Tuesday, February 1, 2022

स्मृती

 स्मृती चांगली की वाईट ?


'वेळ क्षणभंगुर आहे', 'वेळेचा फायदा घ्या', 'त्याचे मालक व्हा' असं बऱ्याचदा सांगितलं जातं. 'जसजसा वेळ जाईल तसतश्या गोष्टी चांगल्या होत जातील' असं वडीलधारी मंडळी सांगत असतात. पण बऱ्याचदा असंही जाणवतं की माणसांना वेळ जात नाही. एक महिना वर्षाप्रमाणे वाटू लागतो. तर काहींना आठवडा कसा गेला ते कळत नाही, मुलं केव्हा मोठी होतात, वेळ कसा जातो हे समजतही नाही. साधारणपणे असे दिसून येते की वेळ खूप वेगाने धावते.


वेळ झपाट्याने किंवा हळूहळू धावते ही प्रत्येकाची धारणा असते. वास्तवत: शास्त्रीयदृष्ट्या वेळ हा एकाच वेगाने पुढे सरकत असतो. वेळेबाबतची हि समज तुमची स्मरणशक्ती कशी कार्य करते यावर अवलंबून असते. आपणास जर स्मृतीभंश होत असेल तर तुमच्या आयुष्यात वेळ झपाट्याने निघून जाते असे भासते. पण जर स्मरणशक्ती मजबूत असेल तर आपल्या आयुष्यातील आणि सभोवतालच्या गोष्टी आणि घटना अगदी क्रमाने तपशीलवार आठवतील. या घटना आपल्या स्मृतिपटलावरील भरपूर जागा व्यापतील, आपणास दोन घटनांमध्ये बराच काळ लोटला आहे असा भास होईल आणि वेळ हळू हळू जात असल्याची जाणीव होईल. 

प्रथमदर्शनी उत्तम स्मरणशक्ती आपणासाठीची जमेची बाब वाटत असली तरी बऱ्याचदा हीच स्मृती जीवनावर प्रतिकूल परिणाम करत असेल तर ती नसली तरी बरी अशी गत होऊन बसते. 
​​

माणसाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. बहुतेकांनी जीवनात अनेक कठीण प्रसंगांचा आणि दुःखाचा सामना केलेला असतो तसेच अस्तित्वासाठी संघर्ष देखील केलेला असतो. दुर्दैवाने कालांतराने आपण आपल्या आयुष्यातील सुखद प्रसंगाऐवजी फक्त दुःखद प्रसंगच स्मृतीत ठेवतो. हे प्रसंग स्मृतीपटलावर खोलवर कोरलेले असतात. त्या संघर्षाच्या काळात तुम्ही इतके सोशिक असता की तेव्हा मनमोकळेपणाने व्यक्त होता आलं नसल्याने मनाच्या प्रचंड दडपणात असता आणि हे दडपण उतारवयात आपण सहन करू शकत नाही. या वयात जर तुमची स्मरणशक्ती चांगली असेल तर या सर्व घटना तुम्हाला त्रास द्यायला वारंवार समोर येतात. वावरत असताना आपण भूतकाळ आठवत नसलो तरी ही त्रासदायक विचार प्रक्रिया पडद्याआडून मनःपटलावर अविरत चालू असते. यामुळे आपण कायम व्यस्त असता. ही व्यस्तता आपल्याला निश्चिंत जीवन जगताना अडथळा निर्माण करते. येथे शक्तिशाली स्मृती आपली शत्रु बनते. न पेलता आलेला तणाव आपणास मनाच्या विकृत अवस्थेकडे ढकलतो. पर्यायाने पुढे जाऊन आपण या सुंदर जीवनाचा तिरस्कार करू लागतो. 

