Wednesday, April 14, 2021

संभाजी शिंदे

  

ध्येयवेडा डॉ संभाजी शिंदे 

आयुष्यात काहीतरी मोठं करून दाखवण्याचं स्वप्न प्रत्येकाने पाहिलेलं असतं. भारतात क्रिकेटर व्हायचं स्वप्न एकदाही पहिलं नाही असा व्यक्ति दुर्मिळ ! गल्लीत सचिन, धोनी, रोहित अशी बिरुदावली लावून उन्हातानाचं क्रिकेट खेळणारी पोरं काळाच्या ओघात मोठी होऊन असे कुठेतरी जातात की त्यांना क्रिकेट खेळायचं सोडून द्या कॉमेंट्री ऐकायलाही वेळ नसतो. प्रत्येकाच स्वप्न पूर्ण होतच असे नाही. कित्येकदा संधी मिळत नाही तर संधी मिळूनही कित्येकदा प्रयत्न अपुरे पडतात. पण प्रामाणिक प्रयत्नाने स्वप्ने सत्यात उतरवली जाऊ शकतात. शेतकरी कुटुंबातील संभाजी शिंदे या युवा संशोधकाची काटेरी वाटेवरची यशोगाथा तरुणांसाठी नक्कीच प्रेरक आहे.

प्रत्येक समर्पित संशोधकाला विश्वाचं कोडं उलघडण्याच वेड लागलेलं असतं. त्यांना विश्वातील प्राणिमात्रांच्या सुखमय जीवनाची स्वप्ने पडतात. चंचुपात्र आणि परीक्षानळीसह प्रयोग करणाऱ्या नव्या संशोधकाला त्याचं संशोधन 'नेचर' मासिकात प्रसिद्ध होण्याचं स्वप्न पडलं नाही तर नवल ! कारण नेचर मासिकात शोधनिबंध प्रसिद्ध होणे म्हणजे नोबेल मिळवण्यापेक्षा कमी नसते. येथे प्रसिद्ध होण्यारे संशोधन अगदी मूलभूत स्वरूपाचे व विज्ञानाला नवे वळण देणारे असते. म्हणूनच नेचरच्या प्रत्येक मासिकाचा 'इम्पॅक्ट फॅक्टर' ४० च्या पुढे असतो. सोप्या शब्दात इम्पॅक्ट फॅक्टर समजून घ्यायचा झाला तर मासिकात प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक शोधनिबंधाची इतर संशोधनकार्यांसाठी उपयोगात आल्याचे दर्शवणारी संख्या ! वेगवेगळ्या देशातून प्रसिद्ध होणाऱ्या संशोधन मासिकांची संख्या लाखाच्या घरात आहे त्यामुळे ४ किंवा ५ हा इम्पॅक्ट फॅक्टरदेखील मोठा मानला जातो.

नुकतंच शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र अधिविभागाचे माजी विद्यार्थी व दक्षिण कोरियातील हनयांग विद्यापीठातील संशोधक डॉ. संभाजी शिवाजी शिंदे यांचे संशोधन 'नेचर एनर्जी' या ४७ इम्पॅक्ट फॅक्टर असलेल्या मासिकात प्रसिद्ध झाले. डॉ. संभाजी व त्यांच्या ग्रुपने प्रसिद्ध केलेले संशोधन स्टोरेज बॅटरीच्या (संचय विद्युतघट) संदर्भात आहे. आज आपण प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये ज्या बॅटऱ्या वापरतो त्यात लिथियम नावाच्या मूलद्रव्याचा वापर होतो. हे मूलद्रव्य कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याची किंमत जास्त आहे तसेच लिथियम बॅटरीची कार्यक्षमता वाढवण्यावरही मर्यादा आहेत त्यामुळे जगातील अनेक संशोधकांनी वेगवेगळी मूलद्रव्ये बॅटरीत वापरण्याच्या शक्यतेवर संशोधन करायला सुरवात केली आहे. झिंक या मूलद्रव्याची उपलब्धता व रासायनिक गुणधर्म पाहता काही संशोधकांनी त्याचा उपयोग बॅटरीत करण्यास सुरुवात केली. अनेक संशोधक प्रयोगशाळेत झिंक बॅटरीचा अभ्यास करण्यात यशस्वी झाले पण त्या बॅटऱ्या बाजारात येतील इतकं त्यावर संशोधन झालं नव्हतं. डॉ. संभाजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी झिंक बॅटरी प्रत्यक्ष वापरात येतील व लवकरच त्या लिथियम बॅटरीची जागा घेतील इथपर्यंतचं संशोधन केलं आहे.

