Sunday, April 5, 2020

निवास दत्तात्रय अनपट


चित्रकार निवास; सर्वसमावेशक नेतृत्व

अनपटवाडी गावचे माजी सरपंच आणि उत्कृष्ट चित्रकार असलेले श्रीयुत निवास दत्तात्रय अनपट हे एक हसतमुख व्यक्तिमत्त्व आहे. बावधन, वाई तसेच मुंबई येथे त्यांचा खूप मोठा मित्रसमुदाय आहे. अशा या हसतमुख व्यक्तिमत्त्वाविषयी यावेळी जाणून घेऊया !

समाजकारण आणि राजकारणाने भारलेल्या वातावरणात, गावच्या प्रतिष्ठित 'वरच्या वाड्यात' निवासभाऊंचा जन्म २५ जून १९६४ रोजी झाला. त्यांचे वडील दत्तात्रय बजाबा अनपट हे १९५० ते १९७५ च्या दरम्यान गावचे एक धडाडीचे नेतृत्व होते. त्यामुळे समाजसेवेचे बाळकडू निवासभाऊंना लहानपणीच घरातून मिळाले. वास्तव्यास वाईमध्येच असल्याने त्यांचे सर्व शिक्षण तिथेच झाले. वाई नगरपालिकेच्या शाळा क्रमांक ४, ६ आणि ११ मधून त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर माध्यमिक व अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी त्यांनी वाई येथील द्रविड हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी १९८० मध्ये एसएससी आणि १९८२ मध्ये एचएससी शिक्षण द्रविड हायस्कूलमधूनच पूर्ण केले.

पुढे आई-वडिलांचे छत्र हरपल्यामुळे, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना मुंबईची वाट धरावी लागली. १९७० ते १९८२ हा काळ त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने सत्वपरीक्षेचा होता; मात्र या खडतर प्रवासात त्यांना सर्व चुलते आणि भावजय सिंधुवहिनी यांची मायेची खंबीर साथ लाभली. निवासभाऊंचा स्वभाव अत्यंत शांत, निगर्वी आणि सर्वसमावेशक! कुणीही सहजपणे त्यांच्या प्रेमात पडावं आणि त्यांची मैत्री स्वीकारावी, असं हे व्यक्तिमत्त्व. या काळात त्यांना राजूनाना मांढरे आणि अनिलभाऊ अनपट यांचा स्नेहरूपी सहवास लाभल्याचे ते कृतज्ञतेने सांगतात. परिस्थितीशी संघर्ष करत असतानाच, पुढे त्यांनी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आपली 'बी.ए.' ही पदवी देखील यशस्वीपणे पूर्ण केली.

घरात शैक्षणिक सुबत्ता नसली, तरी त्यांच्याकडे जन्मजात उत्कृष्ट चित्रकलेचे अनमोल कौशल्य होते. त्यांचे अक्षर खूपच वळणदार आणि मोत्यासारखे सुंदर आहे. त्यांच्या चित्रकलेची प्रेरणा त्यांचे आर्टिस्ट कदम मामा व प्रीमियर कंपनीत नोकरीला असणारे त्यांचे मोठे बंधू अजित यांची होती. चित्रकलेसाठी त्यांनी कोणतेही वेगळे प्रशिक्षण घेतले नव्हते, ही तर त्यांना लाभलेली नैसर्गिक दैवी देणगी होती!

हायस्कूलमध्ये असताना चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा मात्र ते उत्कृष्ट श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परीक्षांच्या दरम्यान मिळालेले मार्गदर्शन काय ते त्यांच्याकडे होते. त्यांच्या पडत्या काळात त्यांचा हा छंद आणि जोपासलेली कला पेंटिंगचा व्यवसाय करताना खूप कामी आली. निवासभाऊ आजही उत्कृष्ट पेंटिंग करतात. त्यांनी तयार केलेले उत्कृष्ट साईन बोर्ड अजूनही माझ्या लक्षात आहेत. बेंदराच्या सणावेळी बैलांच्या अंगावर पिवडी लावून भाऊ कुंचल्याने जी अप्रतिम नक्षी आणि चित्रे काढायचे, तेव्हापासून मी त्यांचा मोठा फॅन आहे.

