विनायक शंकर अनपट (बापू नाना)
वरच्या वाड्यातील वाघोजी अनपट यांच्या चार (रावजी, गोपाळा, श्रीपती, दौलती) अपत्यांपैकी, श्रीपती यांचा मुलगा शंकर ! ते गवंडीकाम करत व त्यांचा मुंबई येथील गोल देऊळ बांधण्यात सहभाग होता असे समजते. शंकर श्रीपती अनपट यांना एकूण ६ अपत्य ! त्यापैकी चार मुली व दोन मुलगे. त्या चार मुलींचा विवाह पुढील प्रमाणे विविध गावात झाला: १. बावधन चे पिसाळ, २. विठ्ठलवाडीचे शिंदे, ३. चांदकचे संकपाळ, ४. शेरेचीवाडी चे मोहिते. दोन मुलांपैकी एक जण किशोरवयात गेले व दुसरे विनायक शंकर अनपट हे अनपटवाडीत बापूंनाना या नावाने प्रचलित झाले. बापू नाना आणि अवखळपणा हे ठरलेलं समीकरण ! त्याच्या अवखळ स्वभावामुळे बऱ्याचदा त्यांना अडचणीत आणलं असलं तरी तो त्यांच्या जीवनाचा ट्रेडमार्क होता.
नानांचा जन्म १९३२ चा ! नानांनी चौथीपर्यंतची शिक्षण बावधन येथे पूर्ण केले. नानांना लहानपणापासूनच कुस्तीची प्रचंड आवड ! अनपटवाडीतील सदाशिव आण्णा, महादेव आण्णा, मारुती नाना, सुभेदार दादा हे नानांचे समकालीन कुस्तीपटू होते. त्यांच्या कुस्ती संबंधी एक प्रसंग सांगितला जातो तो म्हणजे एकदा बावधन पंचक्रोशीतील यात्रेमध्ये नामवंत मल्ल (परदेशी, दाणेबाजार तालीम, वाई) कुस्तीच्या फडात आला होता. त्यांची तब्बेत बघून कुस्ती करायला कोणी तयार नव्हते. अशावेळी बापू नानांनी त्यांच्यासोबत कुस्ती केली होती. त्याला नानांनी चित्तपट केले होते. तेव्हा त्यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल अनपटवाडीचे तत्कालीन नेतृत्व दत्तात्रय अनपट (तात्या) यांनी नानांना जरीचे खिस्तांग बक्षीस म्हणून दिले होते. हे मिळालेले पारितोषिक त्यांच्यातील अवखळता, आत्मविश्वास, हिय्या आणि धैर्यासाठी होते. कुस्ती हरलेल्याचा अपमान परदेशी सहन करू शकत नव्हता. पुन्हा त्यांनी वर्षभर मेहनत केली व अनपटवााडीतल्या पैलवानांना आव्हान केले. यावेळी त्यांच आव्हान गावातली दुसरेे मल्ल सदाशिव मांढरे यांनी स्वीकारलं व दुसऱ्यांदा परदेशी यांना चितपट केले.
चौथीतुन शाळा सोडल्यानंतर नाना वडिलांसोबत शेती करू लागले. नाना हे एकुलते एक चिरंजीव ! त्यामुळे शंकर श्रीपती अनपट यांनी त्यांच्या वाट्याची बरीचशी जमीन त्याकाळी विकली वा घाण ठेवली. अशात नानांच्या वाट्याला फक्त तीन एकरच क्षेत्र उरले. त्या स्वातंत्र्यपूर्व काळात उपजीविकेसाठी बरेचजण मिलमध्ये काम करण्यासाठी मुंबईला जात असत पण नानांनी आपला गाव, कुटुंब व शेती भली म्हणून गावीच राहणे पसंत केले. गावामध्ये सदाशिव आण्णांशी त्यांच खूप सख्य होतं. मल्ल म्हणून ते चांगले मित्र होतेच पण आण्णा नानांना खूप समजून घ्यायचे. त्यांचा नानांना मोठा आधार होता.
