गावातील उच्च विभूषित व्यक्तींचे यादीमध्ये एक नाव आवर्जून घ्यावं वाटतं, की जे तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करतात, ते म्हणजे गावचे भूषण सीए *चार्टर्ड अकाउंटंट विजय अनपट* ..
सीए विजय बाबुराव अनपट हे भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स (आयसीएआय) या संस्थेचे सदस्य आहेत. त्यांना प्रत्यक्ष कर सल्लागार, कंपनी व्यवहार हाताळणी तसेच विविध भागात प्रकल्प सल्लागार अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कामांचा अफाट अनुभव आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही त्यांनी ऑडिटिंग व लेखा क्षेत्रातील सर्वोच्च स्थान मिळवले आहे. एक सामान्य विद्यार्थी ते नामांकित सीए ही अशक्यप्राय उंची त्यांनी स्वकर्तुत्वावर गाठली आहे. येथे मी त्यांची यशोगाथा थोडक्यात मांडत आहे जी पुढील तरुण पिढीस नक्कीच सतत प्रेरणा देत राहील. मित्रहो, तुम्हीही कठोर परिश्रम आणि उत्कटतेने आपले ध्येय साध्य करू शकता. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जगात अशक्य असे काहीही नाही, फक्त 'ते' करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास आपणाकडे हवा.
१९७८ साली सातारा जिल्यातील अनपटवाडी-बावधन (ता. वाई) या छोट्याश्या खेडेगावात त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेला विजय पुढे सिए पर्यंत झेप घेईल असे कुणालाच वाटलं नसावं. अशा वेळी जर एकाद्याचे नशीब तसेच शैक्षणिक गुणवत्ता बलवत्तर असेल तर तो कुठपर्यंत झेपावेल हे सांगणं कठीणच ! त्यांनी शालेय शिक्षण (एसएससी, १९९४) बावधन हायस्कुल मध्ये पूर्ण केले. शाळेत असताना अभ्यासात जरी ते सर्वसाधारण विद्यार्थी असले तरी एक चुणचुणीत, प्रामाणिक, प्रयत्नशील व सक्रिय मुलगा म्हणून त्यांची ख्याती होती. एका ग्रामीण शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यावेळी त्यांची डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्यासाठी आवश्यक आर्थिक परीस्थीती नव्हती. त्यामुळे त्यानंतर त्यांना पारंपारिक पद्धतीने शिक्षण घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. पुढे १९९६ मध्ये ते द्रविड हायस्कूल, वाई येथून 'लेखा व लेखा परीक्षण' हा व्यावसायिक अभ्यासक्रम घेवून बारावी उत्तीर्ण झाले. मला वाटते याच ठिकाणी त्यांचे पूर्णपणे विकसित सीएरुपी वटवृक्षाचे प्रथम बीज रोवले गेले. अर्थात, 'बारावी' हे चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून करिअर करण्यासाठीची योग्य पात्रता नव्हती. मग १९९९ मध्ये त्यांनी वाईच्या किसन वीर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची बी. कॉम ही पदवी पूर्ण केली. दरम्यान महाराष्ट्र शासनाचा जीडीसीए हा सहकार आणि लेखा क्षेत्रातील डिप्लोमा २००० मध्ये पूर्ण केला. पुढे २००१ मध्ये उच्च शिक्षण घेण्याचा त्यांचा ध्यास त्यांनी कर आकारणी संबधातील कायदे या विषयीतील पदविका (Diploma in Taxation Laws) अभ्यासक्रम पूर्ण करून चालू ठेवला.
