Friday, February 19, 2021

मनोज राजपुरे


 अखेर मनोज राजपुरेने कोरिया गाठलं


           दरेवाडी (ता-वाई) येथील एका सर्वसामान्य मजूर शेतकरी कुटुंबात जन्मलेला मनोज महादेव राजपुरे याचा दरेवाडी ते दक्षिण कोरिया पर्यंत चा प्रवास तसा अवघड नव्हता परंतु घरची आर्थिक दुर्बलता, गावाकडे असणारी वैचारिक मागास विचारसरणी याचा विचार केला तर तो तसा सोपाही नव्हता.

          १४ नोव्हेंबर १९९५ रोजी बालदिनी श्री. महादेव बापू राजपुरे आणि सौ. सुवर्णा राजपुरे यांच्या पोटी जन्मलेले मनोज हे बहिणीनंतरचे दुसरे अपत्य ! घरची परिस्थिती जेमतेम होती. सुरवातीला त्यांनी काही दिवस दुसऱ्याच्या ओसरीला संसार थाटला, त्यांनतर वडिलोपार्जित घर मिळाले. जवळपास १० बाय १० च्या च्या दोन खोल्या; एका मध्ये आज्जी राहायची दुसऱ्या खोलीत हे चौघेजण!

             त्याचे आई-वडील अल्पशिक्षित; जेमतेम ९ वी शिकलेले! कमी शिक्षणामुळे महादेव यांना नेहमीच कष्टाची कामे करावी लागली. आजोबा बापूराव यांचा स्वर्गवास महादेव ४ वर्षाचे असतानाच झाला होता. त्यांनतर सर्व जबाबदारी महादेव यांची आजी श्रीमती बाई बापूराव राजपुरे यांच्यावर पडली. त्यांनी दुसऱ्याच्या शेतात मोल मजुरी करून पाच ही मुलांचा सांभाळ केला आणि त्यांना देता येईल तेवढं शिक्षण दिले. महादेव यांना शिक्षणात आवड नसल्यामुळे त्यांनी १९८५ साली नोकरीसाठी मुंबईचा मार्ग निवडला. शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना माथाडी म्हणून अवघड काम करावे लागले. दरम्यान मनोजच्या आई सौ सुवर्णा गावाकडे दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून मनोज व त्याची बहीण मोनाली यांचा सांभाळ आणि शिक्षण करत होत्या. त्यांनी १० बाय १० च्या खोलीत राहून २७ वर्ष संसार केला. महादेव यांना मुंबई मध्ये राहून एवढं अवजड काम करूनही योग्य मोबदला मिळत नव्हता, म्हणून २००४ साली अखेर त्यांनी मुंबई सोडली. क्षुधाशांती साठी मोलमजुरी करून चरितार्थ चालवला.

         मनोजच्या प्राथमिक शिक्षणाची सुरवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाली. त्याने ३ री पर्यंतचे शिक्षण दरेवाडी येथे पूर्ण केले. तो अभ्यासात नेहमीच चुणूक दाखवत असे, वर्गात नेहमी उत्तम गुण मिळवायचा परंतु घरची परिस्थिती आणि सभोवातलाचे वातावरण हे शिक्षणासाठी पोषक नव्हते. अश्या परिस्थितीत हा हुशार मुलगा पुढे शिकणार नाही हे मनोजचे मावस बंधू इंद्रजीत आणि अभिजित भिलारे यांनी हेरलं आणि त्याला पुढील शिक्षणासाठी स्वतः च्या गावी दरेखुर्द (ता. जावली) येथे नेले. त्यांची मावशी सुलावती व काका मोहन भिलारे यांनी त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली. नंतर ४ थी जि. प. प्रा शाळा दरेखुर्द येथे पूर्ण करून माध्यमिक शिक्षण जवळच असणाऱ्या रयतच्या न्यू इंग्लिश स्कूल पवारवाडी या छोट्या शाळेतून (२००६-२०११) एस एस सी मध्ये ८९.८२% गुण मिळवून पूर्ण केले. गणित हा त्याच्या आवडीचा विषय होता. १० वी मध्ये बोर्डाच्या परीक्षेत गणित विषयात त्याने १५० पैकी १४४ गुण मिळवले होते. जेवढा तो शाळेत हुशार होता त्यापेक्षा जास्त आगाऊ पण होता. एकदा सुट्टीत गपचूप ऊस खायला गेला म्हणून मुख्याध्यापकांनी अख्ख्या शाळेसमोर त्याला ऊसाने मारले होते याची आठवण अजूनही त्याला होते.