नानांचा विवाह १९४९ च्या दरम्यान पुण्याच्या हिराबाई बबनराव काळे (ताई) यांच्यासोबत झाला. ताईंचे आजोळ नांदवळ (बर्गे) व नानांची बावधन मधील भाची (यमुना पवार, नांदवळ) यांच्या नातेसंबंधातून हा विवाह ठरवला गेला असावा. ताई या शहरात वाढलेल्या होत्या त्यामुळे शेतातील कामाची सवय नव्हती. पण त्या सर्व काही शिकून नानांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिल्या व यशस्वी संसार केला. या उभयतांना एकूण पाच मुले व तीन मुली अशी आठ अपत्ये ! यामध्ये थोरले मोहन (इंदुमती संकपाळ, चांदक) व नंतर शिवाजी (नंदा सस्ते, सस्तेवाडी, बारामती), समिंद्रा जाधव (जाधववाडी, वेणेगाव), हनुमंत (रेणुका काळे, पुणे), शारदा मुळीक (बावधन), लतिका संकपाळ (चांदक), शहाजी (सुरेखा साळुंखे, खंडाळा) व सुनील (माधवी जगताप, रहमतपुर).
राग हा आपल्या मानसिक शत्रूंमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. रागापासून मुक्ती मिळावी अशी सर्वाचीच इच्छा असते पण बऱ्याचदा ते जमत नाही. नानांचा स्वभाव तसा चंचल, अवखळ व शीघ्रकोपी. त्यांना प्रचंड राग येत असे. मनाला न पटलेल्या गोष्टींबाबत त्यांची हलकीशी कुरबूर, चीडचीड ते संतापापर्यंत मजल जायची. मग रागाने बडबड करून, प्रसंगी शिव्या घालून, ते सगळा राग व्यक्त करून मोकळे व्हायचे पण मनात काही ठेवायचे नाहीत. त्याच्या या स्वभावामुळे ते सर्वांचा रोष पत्करायचे. त्यांना अन्याय सहन व्हायचा नाही मग तो दुसऱ्यावर झालेला का असेना. अन्यायाविरुद्ध नेहमी आवाज उठवायचे. माणसांन स्वभाव बद्लून चालत नाही कारण नैसर्गिक स्थायी स्वभावात बदल केल्यास माणसाला त्रास होतो. उतारवयात मात्र त्यांचा हा स्वभाव पूर्ण बदलला होता त्यामुळे तो काळ त्यांच्यासाठी परीक्षेचा होता. नानांच्या पत्नी हिराबाई (ताई) याउलट प्रेमळ, संयमी, तसेच शांत स्वभावाच्या होत्या. त्यांच्यामुळेच नानांच्या संसाराचा समतोल साधला गेला. ताई शांत असल्यातरी आचरणासाठी कडक शिस्तीच्या होत्या. त्यांनी सर्व मुले, मुली, सुना, नातवंडे यांना व्यवस्थित वळण लावली आहेत. ताईंच्या परिश्रम आणि समर्पणरुपी योगदानाचे एक उदाहरण हे आहे: शहाजी आबा मुंबईत नोकरी शोधण्यासाठी गेले होते. शिक्षण कमी असल्याने नोकरी मिळत नव्हती. अशावेळी आबांनी वायरमनच्या हाताखाली काम करण्यास सुरुवात केली. वायरमनचे काम करावयाचे झाल्यास पीडब्लूडी विभागाचा तारतंत्रीचा परवाना लागत असे आणि यासाठीची परीक्षा देण्यासाठी तेव्हा ३०० रुपये भरण्यास नव्हते. अशा वेळी ताईंनी, घराच्या गरिबीत जमीन गहाण असल्याने, भुईमूगाच्या शेंगा चाळण्यासाठी जाऊन हि परीक्षा फी पाठविल्यामुळे ते परीक्षा देवून उत्तीर्ण झाले आणि त्यामुळे आज इलेक्ट्रिक कामे करू शकतात.
