Monday, December 19, 2022

passport

 आला एकदाचा पासपोर्ट
(पासपोर्ट काढताना काय काय डचणी येऊ शकतात हे इतरांना अवगत व्हावे तसेच त्यातून त्यांना मार्गदर्शव व्हावे म्हणून हा ब्लॉग प्रपंच ! इथे कोणालाही दोष देण्याचा अजिबात हेतू नाही. शहाण्या माणसाच्या आळशीपणाचा हा स्वानुभव शालेय पाठ्यपुस्तकातला धडा असू शकतो.)

तसं बघितलं तर पासपोर्ट म्हणजे एक सरकारी अधिकृत प्रवास दस्तऐवज. परदेश प्रवास करत असताना पासपोर्ट सोबत असणे आवश्यक असते आणि हे महत्वाचे ओळखपत्र असते की ज्याच्यामुळे आपले राष्ट्रीयत्व प्रमाणित होते. गरीब ग्रामीण शेतकरी कुटुंबात वाढल्यामुळे अगदी विद्यार्थी दशेपासूनच या दस्तऐवजाची कधी गरज भासेल असे वाटले नव्हते.

परदेश प्रवासासाठीच पासपोर्ट आवश्यक असतो, असा सर्वसाधारण समज आहे. पण त्याबरोबरच, एक ओळखीचा सर्वमान्य पुरावा म्हणून प्रत्येकाकडे स्वतःचा पासपोर्ट असणे आवश्यक आहे. अलीकडे ऑनलाइन स्वरूपामुळे ही पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत अधिक सोपी झाली आहे. पासपोर्टसाठी अर्ज करण्यापूर्वी योग्य कागदपत्रे पूर्तता करणे खूप महत्त्वाचे असते. तुमच्याकडे फक्त सर्वत्र अचूकपणे नाव लिहिलेले आधारकार्ड, पॅनकार्ड आणि एसएससी प्रमाणपत्र असले पाहिजे. हा माझा स्व-शिक्षित-अनुभव या ठिकाणी शेअर करत आहे.

पासपोर्टसाठी अर्ज करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे; ती म्हणजे तुम्ही परदेशात जाण्यास सक्षम असाल, तर तुम्ही ऑनलाइन पासपोर्ट कागदपत्र पडताळणी प्रक्रिया देखील सक्षमपणे हाताळू शकता. काहीही गरज नसताना याकामी आपण कुठलीही भूमिका नसलेल्या एजंटकडे जातो. फक्त त्याला अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती असते. यासंदर्भात आपल्यालाच प्रत्येक ठिकाणी सामोरे जावे लागते. अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर एजंट आपोआप बाजूला पडतो. विनाकारण आपण प्रक्रियेची भीती बाळगतो आणि स्वतःला कमी लेखतो. जेव्हा आपण एजंटच्या प्रोफाइलद्वारे अर्ज करतो तेव्हा आणखी एक अडचण उद्भवते: पासपोर्ट ऑफिसद्वारे दिलेल्या सर्व सूचना, आक्षेप आणि अर्जाच्या सध्यस्थितीबाबत पत्रव्यवहार एजंटच्या ईमेल पत्त्यावर येतात, ज्या क्वचितच कळतात. यामुळे आपले दुहेरी नुकसान होते कारण निष्कारण पैश्याचा अपव्यय आणि वर त्रास.

पीएचडी करत असताना माझे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक चंद्रकांत भोसले सर आयआयटी मुंबई येथे दोन महिन्याच्या अभ्यास रजेवर गेले असता तिथे मूळचे ऑस्ट्रियाचे पण फ्रान्समध्ये शास्त्रज्ञ असलेले प्राध्यापक मायकल न्यूमन स्पेलार्ट यांच्यासोबत ओळख झाली. काही दिवस मीही सरांसोबत आयआयटीत होतो त्यामुळे माझीही त्यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर मायकल सर त्यांच्या भारत भेटीदरम्यान काही कालावधीसाठी शिवाजी विद्यापीठात येऊ लागले. एव्हाना माझं पीएचडीच काम संपून मी शिवाजी विद्यापीठात शिक्षक म्हणून रुजू झालो होतो. त्यांच्या मार्च २००० मधील शिवाजी विद्यापीठ भेटीदरम्यान सहज बोलता-बोलता मी मायकल सरांना फ्रान्समध्ये पोस्ट डॉक करण्याच्या शक्यतेविषयी चौकशी केली आणि त्यांना विनंती केली की त्यांच्याकडे जर एखादी शिष्यवृत्ती असेल तर मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट डॉक करायला उत्सुक आहे. ते म्हणाले फ्रान्स ला परत गेल्यानंतर शक्यता तपासतो आणि साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात मला कळवतो. माझ्या बाबतीत पासपोर्ट प्रक्रिया कशी प्रज्वलित झाली हे सर्वांना समजण्यासाठी हा अनुभव सुरुवातीला शेअर केलाय. मायकेल सर मला भेटले नसते तर कदाचित तेव्हासुद्धा मी पासपोर्टसाठी अर्ज केला नसता.