सर्वसाधारणपणे ४००० एमएएच धारण क्षमतेच्या डिसी बॅटरीचा आकार ८ सेमी बाय ५ सेमी बाय १ सेमी असतो. त्यांनी विकसित केलेल्या बॅटरीचा आकार मेमरी कार्ड च्या आकाराचा (३ सेमी बाय १ सेमी बाय ३ मीमी) करून धारण क्षमता ५००० एमएएच पर्यंत वाढवली आहे. ही बॅटरी विस्तृत तापमान पल्ल्यात स्थिर राहून आपली पुनरुत्पादक क्षमता टिकवू शकते. परंपरागत बॅटरीतील सेंद्रिय द्रव इलेक्ट्रोलाईट ऐवजी पाण्यावर आधारित इलेक्ट्रोलाईट वापरल्यामुळे गंज लागून बॅटरी क्षीण होत नाही. सदरच्या अभ्यासानुसार ह्या बॅटऱ्यांचं आयुष्य किमान आठ वर्षे असेल व चार्जिंग-डिस्चार्जिंगच्या बाबतीत ह्या अधिक कार्यक्षम असतील, शिवाय किमतीचा विचार केल्यास लिथियम बॅटरीपेक्षा यांची किंमत किमान १० पट कमी असेल. यावरून आपल्याला या संशोधनाचे महत्त्व लक्षात येईल. आज जेव्हा हे संशोधन जगासमोर आलं तेव्हा या क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या आहेत. कारण डॉ. संभाजी यांच्या ग्रुपने अल्पावधीत मिळवलेले यश पुढच्या काळाला नवे वळण देणारे आहे आणि अर्थातच त्यामागे मोठी तपश्चर्या आहे.

ज्यांनी डॉ. संभाजी यांना शिवाजी विद्यापीठात संशोधन करताना पाहिलंय त्यांच्यासाठी हे यश म्हणजे फक्त कौतुकपात्र आहे, त्यांना याचं आश्चर्य वगैरे नसणार कारण त्यांनी डॉ. संभाजी यांची काम करण्याची पद्धत व चिकाटी पहिली आहे. संशोधनासाठी आवर्तसारणीतील प्रत्येक मूलद्रव्याला स्पर्श केलेला माणूस अशीच त्यांची भौतिकशास्त्र अधिविभागात अजूनही ओळख आहे. पी. एचडी. च्या काळात फोटोकॅटालायसिस, गॅस सेन्सिंग, फोटो डिटेक्टर, सोलार सेल अशा विविध विषयात त्यांनी मोलाचं संशोधन केलं आहे. पी. एचडी. डिग्री मिळवेपर्यंत त्यांच्या नावावर पन्नासपेक्षा अधिक शोधनिबंध होते त्यावरून त्यांची संशोधनाप्रतीची समर्पकता लक्षात येते.

सातारा जिल्यातील फलटण तालुक्यातील बिबी-वडगाव येथील शिवाजी शिंदे यांना संभाजी व अविनाश ही दोन मुलं ! दोघेही अभ्यासात हुशार.. पण घरची परिस्थिती शिक्षणास पोषक नव्हती. क्षूधा शांतीसाठी स्वतःबरोबर मुलांनाही मोलमजुरी करावी लागे.. त्याच वेळेला संभाजीने ठरवले कि आपल्याला यातून बाहेर पडायचं असेल तर शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही.. वडगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत संभाजीचे सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण झाले. तर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण बीबी येथील हायस्कूलमध्ये झाले. अभ्यासात हुशार असूनही शैक्षणिक सुविधा आणि योग्य शैक्षणिक वातावरणाच्या अभावामुळे हे शिक्षण जिकरीने झाले. अशा पार्श्वभूमीवर २००० साली एसएससी च्या परीक्षेत संभाजीने ७५ टक्के गुण मिळवले व आपली गुणवत्ता सिद्ध केली.

