Sunday, April 14, 2024

पालकांची भूमिका काय असावी ?

मुलं, जबाबदाऱ्या, वाईट सवयी, वाद आणि उपाय
हल्ली मुलांचं विचित्र वागणं तसेच त्यांच्या वाईट सवयी यामुळे त्यांच्या एकूण व्यक्तीमत्व तसेच जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे घरात तणावाची परिस्थिती निर्माण होते, पालकांना काय करावे सुचत नाही आणि सर्वजण बिथरून जातात. बऱ्याचदा कुटुंबामध्ये वादावादीचे प्रसंग येतात. 

या पिढीला मिळालेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेट आणि स्मार्ट फोन गॅझेट्स. त्यांना इंटरनेटवरील संपूर्ण माहिती उपलब्ध आहे ज्यामध्ये ८०% पेक्षा जास्त भाग प्रौढत्वाविषयी व्हिडीओ, फोटो आणि लेख आहेत, त्यामुळे नवोदित वयात त्यांच्या दृष्टीने असुरक्षित माहितीच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या नैसर्गिक भावनांवर नियंत्रण ठेवणे त्यांच्यासाठी खूप कठीण जाते. त्यात चॅटिंग, मैत्री आणि संवाद सुलभ करण्यासाठी बोटाच्या टोकावर व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम सारखी सोशल मीडिया उपलब्ध आहेतच. स्मार्टफोन सारख्या गॅजेटचा अतिवापर, तसेच पाश्चिमात्य संस्कृतीचं अवलंबन, त्याच्यातून निर्माण झालेल्या संपर्कवलयात रिलॅक्स होण्यासाठी तसेच गमती करण्यासाठीच्या अतिउल्लासाच्या सवयींमुळे मुलांचे ना धड अभ्यासात लक्ष लागते ना ते घर कामात मदत करतात, ती एकूणच विचित्र वागू लागतात आणि त्यांचे स्वास्थ्य देखील बिघडतं. यामुळे पालक ही हैराण होऊन जातात आणि मुलांना याच्यातून बाहेर कसे काढावे याबाबत त्यांना काही सुचत नाही. 

बऱ्याच वेळा मुलांना देखील माहित असते की त्यांना वाईट सवयी आहेत आणि ते चुकीचे वागत आहेत परंतु हे समजून देखील ते या सवयीच्या आधीन झालेले असतात आणि इच्छा असूनही अशा विचित्र परिस्थितीतून त्यांना बाहेर पडणे अशक्य होते. पालकांच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात येते तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो. 

मला वाटतं, पालक आणि मुलांच्यातील दुर्मिळ झालेला किंवा लोक पावत चाललेला संवाद, मुलांच्यावर प्रमाणापेक्षा जास्त ठेवलेला विश्वास, पुरवलेले लाड, अनावश्यक व्यस्तता आणि मुलांचं पालकांना गृहीत धरणं या आणि अशा अनेक गोष्टी यांस जबाबदार आहेत. 

अशाप्रसंगी संवादावर भर ठेवणं महत्त्वाचं आहे, पालकांनी मुलांच्या अडीअडचणी, त्यांच्या सवयी तसेच संगती बद्दल त्यांच्याशी बोलणं आवश्यक आहे. त्यांना जीवनमूल्यांविषयी महत्त्वाच्या गोष्टी सांगणं आवश्यक आहे. हे सांगत असताना मुलांना काही विशिष्ट मर्यादा घालून देणे पालकांचे कर्तव्य आहे; त्यामध्ये त्यांचा दिनक्रम असेल, त्यांच्या खाण्याच्या पद्धती असतील, त्यांच्या संगती असतील, अनाठाई खर्च असेल, वाईट सवयींना आळा असेल. संतुलित जीवन जगत असताना वाईट सवयींना कसा फाटा द्यायचा, त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे मुलांना सविस्तर समजावून सांगणं गरजेचे आहे. हल्ली माणसं गप्प गप्प झाली आहेत ते इतरांशी सोडा घरातल्यांशीही अल्पसंवाद साधतात. हीच गोष्ट मुलांच्या या सवयी आणि भवितव्याच्या विषयी मारक ठरतात याची कल्पनाही पालकांना नसते. 