त्यांच्याशी सहज बोललो होतो खरं वस्तुतः मी इथे कायमस्वरूपी सेवेत नव्हतो त्यामुळे पोस्ट-डॉकला जायचं म्हटलं तर राजीनामा देऊनच जावे लागणार होते. तसेच घरात देखील चर्चा केली नव्हती आणि महत्वाचे म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींची पूर्तता देखील केली नव्हती. मला वाटलं नक्की त्यांच्याकडे पोस्ट डॉक जागा नसणार आणि त्यांचा नकारात्मक निरोप येणार.. पण झालं मात्र नेमकं उल्टं.. जून २००० च्या पहिल्या आठवड्यादरम्यान त्यांचा ईमेल आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी माझ्यासाठी शिष्यवृत्तीची एक जागा तयार केली होती आणि मला एक सप्टेंबरला फ्रान्सच्या प्रयोगशाळेत जाऊन रुजू व्हायचे होते. आता आली का पंचाईत ! परदेशगमनाचे बहुप्रतिक्षित स्वप्न साकार होणार होते पण माझ्याकडे पासपोर्ट नव्हता. मार्च मध्ये चर्चा करूनही मी वेळेत प्रक्रिया सुरू न केल्याने पासपोर्ट हातात नव्हता. कदाचित ते घडणार नव्हते म्हणून मी गाफील होतो. मग मात्र मला या हलकेच घेतलेल्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात आले. महत्वाचे म्हणजे त्या वेळेला मॅन्युअल प्रक्रियेत, सर्व कागदपत्रे असतील तरी नवीन पासपोर्ट मिळण्यासाठी किमान तीन महिने आणि जास्तीत जास्त पाच महिने लागत असत आणि तेव्हा माझ्या हातात फक्त तीन महिने बाकी होते.

दरम्यान, आपला लेक दोन वर्षांसाठी सातासमुद्रापार जात असल्याचे माझ्या आईच्या कानावर आले. तिचा मुलगा गरीब शेतमजूर कुटुंबातून आलेला असल्याने 'तो कधीतरी परदेशात जाईल' असा विचार तिने आयुष्यात कधीच केला नव्हता. तिला माझ्याबद्दल अभिमान होताच पण तिला माझी पुढील दोन वर्षे भेट होणार नाही म्हणून ओढीने हुरहूर आणि मायेपोटी काळजी वाटत होती. मी परदेशात जाण्यापूर्वीच तिने खूप विचार केला. ती भेटेल त्यांना सांगायची आणि भावूक व्हायची. दुर्दैवाने मी तिचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही.

