Total Pageviews

Friday, April 17, 2020

दिलीप आनंदराव अनपट

संघर्षाचे दुसरे नाव दिलीप
(दिलीप झाला दिलीप शेठ)

घरात अठरा विश्व दारिद्र्य, वडील परागंदा, कुटुंबाची जबाबदारी आईच्या मोलमजुरीवर.. अशा खडतर परिस्थितीत मार्ग काढून स्वकष्टाने जीवन मार्ग बदलून, शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करणारे, आमचे मित्र लघुउद्योजक श्री दिलीप आनंदराव अनपट अर्थात बापू यांचा प्रेरणादायी जीवन संघर्ष आज आपणा समोर मांडतोय.

बयाजी मुकिंदा अनपट यांना यशवंत, आनंदराव, बळवंत व हनुमंत ही चार आपत्य ! आनंदराव यांचा स्वातंत्र्यपूर्वकाळात साधारण १९३० चा जन्म ! स्वातंत्र्यानंतर आनंदराव भारतीय सैन्यदलात दाखल झाले. १९६२ च्या भारत-चीन युद्धाचा ते भाग होते. त्यांना थोरला भिकू आणि धाकला दिलीप ही दोन अपत्य ! दिलीप चा जन्मदिनांक १५/११/१९६६. दिलीप सहा वर्षांचा असताना त्यांचे वडील युद्धाच्या भितीने तसेच अविचाराने कुटुंबाला वाऱ्यावर सोडून परागंदा झाले. आठ वर्षांनी परत घरी आले पण पुढे आजारात १९७३ ला त्यांचे देहावसान झाले. तेव्हा भिकू नाना सहावीला तर दिलीप अजून शाळेत जायचा होता. अचानक ओढावलेल्या गरिबीने दिलीपची आई यमुना काकी यांना चरितार्थ चालवण्यासाठी मोलमजुरी करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

अशा हालाखीच्या परिस्थितीत दिलीपचा शिक्षण प्रवास सुरू झाला. शिक्षण कसलं... अस्तित्वाची लढाई ती !  कोदे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली १९७५ ते १९७८ दरम्यान अनपटवाडी येथील प्राथमिक शाळेत त्याने पहिली ते तिसरी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. भिकू नाना यांनी दिलीपच्या शिक्षणावर जातीने लक्ष दिले होते. नंतर चौथी ते सातवी दरम्यानचे शिक्षण बावधन येतील प्राथमिक शाळा क्रमांक एक मध्ये पूर्ण केले. 

तो त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा होता. पैशाअभावी दोन्ही भाऊ पुढील शिक्षण घेऊ शकत नव्हते. म्हणून त्यांना तेव्हा जगण्यासाठी स्त्रोत मिळवण्यासाठी आईस मदत करावीच लागत होती. त्या कोवळ्या वयात त्याने शेतातील कामे, घर कामावर बिगारी तसेच विहीर खोदायची कामे केली होती. त्याचे वाईतील मावस भाऊ चंद्रकांत जायगुडे, वाडीतील हिंदा बापू, नारायण नाना, घाडगे मामा यांच्यासोबत पंचक्रोशीत तसेच तालुक्यात इतरत्र ही कामे त्या वयात केली. उडतारे, लोहारे, केंजळ या गावातून मजुरी करून दिवसा बारा रुपये हजेरीवर काम केल्याचे त्यांच्या कायम स्मरणात आहे. त्याने चौधरी आणि माळ्याच्या विहिरीच्या खोदाईवर पंधरा रुपये हजेरीवर काम केलेले आहे.

आयुष्याच्या या टप्प्यावर तो जगण्यासाठी हातपाय हलवावेच लागणार हा फार मोठा धडा शिकला. त्यांचे इतर मित्र मात्र अभ्यासात मग्न होते. दिलीप त्याच्या आयुष्याची तुलना मित्रांच्या आयुष्याशी करण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेव्हा इतरांसाठी शिक्षण तर दिलीपसाठी कठोर परिश्रम ही प्राथमिकता होती. कोवळ्या वयातील त्या कष्टांनी त्याचे आयुष्यच बदलून गेले. त्याचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. निव्वळ आपल्या भावाच्या समाधानासाठी तो शिकत गेला. शेवटी व्हायचे तेच झाले. तो सातवीच्या केंद्र परीक्षेत आयुष्यात पहिल्यांदाच नापास झाला. मग त्याच वर्गात पुन्हा एक वर्ष काढून दुसऱ्या प्रयत्नात दिलीप केंद्र परीक्षा उत्तीर्ण झाला. पुढे मग पुढील शिक्षण बावधन हायस्कूल मध्ये..

