स्टॅनफोर्ड विद्यापीठाने शीर्ष २% शास्त्रज्ञांची यादी का प्रकाशित केली?
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या इओनिडिस, बॉयॅक, बास या तीन संशोधकांनी १६ ऑक्टोबर २०२० रोजी प्लॉस बायोलॉजी या मासिकात "प्रमाणित उद्धरण संकेतकांचे विज्ञान-व्यापी लेखक डेटाबेस" प्रकाशित केले आहे. जगातील सर्वात जास्त उल्लेखित वैज्ञानिकांपैकी दोन टक्के, म्हणजे १,५९,६८३ संशोधकांच्या या यादीमध्ये भौतिकशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायन अभियांत्रिकी, वनस्पती जीवशास्त्र, ऊर्जा आणि इतर क्षेत्रांमध्ये संशोधन करणाऱ्या १४९२ भारतीयांना देखील स्थान मिळाले आहे. नवीन मापदंड वापरून ही क्रमवारी का प्रकाशित केली त्याविषयी उहापोह ...
प्रत्येक संशोधक कठोर परिश्रम करून तो करत असलेल संशोधन कार्य उच्च प्रभाव असलेल्या प्रख्यात संशोधन मासिकांमध्ये प्रकाशित करत असतो. तसंं बघायला गेलं तर २ इम्पॅक्ट फॅक्टर (प्रभाव घटक) असलेल्या जर्नलमध्ये एक प्रकाशन मिळविणेदेखील खूपच आव्हानात्मक असते. या प्रकाशनांना/ पेपर्सना त्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून इतरांच्या पेपरमध्ये उद्धरणे (सायटेशन्स) मिळतात. पूर्वी संशोधकांच्या संशोधन कार्याच्या गुणवत्तेचा न्यायनिवाडा करताना प्रकाशने आणि उद्धरणांची संख्या हा निकष असायचा. पुढे संशोधन कार्याच्या एकत्रित प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी एच इंडेक्स/निर्देशांक वापरला जाऊ लागला. शक्यतो एच-निर्देशांक एकूण प्रकाशनाच्या संख्येच्या २५% असू शकतो. आत्तापर्यंत जास्तीत जास्त १९१ एच-निर्देशांक (सोलोमोन सेंडर) नोंदला गेला आहे. तर १९५१ साली प्रकाशित झालेल्या एका पेपरला (द्रावणामध्ये प्रथिनेंचे प्रमाण निश्चित करण्याची पद्धत) ३ लाख ५ हजार एव्हढी उद्धरणे मिळाली आहेत. त्यामुळे हे ही निर्देशांक बऱ्याचदा चकित करणारे ठरायचे. तसेच एकाच क्षेत्रात शास्त्रज्ञांचे एच निर्देशांकाच्या आधारेे तुलनात्मक मूल्यांकन योग्य होई. तसेच विद्याशाखा अंतर्गत एच निर्देशांकाची तुुलना होत नाही. या कारणामुळेच ही पद्धत मूल्यांकनासाठी योग्य नव्हती. एकूणच अलीकडेपर्यंत संशोधनाच्या गुणवत्तेचा न्याय करण्यासाठी विश्वसनीय व अचूक पद्धत अस्तीत्वात नव्हती.
प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची गुणवत्तेवर आधारित जागतिक क्रमवारी दाखवणारा एकही डेटाबेस अस्तित्वात नव्हता. गूगल स्कॉलरसारखे काही डेटाबेस वैज्ञानिकांना त्यांची प्रोफाइल तयार करण्याची परवानगी देत असत, की ज्यात मानकीकरण नव्हते. जगातील सर्व शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक शाखांमध्ये प्रमाणित उद्धरण मापदंडाच्या आधारे तयार केलेल्या डेटाबेसची आवश्यकता होती. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या या तीन तज्ञांनी तयार केलेला हा महत्वपूर्ण आणि मोठा डेटाबेस स्कॉपसच्या डेटावर आधारित आहे, ज्यातून जर्नल्स रँक आणि उद्धरणपत्रिका दिल्या जातात. एलसेव्हियर चा स्कोपस हा साहित्यातील सर्वात मोठा अॅबस्ट्रॅक्ट आणि उद्धरण डेटाबेस आहे. ही यादी तयार करण्यासाठी एच-इंडेक्स व्यतिरिक्त त्यांनी एकत्रित सूचक निर्देशांक वापरला आहे. संयुक्त निर्देशकाची गणना करण्याचे सूत्र सहा संकेतकांचा वापर करून लॉगॅरिथमच्या गुणोत्तरांची बेरीज करून काढले आहे. यामध्ये संशोधनाच्या सर्व गोष्टींचा सारासार विचार केला आहे.