मोठे कुटुंब सांभाळत असताना वडिलोपार्जित तीन एकर जमिनीमधून जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळवता येईल याकडे त्यांचा कटाक्ष असे. ते शेतातील भाजीपाला बैलगाडीतून वाईला नेऊन विकत असत. १९७० च्या दरम्यान त्यांनी तिन्ही आंबा परिसरात जलसिंचनासाठी एक वीहीर खोदली. पण ती फार खोल नसल्याने तिला वर्षभर पाणी टिकायचे नाही. म्हणून १९८४ ला या विहिरीची घरातील माणसांच्या पाठबळावर पुन्हा खोदाई केली. यावेळची आठवण म्हणजे पूर्वी विहिरीवर वीजपंप नव्हते तर मोट असायची. अश्यावेळी बापू नाना मोट हाकत आणि ताई पिकांना पाणी देत. खर तर बाळंतीण सव्वा महिना झाल्याशिवाय गार पाण्यात हात घालत नाही परंतु ताई यांनी तेव्हा १२ दिवसाचे आपले बाळ आपली मुलगी समिंद्रा यांचेकडे सोडून पाणी धरत आणि नवऱ्याला शेतीकामात आवश्यक मदत करत असेही सांगितले जाते.
१९७२ च्या दुष्काळात मिलो खाऊन नानांच्या परिवाराने मोठे कुटुंब, कमी जमीन व अवर्षण परिस्थितीमध्ये आलेल्या परिस्थितीचा मोठ्या धैर्याने सामना केला. १९७५ साली दत्तात्रय अनपट यांच्या मदतीने ज्येष्ठ चिरंजीव मोहन दादा यांचा विवाह पार पडला. त्यानंतर पैसे कमावून कुटुंबास हातभार लावण्यासाठी दादा मिलमध्ये काम करण्यासाठी मुंबईला गेले. त्यानंतर शिवाजी (आप्पा) व हनुमंत (भाऊ) हेदेखील मुंबईला गेले. नानांचे कुटुंब कुठे स्थिरस्थावर व्हायला लागले होते तोच १९८३ झाली मिल बंद पडल्या व सर्वजण गावी परतले. यावेळी कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी नानांनी बकरी पालनाचा व्यवसाय चालू केला. तसे पाहता हे म्हणजे नव्वदच्या दशकात मराठा समाजातील व्यक्तींनी बकरी पालनाचे दुर्मिळ उदाहरण होतं. या कामांमध्ये त्यांना त्यांचे चिरंजीव हनुमंत यांची साथ लाभली. बकरी पालनामध्ये बकऱ्या मागे डोंगरात किंवा शिवारभर भटकणे व सायंकाळी तळावर वाघरा ठोकणे इत्यादी कामे त्यांनी कोणतीही लाज न बाळगता केली. एकदा बकरी चारताना ते लिंबाच्या दाऱ्याआसपास कड्यावरून पडले व जबर जखमी झाले पण सुदैवाने यातून वाचले. कुस्तीत कमावलेल्या शरीर संपदेमुळे नाना तेव्हा बचावले असे म्हटले तर वावगे ठरू नये. नानांच्या रागीट स्वभावामुळे बकरी सांभाळत असताना नानांची बऱ्याच लोकांबरोबर कलह झाल्याचे सांगितले जाते. बावधन येथील सदाशिव धनगर यांना त्यांच्या बकऱ्यांसाठी झाडपाल्यासाठी अनपटवाडी शिवारातील बाभळी खडसू नये असे बजावले होते तरीपण सदाशिव धनगर मुद्दामहून बाभळा खडसत असे. याामुळे सदाशिव धनगर यांच्याबरोबर मोठे भांडण झाले होते. अशा तंट्यामुळे पुढे नानांनी बकरी विकली व पुन्हा नव्या जोमाने शेतीवर लक्ष केंद्रित केले.
१९८४ मध्ये नानांची अनपटवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी निवड करण्यात आली. असे मानलेेे जाते की नानांमधील अवखळपणा कमी करण्यासाठीच गावानं ही महत्त्वाची महत्त्वाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे १९८४-१९८९ या पंचवार्षिक योजनेसाठी नानांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडणूक पार पाडली गेली. त्यावेळेला त्यांचे ग्रामपंचायती मधील सहकारी होते: जयहिंद जगदेव अनपट (उपसरपंच), संभाजी केशव अनपट, संपतराव मन्याबा गोळे, शामराव जगदेव अनपट, शकुंतला मारुती अनपट व विमल सदाशिव अनपट. अनपटवाडीतील कुणाशी भांडण झाले की नाना नेहमी माणसांना वाडगाळ म्हणायचे, ज्यात ते स्वतः देखील असायचे. आणि ही वाडगाळ कधी सुधारायची नाहीत - असे त्यांचे म्हणणे. पण मारुती मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी जाहीर भाषणात सांगितले की मी चूक होतो. हि वाडगाळ राहिली नाहीत.
