गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वरः, गुरुर साक्षात परम ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः
आज (९ जुन २०१७) माझे प्रेरणास्त्रोत आदरणीय प्रा चंद्रकांत हरी (सी.एच.) भोसले सर की ज्यांनी माझ्यामध्ये संशोधन संस्कृती पेरली आणि विकसित केली त्यांचा शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील अधिकृत सेवेचा शेवटचा दिवस ! तसे सर विभागातील शिक्षक पदावरून ३१ मे २०१४ रोजीच सेवानिवृत्त झाले होते पण पुढे लगेच त्यांना मानाची युजीसी बीएसआर शिक्षक शिष्यवृत्ती मिळाली होती. या शिष्यवृत्तीच्या कार्यकालाचा आजचा शेवटचा दिवस ! या शिक्षकरूपी गुरूंनी माझ्या मनात ज्ञानाचा दिवा उजळवला आणि जीवनात प्रकाश निर्माण केला. माझ्या गुरुंविषयी कृतज्ञता मानण्याची चालून आलेली ही संधी ... ...
सरांचा जन्म सांगोला तालुक्यातील महूद या छोट्याश्या खेडेगावात १९५२ चा ! घरात आठराविश्वे दारिद्र्य ! सोलापूर हा तसा दुष्काळग्रस्त जिल्हा त्यामुळे या जिल्यातील मुलांना उदार निर्वाहासाठी अंगमेहनतीची कामे किंवा शिक्षणाशिवाय तरणोपाय नसायचा. सर घराची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही अगदी जिकरीने १९७० ला अकरावी (जुनी एसएससी) प्रथम वर्गात पास झाले. पुढे १९७४ मध्ये गावानजीकचे शहर पंढरपूर येथील महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून बी.एस्सी. पदवी प्रथम वर्गात मिळवली. यादरम्यान मित्राच्या खोलीवर राहून आणि गावाकडून दिवसातून एकवेळसच येणाऱ्या जेवणावर उदरनिर्वाह केला. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी उच्च शिक्षणाचा ध्यास सोडला नाही.
त्या पुढील उच्च शिक्षण घ्यायचे तर पुणे किंवा कोल्हापूर येथे जावे लागणार होते. त्यांनी कोल्हापूरची निवड केली कारण तेव्हा त्यांनी कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पावार यांनी सुरू केलेल्या कमवा आणि शिका या योजनेबद्दल ऐकले होते. ते येथे प्रवेश घेण्यासाठी आले आणि चौकशी केली असता असे समजले की या योजनेत प्रवेश हा मुलाखतीवर आधारित होता आणि या मुलाखती ४ दिवसांनंतर होत्या. दुर्दैवाने त्यांच्याकडे कोल्हापूरमध्ये ते ४ दिवस घालवण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. आणलेले पैसे दोन दिवस पुरले. उरलेले दोन दिवस उपाशी राहून आणि मैदानावर झोपुन काढले. कुलगुरु डॉ. आप्पासाहेब पवार आणि कुलसचिव डॉ. उषा इथापे मॅडम हे दोघे मुलाखती घेत होते. आदबीने सरांनी आत प्रवेश केला. त्यांच्या समोर बसण्यासाठी खुर्ची होती तरीही ते दोघांसमोर उभेच होते. काही वेळ दोघेही कागदावर लिहिण्यात मग्न होते, जेव्हा त्यांनी पुढे बघितले तर एक कृश झालेला मुलगा उभा दिसला. सरांनी दोन दिवस काहीही खाल्ले नव्हते तसेच अंगात थोडी कणकणही होती त्यामुळे ही अवस्था होती. कुलगुरु साहेबांनी सरांना विचारले की तू इतका कमजोर का झाला आहेस ? सरांनी उत्तर दिले "गेल्या दोन दिवसांपासून माझ्या पोटात काहीच नाही". एवढ्यावरच मुलाखत संपली आणि निवडलेल्या यादीत त्यांचे नाव होते आणि विशेष म्हणजे यानंतर लगेचच कार्यालयातील शिपाई त्यांना जेवण देण्याकरिता शोधत होता. शेवटी सरांना मिळाला होता हवा असलेला प्रवेश ! या बातमीने खऱ्या अर्थाने सरांचे पोट कायमचे भरले होते. जिद्द, चिकाटी, चौकस बुद्धी व अभ्यासू वृत्ती याचं फलीत म्हणजे त्यांनी १९७६ मध्ये भोतीकशास्त्र विभागातून एम.एस्सी. पदवीही प्रथम वर्गात मिळवली.