पासपोर्ट काढताना रेशनकार्ड हा ओळखीचा महत्त्वाचा पुरावा असल्याचे समजले (आता आधार व पॅन कार्ड लागते). म्हणून मग गावी जाऊन राशन कार्ड घेतले. पाहतो, तर काय ? रेशनवर माझे नाव केसु नसून आप्पासाहेब होते. यातील 'आप्पासाहेब' हे तलाठ्याची तर 'केसू यशवंत' ही कोदे गुरुजींची देण ! खरं तर पहिलीच्या प्रवेशावेळी माझ्या वडिलांनी कोदे गुरुजींना माझे नाव - केसू येसू राजपुरे- असे  ठेवण्यास सांगितले होते ! पण गुरूजींनी स्वतः माझ्या पूर्ण नावात उच्चारायला थोडे कमी खेडवळ वाटावे म्हणून - केसू यशवंत राजपुरे - असा बदल केला होता. माझे आजोबा माझ्या पोटाला आले होते म्हणून घरी सर्वचजण आप्पा म्हणत.. अद्याप गावी माझे हेच नाव प्रचलित आहे. जन्मतारखेचा पुरावा, अर्थात दहावीच्या सर्टिफिकेटवर केसू हेच नाव असल्याने मला तेव्हा खात्री झाली होती की रेशन वरील नाव बदलणे आवश्यक होते. त्यासाठी तहसीलदार कार्यालयात एफिडीवेट करावे लागणार होते, ते घेऊन तलाठी ऑफिस मध्ये जावे लागणार होते आणि मग मला नवीन रेशन कार्ड मिळणार होते. त्यानंतर मी पासपोर्ट ला अर्ज करणार होतो तेव्हा त्याच्यापुढे तीन महिन्यानंतर पासपोर्ट येणार होता. सर्व गोष्टी वेळेत होतील याची खात्री वाटत नव्हती पण मी आशावादी, प्रयत्न करायला तयार होतो.

एफिडेविट चे काम एका दिवसात झाले. मग मी ते तलाठी कार्यालयात नेऊन दिले. त्यांनी सांगितले या गोष्टीस आठ दिवस लागतील. मग मी पुन्हा आठ दिवसानंतर वाईला जाऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की नवीन रेशनकार्ड अजून आठ दिवसांनी उपलब्ध होतील तेव्हा नक्की काम होईल. या सर्व प्रकारात माझ्या दोन-चार फेऱ्या झाल्या आणि एक महिना कधी उलटला ते समजले नाही. एव्हाना माझ्या लक्षात आले होते की मला वेळेत पासपोर्ट मिळणे शक्य नाही. त्यामुळे दुर्दैवाने फ्रान्सला जाण्याचा माझा मनसुबा मी बदलला आणि मायकल सरांना ईमेल पाठवला की - पासपोर्ट नसल्यामुळे येणे शक्य नाही. मला क्षमा करावी आणि इतर गरजू विद्यार्थ्याला ती शिष्यवृत्ती द्यावी. माझ्याकडे पासपोर्ट नाही हे समजल्यावर मायकेल सरांना आश्चर्य वाटले. हातात पासपोर्ट नसताना मी त्यांना शिष्यवृत्तीबद्दल कसे विचारले, असा विचार त्यांनी मनोमन केला असावा.

खरे सांगायचे तर, आज मागे वळून पाहताना असे निदर्शनास येतेय की, तेव्हा मी पासपोर्ट मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नव्हते. मी लवकर पासपोर्ट मिळवण्याचे महत्त्व जवळच्या कोणालाही सांगितले नव्हते. ना आप्तेष्ट, मित्र किंवा शिक्षकांना याबाबत मारदर्शन वा आवश्यक मदतीची विनंती केली होती. जर तेव्हा मला वेळेत पासपोर्ट मिळाला असता, तर भौतिकशास्त्र विभागातील परदेश वारी केलेला पहिला पोस्ट-डॉक फेलो असतो आणि माझ्या करिअरचा मार्ग सध्यापेक्षा नक्कीच वेगळा असता. याचा अर्थ असा नाही की मी माझ्या सध्याच्या पदावर आणि शिक्षकी पेशावर असमाधानी आहे. मी पूर्णपणे समाधानी आहेच परंतु खंत उरते ती परदेश वारीची चालून आलेली नामी संधी न पटकावल्याबद्दल. 

तसा मी निराश झालो होतोच पण त्याहीपेक्षा मला शरम या गोष्टीची वाटते की प्रविण्यासह पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करूनही सर्व रेकॉर्डवरील नावाच्या समानतेबद्दल मी गहाळ होतो. एकतर मी या गोष्टी महत्त्वाच्या न वाटल्याने गंभीर नव्हतो किंवा माझी समज तेवढी सक्षम नव्हती. मनाशी खूणगाठ बांधली की मला परदेशात जाण्याची संधी मिळणार नसली तरी माझ्याकडे महत्त्वाचे ओळखपत्र असायला हवेच. म्हणून अगदी जिद्दीने ठरवले की काहीही झाले तरी मी पासपोर्ट मिळवणारच. मी ते एक आव्हान म्हणून स्वीकारले.

