Wednesday, February 2, 2022

आयर्नमॅन चार्टर्ड अकाउंटंट विजय अनपट

 


अनपटवाडी (ता. वाई) या माझ्या मूळ गावाने विविध क्षेत्रात अनेक दिग्गज निर्माण केले आहेत. सध्याचे स्थान गाठण्यापूर्वी प्रत्येकाने कठोर परिश्रम केले आहेत. त्यापैकीच एक तरुणांचे रोल मॉडेल, सदाहरित आणि हसतमुख व्यक्तिमत्व म्हणजे; चार्टर्ड अकाउंटंट श्री विजय बाबुराव अनपट ! वीस वर्षांपूर्वी आउट ऑफ बॉक्स विचार करून त्यांनी लेखापरीक्षण अर्थात चार्टर्ड अकाउंटंट हे आव्हानात्मक करिअर क्षेत्र निवडले होते. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही आजतागायत त्यांनी लेखा आणि लेखापरीक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एक सामान्य विद्यार्थी ते नामांकित सीए पर्यंत त्यांनी स्वबळावर अशक्यप्राय उंची गाठली आहे. त्यांची यशोगाथा नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

लेखापरीक्षण म्हणजे आर्थिक खाती अचूक आहेत की नाही हे तपासणे. ऑडिटर असणे म्हणजे न्यायाधीश असण्यासारखे आहे. लेखापरीक्षणासाठी साशंकता आवश्यक असल्याने आव्हानात्मक बनते. महसूल ओळख, फसवणूक, प्रतिभा, कामाचा ताण, कालबाह्य कौशल्ये ही लेखापरीक्षकांसमोरील काही आव्हाने असतात. सर्वात आव्हानात्मक बाब म्हणजे तुम्ही एकाच वेळी अनेक प्रकल्पांवर काम करत असाल तर तुम्हाला ते सर्व प्रकल्प व्यवस्थित हाताळावे लागतात.

यासाठी ऑडिटरना त्यांच्या मनाचे आणि शरीराचे भरपूर पोषण करावे लागते आणि सदोदित त्याला चुस्त ठेवावे लागते. नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांना नेहमी तत्पर असावे लागते. दैनंदिन व्यायाम, योग्य आहार आणि ध्यानधारणा यामुळे माणसाला संतुलित जीवनशैली लाभते. तसेच पुढील कामांसाठी ताजे राहण्यासाठी यांत्रिक जीवनशैलीतून विश्रांतीची देखील लाभते.
 
विजयने मात्र स्वतःला या आव्हानात्मक जीवनशैलीत ताजेतवाने राहण्याचा एक वेगळाच मार्ग शोधला आहे. नित्यनेमाने पोहणे, धावणे आणि सायकल चालवणे असा त्याचा दिनक्रम असतो. या नित्य व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंची ताकद तसेच लवचिकता वाढते, हाडे मजबून तर होतातच पण सांध्यात गतिशीलता येते, रोगप्रतिकारात्मक शक्तीत वृद्धी होते, शरीरातील चरबीची पातळी कमी होते आणि महत्वाचे म्हणजे तणाव पातळी कमी व्हायला मदत होते. यामाध्यमातून विजय च्या केवळ कार्यक्षमतेतच वाढ झाली नाही तर जीवनात शांती आणि समाधान प्राप्ती होऊ लागली. दिवसेंदिवस विजय तंदुरुस्त, सक्रिय आणि तणावमुक्त होत गेला. ती त्याच्या जीवनशैलीची सवय बनली.

या दीर्घ व्यायामाबाबत पुरेसा आत्मविश्वास मिळाल्यानंतर त्याने मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा विचार केला. तो बायथॉलॉन आदी स्पर्धेत स्वतःला आजमावून बघू लागला. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आपली सहनशक्ती, सामर्थ्य आणि गती बाबत प्रशिक्षीत करावे लागते आणि कठोर सराव करावा लागतो हे एव्हाना त्याच्या लक्षात आले होते. आपल्या अचिव्हमेंट्स चा अंदाज आल्यानंतर त्याने आणखी कठीण असलेल्या हाफ आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले होते. कैक तास सतत व्यायाम आणि प्रतिकूल हवामानात खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीचा कस बघणे हा आयर्नमॅन ट्रायथलॉनचा उद्देश असतो. त्याची सहनशीलता, धैर्य आणि क्षमता शारीरिक आणि मानसिक सामर्थ्यांनुरूप अजमावण्याचा त्याचा उद्देश होता.