१९८४ ते २००२ या दरम्यान त्यांचे वाडीत वास्तव्य होते. या काळात त्यांनी रिक्षा चालवणे, बेकरी व्यवसाय, पत्रकारिता, केबल व्यवसाय यांसह वाई येथील विश्वकोश मंडळात काम देखील केले. सोबत त्यांचा पेंटिंगचा व्यवसाय सुरूच होता. या सर्व प्रवासात त्यांनी गावचा भूगोल आणि इतिहास खूप जवळून पाहिला व अभ्यासला. तत्कालीन माजी सरपंच सदाशिवअण्णा, बापूंनाना तसेच सर्जेरावतात्या यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजकारणाचे धडे घेतले. ग्रामसेवक आणि तलाठ्यांच्या संपर्कात राहून ग्रामपंचायतीची कार्यपद्धती, वेगवेगळी दप्तरे आणि पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या शासकीय योजनांची सखोल माहिती घेतली.

याच अभ्यासाचा उपयोग होऊन पुढे वयाच्या २५ व्या वर्षी, म्हणजेच १९८९ साली ते अनपटवाडी ग्रामपंचायतीचे युवा सरपंच झाले. १९८९ ते १९९४ या काळात सरपंच म्हणून, तर पुढील एक वर्ष प्रशासक म्हणून त्यांनी गावासाठी काम केले. त्यांच्यातील नेटकेपणा, वक्तशीरपणा, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक गोष्टीची डायरीत छान टिपणे ठेवण्याच्या सवयीमुळे त्यांचा ग्रामपंचायत कार्यकाळ अतिशय यशस्वी ठरला. दरम्यान, १९९१ मध्ये नायगाव (मुंबई) येथील नम्रता वहिनी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आपले मित्र अनिलभाऊ व राजूनाना हे अजित आणि निवास या दोघांच्याही लग्नात पालकाच्या भूमिकेत पाठीशी उभे होते, असे ते आवर्जून सांगतात.

सध्या (पुन्हा एकदा) चर्चेत असलेल्या रामायण आणि महाभारत या महामालिका त्यावेळी व्हीसीआर व कलर टीव्हीच्या माध्यमातून निवासभाऊ आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या प्रयत्नांमुळेच अनपटवाडीकरांना पाहता आल्या. त्या काळात गावामध्ये दूरदर्शन चालत नव्हते आणि कुणाकडेही कलर सोडा, साधा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही देखील नव्हता. या मालिका रविवारी प्रसारित व्हायच्या आणि त्यांच्या व्हिडिओ कॅसेट एका आठवड्यात उपलब्ध व्हायच्या. आधीच्या रविवारी झालेला एपिसोड पुढच्या रविवारी गावात दाखवायचाच, असा त्यांचा निश्चय असायचा. रजनीकांतभाऊ यांच्या परड्यातील शेडमध्ये कनात बांधून तिकिटावर या मालिका पाहण्याची पर्वणी गावाला मिळाली, ती केवळ निवासभाऊंच्या पाठिंब्यामुळे! तेव्हा मोठ्यांसाठी ८० पैसे आणि लहान मुलांसाठी ५० पैसे असा तिकीट दर होता. या कामात शरदबापू यांनी आपल्याला मोलाची मदत केल्याचे निवासभाऊ आवर्जून सांगतात.

अनिलभाऊ आणि राजूनाना यांच्या सहकार्यातून गावात सर्वात आधी स्थापन झालेल्या 'नवनाथ क्रीडा मंडळा'चे निवासभाऊ संस्थापक अध्यक्ष होते. गावच्या सर्वांगीण विकासासाठी गावपातळीवर एखादे तरी मंडळ असावे, या एका सुंदर कल्पनेतून त्यांनी या मंडळाची मुहूर्तमेढ रोवली होती. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी बॅडमिंटन स्पर्धांचे दिमाखदार आयोजन केल्याचे ते अभिमानाने सांगतात; मात्र पुढे नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने सर्वजण विखुरले गेले आणि नवनाथ मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आला.