नावात सुधारणा करून नवीन रेशन कार्ड मिळण्यास विनाकारण विलंब होत असल्याचे माझ्या लक्षात आल्यावर काहीही करून रेशन कार्ड मिळवायचेच हा निर्धार केला. पुढे सप्टेंबर महिन्यात मी तलाठी कार्यालयात चौकशीसाठी गेलो आणि साम दाम दण्ड भेद वापरून एका तासाच्या आत केसू नावासह नवीन रेशनकार्ड मिळवले. हा शासन दरबाराचा अनुभव पाठीशी ठेवत ठरवले की मी एजंटविना स्वतःच्या प्रयत्नाने पासपोर्ट मिळवणार. सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सादर करण्यासाठी मी पुण्याला गेलो. मला आठवतं, तेव्हा मी भर उन्हात चार तास रांगेत उभा होतो तरीही अर्ज स्वीकृती खिडकीपर्यंत माझा नंबर आला नव्हता. मला त्या दिवशी पुण्यात रहावे लागले आणि दुसऱ्या दिवशी लवकर रांगेत उभा राहून मी अर्ज जमा केला होता. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होते. तसेच तुम्हाला अगोदरच सोयीची अपॉइंटमेंट तारीख व वेळ मिळते. अपॉइंटमेंट मर्यादित व्यक्तींना दिलेली असते त्यामुळे वेळ वाया जात नाही आणि ताटकळत बसावे लागत नाही. 

मी अर्ज केला आणि विसरून गेलो कारण मला तेव्हा पासपोर्टची निकड नव्हती. म्हणूनच पासपोर्ट लवकरात लवकर मिळण्यासाठी मी इतर प्रयत्न केले नाहीत. तसेच वाई पोलिसांच्या चौकशी अहवालाचीही मला चिंता नव्हती. एके दिवशी मला घरून निरोप आला की - पासपोर्ट बद्दल पोलिस स्टेशनमधून फोन आला होता आणि मला तिथे बोलावले होते. मग धावपळ न करता माझ्या सवडीने मी पोलीस स्टेशनला गेलो आणि औपचारिकता पूर्ण केली. तेथील चौकशी अधिकारी माझ्या विद्यार्थ्याचे वडील असल्याने त्यांनी माझ्या कोल्हापूर येथील वास्तव्यामुळे काही अडचण येणार नाही अशा पद्धतीने अहवाल दिला. आश्चर्य म्हणजे त्यानंतर एका महिन्याच्या आत मला माझ्या अनपटवाडी गावच्या पत्त्यावर पासपोर्ट मिळाला. मी निवडले नसलेल्या नावाला सिद्ध करण्यासाठी मात्र तोपर्यंत माझी दमछाक झाली होती. त्यावेळी माझ्याकडे पासपोर्ट होता मात्र परदेशात जाण्यासाठी आवश्यक संधी आणि इच्छा नव्हती.

वर्षभरानंतर माझा परदेश दौरा रद्द झाल्याची बातमी सगळीकडे पसरली. या परदेश दौऱ्याच्या अनावश्यक प्रसिद्धीबद्दल लोक कुजबुजू लागले. तेव्हढ्यात माझ्यापेक्षा लहान इंजिनीयर मित्राला परदेशी जाण्याची संधी आली. 'बघा हे तुमच्या मागून निघाले, तुम्ही कधी जाणार?'- लोकांच्या तोंडावर कोण हात ठेवणार होते. पण हे बोलणं मात्र माझ्यासाठी खूपच निराशाजनक होते. तेव्हापासून आजतागायत मी माझी कोणतीही गोष्ट इतरांनी जाहीर केल्याखेरीज अनावश्यकपणे प्रसिद्ध केली नाही.

