Saturday, May 16, 2020

अगस्तेश्वर मंदीर, पांढरेचीवाडी, बावधन


अगस्तेश्वर मंदीर, पांढरेचीवाडी, बावधन
 
अलीकडेच डेक्कन महाविद्यालय, पुणे येथील पुरातत्वशास्त्र विभागातील संशोधक शंतनु वैद्य व जयेंद्र जोगळेकर यांनी २०१६ साली बावधन पंचक्रोशीतील काही ठिकाणांच सर्वेक्षण करून दोन शोध निबंध प्रकाशित केले होते, ते वाचनात आले. त्यांच्या संशोधनाचा मूळ उद्देश दख्खनच्या पठाराचा पुरातत्व संदर्भातून अभ्यास व सह्याद्री घाट या कोकणातील तत्कालीन व्यापाऱ्यांच्या देशावर जाण्याच्या प्रवेशद्वाराच्या भागातील दगडात कोरलेल्या गुहांचा अभ्यास करून, तेथील वस्तूंचे सर्वेक्षण करून काही ऐतिहासिक वस्त्यांचा सुगावा लागतोय का हे पाहणं होतं. यासाठी त्यांनी पांढरेचीवाडी, आ सले, कडेगाव आणि वाई या ठिकाणचे सर्वेक्षण केले होते. तिथून काही पुरावे गोळा करून त्याची अनुमाने या पेपरमध्ये मांडली आहेत. कोकण ते घाट या व्यापाऱ्यांच्या मार्गाक्रमणात ते डोंगरात दगडात कोरलेल्या सुरक्षित गुहांमध्ये वस्त्या करत असत असे संशोधकांना वाटते. यामध्ये बावधन च्या उत्तरेस असणाऱ्या पाचीदेऊळ व परिसरातील (विसाव्याच्या धोंड्याच्या वर) तसेच वाईच्या उत्तरेस असलेल्या सुलतानपूर आणि लोहारे येथील दगडी गुहांचा संदर्भ आहे. पांढरेचीवाडी येथे मिळालेल्या पुरातन वस्तूंवरून व तिथे अस्तित्वात असलेल्या अगस्तेश्वर या पुराणकालीन मंदिर याच्यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की हे मंदिर मध्ययुगीन (तेराव्या ते आठराव्या शतका दरम्यान) बांधले असावे. मंदिराच्या शेजारील परिसर तेली समाजातील माणसांनी शेतीसाठी किंवा इतर कारणाने खोदून सपाट केला आहे. तिथल्या मातीचे ढिगारे आणि विटा यांचे निरीक्षण केले असता असे लक्षात आले की ते सातवाहन काळातील (मंदिर निर्माण होण्यापूर्वी चे) अवशेष आहेत. म्हणजे सातवाहन काळापासून बावधन पंचक्रोशीत वसाहती होत्या.


असे ऐकण्यात होतं की बावधन मधील गाडेबाग आळीमधील सध्याचा राजे भोसले यांच्या वाड्यापासून ते अगस्तेश्वर मंदीर व वाकेश्वर मंदिर इथे जाणारे दोन गुप्त भुयारी मार्ग आहेत. माहिती काढल्यानंतर असं लक्षात आलं की हा वाडा आणि अगस्तेश्वर मंदिर यामध्ये काहीतरी संबंध होते. छत्रपती संभाजी राजेंचे चिरंजीव व साताराच्या गादीचे पहिले संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांनी बावधनमधील भैरवनाथ व अगस्तेश्वर देवस्थानांचे वतन कानिटकर या ब्राह्मण घराण्याकडे दिले होते. अठराव्या ते एकोणिसाव्या शतकादरम्यान कानीटकर बावधन मध्ये या अकरा गुंठ्यात बांधलेल्या भव्य वाड्यात वास्तव्यास होते. ते मोठे शिवभक्त होते व मंदिराचे पुजारी होते. दररोज सकाळी ओल्या पडदेन, कुणाचीही सावली अंगावर न पडू देता ते या भुयारी मार्गाने अगस्तेश्वर येथे महादेवाची पूजा-अर्चा करायला जात. वाड्याच्या मागे अजूनही घोड्याची पागांची जागा व गुप्त तळघर अस्तित्वात आहे. तेव्हा बावधन मध्ये तीन वेशीच्या आत तटबंदीमध्ये ब्राह्मणांच्या वस्त्या होत्या. त्यामुळे पंचक्रोशीत असणाऱ्या अगस्तेश्वर या मंदिराबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी मन कासावीस झाले.

