Friday, February 7, 2020

दीपा महानवर सर

।। महानवर सर ।।

आज लोणंद येथील तेव्हाच्या सायन्स कॉलेज लोणंद चे प्राचार्य आदरणीय महानवर सर त्यांचा चतुर्थ पुण्यस्मरण दिन ! मी आज जो कुणी आहे त्या सगळ्याच सर्व श्रेय आदरणीय महानवर सरांना जातं असे मी मानतो. बारावीला ८२ टक्के गुण मिळवूनही इतरत्र प्रवेश न घेता मी जेव्हा लोणंद महाविद्यालयात बीएससी साठी पारंपारिक शिक्षण घेण्यास प्रवेश घ्यायला गेलो तेव्हा माझ्या परीस्थितीची सरांना बरोबर जाणीव झाली. माझ्यातील चमक व हुशारी कदाचित सरांनी हेरली असावी तेव्हा ! त्यात मी सरांच्याच, म्हणजे वाई तालुक्यातील त्यामुळे आणखीन जवळीकता वाटली असावी. प्रवेश घेण्यासाठी माझे दाजी कै सदाशिव शिर्के यांनी मला जेव्हा त्याची भेट घालून दिली त्यानंतर सरांनी खात्री दिली की हा मुलगा पुढे जाऊन आपल्या सर्वांसाठी काहीतरी नक्की करेल. तो ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत उदाहरण ठरेल. त्यामुळे केशवची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर दाजी तुम्ही पुढाकार घेऊन त्याला आर्थिक पाठबळ पुरवाव, तो या गोष्टीच पांग नक्कीच फेडेल. ती गोष्ट दाजींना तेव्हा पटली आणि त्यांनी सरांना शब्द दिला की इथून पुढं मी माझ्या म्हेवण्याच दातृत्व स्वीकारलं आणि आपण जसं म्हणताय तसं त्याच्यातल्या गुणवत्तेला आपण वाव देऊया. तुम्ही त्याला मार्गदर्शन आणि व्यासपीठ उपलब्ध करून द्या मी त्याच आर्थिक दृष्ट्या समर्थन करतो. अशाप्रकारे माझा लोणंद महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झाला आणि मी नव्या उमेदीने पदवीचे शिक्षण घ्यायला लागलो.

१९८९ ते १९९२ या लोणंद येथील माझ्या महाविद्यालयीन जीवनात सरांचे योगदान खूप मोठे आहे. स्वतः प्राचार्य असून देखील सर नेहमी माझी जातीनिशी चौकशी करत. मला लागणारे प्रश्नसंच, पुस्तक, नोट्स हे मी मागण्या अगोदर सर देण्याची व्यवस्था करत. एक पालक ज्या पद्धतीने आपल्या पाल्याची सर्वांगीण जबाबदारी घेतो तशी जबाबदारी सरांनी घेतली होती. माझ्या अभ्यासाविषयी वारंवार चौकशी ठरलेली. शिक्षकांच्या अध्यापनाच्या पद्धतींबद्दल अभिप्राय घ्यायचे. सुदैवाने तेव्हा आम्हाला लाभलेले सर्वच शिक्षक अतिशय तन्मयतेने आणि प्रामाणिकपणे सेवा बजावत त्यामुळे कुणाविषयीच तक्रार करण्याची वेळ आली नव्हती. माझ्या सर्व शिक्षकांना विद्यापीठाच्या मागील प्रश्नपत्रिका माझ्याकडून सोडवून घ्यायच्या सूचना असायच्या. तसं बघायला गेलं तर मी इतर विद्यार्थ्याप्रमाणे सामान्य विद्यार्थी ! पण सरांनी मला विशेष महत्वाच्या व्यक्तीसारखी वागणूक दिली. त्यामुळे शिकत असंताना माझ्यासारख्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्याला संकोचित वाटायचं.. या सर्व कठोर परीश्रमाचे फलस्वरून म्हणून मी बीएससी च्या तिन्ही वर्षात विद्यापीठाच्या परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवू शकलो. मी विद्यापीठात कितवा क्रमांक मिळवला हे जाणण्यासाठी ते नेहमी उत्सुक असायचे. मी नेहमीच गुणवत्ता यादीच्या शीर्षस्ठानी असावं ही त्यांची अपेक्षा !  

