Friday, April 14, 2017

कमी लेखू नका

कुणालाही कमी लेखू नका .. मोठे व्हाल ..
(प्रा. केशव राजपुरे)

आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारची माणसे आपण पहातो. त्यात काही सुस्वभावी, तत्पर, समयसूचक, वक्तशीर, प्रामाणिक, मनमिळावू, मितभाषी, सत्यवचनी, स्पष्टोक्ती, विश्वासू, इमानी तसेच मोकळ्या मनाची मंडळी बघतो. काही माणसे उपजतच कद्रू असतात. त्यांना मोकळ्या आणि 'मोठ्या' मनाने जगता येत​​ नाही की मनमोकळे वागता येत नाही. या भाऊगर्दीत थोडेशे ताठ, चंचल आणि गंभीर स्वभाव असलेले काहीजण अनुभवायला मिळतात. याबाबतीत कदाचित मी चूकत असेन पण माझं निरीक्षण मात्र नक्कीच चुकीचं नसावं ......

आम्ही लहान असताना अभिनेते मिथून दा आमचे सर्वाचे आदर्श नायक असावेत.. बऱ्याचदा आम्ही कुणालातरी  वार्षिक स्नेहसंमेलनावेळी 'दोन हाणा पण मिथून म्हणा' असे शेले पागोटे टाकत असू.... माझ्या जिज्ञासू मनाने अगदी  तेव्हापासून अशा 'क्षमतेने कमी पण क्षमतावान दाखवणारे' खास आणि वेगळया प्रकारच्या व्यक्तींना पारखायला सुरुवात केली असावी. यांना फुकटचा 'मोठेपणा' हवा असतो. समोरच्याने महत्व दिले नाही की यांना अपमानीत व्हायला होतं. फारच गर्विष्ठ असतात हे म्हणे. समोरच्याच्या बोलण्या वागण्याचा सोयीस्कर अर्थ लावण्यात आणि त्यामुळे त्रागा करण्यात अगदी तरबेज. आपण नेहमी अशा दुराचारीना टाळू इच्छित असतो पण दुर्दैवाने अशांचा संपर्क आलाच तर अस्वस्थ व्हायला होत. येथे मी अशा व्यक्तीबद्दल माझी काही निरिक्षणे देत आहे. यामुळे आपणास त्यांच्यापासून दूर राहायला मदत होईल.

त्यांच्या मते समृद्धता ही राहणीमान, मालकीचे वाहन, कपडे, शूज, जेवत असलेले हॉटेल, वापरत असलेल्या गोष्टीच्या मानकाच्या दृष्टीने करावी.  इतर लोकांची गुणवत्ता ठरवण्याची त्यांची स्वत:ची काही मानके आहेत. त्यांच्या दृष्टीने दुसरे म्हणजे कवडीमोल ! कदाचित त्यांच्या हातात असते तर त्यांनी जगातील सर्व माणसांचे मुल्यांकन करण्याची एखादी एजन्सीच काढली असती. त्यांच्या मते एखादा अधिकारी त्यांना मिळालेल्या अधिकारांच्या योग्यतेचा नसतो.  समोरच्याच्या जागेवर त्याच्यापेक्षा आपण कसे योग्य आहोत हे मानण्यात धन्यता आणि मनाची समजूत काढून मोकळे.. जसं म्हंटलं जातं की 'ज्यांनी आपला संघर्ष पाहिला आहे त्यांनाच तुमच्या यशाची किंमत कळते, बाकीच्यांच्यासाठी तुम्ही एक भाग्यवान व्यक्ती असता'. तसं अशा स्वप्न कोंबड्यांना तुमच्या यशाची किंमत का असावी ?

त्यांच्या मते त्यांना सर्व काही माहीत असते, किंबहुना प्रत्येक विषयाचे ते ज्ञानी असतात. जर त्याना चुकून चाहूल लागलीच की एखाद्या विषयात आपण कमजोर आहोत तर त्या विषयातील ज्ञानी लोकांशी सुरुवातीला लगट करतील आणि एकदा अंदाज आल्यावर त्या माणसाच्या कमकुवत मुद्याची माहिती घेवून त्याला काय येते यापेक्षा काय येत नाही या विषयावर मित्रांत चर्चा करून मनाची तहान भागवून घेतील.

या लोकांच्या अपेक्षा फार ! हे असंचं व्हायला हवं. फार महत्वाकांक्षी असतात हे. त्यांच्या इच्छा-आकांक्षा मध्ये जर अडसर आलाच तर लगेच क्रोधीत व्हायचं. 'असं का म्हणायचं त्यांनी', 'असं त्यांनी म्हणायला नाही पाहिजे' -ह्या यांच्या एखाद्याच्या वाक्यांवर प्रतिक्रिया. यांचं नेहमी खरं असतं - कारण त्यांच्या मते ते कधी चुकत नाहीत. मग चूक नसेल तर माफी तरी मागणार कशी ? का मागायची, जर मागितली तर त्यांचा अपमान

त्यांना डिवचलेल्या 'एखाद्याला डोक्यात ठेवायचं' एव्हढचं फक्त त्यांच्या डोक्यात. अशांचा कधी एकदा बदला घेतोय असं होतं त्यांना.. त्याला विरोधास विरोध हे ओघानं आलं.. मग त्याला खुन्नस द्यायची... कुणाकडून तरी त्याला 'सांगायची' पद्धत अवलंबायची. 'बोलल्यावर'- मग कसा गप्प बसला ? असं बोलून स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची. जर चुकून यात एखादी गोष्ट अंगलट आलीच तर कशाचीतरी कुबडी सोबत ठरलेली. कुणी 'मोठं' म्हंटलं म्हणून कुणी मोठं होतं नसतं - 'मोठेपणा हा अंगी असायला हवा', अर्थात खरा मोठेपणा अंगच्या गुणांवर व कर्तुत्वामध्ये असतो. नम्रतेतून येणारा मोठेपणा दुर्मिळ झालाय..

अशी मंडळी कायम एक-एकटी असतात, त्यांचे मित्र फार कमी, शत्रूच जास्त... लाजाळूपणा, 'लेप्ट आउट' फिलिंग, कायमची अस्वस्थता, मनात अकल्पित भीती, लयास गेलेला आत्मविश्वास, धैर्याचा अभाव, स्वयंसुरक्षेसाठी देवाचा धावा हे नेहमी त्यांच्या वाट्याला आलेलं दिसतं. या मंडळीना 'दु:खी जादा सुखी कम' असेच पाहू शकता. या दु:खीपणाचे कारण ही काय असावे, ठाऊक आहे ? 'इच्छा'! इच्छेविरूद्ध काही झालं किंवा त्यात अडसर आला की यांना क्रोधीत व्हायला होतं. इच्छा पूर्ण झाली की आनंदीत आणि अपूर्ण राहीली की दु:खी ! हे गणित झालेलं दिसतयं बिच्याऱ्यांच्या आयुष्याचं. यांच्या क्रोधाची दुसरीही कारणं असू शकतात; ज्यामध्ये जिद्द, हिंसा, अहंकार, भय, चुगली, वैर, ईर्षा, घृणा आणि उपेक्षा. असू देत ना काहीही.. पण ह्याच आपल्याला निदान झालं म्हणजे सुखी आयुष्याची वाट सापडायला मदत होईल. या सर्वावर शांततेने विजय मिळवायला हवा.. असं करणं म्हणजे स्वत:ला शिक्षा देण्यासारखं आहे. म्हणूनच सांगतो 'कुणालाही कमी लेखू नका .. मोठे व्हाल' ..

@ Keshav

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...