Thursday, March 26, 2020

माती, पंख आणि आकाश माझा अनुभव..

माती, पंख आणि आकाश माझा अनुभव..


माती, पंख आणि आकाश हे भारताचे माजी कौन्सिल जनरल ऑफ न्यूयॉर्क श्रीयुत ज्ञानेश्वर मुळे यांचे जीवन प्रवास वर्णन आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी जवळील अब्दुल लाट च्या *माती*त ते घडले. घडलेल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास (*पंख* लाभले) कोल्हापुरात झाला व त्यानंतर त्यांनी भारतीय विदेश सेवेतील उच्चायुक्तपदी घेतलेली *आकाश* झेप या सर्वांचे यथार्थ वर्णन म्हणजे त्यांचे २२२ पानी आत्मचरित्र. यात वर्णन केलेल्या लेखकाच्या जिप्सी चा प्रवास लाट गावात सुरू होऊन जपानमध्ये संपतो. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन दिपस्तंभा एवढे व्यक्तिमत्व विकसित कसं होतं याचा बोध हे पुस्तक वाचल्यानंतर होतो. ही म्हणजे ग्रामीण भागातील होतकरू आणि हरहुन्नरी विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर यशोगाथा म्हटल्यास वावगे ठरू नये.

हे पुस्तक वाचायला घेतल्यानंतर तीन-चार दिवस लागले पूर्ण करायला. लेखकाचे बालपण, शाळा-महाविद्यालयीन काळ हा अतिशय उत्कंठावर्धक व आपलाच असल्याचा भास असल्यामुळे एका बसनीतच चाळीस ते पन्नास पानं वाचून व्हायची पण नंतर जपानी संस्कृती, तिथली माणसं याविषयी वाचण एवढे जलद व्हायचं नाही. लेखकाचे विचार ऐकून  जमिनीवर पाय ठेवून आकाशाकडे पाहणार एवढे महान व्यक्तिमत्व आपल्यातलच असल्याचा भास होतो. लेखकाने आपल्या पुस्तकातून आलेले अनुभव, आपलं जीवन इतक्या सहजसुंदर भाषेत व्यक्त केलेल आहे ते वाचून वाचकाला त्याहीपेक्षा जास्त व्यक्त होऊ वाटणं हीच लेखकाच्या लिखणातली जादू आहे.

लेखकाने ७० च्या दशकात सांगली जिल्ह्यातील मिरज जवळ असलेल्या आपल्या आजोळापासून, १९८८ पर्यंत जपानमधील तोक्यो येथील भारतीय दूतावासातील त्यांच्या सचिवपदाच्या कार्यकालातील अनुभव सर्वांग सुंदर भाषेत मांडलेला आहे. बालपणीचे अनुभव, खेड्यातले जीवन, गरीबी, आजोळच्या आठवणी, घरातील वातावरण, कुटुंबातील सर्व व्यक्ती, प्राथमिक शाळा, त्यांचे तेव्हाचे सर्व शिक्षक, गावातील पाण्याचा तलाव, विहिरीतलं मनसोक्त पोहण या सर्वांच आठवणरुपी चिंतन लेखकानं सुरुवातीला केलेल आहे. खेड्यात  जन्मलेल्या सर्वसामान्य मुलाची कथा जणू.. सर्व गोष्टींचे इत्थंभूत वर्णन ! आणि त्याच कारणामुळे वाचकाला हे आपल्याच बालजीवनाचं वर्णन असल्याचा भास होतो. पुस्तक वाचकाच्या इतक्या जवळ जातं की ते संपल्याशिवाय सोडण्याची इच्छा होत नाही..

लेखक दहा वर्षाचे असतानाच त्यांनी कोल्हापुरातील विद्यानिकेतन या त्यावेळी नव्याने सुरु झालेल्या निवासी शाळेत प्रवेश मिळवला. सर्वांसाठी लेखकांन शहराच्या ठिकाणी जाऊन परिश्रमपूर्वक चांगले व्यक्तिमत्व घडवावे हा कयास ! पण लेखकासाठी माहेरवासनीने सासरी जाताना घेतलेल्या निरोपाच्या वर परिस्थिती.. शिक्षणानिमित्त बाहेरगावी जाताना खेड्यातील मुलाच्या मनातील गावची ओढ तसेच शिक्षणासाठी मनावर ठेवा लागणारा धोंडा आणि त्याचा कासावीस झालेला जीव हे बारकाईने टिपले आहे. शाळेची प्रवेश परीक्षा, मुलाखत तसेच निकालाचे वर्णन संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभा करते. हे वाचत असताना मला तरी माझ्या कोल्हापुरातल्या पहिल्या दिवसांची आठवण झाली.