विद्वत्ता असूनही घरची आर्थिक परिस्थिती त्याच्या उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी पोषक नव्हती. तरीही अर्धवेळ नोकरी किंवा काहीतरी व्यवस्था करून आपली गुणवत्ता जपण्यासाठी पुढील अभ्यासासाठी त्याने विज्ञान विद्याशाखा निवडण्याचे ठरवले. सातारा येथे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेच्या निकषावर आधारित जेवण व राहण्याची सोय असलेले शासकीय वसतिगृह आहे याची त्याला माहिती मिळाली. त्याने अर्ज केला आणि सुदैवाने त्याला प्रवेश मिळाला. त्या पुढील दोन वर्षे त्यांने प्रामाणिकपणे कठोर परिश्रम करत, पालकांवर कोणताही शैक्षणिक बोजा न लादत रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट सातारा येथे शिक्षण घेतले आणि बारावीच्या परीक्षेत देखील डिस्टिंक्शन मिळवले.

शिक्षण पूर्ण होत होतं.. शैक्षणिक जाणतेपण मिळत होतं.. पण वस्तुस्थिती अशी होती की उदरनिर्वाहासाठी शिक्षण थांबवून नोकरी करणे गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर त्यांन महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचं ठरवलं. वाय सी महाविद्यालयातील मागेल त्याला काम या योजनेद्वारे त्याच्या आर्थिक विवंचनेचा प्रश्न मिटला होता. छोटीमोठी कामे करत, स्वतःचे जेवण स्वतः बनवत व या योजनेचा लाभ घेत त्याने २००५ साली बी.एस्सी. फिजिक्स पदवी ९० टक्के गुण मिळवत पूर्ण केली.

हातात काही नसताना, घरची परिस्थिती बेताची असताना आणि कोणाचाही आधार नसताना संभाजीच्या शिक्षणाच्या वाटा आपोआप चोखाळत गेल्या, मार्ग निघत गेले आणि संभाजी शिकत गेला. ज्ञानी होत घरची गरिबी हटवायची असेल तर शिक्षण थांबता कामा नये ही धारणा कायम ठेवत पुन्हा शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील एम.एस्सी. ची प्रवेश परीक्षा दिली. प्रवेश परीक्षेत गुणवत्तेत येत प्रवेश मिळवला. विद्यापीठात देखील त्याच्या आर्थिक प्रश्नावर मार्ग निघत गेले आणि बघता बघता २००७ साली सॉलीड स्टेट फिजिक्स स्पेशलायझेशन घेवून डिस्टिंक्शन मिळवून संभाजी एम.एस्सी. झाला. वेगळेपणाची आवड असलेल्या संभाजी यांना एम.एस्सी. ला विद्यापीठात आल्यावर भौतिकशास्त्र अधिविभागातील संशोधनसामुग्री जवळून पाहिल्यावर संशोधन करण्यासाठी जीव ओतून द्यावा अशी भावना जागृत झाली नसती तरच आश्चर्य !

एम.एस्सी. नंतर त्याने संशोधक होण्याची स्वप्न पाहण्यास सुरुवात केली आणि ज्ञान जगतात नावीन्यपूर्ण योगदान देण्याचे ठरवले. पुन्हा एकदा आर्थिक तरतुदीचा प्रश्न ऐरणीवर होताच.. पैशाची चिंता होती.. संशोधन सुरू करण्यासाठी संशोधन शिष्यवृत्तीच्या आगमनाची तो वाट पाहत होता.. त्यात एक वर्ष कधी गेल ते त्याला कळलं नाही. त्याच्या सुदैवाने प्रा राजपुरे यांचेकडे डीआरडीओ प्रकल्पाअंतर्गत एक शिष्यवृत्ती उपलब्ध होती. त्यांने या संधीचं सोनं केलं आणि पुढील तीन वर्ष जेआरएफ आणि एसआरएफ या शिष्यवृत्ती अंतर्गत सरांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. तो अधिविभागातील संशोधन संस्कृतीशी एकरूप होऊन कार्य करू लागला. वेगळं काहीतरी करून त्यातील सर्वोत्कृष्ट शोधण्याचा ध्यास त्याच्या ठायी असल्याने त्याला कुठल्याही संशोधन क्षेत्राचं वावडं नव्हतं. वेगवेगळ्या मूलद्रव्यांशी खेळत त्याने वेगवेगळ्या संयुगांना विविध कार्यासाठी उपयुक्त सिद्ध करण्यासोबतच स्वतःलाही संशोधनात सिद्ध केलं. इलेक्ट्रो केमिकल्स मटेरियल रीसर्च लॅबरोटरी (ईसीएमएल) च्या जडणघडणीत संभाजीचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रयोगशाळेतील मूलभूत सुविधा ते प्रकल्पातील सर्व उपकरणे सुस्थितीत ठेवण्यापर्यंत त्याने हिरिरीने भाग घेतला होता. २०१० साली आयोजित केलेल्या विभागाच्या कार्यशाळेचे आयोजन संभाजी मुळे शक्य झाले. २०१२ मध्ये त्याने फोटोकॅटॅलीसीस मध्ये पी.एचडी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

