Tuesday, February 24, 2026

आत्मचिंतन


 
ज्ञानजिज्ञासेचा अभाव

संशोधनाचा मुख्य उद्देश 'ज्ञाननिर्मिती' हा असतो. हे करत असतानाच संशोधकाची जडणघडण व्हावी, त्याचा व्यक्तिमत्व विकास व्हावा आणि वैचारिक क्षमता प्रगल्भ व्हावी, हा देखील त्यामागचा महत्त्वाचा हेतू असतो. यालाच जर आपण 'कौशल्याधिष्ठित ज्ञाननिर्मिती' म्हटले, तर ते वावगे ठरू नये. मात्र, हल्ली मुले संशोधनाकडे केवळ एक गरज किंवा पात्रता म्हणून वळताना दिसतात. पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी असूनही नोकरी मिळत नाही, मग आता काय करायचे? या विवंचनेतून केवळ पदवीसाठी संशोधनाकडे वळणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

संशोधनाला प्रवेश घेतल्यानंतर अनेकांचा असा समज असतो की, आपण काहीतरी 'जगावेगळा' शोध लावला पाहिजे, जे आजवर कोणीच केले नाही असे काहीतरी करून दाखवले पाहिजे. यामागे नाव कमावण्याची आणि समाजात 'ग्रेट' ठरण्याची सुप्त इच्छा असते. मला वाटते, समाजात संशोधनाविषयी खरी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. संशोधनामुळे माणसाची तार्किक आणि विश्लेषणात्मक दृष्टी सुधारते, हे त्यांना कोणीही सांगत नाही. ज्यांनी प्रामाणिकपणे पीएचडी केली आहे, त्यांना याचा अनुभव नक्कीच येतो.

संशोधनाला सुरुवात करताना, कमी वेळात संशोधन कोणत्या गाईडकडे पूर्ण होईल किंवा कोणत्या क्षेत्रात लवकर निकाल मिळतील, याचा विचार करूनच अनेकजण प्रवेश घेतात. म्हणजेच, या निवडीमध्ये ते अत्यंत व्यावहारिक (निवडक) असतात. याचे कारणही तसेच आहे: त्यांना कमीत कमी श्रमात पदवी मिळवायची असते, इतरांचे रेकॉर्ड तोडायचे असतात आणि स्वतःला सरस सिद्ध करायचे असते.

सुरुवातीला मार्गदर्शक किंवा लॅबमधील वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून विषयाच्या 'टिप्स' घेतल्या जातात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून श्रम वाचवत, निवडक प्रयोग करून उत्तम निकाल मिळवणे, हेच एकमेव ध्येय समोर ठेवले जाते. या पिढीला धीर नाही; त्यांचे लक्ष शिकण्यापेक्षा 'एक्सीलंट रिझल्ट' मिळवण्यावर असते. 'येनकेन प्रकारेण' शोधनिबंध  आणि प्रबंध पूर्ण झाला पाहिजे, एवढाच त्यांचा मर्यादित उद्देश असतो. शिकण्याच्या नावाने मात्र आनंदीआनंदच असतो. लॅबमधील सिनिअर विद्यार्थ्यांना स्वतःचे काम असते, तर मार्गदर्शकांवर शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा बोजा असतो. त्यामुळे विद्यार्थ्याने काढलेले निष्कर्ष किंवा आकडेमोड मुळापासून तपासली जाईलच असे नाही. केवळ अंतिम निकाल पाहिला की काम भागते. पण या प्रक्रियेत विद्यार्थी ज्ञानाच्या बाबतीत 'कोरा'च राहतो, हे आजचे दुर्दैवी वास्तव आहे.

बऱ्याचदा विद्यार्थी जे प्रयोग करतात, त्यातील मूलभूत तत्त्वांची माहिती त्यांना नसते. विषयातील क्लिष्टतेमुळे कधीकधी मार्गदर्शकही काही बाबींपासून अनभिज्ञ असतात. "मुले काहीतरी नवीन करतायत ना, मग ते बरोबरच असणार," किंवा "सिनिअर विद्यार्थी सोबत आहेच," असे गृहीत धरून जबाबदारी टाळली जाते. इथेच मुख्य अडचण निर्माण होते. मार्गदर्शकाची बौद्धिक मर्यादा किंवा आळस यामुळेही दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. परिणामी, संशोधनाचा मुख्य उद्देश बाजूला राहतो आणि मुले 'हम करे सो कायदा' या वृत्तीने वाटचाल करू लागतात.