दरम्यान १९८२ मध्ये बंधू भिकू नाना बीईएसटी बस वाहक म्हणून रुजू झाले. पैशाच्या स्त्रोताचा प्रश्न मिटला होता. नानांनी दिलीपला शिक्षणावर लक्ष केंद्रित करायला सांगितले. दरम्यानच्या काळात वाडीतील छप्पर वजा झोपडी काढून मजबूत घर बांधत होते (१९८४). पण परत एकदा आयुष्याने त्याच रूप त्यांना दाखवलं. दुर्देवाने चुकीच्या आरोपामुळे भिकू नाना यांना नोकरीवरून निलंबित केले गेले. घर अर्धवट राहिल नाही कारण कंत्राटदाराने पत्रा खरेदीसाठी हातभार लावला. पण परत संघर्ष वाट्याला ! या आपत्तीमुळे दिलीप निराश झाला. अभ्यास आणि शिक्षण एव्हाना त्याच्यापासून फारच दूर गेले होते. पुन्हा एकदा दिलीप आठवीत सलग पुढच्या वर्गात अनुत्तीर्ण झाला. भिकू नानाने दिलीपला आत्मविश्वास दिला आणि प्रामाणिकपणे अभ्यास सुरू ठेवण्यास सुचवले. यादरम्यान मीही त्याच्या संपर्कात आलो. तसं बघितलं तर आम्ही समदुखी.. माझ्या घरी वीज नव्हती त्यामुळे रात्रीचा अभ्यास नाही, मग संध्याकाळी दिलीपच्या घरी वीज असलेने अभ्यास त्याच्यासोबत लाईट मध्ये! पण दिवसभर मोलमजुरीची कामे केल्याने दिलीपला कंटाळा येई व त्यामुळे माझ्याबरोबर अभ्यास क्वचितच करी. त्याच्या घरातील वीज सुविधा मी पूर्णपणे वापरली पण तो मात्र अभ्यासाविना भविष्य अंधारात ठेवलेला. अपुरा अभ्यास आणि गुणवत्तेच्या अभावाने १९८७ मध्ये दहावीच्या बोर्ड परीक्षेत आणखी एका अपयशाला त्यास सामोरे जावे लागले. तो दहावी नापास झाला कारण त्याचा संघर्ष अजून संपला नव्हता. 

१९८८ मध्ये शाळेचा नाद सोडून कमाई करण्यासाठी मुंबईला बंधू भिकू नाना यांच्याकडे गेला. तेव्हा नाना कुर्ल्यात राहून रस्त्यावर भाजीपाल्याचा व्यवसाय करीत. दिलीपने या धंद्यात पडू नये हे नानाचे मत.. मग मनू घाडगे यांचे मित्र माणिक यांनी दिलीपला एका छपाई कारखान्यात महिना २७५ रुपयांच्या नोकरीवर जोडून दिले. यादरम्यान दिलीप कुर्ल्यात राहत असे पण खोलीत पुरेशी जागा नसल्याने फुटपाथवर झोपत असे. मुंबईत जाऊनही ससेहोलपट थांबली नव्हती. कसेबसे दिड वर्षे या नोकरीत काढल्यानंतर त्यांचे वर्गमित्र अनिल अनपट यांनी त्यांची नोकरीतील अडचण दूर केली.