अगस्ती हे वैदिक ऋषी होते. त्यांचे वडील पुलस्तऋषी हे ब्रह्मपुत्र होते अशी अख्यायिका आहे. अगस्ती हे वशिष्ठ ऋषींचे मोठे बंधू होते. कलीयाला वरदान देण्यासाठी प्रभू शंकर यांनी त्यांची निर्मिती केली होती असे सांगितले जाते. त्यांचा जन्म काशी इथला. विदर्भातली राजकुमारी लोपमुद्रा यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. अगस्ति ऋषी हे ऋग्वेदाच्या अनेक स्तोत्रांचे लेखक आहेत. राजा दशरथचे ते राजगुरू होते. दक्षिण तसेच आग्नेय आशिया मध्ये  सापडणाऱ्या प्राचीन मंदिरांमध्ये असणाऱ्या शिल्पकलेत सापडणारे ऋषी म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जाते. असं म्हटलं जातं की आर्य समाजाच्या प्रसारासाठी अगस्ती ऋषी हे दक्षिण भारताकडे आले होते. त्यावेळी उत्तराखंड, तामिळनाडू, महाराष्ट्र तसेच दक्षिण भारतात या ऋषींनी समाज प्रसारासाठी आश्रम बांधले. ते स्वतः शिवभक्त असल्यामुळे या आश्रमांच्या परिसरात महादेवाची मंदिर बांधण्यात आली. यातूनच बावधन च्या दक्षिणेला अर्धा किलोमीटर वर असलेल्या पांढरेचीवाडी गावच्या शिवारात अगस्तेश्वर हे मंदिर वसलेले आहे. अगस्तेश्वर महाराजांचे मठ काशी, नाशिक तसेच नागपूर येथे असल्याचे सांगितले जाते. 

या गावच्या शिवारात तसेच शेतात सापडणारी बहुतांशी माती ही पांढऱ्या रंगाची आहे आणि ह्या मातीच्या ओळखीवरूनच या गावाचे नाव पांढरेचीवाडी पडले असावे असे वाटते. पांढरेचीवाडी गावच्या पश्चिमेला अर्धा किलोमीटर अंतरावर बारोळी कडून येणारा एक ओढा तसेच कनुर कडून येणारा एक ओढा याचा संगम आहे. तोच ओढा पुढे जाऊन थोरला ओढा (पवनगंगा) म्हणून पांढरेचीवाडीच्या दक्षिणेकडून वाहून पुढे कृष्णा नदीस मिळतो. असे सांगितले जाते की कनुरहून आलेल्या ओढ्याचा पांढर्‍याचीवाडी गाव येण्याअगोदरचा नैसर्गिक प्रवाह पूर्वजांनी जमिनींच्या लागवडीसाठी दक्षिणेकडे वळवला होता. खरंतर या ओढ्याच्या मूळ प्रवाह पांढरेचीवाडी च्या उत्तरेकडून असून हा ओढा बारूळीच्या ओढयास पांढरेचीवाडी गावाच्या पूर्वेस मिळत होता. दहा वर्षांपूर्वीच्या मुसळधार पावसाने आलेल्या पुरात ओढ्याने आपली नैसर्गिक प्रवाहाची दिशा घेतल्याचे सगळ्यांनी पाहिले आहे. तसा हा ओढा खूप जुना वाटतो कारण पाण्याने कातळ खडक देखील खुप कापलेला आहे. तसेच मंदिराच्या आसपासच्या परिसरात तेली समाजाची शेती व दफनभूमी अस्तित्वात आहे. अजूनही त्या परिसरात त्यांच्यातील मयतांचे दफन केले जाते.

