गावचे प्रथम सरपंच सदाशिव कुंडलिक मांढरे (आण्णा)
(भारदस्त, निःस्पृह, सभ्य, गरिबांचे आधारवड व एक अजातशत्रू व्यक्तीमत्व)
ज्या बाळाने नुकताच श्वास घेतला होता, फक्त तीन आठवड्यांचं असताना पितृप्रेमाला पोरकं झालं ! आई आणि आजी यांच्या वात्सल्याने त्यास पितृप्रेमाची कमतरता जाणवली नाही. भविष्यात संपूर्ण गाव आणि पंचक्रोशीत ज्या माणसाने आपल्या कर्तृत्वाने, मायेने आणि प्रेमाने लोकांना बापासारखी सावली दिली गरिबांचे आधारवड झाले ते आण्णा म्हणजे सदाशिव कुंडलिक मांढरे. आण्णांची जीवनकथा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय !
मांढरेंच्या जवळजवळ १७५ वर्षांपूर्वी बांधलेल्या खालच्या वाड्यातील काशिनाथ मांढरे यांना नारायण, तुकाराम व सखाराम ही तीन मुलं ! नारायण यांचे चिरंजीव कुंडलिक. कुंडलिक यांना दत्तात्रय व सदाशिव ही दोन अपत्य ! सदाशिव कुंडलिक मांढरे (आण्णा) यांचा जन्म १५.६.१९१७ चा ! वडिलांनंतर या दोन मुलांचे संगोपन आणि पालनपोषण आई आणि आजी गंगुबाई यांनी केले. पाच वर्षांनी मोठे आण्णांचे बंधू दत्तात्रय यांच्यासोबत त्यांचे बालपण गेले. त्यांना पोटभर शेती होती आणि कुस्तीची प्रचंड आवड, यामुळे ते शिकले नाहीत. प्राथमिक शाळेमध्ये जेमतेम आठ महिनेच त्यांनी शिक्षण घेतले. त्या काळात घर चालवण्यासाठी आण्णा आपल्या बंधूसोबत गावातील जनावरे सांभाळून शेतीची सर्व कामे करत. तरीही कौटुंबिक खर्च भागवणे अवघड झाल्याने बंधू दत्तात्रय पैसे कमावण्यासाठी मुंबईला गेले. त्यांना कापड गिरणी मध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांनी आण्णांना सुध्दा मुंबईला नेले व एका कापड गिरणीमध्ये काम मिळवून दिले. बंधू दत्तात्रय यांचे लग्नानंतर लगेच निधन झाल्याने त्यांचा वंश पुढे वाढला नाही.
आण्णांना लहानपणापासूनच कुस्ती खेळण्याचा छंद होता. वयाच्या अठराव्या वर्षी अण्णांचे शरीर जोर- बैठका मारून, दांडपट्टा फिरवून आणि व्यायामामुळे अत्यंत पिळदार बनले होते. मुंबई मध्ये नोकरी करत असताना आण्णांनी आपला तालमीचा व कुस्तीचा छंद बंधूंच्या मदतीने जोपासला होता. १९३८ दरम्यान आण्णांचे बावधनमधील ताराबाई पिसाळ यांचेशी लग्न झाले. त्यावेळी पाणवठ्याच्या गावविहीरीचा पिंडीसारखा आकार होता. त्यात पाणी आणण्यासाठी उतरण्यासाठी घडीव दगडांत बांधलेला जिना होता. भल्या पहाटे उठून पाणी भरत असताना विहिरीत सर्पदंश होऊन ताराबाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयुष्य हे सायकल चालवल्यासारखे असते संतुलन टिकवण्यासाठी गतिशील राहावे लागते. मग त्यांचा दुसरा विवाह ताराबाईंची चुलत बहीण लक्ष्मीबाई पिसाळ यांचेशी १९४१ दरम्यान झाला. आण्णांची सासुरवाडी बावधन असली तरी बावधनच्या पिसाळ परिवारांशी अनपटवाडीचे आगोदरपासूनचे फार जुने नाते संबंध होते. त्यांच्या पत्नी नावाने जरी लक्ष्मी होत्या तरी स्वभावाने मात्र सरस्वतीचं होत्या. त्यांच्या नऊ भावंडात (७ बहिणी आणि २ भाऊ) त्या सर्वात मोठ्या होत्या. लग्नाआगोदर त्यांनी आई मुक्ताबाई आणि वडिल यांची खूप सेवा केली. लग्नानंतर देखील माहेरी काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर त्यांचे मत घेतले जाई. अतिशय शांत, संयमी आणि विचारी स्वभाव असल्यामुळे सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी त्यांच्या शब्दाला मान असे. घरातीलच नव्हे तर भाव-भावकीत देखील भांडण तंटा सोडवण्याचे खात्रीचे एकमेव ठाणे म्हणजे लक्ष्मी या असायच्या.
