जागतिक शीर्ष संशोधकांच्या यादीत प्राध्यापक डॉ केशव राजपुरे यांना सलग तिसऱ्या वर्षीही स्थान
गेल्या तीन वर्षांपासून अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील अभ्यासकांकडून विविध विषयात संशोधन करणाऱ्या शीर्ष २% संशोधकांची यादी प्रसिद्ध केली जात आहे. यावर्षीच्या यादीत देखील शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आणि बावधन-अनपटवाडी (ता. वाई) गावचे सुपुत्र डॉ केशव यशवंत राजपुरे यांनी आपले नाव टिकवले आहे. अभ्यासकांनी जगातल्या जवळपास एक कोटी संशोधकांच्या संशोधन कार्याचा अभ्यास करून त्यातील २ लाख व्यक्तींची ही यादी प्रसिद्ध केली आहे. अत्याधुनिक सुविधा नसताना देखील प्राप्त सुविधांमध्ये जगातील उच्च कोटीच्या प्रयोगशाळांतील संशोधकांच्या पंक्तीत जाऊन बसणे ही फार मोठी उपलब्धी आहे कारण त्यांचे संशोधन जागतिक दर्जाचे व महत्त्वाच्या प्रश्नांचा वेध घेणार आहे. ते मूळतः प्रामाणिक आणि उत्कृष्ट शिक्षक, त्यातच संशोधनातील ही उत्कृष्टता त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा पुरावा सादर करते. खेड्यातील अतिशय जिद्दी तरुण प्रतिकूल परिस्थितीतून स्वप्नवत यश मिळवत इथपर्यंत मजल मारतो ही इतरांसाठी खूपच प्रेरणादायी गोष्ट आहे.
संशोधकांची गुणवत्ता ठरवण्यासाठी पारंपारिकपणे त्यांच्या एच-इंडेक्सचा वापर केला जाई. वेगवेगळ्या विषयातील संशोधकांची गुणवत्ता ठरवताना ही पद्धत अपुरी पडे. म्हणून स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक जॉन इयोनिदिस व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्कोपस डेटाबेसमधील माहितीचा उपयोग करत संशोधकांचा कोम्पॉसिट इंडिकेटर काढण्याची पद्धत तयार केली व त्याआधारे ते दरवर्षी शीर्ष २% संशोधकांची यादी प्रसिद्ध करतात. ही यादी वार्षिक शीर्ष २% व सार्वकालिन २% अशा दोन प्रकारात जाहीर केली जाते. गेल्या तीन वर्षांपासून डॉ राजपुरे यांचे नाव दोन्ही प्रकारच्या यादीत सातत्याने येत आहे.
गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी संशोधनासाठी व्यतीत केला आहे. ते करत असलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनात खालील क्षेत्रांचा समावेश आहे: विद्युत घट, गॅस सेन्सर, फोटो डिटेक्टर, फोटोकॅटालायसिस, मेमरीस्टर इत्यादींसाठी उपयोगात येणाऱ्या विविध पदार्थांचा अभ्यास. सेमीकंडक्टर व प्रकाश वापरुन पाण्यातील घातक द्रव्यांचे विघटन करणारे फोटोकॅटालायसिस हे त्यांचे विशेष आवडीचे संशोधन क्षेत्र असून या विषयात त्यांनी मोठे संशोधन करून वेळोवेळी ते आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केले आहे. याशिवाय त्यांनी विशेष फोटोकॅटालायटीक पदार्थांचे पेटंट देखील मिळवले आहेत, यावरून त्यांच्या संशोधनाची नविण्यपूर्णता व सामाजिक उपयोजकता दिसून येते. आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ विद्यार्थ्यांनी पीएचडी व दोघांनी एमफीलचे संशोधन पूर्ण केले असून सध्या आठजण पीएचडी करीत आहेत. त्यांनी शैक्षणिक व संशोधन कार्यासोबतच विद्यापीठातील अभ्यासमंडळ चेअरमन, अधिविभागप्रमुख, समन्वयक वगैरे अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी पार पाडली आहे. युसिक-सीएफसीचे प्रमुख असताना त्यांनी अनेक संशोधन सुविधा विद्यापीठात उपलब्ध केल्या. त्या सुविधांचा उपयोग विद्यापीठातील संशोधनाची गुणवत्ता वाढण्यास होत आहे.
सध्या भौतिकशास्त्र अधिविभागात प्रमुख म्हणून कार्यरत असताना विविध संशोधन सुविधा निर्माण करण्यावर त्यांचा भर असून त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या तालमीत तयार झालेले या विभागातील १५० हून अधिक विद्यार्थी युरोप, अमेरिका, जपान तसेच दक्षिण कोरिया सारख्या देशांत प्रतिष्ठित फेलोशिपवर संशोधन करत आहेत. संशोधनातील महत्त्वाकांक्षेच्या बळावर त्यांनी आजवर भरपूर गोष्टी मिळवल्या. केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून निधी मिळवून त्यांनी दर्जेदार संशोधन तर केलंच सोबत त्यातून अनेक वैज्ञानिक उपकरणेही आणली. त्यांच्या प्रत्येक विद्यार्थाचे संशोधन विषय पाहिल्यास त्यात नविण्यापूर्णता जाणवते. शोधनिबंधात नुसते पदार्थांचे गुणधर्म मांडण्याऐवजी त्यात पदार्थांच्या विशिष्ट गुणधर्मामागील विज्ञान उलघडण्यात त्यांचा भर असतो. म्हणूनच त्यांच्या जवळपास २०० शोधनिबंधांना नऊ हजार पेक्षा जास्त उद्धरणे (सायटेशन्स) मिळाली आहेत.
राज्यातील इतर विद्यापीठातील संशोधकांच्या क्रमवारीच्या तुलनेत डॉ राजपूरे यांचे नाव अगदी वरती आहे. ज्ञान म्हणजे कृतीतील माहिती यावर त्यांचा विश्वास आहे आणि ज्ञानी पिढी घडविण्यासाठी ते नेहमी आपल्या स्तरावर सर्वोत्तम प्रयत्न करतात. हे मिळालेलं मानांकन ते त्यांचे आई-वडील, कुटुंबीय, विद्यार्थी, मित्रपरिवार, सकळ पंचक्रोशी ह्या सर्वांच्या वेळोवेळी मिळालेल्या सहकार्य, पाठींबा आणि सदिच्छांचा परिपाक आहे अशी त्यांची धारणा आहे. हि गोष्ट तरुण पिढीला त्यांच्यातील सर्वोत्कृष्टता शोधण्यासाठी आणि ज्ञान निर्मिती प्रक्रियेत सक्रिय रित्या सहभागी होण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल. अशा मानांकनामुळे संशोधनाचा दर्जा खूपच प्रमाणात सुधारला आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील कलागुणांना हे सर्व आपल्या आवाक्यात असल्याचा विश्वास मिळतो.
शब्दांकन - डॉ सुरज मडके
मोबाइल - 8208283069
No comments:
Post a Comment