Wednesday, June 3, 2020

श्री क्षेत्र सोनेश्वर



श्री क्षेत्र सोनेश्वर

सनातन धर्माच्या तत्वानुसार कृत, त्रेता, द्वापार, कली या युगांमध्ये मानवाची सत्प्रवृत्ती, मानसिक व शारीरिक कार्यक्षमता यांचा उत्तरोत्तर ऱ्हास होत असतो. त्यामुळे मानवाकडून जादा पाप होत असते. परंतू साधर्म्य कमी असल्यामुळे कृच्छ-चांद्रायणादि शरीर कष्टाची प्रायच्छिते करून पापक्षालन करणे अशक्य असते. म्हणून कृष्णा स्नान, कृष्णाजलपान, एवढेच काय कृष्णा नदीच्या स्मरणाने देखील पातकांपासून मानवाची मुक्ती होते. या उद्देशाने प्रत्यक्ष भगवान विष्णूच कृष्णानदीस्वरूप झाले व त्यांच्याच आज्ञेने नदी-सागरादी तीर्थक्षेत्र मानवाच्या पापक्षालनार्थ उत्पन्न केली असे कृष्णा महात्म्यात सांगितले आहे. विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णूपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्व अधिक आहे.  

सोनेश्वर हे जागृत स्वयंभू महादेवाचे पुरातन हेमाडपंथी मंदिर, बावधन च्या बगाडाच्या संदर्भात महत्वाचे मंदीर आहे. सोनेश्वर बावधनच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या तीरावरील टेकावर आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूस नदीच्या दोन्ही तीरावर कजाळाची दाट झाडी असून नदीवर प्रचंड पाण्याचे डोह आहेत. नवनाथापैकी मच्छिंद्रनाथांनी कृष्णा नदीतील डोहात टाकलेल्या सोन्याच्या विटेवरुन या तिर्थक्षेत्राला सोनेश्वर असे नाव पडले असावे. तेव्हा पासून आजपर्यंत या डोहातील पाणी कधीच आटले नाही असे सांगतात. त्याचा तळही कधी सापडला नाही. मंदिर प्रत्यक्ष ओझर्डे गावाच्या हद्दीत, गावच्या पश्चिमेला दीड किलोमीटर अंतरावर असून हे मंदीर अठराव्या शतकात ओझर्ड्याच्या पिसाळ देशमुख मंडळींनी बांधले आहे. ग्वाल्हेरच्या अनेक धनिकांनी या मंदिरास देणग्या दिल्या आहेत.


मंदीर घोटीव चीऱ्यांनी बांधले असून या पश्चिमाभिमुख मंदिरात शंकराची पिंड आहे. पिंडीवर संततधार पाणी पडत असते. या देवालयासमोर वीस-बावीस फुटावर लहानश्या चौथऱ्यावर चौफेर कमानीत नंदी असून त्याच्या गळ्यातील घंटेत असलेल्या बगाड्याच्या मूर्तीवरून बगाड हे सुमारे ३१३ वर्षांपूर्वीपासून सुरु झाले असावे असे म्हणतात. मंदीर ३१३ वर्षापूर्वी बांधले असतानाच नंदी तयार केला असला पाहिजे. बावधनमध्ये भैरोबाच्या मंदिरात खांबांनाही ठोकलेले नालांचा आकडादेखील यादरम्यानच आहे. या दोन्ही गोष्टींवरून बगाडाची सुरुवात ३१३ वर्षापूर्वी झाली याचा अंदाज बांधता येतो. याच देवालयापासून बगाडाची सुरुवातही होते. बगाड्या सोनेश्वर डोहात स्नान करून विशिष्ट पोषाख घालून नंतरच बगाडाच्या शिडाला टांगतात. 