मुंबईत कापड गिरणीत जॉबर असताना अनपटवाडीतील अनेक लोकांना त्यांनी गिरणी मध्ये कामाला लावले. त्यांपैकी आत्ता कोणी हयात नसले तरी हे सर्व त्याकाळी आण्णांना अतिशय मानत असत. स्वतःसाठी जगणारे अनेक असतात पण जगत असताना मागे पडलेल्या आणि अडीअडचणी मध्ये असणाऱ्या आपल्याच माणसांना मदत करण्याचा गुण आण्णांमध्ये होता. लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी आण्णांनी नोकरी सोडली. त्यानंतर ते गावी आले व शेतीत रमले. व्यायामाची आवड असल्यामुळे त्यांनी गावचे सध्याचे ग्रामपंचायत ऑफिस जेथे आहे त्याठिकाणी तालीम तयार केली होती. आण्णा अनपटवाडीमधील तरुणांना कुस्ती आणि त्यातील डावपेच शिकवत असत. ताण्याबा दादा, बापू नाना, व्यंकट तात्या इत्यादींना आण्णांनी कुस्ती आणि शरीर कमावण्यामध्ये तरबेज केले होते. तेव्हा गावातील कुस्तीपटूंनी त्यांची विजेती प्रतिष्ठा कायम ठेवली होती. त्यांच्या इतर पहिलवान सहकाऱ्यांमध्ये बापु नाना व मारुती नाना होते. एकदा बापू नाना यांनी एका शक्तिशाली पैलवानाला बावधनमध्ये चितपट केले होते. पुढच्याच वर्षी त्याने गावातल्या कुस्तीगीरांना पुन्हा आव्हान दिलं. त्यावेळी आण्णांनी हे आव्हान उत्सुर्तपणे स्वीकारलं आणि त्याचा पराभव केला. ते किती जिद्दी व जिगरबाज होते हे यावरून दिसते.
त्यांना भौतिकशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक दत्तात्रय (बापू) मांढरे, कै उत्तम मांढरे, सुरेखा लेंभे (पिंपोडे), नलिनी कदम (आरळे) व सुनंदा पवार (वेण्णानगर) ही पाच अपत्ये ! बापूंना दिपक, महेंद्र व मंगेश ही तीन मुलं. यापैकी महेंद्र व मंगेश अभियंता तर दिपकने विज्ञान विषयातून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल आहे. उत्तम भाऊंना हनुमंत, माधुरी इंदलकर (कळंभे, सातारा) व राजेंद्र ही तीन मुलं. हनुमंत एम कॉम असून एका नामांकित कंपनीत अकाउंट्स विभागात डेप्युटी मॅनेजर आहे. राजूचा गाडीव्यवसाय आहे. त्यांच्या नातसुनादेखील उच्च विद्याविभूषित आहेत. आण्णांच्या मुलींची मुलेही उच्च शिक्षित आहेत.