पुढे प्रश्न होता उच्च शिक्षण घेवून कायमस्वरुपी नोकरीचा! रयत शिक्षण संस्थेच्या रामानंदनगर येथील महाविद्यालयात सुरुवातीला हंगामी आणि नंतर कायमस्वरुपी नोकरी मिळाली. पुढे त्यांची कोपरगाव येथील महाविद्यालयात बदली झाली. त्यांनी महाविद्यालयातील प्रतिनियुक्ती घेऊन प्रा. एस.एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मानांकीत एम.फिल आणि पीएच्.डी. पदव्या प्राप्त केल्या. यामुळेच १९९२ ला ते शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. सरांना मी प्रथमत: जून १९९२ साली भेटलो होतो. त्यांनी आम्हाला भौतिकशास्त्रातील क्लासिकल मेकनिक्स सारखा अत्यंत अवघड विषय अगदी सोपा करून शिकवल्याचे ध्यानात आहे. सरांच्या व्याख्यानाचे अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे ते कोणतीही कठीण गोष्टी सांगून श्रोत्यांची लय घालवत नसत तर त्याच गोष्टी साध्या आणि समजायला सोप्या पद्धतीने सांगत आणि त्यांच्या मनात विषयाविषयी अधिक रस निर्माण करत. मला तर त्यांच्या शिकवण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. त्यांच्याकडून शिकवलेला सर्व अभ्यासक्रम वर्गामध्येच पूर्णपणे समजला होता आणि विशेष म्हणजे परीक्षेवेळीअगदी थोड्याच वेळात उजळणी झाली होती आणि या विषयात मी वर्गात पहिला आलो होतो. तेव्हापासून एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांचा आमच्यावर पडलेला ठसा अद्याप कायम आहे. जुन १९९६ ला मी सरांच्याकडील डी.एस.टी. संशोधन प्रकल्पामध्ये काम करायला सुरुवात केली होती. संशोधनादरम्यान भोसले सरांनी मला एका वेगळ्याच वस्तुस्थितीची जाणिव करून दिलेली आठवते- ज्ञानाबरोबरच जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तरच तुम्ही जीवनात पाहिजे ती उंची गाठू शकता ! एक चांगला शिक्षक कसा असावा याचे धडे भोसले सरांनीच मला दिले. सर स्वतःच एक आदर्श शिक्षक असल्याने मी सरांची शिकवण्याची हातोटी आत्मसात केली होती. सरांच्या सहवासात आल्यावर त्यांचा एक स्वभाव कायम लक्षात राहीला तो असा: कोणत्याही गोष्टीवर सत्यापित झाल्याशिवाय विश्वास ठेवू नका. एखादी गोष्ट समोरच्याला अगदी त्याला समजेल अशा भाषेत सामजवावी ती सरांनीच ! शिवाजी विद्यापीठातील सध्याचा आमचा संशोधनचा स्तर निव्वळ आदरणीय भोसले सर व प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. मायकेल न्यूमन स्पेलार्ट यांच्या योगदानामुळेच आहे असे आम्ही मानतो.
ग्रामीण भागातील मुलांना जे संघर्षमय जीवन जगावे लागते त्याच प्रकारच्या अनुभवातून जाऊन भौतिकशास्त्रातील नामवंत प्राध्यपक तसेच आंतरर्राष्ट्रीय संशोधक अशी ख्याती सरांनी मिळवली, ही बाब सर्वांसाठी अभिमानस्पद आहे. ध्येयवादी वृत्ती आणि प्रबळ इच्छाशक्ती यांचा संगम झाला की, एखादी व्यक्ती कशी ध्येयप्राप्ती करू शकते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमचे सर. आपण १९७४ -१९७६ दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या "कमवा आणि शिका" योजनेतून शिक्षण घेऊन शिक्षणाला श्रमप्रतिष्ठेची आणि सुसंस्कारची जोड मिळाली की, व्यक्तिमत्व विकासाने झळाळून निघत, हा आदर्श समाजापुढे घालून दिलाच आहे.
