स्नायूंची कळ की ‘नागिन’? : भीती, अज्ञान ते अचूक निदानापर्यंतचा माझा पाच दिवसांचा अनुभव
आरोग्य ही मानवी जीवनातील सर्वांत मोठी पुंजी आहे, याची जाणीव आपल्याला नेहमीच असते; पण जेव्हा शरीर अचानक एखादा वेगळाच संकेत देतं, तेव्हा मन किती अस्वस्थ होतं, याचा प्रत्यक्ष अनुभव मी गेल्या आठवड्यात घेतला. रविवार, २ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते शुक्रवार, ७ ऑगस्टपर्यंतचा हा पाच दिवसांचा प्रवास माझ्यासाठी शारीरिक वेदनांचा तर होताच, पण त्याहून अधिक तो वैद्यकीय साक्षरतेचा आणि संयमाचा धडा देणारा ठरला. हा अनुभव माझ्या ‘दीपस्तंभ’ ब्लॉगच्या वाचकांसाठी आणि मित्रपरिवारासाठी आवर्जून शब्दांकन करत आहे, जेणेकरून वेळेवर घेतलेल्या योग्य निर्णयाचे महत्त्व सर्वांना कळावे.
(रविवार, २ ऑगस्ट): २ ऑगस्टच्या रात्री अचानक दोन वाजता डावा बकुटा आणि खांदा तीव्रतेने दुखू लागला. मध्यरात्री दोनच्या सुमारास डावा हात, काख आणि खांदा अचानक तीव्रतेने दुखू लागणे हे ऐकताच कोणत्याही सामान्य माणसाच्या मनात पहिली शंका येते... हृदयविकार किंवा पॅरालीसीस चा झटका तर नाही ना?
माझ्या मनातही क्षणात भीतीची पाल चुकचुकली. मी लगेच स्वतःची लक्षणे तपासली... घाम आला नव्हता, श्वास घ्यायला कोणताही त्रास होत नव्हता किंवा छातीवर दबाव नव्हता. त्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी वाटल्याने मनाला थोडा धीर मिळाला; पण वेदना मात्र असह्य होत्या. मी सौभाग्यवती मेडिको डॉ प्रियाला उठवले. त्याक्षणी, अचानक झोपेतून उठल्याने आणि भितीपोटी मला त्या वेदनांचे स्वरूप ओळखता आले नाही; म्हणजे त्या स्नायूंच्या होत्या की हाडांच्या की चमका, हे मला सांगता आले नाही. तिने लक्षणे ऐकून आणि परिस्थिती बघून अंदाज बांधला, "कदाचित रोजच्या खेळण्यामुळे स्नायू दुखावला असेल."
पण माझ्या मनात शंका होती.. मी बॅडमिंटन तर उजव्या हाताने खेळतो, मग डावा हात इतका का दुखावा? तरीही वेदना कमी करण्यासाठी तिने एक वेदनाशामक गोळी; पेनकिलर दिली. सुदैवाने अर्ध्या तासात औषधाचा प्रभाव सुरू झाला, वेदना थांबल्या आणि मला शांत झोप लागली.
(सोमवार, ३ ऑगस्ट): दुसऱ्या दिवशी सकाळी दुखणे थांबल्यामुळे मी नेहमीप्रमाणे बॅडमिंटन खेळायला गेलो. प्रियाने सुचवले की, "जर हा स्नायूंचा ताण असेल, तर आपण अँटी-इन्फ्लेमेटरी आणि पेनकिलर गोळी एकत्र घेऊया." त्यानुसार मी डोस घेतला; परंतु रात्री घेतलेल्या पहिल्या गोळीचा असर संपताच खांदा पुन्हा तीव्रतेने दुखू लागला.
दुपारी आणि संध्याकाळी दोन डोस घेऊनही वेदना कमी होईनासे झाले. सोमवारची रात्र अत्यंत वेदनादायी गेली. डाव्या बाजूला झोपताच येत नव्हते. रात्री ४ ते ५ वेळा झोपमोड झाली, तळमळ वाढली आणि वेदनांनी तीव्र रूप धारण केले.
