्षणिक अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा व इतर शैक्षणिक बाबींसोबत संशोधन हा देखील एक निकष असतो. विद्यापीठाच्या विविध अधिविभागांत होणारं दर्जेदार संशोधन व त्या अनुषंगाने मिळालेले निर्देशांक अ++ मानांकनासाठी बहुमोल ठरले आहेत यात तीळमात्र शंका नाही. मानांकन जाहीर झाल्यावर अनेक दिग्गजांच्या लेखण्या तळपल्या. विद्यापीठाची यशोगाथा मांडून अभिनंदन करणारे व विद्यापीठाचा घटक असल्याचा स्वाभिमान व्यक्त करणारे अनेक लेख वाचनात आले. पण बहुतेक लेखांमध्ये ग्रामीण भागात विद्यापीठ स्थापनेच्या इतिहासाची व विस्ताराची पुनरावृत्ती झालेली दिसते. मात्र या अनुषंगाने विद्यापीठाच्या संशोधन प्रणालीवर कुणीच भाष्य केलं नाही. शेतात राबणाऱ्या गरीब कुटुंबातली लेकरं विद्यापीठात येऊन संशोधनासाठी प्रयोगशाळेत अहोरात्र राबतात. विद्यापीठाच्या आजच्या उपलब्धीत भागीदार असलेल्या संशोधनाचा व अनेक संशोधकांच्या कष्टाचा सुगंध सर्वदूर पसरावा हाच या प्रस्तुत लेखाचा उद्देश आहे.

सुरवातीच्या काळात विद्यापीठाच्या दृष्टीने संशोधन हा अधोरेखित मुद्दा नव्हता, पण तरीही काही द्रष्ट्या संशोधकांनी नंतरच्या काळात रुजवलेली संशोधन संस्कृती आज आपले बलस्थान बनली आहे, हे वास्तव आहे. स्कोपस डेटाबेस नुसार शिवाजी विद्यापीठाचा पहिला शोधनिबंध १९६५ साली वनस्पतिशास्त्रातील संशोधनावर ‘डी नाचरविझनशाफन’ (द सायन्स ऑफ नेचर) या मासिकात झाला. १९६५ व १९६६ या दोन वर्षात या विषयावर त्याच मासिकात एकूण ७ शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यानंतरचे दोन शोधनिबंध पदार्थसंशोधनावर ‘ऑस्ट्रेलियन जर्नल ऑफ केमिस्ट्री’ या मासिकात झाले. विद्यापीठ स्थापनेनंतरच्या पहिल्या आठ वर्षात विद्यापीठाच्या खात्यात २० शोधनिबंध होते. त्यावेळची मर्यादित साधने पाहता हा आकडा मोठा होता. विद्यापीठातील संशोधन खऱ्या अर्थाने प्रज्वलित होण्यास जवळपास दहा वर्षे लागली. ऐंशीच्या दशकात भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांत संशोधन सुरू झाले. 

 १९७१ साली भौतिकशास्त्र अधिविभागात पदार्थ संशोधन प्रयोगशाळा विकसित झाली व त्यांनी ‘फिलॉसॉफीकल मॅगझीन’ या प्रसिद्ध मासिकात संशोधन प्रसिद्ध केले आणि विद्यापीठातली संशोधनाची दिशाच बदलून गेली. कारण ते संशोधन पूर्णपणे विद्यापीठात विकसित झालेल्या संसाधनांवर आधारित होतं. नॅकने शैक्षणिक कार्यक्रमांबरोबरच संशोधनावर समान भर देण्याच्या सूचना दिल्यानंतर विद्यापीठातील संशोधन वेगाने वाढले.