विद्यानिकेतन मध्ये असताना त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची चांगली सवय जडली. वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणे त्यांच्या जीवनावर कसा परिणाम करून गेली हे लेखक सांगायला विसरत नाही. त्यांच्या शाळेतील शिक्षक; त्यामध्ये सावंत सर व संस्कृत विषयाच्या शैला अग्निहोत्री मॅडम, प्राचार्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर झालेला परिणाम आणि संस्कृत विषयातील मानाची 'शंकर शेठ शिष्यवृत्ती' पटकावल्याचे तपशीलवार वर्णन लेखक या खंडामध्ये करतो. तसं निवासी शाळेत राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आलेले अनुभव लेखक यामध्ये कथन करतो. लेखिकाच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा परिवर्तनाचा काळ कुठला असेल तर तो विद्यानिकेतन मधील काळ असे मला वाटते. हाच तो काळ ज्यावेळी लेखकांमध्ये प्रामाणिकता, शिस्तप्रियता, अभ्यासूपणा तसेच जीवनात काहीतरी करण्याची जिद्द या सर्वांचे नव्याने घट्ट रोपण झाले.. मॅट्रिक परीक्षेपेक्षा संस्कृत विषयातील शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळवल्याचा आनंद हा श्रेष्ठ होता याचा उल्लेख केला आहे. यातून त्यांची अभ्यासातील प्रतिभा, घेतलेले कष्ट आणि परिश्रमावरील भक्ती हे गुण प्रतीत होतात.

पुढे लेखक कोल्हापुरातील एका महाविद्यालयात इंग्रजी विषय घेऊन पदवी परीक्षा विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतो. प्रतिभा आणि जिद्दीला कुठेही कमतरता नव्हती.. जिथे जाईल तिथे उत्कृष्टता मिळवायचीच हाच लेखकाचा ध्यास.. आपल्यातील ज्ञानरूपी प्रतिभेचा आपण ज्या समाजातून आलो त्या समाजासाठी उपयोग व्हायचा असेल तर शासनाच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन नागरी सेवेमध्ये सेवा करणे हे एक नजीकचे ध्येय त्यांनी त्या वेळेला ठेवल होत. त्यासाठी कोल्हापुरात राहून प्रयत्न अपुरे पडणार होते याची त्यांना नंतर जाणीव झाली.. म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी ते मुंबईला गेले. तिथे अभ्यास करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना झालेली मदत, तिथले अनुभव, मार्गदर्शक, मित्र या सर्वांचा लेखाजोखा लेखक पुस्तकामध्ये मांडतो.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन नागरी सेवांमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक नवख्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक अनुभव म्हणून याच्याकडे बघायला काही हरकत नाही. पूर्व परीक्षा, त्यानंतरची मुख्यपरीक्षा, त्यातील मुलाखत या सगळ्यांचं सूक्ष्म वर्णन लेखक करतो तेव्हा आपण खरोखर त्या कक्षात उपस्थित राहून लेखकाची मुलाखत बघतोय की काय असा भास होतो.. हे वर्णन म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अनुभवाची कुपी म्हणायला हवी. लेखक स्वतः पुण्यामध्ये उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी भारतीय विदेश सेवेतील अधिकारी पद प्राप्त केले या सगळ्यांचे वर्णन रोमांचकारी..

पहिली पोस्टिंग जपानमध्ये होते. तिथे सोबतीला घरकाम मदतीसाठी आपला मारुती नावाचा गावातील मित्र त्यांनी निवडला. आपल्याबरोबर आपल्याच भागातील इथपर्यंत येऊ न शकलेल्या आपल्या मित्राला जगाच्या त्या कोपऱ्यातील संस्कृतीची, प्रदेशाची माहिती व्हावी हा लेखकाचा रास्त हेतू दिसतो. मारुतीला जपानला नेतनाच्या सर्व प्रसंगांचे तपशीलवार वर्णन यात केलेले आहे. यामध्ये भारतीय माणूस आपल्या स्ववलयातून बाहेर पडायला सहजासहजी तयार होत नसतो हे यात पटवून दिलेले आहे. प्रगती करायची असेल तर समोरची संधी नाकारून मी आहे त्या ठिकाणीच बरा ही मानसिकता सर्व भारतीयांनी सोडायला पाहिजे हा संदेश यातून लेखक देतो. जपान मधली माणसं, त्यांची संस्कृती, समाजव्यवस्था, सणवार, इतिहास, त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली प्रगती, ते आर्थिक महासत्ता का आहेत या सगळ्याचे बारकाईने वर्णन केले आहे. रवींद्रनाथ टागोरांची जपान भेट, त्यांची कविता रुपी आठवणी आणि इतर गोष्टी हे एक जपानी वयोवृद्ध आपल्या पोटच्या लेकरा सारखी सांभाळल्याचा उल्लेख जेव्हा लेखक करतो तेव्हा पापण्यांच्या कडा ओलावल्या शिवाय रहात नाहीत. मैत्रीसंबंध, भावनांची कदर आणि नाती जपणं हे जपानी माणसाच्या कडून च शिकावं !