विद्यापीठातील शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती झाल्यास त्यांना अभ्यास रजा मिळण्याची तरतूद आहे. हंगामी नोकरीमुळे माझ्या बाबतीत ते शक्य नव्हते आणि मला अभ्यास रजा मिळण्याचा अधिकार नव्हता. कालांतराने कुटुंबविस्तार झालाच आणि अनुषंगाने जबाबदाऱ्या वाढल्या. त्यामुळे माझ्या मनात नोकरीत कायम झाल्यानंतरच वर्षभराच्या वा तत्सम परदेशी भेटींचे नियोजन करण्याचा विचार आला. वेळ कुणासाठी थांबत नाही. तोपर्यंत आमच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी पोस्ट डॉक संशोधनासाठी युरोप आणि पूर्व आशियातील देशांना भेटी दिल्या. किंबहुना कॉन्फरेन्सलाही परदेशात जाण्याचा विचार माझ्या मनात येत नसे. मी किमान दक्षिण कोरियाला भेट द्यायला हवी होती - असे काहीजण मला टोमणे मारत. 

साधारणपणे, प्रौढांसाठी पासपोर्ट जारी केल्याच्या तारखेपासून १० वर्षांसाठी वैध असतो आणि त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते. त्यामुळे दहा वर्षांनी २०११ मध्ये माझ्या पासपोर्टचे नूतनीकरण आले. तोपर्यंत परदेश प्रवास माझ्या नशिबातच नसेल असे समजून बऱ्याच संधी नाकारल्या. तरीही मी आशावादी होतो. त्यामुळे भविष्यातील अज्ञात संधींची वाट पाहत पासपोर्टचे नूतनीकरण करण्याचा विचार केला. एव्हाना लग्नानंतर सहकुटुंब कोल्हापुरात रहात होतो. रेशनकार्ड माझ्या मूळ गावाहून कोल्हापुरात भाड्याच्या घराच्या पत्त्यावर हस्तांतरितही केले होते. मला घर मालकांच्या पत्त्यावरून अर्ज करावा लागला. आत्ता पासपोर्ट मध्ये नवीन पत्ता, कामाचे ठिकाण आणि इतर आवश्यक बाबी येणार होत्या. तो पत्ता मिळवतानाचा देखील एक मजेदार अनुभव आहे. माझ्या घरमालकांनी मी त्यांच्या घरात भाड्याने राहात असल्याचे प्रमाणपत्र आणि 'ना हरकत प्रमाणपत्र' देण्यास सुरुवातीस टाळाटाळ केली कारण त्यांना भीती होती की अशा प्रमाणपत्रांद्वारे मी त्यांच्या खोल्यांचा ताबा घेऊ शकलो असतो. त्यानंतर मी त्यांच्या चिरंजीवांसह त्यांना 'असे काहीही होणार नसल्याचा' विश्वास दिल्यानंतरच मला 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळाले.

यासाठी आवश्यक नोकरीच्या ठिकाणचे 'ना हरकत प्रमाणपत्र' मला विद्यापीठाकडून लगेच मिळाले कारण दरम्यानच्या काळात माझी नियमित नियुक्ती झाली होती. मला वाटले की नवीन घडामोडींनंतर पासपोर्ट मिळणे अडचणीचे असेल, पण ते विनाविघ्न पार पडले आणि मला फक्त माझा फोटो बदलण्यासाठी दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट घ्यावी लागली. यावेळी पोलीस चौकशी देखील झाली नाही. मला पटकन पासपोर्ट मिळाला. तेव्हा मला समजले की पहिल्याचवेळी अडथळ्यांनी परीक्षा घेऊन मला धडा शिकवला होता.

२०१४ साली थेट भरतीद्वारे मी विद्यापीठात नियुक्त प्राध्यापक झालो. आता मला आंतरराष्ट्रीय संवादाची संधी मिळेल असे वाटले. पण नंतर.. दुर्दैवाने माझ्या पूर्व पत्नीचे आकस्मात निधन झाले. मुलींच्या अदृश्य जबाबदारीने मला त्यांना एक मिनिटही सोडून जाण्याचा निर्णय घेता आला नाही. दरम्यान, मला अपरिहार्य परिस्थितीमुळे जपान, सिंगापूर, दक्षिण कोरियाच्या नियोजित छोट्या भेटी रद्द कराव्या लागल्या. २०१९ ते आत्तापर्यंत संपूर्ण जग कोरोना विषाणूने भयभीत झाले होते. पण वेळ स्वतःच्या गतीचे पुढे सरकत असते. माझ्यासाठी त्याने मग का थांबावे ? काळाने माझ्यासाठीचा आणखी १० वर्षांचा पासपोर्टचा वैध कालावधी गिळंकृत केला. बघता बघता दुसऱ्या नूतनीकरणाची वेळ आली देखील ! 