या संकटातून बाहेर पडण्यासाठी मग माणूस विचार करू लागतो की आता करायचं काय ? प्रत्येकजण आपापल्या धारणेनुसार यावर पर्याय सुचवत असतात आणि माणूस ते सर्व पर्याय करून बघतो. यासाठी काही तात्पुरते इलाज आहेत परंतु ते कायमस्वरूपी उपाय नाहीत. मग यावर वैद्यकीय उपचारांचा देखील आधार घेतला जातो. वैद्यकीय उपचारांचा मुख्य हेतू शरीरात होणाऱ्या जैवरासायनिक प्रक्रियांना उलट करणे हा असतो. या प्रक्रिया म्हणजे आपल्या तीव्र स्मरणशक्तीचा थेट परिणाम असतो. ही उपचारपद्धती तात्काळ गुण देणारी असली तरी त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत. उत्तम स्मृती असणे आणि उतारवयात पर्यंत ती टिकणे हे चांगली बाब आहेच. पण हीच स्मृती जर आपल्या अशांततेच तसेच उदासिनतेचे कारण बनत असेल तर माणूस स्मृतीपटलावर लिहिलेल्या गोष्टी नष्ट कशा करता येतात या गोष्टीचा विचार करू लागतो. 

अशा त्रासदायक परिस्थितीत आपल्या हातात एकच गोष्ट उरते ती म्हणजे या स्मृतीस दिला जाणारा योग्य प्रतिसाद ! अध्यात्मिकता किंवा संवेदना जपल्याने आपण या स्मृतीस योग्य प्रकारे हाताळू शकतो. त्यासाठी आपण 'दैवी आणि अमर्याद विश्वाचे सुक्ष्म घटक आहोत' तसेच 'माणूस असण्यापलीकडे सचेतन व काहीतरी अधिक आहोत' हे समजणे गरजेचे आहे. ही गोष्ट समजायला कठीण असली तरी जीवन आणि प्रसंगाकडे तटस्थपणे बघायला शिकलो तर काळ किंवा वेळेची सापेक्षता जाणवणार नाही हे मात्र नक्की. स्मृतीत जगणं म्हणजे भूतकाळात जगणं.. माणूस जर भूतकाळ आणि भविष्यकाळात जगत असेल तर तो त्याच्या अस्वस्थतेचं कारण बनतो. म्हणून माणसाने वर्तमानात जगावे. जगत असताना स्मृति सारख्या गोष्टी आपल्याला कायम टाळता येणार नाहीत पण त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय असेल हे मात्र आपण ठरवू शकतो.

स्मृती माणसाला दु:खी नाहीतर सूज्ञ बनवते. बदलणार्‍या जगातील आनंदी किंवा दुःखी घटनांची स्मृती अमर्याद स्वत्वाला दाबून ठेवते. आपण यात जखडले जातो. आपल्या स्वत्वाची स्मृती तुमची जागरूकता वाढविते आणि तिला समृद्ध करते. क्षुल्लक गोष्टींचे विस्मरण हा परमानंद आहे. घटनांचे अशाश्वत स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. भूतकाळातील घटना वर्तमानात अस्तित्वात नसतात हे ध्यानात घ्यावे. भूतकाळाचा स्वीकार करून सोडून द्यायला शिकायला हवे. नि:पक्षपाती व अंतर्मुख व्हावे तरच डोईजड वाटणारी स्मृती वरदान वाटेल.

- केशव राजपुरे

2 comments:

  1. वेळ आणि स्मृती यांचा सुरेख मिलाफ.
    मनुष्य हा संवेदनशील प्राणी..
    खरे तर स्मृतीपटलावर स्मृती उमटणे हे मनुष्याचे जिवंतपणाचे लक्षण.अर्थात त्या स्मृती चांगल्या कि वाईट हे आपण त्यांना किती सहजपणे स्वीकारतोय यावर अवलंबून असेल आणि यावरच त्यांनी आपण सुखी अथवा दुःखी होऊ हे अवलंबून असेल.खरे तर भूतकाळाला पाठीवर टाकून भविष्याचा वेध घेत वर्तमानात रमले पाहिजे. तर आणि तरच मनुष्य जीवन सुखदायी होईल.
    अंतर्मुख करायला लावणारे लिखाण खूपच मार्मिक...

    ReplyDelete
  2. Some memories are painful but we learn from them.
    They help guide us to make better decisions.
    We remember negative experiences over positive experiences
    We tend to notice the negative more than the positive.
    But I think positive memories keep on giving us happiness so let's remember them and be happy and learn from bad memories and avoid doing such mistakes. Sir, you have explained in very nice ways.Thankyou sir.

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...