बावधन च्या दक्षिणेला अर्धा किलोमीटर अंतरावर व पांढरेचीवाडी गावापासून पश्चिमेला झाडांच्या बागेत ओढ्याच्या काठी अगस्तेश्वर हे मंदिर वसलेले आहे. मंदिराला पाच फूट रुंदीची व पाच मीटर उंचीची साधारण तीस मीटर बाय वीस मीटर परिसरात तटबंदी आहे. मुख्य मंदिर वीस बाय वीस फूट जागेत वसलेले आहे. दर्शन मंडप पंचवीस फुटांचा आहे. दर्शन मंडपाच्या पुढे नंदी व ध्यानधारणेसाठी षटकोनी आकाराचे चौथरे अशी रचना केलेली आढळते. लिंग असलेले मुख्य मंदिर छोटे आहे. कदाचित हे मंदिर पुरातन मंदिर असावे हे त्याच्या वास्तुशैली वरून लक्षात येते. पण या मंदिराच्या दर्शन मंडपाचे वास्तुशिल्प आणि बावधन गावामधील भैरवनाथ मंदिरांचे दर्शन मंडपाचे वास्तुशिल्प समान असल्यामुळे असे वाटते की भैरवनाथ व अगस्तेश्वर मंदिरांची कानिटकर घराण्याने पुनर्बांधणी केली असावी. मंदिराच्या आवारात अजून एक छोटेसे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला पुरातन मठाची मोकळी जागा आहे. ही इमारत जरी अस्तित्वात नसली तरी तिथल्या अवशेषावरून असे लक्षात येते की त्यावेळी महाराजांनी समाधी घेण्यासाठी विशिष्ट आकारांच्या दगडात समाधीस्थळ बांधली होती. मंदिराचा पाया अतिशय भक्कम आहे. पाया जवळजवळ सात ते आठ फूट खोल व पाच फूट रुंद आहे. या पायामध्ये मोठाले दगडाचे गोटे असल्याने मंदिरास भक्कमता आली आहे. मंदिराच्या पूर्वेला साधारण १०० मीटर अंतरावर एका जुन्या वाड्याचे पायाचे बांधकाम होते, सद्ध्या तिथे काहीही अवशेष शिल्लक नाहीत. हा वाडा कुणाचा? याची माहिती घ्यावी लागेल. तेली समाजाची या जागेवर स्मशानभूमी आहे.

मंदिरापासून साधारण ५० मीटर अंतरावर मठाची जागा आहे. येथे एक दगडी चौथरा आहे. या ठिकाणी गोसावी वस्ती होती. या कुटुंबातील पुर्वजापैकी एकाने  या ठिकाणी समाधी घेतली होती असे म्हणतात. अंदाजे ६० ते ६५ वर्षापुर्वी पर्यंत हे गोसावी कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास होते. नंतर त्यांनी ते शेत बावधन मधील गारडे यांना विकले व गाव सोडून गेले. त्या ठिकाणी एक दगड मातीची इमारत होती ती आता अस्तित्वात नाही. चौथऱ्या शेजीरी साधारण ७ ते ८ फुट अंतरावर प्रत्यक्षात समाधी घेतलेली जागा सापडली होती. जमीनी खाली दगडी बांधीव काम व त्यावर दगडी फरशी ठेवलेली. त्याबाबत गारडे यांनी कै. दत्तात्रय जोशी काका यांना विचारले होते. त्यांनी त्या ठिकाणी समाधी आहे आणि ते काढू नका- असे सांगितले होते. दगडी चौथरा हा स्मृतीस्थंब असावा असे वाटते. त्याचे ऊत्खणन झाले तर अधिकची माहिती समजेल. याच गोसाव्यांचे एक नातेवाईक- भारती (गोसावी) आपल्या गावात राहतात. पूर्वी ते भिक्षा मागत असत.