नानांच्या कारकीर्दीत गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने स्वजलधारा योजना मंजूर झाली होती. पुढे निवास भाऊंच्या कारकीर्दीत त्याचे काम पूर्ण झाले होते. नानांनी व बाळाप्पा यांनी पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी लागणारी जागा विनामोबदला दिली होती. आपल्या गावात दातृत्वगुण आधीपासूनच होते हे यातून दिसते. परबती मांढरेे आप्पा व बापूनाना यांनी वाकडेश्वर यात्रा वाडीमध्ये भरवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. अनपटवाडी च्या नवीन शाळेच्या इमारतीची मंजुरीही नानांच्या कारकिर्दीत आली होती. नानांच्या कारकीर्दीत अनपटवाडी गावाच्या विकासाची सुरुवात झाली होती असे मला वाटते. नाना कमी शिकले होते तरीही त्यांच समयसूचक आणि कडक बोलण एवढे प्रभावी असायचं की कुठलही कार्यालयीन काम अडले असं व्हायचं नाही.
१९८५ साली मोहन (दादा) यांनी मुंबई येथे माथाडी कामगार म्हणून सेवा सुरू केली. त्यांच्यापाठोपाठ हनुमंत (भाऊ) देखील माथाडी मध्ये जोडले गेले. शिवाजी (आप्पा) यांनी अनपटवाडी मध्येच शेतीचे कामकाज पाहिले. शहाजी (आबा) यांनी ज्ञानदिप बँकेची एजन्सी घेतली. १९८६ साली चंद्रकांत शिंदे यांच्या सहकार्यातून कनिष्ठ चिरंजीव सुनील (काका) हे ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये सेवस्त झाले. तेवढ्यात त्यांचे कुटुंब चांगलेच स्थिरस्थावर झाले होते. शेती व्यवसाय तसेच आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. त्यांची नातवंडे शिकू लागली आणि त्यांच्या सर्व मुलांची कुटुंबे वेगाने वाढू लागली.
ते लहान असताना त्यांच्या वडिलांनी जमीन विकली होती व काही जमीन गहाण ठेवली होती ही गोष्ट नानांना नेहमी सतावत असे. वाढलेल्या कुटुंबाला तीन एकर जमीन पुरणारी नव्हती. त्यामुळे त्यांच्या मुलांना ते नेहमी चॅलेंज द्यायचे की हिम्मत असेल तर एक एकर जमीन घेऊन दाखवा. मुलांनी नानांचे चॅलेंज स्वीकारले व दरेवाडी च्या शिवारामध्ये ५४ गुंठे जागा खरेदी केली. एवढेच नाही तर या जमिनीच्या सिंचनासाठी स्वतंत्र विहीर सुद्धा खोदली. नानांच्या दृष्टीनं हा क्षण खूप आनंदाचा होता. बापाने घालवलेली जमीन पोरांनी खरेदी करून मिळवली होती. नाना मुलांना कितीही रागावले किंवा बोलले तरी त्यांच्या बोलण्याचा राग धरून नानांना कुणीही उलटे बोलल्याचे आठवत नाही. त्यांच्याविषयी त्यांच्या मुलांच्या मनामध्ये खूप आदर होता.