(मंगळवार, ४ ऑगस्ट): मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी मी बॅडमिंटनला जाणे टाळले. ऑफिसमध्ये गेलो, पण केबिनमध्ये अस्वस्थता वाढू लागली. शेवटी मी विद्यापीठाच्या हेल्थ सेंटरमध्ये गेलो.
माझी लक्षणे ऐकून प्रथमदर्शनी त्यांनाही वाटले की हा स्नायूंचा खिचाव (मसल स्ट्रेन) किंवा डिहायड्रेशनचा प्रकार असावा. तरीही खबरदारी म्हणून त्यांनी रक्तदाब (बीपी) आणि इसीजी काढण्यास सांगितले. इसीजी काढत असताना मनात धाकधूक चालूच होती: ‘काय निघेल आणि काय नाही?’
सुदैवाने, रक्तदाब आणि इसीजी दोन्ही पूर्णपणे नॉर्मल आले!
या रिपोर्टमुळे हृदयविकाराची भीती पूर्णपणे geli आणि हे केवळ ‘स्नायूदुखी’च आहे यावर माझा पक्का विश्वास बसला. तेथील मेडिकल ऑफिसर यांनी दिलेल्या औषधांचा कोर्स मी सुरू केला. परंतु त्या रात्रीही वेदना कमी झाल्या नाहीत. काखेच्या खालचा भाग बधीर झाला होता, तिथे विजेसारख्या चमका येत होत्या आणि काखेच्या बाजूला प्रचंड आग-आग होत होती. मी पेन-रिलीफ स्प्रे मारला, त्यामुळे काही काळ थांबल्यासारखे वाटले. काखेत वळ किंवा आयदान उमटला असल्यासारखे जाणवले. इन्फेक्शन किंवा मुका मार लागल्याखेरीज हे होत नाही हे मला माहित असून सुचले नाही.
यादरम्यान एका मित्राने सल्ला दिला, "सर, या दुखण्याला हलक्यात घेऊ नका. माझी काही मदत हवी असेल तर सांगा. माझे नातेवाईक एक नामांकित डॉक्टर आहेत." मलाही तसेच वाटू लागले होते, कारण पेनकिलर घेऊनही स्नायूदुखी थांबत नव्हती आणि चमका येत होत्या. मी अधूनमधून ऑक्सिमीटरवर ऑक्सिजन लेव्हल आणि पल्स रेट तपासत होतो; ते नॉर्मल येत असल्याने मनाला तेवढाच दिलासा मिळत होता.
(बुधवार, ५ ऑगस्ट): बुधवारी, ५ ऑगस्टला वेदना सहन करत मी ऑफिसला गेलो, लेक्चर घेतले. दुपारी घरी विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला, पण पाठीची आग आणि चमकांमुळे झोपणे किंवा बसणे कठीण झाले होते. त्यामुळे पुन्हा विभागाकडे परतलो. विभागात आल्यावर मी बर्फाचे खडे मागवून घेतले. संध्याकाळी घरी आल्यावर त्याचा तुकडा करून माझ्या कन्येस जिथे जिथे आग होत होती तिथे बर्फ लावायला सांगितला. बर्फ लावल्यामुळे आगीपासून तात्पुरता खूप दिलासा मिळाला.
त्याच वेळी कन्येच्या निदर्शनास आले की, माझ्या पाठीच्या डाव्या बाजूला छोटे-छोटे पुरळ आले आहेत.
मी प्रथम विचार केला की, कदाचित घामामुळे किंवा आधी मारलेल्या स्प्रेच्या अॅलर्जीमुळे हे आले असावेत. त्या वेळी हे पुरळ म्हणजेच या आजाराचे मुख्य लक्षण होते, हे मला समजले नाही. रात्री पुन्हा प्रचंड वेदना, झोपमोड आणि अस्वस्थता कायम राहिली.