माझ्या पासपोर्टच्या दुसऱ्या नूतनीकरणाची तारीख जानेवारी २०२२ होती. पण अर्ज करायला मीच उशीर केला कारण आम्ही ओळखीच्या पुराव्यात नवीन तपशीलांसह अपडेट केलेले आधार कार्ड मिळण्याची वाट पाहत होतो की जे जुलै २०२२ मध्ये मिळाले. कुटुंबाचा नियोजित परदेशी दौरा नजरेसमोर ठेऊन, कुटुंबातील सर्व सदस्यांची पासपोर्ट निकड वाटू लागली. तात्काळ सर्व सदस्यांच्या अर्जाची एकाच वेळी तयारी सुरू केली. यावेळी केसू ते केशव नावात मोठा बदल झाला होता. हा नाव बदल करण्याचे मुख्य कारण म्हणजे रेकॉर्डवरील आणि माझ्या संभोधनाचे नाव यात एकसमानता यावी. अगोदरच्या परिसरालगतच नवीन पत्त्यावर तीस वर्षांनंतर प्रमथच कोल्हापुरात स्वतःच्या मालकीचे घर झाले होते. पुनर्विवाहामुळे सहचारिणीचे तपशील बदलणे आवश्यक होते. नावातील बदल आणि अपुरी कागदपत्रे यावर आक्षेप घेतला जाईल की काय याची मला काळजी वाटत होती. अर्थात माझ्या पाठीशी दोनदा पासपोर्ट अर्ज करण्याचा तसेच संबंधित अडचणींचा सामोरे जाण्याचा अनुभव होताच. विचार केला की अर्ज तर करूया आणि त्रुटी निघाल्या तरच दुरुस्त्या करू. जुलै मध्ये नूतनीकरणासाठी एजंट मार्फत ऑनलाईन अर्ज भरला आणि कोल्हापुरातील ऑगस्ट ची अपॉइंटमेंट मिळाली.

म्हणतात ना - मन चिंती ते वैरी न चिंती.. मनात नकारात्मक विचार येऊ लागले. या अडचणी येतच राहाणार.. आणि पासपोर्ट मिळणार नाही किंवा नूतनीकरणास उशीर केल्यामुळे काहीतरी दंड होणार. तेव्हा माझ्याकडे आधार, पॅन आणि गॅझेटमध्ये "केशव यशवंत राजपुरे" नावाचे अचूक स्पेलिंग होते. एकदा तर वाटले कि पासपोर्ट नूतनीकरण करण्याऐवजी हे जुने एप्लिकेशन रद्द करून नव्या आधार तसेच पॅन कार्डसह आणि नावातील बदलाच्या गॅजेटसह नव्याने अर्ज करून या कागदपत्रांतील त्रुटींची कटकट दूर करावी. चौकशी केली असता तेही शक्य नसल्याचे समजले कारण नव्याने नोंदणी होत नाही. म्हणजे अडचणी या अटळ होत्या.. 

दस्तऐवज पडताळणी भेटीच्या दिवशी अनेक त्रुटी आढळल्या. मयत पत्नीचे 'मूळ मृत्यू प्रमाणपत्र', नवीन विवाह 'मूळ प्रमाणपत्र', दुसऱ्या पत्नीचे 'नाव बदललाचे गॅझेट (राजपत्र)' या सर्वाची दुपारपर्यंत पूर्तता करण्यास सांगितले की जे शक्य नव्हते. जुना पासपोर्ट आणि आधार कार्डमध्ये माझ्या वडिलांच्या नावातील 'a' अक्षराचा फरक होता. कागदपत्रे तपासणाऱ्या संबधीत व्यक्तीने हे तेव्हाच ओळखले असते आणि मला दुरुस्त करण्यासाठी सूचित केले असते, तर मी या सर्व दुरुस्ती एकाच झटक्यामध्ये केल्या असत्या. पण नाही, मला त्रास झाल्याशिवाय ते होणार नव्हते. त्यांनी पुढच्या तारखेची अपॉइंटमेंट घेण्यास सांगितले.