आण्णा घरची शेती करत करत झाडे तोडण्याचे काम करत. झाडांच्या मोठाल्या बागा विकत घेवून वाखारीस सरपण विकत असत. त्याचबरोबर इतरांच्या जमिनी कसण्यासाठी वाट्याने घेत असत आणि ज्यांच्याकडे शेती औजारे आणि बैल नसत यांच्या जमिनीच्या मेहनती करून पैसे कमवत. यातुन बऱ्याच मजुरांना रोजगार उपलब्ध होई आणि त्यातून आण्णानाही उदरनिर्वाहासाठी चार पैसे मिळत. यादरम्यान त्यांनी पुष्कळ लोक जमवले आणि बाहेरही बऱ्याच ओळखी झाल्या.
उत्तम भाऊ चौथीत असताना अभ्यासात डोकं चालत नसलेने त्यांनी शाळा सोडली व आण्णांना शेतीत मदत करू लागले. तशी पत्नी लक्ष्मी, बापू आणि भाऊ या तिघांनीही आण्णांना शेतीत मदत केली. शिक्षणात मन लागत नाही म्हंटल्यावर आण्णांनी भाऊंना कुस्तीची आवड निर्माण केली. सकस आहार व तालमीत सराव दिला. यामुळे भाऊंनी आण्णासाररखीच शरीर संपदा कमावली. भाऊंनी कुस्त्या केल्या होत्या. भाऊंच्या जीवावर आपल्या शेतीसह म्हातेकरवाडीपासून काळ्या रानापर्यंत इतर बऱ्याच जमिनी वाट्याने केल्या. मग वयाच्या १८ व्या वर्षी भाऊ बावधन मधील नातेवाईक गुलाबराव सखाराम भोसले यांच्या सहकार्यातुन मुंबईला वखारीत कामाला लागले. पुढे याचठिकाणी भाऊंनी २२ वर्षापेक्षा जास्त काळ कष्टमय सर्विस केली. त्यादरम्यान बापूंचे शिक्षण चालू होते. प्रतिकूल परिस्थितीत खेडेगावात राहून अतिशय कष्टाने बापू विज्ञानातील भौतिकशास्त्र विषयात उच्चविद्या विभूषित होवू शकले ते आण्णांच्या शिक्षणावरील निस्सीम प्रेमामुळेच. मुलाच्या प्रत्येक यशानं हुरळून जाणारा बाप म्हणजेच आण्णा खूपच आशादायी होते. मुलांन भरपूर शिकून मोठं व्हावं हा त्यांचा ध्यास मात्र कायम असे. त्यांच्या मुलांची व्यक्तिमत्त्व ही आण्णांचीच प्रतिकृती !
आण्णांनी नेहमीच आपल्या मुलांचा अभिमान बाळगळा. मुलांच्या साथीने आण्णांनी आपल्या तीनही मुलींचे विवाह प्रतिष्ठित घरात देवून केले. भगवान शंकराच्या नावात एकंच शिव होता पण अण्णांच्या नावात सदांच शिव होता आणि त्या शिवाला पत्नी लक्ष्मीची अनमोल व अखंड साथ मिळाली. या दोघांनी आपली कन्या सुरेखा हिचा विवाह पिंपोडे येथील उच्चविद्याविभुषित उपजिल्ह्याधिकारी श्री. वसंतराव लेंभे यांच्याशी १९७८ मध्ये केला. दुसरी कन्या नलिनीचा विवाह आरळे येथील श्री. रमेश कदम यांच्याशी १५ मे १९७९ रोजी केला तर लहान कन्या सुनंदा हिचा विवाह साबळेवाडी (वेण्णानगर) येथील श्री. अशोक पवार यांच्याशी १३ मे १९८२ रोजी केला. या लग्न कार्यावेळी आण्णांची दोन्ही मुलं जरी कमावती होती, तरी पण आई वडील म्हणून ही आमचीच जबाबदारी आहे, असं मानून झालेल्या खर्चातील निम्मा खर्च आण्णा आणि पत्नी लक्ष्मी यांनी शेतीतील मिळकतीतून केला होता. उरलेला खर्च दोन्ही मुलांनी केला होता. मुलींची लग्न झाल्यानंतरही आण्णांनी जबाबदारपणे दातृत्व जपले होते. ते प्रत्येक महिना दोन महिन्यांतून मुलींच्या घरी जाऊन खुशाली घेत, त्यांच्या अडचणीत मार्गदर्शन आणि आधार देत. मुलींच्या लग्नानंतर देखील त्यांच्या अडीअडचणीत, म्हणजे अगदी त्यांच्या बाळंतपणापर्यंत, शेती संभाळून या उभयतांनी आपल्या जबाबदाऱ्या एक हाती संभाळल्या होत्या. मुलींच्या अपत्यांवर देखील आण्णा आणि आईंचे खूप प्रेम होते. दोन सुना, तीन जावई आणि १५ नातवंड असणाऱ्या आण्णांचा महेंद्र आणि हनुमंत या नातवांवर विशेष स्नेह असायचा. सुनांना देखील मुलीसारखं प्रेम आणि जावयांना मुलाचा आधार देणारा सासरा आण्णा होते. आण्णा एक चालते बोलते ज्ञानपीठ होते. आण्णारुपी रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे.