पण डॉक्टरेट डिग्री, पन्नासभर शोधनिबंध, व पराकोटीची प्रतिभा इतकं सारं असूनही त्यांना पुढील संशोधन कार्यासाठी परदेशात सहज संधी मिळाली नाही. वर्षभराच्या प्रयत्नांनंतर त्यांना दक्षिण कोरिया येथील 'क्रिस्स' या संशोधन संस्थेत संशोधनासाठी संधी मिळाली. शिवाजी विद्यापीठात त्यांच्या ज्ञानाचा पाया पक्का झाला होता. त्या मजबूत पायावर आकाशाला भुरळ घालेल असा कळस चढवणे हाच विचार कोरियाला जाताना त्यांच्या मनात होता. क्रिस्स मधील एक वर्षाच्या संशोधनानंतर त्यांना हनयांग विद्यापीठात संशोधनाची संधी मिळाली. सुरवातीला ते पोस्ट डॉक्टरेट फेलो म्हणून तिथे रुजू झाले होते, पण त्यांनी संशोधनात दाखवून दिलेल्या प्रतिभेमुळे तिथेच त्यांना रिसर्च प्रोफेसर म्हणून बढती मिळाली. तिथे ते प्रामुख्याने विद्युतरासायनिक पदार्थांवर संशोधन करतात, सॉलिड स्टेट बॅटरी हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय आहे. त्यातही त्यांचा समाजाच्या मागणीनुसार संशोधनावर भर आहे. त्यांच्या आत्तापर्यंत ११० शोधनिबंध व ४५ पेटंट प्रकाशित झाले आहेत. यातील २० पेटंट्स अलीकडेच नेचर एनर्जी मासिकात प्रकाशित झालेल्या शोध निबंधात समाविष्ट आहेत. त्यांच्याकडचे संशोधन फक्त प्रयोगापर्यंत मर्यादित नसते. एखादे संशोधन समाजातील प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोचवणे ही गोष्ट त्यांच्या संशोधनाच्या केंद्रस्थानी असते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आता केलेलं हे संशोधन लवकरच एखाद्या मोठ्या कंपनीकडून सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं जाईल यात शंका नाही. पुढे झिंक बॅटरीला इलेक्ट्रॉनिक-वेहिकल मध्ये वापरुन त्यांची क्षमता वाढवण्याचे दायित्व त्यांच्या खांद्यावर असेल. त्यातही ते यशस्वी होतील याची खात्री आहे.



 
पुढे त्यांना अनेक यशशिखरे सर करायची आहेत आज प्रसिद्ध झालेलं संशोधन त्यासाठीच्या मार्गातील एक टप्पा आहे. हे संशोधन अनेकांना प्रेरणा देत राहणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागाच्या तालमीत तयार झालेला मल्ल कुठेही कमी पडत नाही हे त्यांनी पुन्हा सिद्ध केलंय. ज्ञानार्जनाचा सततचा ध्यास आणि उत्कृष्टतेसाठी घेतलेले परिश्रमपूर्वक प्रामाणिक प्रयत्न हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. त्यांनी मिळवलेलं ही अद्भुत यश व त्यांचे प्रयत्न तुकोबारायांच्या शब्दात सांगायचं झालं तर; "याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा" असे म्हणता येईल पण हे यश शेवटचे नसावे इथून पुढेही असेच यश मिळवत रहावे याच तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा.

- प्रा केशव राजपुरे, सुरज मडके
 
मूळ पेपर या लिंकवर आहे.
 

11 comments:

  1. Excellent!! Terrific!! Brilliant!! Very inspirational story. Congratulations 🎊🎉

    ReplyDelete
  2. Great work. We are proud of you.

    ReplyDelete
  3. आपल्या वडगाव गावाचं नाव लौकिक केलं आपण अभिनंदन

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. Hearty congratulations to Dr. Sambhaji Shinde and Prof. Rajpure Sir.Its really a great contribution to the society.
    .....Dr. Bharati Balasaheb Patil

    ReplyDelete
  6. प्रेरणादायी...सर

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...