हाफ आयर्नमॅन म्हणजे पोहणे, सायकल चालवणे आणि धावणे या तीन स्पर्धांची ट्रायथलॉन स्पर्धा.. निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण करणे आवश्यक असते. या स्पर्धेचा सर्वात कठीण भाग म्हणजे पोहणे आणि सायकल चालवल्या नंतर 'धावणे' हा असतो. ९० किलोमीटर सायकल चालवुन शरीर थकलेले असते आणि शरीराला विश्रांतीची गरज असते त्याचवेळी आपल्याला विश्रांती न घेता धावावे लागते. इथेच आपला कस पणाला लागतो. पण निग्रही खेळाडू ह्या कठीण काळातही त्राण न घालवता स्पर्धा पूर्ण करतोच.

अलीकडेच ३० जानेवारी २०२२ रोजी त्याने डेक्कन स्पोर्ट्स क्लबने कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या 'बर्गमन ११३' या ट्रायथलॉनमध्ये भाग घेतला आणि यशस्वी देखील झाला. या स्पर्धेमध्ये सहनशीलता, संयम तसेच सामर्थ्याचा कस लागतो. निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण केल्यास आयर्नमॅन म्हणून शिक्कामोर्तब केला जातो. विजयने २ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २२ किमी धावणे अशी एकूण ११३ किमीची स्पर्धा ६ तास २५ मिनिटे आणि ३८ सेकंदात पूर्ण  केली. याद्वारे त्याने आपण कणखर, तंदुरुस्त आणि फिट असल्याचे प्रमाण मिळवले.


विजय चे बालपण खेड्यात गेले. अगदी लहानपणापासूनच त्याला काबाडकष्ट करणं, शेतातील कष्टाची कामं करणं तसेच डोंगर माथ्यावर जाणं याची सवय होतीच. त्यामुळे शारीरिक कष्ट आणि वेदना यांना न जुमानता मार्गक्रमण करण्याची कला त्याच्याजवळ लहानपणापासूनच आहे. वयोमानानुसार हा स्टॅमिना, संयम तसेच निग्रह टिकत नाही. पण विजयने कायम व्यायाम आणि कसरतीत राहून तो अजून टिकवलेला आहे. बावधन पंचक्रोशीतील प्रत्येकजण चिवट आणि धाडसी स्वभावाचा असतो. कदाचित पंचक्रोशीतील मातीचे हे गुण विजयने चिरंतन सरावाने अजून संवर्धित केलेले आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.
 


२५० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या आपल्या गावासाठी ही अत्यंत सन्मानाची आणि प्रतिष्ठेची बाब आहे. आपले या प्रसंगी खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि भावी कारकिर्दीसाठी अनेक शुभेच्छा. विजय तुमची ओळख, कौशल्य आणि अनुभव आपल्या गावातील आगामी प्रतिभेला एक दिपस्तंभ किंवा मशाल बनून राहो ही आमची इच्छा आहे.

- केशव राजपुरे 

4 comments:

  1. Congratulations kaka.
    तुम्ही नेहमीच आम्हाला प्रेरणा स्थानी आहात.
    खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा..

    ReplyDelete
  2. Sir, story of Vijay gives inspiration to youth. You have seen his efforts and focused it for us. Your blog really lights on real and hidden gem s of our society.
    Thankyou Sir 👍.

    ReplyDelete
  3. लष्कर किंवा पोलीस सेवेतील व्यक्तींना असणारे असे शौक किंवा आवड सि. ए. या गुंतागुंतीच्या विषयातला माणूस जपतोय हे वेगळेपण आहे, ते स्फूर्तीदायक पण आहेच, आपल्या परिसरातला, मातीतला आहे त्यामुळे मनाला सुख देणारी गोष्ट आहे. शब्दांकन छानच,
    धन्यवाद सर.

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...