(गुरूवार, ६ ऑगस्ट): गुरूवार, ६ ऑगस्ट रोजी दुपारी पाचवा डोस घेऊनही वेदना थांबत नव्हत्या. पुन्हा एकदा बर्फ लावण्यासाठी मी बनियन काढून थांबलो होतो.
एकूण झालेली सर्व लक्षणे, चमका, आग आणि पाठीवरील पुरळ पाहून प्रियाच्या मनात शंका आली: "हा नागिन (हर्पिस झोस्टर) प्रकार तर नाही ना?"
तिने पाठीवरील पुरळ जवळून पाहिले, तर त्या पुरळांवर पाण्याचे छोटे फोड आले होते. प्रियाला खात्री पटली की ही 'नागिन'च आहे. तोच आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचा आणि निर्णायक क्षण ठरला ! आदल्या दिवशी कन्येने केलेले पुरळांचे निरीक्षण प्रियाला सांगितले असते तर एक दिवस अगोदर निदान झाले असते.
मी लगेच त्या पुरळांचा फोटो काढून हेल्थ सेंटर मधील मेडिकल ऑफिसर यांना पाठवला. त्यांनीही फोटो पाहून ‘नागिन’ असल्याच्या संशयाला पुष्टी दिली. माझ्या छातीच्या डाव्या बाजूला आणि पाठीवर दोन ठिकाणी पुरळांचे पुंजके आले होते. मी सर्व लक्षणे आणि फोटो जेमिनी वर अपलोड केले. तिथेही खात्री झाली आणि एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला मिळाला:
वैद्यकीय शास्त्रात 'नागिणी'ला (हरफीज झोस्टर) अनेकदा 'मास्टर मिमिक' म्हणजेच दिशाभूल करणारा आजार म्हटले जाते. कारण मणक्याच्या नसेत सुप्त असलेला हा विषाणू जेव्हा सक्रिय होतो, तेव्हा तो त्या विशिष्ट नसेच्या संपूर्ण मार्गावर तीव्र दाह निर्माण करतो. पुरळ त्वचेवर येण्याआधीच नसेच्या आत ही आग आणि वेदना सुरू झालेली असते. त्यामुळेच पाठीपासून, काखेतून ते छातीपर्यंत होणाऱ्या या वेदनांना सुरुवातीला हृदयविकार, स्नायूंचा खिचाव किंवा मज्जातंतूचा आजार समजण्याची चूक होते.
"नागिनच्या उपचारात पहिले ७२ तास (७२ तासांची गोल्डन विंडो) अत्यंत महत्त्वाचे असतात. जितक्या लवकर अँटीव्हायरल उपचार सुरू होतील, तितका हा आजार नियंत्रणात येतो."
पहिले लक्षण दिसल्यापासून ७२ तासांहून अधिक काळ लोटला होता, त्यामुळे मनात भीती वाटू लागली. या रोगाची दाहकता मी ऐकून होतो; तो फोफावण्याआधीच रोखणे गरजेचे होते. मी माझ्या दोन विद्यार्थ्यांसह तातडीने राजारामपुरीतील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. नलावडे यांची वेळ घेतली आणि हास्पिटल गाठले. बाहेर तर जोरदार पाऊस पडत होता. त्यात आमचा नंबर २३ वा. पण मधील बरेचजण फक्त नंबर लावून गेले होते. त्यामुळे सुदैवाने १५ च मिनिटांत आमचा ५ वा नंबर आला आणि एकदाचे आम्ही डॉक्टरांना भेटलो.
डॉक्टरांनी पाहाताच विचारले, "कालच का नाही आलात? "मी नम्रपणे सांगितले, "सर, कालपर्यंत ही पुरळ इतकी स्पष्ट नव्हती आणि हा नागिनचा प्रकार असेल याची कल्पनाच आली नाही. आज लक्षात येताच लगेच आलो आहे."
त्यांनी योग्य अँटीव्हायरल उपचार त्वरित सुरू करण्यासाठी आवश्यक औषधे लिहून दिली.