मुलांशी मुक्त संवाद साधण्याबरोबरच त्यांना काही कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील देणं आवश्यक आहे. जेणेकरून त्यांच्याकडे असणारा फावला वेळ घरातील कामं करण्यासाठी उपयोगी पडेल. त्यामुळे पालकांचा कामाचा बोजा तर कमी होईलच पण मुलांना जबाबदारी तसेच कुटुंबात घट्ट बंध निर्माण करण्यासाठी हा वेळ उपयोगी होईल. त्याच्यामुळे चांगल्या सवयी लागतील आणि त्यांच्या वाईट सवयींमधून त्यांना बाहेर यायला मदत होईल. 

मुलांच्या चुकांबद्दल आणि सवयींबद्दल त्यांच्यावर ओरडणं किंवा त्यांना शिक्षा देण्यावर भर देण्यापेक्षा शांतपणे त्यांच्या चुका दाखवून त्याची कारणमीमांसा करावी. त्यांना मोठ्या मनाने माफ करावे आणि कधीच चुकांची आठवण करून देऊ नये. उलट, ते ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतात त्याविषयी त्यांचं कौतुक करणं, त्यांना प्रेरित करणं, त्यांना पाठिंबा देत जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर त्यांचे कौतुक करणं आवश्यक आहे. हळूहळू, त्यांना त्यांच्या चुका लक्षात येतील आणि तुमच्या पालकांनी त्यांना मनापासून क्षमा केली आहे हे त्यांना समजेल. त्यांना स्वतःबद्दल अपराधी वाटू लागेल. त्यामुळे त्यांच्यात नक्कीच बदल होऊन त्यांच्याभोवती सकारात्मक वातावरण निर्मिती होईल. वेळोवेळी त्यांच्या दिनचर्येबाबत चौकशी करून विचारणा करणं आणि माहिती घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे मुलांच्या लक्षात येईल की आपले पालक आपल्यावर लक्ष ठेवून आहेत मग ते आपोआप मर्यादेत वागतील. 

तसं बघितलं तर पालकत्व निभावण तेवढं सोपं काम नाही. बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी करून देखील मुलांच्या सवयीत तितका फरक पडत नाही. अशा वेळी तज्ञांच्या मार्गदर्शनाने मुलांच समुपदेशन करायला लागलं तरी काही हरकत नाही ज्यामुळे मुलांना काय करायला पाहिजे आणि काही करू नये याविषयी समज निर्माण होईल. आणि गरज भासल्यास सुचवलेला डॉक्टरी इलाज करायला हवा.   

वेळ देत, मुक्त संवाद राखत, मर्यादेत ठेवून आणि त्यांच्या भोवती आश्वासक वातावरण निर्माण करून पालक आपल्या मुलांना या आव्हानांवर मात करण्यास मदत करू शकतात. एकत्र वेळ घालवत, सलोखा जपत आणि वाईट सवयींना सकारात्मकतेने बदलून, पालक कुटुंबात शांती आणि मजबूत नातेसंबंध निर्माण करू शकतात.

- प्रा केशव राजपुरे

Monday, January 1, 2024

चांगुलपणा

चांगुलपणा 

अलीकडेच, माझ्या माहितीतले एकजण अचानक निर्वतले. मी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी घरी गेलो होतो. दुर्दैवाने त्यावेळी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांव्यतिरिक्त मोजकेच लोक उपस्थित होते. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता आणि त्यांचे ऑपरेशन देखील यशस्वी झाले होते. त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळणार आणि अचानक त्यांच्या छातीत दुखले ते शेवटचेच ! चालता-बोलता माणूस असा अचानक जातो आणि त्याच्या अंत्यसंस्कारावेळी ही अल्प उपस्थिती पाहिल्यानंतर मी थोडा गोंधळून गेलो. अलीकडे माणसाकडे वेळ नाही, परंतु ते चित्र मला अस्वस्थ करून गेले.