आत्तापर्यंत त्यांचे एकूण २१५ शोध निबंध वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मासीकांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या प्रकाशनांना एकून ४४७४ उद्धरणे मिळाली असून त्यांचा एच निर्देशांक ३९ तर आय-१० निर्देशांक ११३ आहे. आत्तापर्यंत त्यांची चार पुस्तके प्रकाशीत झाली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण सव्वीस विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केलेली आहे. यातील काही विद्यार्थी पुढे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया येथे उच्च शिक्षण घेत आहेत, तसेच इतर प्राध्यापकपदी तर काहीजण महाविद्यालयांचे प्राचार्य म्हणून काम करीत आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या सौजन्यातील सात प्रकल्प यशस्वीरित्या पुर्ण केले आहेत. ब-याच संशोधन मासिकांचे तसेच विद्यापीठांतील पीएच. डी. साठी ते परिक्षक आहेत. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या परिषदा आणि रिफ्रेशर कोर्सेसमध्ये १०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांनी परदेशातील प्रयोगशाळांमध्ये संशोधन करण्यासाठी अमेरिका, झेक प्रजासत्ताक, इजिप्त, चीन, कॅनडाला भेटी दिल्या आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या शास्त्रज्ञांबरोबर पाणी शुद्धिकरणावर काम केले आहे आणि हे काम उत्कृष्ट मासिकांत प्रकाशित केले आहे. त्यांनी फ्लोरिडा सौर ऊर्जा केंद्र, यूएसए, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई आणि नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च (सीएनआरएस) फ्रान्स या शिखर संस्थांशी शिवाजी विद्यापीठाने केलेल्या सामंजस्य करार स्थापन करण्यात प्रमुख भूमिका बजावली आहे. ते २०१० ते २०१३ या काळात विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी १० कोटी किमतीची शास्त्रीय उपकरणे एकाच छताखाली असलेले भौतिकशास्त्र इंस्ट्रुमेंटेशन सुविधा केंद्र स्थापन केले. पदार्थविज्ञानातील भरीव संशोधनामुळे या कारकीर्दीतच विद्यापीठाच्या कॅंपसमध्ये भोतिकशास्त्र विभागाने सर्वोच्च स्थान पटकावले. मी व डॉ मोहोळकर, सरांचे पीएच. डी चे विद्यार्थी, आज याच भौतिकशास्त्र विभागामध्ये प्राध्यापक म्हणूक कार्यरत आहोत याचा सरांना सार्थ अभिमान वाटतो याचे सर्व श्रेय सरांनाच जाते.
शिवाजी विद्यापीठातील सरांचे अध्यापन तसेच संशोधन कार्य उल्लेखनीय आहे. सौरघट, इंधनघट व पाणी शूद्धीकरण या विषयावरील सरांचे संशोधन अद्वितीय आहे. त्यांच्या कार्याची पोहोच म्हणून महूद गावकर्यांनी त्यांना महूदभूषण हा गावचा सर्वोच्च नागरी बहूमान बहाल केला होता. सर शिवाजी विद्यापीठाचे गुणवंत शिक्षक पुरस्कार विजेते आहेतच तसेच महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सच्या कार्यकारणी मंडळाचे सदस्यही आहेत या सर्वच गोष्टी आम्हाला अभीमानास्पद आहेत. नुकतेच ३० एप्रिल २०१७ रोजी मराठी विज्ञान परिषदेने मुंबई येथे त्यांना "विशेष मार्गदर्शक पुरस्कार" देवून गौरवले आहे. सर्वच विद्यार्थ्यांप्रती अतिशय आपुलकीने व प्रेमाने वागणार्या सरांविषयी काय लिहावे की ज्यांनी विद्यार्थ्यामध्ये पोहचले पाहिजे हा डॉ. आप्पासाहेब पवार यांचा विचार कृतीतून यशस्वीपणे उतरविला. सद्गुरू संत गाडगे महाराज तसेच डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांच्या प्रभावातून सरांच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण होत गेली. आज भौतिकशास्त्र विषयाबद्दल मुलांमध्ये जागरुकता निर्माण करून या विषयाविषयीची भीती दूर करण्यासाठी अशा समर्पित शिक्षकांची नितांत गरज आहे.