माझ्या पाठीवर आलेल्या पुरळांचे एक वेगळेच वैशिष्ट्य माझ्या निदर्शनास आले. हे पुरळ डाव्या बाजूला विखुरलेले नसून, एका विशिष्ट रेषेत छोट्या-छोट्या पुंजक्यांच्या रूपात आले होते आणि पुढे सरकत असल्याचा भास होत होता.
यामागचे वैद्यकीय कारणही तितकेच रंजक आहे. आपल्या पाठीच्या मणक्यातून निघणारी प्रत्येक नस (नर्व्ह) शरीराच्या एका विशिष्ट पट्ट्याला (डर्माटोम) जोडलेली असते. मणक्याच्या मुळाशी सुप्त बसलेला विषाणू जेव्हा जागा होतो, तेव्हा तो नसेच्या संपूर्ण लांबीवरून हळूहळू पुढे प्रवास करतो. नसेची जी जी टोके त्वचेजवळ येतात, तिथे हे विषाणू आल्यावर पाण्याचे हे बारीक फोड पुंजक्याने उठतात.
एकाच नसेच्या रेषेवर सापासारखे नागमोडी पुढे सरकणाऱ्या या पुरळांमुळेच या आजाराला पारंपरिक भाषेत 'नागीण' हे नाव पडले आहे. विशेष म्हणजे, ही नस शरीराच्या मध्यरेषेवर संपत असल्याने हे पुरळ शरीराची अर्धी बाजू ओलांडून दुसरीकडे कधीच जात नाहीत. म्हणूनच माझा हा संपूर्ण त्रास फक्त डाव्या बाजूपुरताच मर्यादित राहिला ! काखेत आलेला वळ व्हायरल इन्फेक्शन चा संकेत होता.
एक गोष्ट मात्र नक्की घडली. निदान (डायग्नोसिस) स्पष्ट झाल्यामुळे मनातील अनिश्चिततेची भीती पूर्णपणे निघून गेली. दुखण्याचे कारण काय आहे हे कळल्यामुळे एक मानसिक बळ मिळाले. शिवाय, पूर्वी प्रियालाही असाच त्रास झाला असताना याच डॉक्टरांच्या उपचारांनी ती पूर्ण बरी झाली होती, त्यामुळे उपचारांवर पूर्ण विश्वास बसला.
गुरुवारी रात्री औषधे सुरू करूनही जळजळ चालूच होती. पण एक नवीन निरीक्षण जाणवले- जिथे पुरळ आले होते, नेमकी तिथेच आता जळजळ केंद्रित झाली होती आणि काखेतील बधीरपणा कमी झाला होता.
दरम्यान, एका मित्राकडून माहिती मिळाली की, 'उमा टॉकीज'जवळ वडिलोपार्जीतपणे एक कुटुंब यावर लेप देतात. मी तो पारंपरिक लेप आणून संध्याकाळी लावला. मला थंडावा जाणवला आणि आराम मिळाला. डॉक्टरांची अँटीव्हायरल औषधे आणि हा लेप; दोघांनी मिळून काम करायला सुरुवात केली.
हळूहळू वेदनांचा जोर ओसरू लागला. शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हातातील वेदना बऱ्यापैकी कमी झाल्या, चमका जवळजवळ नाहीश्या झाल्या. लेप दोनदा लावून झाल्यानंतर जळजळ आणि दाह सुमारे ७५ टक्के कमी झाला.
नागीण म्हटलं की प्रचंड जळजळ आणि आग अपेक्षित असते, पण माझ्या बाबतीत सुदैवाने आग झाली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे पुरळ दिसताच पहिल्या ७२ तासांत वेळेवर सुरू झालेले अँटीव्हायरल औषधोपचार! डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यामुळे विषाणूचा त्वचेवरील प्रसार लगेच थांबला. परंतु, हातात मारणाऱ्या विजेच्या चमका आणि बधीरपणा हा नसेचा दाह कमी होतानाचा आणि नस पूर्ववत होतानाचा एक नैसर्गिक भाग असतो. विषाणूमुळे संवेदनशील झालेली नस जेव्हा शांत होऊ लागते, तेव्हा मेंदूकडे असे अनियंत्रित विजेसारखे सिग्नल पाठवते.