विद्यापीठाच्या संशोधन लौकिकात प्रत्येक अधिविभागाने आपापल्या परीने मोलाची भर घातली आहे. सुरुवातीच्या काळापासून रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, गणितशास्त्र, संख्याशास्त्र व जैवरसायनशास्त्र विषयांत महत्त्वाचे मूलभूत संशोधन सुरू आहे पण त्यात भौतिकशास्त्र अधिविभागाचे गुंजभर का होईना जादा योगदान आहे. आज भौतिकशास्त्र विभागात कोट्यवधींच्या संशोधन सुविधा, ते लीलया हाताळणारे संशोधक, त्यांच्या शोधनिबंधांची संख्या, इथे शिकून परदेशात जाऊन नाव मिळवलेले शंभरभर संशोधक हे सगळं दिसतं. यामुळेच विद्यापीठ पदार्थ संशोधन क्षेत्रात अव्वल क्रमांकावर आहे. पण हे एका रात्रीत साध्य झालेलं नाही. गेल्या पाच दशकांतील अविरत प्रयत्नांचा तो परिणाम आहे. विभागाच्या जडणघडणीच्या काळात संशोधन हे स्वखर्चातून व्हायचं. त्यामुळे पूर्णवेळ संशोधन नावाचा प्रकार तेव्हा नव्हता. ९० च्या दशकात विभागात पूर्णवेळ संशोधन रुजलं. यानंतर मटेरियल सायन्स, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि इतर विषयांत विस्तृत संशोधन झाले. विद्यापीठाचे नवनिर्वाचित प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील हे पूर्णवेळ संशोधकांच्या पहिल्या फळीतील संशोधक! अर्थातच त्या काळात शिष्यवृत्त्या किंवा संशोधन निधी नसायचे. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रांगणात बसून चार आण्याचे चणे-फुटाणे खाऊन रात्रंदिवस संशोधनात घालवलेल्या काळाच्या आठवणी ते आवडीने सांगतात.  

१९९० नंतर विविध शासकीय संस्थांकडून संशोधन योजना व प्रकल्पातुन मोठे निधी खेचून आणण्यात प्राध्यापकांना यश आले. नंतर सामंजस्य करारांतर्गत परदेशी संस्थांशी आंतरराष्ट्रीय संबंध विकसित केले गेले. त्यातून संशोधन सुविधा वाढत गेल्या आणि त्याचा परिणाम म्हणून सर्वसामान्य व गरीब घरातल्या होतकरू पोरांना संशोधनाची स्वप्नं पडू लागली. पण दर्जेदार संशोधनाच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग अजूनही सुकर झाला नव्हता. कारण तेव्हा संशोधनासाठी लागणाऱ्या संदर्भांसाठी मुद्रित मासिकांवर अवलंबून राहावं लागे, सर्वच मासिके विद्यापीठाच्या ग्रंथालयात उपलब्ध नसायची. काही मासिकांसाठी पुणे-मुंबई या सारख्या ठिकाणी जावं लागायचं. निधी मिळू लागल्यावर संशोधनाचा दर्जा दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ लागला, त्यामुळे नवनवीन तंत्र संशोधनात आणण्यावर भर देणं भाग होतं. एक्सआरडी व एसईएम सारखी तंत्रे वापरुन संशोधन केल्यास संशोधनाचा दर्जा वाढेल ही गोष्ट प्राध्यापकांच्या लक्षात आली, आणि मग या विश्लेषणसाठी विद्यार्थ्यांच्या मुंबई आणि बेंगलोर सारख्या ठिकाणी वाऱ्या चालू झाल्या. 

संशोधनाला समर्पित प्राध्यापकांकडून त्या आधुनिक सुविधा आपल्याकडेच सुरू करण्याचं स्वप्न पहिलं गेलं नसतं तरंच आश्चर्य! विभागात त्यासाठी हालचाली सुरू झाल्या, योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेमुळे दिवसागणिक नवनवीन संशोधन तंत्रे येऊ लागली. आज अधिविभागात पीआयएफसी नावाच्या एकाच छताखाली कोट्यवधींची अनेक पृथक्करण उपकरणे उपलब्ध आहेत. बहुतेक विद्यार्थ्यांना पुरेशा शिष्यवृत्त्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर परंपरेने मिळालेलं अहोरात्र आणि रात्रंदिवस कार्य करणं त्यांच्या सोबत अजूनही आहे. त्याचंच फळ म्हणून अलीकडेच विद्यापीठातील ज्या नऊ जणांचा जागतिक शीर्ष २% शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाला त्यात भौतिकशास्त्रातल्या ६ प्राध्यापकांचा समावेश आहे. विभागाच्या व पर्यायाने विद्यापीठाच्या दृष्टीने ही बाब भूषणावह आहे.