तसं बघितलं तर त्या सहकाऱ्यांचं कुटुंब केले ५० वर्ष इथे वास्तव्यास आहे. वस्तुतः इथे त्यांच्या मालकीचे घर आहे तसेच त्यांचे नातेवाईक आसपासच राहतात. ते बहुदा परगावातील असल्यामुळे त्यांच्या ओळखी तसेच संबंध कमी असावेत असा मी क्षणभर विचार केला.

परत विचार केला जरी भाषेचा प्रश्न असला तरी आज आपण इतके वर्षे पुरोगामी शहरात वास्तव्यास असूनही आपण आजूबाजूला सलोख्याचे संबंध निर्माण करू शकलो का नाही ? "का ते करायचे नव्हते" हाही प्रश्न मनात भेडसावू लागला. कि त्यांनी तसा प्रयत्न केला होता परंतु इथल्या कुटुंबांकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता काय ? त्यामुळेच जणू त्यांनी प्रयत्न करणे सोडून स्वतःला अलिप्त ठेवले असावे. कारण काहीही असो पण अंत्यदर्शनाला असलेली जुजबी उपस्थिती बरंच काही सांगून जात होती.

ते कामाच्या ठिकाणी देखील मिसळणारे व्यक्तिमत्त्व नव्हते, नेहमी अलिप्त राहायचे, फक्त कामापुरतच बोलायचे. सहकाऱ्यांशी ते नेहमीच कडक होते. त्यांचे मोजकेच निकटवर्तीय होते. त्यामुळे सहकाऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी सहचारी भावाची उणीव जाणवत असे. एकूणच, ते अलिप्त व्यक्तिमत्व असल्याने कुणी त्यांच्याजवळ जायचे नाही. त्यामुळे त्यांचा मित्र समुदाय देखील छोटेखानी होता. कदाचित त्यांचा हा स्वभाव ते राहत्या ठिकाणच्या समाजात आवडत नसावा, त्यामुळे ते तेवढे लोकप्रिय नव्हते. पण शेवटी काय झाले त्यांनी त्यांचा अलिप्त स्वभाव सोबत नेलाच, पण त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर त्या स्वभावाने मोहोर उमटवली.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे याचा त्याला विसर पडत असल्याने हल्ली माणसाने स्वतःभोवती एक अनावश्यक कवच बनवले आहे. मला कोणाचीही गरज नाही - असल्या खोट्या भ्रमात त्याने जगण्यास सुरवात केली आहे. स्वभावात एक प्रकारचा ताठपणा आलाय. पद, प्रतिष्ठा आणि संपत्तीची वागण्यात घमेंड ओसंडून वाहत आहे. त्यामुळे कुणाशी नम्रपणे राहिलं, बोलणंही माणूस सोडून दिला आहे. इतरांची विचारपूस किंवा त्यांच्याबद्दल स्नेहभाव हे त्यांच्या गावाला उरले नाही. आपुलकी, माणुसकी याला कधीच मूठमाती दिलेली आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे माणूस माणसाशी बोलायला तयार नाही. अलिखित मौन बाळगले आहेत. आणि हेच ते कारण आहे की लोक तुमच्या जवळ सोडाच, तुमच्या मयताला सुद्धा यायला इच्छूक नसतात. विशेष करून ही बाब परमुलकात नोकरीला असणाऱ्यांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवते.