          दहावी मध्ये मिळवलेल्या भरभरून यशानंतर ११ वी सायन्ससाठी त्यांनी अव्वल असणाऱ्या यशवंतराव चव्हाण इस्टिटयूट सातारा येथे गुणवत्ता यादीमधून प्रवेश मिळवला. पण तो काळ खरंच कठीण होता शिक्षणाचा खर्च घरच्यांना झेपणार नाही म्हणून त्याने पुढे बी एस्सी करायचंय ठरवलं. २०१६ मध्ये त्याने रसायनशास्त्र या विषयात ७७.८२% गुण मिळवून पदवी व नंतर २०१८ मध्ये ७२.२५% मिळवून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

       त्याचे इंजिनीरिंग च स्वप्न अपूर्ण राहिले, सैन्य भरती चे पण खूप अयशस्वी  प्रयत्न झाले होते. घरची जबाबदारी असताना देखील त्यानं असं ठरवलं की आपण निवडलेल्या क्षेत्रात पी. एचडी. करायची. भारतात हे शिक्षण उपलब्ध होतं, परंतु परिस्थितीचा विचार करता अजून ४-५ वर्ष शिकणे शक्य नसल्यामुळे त्याने परदेशात शिष्यवृत्तीवर असणाऱ्या संधींचा शोध घेणे सुरु केले.


        दरम्यान त्याने नोकरीला सुरवात केली. त्यावेळी त्याचा पगार ११००० रुपये होता. दोन वर्षांनंतर तुलनेने चांगला पगार असूनही नोकरीत त्याचे मन रमत नव्हते कारण त्याचा ओढा हा संशोधनकडेच होता. लॉकडाऊनच्या काळात त्याने सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून परदेशात विविध ठिकाणी पी. एचडी. प्रवेशासाठी अर्ज केले. वायसी चे माजी विद्यार्थी तसेच क्षेत्र माहुलीचे रहिवासी व माझे विद्यापीठातील एम.एस्सी चे विद्यार्थी हर्षराज जाधव तेव्हा दक्षिण कोरिया येथे पीएच डी करत होते. त्यांच्या प्रयत्नांतून १४ जून २०२० ला प्रोफेसर हर्न किम यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण कोरिया मधील नामांकित म्योंग्जी विद्यापीठात शिष्यवृत्तीवर पी.एचडी साठी निवड झालेले पत्र त्याला मिळाले. स्वप्नपूर्तीसाठी त्याने चांगल्या पगाराची नोकरी हसत हसत सोडली. 
 
         सर्व तयारी केल्यानंतर तो २६ ऑगस्ट २०२० रोजी दिल्लीमध्ये पोहोचला, कोरियाला जाण्यासाठी विमान सुटायच्या वेळेच्या ४ तास आधी सर्व भारतीयांना कोव्हीड १९ च्या साथीमुळे कोरियात येण्यासाठी निर्बंध लावल्याचे कळले आणि विमान रद्द झाले. हातातोंडाशी आलेला घास गेला, नोकरी नाही व परदेश संधी सुद्धा हुकली यामुळे हताश मनाने दिल्लीतुन माघारी येताना त्याचे डोळे अश्रूनी भरले होते. घरी जायची इच्छा नव्हती. तो २ दिवस पुण्यातच राहिला. नंतर म्योंग्जी विद्यापीठात संपर्क केल्यावर समजलं की ६ महिने जाता येणार नव्हते.