मुख्य मंदिराच्या पुर्वेला २५ ते ३० फुट अंतरावर साधारण १५ फुट ऊंचीचे एक दगडी मंदिर आहे. त्याला अडीच तीन फुटाची चौकट आहे. त्यातून आत गेल्यानंतर साधारण ४ ते ५ फूट खोलीचा विटा व दगडात बांधलेला भराव असून वर साधारण दिड बाय दिड फुटाचा दगडी फरशी ठेवण्यासाठी जागा आहे. तिथे एक काळा चौकोन दिसतो. हे दगडी मंदिर समाधी साठी बांधले होते का ? त्यामध्ये समाधी  घेतली आहे का ? हे सांगता येत नाही. या मंदिराच्या शेजारी ८ ते १० फूट अंतरावर तेवढयाच ऊंचीचे अजून एक मंदिर होते पण आता ते पडक्या अवस्थेत आहे. ४o वर्षापुर्वी ते चांगल्या अवस्थेत होते असे सांगतात.  त्यामध्ये एक शिवलिंग होते पण त्यामध्ये बांधीव खड्डा नव्हता. मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या बाहेर दिपमाळ व जुना नंदी आहे. देवीची जुनी मुर्ती, कोरीव काम केलेल्या दगडी बाहेर पडलेल्या दिसतात. यांसाठी वापरलेला दगड हा फार पुरातन वाटतो. मंदिराच्या संरक्षक भिंतीतुन एक दगडी तोड ढिली होऊन निघालेली दिसत आहे. बावधनमधील कानिटकरांच्या वाड्यातील भुयारी मार्ग इथे निघत असावा. हा मार्ग सुरक्षेच्या कारणाने सद्ध्या बंद आहे. मंदिराच्या मधल्या मंडपातील गणेश मूर्ती व गाभाऱ्यातील देवीची मूर्ती तसेच कळस यांचा जीर्णोद्धार सप्टेंबर २०१० मध्ये झालेला आहे. मंदिरातील मुख्य लिंग पूर्वीचेच असून त्याला फक्त वज्रलेप केलेला आहे. अफजलखान राजेंना पकडायला बराच काळ वाई प्रांतात राहण्यास होता. त्यादरम्यान त्याने वाई परिसरातील बरीच मंदिरे उध्वस्त केली. त्यात त्यावेळचे त्यांचे महसुली गाव "अफजलपूर" म्हणजेच सद्ध्याचे "बावधन" मधील अगस्तेश्वर मंदिर हे सुद्धा असेल.त्या भग्न मंदिराचे अवशेष मंदिराच्या आवारात पडले असावेत.   

बावधन येथील ब्राह्मण वस्तीचा भाग सुरक्षा व पूजेचे सोवळे पाळण्यासाठी तटबंदी व वेशी बांधून बंदिस्त केल्याचे वाटते. हि मंडळी स्वातंत्रलढ्यात तसेच महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर बऱ्याच अंशी उदरनिर्वाहासाठी स्तलांतरित झाली असावी. त्यामुळे अगस्तेश्वर मंदिराची जबाबदारी गावखात्याने स्वतःकडे घेतली असावी. त्यानंतर ब्राह्मण समाजाचे गाडेबाग आळीतील वाडे इतरांनी विकत घेतले होते. पांढरेचीवाडी गावांमध्ये तरटे, ननावरे आणि रासकर या माळी समाजातील घराण्यांची वस्ती आहे. हे गाव बागायत शेतीबरोबरच विशिष्ट जातीच्या पेरुंच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. सध्या या मंदिराचे सगळे कारभार हे अगस्तेश्वर मंडळ, पांढरेचीवाडी यांचे मार्फत चालवले जातात. जवळजवळ पाच एकर परिसरात वसलेले हे मंदिर व शेजारील मोकळी जागा सातारच्या महाराजांच्या नावावर आहे. बावधन गाव हे सातारचे महाराज उदयनराजे यांना महसूल देणारे गाव अशी अजूनही ओळख आहे. २००३ साली मंदिरासाठी वीज पुरवठा घेते समयी या सर्व गोष्टींचा उलगडा झाल्याचे सांगितले जाते.