जपान मधील वेगवेगळ्या भूकंपांचे वर्णन तपशीलवारपणे लेखकाने दिलेले आहेत. प्रत्येक भूकंप महाभयंकर असला तरी तेथील नागरिक या भूकंपाना सरावलेले आहेत कारण त्यांना त्यांच्या वास्तु रचनेवर पूर्ण विश्वास आहे.. जपानमधील भूकंप आणि भारतातील भूकंप याची तुलना लेखन करायला विसरत नाही. नैसर्गिक संकटांना तोंड देण्याच्या दृष्टीने आपणाकडे का नाही होत अशी प्रगती? जपान मधील दिवस भारतात यायचे असतील तर काय व्हायला पाहिजे हे त्यांच्या निरीक्षणांवरून समजते.

जपानमध्ये लेखकाचे पुस्तक एकदा एका बस मध्ये विसरलेले होते. ते विसरलेले पुस्तक, त्या पुस्तकात बुकमार्क केलेल्या एका विजिटिंग कार्ड च्या पत्त्यावरून लेखकापर्यंत तिसऱ्या दिवशी पोहोचवल गेलं यातून जपानमध्ये अस्तित्वात असलेल्या शिस्तबद्धतेचा एक वेगळा नमुना वाचायचा मिळतो.
जपान मधला माणूस आपल्या ज्ञानाचा उपयोग अभिनव आणि नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी कसा करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी वर्णन केलेल्या पोलिसांना सापडलेल्या एका जपानी जंगली माणसाचं होय. हा मनुष्य कित्येक वर्षे पान्याखाली राहतो, तिथे स्वतःचं अस्तित्व विश्व तयार करतो, स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी तंत्रशुद्ध पद्धतीने तयार करून पाण्याखाली कित्येक वर्षे जिवंत राहतो, हे काय सांगते ? प्रगत जपानी बुद्धीमत्तेच गुणवैशिष्ट !

जपानमध्ये वाहन चालकाच्या परवाना मिळवणे किती अवघड गोष्ट आहे हे त्यांनी अतिशय विस्तृतपणे सांगितले आहे. बहुदा भारतामध्ये वाममार्गाने हे परवाने मिळवले जातात आणि त्याचा परिणाम आपण रस्त्यांवर घडणाऱ्या सर्व प्रकारच्या अपघातांमध्ये बघतो. जपानमधील परवाना पद्धत भारतामध्ये का सुरू होत नसावी ? हा मलाही पडलेला प्रश्न आहे. जपानमधील फुजियामा पर्वत, त्यांचे साहित्य व कला या सर्वांची तोंडओळख लेखक विस्तृतपणे करून देतो आणि एक प्रकारे वाचकाला जपानची सहल घडवून आणतो.

मला वाटते लेखकाच्या जपानमधील तीन वर्षांच्या सेवेनंतर त्यांच्या आई-वडिलांची तोक्यो भेट, त्यांचे विमानतळावरील आगमन आणि तिथे घालवलेला वेळ याचे वर्णन म्हणजे या पुस्तकाचा आत्मा ! पृथ्वीतलावरील नवनवीन प्रदेश, विज्ञानाने केलेली प्रगती, गगनचुंबी इमारती, महाकाय प्रकल्प आपण अभ्यासात शिकतो व योग आला तर बघतो देखील. पण हे सर्व आपल्या आई-वडिलांना दाखवण्याचा योग ज्याला येतो त्याच्यापेक्षा भाग्यवंत दुसरा कोणी असू शकत नाही. लेखक खूप भाग्यवान आहेत. यावेळी  त्यांच्या आई - वडिलांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे केलेले वर्णन वाचताना वाचक त्यांच्यामध्ये आपल्या आई-वडिलांना पाहिल्याशिवाय राहत नाही.

भारतीय विदेश सेवेत रुजू होण्याअगोदर भारताचे ग्रामीणदर्शन व खेड्यातील समस्यांची जाण या अधिकाऱ्यांना व्हावी म्हणून त्यांची उत्तर प्रदेशमधील मसूरी या थंड हवेच्या ठिकाणी काही काळासाठी प्रशिक्षण पोस्टिंग असते. या काळात लेखकाला देशाच्या दुसऱ्या भागातील ग्रामीण जीवनाची व तेथिल समस्यांची नव्याने ओळख झाली. समाजव्यवस्था आणि समस्यांमध्ये लेखकाचे मुळगाव आणि हा प्रदेश यामध्ये फारसा फरक नव्हता. लेखकाच्या मते खेडेगावात घडलेल्या त्याच्यासारख्या व्यक्तिमत्वाला ग्रामीण दर्शन कशासाठी ? इथली समाजव्यवस्था व समस्या अवगत करूनच लेखक तिथपर्यंत आलेला असतो. यावेळी गावातील एका मनोरुग्ण तरुणाची कथा अतिशय विस्तृतपणे सांगून आपल्या समाजव्यवस्थेवर सरंजामशाही तसेच बरबटलेल्या मानशिकते बरोबर जातिव्यवस्थेचा अजूनही पगडा कायम असल्याचे निदर्शनात आणतो.

