Total Pageviews

Sunday, May 24, 2020

सोनजाई देवस्थान बावधनसोनजाई देवस्थान, बावधन

सह्याद्रीच्या पर्वत रांगांत वाई व बावधन पंचक्रोशीची विभागणी करणारी, पाचगणी पासून पूर्वेला, पूर्व पश्चिम पसरलेली सोनजाई डोंगर रांग आहे. पूर्वेकडील बाजूस कातळ खडकाचा खडा कडा असल्याने हरीत संपदा नाही व बराचसा भाग बोडका आहे. या डोंगराच्या आग्नेय पायथामूखास इतिहास कालीन बावधन गाव वसलेले आहे. उत्तरेकडे सोनजाई, दक्षीणेकडे वैराटगड व पश्चिमेला कार्तिक स्वामी डोंगरांच्या रांगांनी तयार झालेल्या बंदिस्त खोऱ्यात गाव व बारा वाड्यांची बनलेली बावधन पंचक्रोशी वसली आहे. या निसर्गरम्य सोनजाई पठारावर अंदाजे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील पुराणकालीन गुहा तसेच देवस्थान आहे. या देवस्थानाविषयी आज..

हिंदूंचे प्रामुख्याने चार पंथ आहेत:- वैदिक, वैष्णव, शैव आणि स्मार्त. शैव पंथात शाक्त, नाथ आणि संत असे पोटपंथ आहेत. नाथपंथीयांनी भारतभर हिंडून आपल्या सांप्रदायाचा प्रसार केला होता. महाराष्ट्रातील नाथ पंथाच्या इतिहासावरून या पंथाची सुरुवात सुमारे नवव्या शतकाच्या पूर्वार्धात झाली असावी असे मानतात. या पंथाची परंपरा आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, जालंदरनाथ, निवृत्तीनाथ अशी आहे. सांगली जिल्यातील वाळवा तालुक्यात मच्छिंद्रगड येथे मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. नाथ सांप्रदायात हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते. नाथपंथीय लोक सातारा जिल्ह्यातही वास्तव्य करून आपल्या पंथाचा प्रचार करत होते. हे नाथपंथिय लोक बावधनच्या उत्तरेकडील सोनाजाईच्या व दक्षिणेकडील जांभूळण्याच्या डोंगरावर तसेच खोऱ्यात येवून राहिले असावेत असे वाटते.

साधू पुरुषाला संपत्तीचा मोह नको म्हणून मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाच्या झोळीतील श्रीलंकेहून आणलेली सोन्याची वीट ओझर्डे आणि बावधनच्या शिवारातील कृष्णा नदीच्या सोनेश्वर डोहात टाकली होती. त्यामुळे गोरक्ष मच्छिंद्रनाथांवर भयंकर रागावले. तेव्हा बावधनच्या उत्तरेस असलेला संपूर्ण डोंगरच मच्छिंद्रनाथांनी सोन्याचा करून टाकला आणि "तुला हवे तेवढे सोने घे" असे सांगितले. त्यावर गोरक्षानी मच्छिंद्रनाथांची माफी मागितली. या पुराण कथेचा नवनाथ ग्रंथात उल्लेख आहे. हाच तो बावधन च्या उत्तरेस असणारा सोन्याचा अर्थात सोनजाईचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे.


या नाथपंथीय भिक्षुक गोसावी समाजाचे सोनजाईच्या डोंगरावर मठामध्ये आजही वास्तव्य आहे. हे गोसावी धनगर समाजातील असून त्यांची वस्ती या संप्रदायाच्या निर्मितीपासून या डोंगरावर असल्याचे दिसते. नाथपंथातील जे अनेक पोटभेद आहेत त्यात कानफाटे गोसावी हा एक प्रकार आहे. हे लोक कान विदीर्ण करून त्यात कुंडले घालतात. त्यांना डवरी गोसावी असे म्हणतात. हे लोक अंगाला भस्म लावतात, जेवनाचे वेळी पुंगी वाजवून नंतरच अन्नग्रहण करतात. आजही शंख फुंकून, भस्म लावून हे लोक देवाची भक्ती करीत असल्याचे दिसते. "गुरु" हा रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त अभिनव नातेसंबंध आहे. "गुरु" केल्याने आपणास काही नियमांचे पालन करावे लागते. यात आपण कुणाचेतरी अनुयायी होता. मठावर नवरात्रात कान फुंकुन गुरु करण्याची प्रथा आहे व गुरु करण्यासाठी बहुजन समाजातील लोक आजही तेथे जातात.  