एक चार्टर्ड अकाउंटंट होणं किती कठीण आहे? या प्रश्नाचं उत्तर फक्त ज्यांनी ही परीक्षा दिली आहे तेच देवू शकतील. भारतात एकूण अर्जदारांपैकी जवळपास ५% उमेदवारच सीए परीक्षा पास होतात हे मी ऐकले आहे. यावरून या परीक्षेच्या अवघडपणाची कल्पना यावी. मग प्रामाणिक आणि कष्टाळू विजय यांनी हे 'सिए' परीक्षेच्या शिवधनुष्याचे आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हे आव्हान सहज पार करणं शक्य नाही हे ते उमगून होते त्यामुळे सुरूवातीला अपयशाची अपेक्षा होती. सीए च्या अंतिम परीक्षेला जातांना ते एक गोष्ट ठाम करून जात ती म्हणजे 'अपयश नक्की आहे पण यश अशक्य नाही'. कोणालाही अपयश येवू शकत हे मात्र खरं. या दरम्यान २००१ ला सिए साठी आवश्यक नाव नोंदणी करावी लागते ती करून घेतली. या परीक्षेची तयारी करण्यासाठी कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठात काही वेळ घालवला. मला विद्यापीठाच्या अभ्यासिकेत अंतिम सीए परीक्षेची तयारी करणारा तसेच अंतर्गत प्रवासासाठी सायकल वापरणारा विजय आठवतोय. एका परीक्षेच्या वेळी ते अपेक्षित यश संपादन करू शकले नव्हते, त्यामुळे काही काळ ते नाराज होते, प्रयत्न सोडायचा विचार चालू होता. दुसऱ्या पर्यायाचा विचार चालू होता. अशा वेळी मन घट्ट करण्यासाठी, निग्रह वाढवण्यासाठी, या अडचणीतून मार्ग निघतो का म्हणून आम्ही विचार विनिमय केला. अशा परीस्थितीत स्वत:ला कसं सावरायचं आणि प्रयत्न मध्येच का सोडायचे नाहीत याबाबत त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या यशाच्या मार्गक्रमणात मला सहभागी होता आलं. पुढे यश मिळविण्यासाठी त्यांनी निकराची लढाई लढली, शेवटी केलेल्या सर्व पराकाष्टांचे फळ झाले, त्यांना यशाची गुरूकिल्ली मिळाली आणि ते २००३ साली चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) झाले.
सीए झाल्यावर करीयर घडवण्यासाठीच्या संभावनांचा समुद्र त्याच्या समोर होता. पत्त्याच्या पानातील प्रत्येक कार्ड त्यावेळी त्यांच्याजवळ होते. अनेक पर्याय होते. त्यांनी योग्य तो मार्ग निवडला आणि लेखा परीक्षण आणि कर क्षेत्रात सर्वोच्च पातळीचे यश संपादन केले. २००३ मध्ये त्यांनी डिप्लोमा इन इन्फोर्मेशन सिस्टीम ऑडीट (डीआयएसए) ही पदविका पूर्ण केली. सध्या ते अमेरिकेने प्रमाणित केलेले सर्टिफाईड इन्फोर्मेशन सिस्टीम ऑडीटर (सीआयएसए) म्हणूनही कार्यरत आहेत.
पुढे त्यांनी स्वतंत्र लेखापरीक्षक म्हणून सराव सुरू केला. एक कर सल्लागार म्हणून आपला व्यवसाय किफायतशीर असू शकतो, पण अशावेळी आपणास पूर्णपणे जागरूक असायला हवं.. काम करत असताना आपणास एखाद्या ठिकाणी प्रविष्ट होण्यास अनेक दरवाजे असतात पण बचावास एकच दारवाजा असतो म्हणून फार सावध आणि सक्षम असावे लागते. सर्व प्रकारची माणसे भेटतात तसेच वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. या सगळ्यातून मार्गक्रमण करत विजय यांनी आपला वेगळा ठसा या क्षेत्रात तयार केलाय. सामाजिक जबाबदारीची त्यांना जाणीव आहे. ते अबु धाबी येथे २००६ ते २००८ दरम्यान एका खाजगी कंपनीत कर सल्लागार आणि लेखापरीक्षक म्हणून कार्यरत होते. या दरम्यान त्यांच्या व्यवसायास एक नवीन परिमाण मिळाले. २०१४ पासून ते नामांकित सीए श्रीयुत जयवंत चव्हाण (www.jbcaasso.com) यांच्या गटात सामील झाले असून भागीदारीत व्यवसाय सुरू आहे. तसेच त्यांची वाई आणि पुण्यात वेगवेगळी प्रशासकीय कार्यालये आहेत. त्यांनी वाई येथे लहान मुलांची उत्पादने असलेले फर्स्ट क्राय डॉट कॉम हे आशियातील सर्वात मोठे ऑनलाइन शॉपिंग स्टोअर सुरू करून व्यवसाईक म्हणूनही कारकीर्द सुरू केली आहे.