मी गेल्या तीस वर्षांपासून संशोधन क्षेत्रात आहे. भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्रातील बहुतांश संशोधक 'मटेरिअल सायन्स'ची निवड करतात. मूळतः अकार्बनिक रसायनशास्त्र आणि घनअवस्था पदार्थविज्ञान यांच्याशी निगडित हा विषय आहे. पण जेव्हा इतर विषयांतील संशोधकही याच क्षेत्रात गर्दी करतात, तेव्हा कुतूहल वाटते. याची दोन कारणे असावीत: मटेरिअल सायन्सची उपयुक्तता आणि संशोधनातील सुलभता. एकेकाळी थिन फिल्म, PEC सोलर सेल, गॅस सेन्सर, मायक्रोवेव्ह, होलोग्राफी किंवा एरोजेल यांसारख्या विषयांत काम करणारी माणसे 'सुपर कॅपॅसिटर'च्या संशोधनात कधी रमली, हे समजलेच नाही. सुपर कॅपॅसिटरमध्ये संशोधन करायला हरकत नाही, पण इतर क्षेत्रांत वाव नाही का? की ती क्षेत्रे खर्चिक वाटतात? तिथे कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे? विषय बहुविद्याशाखीय असल्याने ठेवलेला हा व्यावहारिक दृष्टिकोन संशोधनाच्या मुळावर येत आहे.

आता मूळ मुद्द्याकडे येऊया: विद्यार्थ्यांची उत्सुकता, क्युरिऑसिटी आणि ज्ञानरचनावाद. सुरुवात उपकरणांपासून होते. उपकरणाला दिलेल्या 'डेटा'साठी आपण कोणत्या सूचना दिल्या आहेत, हे अनेकदा विद्यार्थ्यांना ठाऊक नसते; कारण ते एकतर उपकरण वापरण्यात पारंगत नसतात किंवा त्यांनी दुसऱ्या कोणाकडून तरी निरीक्षणे घेतलेली असतात. "हे असं करायचं, ते तसं करायचं" या पलीकडे त्यांना काहीही माहिती नसते. माहिती करून घेण्याची उत्सुकताही नसते. त्यांच्या दृष्टीने केवळ डेटा आणि त्यावरून काढलेला आलेख महत्त्वाचा असतो. आलेली निरीक्षणे अशीच का आली, याचा शोध घेण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. प्रत्येकजण केवळ आपली भूमिका निभावण्याचे सोंग करतो; तिथेच शिक्षण पद्धती मार खाते.

तीस वर्षांपूर्वी संगणक उपलब्ध नव्हते. आलेख पेपरवर हाताने काढावे लागत. निरीक्षणांच्या बिंदूंमधून जाणारी 'बेस्ट फिट' रेषा काढण्यासाठी तासन् तास खर्च होत. अक्षाचा छेदबिंदू घेताना शून्यापासून सुरुवात करण्याचे भान ठेवावे लागे. लॉग स्केल, लॉग-लॉग स्केल, सेमी-लॉग स्केल यांचा अर्थ समजल्याशिवाय आलेख काढता येत नसत. आता मात्र सॉफ्टवेअरमुळे (एक्सेल किंवा ओरिजिन) डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, पीक फिटिंग ही कामे लीलया होतात. यामुळे आलेख काढण्याच्या मूलभूत पद्धती आणि स्केलचे ज्ञान विद्यार्थ्यांकडे राहत नाही.

गणितातील पाया कच्चा असल्याने विद्यार्थ्यांना डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशनचा 'भौतिक अर्थ' सांगता येत नाही. मॅथेमॅटिकल एरिया आणि ॲब्सोल्युट एरिया यातील फरक त्यांना समजत नाही. "रिझल्ट महत्त्वाचे की या मूलभूत गोष्टी?" असा प्रश्न काहीजण विचारतात. माझ्या मते, आधी पाया भक्कम हवा आणि मगच रिझल्ट.

जेव्हा ही मुले सादरीकरण देतात, तेव्हा चाणाक्ष परीक्षकांच्या लक्षात त्यांचे अज्ञान लगेच येते. उदाहरणादाखल, एक्सपीएस च्या आलेखात क्ष-किरणांचा स्रोत बदलला तर 'बाइंडिंग एनर्जी पीक'ची जागा बदलेल, असे चुकीचे उत्तर देऊन विद्यार्थी स्वतःचे हसू करून घेतात. "हे तर इन्स्ट्रुमेंट देते, उत्तर माहित नसले तर काय झाले?" असा त्यांचा युक्तिवाद असतो. मग तुमच्यात आणि बारावीच्या विद्यार्थ्याच्या ज्ञानात काय फरक उरला? ग्रामीण भागातील मुले तरीही आपली चूक मान्य करतात, पण शहरी भागातील मुले प्रश्न विचारणाऱ्याच्याच पात्रतेवर शंका घेण्यास कमी करत नाहीत, असा माझा अनुभव आहे.

बहुतांश मुलांना एक्सआरडी व्यतिरिक्त इन्फ्रारेड आणि रमण तंत्रज्ञान कधी वापरावे, हे सांगता येत नाही. साधे प्रश्न विचारून आपण त्यांच्या अज्ञानाची उकल करू शकतो. मुले पदार्थ तयार करतात आणि कॅरॅक्टरायझेशनसाठी दुसऱ्यांकडे देतात. त्यामुळे या प्रक्रियेतील बारकावे त्यांना समजत नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या प्रश्नांची उत्तरे एआय च्या माध्यमातून क्षणार्धात मिळू शकतात, पण तशी जिज्ञासा किंवा मानसिकता मुलांमध्ये नसते. त्यांच्या मेंदूची मशागत तशी झालेली नसते.