त्या काळात अनिलभाऊ आणि राजूनाना यांच्याकडे पॉकेटमनी नसायचा, त्यामुळे मंडळाचा किंवा इतर सर्व प्रासंगिक खर्च निवासभाऊ स्वतःच्या खिशातून आनंदाने करायचे. ही केवळ त्यांनी जपलेल्या जिवाभावाच्या मैत्रीपोटी! निवासभाऊंचे कपडे आणि शूज म्हणजे जणू या दोघांचेच अधिकारक्षेत्र असायचे. अनिलभाऊंना त्यांची पहिली पँट निवासभाऊंनीच घेऊन दिली होती, ही आठवण अनिलभाऊ आजही डोळ्यांत जिव्हाळा आणून सांगतात. एका परीक्षेत नजरचुकीने दुसऱ्याच विषयाचे टाचण सोबत राहिल्यामुळे अनिलभाऊंना ३० रुपये दंड झाला होता; या कठीण प्रसंगातूनही निवासभाऊंनीच त्यांना सहीसलामत बाहेर काढले होते.

वाई महाविद्यालयात शिकत असताना राजूनाना जेव्हा वर्ग प्रतिनिधीची निवडणूक जिंकले, तेव्हा त्या निवडणुकीत निवासभाऊंनीच प्रचाराचा मुख्य पुढाकार घेतला होता. पुढे कॉलेजच्या सरचिटणीस पदाच्या निवडणुकीत राजूनानांचे मत अत्यंत निर्णायक ठरले होते, त्या काळातील अशा अनेक रंजक आणि अविस्मरणीय गमतीजमती ते आजही आवर्जून आठवतात.

अनिलभाऊ आणि राजूनाना यांच्याबरोबच गावातील अजय रमेश मांढरे या व्यक्तिमत्त्वाशी देखील निवासभाऊंचे घट्ट सख्य होते. अजयची उंची जरा जास्त होती आणि त्याचा आवडता अभिनेता अमिताभ बच्चन! त्यामुळे निवासभाऊंनीच त्याला प्रेमाने 'लंब्या' हे नाव दिले आणि पुढे तो याच नावाने प्रसिद्ध झाला. अजयने 'शोले' सिनेमा थिएटरात कित्येक वेळा पाहिला होता, पण निवासभाऊंच्या टेप रेकॉर्डरवर या सिनेमाचे संवाद (डायलॉग) ऐकण्याचा त्याचा छंद काही न्याराच होता! निवासभाऊंच्या घरी बसून अजय तासन्तास हे डायलॉग ऐकत असे; पण भाऊंनी कधीही त्याचा कंटाळा केला नाही की त्यांना त्याची कटकट वाटली नाही.

एकदा तर काय झाले, नजरचुकीने शोलेची ती आवडती कॅसेट थेट उकिरड्यावर जाऊन पडली! ती कॅसेट शोधण्यासाठी सर्वांनी मिळून संपूर्ण उकिरडा उपसल्याची मजेशीर आठवण आजही आमच्या मनात ताजी आहे. असाच एक किस्सा टीव्हीचा; डोंगरावरून दूरदर्शनचा सिग्नल व्यवस्थित मिळतो, असे कोणीतरी सांगितले. मग काय... निवासभाऊ, अजय आणि आम्ही सर्व 'चिल्ड्रन फॅक्टरी' (बालगोपाळ) थेट टीव्ही आणि अँटिना घेऊन टोंगेवर (डोंगरावर) चढलो! तो प्रसंग प्रचंड मजेशीर आणि अविस्मरणीय होता. असं हे जिवाभावाचं मित्रत्व जपणारं निवासभाऊंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच इतरांपेक्षा अगदी निराळं आहे.