सोनजाईच्या डोंगरावर सोनूबाई आणि काळुबाई देवतांची मंदिरे असून ही दोन दैवते धनगरांची आहेत असे म्हणतात. ठोंबरे धनगराच्या भक्तीला प्रसन्न होऊन या देवता येथे आल्या आहेत अशी धारणा आहे. पूर्वीच्या काळी ठोंबरे धनगर आणि ब्राह्मण भक्त यांचे पूजा करताना कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचा गदारोळ होताच घरणीकंप झाला, पश्चिम बाजूचा कडा कडाडला, मोठाले आवाज ऐकू येऊ लागले, दरडी कोसळू लागल्या, धूळ उडून जमीन हादरू लागली. त्यामुळे ब्राह्मण घाबरला आणि जीव वाचवण्यासाठी पळून गेला. त्या ठिकाणी धनगर मात्र घाबरला नाही. त्याने पटकूर घेतलं आणि मूर्तीवर टाकून कोसळणारी मूर्ति सावरून धरली. धनगराची ही भक्ती पाहून देवी त्याला प्रसन्न झाली. अशा प्रकारची एक दंतकथा सांगीतली जाते. म्हणूनच धनगर लोक शेंडी काढून, करगोटा तोडून व संन्याशी गोसावी होऊन या देवीची पूजा आजतागायत करत आहेत. हा कथाभाग काल्पनिक असला तरी ही देवता सर्वांची आहे कारण या देवीची पूजा बहुजन समाजातील सर्वच लोक करतात. तसेच सोन्याच्या डोंगरावर बसलेली देवी ती सोनजाई असाही कथाभाग लोक सांगतात.

महाराष्ट्रातील अखंड अग्निजन्य खडक कोरीव कामासाठी अनुकूल आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गुहांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातील या प्राचीन गुहा तत्कालीन व्यापारी मार्गावर किंवा एखाद्या मोठ्या व्यापारी केंद्राजवळ अस्तीत्वात होत्या, असे दिसते. सोनजाई डोंगरावर असलेल्या खडकातल्या पुराणकालीन लेण्या नाथ पंथीयापूर्वी हीनयान बौद्ध संप्रदायाच्या बुद्ध भिक्षूंच्या गुहा असाव्यात असा तर्क लावला जातो. म्हणजे या खोल्या सुमारे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील असाव्यात असा अंदाज करता येतो. सह्याद्रीतील सोनजाई रांग म्हणजे कोंकण आणि देशभाग जोडणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ असल्याने कोकणातून देशावर आलेले व्यापारी पूर्वी या डोंगरावर वास्तव्यास रहात असावेत असे वाटते तसेच या भागात तेव्हा एक मोठे व्यापार केंद्रही होते. म्हणून नंतरच्या काळातील या लेण्यांचे अस्तित्व तार्किक विचारांनी समर्थित आहे.

