Total Pageviews

Thursday, January 16, 2020

साधेपणातील विलक्षण मोठेपण

प्रा के सुरेश : साधेपणातील विलक्षण मोठेपण

डीएसटी च्या मीटिंग दरम्यान एक चैतन्यमय व्यक्तिमत्व प्राध्यापक के ए सुरेश यांना जवळून पहाण्याचा योग आला. सुरेश सर बंगलुरू येथील सेंटर फॉर न्यानो अँड सॉफ्ट मॅटर सायन्स या संस्थेचे संचालक होते आता ते तेथेच मानद प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. डीएसटी च्या वेगवेगळ्या समित्यांवर ते अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. तसं पाहायला गेलं तर सुरेश सर म्हणजे खूप मोठे व्य​​क्तिमत्व !

आरआरआय बंगलोर येथून सरांनी पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर काही वेळ इथेच सेवा केल्यानंतर त्यांना अमेरिका तसेच फ्रान्स येथे मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये बरेच नोबेल परस्कारप्राप्त शास्त्रज्ञ होते. ते सांगतात या लोबेल लॉरेट चे जीवन म्हणजे अतिशय सहज सुंदर असते. याचा प्रभाव त्यांच्या विचारांवर झाला असे ते मानतात. त्याचबरोबर फ्रान्समध्ये एका खाजगी तेल कंपनीत त्यांनी नोकरी देखील केली आहे. परदेशात बराच वेळ काढल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये विलक्षण बदल झाला होता.

त्यांच्या जीवनात ऐश्वर्याच्या गोष्टींना नगण्य स्थान आहे. इमारतीतील लिफ्ट ऐवजी जिन्याचा ते वापर करण्यावर भर देतात. महागड्या हॉटेलमधल्या जेवणापेक्षा कँटीनचे जेवण त्यांना अधिक रुचकर लागते. रिक्षा तसेच चारचाकी गाडीपेक्षा ते दुचाकी किंवा पायी जाण्यास प्राधान्य देतात.

त्यांच्या इथल्या तीन दिवसांच्या वास्तव्यात त्यांच्याकडून मला बरंच काही शिकता आले. त्यांच्या बोलण्यात किती मृदूता, किती नम्रता ! मी तर अचंबित झालो. त्यांनी मला सांगितले - बिइंग सिम्पल कॉस्टस नथिंग. देन व्हाय टू इन्वेस्ट इन थिंग्ज ऑफ नो युज. म्हणतात ना साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. मला भावली ती त्यांची समजावून देण्याची आणि समजून घेण्याची कला ! ते ज्या पद्धतीने मार्गदर्शन आणि प्रेरणा देतात ते अतिशय वाखाणण्याजोगे.  त्यांच्या मते देवाच्या मंदिरापेक्षा ज्ञानाचे मंदिर फारच महत्वाच. त्या ज्ञानाच्या मंदिरातील देवांची नेहमीच पूजा करावीशी वाटते त्यांना. नव्या पिढीला मार्गदर्शन करताना ते त्यांचे जुने अनुभव सांगतात.

परमेश्वराने त्यांना अगाध ज्ञान दिले आहेच. याबरोबरच त्यांच्याजवळ सर्जनशील आणि तर्किक विचारांची ज्ञानसंपदा आहे. त्यांच्यामध्ये क्षणोक्षणी समोरच्याच्या जागेवर जाऊन विचार करण्याची वृत्ती जाणवते. सहज बोलत असताना समोरच्याच्या मतांचा आणि विचारांचा सतत आदर करतात सर. त्यांचे साधे आणि सुस्पष्ट संवाद हवेहवेसे. त्यांच्या नावीन्यपूर्ण विचारांत नकारात्मकतेत सकारात्मकता आणण्याची ताकद आहे. 'काय करावे' हे ते फक्त सुचवतच नाहीत तर 'ते कसे कार्यान्वित करावे' याचे मार्गदर्शन देखील करतात.
कुणीही प्रेमात पडावं असंच त्यांचं व्यक्तिमत्व. त्याची भेट झाली हे मी माझे फार मोठं भाग्य समजतो. तुम्हाला कधी सरांना भेटण्याचा योग आला तर संधी दवडू नका कारण सर साधेपणा बद्दल फक्त सांगतच नाहीत तर क्षणोक्षणी साधेपणा जगतात.. नाहीतरी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली रग्गड माणसे सभोवताली असतातच की !

मग आपण का राहू नये साधेपणाने .. ?


- प्रा. केशव राजपुरे
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.

Sunday, January 12, 2020

राजर्षी शाहू महाविद्यालय कोल्हापूर येथे मार्गदर्शन

राजर्षी शाहू महाविद्यालय कोल्हापूर येथे बीएस्सी फिजिक्स माजी विद्यार्थी मेळाव्यादरम्यान केलेले मार्गदर्शन, १२ जानेवारी २०२०.