निवासभाऊ सरपंच असताना, ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील गुणीजनांचे कौतुक करण्याची एक सुंदर प्रथा त्यांनी सर्वप्रथम सुरू केली. त्या काळात गावातील विविध क्षेत्रांतील कौशल्यप्राप्त व्यक्तींचे सत्कार समारंभ आयोजित केले जात. गावातील होतकरू आणि ज्ञानसंपादनाची जिद्द असणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी निवासभाऊंना प्रचंड जिव्हाळा असायचा. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, हा जणू त्यांच्या आस्थेचा विषय! बावधन परिसरात अनपटवाडीच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचे गुणगान गाणे, हा तर निवासभाऊंचा हक्काचा अधिकार होता; आपल्या माणसांचा त्यांना केवढा अभिमान असायचा! याविषयीचा एक अविस्मरणीय किस्सा माझ्याकडे आहे:

१९८७ मध्ये मी बावधन केंद्रात ८० टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला होता. माझ्या मूळ गावी, म्हणजेच दरेवाडी येथे बैलगाडीतून, गुलालाची उधळण करत आणि वाजत-गाजत माझी भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी सत्कार समारंभ आणि पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या दरम्यान, दरेवाडी येथील आमच्या बांधवांनी बावधन ग्रामपंचायतीसमोर माझ्या अभिनंदनाचा एक बोर्ड लावला होता. मात्र, त्यावर माझे गाव 'अनपटवाडी' असे लिहिल्याचे पाहून दरेवाडीकर काहीसे नाराज झाले. त्यांनी तो शब्द खोडून तिथे 'दरेवाडी गावचे सुपुत्र' अशी दुरुस्ती केली. जेव्हा ही गोष्ट निवासभाऊंना समजली, तेव्हा ते या अस्मितेच्या मुद्द्यावरून दरेवाडीकरांशी अगदी ठामपणे भांडले. त्यांनी आपला मुद्दा त्यांना योग्य रीतीने पटवून दिला आणि बोर्डवर माझ्या गावाचे नाव पूर्ववत 'अनपटवाडी' करायला लावले. जरी मी जन्माने अनपटवाडीकर असलो, तरी निवास अनपट हे असे पहिले व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी मला अधिकृतपणे बावधन पातळीवर 'अनपटवाडीचा नागरिक' म्हणून ती ओळख आणि सन्मान मिळवून दिला. त्यांच्या वडिलांकडून मिळालेला वारसा आणि आमच्याविषयी असणारा जिव्हाळा व स्नेह, यामुळेच हे शक्य झाले असावे, असे मी कृतज्ञतेने मानतो.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण आणि योगायोगाने माझ्या वडिलांचे नावही यशवंत! निवासभाऊ वाई येथे राहत असल्यामुळे आमच्या घराचा त्यांच्याशी संपर्क तसा कमीच होता. त्यामुळे सुरुवातीला त्यांना आमच्या 'राजपुरे' या आडनावाविषयी फारशी माहिती नव्हती. माझ्या वडिलांचा स्वभाव अतिशय साधा आणि गरीब; त्यामुळे गावातील लहान मुलेही कधीकधी त्यांची चेष्टा करायची. याच चेष्टेतून गावातील बरीच मंडळी त्यांना 'यशवंतराव चव्हाण' या मोठ्या नावाने हाक मारायची. नाव जरी एक असले, तरी या दोन्ही यशवंतरावांचे कर्तृत्व आणि जगणे पूर्णपणे वेगळे होते. याच कारणामुळे निवासभाऊंना देखील सुरुवातीला माझे नाव 'केशव यशवंत चव्हाण' असावे असे वाटले होते; मात्र त्यांचे चुलत बंधू विजूकाका यांनी त्यांचा हा गैरसमज दूर केला आणि त्यानंतर भाऊ मला 'राजपुरे' या नावाने ओळखू लागले. एका गरीब मजूर शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या पोराला, शैक्षणिक सुविधांचा एवढा अभाव असूनही इतके छान गुण कसे मिळाले, हा प्रश्न त्यांना नेहमी पडायचा. माझ्या हुशारीबद्दल त्यांना नेहमीच कौतुक आणि मोठे आश्चर्य वाटत असे.