अधिविभागाच्या कार्यसंस्कृतीत सकारात्मकता, परिश्रमपूर्वक प्रयत्न, तसेच नवनिर्मितीचा ध्यास या गोष्टी शीर्षस्थानी आहेत. त्यामुळे विद्यमान सुविधा वापरुन इथले संशोधक जागतिक पातळीवर ज्ञाननिर्मितीत स्पर्धा करीत आहेत. म्हणूनच इथे तयार झालेले ब्रिलियंट ब्रेन्स जगाच्या कानाकोपऱ्यात शिवाजी विद्यापीठाचं नाव गाजवत आहेत व इथल्या संशोधन संस्कृतीचे राजदूत बनले आहेत. विद्यापीठाच्या संशोधन संस्कृतीवर भाष्य करताना फक्त भौतिकशास्त्र अधिविभागातील संशोधनास अधोरेखित करण्याचा इथे मुळीच हेतु नाही. कारण अशाच प्रकारच्या ऐतिहासिक घडामोडी व यशोगाथा संशोधनात पुढारलेल्या विद्यापीठातील सर्व अधिविभागांच्या आहेत.

विद्यापीठाने मिळवलेल्या यशात सर्वांच्याच योगदानाचा समावेश आहे. नॅनोटेक्नोलॉजी, मटेरियल सायन्स, ग्रीन केमिस्ट्री, व्हीएलएसआय डिझाइन, ड्रग डिझाइन अँड डिलिव्हरी, बायो रेमेडीशन, बायो डायव्हर्सिटी, बायो-प्रॉस्पेटींग, डायनेमिकल सिस्टम, सिमुलेशन अँड मॉडेलिंग, ऑप्टिमायझेशन टेक्निक्स, प्रक्रिया नियंत्रण, इंटरनेट ऑफ थिंग्ज, डेटा मायनिंग, डेटा अ‍ॅनालिटिक्स, ऊर्जा तंत्रज्ञान, अवकाश विज्ञान, कृषी आधारित अर्थशास्त्र, प्रदूषण नियंत्रण, न्यूट्रॅस्यूटिकल फूड्स, भू-माहितीशास्त्र, भाषाशास्त्र, ई-कॉमर्स इत्यादी संशोधनाची प्रमुख क्षेत्रे आहेत. त्यामुळे हे सांघिक यश आहे. विद्यापीठाने मिळवलेले यश आणि संशोधन निर्देशांक टिकवणे म्हणजे जगन्नाथाचा रथ ओढण्यासारखे आहे. तो ओढण्यासाठी कार्यक्षम हातांची गरज असते. आता आपण यश मिळवलंय, पण इथून पुढे मर्यादित मनुष्यबळ व जेष्ठांची सेवानिवृत्ती यासारख्या अग्निदिव्याचा सामना करत यश टिकवण्याचे आव्हान येणाऱ्या पिढीवर असेल, कारण गुणवत्ता मिळवण्याबरोबरच ती टिकवणे खूप अवघड असते. त्यामुळे आपल्या रथाची सर्वच चाकं मजबूत झाली आणि सर्वच हातांनी एकाचवेळी समान प्रयत्न केले तर रथ अजून सहज पुढे जाईल.   