         त्याने तर नोकरी सोडून दिली होती, नवीन घर बांधायचं काम चालू होतं, पैशाची गरज तर खूपच होती, ६ महिने घरी बसणे शक्य नव्हतं. मग त्याने ६ महिन्यासाठी छोटी-मोठी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. नोकरी मिळाली पण त्यांचा पगार परवडणारा नव्हता. नंतर सुदैवाने ग्लेनमार्क लाईफ सायन्स या चांगल्या कंपनी कडून संधी मिळाली. त्याची गरज ओळखून त्यांनी त्याला मुद्दाम गुजरात मध्ये पाठवलं. गरज असल्यामुळे तोही तयार झाला. त्या कंपनीने त्याला आधीच्या पगारापेक्षा जास्त पगार दिला. कसेबसे सहा महिने संपवून विसा वगैरेची प्रक्रिया आटपून नुकताच १३ फेब्रुवारीला मुंबई-दुबई-सेवूल असा प्रवास करत तो शेवटी १४ फेब्रुवारी २०२१ ला कोरियामध्ये पोहोचला.

          त्याच्या या यशामध्ये त्याचे आई-वडील महत्त्वाचे आहेत कारण त्यांनी त्याला कधीच जबाबदारीचे ओझे दिले नाही. म्हणूनच त्याला अभ्यास करता आला आणि एवढी वर्षं शिकता आलं. त्याच्या मावशी-काकांनी १४-१५ वर्ष त्याचा सांभाळ केला त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. त्यांनी शैक्षणिक वातावरण तयार करून दिले. मावस भाऊ अभिजित याने तेव्हा स्वतःच्या कमी पगारातून त्याच्या सर्व गरजा भागवल्या, सख्या भावाप्रमाणे त्याने लक्ष दिले. त्याची बहीण व दाजींनीही त्याला नेहमी प्रोत्साहन दिले तसेच लाखमोलाचे संस्कार दिले आणि प्रत्येक वेळी त्याच्या पाठीशी उभे राहिले.

           महाविद्यालयीन काळात त्याला अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. मित्रांची संगतही योग्य मिळाली. त्याचे अनेक वर्गमित्र आयआयएससी, आयसर, गोवा विद्यापीठ, बिट्स पिलानी अशा नामांकित संशोधन संस्थांमध्ये पी. एचडी. करत आहेत. तसेच काही वर्गमित्र मोठ्या कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्याची व त्याच्या मित्रांची कामगिरी पाहता, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व कष्टाळू मित्रांची साथ असेल तर आपण काहीही साध्य करू शकतो हे सिद्ध होते.

 
            ही एका मनोजची गोष्ट नाही, असे अनेक होतकरू मनोज आपल्याला समाजात दिसतात. अनेकांनी मोठी यशशिखरे गाठल्याचे आपण पाहतो, त्यांचे सध्याची पदप्रतिष्ठा आपल्याला दिसते पण बहुतेकदा त्यांनी ते मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाकडे लक्ष जात नाही. मोठं होण्याची स्वप्नं सगळेच बाळगून असतात. पण परिस्थितीनुरूप काहींना स्वप्नपूर्तीचा खडतर मार्ग सोडवा लागतो. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मणारे खूप कमी असतात व त्यांना सक्सेस स्टोरीही नसते. ज्यांना शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण करायचं असतं त्यांच्या वाटेत अनेक दगड असतात, अनेकदा त्यांमुळे ठेच लागते. म्हणून त्या दगडांना दोष देण्यात किंवा त्यांना लाथा घालण्यात काहीही अर्थ नसतो, त्यात आपला वेळ व शक्ति वाया जाते, आणि वेदनाही होतात. त्याऐवजी ते दगड गोळा करून त्यांच्या पायऱ्या करणं आपल्याला जमलं पाहिजे. छोट्या लोकांच्या मोठ्या कामगिरीच्या कथेतून आपण हाच बोध घेतला पाहिजे.

