प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधू माझी आई..
(जागतिक मातृदिन, १० मे २०२०)
"बालपण देगा देवा" हे सर्वांनाच वाटण्यामागचे कारण आईच्या मायेच्या ओढीत दडलेल आहे. आई बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच हवीहवीशी असते. मलाही ती हवीहवीशी आहे. आजच्या जागतिक मातृदिनी माझ्या प्रेमस्वरूप आई विषयी...
वैराटगडाच्या पायथ्याशी वसलेल्या जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील सरसूबाई जानू शिर्के यांच्या पोटी माझी आई अंजुबाई उर्फ अंजिरा हिचा साधारण १९३५ ते १९४० दरम्यान जन्म झाला असावा. जावली तालुक्यातील हातगेघर (गोळे) हे आईचे आजोळ ! आईला दोन भाऊ व तीन बहिणी. या भावंडात आईचा दोन नंबर. या गावांमध्ये बावधन येथील कांबळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आईने जेमतेम तिसरीपर्यंत शिक्षण घेतले हे तिला आठवते. आई मराठी वाचू शकते. अतिशय रूपवान व सर्व प्रकारच्या कामांमध्ये तरबेज आईचा त्यावेळी वयाच्या नवव्या ते दहाव्या वर्षीच दरेवाडी येथील साधारण व्यक्तिमत्व यशवंत राजपुरे यांच्याशी बालविवाह झाला. त्यावेळेला अतिशय लहान असल्यामुळे आईला खांद्यावर उचलून दरेवाडीला आणल्याचे सांगतात. या कोवळ्या वयात घरातील कष्टाची कामे पडू नये व माहेरची आठवण येऊ नये म्हणून आईला सुरुवातीची दोन वर्षे आमच्याच भावकीतील दुसऱ्या वाड्यात (खालचा वाडा) ठेवल्याचे सांगितले जाते.
घरी आल्यापासून अगदी सुरुवातीपासून आईंने घरातल्या सर्व कामात उस्फूर्तपणे समर्पण दिल्याचे सांगितले जाते. दरेवाडी येथील पाच एकर व अनपटवाडी येथील सहा एकर शेती करताना सर्व प्रकारची कष्टमय कामे तिने केली होती. माझे वडील मजुरी करत. आईने वडिलांच्या खांद्याला खांदा लावून पहिल्यापासूनच अतिशय मन लावून संसार केला. वडिलांना आवश्यक ती साथ दिली. तसं बघितलं तर वडील रंगाने सावळे व दिसायला आईइतके रूपवान नव्हते. तरी सुद्धा आपल्या जबाबदारी आणि कर्तव्यापासून आई कधीही हटली नाही. गरीब व भोळ्याभाबड्या नवऱ्याबरोबर संसार कसा करावा त्याचे तीने इतरांना उदाहरण घालून दिलेलं आहे. मोठं घर, मोठं कुटुंब, आणि तशीच शेतीतील जबाबदारीची काम या सगळ्यांचा डोलारा तिने सुरुवातीपासून अगदी यशस्वीपणे सांभाळला आहे.
तिचा दिवस भल्या पहाटे सुरू होई. त्यावेळी गावात पिठाच्या गिरण्या नसायच्या. जात्यावर सर्वप्रकारची दळण ती दळत असे. दळत असताना तिच्या सुमधुर आवाजात गायलेली कित्येक गाणी मला आठवतात. घरात लवकर स्वयंपाक करणे व सकाळच्या प्रहरी शेतात कामाला बसणे हा नित्यनेम. शेतातील पेरणी व मोगणी सारखी गड्याची कामे सुद्धा आईने केलेली मी पाहिली आहेत. दोन्ही वेळचा स्वयंपाक, शेण पाणी व शेताची सर्व कामे करून तिला कधी थकल्याचे मी पाहिलं नव्हतं.
