Saturday, July 5, 2025

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अनास्था

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीची कारणे
आजकाल महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती लक्षणीयरित्या कमी झाली आहे, हे एक कटू सत्य आहे. यावर शासन, प्रसारमाध्यमे आणि इतर घटक विविध पातळ्यांवर विचारमंथन करत आहेत. या समस्येचे मूळ खाजगी शिकवण्या (कोचिंग क्लासेस) आणि 'डमी महाविद्यालये' यांच्या वाढत्या प्राबल्यात आहे. ही व्यवस्था विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, मूल्ये आणि विचारक्षमता विकसित करण्याऐवजी त्यांना केवळ गुण मिळवणारे 'शर्यतीचे घोडे' बनवण्यात व्यस्त आहे. यावर कोणाचाही अंकुश नसल्याने, 'काहीतरी तोडगा निघेल' किंवा 'परिस्थिती पूर्वपदावर येईल' अशा गृहीतकांवर सर्वजण मूग गिळून गप्प आहेत.

या समस्येकडे बारकाईने पाहिल्यास असे दिसते की, सध्या पालक आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. दुर्दैवाने, जर काही इयत्ता वगळून थेट बारावी पास होता आले असते, तर त्यांनी तोही पर्याय निवडला असता. बारावीतील गुणांपेक्षा अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा आयआयटी प्रवेश परीक्षांमधील गुणांना अधिक महत्त्व दिले जाते. या बहुपर्यायी परीक्षांमध्ये गणिताची आकडेमोड महत्त्वाची असल्याने, मुलांना विषयज्ञान किती आहे यापेक्षा जास्त गुण कसे मिळवायचे याचे तंत्र शिकण्यावर भर दिला जातो. अशी मुले पुढे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमात कशीबशी उत्तीर्ण होतात आणि त्यांचे लक्ष केवळ 'कॅम्पस सिलेक्शन' आणि चांगल्या 'पॅकेज'वर असते. झटपट शिक्षण, झटपट नोकरी आणि झटपट स्थैर्य मिळवणे हेच त्यांचे लक्ष्य असते. या धावपळीत, या शिक्षणरूपी नाटकात प्रत्येकजण आपापली भूमिका बजावण्याचा प्रयत्न करतो, परंतु दुर्दैवाने अनेकजण आपल्या भूमिकेला योग्य न्याय देत नाहीत.

अशा परिस्थितीत, खऱ्या अर्थाने ज्ञाननिर्मिती, मूल्यशिक्षण किंवा मानवजातीच्या विकासासाठी स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवू इच्छिणारे विद्यार्थी गोंधळून जातात. त्यांना झटपट स्थैर्य आणि ज्ञाननिर्मिती असे दोन मार्ग दिसतात. प्रतिकूल परिस्थितीतून आलेले ज्ञाननिर्मितीचा विचार करणारे विद्यार्थी स्वतःची तुलना स्थिरस्थावर असलेल्या मित्रांशी करतात. गरिबी आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून ते पारंपरिक शिक्षण किती दिवस घेणार? अशा वेळी त्यांनाही व्यावहारिक विचार करावा लागतो आणि नाइलाजाने झटपट पैसा मिळवण्याच्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. घरातूनही 'काय शिकून उपयोग?' किंवा 'काहीतरी कोर्स कर म्हणजे लगेच जॉब लागेल' असे सल्ले दिले जातात. मुलीही मर्यादित शिक्षण घेऊन लग्नानंतर चूल आणि मूल यात अडकतात, ज्यामुळे त्यांचे शिक्षण पुढे सरकत नाही.

विद्यार्थी महाविद्यालयात न येण्याची आणखी काही कारणे आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे विद्यार्थी संख्या वाढत असली तरी, गल्लीबोळात निर्माण झालेल्या अभियांत्रिकी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमुळे विद्यार्थी संख्या रोडावल्यासारखी वाटते. अनेक विद्यार्थी अर्धवेळ नोकरी किंवा इतर तांत्रिक कोर्सेसमध्ये गुंतलेले असतात, त्यामुळे वर्गात उपस्थित राहणारे विद्यार्थी कमीच असतात.