निवासभाऊंच्याच सरपंचपदाच्या कार्यकाळात बावधन पंचक्रोशीची जीवनवाहिनी ठरलेल्या 'नागेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाची' (नागेवाडी धरण) मुहूर्तमेढ २६ ऑक्टोबर १९९५ रोजी रोवली गेली. तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार आणि नामदार मदनआप्पा पिसाळ यांच्यानंतर, या ऐतिहासिक कामाच्या शुभारंभाचा मानाचा 'चौथा नारळ' फोडण्याचा बहुमान थेट निवासभाऊंना मिळाला होता! आज हा प्रकल्प आपल्या संपूर्ण पंचक्रोशीला नवसंजीवनी देणारा ठरला आहे. पुढे हा प्रकल्प काही काळ रखडला, अनेक अडचणींतून गेला; मात्र यथावकाश आपल्या हक्काच्या पाण्याचा स्त्रोत गावाला मिळाला. या ऐतिहासिक क्षणी गावचे नेतृत्व करण्याचा बहुमान निवासभाऊंना मिळाला, ही गावासाठी अभिमानाची गोष्ट होती.

ते जुन्या आठवणींना उजाळा देत सांगतात की, १९८९ मध्ये गावच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीसाठी बारुळी येथील कोळी यांची दोन गुंठे जागा गावच्या नावावर करून घेण्यात आली होती. सुरुवातीला तिथे एकच खोली बांधली होती; मात्र पुढे वसंत कदम आणि सुभाष माने यांच्या मोलाच्या मदतीतून तिथे आणखी दोन खोल्या बांधण्यात आल्या, ज्यामुळे गावातील मुलांच्या शिक्षणाची सोय झाली.

आपल्या गावच्या शकूकाकी (मारुतीनानांच्या सौ) या कनूर ग्रुप ग्रामपंचायतीत तीन वेळा एकमेव आणि पहिल्यावहिल्या महिला सदस्य होत्या. ही माहिती त्यांनी ग्रामपंचायतीतून आणल्याचे भाऊंना आठवते. तसेच वाईचे तत्कालीन तहसीलदार व निवासभाऊंचे काका महादेवराव बर्गे यांच्या मदतीने स्वतंत्र अनपटवाडी ग्रामपंचायतीची महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटमध्ये नोंद करण्यासाठी भाऊंनी विशेष प्रयत्न केले. अवघी ९३ मतदारसंख्या असताना देखील स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा आपल्याला त्याआधीच १९७४ मध्ये मिळाला होता.

श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी (मुंबई) च्या माध्यमातून गावचा खूप विकास झाला. या मंडळाच्या स्थापनेचे ते गावपातळीवरील मुख्य साक्षीदार आहेत. मंडळाच्या कार्याला त्यांचे नेहमीच सहकार्य लाभले. पुढे ते काहीसे बाजूला राहिले असले, तरी त्यांनी कायम बाहेरून मंडळाला पाठिंबा दिला. आजही निवासभाऊंसारख्या अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या सल्ल्याची, मार्गदर्शनाची आणि अनमोल सहवासाची गावाला खूप गरज आहे.

असे हे हसतमुख, उत्कृष्ट चित्रकार, सर्वसमावेशक स्वभावाचे, माहितीचे भांडार, गावच्या प्रतिष्ठेची मनापासून काळजी वाहणारे आणि मोठ्या मनाचे समाजशील व्यक्तिमत्त्व अनपटवाडी गावच्या विकासातील मैलाचा दगड ठरले आहे. याबद्दल सर्वांनाच त्यांच्याविषयी आदर आणि अभिमान वाटतो.

- केशव राजपुरे

2 comments:

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...