अनिल ने दिलीप ला मोहम्मद अली रोडवरील मिनरा मशिदीसमोर कॉस्मो गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरी मिळवून दिली (८ फेब्रुवारी १९८९). तेव्हा तिथे त्याला साडेचारशे रुपये पगार होता. दरम्यान २२ फेब्रुवारी १९९२ ला त्यांचा चाफळ येथील लतिका पाटील यांच्याशी विवाह झाला. त्यांना दिपाली आणि दिपेश ही दोन मुलं ! दिपालीने गणित विषयात बीएस्सी पूर्ण करून जर्मन भाषेचा अभ्यास देखील पूर्ण केला आहे. गेली तीन वर्षे झालं ती अंधेरी येथील गिब्बस हेल्थकेअर सोल्युशन्स कंपनीत कार्यरत आहे. अलीकडेच तिचं लग्न झालं आहे. दिपेश ने बारावी पूर्ण केली असून वडिलांना व्यवसायात मदत करीत आहे. 

वहिनिंनी आपल्या दोन्ही मुलांना शिक्षण देण्यात पूर्णपणे योगदान दिले आहेच. म्हणूनच दिलीप संसाराबाबतीत पूर्णपणे पत्नीवर विसंबून राहून निर्धास्तपणे आयुष्यातील अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करू शकला. असं मानलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. दिलीपच्या बाबतीत प्रत्येक परीक्षेच्या समयी मदतीस धावून येणारी त्याची अर्धांगिनी पत्नीरुपी दुर्गामाता आहे. दिलीप स्वतः जरी शिकू शकला नसला तरी आपल्या मुलांना साक्षर करण्यासाठी वहिनींच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. 

१९९४ मध्ये दिलीप आपल्या कुटुंबास मुंबईत घेऊन आला. सुरुवातीला कुर्ला येथे एक वर्ष भाड्याच्या खोलीत ते राहत होते. दरम्यान नानानी बीईएसटी विरुद्धचा साडेआठ वर्षांचा लढा जिंकून परत वाहक सेवा सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी शांतीनगर ला एक घर विकत घेतले आणि कुटुंब तिकडे हलवले. १९९७ मध्ये त्यांनी हजूरी येथे आणखीन एक घर विकत घेतले. दरम्यान १९९७ मध्ये नानांचे दुसरे लग्न करून दिले. त्यांना अश्विनी व आशिष ही दोन मुलं. यानंतर मात्र दिलीपच्या आयुष्यातील अवघड टप्पा आला. नानांच्या आजारपणाचा काळ ! जवळजवळ नऊ महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते पण ऑगस्ट २००३ मध्ये सर्वतोपरी प्रयत्न करूनही नानाने या जगाचा निरोप घेतला. खूप मोठा आधार गेला होता.. त्यात कुटुंबाच्या जबाबदारीच दडपण.. हा दिलीपच्या आयुष्याचा अतिशय निराशेचा काळ होता ज्यावेळी तो पूर्णपणे हादरला होता. 

या कठीण परिस्थितीत पत्नी लतिका वहिनी यांनी त्याला केलेली सर्वतोपरी मदत आणि दिलेला आधार खूपच महत्त्वाचा होता. तेव्हा त्यांनी दिलेले समर्पण निव्वळ अमूल्य आहे. पतीच्या संघर्षात खांद्याला खांदा लावून त्यांनी समर्थन दिले आहे. ही त्यांच्याकडील दिलीप साठी निर्णायक मदत होती. या काळात मित्र अनिल व हनुमंत यांनीही दिलीपला पूर्णपणे समर्थन देऊन संरक्षणही दिले. विचारांमध्ये सकारात्मकता ठेवून दिलीप या परिस्थितीतूनही बाहेर आला. 

दिलीपने नानांच्या कुटुंबास संपूर्ण आधार दिला, मुलांना साक्षर केले तसेच त्याच्या मुलीचे लग्न देखील केले. या परिस्थितीत त्यांची दोन्ही मुलं मुंबई येथे दिलीपकडेच शिकायला होती. आपल्या दोन मुलांबरोबरच दिराच्या दोन मुलांचे संगोपन करून त्यांना शिक्षण देण्याचं महतकठीण काम वहिनींन केलं. हे करण्यासाठीचे व्यापक विचार व माणुसकी वहिनी नी जपलेली आहे. जरी संघर्षाच्या या लढाईत दिलीप एका मोर्चावर लढत देत होता तरी संसाराच्या मोर्चावर वहिनी तितक्याच झगडत होत्या व समर्पण देत होत्या.