माझ्या वैयक्तिक मतानुसार, वर्गातील विद्यार्थी संख्या कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे प्रेरणा देणारे, तळमळीने शिकवणारे आणि गुणवत्ताधारक शिक्षक कमी झाले आहेत. असे शिक्षक हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच उरले आहेत, काही महाविद्यालये याला अपवाद असू शकतात. विषयात आणि शिकण्यात रुची निर्माण करणारे शिक्षक कमी झाले आहेत. पूर्वी शिक्षकांचे पगार कमी असतानाही माणसे तन्मयतेने विद्यार्थी घडवण्यासाठी समर्पित असत. परंतु, जसजसे पगार वाढले, तसतसे ऐषारामी जीवनशैलीकडे ओढा वाढला. घर बांधण्यासाठी निवृत्तीची वाट पाहण्याऐवजी आता काही वर्षांतच गाडी-बंगला साध्य होतो. यामुळे जबाबदारीची जाणीव कमी झाली आहे. 'समर्पण दिले नाही तर भरती होणार नाही' किंवा 'वरिष्ठ विचारणा करतील' अशी भीती राहिली नाही. एखाद्या अधिकाऱ्याने विचारणा केलीच, तर संघटनांच्या कुबड्या आहेतच, त्यामुळे माणसे कामाशी अप्रामाणिक राहिली आहेत की काय, अशी शंका येते. वर्गावर न जाणे, लवकर अभ्यासक्रम संपवणे किंवा तासिका तत्त्वावरील शिक्षकांना आपला वर्कलोड देणे, यामुळे शिक्षक वर्गात कसे येणार?

याशिवाय, शासन स्तरावर आणि इतर शिखर संस्थांकडून प्रामाणिक शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर कामांमध्ये गुंतवले जाते. काही शिक्षक तर अशा कामांमध्ये इतके जुंपलेले असतात की त्यांना रात्री उशिरापर्यंत महाविद्यालयात थांबावे लागते. अर्थात, काही शिक्षकांना अशा प्रकल्पांमध्ये किंवा शिकवण्याव्यतिरिक्तच्या कामांमध्येच अधिक रुची असते, त्यामुळे ते तास घेण्याकडे लक्ष देत नाहीत.

अशा परिस्थितीत, जे शिक्षक तास घेतात ते जर गुणवत्ताधारक नसतील, तर विद्यार्थी वर्गात येणे टाळतात आणि नोट्सवर विसंबून थेट परीक्षेस येतात. हल्ली बाजारात स्वस्त भाजी मिळते तिथे जाण्याचा कल वाढला आहे, त्याच धर्तीवर ज्या महाविद्यालयांमध्ये उपस्थितीची गरज नसतानाही थेट परीक्षेत बसण्याची परवानगी मिळते, तिकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढलेला दिसतो. यामुळे सर्व प्रकारचे वर्ग ओस पडलेले आहेत.

इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे मुलांना माहिती, पुस्तके, व्हिडिओ इत्यादींची तात्काळ उपलब्धता झाली आहे. यामुळे विद्यार्थी-शिक्षक संवाद कमी होऊ लागला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची प्राथमिक उत्तरे लगेच इंटरनेटवर मिळत असल्याने, ते शिक्षकांकडे किंवा पर्यायाने वर्गाकडे कशाला वळतील? तसेच, यामुळे वर्गातील उपक्रम किंवा गृहपाठासाठी अभ्यास करण्याची गरज वाटत नाही. आता तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या सगळ्यांचा कळस आहे, ज्यामुळे मुले त्यांच्या बुद्धीचा वापर करत नाहीत किंवा बुद्धीला चालना देत नाहीत. इंटरनेट जगाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध असल्यामुळे त्यांना वर्गात जाण्याची आवश्यकता वाटत नाही.

वेगवेगळ्या कोर्सेसचे अभ्यासक्रम अद्ययावत करणे आवश्यक आहे. हे अभ्यासक्रम शिकणे महत्त्वाचे असले तरी, विद्यार्थ्यांच्या करिअर घडवण्याच्या दृष्टीने उपयुक्त असणारे नवीन अभ्यासक्रम वेळोवेळी समाविष्ट केले पाहिजेत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये (NEP) ऑन-जॉब ट्रेनिंग, भारतीय भाषा पद्धती आणि इतर अनेक विषयांचा समावेश असला तरी, त्याची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात आणि त्याच वेळी पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतात, ज्यामुळे ते वर्गात येऊ शकत नाहीत.

गैर पद्धतीने नियुक्त केलेले शिक्षक फारच उर्मट आणि संस्थेस गृहीत धरून राजरोसपणे आपले हक्क बजावताना दिसतात. त्यांनी लेक्चर घेतले नाही तरी त्यांना कोणी विचारत नाही. 'पगार माझा हक्काचा आहे आणि तो मी महिन्यासाठी घेणारच' या धारणेने ते महाविद्यालयात येतात. त्यांनी क्लास घेतला की नाही हे विचारण्याचे धाडस कोण करणार?

नशीब आपली परीक्षा पद्धती आणि मूल्यांकन पद्धती अमेरिका किंवा इंग्लंडसारखी नाही. त्या ठिकाणी विद्यार्थ्याला पाठांतरावर आधारित मूल्यांकन केले जात नाही, तर त्याची बुद्धी वापरून त्याची वैचारिक क्षमता तपासण्याच्या दृष्टीने परीक्षा पद्धती तयार केलेली असते. इथे तसे झाले, तर मुले प्रवेशच घेणार नाहीत.

