Friday, August 28, 2020

हुतात्मा अनिकेत मोळे

 


हुतात्मा अनिकेत मोळे यांस प्रथम पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन !!
(२८ ऑगस्ट २०२०)

सैनिक ... भारतमातेचे शूर सुपुत्र!! ...देशाच्या रक्षणासाठी सातत्याने तेजत असणारा दिवा म्हणजे सैनिक!! आपल्या जीवाची बाजी लावून देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारी आपल्या देशाची शान म्हणजे सैनिक!! आपल्या समाजात सैनिकांप्रती सदैव आस्था असली पाहिजे, कारण सैनिक हे कोणत्याही नात्यात न गुरफटता आपल्या आई -वडिलांना ,पत्नी व मुलांना सोडून मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर लढत असतात. आपल्या देशावर आलेल्या कोणत्याही परकीय आक्रमणाची किंवा त्याच्या भीतीची झळ सर्वसामान्य माणसाला न लागू देता आपले सैनिक दिवस -रात्र भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर खंबीरपणे पहारा देत असतात आणि वेळ पडली तर स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन शाहिद होतात व आपला प्राण आपल्या मातृभूमीला अर्पण करतात. तर अशा सर्व सैनिकांना व शाहिद जवानांना जयहिंद फाऊंडेशनकडुनत विनम्र अभिवादन!!

आज २८ ऑगस्ट २०२०, शहीद कु.अनिकेत सुभाष मोळे यांचे आज प्रथम पुण्यस्मरण. १२ मे १९९७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घरपण ता. पन्हाळा या छोट्याश्या खेड्यात एका शेतकरी कुटुंबामध्ये शहीद कु.अनिकेत सुभाष मोळे यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण रामचंद्र पवार हायस्कुल,परखंदळे व महाविद्यालयीन शिक्षण विठ्ठल पाटील महाविद्यालय, कळे ता. पन्हाळा येथून पूर्ण केले. शालेय जीवनामध्ये ते कुस्ती मध्ये निपुण होते व आपल्या देशाच्या सेवेसाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ठेऊन त्यांनी त्यांचे मोठे बंधू (फौजी पवन सुभाष मोळे) यांच्या पावलावर पाऊल टाकले.

महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच बी. एस्सी. भाग -१ ला असताना सन मार्च २०१६ ला त्यांची सैन्यामध्ये निवड झाली आणि ते युनिट २५ मराठा मध्ये शिपाई या पदावर बेळगाव येथे रुजू झाले. तेथून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याननंतर ते पंजाब येथे ६ महिने देशसेवेचे कार्य केले. त्यांनतर त्यांनी टेंगा (अरुणाचल प्रदेश) येथे एक वर्ष सेवेचा कार्यकाळ पूर्ण केला. कमी कालावधीत ट्रेनर या पदापर्यंत पोहोचल्याबद्दल १५ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना पुरस्कार सुद्धा मिळाला होता . दरम्यान ते सेवाबढतीच्या शारीरिक परीक्षेसाठी मराठा लाईट इन्फन्ट्री, बेळगाव येथे आले व तेथे २ महिने सर्व आणि प्रशिक्षण पूर्ण केले. दोरीवरून चढणे व उतरने हा एक प्रशिक्षणाचा भाग होता व त्याचाच सराव करत असताना ते एकदम बेशुद्ध पडले. त्यांनतर त्यांना बेळगाव येथील मिलिटरी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले पण दुर्दैवाने त्यांना २८ ऑगस्ट २०१९ रोजी वीरमरण आले.


त्यांच्या पश्चात त्यांचे वडील श्री. सुभाष गणपती मोळे, आई सौ. आनंदी सुभाष मोळे आणि मोठे बंधू श्री. पवन सुभाष मोळे असा परिवार आहे . त्यांचे बंधू सुद्धा भारतीय सैन्यामध्ये सेवा बजावत आहेत. धन्य ते माय -बाप ज्यांनी आपली दोन्ही लेकरं भारतमातेच्या रक्षणासाठी सैन्यामध्ये पाठवली व त्यातील एक मुलगा भारमातेच्या चरणी अर्पण केला.

शहीद अनिकेत यांनी आपल्या मातृभूमी साठीचे कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले. याची दखल जयहिंद फाउंडेशनने घेतली असून मे २०२० मध्ये आयोजित केलेल्या पण कोरोना संकटामुळे होऊ न शकलेल्या पुणे येथील कार्यक्रमात या कुटुंबाचे सांत्वनपर आदरसन्मान करणार होतोच. आता ही गोष्ट आपण पुढे होणाऱ्या कार्यक्रमात करणार आहोत. दरम्यान, अनिकेतचे वडील वीरपिता सुभाष मोळे आणि बंधू फौजी पवन मोळे यांच्याशी वार्तालापात काही गोष्टी समजल्या. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी कडून येऊ घातलेली विम्याची रक्कम दुर्दैवाने कंपनीने नाकारली आहे. त्याविरोधात त्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे आणि फाउंडेशन त्यांना या कामी संपूर्ण मदत आणि मार्गदर्शन करत आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे; ग्रामपंचायत घरपण यांनी शहीद अनिकेत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावच्या प्रवेशद्वारावर अनिकेतच्या नावची स्वागत कमान करायचे ठरवले होते. याबाबतचा योग्य ठराव ग्रामपंचायतीमध्ये करून प्रत्यक्ष कामास सुरुवात केल्यानंतर कमान बांधकामा जवळच राहणाऱ्या मालकाने यास हरकत घेतली होती. या संबंधितची आवश्यक मान्यता जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्याकडे प्रलंबित आहे. याही गोष्टीचा पाठपुरावा फाऊंडेशन शहीद कुटुंबांच्यासह करत आहे. ज्या जवानाने देशासाठी आपला प्राण दिला त्या जवानाच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात येणाऱ्या स्वागत कमानीस विरोध व्हावा ही गोष्ट फार दुर्दैवी आहे. शेवटी या गोष्टीमुळे नाराज होऊन आपल्या राहत्या घराच्या बाजूसच वीर पिता सुभाष मोळे यांनी शहीद अनिकेत चे शहीद स्मारक उभारण्याचा निश्चय केला आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. जयहिंद फाउंडेशन वारंवार वीरपिता सुभाष मोळे यांच्या संपर्कात राहून त्यांना आवश्यक मार्गदर्शन आणि वरील गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी मदत करत आहे.

तरी या प्रथम पुण्यस्मरण दिनी शहीद कु. अनिकेत सुभाष मोळे यांना जयहिंद फाऊंडेशनशनकडुन विनम्र अभिवादन!!🙏

जयहिंद फाऊंडेशन (सैनिक हो तुमच्यासाठी)

Read at FB

1 comment:

  1. जयहिंद
    खूपच मार्मिक शब्दांकन
    सैनिकांप्रती आदराची भावना व सैनिकांविषयी कर्तव्यभावना प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनामध्ये असायलाच हवी.

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...