या डेटाबेसमध्ये प्रमाणित उद्धरण संकेतांच्या आधारे जगातील विविध क्षेत्रांतील (२२ वैज्ञानिक क्षेत्र आणि १७६ उपक्षेत्र) दोन टक्के वैज्ञानिकांचा समावेश आहे. यामध्ये उद्धरणांची संख्या, एच-इंडेक्स, सह-लेखकत्व आणि संमिश्र सूचकांची माहिती समाविष्ट आहे. या आभ्यासात स्कोपसमधील ६ मे २०२० पर्यंतच्या नोंदींच्याआधारे शास्त्रज्ञांची दोन प्रकारची गुणवत्तेवर आधारित क्रमवारीची विश्लेषणे दिली आहेत; एक म्हणजे शास्रज्ञाच्या संपूर्ण कारकिर्दीतील विश्लेषण व दुसरे म्हणजे एका कॅलेंडर वर्षातील विश्लेषण. या विश्लेषणासाठी त्यांनी संबंधित इंटरनेट दुव्यांसह दोन स्वतंत्र सारण्या दिल्या आहेत. एस-६ (कारकीर्द) आणि एस-७ (एक वर्ष) सारण्यांमध्ये स्वयं-उद्धरण समाविष्ट करून व न करता तयार केलेल्या डेटामध्ये एक लाख (किंवा शीर्ष २% यापैकी जे मोठे) शास्त्रज्ञांचा समावेश आहे. एस-८ व एस-९ या सारण्या शीर्ष दोन टक्क्यानंतरच्या याद्या देतात. कमाल लॉग मूल्ये ही स्वतंत्र कारकीर्दीसाठी (एस १०) आणि २०१९ -२०२० या एका वर्षासाठी (एस ११) सारण्यांमध्ये दिली आहेत. अशा पद्धतीने काढलेल्या संयुक्त निर्देशकांवर आधारित शास्त्रज्ञांच्या उतरत्या क्रमानेेे करकीर्द आणि एक वर्ष अशा दोन प्रकारच्या विषयवार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.
या अभ्यासाचे वैज्ञानिकांच्या संशोधक अभिनवतेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असेल. या आधारे भविष्यात जगभरातील शास्त्रज्ञांचे वार्षिक मूल्यमापन होईल. स्पर्धा असल्याशिवाय उत्कृष्टता येत नाही हे मात्र खर आहे. जे या यादीमध्ये नाहीत ते येत्या काही दिवसांत अव्वल २% मध्ये येण्याचा प्रयत्न करतील. ते त्यांचा दृष्टीकोन आणि कामाची पद्धत बदलतील. जे आता वार्षिक डेटाबेसमध्ये आहेत ते कारकीर्द डेटाबेस सूचीत येण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. या विश्लेषणाचा एकंदर उद्देश संशोधकांच्या कार्याचा समाजावर होणारा परिणाम वाढवणे हा असेल. त्यासाठी संशोधकांना स्वय मूल्यांकन करावे लागेल. संस्थांमध्ये प्राध्यापकांचे संशोधन मूल्यांकन सोपे होईल. हे विश्लेषण निश्चितपणे देशाच्या संशोधन उत्पादकता आणि तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये सुधारणा करेल. एकूणच हा अभ्यास देशाचा संशोधनात्मक विकास वाढीस मदतगार होईल यात शंका नाही.
१४९२ भारतीय शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये बहुतेकजण आयआयटी आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांमधील लोक आहेत. खरं तर या संस्थातील बहुतांशी लोक पूर्णवेळ संशोधक असतात. प्राप्त झालेल्या निर्देशांकातील उत्कृष्टतेमुळे केंद्र सरकार त्यांना पूर्णपणे आर्थिक पाठबळ देते. प्रशासकीय आणि इतर आर्थिक प्रक्रिया यांच्याकरता सोपस्कर केलेल्या असतात. त्यामुळे आयआयटी, आयआयएससी आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ या यादीमध्ये असतील तर नवल वाटायला नको. परंतु शिवाजी विद्यापीठासारख्या छोट्या शहरात स्थीत विद्यापीठातील संशोधकांनीही जर या यादीत स्थान मिळवले असेल तर याचा अर्थ शिवाजी विद्यापीठामध्ये संशोधन पातळीवर रूरल ते ग्लोबल बदल नक्कीच झालेले आहेत आणि विद्यापीठासाठी ही बाब भूषणावह आहे. मर्यादित संशोधन संसाधने आणि सुविधा सह जागतिक वैज्ञानिकांशी स्पर्धा करणे कठीण काम आहे. तरीही आपले संशोधक त्यांच्या पंक्तीत आहेेत ही बाबच अतिशय कौतूकास्पद आहे.
या वैज्ञानिकांनी सद्यस्थिती पेक्षा अधिक कुशल संशोधन कार्य करण्यासाठी शासन, संशोधन वित्तीय संस्था तसेच स्थानिक प्रशासन यांनी त्यांना अधिकचे प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांच्या निमंत्रित संशोधन प्रकल्प प्रस्तावांना विशेष मंजुरी देऊन त्यांना आंतराष्ट्रीय संशोधकांच्या सानिध्यात काम करायची संधी निर्माण करून द्यायला हवी. त्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांच्या कार्यासाठी स्वातंत्र्य द्यायला हवे. यामुळे संशोधन निर्देशांक अधिक वाढेलच पण संस्था तसेच देश त्यांचे निर्देशांक सुधारतील.
जगातील अव्वल वैज्ञानिकांच्या यादीमध्ये भारतीय वैज्ञानिकांच असणं हाच मुळी मोठा सन्मान आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारतीय वैज्ञानिकांच्या योगदानाबद्दलचा हा एक सबळ पुरावा आहे. जगातील अव्वल शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेल्या सर्व वैज्ञानिकांचे त्रिवार अभिनंदन आणि त्यांच्या कार्यास सलाम !!
प्रा डॉ केशव यशवंत राजपुरे
(पदार्थ संशोधकांच्या जागतिक क्रमवारीत मी १४१० वा व भारतीय क्रमवारीत ३७ वा आहे)
मूळ पेपर येथे प्रकाशित झाला आहे.
Very informative and interesting article.
ReplyDeleteCongratulations 🎉💐 Sir
ReplyDeleteसर्वाना समजेल असा लेख! जगातील अव्वल वैज्ञानिकांच्या यादीमध्ये तुमची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
ReplyDeleteCongratulations sir
ReplyDeleteCongrats Sirji
ReplyDeleteCongratulations Sir🎉💐🎈👍
ReplyDelete