शेतीची कामे लवकर उरकण्याच्या उद्देशाने त्यांनी वारंगुळा करून शेतीची कामे केली. तान्याबा दादा, रामभाऊ व बावधनमधील आण्णा बाबाचा काका यांचेशी मिळून आण्णांचा अविरत २२ वर्षे वारंगुळा होता. यामुळे त्यांना शेतीतील कामे एकमेकांच्या सहकार्याने उत्साहात व वेळेत पूर्ण करण्यास मदत व्हायची. त्यानंतर काही काळ या गटात बुवा तात्या व बापू नाना देखील सहभागी झाले होते. आण्णांनी त्यांच्या उमेदीच्या काळात शेती सिंचनासाठी स्वत:ची एक व एकत्रीतील एक अशा दोन विहिरी खणून घेतल्या. विहीर तसेच मोटेसाठीची धाव घडीव दगडात बांधण्यात पुढाकार घेतला. याच्या जोरावर त्यांनी बागाईत शेती सुद्धा केली.
स्वतःच्या अत्यंत निस्पृह, प्रामाणिक आणि भारदस्त व्यक्तिमत्वामुळे आण्णा अनपटवाडीतील घरगुती किंवा भाऊबंदकी मधील भांडणं - तंटे अतिशय मुत्सद्दीपणाने सोडवत असत. आण्णांचा केवळ अनपटवाडीतच नव्हे तर संपूर्ण बावधन पंचक्रोशी मध्ये आदरयुक्त असा दबदबा होता. त्यांच्या विविध गावातील स्नेह्यांमध्ये बावधनमधील; आनंदराव बयाजी पिसाळ, आमदार मदनराव गणपतराव पिसाळ, आनंदराव कृष्णा पिसाळ, आप्पासाहेब दिनकर पिसाळ, यशवंतराव रावजी पिसाळ, गुलाबराव सखाराम भोसले, दत्तात्रय जोशी काका, बुवासाहेब (तात्या) सीताराम भोसले व वसंतराव भोसले, कणूरमधील; पांडुरंग राजपुरे, पोलीस पाटील शंकरराव काळे, म्हातेकरवाडीतील आण्णा म्हातेकर, बिगडा झांजुर्णे, दिनकर झांजुर्णे, तर दरेवाडीतील कोंडीबा राजपुरे, गणपत वाडकर, यशवंत वाडकर व गोविंद गणू राजपुरे हे व इतर.