त्यामुळेच शुक्रवारी रात्री मला चार दिवसांनंतर शांत आणि गाढ झोप लागली!
माझ्यासारख्या नियमित खेळणाऱ्या, सक्रिय आणि फिट राहणाऱ्या माणसाला हा आजार अचानक कशामुळे झाला असावा, असा प्रश्न माझ्या मनातही आला. आपण डॉक्टर नसल्याने आपल्याला याचे योग्य कारण माहित नसलं तरी ढोबळपणे याचं उत्तर शोधताना असं वाटलं की, गेल्या काही दिवसांत झालेला बॅडमिंटनचा अति सराव, लांबच्या ड्रायविंग प्रवासाची धावपळ, अपुरी विश्रांती आणि शरीरातील जीवनसत्त्वांची (व्हिटॅमिन्स) संभाव्य कमतरता या सर्व कारणांचा एकत्रित ताण शरीरावर आला असावा. यामुळे माझी रोगप्रतिकारशक्ती (इम्युनिटी) क्षणिक का होईना खाली आली असावी. पाठीच्या मणक्यातील मज्जातंतूंच्या मुळाशी कित्येक वर्षांपासून सुप्त अवस्थेत शांत बसलेल्या 'व्हॅरिसेला-झोस्टर' या विषाणूने नेमक्या याच संधीचा फायदा घेतला असावा. प्रतिकारशक्ती ढळल्याचे लक्षात येताच तो अचानक सक्रिय झाला असावा आणि त्याने नसेवर हल्ला चढवला असावा... आणि मी या नागिणीच्या आजाराच्या विळख्यात आलो !
मला नागीण झाल्याचे समजताच मला भेटणाऱ्या किंवा विचारपूस करणाऱ्या ९०% लोकांनी एकच वाक्य सांगितले— 'सर, शरीरात खूप उष्णता वाढली असेल, म्हणून नागीण उठलीय!'
पण वैद्यकीयदृष्ट्या हा एक अत्यंत मोठा गैरसमज आहे. नागिणीचा आणि शरीरातील 'उष्णतेचा' किंवा खाण्यापिण्यातील उष्ण पदार्थांचा दूरवरही काहीही संबंध नाही. हा पूर्णपणे विषाणूचा (व्हायरल इन्फेक्शन) खेळ आहे. लहानपणी झालेल्या कांजण्यांचा विषाणू मणक्यातील नसेच्या मुळाशी सुप्त बसलेला असतो आणि प्रतिकारशक्ती कमी होताच तो नसेवर हल्ला करतो.
नागिणीमध्ये होणारी 'आग' ही नसेची वेदना (नर्व्ह पेन) असते, शरीरातील 'उष्णता' नव्हे! याला उष्णता समजून अयोग्य घरगुती उपाय करण्यात वेळ घालवण्याऐवजी, पुरळ दिसताच ७२ तासांच्या आत अँटीव्हायरल उपचार सुरू करणे हाच यावर एकमेव शास्त्रीय उपाय आहे.
औषधांचा आणि लेपाचा कोर्स पुरळ, चमक आणि वेदना पूर्ण जाईपर्यंत चालू ठेवावा लागणार आहे. अद्याप अधूनमधून पाठीच्या किंवा छातीच्या बाजूला हलक्या चमका येतात, पण आता त्या कशाच्या आहेत हे पूर्णपणे ठाऊक असल्यामुळे मनात कोणतीही भीती किंवा दडपण उरलेले नाही.