रिकाम्या हाताने आलेला माणूस रिकाम्या हातानेच या जगाचा निरोप घेतो. उरते ते त्यांन इथं कमावलेले नाव, टिकवलेले नातेसंबंध आणि दाखवलेली माणुसकी ! कित्येक माणसांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तोबा गर्दी आपण पाहतो खरंतर तीच त्याची संचित संपत्ती असते. म्हणून मित्रहो आपणा सर्वांना नम्र निवेदन आहे की बोलताना नम्रता, वागण्यात माणुसकी आणि व्यवहारात आपुलकी, आदर आणि दानत ठेवायला हवी. तर माणसे जोडली जातील, नातेसंबंध टिकून राहतील आणि तुम्हाला माणसं धरून राहतील. त्यामुळे पन्नाशीनंतर तरी आपला अहंकारी स्वभाव बदलायला हवा ही काळाची गरज वाटते. मानवी स्वभाव ही क्लिष्ट गोष्ट आहे. प्रत्येकाच्या स्वभावावर त्याच्या जन्मजात गुणांचा, वातावरणाचा आणि अनुभवांचा प्रभाव असतो. स्वभाव बदल ही जरी कठीण गोष्ट असली तरी आपला स्वभाव नातेसंबंधास पूरक नसेल तर तो जरूर बदलायला हवा. 

त्यासाठी आपल्याला प्रथम अबोल भावना सोडून बोलणं सुरू करावं लागेल आणि बोलण्यात नम्रता आणावी लागेल, बोलण्यातील स्वारस्य वाढवावे लागेल. एकमेकांची जाणीवपूर्वक विचारपूस करायला हवी. संबंधितांची काळजी घेणे आवश्यक आहे. मग कोणत्याही नात्याला मैत्रीमध्ये रूपांतरित होण्यास वेळ लागणार नाही. समक्ष संवाद तर हवाच परंतु फोन संवाद देखील वाढवायला हवा. कुठलंही नातं जपायचं, टिकवायचं असेल तर त्याला जाणीवपूर्वक वेळ द्यावाच लागतो. कामं तर नित्याचीचं आहेत, त्यातूनच किमान आवश्यक वेळ काढायला पाहिजे. कारण एक वेळ अशी येते की आपल्याकडे वेळ असतो परंतु जपायला नाती नसतात. आपण आपल्या गावापासून दूर नोकरीला असाल तर गावची नाळ पण तुटता कामा नये आणि जोडली नसेल तर ती जोडायला उशीर करू नये. नाहीतर "दोन्ही घरचा पाहुणा उपाशी" सारखी गत व्हायची. गाववाले म्हणायचे "तो झालाय तिकडचा" आणि इकडचे म्हणायचे "तो आहे गावचा". 

काही लोकांना नवीन नाती बनवायला, टिकवायला आणि फुलवायला आवडतात, खरं तर हा एक छंद आहे. असे लोक जगातील सर्वात श्रीमंत लोक आहेत. हे लोक कोणतेही पद, प्रतिष्ठा, संपत्ती सोबत घेऊन जात नाहीत तर जोडलेल्या लोकांच्या सदिच्छा सोबत घेऊन जातात. चांगला माणूस मुळात आतून समाधानी असतो. जेव्हा आपण इतरांचे चांगले करतो तेव्हा ते इतरांचे तरी चांगले करतील, बरोबर? जरी ते आपल्याशी चांगले वागले नाहीत तरी आपण त्यांच्याशी चांगले वागले पाहिजे. तुमच्या या वागण्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि ते हळूहळू तुमच्याशीही चांगले वागतील.

चांगुलपणा म्हणजे नैतिकदृष्ट्या शुद्ध असणं आणि नेहमी योग्यच वागणं. परोपकार आणि गरजूंना मदत त्यांना विवंचनेतून मुक्त व्हायला मदत करते. आपोआप ते आपल्याला शुभाशीर्वाद देतात. पण आपणास काही परतावा मिळतोय म्हणून चांगले करू नये. आपण चांगले आहोत म्हणून करावे. म्हणून 'चांगुलपणा जपूया' आणि या नवीन वर्षाच्या निमित्ताने या चांगुलपणाच्या चळवळीमध्ये सहभागी होऊया. यामुळे कसलाही तोटा नाही, उलट फायदाच आहे. नात्यात इर्षा नाही. हर्ष उल्हासाने मनातील ताण तणाव गायब आणि आपल्या जीवनात आनंदाचे आगमन ! आनंदी जीवनाचे गमक म्हणजे पैशाची नव्हे तर "वेळ" आणि "चांगुलपणा" ची गुंतवणूक ! 

- केशव राजपुरे

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...