पूर्वी कणूर, दरेवाडी आणि अनपटवाडी अशी तीन गावे असलेली गट ग्रामपंचायत होती. आण्णा व इतर ग्रामस्थांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी प्रयत्न केले आणि ते १९७२ मध्ये यामध्ये यशस्वी झाले. १९७२ साली स्थापन झालेल्या स्वतंत्र अनपटवाडी ग्रामपंचायतीचे आण्णा पहिले सरपंच होते. त्यावेळचे त्यांचे इतर सहकारी पंच हिराबाई सोपान शिंदे (उपसरपंच), दत्तात्रय बजाबा अनपट, लक्ष्मण बजाबा अनपट, सोनुबाई साहेबराव मांढरे, सर्जेराव केशव अनपट व शांताराम मारुती अनपट यांचे आण्णांना खुप सहकार्य लाभले. त्यांच्या कारकिर्दीत बारूळी ते अनपटवाडी हा अगोदर बांधावरून पायवाट आणि ओढ्यातून असणारा रस्ता ओढ्याच्या कडेने तयार झाला. तेव्हा लावंड, पांडुरंग मांढरे, दत्तू जोशी यांनी आण्णांच्या शब्दाखातर रस्त्याला विनामोबदला जागा दिली असे सांगीतले जाते. त्यावेळी हा रस्ता गावकऱ्यांनी श्रमदानातून केला होता. तेव्हा इमानदारीच्या जमान्यात संकोच आणि अहंभाव न बाळगता माणसं एकत्र यायची व एकजुटीने कामे व्हायची; याच हे उत्तम उदाहरण.
ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस गावात वीज नव्हती. तेव्हा केवळ शेतीतील वीजपंपासाठी वीज मिळे पण घरगुती वापरासाठी वीज सहजासहजी मिळत नसे. मग आण्णा यांच्या नेतृत्वाखाली विद्युत पंपांसाठी वाडीतील १४ प्रस्ताव तयार करून मंजूर करून घेतले. वायरमनच्या मदतीने त्यांनी हे वीजपंपाचे इलेक्ट्रीक कनेक्शन गावातून वळवून आणण्याची योजना केली आणि गावात वीज आणली. त्यांनी गावाची यात्रा सुरू करण्यासाठी बापू नाना व परबती आप्पा यांच्या प्रयत्नांचे समर्थन केले. त्यांच्या नंतरच्या सर्व पंचायतीना आण्णांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. आण्णांच्या उमेदीच्या काळात अनपटवाडीमध्ये दर महिन्याला ग्रामस्थांची मीटिंग होत असे. त्या मीटिंग मध्ये आण्णा लोकांना उत्तम मार्गदर्शन करत असत. लग्न कार्यासारखी कामे एकजुटीने आणि शिस्तीने होत. प्रत्येक कार्य हे आपले स्वतःच्याच घरचे आहे या भावनेने पार पाडण्यास सांगत असत. आण्णांनी अनेक लग्न स्वतःचा वेळ आणि पदरमोड करून जमविली. स्वतः झळ सोसून इतरांना मदत करण्यामध्ये, इतरांच्या अडीअडचणी सोडविण्यामध्ये आण्णांना निसर्गतःच आवड होती. आण्णांना गावामधे लोकांची एकी, परस्पर बंधुभाव, एकात्मता आणि सहकार्य ही मूल्ये रुजवायची होती. या हेतूनेच आण्णा कायम झपाटलेले असत.
आण्णा म्हणजे जिवापेक्षा शब्दाला किंमत देणारा माणूस, त्यांनी दिलेला शब्द आयुष्यात नेहमी पाळला. जरी कधी जवळ पैसे नसले म्हणून आयुष्यात त्यांचा एकही व्यवहार नडला नाही. जेव्हा पैसे नसायचे तेव्हा वेळप्रसंगी त्यांनी बार्टर व्यवहार (वस्तूच्या बदल्यात वस्तू) केले पण व्यवहार थांबवले नाहीत. १२ बलुतेदारांशी देखील त्यांचे चांगले संबंध होते. अगदी दादू धनगरांनी देखील बापूंच्या शिक्षणावेळी आर्थिक सहकार्य केलं होत. अगदी मजुरा विषयी सुध्दा आण्णांच्या मनात आदर व हृदयात तेव्हढीच जागा असायची जेव्हढी इतरांसाठी असायची. घरी भेटायला येणारा प्रत्येक व्यक्ती निदान एक कप चहा घेऊन तरी जायचाचं. वडिलांचे छत्र न लाभलेले आण्णा कितीतरी जणांचा आधारवड झाले होते. स्वतः निरक्षर असून त्यांनी फक्त स्वतःच्याच मुलांना साक्षर केलं नाही तर कितीतरी जणांना शिक्षणासाठी मदत केली. ते फार शिस्तप्रिय होते, चुकीचं त्यांना काही पटायचं नाही. उत्तम भाऊनी नशेत घरात अपशब्द वापरून दंगा केल्यावेळी ते वयाच्या ६५ टीत देखील काठी घेऊन मारायला गेले होते. आण्णा जेवढं घरातल्या माणसावर प्रेम करत तेवढंच प्रेम सांभाळलेल्या जनावरांवर देखील करत. याच उत्तम उदाहरण म्हणजे पैठण हा बैल आण्णांच्या शब्दावर कृती करायचा. उत्तम भाऊंचा देखील पैठणवर खूप जीव होता. पैठण म्हातारा झाला आणि शेवटच्या घटका मोजत होता पण जोपर्यंत भाऊ मुंबईवरून गावी आले नाहीत तोपर्यंत या मुक्या जिवाने प्राण सोडला नव्हता. म्हणजे या घरात माणसाला तर किंमत होतीच पण मुक्या जनावरांवर देखील तेव्हढीच माया केली जायची.