या प्रवासात मला शरीराच्या रचनेचा एक वेगळाच धडा मिळाला. डावा हात मोकळा खाली लटकवला की गुरुत्वाकर्षणामुळे सुजलेल्या नसेवर ताण येऊन वेदना वाढायच्या, त्यामुळे तो हात उशीवर किंवा खुर्चीवर टेकवून ठेवावा लागला. तसेच डाव्या कुशीवर झोपल्यास नसेवर थेट दाब पडायचा, त्यामुळे उजव्या कुशीवर झोपून डाव्या हाताखाली उशीचा आधार घेणे अत्यंत सोयीचे ठरले. मुबलक पाणी आणि वेळेवर विश्रांती यांमुळे शरीर लवकर सावरले.
स्नायूचा ताण (मसल स्ट्रेन) ते 'नागिन' (हर्पिस झोस्टर) हे अचूक निदान होण्यासाठी पाच दिवस गेले. पण या पाच दिवसांत स्वतःला सांभाळत, वेदना सहन करत योग्य निदानापर्यंत पोहोचणे आणि उपचारांवर विश्वास ठेवणे हा एक मोठा अनुभव होता.
या अनुभवातून मी काय शिकलो? (वाचकांसाठी महत्त्वाचे धडे)
[१] अस्पष्ट वेदनांकडे दुर्लक्ष करू नका.
[२] शरीराच्या एकाच बाजूला (डाव्या किंवा उजव्या) तीव्र वेदना, त्वचेवर बधीरपणा किंवा आगीसारखी जळजळ होत असेल, तर ती केवळ स्नायूदुखी नसून मज्जासंस्थेशी किंवा इत्तर आजारासंबंधित असू शकते.
[३] नागिन (हर्पिस झोस्टर) मध्ये अनेकदा पुरळ किंवा पाण्याचे फोड येण्याआधी २ ते ४ दिवस तीव्र वेदना आणि चमका येतात. लक्षणे दिसताच किंवा शंका येताच ७२ तासांच्या आत त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अँटीव्हायरल औषधे सुरू करणे अत्यंत गरजेचे असते.
[४] आजाराचे योग्य निदान होईपर्यंत अस्वस्थता असणे स्वाभाविक आहे, पण एकदा निदान झाल्यावर वैद्यकीय उपचारांवर आणि स्वतःच्या रोगप्रतिकारशक्तीवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.
[५] आपल्याला वाटतं की शरीरात एकच 'व्हायरस' आहे आणि एका गोळीने तो मरेल; पण प्रत्यक्षात शरीरात लक्षावधी विषाणू वेगाने स्वतःची संख्या वाढवत असतात. अँटीव्हायरल औषधे विषाणूंना मारण्याऐवजी त्यांच्या पुनरुत्पादनाची फॅक्टरीच बंद करतात. ही औषधे रक्तात २४ तास सक्रिय ठेवण्यासाठी दर ८ तासांनी (दिवसातून ३ वेळा) गोळी घेणे अत्यंत गरजेचे असते, जेणेकरून शरीराची प्रतिकारशक्ती त्या विषाणूंना पूर्णपणे निष्प्रभ करू शकेल.
[६] वयाच्या ५५ व्या वर्षी, नेहमीप्रमाणे खेळणारा आणि सक्रिय असणारा माणूस अचानक अशा वेदनांनी घेरला जातो, तेव्हा सकारात्मक राहणे हीच सर्वात मोठी ताकद असते. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे, भीती न बाळगता इसीजीसारख्या तपासण्या करून शंकांचे निरसन करणे आणि औषधांचा कोर्स शिस्तबद्धपणे पूर्ण करणे यामुळे मी या नागिणीच्या त्रासातून सुखरूप बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
शरीराने दिलेला प्रत्येक संकेत महत्त्वाचा असतो, फक्त तो वेळेवर ओळखता आला पाहिजे !
माझ्या या अनुभवाचा कोणातरी वाचकाला वेळेवर योग्य निर्णय घेण्यासाठी फायदा व्हावा, याच हेतूने हा लेखप्रपंच !
आपला,
प्रा. (डॉ.) केशव राजपुरे
(माझे विचार आणि अनुभव : 'दीपस्तंभ' ब्लॉग)