माझ्या आईला पाच मुलं आणि पाच मुली अशी एकूण दहा अपत्य ! यापैकी माझे तीन भाऊ वेगवेगळ्या वयात निर्वतले. आम्हा सर्व भावंडांचा सांभाळ व संगोपन आईने संसार सांभाळत केला. कुटुंबाचा विस्तार झाल्याने गरजा वाढल्या. मुली मोठ्या ! त्यामुळे मुलींच्या मदतीने संसार गाडा चालवण्यास सुरुवात केली. गरिबीत सुद्धा आपल्या मर्यादेत राहून मुलांना शिकवलं. मुली मोठ्या झाल्या.. त्यांचीही लग्न परिस्थितीने गरीब पण सुसंस्कृत घरांमध्ये मागे कोणतेही कर्ज न ठेवता लावून दिली. मुलांना पहिल्यापासूनच चांगली वळणं लावली. फाटक्यात राहा पण नेटके रहा अशी तिची कायम शिकवण.
माझं मूळ गाव दरेवाडी. माझ्या वडिलांनी माझ्या जन्माच्या वेळी गावापासून तीन किलोमीटरवर असलेल्या अनपटवाडी या माझ्या जन्मगावी बामणाची सहा एकर शेती कसायला घेतली होती. घरातील सर्व कामे आटोपून आई सकाळी सकाळी अनपटवाडी च्या शेतात असायची. नंतर या भागदौडीचा त्रास होऊ लागल्यानंतर घरातल्यांच अनपटवाडी तील शेतात वास्तव्य करायचं ठरलं. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी आमचं कुटुंब वाडीतील शेतात छप्पराची वस्ती करून राहिले. नवीन जागा, नवीन गाव व नवीन माणसं या सगळ्यात सामावून जायला सुरुवातीला वेळ लागला. पण हे कठीण आव्हान कुटुंबाच्या साथीने आईने लीलया पार पडल. पुढं ही शेती कुळकायद्याअंतर्गत वडिलांच्या नावे झाली. यांच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन काही जणांनी ही शेती स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनांमध्ये आईने वडिलांना अतिशय खंबीरपणे साथ दिली व सगळ्या घटना निभावून नेल्या. निव्वळ आई त्याठिकाणी होती म्हणून ती जमीन आणि या नवीन गावातील वास्तव्य टिकलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
पहिल्यायापासून कष्ट उपसायची सवय असल्यामुळे व त्या कष्टाच्या मोबदल्यात अवश्यक संसारोपयोगी गरजा भागवता येत नसल्यामुळे नंतर नंतर तिचा स्वभाव कडक बनत गेला. नवीन गावातील माणसांचे अनुभव हेसुद्धा त्याला काही अंशी कारणीभूत होते. ती फार स्वाभिमानी. स्वतःच्या सर्व गोष्टी स्वतः करी. कुणावरही अवलंबून राहिल्याचे मला आठवत नाही. त्यामुळे अन्याय व कपटाची तिला नेहमीच चिड. तिचा आवाज खूप मोठा.. साधी गोष्ट सांगायचं म्हटलं तरी ओरडून सांगायची ही तिची मूळ सवय. तिचा कडक आणि शीघ्रकोपी स्वभाव कायम तिला इतर माणसापासून दूर घेऊन गेला. तिच्या कडक आवाजा पाठीमागची मृदूता कुणालाही कळली नसावी. ती कितीही कडक स्वभावाची असली तरी आतून मात्र कापसासारखी मऊ आहे हे फक्त आम्हा भावंडांनाच माहित आहे.
हौस-मौजे च्या गोष्टी घेण्यासाठी पैसे नसले म्हणून तिने कधीही घरांमध्ये तक्रार केल्याचे आठवत नाही. प्राप्त साधन व आर्थिक स्थितीत घर पुढे चालवणे हे कसरतीचे काम तिने आयुष्यभर केलं. मुलांना नवीन कपडे कुणी पाहुण्यांनी घेतली तरच.. लग्नसमारंभात किंवा कुठे नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर मिळालेली नवीन साडीच तिच्यासाठी हौसेची गोष्ट. घरात अठरा विश्व दारिद्र्य. घरातील गरजा भागवण्यासाठी पैसे नसायचे. अशा परिस्थितीत मुलांना शिक्षणासाठी ती पैसे आणणार कुठून होती ? तरीसुद्धा आपल्या दोन्ही मुलांना आपल्या जोडीदाराच्या मदतीने तिने उच्चशिक्षित केलं म्हणजे फार मोठे काम तिच्यातून झालं आहे हे सर्वजण जाणतात.