२०१५ मध्ये त्याच्या आयुष्याने अनपेक्षित वळण घेतले. मशिद बंदर येथे एक तर वाशी येथे दुसरी अशा त्यांच्या कंपनीच्या दोन शाखा होत्या. २०१५ दरम्यान दिलीपला वाशी शाखेत हलवण्यात आले. दुर्देवाने मालकाने त्यांना अपेक्षित वागणूक न दिल्याने त्याला सव्वीस वर्षांच्या अखंड सेवेनंतर कॉस्मो गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनी सोडण्याचा दुर्दैवी निर्णय घ्यावा लागला. पुन्हा एकदा जीवनात संघर्ष ! मग दिलीपने वाशी येथे स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पण यासाठी आवश्यक निधी उभारण्याचा प्रश्न अनुत्तरित होता. अनिल भाऊ, राजू मांढरे आणि हनुमंत मांढरे यांनी त्याचे कार्यालय सुरू करण्यास समयसुचक आर्थिक मदत केली. मार्च २०१५ मध्ये दिपेश रोडलाईन्स नावाची ट्रक टर्मिनल बिल्डींग वाशी येथे दिलीपची स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी अस्तित्वात आली. तेव्हापासून आजतागायत त्याची कंपनी कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत आहे व या व्यवसायात पत टिकवून आहे. 

दिपेश दिलीपच्या व्यवसायात मदत करत आहेच. त्याबरोबरच दिपेशने मित्र संजीव गुप्ता यांच्या भागीदारीत त्याच इमारतीत श्री गणेश रोड कॅरिअर नावाची ट्रान्सपोर्ट व्यवसायातील आणखीन एक फर्म सुरू केली आहे. याही कंपनीची उत्तम वाटचाल सुरू आहे. मोलमजुरी पासून सुरुवात करून दिलीपने ट्रांसपोर्ट व्यवसायात उच्च स्थान मिळवले आहे ते निरंतर प्रामाणिक व कष्टमय प्रयत्नांमुळेच ! तो आता एक रेगुलर आयकर दाता झाला आहे ही गोष्टच त्याच्या यशस्वितेची पोहोच आहे. दिलीपच्या इथपर्यंतच्या प्रवासाचे परीक्षण केले तर असे लक्षात येईल की त्यांनी खूप मोठा आणि खडतर प्रवास केला आहे. 

एक वेळ तर अशी होती की वडीलांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबास घराबाहेर हाकलून दिले होते. गावातच त्यांच्या नातलगांच्या घराबाहेरील गोठ्याच्या जागेत ते राहिले होते. तेव्हा दिलीप अतिशय लहान होता. नातेवाईकही त्यांच्या त्या परिस्थितीत त्यांना पुढे आधार देण्यास तयार नव्हते. काही काळानंतर तेही त्यांचा द्वेष करु लागले आणि त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की दिलीपने त्यांचे घर सोडून जावे. पण दिलीप ची आई खूपच खंबीर होती. घरात नवरा नसताना दोन मुलांचा घरची कामे, शेतातील कामे, वाकळा शिवणे, पाझर तलावावर मजुरी करून सांभाळ केला आणि संघर्षमय प्रवास सुरू ठेवला. त्यावेळी त्यांचे नातेवाईक व तेव्हाचे गावचे नेतृत्व दत्तू तात्या यांनी अवघड परिस्थितीत या कुटुंबास आधार दिला. तात्यांनी त्यांची घरच्यांनी नाकारलेली जमीन व घर त्यांना परत मिळवून दिलीच पण त्यांचे सर्व हक्क सुद्धा परत मिळवून दिले. दिलीप तात्यांचा यासाठी कायमचा ऋणी आहे.