हल्ली सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार फोफावलेला आहे. 'आता काहीही अशक्य राहिले नाही' अशी सर्वांची धारणा झाली आहे. 'पैसा फेको, तमाशा देखो' असे झाले आहे. त्यामुळे 'शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही' हा विचारच मागासलेला वाटतो. मग मुले केवळ पदवी असावी म्हणून शिकतात आणि कशाबाबतच गंभीर राहत नाहीत, मग शिक्षकही त्याच अवस्थेत...

एक ना दोन अशी अनेक कारणे देता येतील. या सर्व गोष्टींसाठी फक्त शिक्षक किंवा फक्त विद्यार्थी जबाबदार आहेत असे माझे मत नाही. आपली शिक्षण व्यवस्था आणि समाज व्यवस्था या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे असे म्हणणे धाडसाचे होईल, परंतु यामध्ये जे काही 'लूपहोल्स' आहेत आणि वाढत्या जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर खरोखरच या सगळ्या गोष्टींमध्ये अमुलाग्र बदल होणे आवश्यक वाटते. भविष्यात काय होईल याचा आता तरी अंदाज बांधणे अशक्य आहे. 'जो भी होगा देखा जायेगा'. तसे बघितले तर भारत हा सर्वसमावेशक देश आहे. भारतामध्ये 'युनिटी इन डायव्हर्सिटी' असल्यामुळे अशी कित्येक वादळे, कित्येक संकटे आली तरी या समुदायांमध्ये 'ऑटोक्युअर मेकॅनिझम' आहे. यावरही काहीतरी तोडगा निघेल अशी आशा करूया.

प्रा केशव राजपुरे 

11 comments:

  1. सत्य परिस्थिती मांडलीय सर तुम्ही

    ReplyDelete
  2. सत्य परिस्थिती वर आधारित लेख याच्यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा करूया 👍

    ReplyDelete
  3. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेला भेडसावणाऱ्या समस्येचे खूप छान विश्लेषण केले आहे सर आपण. माझ्या मते विद्यार्थ्यांना प्रवेश वाढीसाठी दिली जाणारी आमिषे, परीक्षा पास होण्यासाठी सहज उपलब्ध असणारे गैरमार्ग, कमीत कमी कष्टात पदवी मिळवण्यासाठी ची धडपड, गुणवत्तापूर्ण शिक्षणापेक्षा शॉर्टकट शिक्षणाकडे कल, व्यवसायात कमी वर्षांमध्ये जास्त पैसा मिळतो आणि शिकून वर्षे वाया जातात अश्या भावनेतून शिक्षणाबद्दल कमी झालेली आस्था, वाढते वय, तसेच शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा ताण, नोकरीत कायम होण्याचा दबाव आणि गैरमार्ग यातून आलेली निष्क्रियता इत्यादी अनेक कारणे या समस्येच्या मुळाशी असू शकतात.
    --अनिकेत भोसले (जि. प. शाळा, म्हसवे)

    ReplyDelete
  4. सर आपण अतिशय अभ्यासपूर्ण व वास्तववादि मांडणी केलेली आहे. सकारात्मक बदलासाठी आपण सर्वानी मिळून सुरुवात करूया....

    ReplyDelete
  5. अगदी योग्य विश्लेषण आहे सर. फार गोंधळाची स्थिती आहे. बदल घडेल अशी अपेक्षा करू या

    ReplyDelete
  6. खरी वस्तुस्थिती आहे..

    ReplyDelete
  7. That's true situation of our education system...need some grass root level reformations in near future.......

    ReplyDelete
  8. प्रिय मित्र केशव खूप छान आणि सविस्तर लेख लिहिला आहे. आज मी ही गेली 31 वर्ष शिक्षण क्षेत्रात आहे, मी उच्च माध्यमिक ला आहे. माझं कॉलेज वरिष्ठ महाविद्यालयास जोडलेले आहे. ज्यु कॉलेज ला विज्ञान ला जवळपास 200च्या वर विद्यार्थी संख्या आहे पण वरिष्ठ महाविद्यालयात त्यातील 50% विद्यार्थी सुद्धा ऍडमिशन घेत नाहीत.. त्या मागील तू मांडलेली कारणे योग्य वाटतात. पगार घ्या पण त्या पगाराची जाणीव ठेवून, कर्म सिद्धांतावर विश्वास ठेवून शिक्षक वागले तर शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती बदलू शकते. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.🙏.B. Sc., M. Sc होऊन नोकरी नाही.

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...