स्थापनेपासून आतापर्यंतचा काळ आपल्यासाठी देशातील प्रस्थापित शैक्षणिक व संशोधन संस्थांच्या बरोबरीने चालून स्वतःला सिद्ध करण्याचा होता. सुदैवानं आता स्वतःला वारंवार सिद्ध करण्याची गरज नाही, कारण आपल्या चालण्याचं रूपांतर काळानुरूप पळण्यात झालंय. एके काळी केवळ पदार्थांच्या पृष्ठभागाची छायाचित्रे मिळवण्यासाठी नागपूरपर्यंत हजारो किलोमीटर प्रवास कराव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता मात्र टीईएम, एक्सपीएस, एक्सआरडी, एएफएम, मायक्रो-रमण यासारख्या अत्याधुनिक विश्लेषणात्मक सुविधा विद्यापीठाच्या आवारातच उपलब्ध आहेत. आपण आता इतकं पुढं आलोय की पुन्हा मागे वळून पाहण्याची मुळीच गरज नाही. आता फक्त पुढच्या संधी पाहायच्या.... अ++ मानांकनामुळे आपल्याला निधीची कमतरता भासणार नाही. अनेक योजना आपल्याला सहज मिळणार आहेतच. जवळ तुटपुंजी संसाधने असतानाही आपण राष्ट्रीय स्पर्धेत केव्हाच पुढे गेलोय.

यापूर्वी आपण क्युएस रॅंकींग च्या क्युएस-ब्रिक्स यादीत स्थान मिळवलंय, यावर्षी आपण क्युएस-एशिया यादीतही खूप वरच्या क्रमांकावर आहोत. आता जर अनेक संधी आयत्या चालून आल्या असतील तर याहून मोठी स्वप्ने बघायला काय हरकत आहे? कुणी अतिशयोक्ती म्हटलं तरी चालेल पण आता आपले जगातील नामवंत विद्यापीठांशी स्पर्धा करण्याचे दिवस आले आहेत. देशात अव्वल व्हायचं स्वप्न जुन्या लोकांनी पाहिलं होतं, आपण जागतिक पातळीवर यशस्वी होण्याचं स्वप्न पाहूया.  

विद्यापीठाच्या प्रांगणात पाऊल ठेवताक्षणी प्रेरणा देणाऱ्या शिवछत्रपतींनी अवघ्या मूठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं होतं. त्यांनी पाऊल ठेवलेल्या मातीचा टिळा लाऊन लढवय्यांनी अटकेपार झेंडा फडकवला होता. मग त्यांच्याच नावाने उभारलेल्या विद्यापीठाने जग जिंकण्याचं ठरवलं तर काय वावगं आहे? विद्यापीठातील संशोधक मावळ्यांनी आधीच तलवारी धार करून मुठी आवळल्या आहेत.... आता फक्त रणशिंगाचे मधुर स्वर कानी यायचे बाकी आहेत.

शब्दांकन: प्रा. केशव राजपुरे, सूरज मडके  
भौतिकशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 


13 comments:

 1. व्वा ... मुद्देसूद अप्रतिम लेख

  ReplyDelete
 2. अप्रतिम लेख.. फारच छान.

  ReplyDelete
 3. सर,
  अप्रतिम लेख.
  अतिशय मार्मिक शब्दांमध्ये, शिवाजी विदयापीठ चालु झाल्यापासुन ते आजपर्यंतचा विशेषतहा संशोधनाचा विविध विभागातील (त्यामध्ये भौतिकशास्त्र व इतर विभाग) इतिहास अतिशय समर्पक भाषेमध्ये मांडला आहे.
  इवलेसे रोप लवियले द्वारी,
  तयाचा वेलु गेला गगनावरी,
  मोगरा फुलला, मोगरा फुलला,
  फुले वेचिताशी बहारू,
  काळियासी आला,
  या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीप्रमाणे
  खऱ्या अर्थाने विदयापीठ स्थापनेपासुन सर्वांनीच आपआपल्या परिने दिलेल्या योगदानामुळे आज हा नॅकचा A++ हा दर्जा मिळाल्यामुळे या वेलीच आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे आणि असेच या वटवृक्षाने आकाशाला गवसणी घालावी एवढीच मनापासुन अपेक्षा व्यक्त करतो. शिवाजी विदयापीठाच्या भावी वाटचालीसाठी मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा.उत्तोत्तर अशीच प्रगती होत रहावी हीच मनापासुन प्रार्थना.
  सर, अतिशय सुंदर लेख लिहला आहे. आपल्या हातुनही असेच सुंदर लिखाण होत रहावे. त्यासाठीही मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा.