सोनुबाई देवीचे देऊळ डोंगरावर मध्यभागी दाट झाडीत खड्ड्यात बांधले आहे. हे मंदिर दगडात बांधलेल्या बंदिस्त दुमजली वाड्यात आहे. या ठिकाणी खडकात कोरलेली पाण्याची तळी व निवासासाठी खोल्या काढल्या आहेत. येथे नवरात्रात देवीचा जागर घालतात व तेव्हा अनेक लोक देवीच्या दर्शनासाठी येतात. मंदिराच्या दक्षिण बाजूस येथील भक्त गोसाव्यांची दफनभूमी आहे. त्यांच्या पैकी कोणाचाही कुठेही देहांत झाला तरीही त्याला विधिवत येथेच दफन केले जाते. शेजारीच भोनजाईचे दक्षिणाभिमुखी देऊळही आहे. डोंगरावर पश्चिमेच्या बाजूला काळूबाईचे मंदिर आहे. चिंचोळ्या डोंगरकड्याचा योग्य वापर करून त्यांनी हे छोटेसे दौलदार मंदिर बांधले आहे. समोर टुमदार दर्शन मंडप बांधला आहे. अनपटवाडी गावचे आत्माराम सुतार यांनी या बांधकामास योगदान दिले आहे. या देवतेचीही उपासना धनगर गोसावी परंपरेने करत असल्याचे दिसते. काळूबाईच्या मंदिरापाठीमागे डोंगराला मोठी दरी (खिंड) आहे. कृष्णा नदी दक्षिण वाहिनी करून ती बावधन वरून पुढे जावी यादृष्टीने भिमाने ती दक्षिणवाहिनी करण्याचा निश्चय केला होता. मात्र हे काम कोंबडा आरवायच्या आत पूर्ण व्हायला पाहिजे अशा प्रकारची अट देवीने घातली होती. त्यानुसार भिमाने एकच खोरे मारले इतक्यात कोंबडा अरवला. त्यामुळे भीमाचा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. हा संकल्प पूर्ण होऊ शकला असता तर नदीचा प्रवाह नैसर्गिक राहिला नसता. काळुबाई देविने मुद्दामून लवकर कोंबडा आरवून याच्यामध्ये घाट घातला होता अशा प्रकारची एक दंतकथा या भागातील लोक आजही सांगतात. या खिंडीला "भीमाचे खोरे" म्हणूनही संबोधले जाते.

या देवस्थानाची यात्रा नवरात्रात असते. पहाटे पाचला देवीची आरती होते. नऊ दिवस रात्रभर होम-हवन, प्रवचन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन असते. दररोज महाप्रसादाचे वाटप असते. दिवस बंद भक्तजन भजनाचा कार्यक्रम करतात. दसऱ्या दिवशी पालखीतून देवतांच्या मिरवणुकीचा छबिना दिवसभर रंगतो. छबिन्यासाठी बावधन व वाई पंचक्रोशीतून बरीचशी ढोल वादक मंडळी येतात. सकाळी अकरा ते संध्याकाळी चार पर्यंत छबिना चालतो. वाहतुकीची सुविधा नसलेल्या व दुर्जन भागात वसलेल्या या तुलनेने कमी लोकप्रिय तीर्थक्षेत्राच्या यात्रेत फेरीवाले, खेळण्याची व खाऊची मोजकीच दुकाने येतात. यात्रेनिमित्त सोनजाई मठामार्फत प्रसादाचे वाटप केले जाते. पंचक्रोशीत या देवतेच्या महातम्याचा प्रभाव असल्याने यात्रेदिवशी बावधन मधील भाविक कडाकणी व धपाट्याचा नैवेद्य सोनजाईला घेऊन जातात.