२०१५ पासून मोहन (दादा) अनपटवाडी गावचे प्रथम नागरिक म्हणजेच सरपंच म्हणून काम पाहत आहेत. मागील पाच वर्षात गावात बरीच विकास कामे झाली आहेत. ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामात त्यांनी नेतृत्वरूपी योगदान दिले आहे. दादा श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी (मुंबई) चे संस्थापक अध्यक्ष देखील होते. दादांचा मुलगा, प्रभाकर बीकॉम जीडीसी अँड ए करून ज्ञानदिपच्या विरार शाखेत शाखा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मुली राजश्री जाधव (चव्हाणवाडी) व सुकेशिनी शिंदे (बावधन) विवाहित आहेत. शिवाजी (आप्पा) यांचे ज्येष्ठ चिरंजीव गणेश ज्ञानदीप एजन्सी ओरिएंटल इन्शुरन्स, अंधेरी येथे कार्यरत आहे. तर दुसरा चिरंजीव राहुलने हॉर्टिकल्चर डिप्लोमा पूर्ण केला असून कृषी संबंधित कंपनीमध्ये मार्केटिंग व शेती असा दुहेरी व्यवसाय करत आहे. आप्पा यांच्या मुली शोभा ढेंबरे (तरडप, फलटण) व मीनाक्षी सोळस्कर (घाटदरे, खंडाळा) विवाहित आहेत. हनुमंत (भाऊ) माथाडी कामगार म्हणून नोकरी झाल्यानंतर सध्या शेळीपालन व शेती व्यवसाय करतात. त्यांचा चिरंजीव निलेश ज्ञानदीप एजन्सीमध्ये इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स ची कॉन्ट्रॅक्ट चे काम करतो. शहाजी (आबा) यांचा चिरंजीव अनिकेत ने बीएससी पूर्ण केली असून लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत आहे. कन्या अनिता एमकॉम असून मुंबईमध्ये एका कंपनीत कार्यरत आहे. सुनील (काका) यांचा मोठा मुलगा सुरज हा धनुर्विद्या मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. त्याने बऱ्याच स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत. लहान चिरंजीव चेतन सीए फाउंडेशन पूर्ण करून सीए विजय अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तयारी करत आहे.
अशाप्रकारे नानांचे कुटुंब राजकीय, कृषी, बँकिंग, क्रीडा अशा विविधांगी क्षेत्रांमध्ये चमकत आहे. नानांच्या रूपानं पेरलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे अस म्हणायला काहीच हरकत नाही. नाना जरी स्वभावाने अवखळ व रागीट असले तरी मनाने साफ होते. त्यांचेच गुण त्यांच्या अपत्यांमध्ये आलेले आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर नानांनी घेतलेल्या खडतर परिश्रमाचे व ताईंनी मायेने लावलेल्या शिस्तीचे चीज झाले आहे हे मात्र नक्की.
तंदुरुस्त शरीर असल्यामुळे तसा नानांना दुसरा आजार नव्हता पण त्यांना मेंदूच्या अपुऱ्या रक्त पुरवठ्यामुळे येणाऱ्या फिट्स चा त्रास होता. यासाठी दररोज एक गोळी घ्यावी लागायची. त्यादिवशी नानांच्या छातीत दुखायला लागले त्यामुळे त्यांना रात्री अकरा वाजता दवाखान्यात दाखवून आणलं. औषध घेऊन सगळ्यांना झोपायला सांगितले व १५ मार्च २००५ रोजी रात्री दोन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे म्हातारपणात स्वाभिमानी व कणखर नानांनी कॉट धरली नाही किंवा कोणाकडून सेवा करून घेतली नाही.
नाना उत्कृष्ट कुस्तीगीर होतेच पण करारी, आत्मसन्मान जपणारे, बाणेदार आणि आत्मविश्वासू देखील होते. नानांनी आई-वडिलांची काळजी घेतली, मुलांचे संगोपन केले, नीती धर्माचे आचरण ठेवले व अब्रूने जगले. तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या श्रीमंत माणसाचे जीवन जगले.
नानांच्या पवित्र स्मृतीस वंदन.
✍️आकाश बाळासाहेब राजपुरे
उपअभियंता, मुंबई महानगरपालिका
संकलन व संपादन: केशव राजपुरे
नानांसारख्या सर्वार्थाने श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिचित्रण अतिशय समर्पक शब्दांत मांडण्याचे काम आपल्या लेखणीतून झाले आहे.
ReplyDeleteखूपच छान शब्दांकन.