दिलीप त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या वळणांवर बऱ्याच मित्रांना भेटला. आम्ही सुरुवातीच्या काळात एकत्र होतो. त्यानंतर अनिल ने त्याच्या जीवनरूपी ट्रेनला मार्गस्थ केले. त्याचे ऑफिस सोबती योगेश पुरोहित यांनी सर्व प्रकारच्या कार्यालयीन कामात दिलीपला पारंगत केले व मोलाचे नैतिक पाठबळ दिलं. पुढे हनुमंत व अनिलने त्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत मोठ्या भावाप्रमाणे पूर्ण मानसिक पाठबळ दिलं आणि व्यवसाय सुरू करून दिला. त्यांचे अजूनही त्याच्यावर लक्ष आहे. मित्र हा त्याच्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहे, एक महत्त्वाची संपत्ती ! मैत्रीच्या नातेसंबंधाची तो नेहमी कदर करतो. 

जरी याठिकाणी दिलीप च्या आयुष्यातील संघर्ष अधोरेखित होत असला तरी वहिनींनी याप्रसंगी दिलेली साथ व त्यांचे समर्पण म्हणजे पडद्यामागे झाकोळलेलं योगदान आहे. निव्वळ त्यांची समर्थ सोबत होती म्हणून दिलीप आयुष्याच्या लढाईस यशस्वीपणे सामोरे जाऊ शकला.

दिलीप ग्राम विकास मंडळ अनपटवाडी या संस्थेचा खजिनदार व जयहिंद फाउंडेशन या शहीद कुटुंबाला समर्पित सामाजिक संस्थेचा सक्रिय सभासद आहे. या माध्यमातून त्याची सामाजिक जबाबदारी सांभाळत आहे. जीवनाचे विविध रंग आणि चेहरे पाहिलेले ते एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे. एसएससी नापास झालेला विद्यार्थी एका रात्रीत एका फर्मचा मालक होऊ शकत नाही. त्यामागे बऱ्याच दिवसाची संयमी भूमिका, पडेल ते कष्ट करण्याची वृत्ती आणि महान तपश्चर्या आहे. एक एसएससी नापास विद्यार्थी एक यशस्वी उद्योजक होतो काय आणि व्यवसायाच्या निमित्ताने विमान प्रवास करतो काय हे निव्वळ त्याच्या कर्तृत्वाचे फळ आहे. एकेकाळी मोलमजुरी करणाऱ्या दिलीपने प्रामाणिक प्रयत्नाने आपली ओळख दिलीप शेठ अशी केली आहे. अल्पशिक्षित असला तरी आपणही नक्की शेठ होऊ शकता, विश्वास ठेवा तुमच्यातील स्व वर ! दिलीपच्या उर्वरित कार्यकाल व आयुष्यास हार्दिक शुभेच्छा.

डॉ केशव यशवंत राजपुरे

7 comments:

 1. खूपच सुंदर शब्दांकन!

  ReplyDelete
 2. सुंदर लेखणी सर 👌

  ReplyDelete
 3. दिलीप ते दिलीप शेठ अतिशय मार्मिक शब्दांत वर्णन.सगळा जीवनपटच आपण आपल्या लेखणीतून मांडण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. आर्थिक परिस्थिती जीवन यशस्वी करण्यासाठी कधीही आड येत नाही याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दिलिप. जीवनप्रवास यशस्वी करण्यासाठी मित्र म्हणून अनिल भाऊ,राजेंद्र मांढरे व हनुमंत मांढरे यांनी दिलेली साथ आणि त्या साथीच्या संधीचे सोने करणारा दिलीप व त्यास संसाराच्या खडतर प्रवासामध्ये साथ देणाऱ्या सौ.वहिनी म्हणजे त्याग मूर्ती. दिपाली व दिपेश ही संस्कारक्षम मुलं म्हणजे त्यांना लाभलेली दैवी देणगीच.स्वतःच्या प्रतिकूल परिस्थितीची जाणीव ठेवून दिलीप करत असलेले समाजकार्य ही वाखाणण्याजोगे.
  दिलीपच्या पुढील वाटचालीसाठी मनस्वी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

  ReplyDelete
 4. संघर्षाला सलाम

  ReplyDelete
 5. sir दिलीप सरांच्या संघर्षाला लाखों सलाम आणी आज टॉपला विराजमान आहेत त्यांचे खुपच कौतुक आहे तुमचें हें मासे मारीचे जाळे विणणे अफलातून आहे नक्कीच भविष्यात त्याचा फायदा होईल

  ReplyDelete