मी ज्यावेळेस महाविद्यालयात प्रवेश घेतला होता त्यावेळेला महाविद्यालय विनाअनुदानीत होते. महाविद्यालय पूर्णपणे अनुदानित करण्यासाठी महाविद्यालयाचा गुणांक कसल्याही परिस्थितीत वाढवला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. हे करत असताना विद्यापीठ पातळीवर जर महाविद्यालयातील विद्यार्थी चमकले तर ही गोष्ट महाविद्यालयाच्या दृष्टीने फायद्याची होती. सरांनी स्वतःचे स्वप्न मी किंवा नौकुडकर मॅडम सारख्या विद्यार्थ्यांच्या मार्फत पूर्ण करून घेतलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सरांच्या मधील जिद्द, चिकाटी, येनकेन प्रकारे कुठलेही कार्य पूर्ण करून घेण्याची तळमळ यातून व्यक्तिमत्व घडवणार एक महान व्यक्तिमत्त्व मी सरांच्यामध्ये अनुभवलं. त्यावेळेला महाविद्यालयाला टप्प्याटप्प्याने अनुदान मिळायच.  सुरुवातीला २५ टक्के नंतर ५० टक्के आणि मग शेवटी पूर्ण अनुदान.. मी जेव्हा १९९२ साली बीएससी च्या परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला त्याचा परिणामस्वरूप म्हणा त्यावर्षी महाविद्यालयाला शंभर टक्के अनुदान प्राप्त झाले. मी स्वतःला भाग्यवान समजतो की हे अनुदान मिळणाऱ्या घटकांचा मि सुद्धा एक भाग होतो.

बीएससी झाल्यानंतर पुढे शिक्षण घेण्याची परिस्थिती नव्हती. किंबहुना मी कुठेतरी नोकरी शोधून घर खर्चाचा बोजा उचलावा अशी गरज होती. पण सरांनी माझ्यातलया गुणवत्तेला वाव देऊन माझ्याकडून जास्तीत जास्त अर्कित करण्याचा ध्यास मात्र सोडला नव्हता. त्यांच्या सांगण्यावरूनच मी पुढे एम एस सी प्रवेशासाठी विद्यापीठात अर्ज केला. विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम आल्यामुळे माझा प्रवेश पहिल्या क्रमांकाला झाला. विद्यापीठात आलो तरी सरांचं माझ्यावरच लक्ष कमी झालं नव्हत. काय मार्गदर्शन ठरलेल, कायम चौकशी ठेवलेली, नेहमी पत्र लिहून माझ्यातील आत्मविश्वास व जिद्द टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचे सर.. विद्यापीठात आले की विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक तसेच विद्यापीठ अधिकार मंडळातील सदस्य यांच्या ओळखी करून द्यायचे. नेहमी मला माझ्या ध्येयाचे स्मरण करून द्यायचे. केशव आपल्याला पीएचडी व्हायचय - कितीतरी वेळा सर बोलले असतील. 
बीएससी ला लोणंद येथे असताना मी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला होता. सरांची इच्छा होती यासाठी माझा उचित सन्मान आणि गौरव व्हायलाच पाहिजे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते सत्कार करावा हे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले कारण मध्यंतरीच्या काळात पवार साहेबांची तारीख मिळाली नाही व सरांची रामानंदनगर येथे बदली झाली. मग सरांनी त्यांच्या या मानसाविषयी रामानंदनगर येथील महाविद्यालय निवडले. आणि तत्कालीन सहकार मंत्री आदरणीय आमदार पतंगराव कदम यांच्या हस्ते त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात माझा सत्कार घडवून आणलाच. 
सरांच्या मधील पद्धतशीरपणे, टापटीप, वक्तशीरपणा, तत्परता आणि प्रामाणिकपणा हे सर्व गुण माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी हवेहवेसे.. अभ्यासाव्यतिरिक्त जीवनावश्यक मानवी मूल्यांचे रोपनही सरांनी माझ्यामध्ये केले. विशेषता माझ्यातील खेळाच्या वेडाचे सरांनी नेहमी समर्थन केले. केशवने एक अष्टपैलू व्यक्तिमत्व घडावे यासाठी सर नेहमी प्रामाणिक प्रयत्न करत असत. सरांच्या या क्रियाकलापाचा मला मात्र खूप फायदा झाला. त्यामुळे माझ्यातील गुणवत्तेला वाव मिळाला व मी माझ्यातील आत्मविश्वास पुन्हा एकदा शोधून काढला. आज सर आपल्यात नाहीत पण सरांनी घडवलेलं अनेक केशव आजूबाजूला आहेत. सरांचे विचार आणि कार्य अजूनही या सर्वांच्या माध्यमातून करून घेणं चालू आहेच. मला माहित नाही की समाज सुधारणेविषयीची त्यांची पातळी आम्ही गाठू शकतो की नाही, परंतु सर आपण सोपवलेली शिक्षक रुपी मशाल पुढे नेण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.