         मनोजला आता संशोधन कार्यासाठी हवी तशी जागा मिळाली आहे. तिथं त्यानं मन लावून करावं, त्याच्या ज्ञानात भर पडावी, तेथून परत येताना डॉक्टरेट पदवीसोबत मोठा अनुभवही मिळवा. इथे त्याने आयुष्यात आपुलकीची अनेक नाती जोडली आहेत, त्यांचा तो नेहमीच सन्मानही करतो. तिथेही त्याने सर्वांना आपलंस करावं. त्याच्या भावी आयुष्यासाठी अनेक शुभाशीर्वाद.

- शब्दांकन: डॉ. केशव राजपुरे, सुरज मडके

Monday, February 15, 2021

संशोधनातील योगदान

शिवाजी विद्यापीठाच्या मटेरियल सायन्स संशोधनात प्राध्यापक राजपुरे यांचे भरीव योगदान 

भारतातील राज्यस्तरीय विद्यापीठे अलीकडेच आपल्या शैक्षणिक कार्यक्रमांसह विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रातील मूलभूत संशोधनावर लक्ष केंद्रित करीत आहेत. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे मटेरियल सायन्स संशोधनात उत्कृष्ठता गाठत भरीव योगदान देत आहे आणि या क्षेत्रात विद्यापीठाने जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळे विद्यापीठाने प्राप्त केलेल्या संशोधन निर्देशांकांत भौतिकशास्त्र अधिविभागाचा सिंहाचा वाटा आहे. विद्यापीठाने आजवर प्रकाशित केलेल्या एकूण वैज्ञानिक शोधनिबंधांपैकी जवळजवळ ४० टक्के शोधनिबंध या विभागाचे आहेत. सध्या पदार्थांच्या नॅनोस्ट्रक्चरवर आधारित कार्यक्षम डिव्हाइस तयार करण्यावर विभागाचे सदोदित प्रयत्न केंद्रित आहेत.

प्राध्यापक डॉ. केशव यशवंत राजपुरे हे भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी या पदाचा अधिभार स्विकारला आहे. अलीकडेच अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी प्लॉस बायोलॉजी या मासिकात जगातील शीर्ष २% शास्त्रज्ञांच्या प्रसिद्ध केलेल्या यादीत प्रा. राजपुरे यांचा समावेश आहे. त्यांची भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यासमंडळाच्या अध्यक्षपदी आणि विद्यापरीषदेच्या सदस्यपदी देखील नियुक्ती झाली. संशोधनातील त्यांच्या योगदानाबद्दल थोडक्यात माहिती येथे देत आहे.

प्रा. राजपुरे यांना मटेरियल सायन्स संशोधनाचा २५ वर्षांचा गाढा अनुभव आहे. त्यांनी १९९४ साली शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी प्राप्त केली. सुरुवातीला त्यांनी ऐरोजेल प्रयोगशाळेत जेआरएफ आणि पुढे डॉक्टरेट अभ्यासादरम्यान एसआरएफ म्हणून म्हणून काम केले. प्रा.सी.एच. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना थीन फिल्म सेप्टम स्टोरेज सेल क्षेत्रातील संशोधनावर १९९९ मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त झाली. त्याच वर्षी प्रा. राजपुरे भौतिकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि गेली वीस वर्षे ते विशेषत: सोलर सेल, गॅस सेन्सर, यूव्ही डिटेक्टर, चुंबकीय पदार्थ, फोटोकॅटालिसिस आणि मेमरिस्टर यांसारख्या महत्वाच्या संशोधन क्षेत्रात काम करत आहेत. थीन फिल्म्स संशोधन क्षेत्रामध्ये ते प्रामुख्याने महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. 

सौर ऊर्जेच्या वापरासंबंधी आज आपण समाजात जागरूकता पाहतोय. २००० च्या दशकात सौर ऊर्जेचे रूपांतर करून वेगवेगळ्या उपकरणांत वापर करण्यावर भरपूर संशोधन सुरू होते. या पार्श्वभूमीवर प्रा राजपुरे यांनी आपल्या डॉक्टरेटच्या संशोधनकार्यासाठी अँटिमनी सल्फाईड हा पदार्थ निवडून त्याच्या सौरऊर्जा रूपांतरणाच्या गुणधर्माचा अभ्यास केला. सौरघटातील उपयोगासोबतच त्या पदार्थाचा वापर सेप्टम विद्युत घटातही होऊ शकतो हे त्यांनी प्रयोगांती सिद्ध करून दाखवले. 
 