आपल्या कामाच्या व्यापातून व व्यापक समाजकार्यातून आयुष्यात परमार्थ साधताना आण्णांनी आपल्या आवडीनिवडी आणि छंद जोपासले होते. आण्णांना भजन गायनाचा फार मोठा छंद ! गावातील हौशी भजनी मंडळीत आण्णा, रामभाऊ, घाडगे मामा व आत्माराम सुतार हे होते. आण्णांचा आवाज चांगला होता तसेच ते उत्कृष्ट तबला वाजवायचे तर उत्तम भाऊ सूरपेटी छान वाजवायचे. त्यावेळी परबती आप्पांच्या मार्गदर्शनातून गावचे ढोल लेझीम पथकही चालवले होते. आण्णांना ढोल वाजवायची सुद्धा प्रचंड आवड होती.
आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना मदत व्हावी म्हणून प्रत्येक महिन्याला ग्रामस्थांची मीटिंग घेऊन ठराविक वर्गणी गोळा करून ती अडचणीत असलेल्या व्यक्तींना देत असत व ती पुढील मीटिंगला जमा करून दुसऱ्या गरजू व्यक्तीला देत असत. हा सर्व आर्थिक व्यवहार लोकांनी एकमताने आण्णांच्या कडे सोपविला होता. आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना पैसे वाटून जर काही पैसे शिल्लक राहिले तर आण्णा ते एका पुडीमध्ये बांधून त्यांच्या देवघरात ठेवायचे आणि पुढील मीटिंगमध्ये ती पुडी सोडायचे परंतु त्या पुडीतील सार्वजनिक पैशातील एक पैसाही वापरण्याचा मोह आण्णांना कधीच झाला नाही. आण्णांना मित्र आणि माणसे जोडण्यात अनोखा हातखंडा होता. त्याचे हे स्वभाववैशिष्ट्य नातू हनुमंतमध्ये आले आहे. सर्वांनी एकत्र राहावे, आपले सुखदुःख वाटून घ्यावे, एकमेकास मदत करावी आणि सर्वांनी सुखी राहावे अशी मानसिकता असणारी आण्णांसारखी व्यक्तिमत्वे समाजात दुर्मिळ. आण्णांचे संपूर्ण आयुष्य या मूल्यांची जोपासना करण्यात गेले. आण्णांचे व अनपटवाडीमधील केशव सावळा अनपट आणि साहेबराव गणपतराव मांढरे यांचे खूप घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे, अगदी रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक म्हटले तरी चालेल, असे खऱ्या मित्रत्वाचे संबंध होते. जगामध्ये खरे मित्र कसे असावेत याचे हे तिघे आदर्श उदाहरण होते. खरचं, म्हणतात ना मैत्रीचे नाते रक्ताच्या नात्यापेक्षा सरस ठरते. याच मित्रांनी गरज पडेल तेव्हा तसेच काहीवेळा आण्णांच्या अनुपस्थितीत आण्णांना गंभीर कौटुंबिक समस्यांदरम्यान आवश्यक ती सर्व मदत केली.