मग मला ऑक्टोबरमध्ये (२ महिन्यांनंतर) पुन्हा अपॉइंटमेंट मिळाली. तशी कागदपत्रांच्या अडथळ्याविना पडताळणी बद्दल खात्री नव्हती. निदान एक तरी चूक निघणारच असे वाटत होते. आणि झालेही तसेच. त्यांनी वडिलांच्या नावातील 'a' अक्षराचा प्रश्न उपस्थित केला. मी दोन संबंधित पुरावे सादर केले तरीपण त्याचे समाधान झाले नाही. संबंधित अधिकारी म्हणाला की - कागदपत्रे तूर्तास पुण्याच्या कार्यालयात पाठवतो आहे पण तिथे काही स्पष्टीकरण द्यावे लागले तर तुमचं तुम्ही बघून घ्या. खरं तर, प्रक्रियेत इतका विलंब झाल्यामुळे मी निराश झालो होतो. मी म्हणालो, जर काही अडचण असेल तर माझा मी हाताळेल. ऑनलाइन पद्धतीने गेलं एकदा प्रकरण पुण्यात.. या पासपोर्टवाल्या अधिकाऱ्यांची नजर इतकी तीक्ष्ण असते की पुण्यात नेमकी 'a' अक्षराची शंका उपस्थित झाली. 

या ऑनलाइन प्रणालीत एक गोष्ट चांगली आहे की आपण आपल्या पासपोर्टचे स्टेटस ऑनलाइन पद्धतीने तपासू शकतो. त्रुटींचे निराकरण करण्यासाठी त्यांच्याकडे स्पीड पोस्टद्वारे प्रमाणित कागदपत्रे स्वीकारण्याची सुविधा आहे म्हणून बरे ! पुणे येथील ऑफीसला देखील मला दोनदा कागदपत्रे पाठवावी लागली, तरीही पासपोर्ट क्लियर झाला नाही. म्हणून यासाठी मी इतर मार्गांनी प्रयत्न केला. मी पोस्टल एक्झिक्युट्युव्ह तसेच कोल्हापूर दस्तऐवज पडताळणी केंद्रातून पुण्याला फोन केला आणि त्रुटी नेमकी काय आहे याची खात्री केली. तोपर्यंत मी अपेक्षेप्रमाणे आधारकार्ड वरील वडिलांचे नाव दुरुस्त केले होते. यास केवळ तीन दिवस लागले. इतर आवश्यक कागदपत्रांसोबत ऑनलाइन काढलेली नवीन आधार कार्डची रंगीत मुद्रित आवृत्ती प्रमाणित करून पुण्याला पाठवून दिली. या सगळ्या पार्श्वभूमीवर अगदी वैतागून -आता हा शेवटचाच प्रयत्न समजून - मी कोणत्याही परिस्थितीत पुणे कार्यालयात जाणार नाही, असे ठरवले.

तोपर्यंत माझा पासपोर्ट सहकारी आणि मित्रांमध्ये गंमतीचा विषय झाला होता. प्रत्येक वेळी मी त्यांच्याशी त्रुटी आणि माझ्या त्यावरील अंमलबजावणीवर चर्चा करी. दुष्काळात पाऊस पडेल पण माझा पासपोर्ट येणार नाही - अशा त्यांच्या मजेशीर कमेंट होत्या. बहुप्रतीक्षित पासपोर्ट लवकर न आल्याच्या अशाच केसेस मी ऐकायचो मग माझ्या अस्वस्थतेत भर पडे. 'भीक नको पण कुत्रा आवर' अशी मनस्थिती.. एके दिवशी रागाच्या भरात मी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला कारण दोन महिने झाले तरी माझ्या पासपोर्टची 'ऑब्जेक्शन' स्थिती बदलत नव्हती. तरीही मी शांत राहिलो आणि नियतीवर विश्वास ठेवला. 