जवळ जवळ ४० वर्षांच्या सेवेदरम्यान सरांनी असंख्य कुशल आणि सुसंस्कृत विद्यार्थी घडवले आहेत. केवळ पुस्तकी शिक्षण न देता चारित्र्य घडविणारे, मानसिक बळ वाढवणारे, बुद्धी विशाल करणारे आणि स्वावलंबी बनविणारे शिक्षण आम्हास दिले त्याबद्दल आम्ही सरांचे शतशः ऋणी आहोत. ज्ञानातूनच सर्वश्रेष्ट विकास साधता येतो, ही आपली शिकवण खरोखरच आम्हास वंदनीय आहे. आज आपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मला खूप धन्यता वाटते. सर नेहमी आम्हाला प्रोत्साहन, समर्थन आणि लाख मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत आम्ही सरांचे सदैव ऋणी राहू .. आपणासारख्या आदर्श व्यक्तीमत्वापुढे आमचे कोटी कोटी प्रणाम. ह्याच भावना सरांच्या असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात आहेत व असतील, मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात त्यातील काही इथे मांडण्याचा प्रयत्न केलाय. सर, सर्व प्रकारच्या शुभाशिर्वादाचा आपणावर सदैव वर्षाव होत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना ! कर्तव्याच्या मोजमापावर, आज खर उतरुन, नव्या पाऊलवाटेवर तुम्ही केवळ सेवेतून निवृत्त होताय, आमच्या मनातून नाही, आमच्या शुभेच्छा सदैव, आपल्या सोबत आहेत .
प्रा (डॉ.) केशव राजपुरे
मोबाईल: ९६०४२५०००६
प्रा. डॉ. राजपुरे,
ReplyDeleteतूम्ही माझ्यावर लिहलेला कोणाच्याही अंतःकरणास स्पर्श करणारा लेख वाचला. माझे हे छोटेसे यश हे केवळ तुमच्यासारखे गुणी, अभ्यासू व काष्ठालू विदयार्थी मिळाले म्हणूनच आहे. तूम्ही केलेल्या प्रयत्नांचेच हे फळ आहे. त्यात डॉ. राजपुरे यांचे योगदान मला कदापि विसरता येणार नाही. सुरुवातीच्या काळात संशोधनात अनेक अडचणी असतात. त्या अडचणी निवारण्यात सुरुवातीचे Ph.D चे विद्यार्थी व Dr. Michael Neumann- Spallart यांचे सहकार्य मोलाचे आहे. सर्व विद्यार्थ्यांचा, सहकाऱ्यांचा व Dr. Michael यांचा मी आभारी आहे.
शेवटी अप्रतीम लेखा बद्दल धन्यवाद. - Prof.(Dr.) C. H. Bhosale
अगदी मोजक्या शब्दामध्ये, आदरणीय डॉ राजपुरे सरांनी आदर्श शिक्षक डॉ भोसले सरांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. डॉ राजपुरे सर मी तुमचा आभारी आहे, कारण तुम्ही आम्हाला डॉ भोसलर सरांची माहिती देऊन प्रोत्साहन दिले आहे.
Deleteअगदी मोजक्या शब्दामध्ये, आदरणीय डॉ राजपुरे सरांनी आदर्श शिक्षक डॉ भोसले सरांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. डॉ राजपुरे सर मी तुमचा आभारी आहे, कारण तुम्ही आम्हाला डॉ भोसलर सरांची माहिती देऊन प्रोत्साहन दिले आहे.
Deleteडॉ दादा पांडुरंग नाडे
विद्यार्थी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
I am also a fan of best teaching and research attitude personality Prof.(Dr.) C. H. Bhosale sir.
ReplyDeleteProf.(Dr.) S. B. Kondawar
RTM Nagpur University,
9890901965
Very good words sir...
ReplyDelete