गरज भासल्यास कमाईपोटी बऱ्याचदा नवरा-बायको मजुरीला जात असत. आठवड्याची मजूरी घेत असताना वडील अनपढ असल्याने सही ऐवजी अंगठा करत. जेव्हा आईचा नंबर येई तेव्हा ती सही येत असताना सुद्धा नवऱ्याला कमीपणा वाटायला नको म्हणून अंगठा निशाणी देई. ही गोष्ट मात्र उभ्या आयुष्याात तिने वडिलांना कधीही माहीत होवू दिली नाही. किती तो सालसपणा.आणि किती तो आदर भोळ्याभाबड्या साथीदारा याविषयी !
कुठल्या गावाला किंवा नातेवाईकांच्याकडे जाणे हे तिच्या कधी नशिबात नसे. कारण बारा महिने काम, काम आणि काम! आणि मिळालीच फुरसद तर पैसे नसायचे. पण आपल्या म्हसवे या माहेरची माघ पौर्णिमेची यात्रा मात्र ती कधी चुकवत नसे. जवळ पैसे नसले तरीसुद्धा व्याजवाडी खिंडीतून पायी प्रवास करून मी आणि माझी बहीण कित्येक वेळा तिच्यासोबत गेलेलो अजून मला आठवते. भल्या सकाळी पायी सुरू झालेला हा जवळजवळ पंधरा किलोमीटरचा प्रवास जेवणाच्या वेळेपर्यंत संपे. हा त्रास सहन करून सुद्धा ती जायची कारण यावेळी तिचे भाऊ आणि बहिणी येत असत. त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणं तिला जमत नसे. भावंडांच्या मुलांच्या अंगावर नवीन कपडे व आपल्या मुलांच्या अंगावर जुनी कपडे पाहून तिचा हिरमुसलेला चेहरा कधी माझ्या ध्यानातून जाणार नाही. तरी सुद्धा तिला आपल्या कुटुंबांचा, मुलांचा आणि सासरच्या सर्वांचा खूप अभिमान असायचा व अजुनही आहे.
माहेरची ओढ टाळून आयुष्यभर संसारासाठी व मुलांच्या संगोपनासाठी सासरी राहून आपला चंदनदेह झिजवणारी आई ही विधात्याची सर्वोत्तम भेटच. तिच्यातील काटकपणाचा दाखला द्यायचं म्हटलं तर आत्तापर्यंत तिची चार ऑपरेशन झाली आहेत. आतापर्यंत शेतात काम करत असताना दोन वेळा विहिरीत पडून तसेच एकदा सर्पदंश होऊनही ती वाचलेली आहे. तिने आपल्या मुलांचे खाण्यापिण्याचे लाड केले पण कामासंदर्भात अजिबात लाड केले नाही. सगळ्यांनी काम करायलाच पाहिजे. मुलींना घरातील व शेतातील सर्व कामे आलीच पाहिजेत ही तीची धारणा. आणि याच गोष्टीमुळे लग्नानंतरही मुलींच्या कुठल्याही कर्तव्याबाबतच्या तक्रारी आईकडे आल्या नाहीत. आईसारखे कुठल्याही परिस्थितीत झगडत संसार करण्याचे गुण सर्व मुलींच्यामध्ये यामुळेच तर आले.