मठ म्हणजे साधू किंवा बैरागी किंवा भिक्षुक गोसाव्यांचे निवासाचे तसेच एकांतात साधना करण्याचे ठिकाण. सोनजाई मंदिराच्या आवारात मठाच्या चार खोल्या आहेत. त्या ठिकाणी मुख्य चालक गोसाव्याबरोबर सात ते आठ इतर सहकारी असतात. इथे राहणारे सर्व भक्त ब्रह्मचारी असतात. त्यामुळे येथील गोसाव्यांचा वंश विस्तार होत नाही. त्यांना देवाची भक्ती, मठाची देखभाल, शेती करणे व मठाची जनावरे सांभाळण्याचे काम करावं लागतं. मठ व देवस्थानच्या मालकीची सोनजाई डोंगरावर पाची देऊळ कडा ते बुवासाहेब खिंड इथपर्यंत कडेपठार व दोन्ही बाजूला डोंगर जमीन आहे. मंदिराच्या पूर्वेकडील माथा पठारावर बैलांच्या साह्याने जिराईत शेती केली जाते. तसेच पश्चिमेकडील वारली डोंगर शिवारात जनावरांना चारण्यायुक्त कुरण आहे. आता यात सागवानचे चांगले वन तयार झाले आहे. सोमजाईवर ५० जनावरांची व्यवस्था होईल एव्हढा भव्य गोठा आहे. पूर्वी देशी खिल्लार गाई, बैल व म्हशी अशी मिळून ३० ते ४० जनावरे मठावर असायची. पूर्वी बकरीही असायची. गेल्या आठ दहा वर्षांत तेथील कष्टाळू व कर्तुत्ववान गोसावी सेवकांची संख्या रोडावल्यामुळे खिल्लार गाई व बैल या जनावरांची संख्या कमी झाली आहे. म्हशी व बकरी पालन पूर्णतः बंद झाले आहे. जनावरांमध्ये प्रामुख्याने पाच ते सहा बगाड गाड्यास जुंपण्यायुक्त बैलांचा समावेश असतो. तसेच बावधन मधील धनगर वाड्याच्या वरच्या बाजूस व बावधन ओढा येथील उंची पिपळ या ठिकाणीदेखील मठ व जनावरांसाठी गोठे आहेत. उन्हाळ्यात सोनजाई येथील मठावर पाणी तसेच चारा कमी पडल्यावर ही जनावरे या गोठ्यांवर आणली जातात.

माठावरील गोसावी समाजाच्या बैलांना बावधनच्या बगाडात पिसाळ तरफे कडून नाथसेवा करण्याचा मान असतो. नेहमी मठाची खिल्लार जातीची पाच ते सहा बैल बगाडात नक्कीच असतात. घरच्या गाईची जातिवंत खिल्लार खोंड पाळून जोपासायचा छंद त्यांनी अद्याप जपलाय. या बैलांवर वर्षभर जरी मठाची शेती केली जात असली तरी मूळ उद्देश बागाडासाठी बैल तयार करणे हाच असतो. धष्टपुष्ट व शक्तिशाली बैल हा त्यांच्या बागाडातील बैलाच्या ताफ्याचे आकर्षण असते. या बैलांचे बागाडात विशेषत धुर्वी व चावरीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन असते.

मठावरील सर्व कारभार व उदरनिर्वाह भक्तांनी दिलेल्या भिक्षा व दानावर पूर्णतः अवलंबून असतो. ही भिक्षा पैसे, वस्तू, धान्य, पशू इत्यादी स्वरूपाची असते. हे गोसावी भगवे कपडे चढवून देवाची भक्ती व सेवा करत असायची. पण याचे सोवळ त्यांना पाळता येत नसल्यामुळे आता ते साधारण कपडे परिधान करतात. ही मंडळी पौष महिन्यांमध्ये भिक्षेसाठी बाहेर पडतात. पूर्वेकडील तालुक्यात धनगर समाज जास्त विखुरलेला आहे त्यामुळे तेथून पुरेशी भिक्षा मिळते. या मदतीच्या माध्यमातूनच त्यांनी डोंगरावर जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे.

पूर्वी माठावरील गोसावी सर्वांचा स्वयंपाक, जनावरांच्या धारा काढून सर्व जनावरांना चारून आणण्याचे काम करत असत. तेव्हा मठावर जनावरे, दूध दुभत्याची चंगळ असे. सध्या कमी मनुष्यबळामुळे त्यांनी जनावरांची संख्या कमी केली आहे. यामुळे मठावरील कामाचा बोजा कमी झालाय. म्हणून त्यांनी त्यांच्या समूहातील लहान मुलांना शिक्षित करायला सुरुवात केली आहे. काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी श्रद्धा सांभाळून अंधश्रद्धेस फाटा दिलेला आहे. तरीपण पुढे त्यांना ब्रह्मचारीच राहावे लागणार हे मात्र नक्की.