८ डिसेंबर रोजी मी ऑनलाइन स्टेटस तपासले तर आश्चर्य ! माझा पासपोर्ट क्लियर.. कागदपत्रे पुढील चौकशी अहवालासाठी राजारामपुरी पोलिस स्टेशनला पाठवली आहेत. बाकीची प्रक्रिया अवघड नसल्यामुळे मला खूप आनंद झाला. पासपोर्ट मिळणार याचा आनंद ! एक वेळ अशी होती की मी पासपोर्ट चा नाद सोडला होता. मग राजारामपुरी शाखेतील संबंधित पोलीस अधिकाऱ्यास विनंती केली. त्यांनी त्यांचा अहवाल १२ डिसेंबर रोजी जिल्हा कार्यालयात पाठविला, त्यांनी तो तात्काळ पुणे कार्यालयात पाठविला. पासपोर्टची १४ डिसेंबर रोजी छपाई झाली आणि आज १८ डिसेंबर २०२२ रोजी (अर्ज केल्यानंतर ६ महिन्यांनंतर) मला तो मिळाला. खूप आनंद झाला. हा आनंद पासपोर्ट मिळाल्याचा नव्हे तर कटकटीतून मुक्त झाल्याचा होता.

माझा पासपोर्ट प्रलंबित असल्याने मी माझ्या दुसऱ्या मुलीच्या पासपोर्टसाठी अर्ज करू शकलो नाही. आता मी माझ्या अल्पवयीन कन्येचा पासपोर्ट अर्ज ईसीआर (इमिग्रेशन चेक आवश्यक आहे) श्रेणीमध्ये करू शकतो. अल्पवयीन अर्जदार १८ वर्षे वयाची झाल्यानंतर नॉन-ईसीआरसाठी पात्र असतात. सर्वसाधारणपणे, जर तुम्ही १० वी (मॅट्रिक किंवा उच्च शैक्षणिक उत्तीर्ण प्रमाणपत्र) उत्तीर्ण केली असेल किंवा उच्च पदवी असेल तर तुमचा पासपोर्ट नॉन-ईसीआर श्रेणीमध्ये येतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कागदपत्र पडताळणीनंतर माझ्या सौभाग्यवती आणि मोठ्या मुलीचे पासपोर्ट ऑक्टोबरमध्ये अवघ्या आठवडाभरात मिळाले होते. कुटुंबातील चारपैकी तीन पासपोर्ट आता मिळाले आहेत, उरलेल्या एकासाठी आता प्रयत्न बाकी आहेत.

नावात बदल, पत्त्यात बदल आणि जोडीदाराच्या नावाचा समावेश ही महत्त्वाची प्रक्रिया आहे म्हणून ते त्याबाबत खूप सतर्क असतात. कागदपत्रात कुठेही नावात एका अक्षराची चूक नसावी. सर्वत्र नावाचे स्पेलिंग सारखेच असावे. पण जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला फक्त तीन योग्य कागदपत्रांची गरज आहे १) आधार कार्ड, २) पॅन कार्ड, ३) एसएससी प्रमाणपत्र. 

शेवटी अनेक चढउतार पार करत आणि मनाच्या वेगवेगळ्या अवस्थेतून प्रवास करून मला पासपोर्ट मिळू शकला व आप्पासाहेब-केसू-केशव यांच्या पासपोर्ट कथेचा शेवट गोड झाला.

© केशव यशवंत राजपुरे

(आपल्या प्रतिक्रिया माझ्या लिखाणात सुधारणा करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. आपल्या नावासह खालील बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्याव्या ही विनंती)

3 comments:

 1. जे जे नवीन पाही।ते ते लिहून घेई॥
  जे जे विचार ऐकी।ते ते टिपून घेई॥
  प्रत्येक क्षण घे वेचुनि। यत्नात जा नित्य रंगुनि ॥
  घे जिद्दिने यश खेचुनि।होईल सार्थक जीवनी ॥

  वरील वचनाप्रमाणे आपण आपले जीवनानुभव आपल्या लेखनीद्वारे अगदीसहज रितीने शब्दबद्ध केले आहेत. नक्कीच वाचकांना त्याचा उपयोग होईल.

  ReplyDelete
 2. खूप छान लेख! स्वतः ची कागदपत्रे बिनचूक का असावी यासाठी आपला अनुभव हा इतरांसाठी मोठा धडा आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. Laxmikant P DamodareDecember 20, 2022 at 5:36 PM

   छान लेख. वाचून आनंद वाटला.

   Delete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...