आई जर सोबतीस असेल तर कधीच आबाळ होत नाही. तिचे फक्त आपल्यासोबत असण आपल्यातील आत्मविश्वास आणि आत्मबल प्रचंड प्रमाणात वाढवते. काही दिवसापूर्वी आमच्या कुटुंबावर ओढवलेल्या संकटसमयी माझ्या धीरोदत्त आईनेच धाडसानं वेळ सांभाळून नेली आणि सर्व गोष्टी पूर्वपदावर आणल्या. त्यानंतर मुलींना आईची माया दिली व आधार दिला. निव्वळ तिच्या सान्निध्यामुळे आम्ही सर्वकाही विसरू शकलो. आईच्या मायेची शिदोरीच अशी असते की ती उरतही नाही आणि पुरतही नाही.
आई जन्मभर स्वाभिमानी आयुष्य जगली व अजून जगत आहे. आजारपणाचे सर्व त्रास तिने सोसले. वयाच्या ७० वर्षापर्यंत तिला जमत असलेली घरातील व शेतातील सर्व कामे विना तक्रार केली आहेत. तिच्या अगोदर तिच्या मुली थकल्या पण ती अजून थकली नव्हती. दोन वर्षापूर्वी उद्भवलेल्या हृदयविकाराच्या आजारानंतर मात्र ती थोडी खचली आहे. थोडासा आत्मविश्वास कमी झालाय. दिसायला कमी आले आहे व ऐकू कमी येते. यावयात देखील तिला कोणी नाव ठेवलेलं किंवा दोष दिलेलं सहन होत नाही. समोरच्याला जिथल्या तिथं उत्तर देऊन सुनावल्या शिवाय तिला चैन पडत नाही. आपल्या जोडीदारासोबत अतिशय कष्टातून कमावलेली व सांभाळलेली वडिलोपार्जित जमीन आपल्यानंतर आपली अपत्य व नातवंड यांनी त्याच पद्धतीने जपावी व चांगलं कुटुंब म्हणून नाव कमवाव ही तिची प्रांजळ भूमिका. माझ्या कुटुंबाला गावात कोणी नावं ठेवू नये यासाठी तिची कायम धडपड.
आता सुना नातवडांच्या जमान्यात आपणास तेवढं महत्त्व राहिले नाही असं तिला वाटतं. अजूनही स्वतःची काम ती स्वतः करते. ती पहिल्यासारखे काम करू शकत नाही, त्यामुळे तिला वाटतं आपण घरात आयात कसं खावं. त्यामुळे तिची नेहमी खटपट चालू असते. आपल्यानंतर आपल्या मुलांमध्ये सख्य असावं तसेच शेवटपर्यंत एकत्रित कुटुंब रहाव म्हणून तिने दिलेले संस्कार फळाला यावं अशी तिची कायम आराधना असते.
अनेकदा ती स्वत: ला नवीन पिढीशी जुळवून घेण्यात अपयशी ठरते. समोरच्याला अनावश्यक सल्ला आणि कुटुंबावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्रासाला बळी पडते. मला कोणी समजून का घेत नाही असं कधी-कधी तिला वाटतं. वयोमानपरत्वे तिचं चिडण व रागावण बंद झाले आहे. ती आतल्या आत कुढत स्वतःशीच बोलत असते. कदाचित आपण कुठून कुठपर्यंत आलोय याचे परीक्षण करत असावी. पण आमच्या कुटुंबाला ती त्रास नाही तर खूप मोठा आधार आणि मार्गदर्शकस्तंभ आहे. आम्ही तिच्या आशीर्वादाचे आणि मार्गदर्शनाचे कायम याचक राहू. यासाठी आम्ही आमच्या आईच्या ऋणातच राहणे पसंत करू.
अशा प्रेमळ, सहनशील, काटक, कुटुंबवत्सल, मेहनती आणि स्वाभिमानी आईच्या पोटी आम्ही जन्म घेऊन खूप धन्य झालो. जागतिक मातृदिनी आईस हार्दिक शुभेच्छा. माझ्या आईस निरोगी उदंड आयुष्य मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
© डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाईल नंबर: ९६०४२५०००६
www.rajpure.com
rajpure.blogspot.com
ह्रदयस्पर्शी लेख. सर तुम्ही तुमच्या लिखाणातून आईचा संपूर्ण जीवनपट मांडला आहे.आईंना उदंड आयुष्य लाभो हीच ई्वरचरणी प्रार्थना.