परिपूर्ण तसेच स्टायचोमेट्रिक ऑक्साईड्स हे इन्सुलेटर अर्थात विद्युतरोधक असतात. सर्व धातू अपारदर्शक असतात. परंतु ऑक्साईड्समध्ये ऑक्सिजनची आवश्यकतेपेक्षा कमतरता असल्यास ते अर्धसंवाहक बनतात आणि ते धातु (चालकता) आणि विद्युतरोधक (पारदर्शकता) या दोन्हींचे गुणधर्म प्रदर्शित करतात. पारदर्शक वाहक ऑक्साइड थीन फिल्म्सचे हे गुणधर्म त्यांना इतके लक्षणीय करतात की ते आधुनिक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचे अनन्यसाधारण घटक बनून प्रत्येक आघाडीवर वापरले जातात. प्रा. राजपुरे यांच्या संशोधनाची मुख्य युक्ती ही आहे की या पदार्थांची स्टोचिओमेट्री आणि परिणामी गुणधर्म यांवर त्यांचे उत्कृष्ट नियंत्रण आहे. त्यांना एकच पदार्थ वेगवेगळ्या अपेक्षित गुणधर्मांचा बनवता येतो की त्यांना भिन्न अनुप्रयोगांमध्ये वापरता येतो.

पुढे पारदर्शक विद्युतसुवाहक ऑक्साइड थिन फिल्म्स पदार्थाचे विविध उपयोग लक्षात घेवून त्यांनी या पदार्थांवरदेखील संशोधन केले. त्यांच्या संशोधन समूहाने नंतरच्या काळात स्प्रे पायरोलायसिस तंत्राचा उपयोग करून अनेक पारदर्शक विद्युतसुवाहक मेटल ऑक्साइडच्या थिन फिल्म तयार केल्या व त्यांचा उपयोग विविध कारणांसाठी केला होता. विशेष करून त्यांनी ज्वलनशील, धोकादायक आणि विषारी वायू तपासण्यासाठी गॅस सेन्सर विकसित केला. गॅस सेन्सर जास्त तापमानावर कार्यान्वित असतो. हे तापमान कमी केले तर या सेन्सर डिवाइसची आणि पर्यायाने तंत्रज्ञानाची किंमत कमी होते. या मुद्द्यावर त्यांचे संशोधन केंद्रित होते व या प्रयोगांवर त्यांना चांगली निरीक्षणे मिळाली होती. ही त्यांनी वेगवेगळ्या संशोधन पेपर मधून मांडली आहेत.

त्यांनी २०११ पासून विद्यापीठात प्रथमच प्रकाश किरणांची पारख करणाऱ्या पदार्थांवर (फोटोडिटेक्टर) संशोधन सुरू केले व तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर त्यांनी झिंक ऑक्साईड या पदार्थावर आधारित अतिनील किरणे तपासण्याच्या गुणधर्मावर २०१४ मध्ये पहिला पेपर प्रसिद्ध केला. त्यानंतर त्यांनी फोटोडिटेक्टर व गॅस सेन्सर असे दुहेरी कार्य करणारे (बहुआयामी) उपकरण तयार करण्यावर भर दिला. सद्या त्यांच्या संशोधक सहकाऱ्यांकडून याबाबत अधिक कार्यक्षम असणाऱ्या टिटॅनियम ऑक्साइड व तत्सम पदार्थांवर फोटोडिटेक्टरसाठी संशोधन कार्य केले जात आहे. 