  ReplyDelete
 4. It seems elaboration of the institution .Magnificent peace of writing. Best Regards..

  ReplyDelete
 5. सर फारच छान

  ReplyDelete
 6. केशव मित्रा खुपच छान शब्दांकन केलंस...

  ReplyDelete
 7. प्रथमतः आपणां सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये अगदी दिमाखाने सर्वस्पर्शी ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या आपणा सर्वांनाच व संपूर्ण महाराष्ट्रालाच अभिमानास्पद व गौरवशाली बाब म्हणजे शिवाजी विद्यापीठास 'नँक'चे मिळालेले A ++मानांकन.
  हा लेख म्हणजे आपणां सर्वांच्याच तपस्वी वाटचालीची यशस्वी गाथा आहे.
  अशीच आपली यशोगाथा उच्चतम होत जावो.पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...

  ReplyDelete
 8. I was in touch with Shivaji University as an examiner to M.Sc, adjunct faculty, invited speaker etc. I am aware about the strong foundation laid down by many senior professors. We are indebted to their efforts which paved ways to young researchers of today. I congratulate the entire faculty, Honble V.C, Pro VC and othet officials, supporting staff, one and all. Prof Rajpures write up deserves appreciation.

  ReplyDelete
 9. Enjoyed a lot reading this post!! The way it has been written, the information covered therein and chronological developments of the alma mater are simply phenomenal and colossal 👏👏. Hearty congratulations to all SUK-ians 🎉🎊 Thanks to KYR Sir for such an informative summary 🙏🙏
  - Sharad

  ReplyDelete
 10. Very nice article by you also congrates sir and best wishes for future

  ReplyDelete
 11. प्रोफेसर डॉ. केशव राजपुरे यांनी शिवाजी विद्यापीठाला A++ मानांकन मिळाले त्यानिमित्ताने लिहिलेला लेख वाचनात आला. अतिशय सुरेख मांडणी असणारा आणि वाचनीय लेख यामध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठात, विद्यापीठ स्थापनेपासून आजपर्यंत विविध विषयात झालेल्या संशोधनाचा आढावा घेतलेला आहे. खरं पाहता विद्यापीठाच्या A++ मानांकनात संशोधनाचा वाटा खूपच मोठा आहे. प्रोफेसर डॉ. केशव राजपुरे हे स्वतः एक चांगले संशोधक असून जागतिक शीर्ष 2% शास्त्रज्ञांच्या यादीत त्यांचा समावेश होतो. त्यांच्याच विभागातील सहा प्राध्यापक यामध्ये समाविष्ट आहेत.
  पण प्रोफेसर केशव राजपुरे सरांनी घेतलेली झेप अत्यंत उल्लेखनीय आहे.वाई तालुक्यातील अनपटवाडी सारख्या छोट्या खेड्यात कंदिलाच्या उजेडात शिकलेला व रयत शिक्षण संस्थेच्या, लोणंद कॉलेजचा विद्यार्थी आज जगातील 2% शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळवत विद्यापीठाच्या पदार्थविज्ञानशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख झाला आणि तो आमचा अत्यंत जवळचा मित्र आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या वाचनीय लेखाबद्दल प्रोफेसर डॉ. केशव राजपुरे यांचे हार्दिक अभिनंदन.
  असेच लिहित जा पुढील वाटचालीस आमच्या हार्दिक शुभेच्छा.
  डॉ. रामराजे शिवाजीराव माने-देशमुख
  भूगोलशास्त्र विभाग
  रयत शिक्षण संस्थेचे,
  छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा

  ReplyDelete
 12. 👍
  सुंदर लेख
  अभिप्रायासाठी शब्द अपुरे

  ReplyDelete