ReplyDeleteखूपच सुंदर लेख. आईवरचा निस्सीम प्रेम आपल्या लेखणीतून स्पष्ट दिसते.
ReplyDeleteआदरणीय सर आपले लिखाण अत्यंत सुंदर स्पष्ट व अस्खलित असं आहे. आपण मांडलेल्या आईच्या आठवणी आम्हास नक्कीच प्रेरणादायी आहेत. यामुळे आमचे आमच्या आई वरील प्रेमामध्ये भर पडलेली आहे. आपण आपल्या आई संदर्भातील सर्वच प्रसंग इतके चांगले मांडले आहेत की त्याचे चित्र डोळ्यासमोर लगेच उभे राहते व तुमच्या आई विषयी आपसूकच मनामध्ये आदर निर्माण होतो. तुमच्या आईला दीर्घायुष्य प्राप्त होओ ही ईश्वरचरणी प्रार्थना.
ReplyDeleteप्रा. मोहन शिंदे.
आदरणीय केशव (आप्पा)
ReplyDeleteआपण आज्जी बदल सुंदर शब्दात वर्णन केले आहे,आई चा बदल असणारे प्रेम आपल्या लेखातून दिसून येत आहे.
आजीला दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
प्रभाकर अनपट
खुप छान लेख, अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहिले.
ReplyDeleteखूप सुंदर ... आईचा आधार सगळ्यांना नाही भेटत.. लेख वाचताना डोळे भरून आले...
ReplyDeleteआजी विषयी आणि तुमच्या लाहापणीच्या हृदयस्पर्शी लेखनाने मन भारावून गेले. बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या..काही प्रेरणा देणाऱ्या काही पानी आणणाऱ्या..
ReplyDeleteसर लेख वाचल्या क्षणी आपल्या आईचे प्रेमळ रूप डोळ्यासमोर उभे राहीले आणि आपण हृदयस्पर्शी ते मांडले आहे
ReplyDeleteसुरेख
ReplyDeleteमामा,
ReplyDeleteआपण आईविषयी व्यक्त केलेले वर्णन जसे आहे तसेच त्या हुबेहूब आयुष्यात आहेत.'मामाची आई' म्हणून मी ओळखते.आजी जशी स्वभावाने कडक आहे तशीच खमकी आणि धीराची आहे.तोच मूळ स्वभाव तुमचाही आहे. "स्वतःचे उत्तुंग कर्तृत्व हीच स्वतःची ओळख."
मातृत्वाची जबाबदारी पेलतं पेलतं स्वतःलाही नव्याने फुलवत असते. स्वप्नातील दिवस आपले वास्तव स्वीकारून बघत असते, कारण ती'आई'असते.
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी
आई म्हणजे सर्वकाही.
आई नुसती घरात बसून राहिली तरी 33 कोटी देवांची सभा घरात भरल्याचे समाधान मिळते.सलाम त्या माऊलीला जीने आपल्यासारखा पुत्र घडवला. आजीला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपली भाची,
वंदना निंबाळकर कदम.
What to write about mother . No any pen and any page is sufficient. Many many salute to Aai.
ReplyDelete🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✍️✍️✍️
ReplyDeleteखूप सुंदर सर....
ReplyDeleteडॉ. राजपूरे सर
ReplyDeleteआईबद्दल व्यक्त केलेले आपले विचार अतिशय हदयस्पशी आणि प्रेरणा देणारे आहेत. आपण आपल्या लेखनीतून साक्षात 'आई' नजरेसमोर उभी केलात. अतिशय उत्तम लेखन.
,,बी. एम. पाटील
चंदगड
मातोश्रींचा संघर्षमय जीवणाचा प्रवास वाचला . आईचं एक वेगळेपण असतं . मातोश्रींच्या समोर सदैव नतमस्तक राहूया . त्यांना चांगले आरोग्य लाभो ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना .
ReplyDelete