सुपर कॅपॅसिटर संशोधनाबाबत बोलायचे झाले, तर तिथे 'पोटॅशियोस्टॅट' हे प्रमुख उपकरण वापरले जाते. पण अनेकांना या उपकरणाची अंतर्गत कार्यपद्धती माहिती नसते. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर बद्दल विचारले तर अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. इनपुट इम्पेडन्स किंवा इलेक्ट्रोकेमिकल स्केल तर दूरची गोष्ट! खरं तर, या उपकरणाद्वारे वेळानुसार व्होल्टेज किंवा करंट मोजला जातो. मुलांना एलएसव्ही आणि सीव्ही मधील साधा फरक माहीत असणे आवश्यक आहे. 'एरिया अंडर कर्व्ह' घेताना तो 'ॲब्सोल्युट' का घ्यायचा किंवा गणितात त्याला 'दोन'ने का भागायचे, यांसारख्या साध्या प्रश्नांची उत्तरेही मुलांना देता येत नाहीत. जीसीडी कर्व्ह सिमेट्रिक असावा का ? हेही त्यांना ठाऊक नसते.

इलेक्ट्रोकेमिकल इम्पेडन्स स्पेक्ट्रोस्कोपी (ईआयएस) हा विषय तर अधिक क्लिष्ट. यातून एसी करंट वाहतो की डीसी? या अभ्यासातून नेमके काय साध्य होते? "कुठलातरी रेजिस्टन्स समजतो," असे मोघम उत्तर मिळते. नेमकेपणाचा अभाव सर्वत्र दिसतो. ही मुले उत्तम 'इम्पॅक्ट फॅक्टर' असलेल्या नियतकालिकात शोधनिबंध प्रकाशित करतात, पण मूलभूत संकल्पनांचे आकलन मात्र शून्य असते. विद्यार्थी किंवा मार्गदर्शक यापैकी कोणालाही याचे सोयरसुतक नसते, कारण दोघांनाही केवळ पेपर्सची संख्या हवी असते.

अलीकडे स्वतःचे प्रकाशित झालेले पेपर्स जसेच्या तसे प्रबंधात चिकटवण्याची पद्धत रूढ झाली आहे. शोधनिबंधाची प्रस्तावना आणि प्रबंधातील प्रकरणाची प्रस्तावना यात तफावत असते. कधीकधी पेपर दुसऱ्याने लिहिलेला असतो आणि प्रबंध विद्यार्थी स्वतः लिहितो, तेव्हा मोठी गडबड उडते. संदर्भांचे क्रमांक, आकृत्यांचे क्रमांक आणि पुनरावृत्ती या चुका तशाच राहतात. यामुळे परीक्षकांचे आणि कमिट्यांचे काम मात्र वाढते.

अर्थात, हे सर्वच विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडते असे नाही, पण बहुतेकांचे हेच वास्तव आहे. याचे मुख्य कारण म्हणजे निष्काळजीपणा आणि व्यवस्थेला गृहीत धरणे. हा लेख कोणाला हिणवण्यासाठी नसून, आत्मपरीक्षणासाठी आहे. आपल्याला माहित नसलेली गोष्ट समजून घेण्याची वृत्ती प्रत्येकाने (माझ्यासकट) जोपासली पाहिजे. 'का' आणि 'कसे' हे प्रश्न विचारले पाहिजेत. फुशारकीमधील अज्ञान दूर झाले, तरच खऱ्या ज्ञाननिर्मितीची कवाडे उघडतील.

वर उल्लेख केलेले 'सुपर कॅपॅसिटर' हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. प्रश्न केवळ एका विशिष्ट उपकरणाचा किंवा एका विषयाचा नाही, तर तो आपल्या एकूणच ज्ञानग्रहणाच्या पद्धतीचा आहे. आज आपण माहितीच्या महापुरात पोहत आहोत, पण ज्ञानाच्या बाबतीत मात्र कोरडे आहोत. याचे मुख्य कारण म्हणजे, आपण 'आपल्याला सर्व काही माहीत आहे' अशा एका आभासी कोषात वावरत असतो.

विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, एखाद्या भांड्यात नवीन द्रव ओतायचा असेल, तर ते आधी रिकामे असावे लागते. तसेच, नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी संशोधकाला आधी स्वतःचे 'अज्ञान' मान्य करावे लागते. जोपर्यंत एखादा विद्यार्थी "मला हे माहित नाही" असे म्हणण्याचे धाडस करत नाही, तोपर्यंत त्याच्यात "हे काय आहे?" आणि "ते कसे कार्य करते?" ही जिज्ञासा जन्म घेत नाही. आपण जेव्हा स्वतःला 'तज्ज्ञ' म्हणवून घेण्याच्या फुशारकीत अडकतो, तेव्हा आपण नवीन काही शिकण्याची दारे स्वतःच बंद करून घेतो.

प्रा केशव राजपुरे 

***

No comments:

Post a Comment

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...