देवालय २६ फूट लांब व १९ फूट रुंद व साडेदहा फूट उंच असे आहे. हे स्थान फार पुरातन असून या स्थानासंबंधाचे महत्त्व श्री कृष्णामहात्म्य मध्ये आहे. याचे पूर्वीचे नाव हटकेश्वर. हटक म्हणजे सोने यावरून सोनेश्वर हे नाव पडले असावे असे वाटते. गाभारा दहा फूट चौरस आहे. गाभाऱ्याला लागूनच लहानशी पडवी आहे. देवालयासमोर चौथऱ्यावर नंदी आहे व त्यामागे श्री मारुतीराज आहेत.

नित्य नियमाने आरती, रुद्राभिषेक मंत्रोच्चारात केले जातात. श्रावणात व चातुर्मासात शेकडो भक्तगण गुरु चरित्रांचे पारायणे करतात. अनेक ग्राम दैवताच्या पालख्या आणि कावडी नदीत स्नान करुन येथील महादेवाच्या भेटीला येतात. यावेळी सोनेश्वर परिसराला जत्रेचे स्वरुप येते. यावेळी ओझर्डे ग्रामस्थ व दत्त सेवेकरी मंडळा तर्फे महाप्रसादाचे वाटप केले जाते.

या देवालयात विश्वनाथ बोवा कर्नाटकी ब्राम्हणाने चाळीस दिवस उपोषित राहून आराधना केली तेव्हा बुवांना दृष्टांत झाला की "या ठिकाणी सेवा करून राहावे". विश्वनाथ बोवानी श्रीगुरुचरित्र हातांनी सुरेख लिहिले आहे. ही हस्तलिखित प्रत देवालयात पूर्वी होती. ते इथे श्री दत्त जयंतीचा उत्साह देखील करीत असत. बुवांचे म्हणण्यात हे स्थान दत्त स्वरूपी आहे. बुवांनी याठिकाणी सुमारे पंचवीस वर्षे काढली. पुढे श्री क्षेत्र काशी येथे जाण्याचे बुवांचे मनात आले. म्हणूनच बुवांनी आपले शिष्य काशिनाथपंत केंजळकर यांना "श्री सोनेश्वराची" पूजा वगैरे सर्व व्यवस्था सांगून आपण श्री क्षेत्र काशी येथे गेले. ते तिकडेच वारले. बुवांचे शिष्य काशिनाथपंत केंजळकर कुलकर्णी हे पुढे तिथे राहत. काशिनाथपंत यांनी प्रपंच सोडून बुवांचे व्रत पुढे चालू ठेवले होते.

पूर्वी या मंदिर व परिसरात लोक तपश्चर्येला बसत असत. काही ऋषींनी मंदिरात व परिसरात समाधी घेतली असल्याचे लोक सांगतात. ४० ते ५० वर्षांपूर्वी या ठिकाणी मंदिर परिसरात सपाटीकरण केल्यानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत समाधी घेतलेल्या अवस्थेतील पाच मानवी सांगाडे सापडले होते. दगडी बांधकाम केलेल्या समाध्या सापडल्या आहेत. या समाधीच्या तोंडावर गोल मोठ्या दगडी चाकांच्या आकारांचे झाकण असून त्यावर सूर्याचे चिन्ह आहे. त्यामुळे ते सूर्य उपासक असावेत, असा अंदाज पुरातत्व खात्याने वर्तवला आहे.    


केंजळ गावचे हैबतराव जगताप इनामदार यांनी येथे लहानसा घाट व चिदंबरेश्र्वराचे देवालय बांधले आहे. हे पूर्वाभिमूख मंदिर २८ फूट लांब व १८ फूट रुंद असे आहे. दर्शनी तीन कमानीची पडवी आहे. समोर चौथऱ्यावर नंदी आहे. देवालयासमोर एकामागे एक असे दोन मनोरे आहेत. एक अष्टकोनी व दुसरा चौकोनी आहे. हे मनोरे फारच सुरेख बांधले आहेत. श्री चिदंबराची पूजा वगैरे ची व्यवस्था काही नाही.