फुलांचे ताटवे, वनराईची दाट सावली व थंडगार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हे स्थळ निसर्गरम्य बनले आहे. पठारावरून आपण बावधन व वाई पंचक्रोशी चे "बर्ड आय व्हीव" ने विहंगम दृश्य बघू शकतो. बऱ्याच शाळांच्या सहली या निसर्गरम्य ठिकाणी येतात तर काही हौशी लोक वनभोजनासाठी या स्थळाची निवड करतात. दसर्‍याच्या उत्सवात पतंगाच्या काटाकाटीचे खेळ लोक हौसेने येथे खेळतात. तसं बघायला गेलं तर सोनजाई मठ जलसंपत्तीच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. मठावर असलेल्या तळ्याचे पाणी उन्हाळ्यात कमी होते व शेवाळाने खराब होते. म्हणून ही कमतरता टाळण्यासाठी तसेच प्रदूषण मुक्तता व्हावी यासाठी ते पर्यायी पाणी व्यवस्थेचा विचार करत होते. अलीकडेच त्यांनी पवनगंगा नदी काठाच्या विहिरीतून लिफ्टने सोनजाईवर पाणी उचलण्याचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे आहे. आशा आहे की हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येईल. यामुळे हे दुर्गम व पवित्र ठिकाण भक्तांसाठी व पर्यटकांसाठी अजून सुंदर व सुविधांनी युक्त होईल.

मठाला जाण्यासाठी मोठी सडक किंवा घाट रस्ता नाही. वाई तसेच बावधनच्या बाजूने छोटी पायवाट अस्तित्वात होती. डोंगराच्या वरच्या टप्प्यात असलेल्या अखंड पाषाण खडकामुळे रस्ता करणे सहज शक्य झालं नाही. वाईच्या बाजूने तर खडा डोंगर असल्याने घाट रस्ता करणे शक्यच नाही. त्यामुळे हे देवस्थान दुर्गम बनले आहे. बावधनच्या बाजूने शेवटचा टप्पा सोडून इतर भागात घाट करणे थोडे सोपे होते. त्यामुळे अलीकडेच डोंगराच्या माथ्यावर छोटा ट्रॅक्टर जाऊ शकेल एवढा रस्ता त्यांनी तयार केला आहे. उभ्या खडकांमुळे शेवटच्या टप्प्यावर निमुळता रस्ता तयार झाला आहे. पण सध्यातरी पूर्वीपेक्षा सोनजाई ची वाट सुलभ झाली आहे असे वाटते. यामुळे या धार्मिक व प्रेक्षणीय निसर्गसौंदर्य लाभलेल्या ठिकाणाला भेट देणार्‍यांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

तसं बघितलं तर वाईच्या बाजूने दररोज सकाळी व्यायाम करणारे बरेच लोक दिवस उजाडण्यापूर्वी डोंगर सर करतात. जर दररोज दोनशे ते पाचशे भाविक या देवस्थानास भेट देऊ शकले, तसेच यात्रेवेळी एक लाखापेक्षा जास्त भाविक देवस्थानावर हजर राहू शकले तर शासनाचा तीर्थक्षेत्राचा किमान "क" वर्ग दर्जा मिळू शकतो. हे शक्य झाले तर शासनाकडून देवस्थान विकासासाठी भरीव निधी उपलब्ध होऊ शकतो. भविष्यात हे थंड हवेचे ठिकाण तीर्थक्षेत्र व छोटेसे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यास मदत होईल.

सह्याद्रीच्या रांगांतील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी आणि आपल्या श्रद्धेच्या पवित्र ठिकाणास भेट देण्यासाठी सोनजाईला नक्की जायला हवे.

संदर्भ:- भैरोबाचा नवस; बावधनचे बगाड, जयसिंगराव येवले (माजी मुख्याध्यापक, बावधन हायस्कुल), संजीवनी प्रेस, १९८३.

© डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाईल नंबर: ९६०४२५०००६
www.rajpure.com
rajpure.blogspot.com 

4 comments:

  1. Khup ch chan ani sundar lekhan👌...keep it up 👍

    ReplyDelete
  2. Khup ch chan ani sundar lekhan👌...keep it up 👍

    ReplyDelete
  3. खुप सुंदर लेखन आहे मला खूप आवडले केशव कारण ंंमि या पठारालगतच्या पायथ्याला रहात होतो आणि 🙏🏼🙏🏼🌷🌷

    ReplyDelete