सीए विजय अनपट हे गरीब शेतकरी कुटुंबातील तरुण आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांना एक प्रेरणा स्त्रोत्र आहेत. त्यांचे आई वडील तसे अशिक्षित, परंतु आपल्या तीनही मुलांनी खूप शिकावं ही त्यांची तीव्र ईच्छा ! विजय यांचे वडील उत्कृष्ट आयुर्वेदिक तज्ञ तसेच नाडीपरीक्षक आहेत, त्यामुळे सुरवाती पासूनच त्यांच्या घरी आजारी लोकांची रीघ असायची, कदाचीत याचमुळे विजय यांना माणुसकीचे धडे हे लहानपणापासून घरातच मिळतं गेले. तसेच त्यांची आई देखील फार शिस्तप्रिय आहेत, कदाचित याचमुळे विजय यांचा शैक्षणिक प्रवास हा वेळेत यशस्वी झाला. आज विजय यांच्या यशात त्यांच्या आई वडिलांचा सिहाचा वाटा आहे. तसेच पुढं लग्न झाल्यानंतर त्यांच्या धर्मपत्नी चार्टर्ड अकाऊंटंट तृप्ती अनपट यांचीही त्यांना मोलाची साथ लाभली. असं म्हणतात कोणत्याही यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. मला वाटतं याठिकाणी त्यांच्या मातोश्री आणि पत्नी यांचा मोठा सहभाग आहे. समाजातील तरुण व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक तसेच शैक्षणिक मदत ते करत असतात. आपण समाजाचं काही देणं लागतो ही त्यांची नेहमीच भावना असते. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे ते आपल्या मातृभूमीची सेवा करत आहेतच. गावांतील मुलांना शिक्षित करण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहेत. त्यांची ही यशोगाथा पुढील पिढीस नक्कीच प्रेरणादायी ठरेल. एका यशस्वी सिए बरोबरच ते एक चांगल व्यक्तीमत्व आहे आणि अजून माणुसकी जपली आहे. गेल्या दिवसांचा त्यांना विसर पडला नाही. त्यांचं स्वच्छ व ताजेतवाने व्यक्तीमत्व, धाडसी व निस्वार्थी स्वभाव तसेच सहनशील व परोपकारी वृत्ती कुणालाही आकर्षित करणारी आहे. कामाचा एव्हढा व्याप सांभाळून ते ताण तणाव मुक्त आयुष्य जगात आहेत. आपण पहातो की आई-बाबा फार प्रेमाने आपल्या मुलाचे नाव 'विजय' ठेवतात, परंतु हे नाव सार्थकी करणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतके विजय असतात. त्यापैकीच एक आहेत श्री. विजय अनपट ! आपल्या पालकांनी ठेवलेल्या 'विजय' या नावाला शोभेल असे कर्तुत्व त्यांनी केले आहे.
असा आहे विजय अनपट यांचा सिए पर्यंतचा चा यशस्वी प्रवास, मला माहीत आहे त्यांना अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. या प्रवासात त्यांना बऱ्याच अडचणी आल्या, बऱ्याचवेळा द्वेष झाला आणि प्रवास अर्ध्यावर सोडावा का ही मन:स्थिती झाली पण त्यांनी आपला दृढनिश्चय सोडला नाही. आपल्या गावकरी मित्राचे यश पाहून नेहमी अभिमानाने छाती फुलून येते व त्याच्या कर्तुत्वाचा आमच्या अनपटवाडी गावाला व पर्यायाने बावधन पंचक्रोशीला सार्थ अभिमान वाटतो. त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाने जे स्थान गाठले आहे त्यामुळे बावधन पंचक्रोशीचे नाव आज सर्वदूर पसरले आहे व आम्हास सर्वत्र बहुमान मिळत आहे. विजय अनपट आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि आपल्या भावी कार्यांस शुभेच्छा.
केशव राजपुरे
मोबाईल: 9604250006
rajpureky@gmail.com
rajpure.com
rajpure.blogspot.com
खडतर परिश्रम आणि जिद्द याचा सुंदर मिलाप दिसतोय... छान लेखन.
ReplyDelete