असेही म्हणतात की पूर्वी ओझर्डे हे गाव पौराणिकदृष्ट्या महत्त्वाच्या सोनेश्वर तीर्थस्थानाजवळ कृष्णा नदीच्या काठावर वसलेले होते. सूर्याजी पिसाळ यांचे काळात ओझर्डे मधील विद्यमान पद्मावती मंदिरही ओझर्डेच्या पश्चिमेस, सोनेश्वर मंदिरास समांतर अंतरावर होते. नंतर त्यांनी गाव आणि पद्मावती मंदिराची जागा देखील हलविली. पण पूर्वी त्यांची स्मशानभूमी या परिसरात होती. केंजळचे जगताप इनामदार यांनी ही जागा मंदिर व स्मशानभूमीसाठी दिली होती. आता स्मशानसुद्धा त्यांनी हलवले आहे. ओझर्डे ते केंजळ या सरळ रस्त्यांसाठी जगताप इनामदार यांच्या खातर ओझर्डे, पांडे, बोपेगाव, कवठे गावांनी जागा दिल्या आहेत.

येथील घाटावरून पूर्वेस चंदन वंदन किल्ले व दक्षिणेस वैराटगड किल्ला वगैरे देखावा फार प्रेक्षणीय दिसतो. तेथील घाट, देवालय व मनोरे यांच्या योगाने हे स्थान विशेष रमणीय झाले आहे. हे निसर्गरम्य ठिकाण असून या ठिकाणी शाळांच्या सहली येतात व भाविकांची गर्दी असते.  कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या नवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तसेच पुरातन  ऋषीमुनींच्या तपश्चर्येने आठवणीत राहिलेले श्री क्षेत्र सोनेश्व‍र सर्वत्र परिचित आहे. प्रत्येक सोमवारी या ठिकाणी संध्याकाळी चार वाजता रुद्रभिषेक व महाप्रसादाचे आयोजन येथील सेवेकरी मंडळा मार्फत केले जाते. श्रावण महिना, महाशिवरात्री या काळात लोकांची दर्शनाला गर्दी झाल्याचे दिसते.

श्री सोनेश्वरापासून नदीपलीकडे कडेगाव आहे. हा गाव मात्र येथून अगदी जवळ आहे. श्री सोनेश्वराचे दक्षिण बाजूस एक कौलारू धर्मशाळा आहे. ही धर्मशाळा वाई येथील पूर्वीचे मोहनीराज मामलेदार यांनी वर्गणी जमवून बांधली असे सांगितले जाते. 

संदर्भ:-
१. भैरोबाचा नवस; बावधनचे बगाड, जयसिंगराव येवले, संजीवनी प्रेस, १९८३.
२. श्रीक्षेत्र वाई वर्णन, गो.वी. आपटे १९११

(अजित आबा पिसाळ, अभिजित पिसाळ (ओझर्डे) यांचे माहिती संकलनातील मदतीसाठी आभार)

© डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाईल नंबर: ९६०४२५०००६
www.rajpure.com
https://rajpure.blogspot.com/2020/06/soneshwar.html
https://www.facebook.com/737138229733051/posts/2990382354408616/ 

4 comments:

  1. डॉ.केशव आपण श्री.क्षेत्र सोनेश्वर मंदिराचे वर्णन व त्याच्या संबंधीत असणाऱ्या पौराणिक ,ऐतिहासिक बाबी अप्रतिम रितीने मांडलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच सोनेश्वर देवस्थान चे महत्व तर वाढणार आहेच पण त्याचबरोबर कृष्णा नदीचे महत्व ही वाढणार आहे. यासंबंधीचे केंजळ गावचे योगदान दृष्टीक्षेपात येणार आहे.
    आपल्या या अभ्यासपूर्ण लेखनास त्रिवार वंदन व पुढील लिखाणास शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. rajpure sir khup chan ani dharmik mahiti milali dhanyawad.

    ReplyDelete
  3. rajpure sir khup chan ani dharmik mahiti milali dhanyawad.

    ReplyDelete
  4. rajpure sir khup chan ani dharmik mahiti milali dhanyawad.

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...