त्यांनी इलेक्ट्रिक सर्किट चा चौथा घटक असणाऱ्या मेमरिस्टर ह्या इलेक्ट्रोनिक घटकावर देखील संशोधन केले आहे. स्विचिंग मेमरी संदर्भातील या संशोधनातील त्याची सुरुवात २०१४ मध्ये हायड्रोथर्मल पद्धतीने तयार केलेल्या टिटॅनियम ऑक्साइड या पदार्थाचे गुणधर्म अभ्यासून झाली. आजपर्यंत त्यांनी विविध ऑक्साइड पदार्थांचा मेमरिस्टरसाठी अभ्यास केला आहे. सध्या ते विविध मेटल टंगस्टेटचे मेमरिस्टर गुणधर्म शोधण्यावर भर देत आहेत. त्यांचे प्रयत्न पदार्थांच्या सौरचनेचा मेमरीस्टर गुणधर्मांवरील परिणाम समजून घेण्यावर केंद्रित आहेत.

प्रा. राजपुरे यांना सॉलिड स्टेट फिजिक्स आणि त्यातही विशेषतः चुंबकीय, फेरोइलेक्ट्रिक आणि घन पदार्थांच्या विद्युत गुणधर्मांच्या संशोधनात आवड आहे. त्यांच्याकडून विद्युतचुंबकीय सेन्सर्स तयार करण्यासाठी विविध फेराईट, ऑक्साइड व त्यांच्या मिश्रणाचा अभ्यास केला गेला आहे. त्यांनी चांगल्या गुणवत्तेचे चुंबकीय सेन्सर तयार करण्यास आवश्यक  कौश्यल्य प्राप्त केले आहे.

त्यांनी सौरऊर्जा वापरुन पाण्यातील प्रदूषकांच्या निर्मूलनावर (फोटोकॅटालायसिस) देखील महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. औद्योगीकरणामुळे आज जगासमोर जलप्रदूषणाची मोठी समस्या उभी आहे. २०११ मध्ये सौरउर्जा  वापरुन टिटॅनियम ऑक्साईड या उतप्रेरकाच्या सानिध्यात विविध सेंद्रिय रसायने, जैविक पेशी तसेच समुद्राच्या पाण्यातील सेंद्रिय प्रदूषकांचे निर्मूलन करण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यानंतर त्यांनी सॅलिसिलिक ॲसिड आणि ४-क्लोरोफेनॉल यासारख्या जवळजवळ पंधरा प्रदूषकांचेदेखील विविध ऑक्साइड उतप्रेरके वापरुन निर्मूलन करून दाखवले आहे. अलीकडेच संकरित उत्प्रेरक वापरून प्रदूषकांचे निर्मुलन करणे चालू आहे. फोटोकॅटालायसिस या क्षेत्रातील ते एक नामांकित संशोधक आहेत, या विषयावर व्याख्यान देण्यासाठी त्यांना अनेक ठिकाणाहून निमंत्रणे असतात.

एकंदरीत प्रा. राजपुरे यांनी विविध पदार्थांवर संशोधन करून वैज्ञानिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तुलनात्मक विचार करता त्यांनी सोप्या व कमी खर्चीक पद्धतीने तयार केलेले पदार्थ अत्याधुनिक आणि महागड्या पद्धतीने तयार केलेल्या पदार्थांशी समकक्ष आहेत. आतापर्यंत त्यांचे २०० संशोधन लेख विविध आंतरराष्ट्रीय नामांकित नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्याच्या संशोधनाचा एच-इंडेक्स ५३ च्या आसपास आहे. आपल्या संशोधन कामावर त्यांनी दोन पेटंट दाखल केली आहेत. हे संशोधन करत असताना त्यांच्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी केलेले योगदान फार महत्त्वाचे आहे असे ते मानतात. त्यांच्या प्रामाणिक, कष्टमय आणि अविरत प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे अशी त्यांची धारणा आहे.

शिवाजी विद्यापीठासारख्या मर्यादित साधने असलेल्या राज्य विद्यापीठात राहून जागतिक दर्जाचे संशोधन करून त्यांनी पदार्थ संशोधनात मोठे योगदान दिले आहे आणि जगभरातील वैज्ञानिकांना आपल्या कार्याची दाखल घ्यायला भाग पाडले आहे. 

शब्दांकन: डॉ. रमेश देवकते, सुरज मडके

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...