अण्णांचा स्वभावच असा होता की त्यांनी पंचक्रोशीतील असंख्य माणसे जोडली होती. सर्वांशी अत्यंत जिव्हाळ्याने वागले. त्यांचे आर्थिक व्यवहार तर इतके चोख आणि वचनबद्ध असत की स्वतः जवळ अनेक वेळा पैसे नसतानाही त्यांचे कोणतेही व्यवहार कधीही थांबले नाहीत कारण आण्णांनी शब्द टाकला की अनेक मंडळी त्यांना मदत करायला तयार असत कारण पैसे परत करण्यासाठी केलेल्या वायद्याच्या आतच आण्णा ते पैसे परत करत. असे हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गावास लाभले. कित्येक जणांना उपयोगी पडले, कित्येक जणांच्या जगण्यास उभारी दिली, जगण्यास धीर दिला, नवनवीन संकल्प करून ते अमलात आणले, मनुष्याला निसर्गतःच जे दानाचे आणि त्यागाचे पवित्र गुण मिळाले आहेत ते आण्णांच्या ठायी परिपूर्ण दिसले त्यांची त्यांनी मुक्तहस्ताने उधळण केली आणि एक समाजोपयोगी जीवन अण्णांनी जगले.
पुढे मजबूत शरीर यष्टीमुळे उतार वयात त्यांच्या शरीराला अवजडपणा आला आणि त्यांची हालचाल कमी झाली. वयाच्या ६५ व्या वर्षी आण्णांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला. या आजारात बापूंनी आण्णांची तब्येत शेवटपर्यंत सांभाळली. सातारा येथील चव्हाण डॉक्टर यांचे देखरेखीखाली त्यांनी अविरत १५ वर्षे वैद्यकीय उपचार घेतले. आण्णांनी औषधे घेण्यात आजीबात हालगर्जीपणा केला नाही म्हणूनच ह्रदयविकाराचा आजार असूनही १५ वर्षे उत्तम जीवन जगले. त्यांच्या कन्यांचा त्यांच्यावर फार जीव. आयुष्यातील शेवटचे सहा महिने त्यांनी अंथरुणावर काढले. त्यावेळेला धाकटी कन्या सुनंदाने आपला मुलगा लहान असूनही त्यांची अनपटवाडी येथे येऊन सहा महिने सेवा केली. तसेच कन्या सुनंदा आणि नलिनी यांनी आईच्या शेवटच्या दोन-तीन महिन्यात अशीच सेवा केली.
दोन्ही मुले आपापल्या नोकरीच्या शहरांमध्ये, मुलींची लग्न झालेली आणि आण्णा थकले असल्याने त्यांनी त्यांची शेती इतरांना वाट्याने दिली. त्यामध्ये बावधनमधील त्यांचे नातेवाईक शंकर (बाळू मामा) पिसाळ व संभाजी (काका) अनपट हे सुद्धा होते. बर्याच वेळा काकाने त्यांच्या मुलांच्या अनुपस्थितीत आण्णा आणि त्याच्या कुटुंबाची एखाद्या मुलाप्रमाणे सेवा केल्याचे सांगितले जाते. पुढे त्यांनी शेती तसेच घरकामासाठी कर्नाटकातील वसंत मामा यांना घरगडी म्हणून ठेवले. त्यांच्यामार्फत शेती करून घेतली. नंतरच्या काळात सोलापूरचे मोहिते मामा हेदेखील त्यांच्या कुटुंबासह घरी घरगडी म्हणून होते.