हे सर्व करत असताना लेखक भारतातील आणि प्रगत देशातील शासन व्यवस्था यांची तुलना करतो. आपल्याला प्रगत देशाच्या यादीत जायचे असेल तर काय व्हायला पाहिजे ही नकळतपणे वेळोवेळी सांगून जातो. भारतासाठी परिवर्तन ही काळाची गरज आहे. पण फक्त शासन व्यवस्था बदलून हे परिवर्तन होणे अशक्य आहे हेही नकळतपणे जाणवते. बदलायला पाहिजे तो समाज आणि त्यांचे विचार.. आणि हा मूलभूत बदल व्हायचा असेल तर भारतातील शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे असे लेखकाला वाटते. आपल्या देशात सामाजिक विषमता दूर करण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत. भारतातील खेड्यांमधील जातीयता, जातीयतेच्या नावावर केली जाणारी छळवणूक पूर्णपणे थांबायचे असेल तर समाजात मानवी मूल्यांचे रोपण करणे आवश्यक आहे.

लेखक जगाच्या कुठल्याही कोण्यात असला तरी त्याची गावची नाळ तुटलेली नाही. ग्रामीण जीवन त्यांच्या नसानसात भरलेल आहे. कोल्हापूर आणि कोल्हापूर मधील ठिकाणांचे यथार्थ वर्णन लेखकाने यांमध्ये केलेल आहे. यामध्ये पंचगंगेचा पूर असेल, त्यांनी रंकाळयामधील पैलतीरावर पोहून जाऊन पैज जिंकल्याचा प्रसंग असेल, त्यांच्या शिक्षकांच्या सोबत पुरातून पुलावरून पैलतीर गाठल्याचा बाका प्रसंग असो, त्यांच्या जीवनातील नीलंबरी असो या सर्वांचे वर्णन म्हणजे प्रत्येक कोल्हापूरकरांसाठी आपल्या मातीच्या गौरवाप्रमाणे..

लेखक आपल्या आत्मचरित्राचा शेवट जपानमधील सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जतन करून ठेवलेल्या मंदिराला दिलेल्या भेटीने करतो. सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यू बाबतच्या काही गोष्टींचा खुलासा हे वाचल्यानंतर होतो. सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा जपान मधील माणसांना एवढा अभिमान वाटत असेल तर तो भारतीयांना तितका का वाटत नसावा या विचाराने मन कासावीस होते..

प्रत्येक प्रसंगातील सूक्ष्म निरीक्षण, सामाजिक समस्यांवर केलेले परखड भाष्य, भावनावश करायला लावणार लिखाण आणि त्यावर मांडलेले लेखकाचे स्वतःचे विचार, पुस्तक आणखीन एकदा वाचायला प्रेरित करत. हे आत्मचरित्रात्मक म्हणजे लेखकाच्या अनेक ललित लेखांचा सुसूत्र पद्धतीने मांडलेला समूह आहे. प्रत्येक वेळी लेखक वाचकांना सिनेमाच्या कथेप्रमाणे लिखाणातील सातत्याला धक्का न पोहोचवता फ्लॅश बॅक मध्ये घेऊन जातो. एक सहज सुंदर अनुभव..

लेखकाने जपान बरोबरच रशिया, मॉरिशस, दमास्कस, सीरिया, मालदीव तसेच अमेरिका येथेदेखील उच्चायुक्त पदी काम केलेले आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागातील संस्कृती, तिथे त्यांना आलेले अनुभव व त्यानिमित्ताने त्यांचे बहुमोल विचार त्यांच्या पुढील लेखनातून वाचायला नक्कीच आवडेल. आमच्यातील माणसाने आमच्यासाठी तयार केलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे लेखकाच्या माती, पंख आणि आकाश मधील मुक्त लिखाण असे वाटते. यासाठी लेखक ज्ञानेश्वर मुळे यांचे मनःपूर्वक आभार आणि त्यांच्या पुढील सर्व लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा..

डॉ. केशव राजपुरे
कोल्हापूर
२६.०३.२०२०
मोबाईल: ९६०४२५०००६

1 comment:

  1. अत्यंत प्रभावी अनुभव कथन आणि वाचनाची आवड असणाऱ्यांना मेजवानी च जणू! सुंदर विवेचन सर!!

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...