याप्रसंगी सरांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली !!

- केशव राजपुरे 
(६ फेब्रुवारी २०२०)

6 comments:

  1. सर.. आपल्याला गुरुजांनांबद्दल किती आदर आहे ते या लेखातून दिसतं..

    ReplyDelete
  2. छान सर..
    सन १९८९-९२ कालावधीत कै. श्री. महानवर सर, श्रीमती. वंदना नौकुडकर व आपणासारख्या प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानामुळे सायन्स कॉलेज लोणंद संस्थेला अल्पावधीत १००% अनुदानित होण्याचा बहुमान प्राप्त झाला.
    आजही तत्कालीन सायन्स कॉलेज लोणंद हे शरदचंद्रजी पवार कॉलेज लोणंद या नावाने प्रशस्त इमारत व अद्ययावत सुविधांसह खंडाळा-फलटण-सासवड पंचक्रोशीतील दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे आयुष्यात दिपस्तंभासमान कार्यरत आहे.
    आपले व सरांचे कार्यास त्रिवार सलाम. तसेच सरांचे पाचवे पुण्यस्मरणानिमित्त सरांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली !!

    श्री. बापुसाहेब शेळके, लोणंद
    तालुका कृषि अधिकारी, कोरेगाव. जि. सातारा.
    मोबा : ९४२३९६४००५

    ReplyDelete
  3. Very nice words..heart touching story

    ReplyDelete
  4. आपल्या गुरूंविषयीची कृतज्ञतेची भावना खूपच सुंदर शब्दांमध्ये व्यक्त केलेली आहे. पुजनीय महानवर सरांचे आपल्या जीवनमध्ये येणे हाच सुवर्णकांचन योग वरला जो आजपर्यंतच्या तुझ्या यशस्वी वाटचालीस कारणीभूत ठरला.सरांची नीर-क्षीर दृष्टी व आपले निष्ठावंत शिष्याचे दर्शन यामधून होत आहे.
    आपल्या गुरू-शिष्य जोडीस त्रिवार वंदन.

    ReplyDelete
  5. डॉ.राजपूरे,
    प्रथम आपणास धन्यवाद देतो, खूप सुंदर लेख आहे, अगदी परत एकदा त्या जुन्या दिवसात घेवून गेलात आणि अगदी चित्रपट सारखा सोनेरी आठवणींना उजाळा देऊन गेलात.
    आपण श्री. महानवर सराबद्दल जेवढे बोलू ते खूप कमीच आहे पण ऐक मात्र नमूद करेल की गरिबाचे कैवारी व डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य पुढे नेणारे खरे रयतेचे मायबाप.
    मी माझे पदव्युत्तर शिक्षण फक्त आणि फक्त सरामुळे पूर्ण करू शकलो, रसायन शात्रात विद्यापिठात दुसरा व कॉलेज मधे पहिला असून सुदा मी पुढील शिक्षण केवळ गरिबीमुळे घेत नाही हे समजल्यावर सरांनी स्वतः कुलगरूंची भेट घेवून विद्यापिठात कमवा व शिका मधे प्रवेश दिला. आणि काय हवे होते या गरीब विद्यार्थ्याला.
    सर स्वतः मला माझ्या लग्नात आशीर्वाद द्यायला आले होते ते मी माझे खूप मोठे भाग्य समजतो. असो,
    ऐक मात्र नक्की सागेन असा निःस्वार्थी गुरू होणे नाही.
    आदरणीय सरांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली !!

    परत एकदा डॉ.राजपूरे तुमचे खूप खूप आभार, तुम्ही माझ्या सुवर्णआठवणींना उजाळा दिलात.

    गोरख शेडगे
    लोणंद कॉलेज पहिली बॅच १९८९

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...