आण्णांच्या पत्नी लक्ष्मी यांच्या संपूर्ण आधारावर आण्णांनी आपले आणि गावचे कुटुंब सांभाळले व वाढविले. आण्णा कोणत्याही कार्यक्रम किंवा कामानिमित्त बाहेर असताना घराचा सांभाळ अतिशय समर्थपणे पेलल्यामुळेच आण्णांना समाजसेवेची कामे करता आली. त्यांनी अण्णांना शेतीत मदत तर केलीच पण मुलांना वाढवताना आणि शिक्षित करताना कष्टमय प्रयत्न केले. आण्णांच्या निधनानानंतरही कुटुंबातील समतोल व संसाराची घडी ढळू दिली नाही आणि नातवंडांवर जीवापाड प्रेम केल.
दत्तू बापू यांच्या वाईतील शिक्षणादरम्यान पहाटे लवकर उठून त्यांना जेवण तयार करून देत. तेव्हा बापू सकाळी लवकरच वाईला पायी पोहचत असत. त्याकाळी वेळ पाहण्यासाठी घड्याळ देखील नव्हतं. एकदातर मुलाच्या जेवणाच्या काळजीपोटी त्या मध्यरात्रीच उठून स्वयपाकाला लागल्या होत्या. मग दिवस भर परत शेतातील काम करून परत रात्री घरची काम त्या एकट्या करत. वयाच्या पंचाहत्तरीत देखील त्या शेतातील खुरपणीसह सर्व कामे करत. वयाच्या नव्वदीतदेखील त्या बिना चष्म्याच्या वर्तमान पत्र वाचत. त्या लहानपणापासूनच एकत्र कुटुंबपद्धतीत वाढल्या असल्याने माहेरी आणि सासरी सर्वानी दिलजमाईने व एकजुटीने राहावे असा त्यांचा कयास आणि तळमळ असे. याच तळमळीपोटी एकदा संपूर्ण कुटुंबाचं एक स्नेहसंमेलन त्यांनी सातारा येथे बापूंच्या निवास्थानी घेतलं होत.अशा स्नेहमीलनातून झालेल्या संवादामुळेच कुटुंब एक मताने राहू शकते असा त्यांचा ठाम विश्वास होता.
आण्णानी जे काही कमावलं किंवा आण्णा जे काही होते त्यामागे पत्नी लक्ष्मी यांचा सिहांचा वाटा होता. अण्णांच्या माघारी देखील खंबीरपणे त्यांनी मुलांच्या आणि मुलींच्या कुटुंबाना योग्य मार्गदर्शन तसेच गरज असेल तिथे शब्दांचा मार देखील दिला. स्वाभिमानी लक्ष्मीबाई एक व्यक्ती म्हणून तर महान होत्याच पण आण्णांच्या कुटुंबाचे प्रेरणास्रोत होत्या. जो पायाकडून जन्म घेतो त्याला पायाळू म्हणतात. या बाळाचा पाय उसण (सिलीक) भरलेल्या पाठीवरून फिरवताच बरे वाटते असे. आण्णा जन्माने पायाळू होते त्यामुळे अशा रुग्णांची देखील घरी कायम रीघ असायची. त्यांनी यासंदर्भात कोणालाही नकार दिला नाही. त्यांच्यातील जन्मजात असलेल्या समाजवादामुळे हे शक्य होते. त्यांच्या झुपकेदार मिश्या आणि भारदस्त शरीरयष्टी त्यांच्या रुबाबदारपणात भर घाली. ते कुणावर रागवत नसत आणि सगळ्या गोष्टी संयमाने करत. दुसऱ्याच्या मदतीस कायम तत्पर. असे हे शांत, संयमी, सभ्य, निस्पृह, भारदस्त, गरीबांचा कैवारी, माणूसकीभाव जपणार अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे आण्णा आपल्यातुन ५ जून १९९५ रोजी अनंतात विलीन झाले !
आण्णा एक व्यक्ती, एक माणूस, एक पती, एक वडील, एक सासरे, एक आजोबा या पेक्षाही खूप काही होते. आण्णा पुन्हा होणं नाही. आण्णांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..
शब्दांकन :
प्रा दत्तात्रय सदाशिव मांढरे
श्री हनुमंत उत्तम मांढरे
प्रा डॉ केशव यशवंत राजपुरे

No comments:
Post a Comment