या मंदिराचे अलिकडील काळाचे वैशिष्ट्य म्हणजे; श्रावण महिन्यातील सत्यनारायणाच्या १०८ सामूहिक पुजांचे आयोजन. पांढरेचीवाडी येथील अगस्तेश्वर मंडळ यांचेमार्फत श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावास्येला हे आयोजन केले जाते. ही परंपरा गेल्या ५४ वर्षांपासून अखंड सुरू आहे. या अगोदर या मंदिरात अभिषेक घालण्याची पद्धत होती. यामध्ये मध्यभागी एक महापूजा असते व सभोवताली नंबर प्रमाणे १०८ पूजा बांधल्या असतात. भाविकांकडून शंभर ते दीडशे रुपयांची अल्प फी घेतली जाते. कमी खर्चात श्रावण महिन्यात शंकराच्या मंदिरात पूजेच्या रुपांनी एका सामुदायिक सोहळ्याचे आयोजन केल्याचे समाधान माणसांना मिळतं. याप्रसंगी महाप्रसादाचे वाटप केले जाते. पूर्वी काळ्या घेवड्याची उसळ व कायलीत तयार केलेली लापशी चा महाप्रसाद असायचा. बावधन पंचक्रोशीत या पूजेत सहभागी होणे म्हणजे अत्यंत समग्र गोष्ट मानली जाते.

भारतीय संस्कृतीने पुरातन परंपरा जपून आकार घेतला आहे. आपली संस्कृती ही हजारो वर्षांच्या इतिहासामुळे, विलक्षण भूगोलामुळे आणि समाजाच्या वैविध्यामुळे आकारास आली आहे. आपण विविध कारंणानी झालेले बदल पचवूनदेखील स्व‌तःचे परंपरागत प्राचीनत्व टिकवून ठेवले आहे. आपल्या देशातील या पुरातत्व मालमत्तेचा अभ्यास करणे आणि त्यांचे जतन करणे खूप महत्वाचे आहे. हे आपल्या संस्कृतीचे पुरावे आहेत. याचा अर्थ असा की बावधन आणि त्याची पंचक्रोशी कमीतकमी सातवाहन काळातही अस्तित्वात होती. मध्यमयुगीन अगस्तेश्वर मंदिर आणि पुराणकथांचे पुराव्यांचा बावधन पंचक्रोशीतील लोकांना अभिमान आहे.

संदर्भ: 
१) शंतनु वैद्य आणि जयंत जोगळेकर, हेरिटेज: जर्नल ऑफ मल्टीडिसिप्लिनरी स्टडीज इन आर्किऑलॉजी, ४ (२०१६) ४०१-४१६ (आयएसएसएन २३४७-५४६३)
२) जयंत जोगळेकर आणि शंतनु वैद्य, मन अँड इन्व्हरमेंट, एक्सएलआय (१), (२०१६) ११४-११८.

© डॉ केशव राजपुरे
मोबाईल नंबर: ९६०४२५०००६
www.rajpure.com
rajpure.blogspot.com
(माहिती स्त्रोत: पप्पूराजे भोसले, सदाशिव ननावरे, सचिन अनपट, तेजस अरबुणे व इंटरनेट)

2 comments:

  1. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या परिसरात असंख्य रहस्य लपलेली आहेत, त्यांना कुतूहलाने शोधत असताना आपणास आत्मिक आनंद मिळतो. त्या संस्कृतीच्या खाणाखुणा, रहस्ये, राहणीमान, त्यांचे आचार - विचार आणि स्थापत्य आपणास प्रेरणा देत राहतात. नवीन शोध घेण्यास भाग पाडतात असाच श्री अगस्तेश्र्वर मंदिर परिसराचा लेख रहस्य तृप्ती करतोय. सर आपले कार्य उत्तम��������

    ReplyDelete
    Replies
    1. Very nice and heart touching information🙏🙏🙏

      Delete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...