Sunday, April 19, 2026

अतिपरिचयात अवज्ञा- अनुभवांतून आलेली शहाणीव

पेरले ते 'प्रेम' उगवला तो 'अहंकार' 


'अतिपरिचयात अवज्ञा' ही म्हण मानवी संबंधांच्या बाबतीत किती अचूक ठरते, याचा प्रत्यय देणारा हा अनुभव आहे. विशेषतः शिक्षक आणि विद्यार्थी किंवा ज्येष्ठ आणि कनिष्ठ यांच्यातील नात्यात 'मर्यादा' आणि 'आदर' हे दोन महत्त्वाचे स्तंभ असतात. जेव्हा आपण माणुसकीच्या नात्याने एखाद्याला मदतीचा हात देतो, तेव्हा त्या व्यक्तीने कृतज्ञ राहणे अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या स्पर्धात्मक युगात आणि अहंकारामुळे अनेकदा तरुण पिढी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाला आणि त्यांच्या सहकार्याला विसरून जाते. हा लेख अशाच एका कटू अनुभवातून आलेली वैयक्तिक शिकवण आणि आत्मचिंतन मांडतो.

आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलांशी सलगी करण्याअगोदर काही गोष्टींचा अवश्य विचार करायला हवा, असे माझे वैयक्तिक मत आहे. विशेषकरून शिक्षक-विद्यार्थ्यांचे नातेसंबंध, तेही आपल्या मुलांच्या वयाच्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचे असलेले संबंध हे फार जपायला पाहिजेत, असे मला वाटते. काय होतं, सुरुवातीला आपली ओळख होण्याअगोदर, आपली सलगी होण्याअगोदर त्या मुलांना आपल्याविषयी एक प्रकारची आदरयुक्त भीती असते. आपण कोण आहोत, आपला स्वभाव कसा आहे हे त्यांना माहिती नसतं. एकदा का त्यांना आपल्याविषयी, आपल्या स्वभावाविषयी कळायला लागलं; आणि आपला मृदू व समजूतदार स्वभाव असेल, माणुसकी दाखवणारे आपले व्यक्तिमत्त्व असेल, तर ते पुढे जाऊन आपल्याला गृहीत धरायला कमी करत नाहीत. आपल्याला गृहीत धरून नम्रता तर सोडाच, पण आपली अवज्ञा करायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. याचा अतिशय वाईट आणि कटू अनुभव मला नुकताच आला, त्याबद्दल...


गेल्या वर्षी एक मुलगा इथे शिकायला आला. तो माझ्यापेक्षा अंदाजे ३५ वर्षांनी लहान असेल. त्याने नवीन प्रवेश घेतला होता, त्यामुळे त्याला इथल्या वातावरणाबद्दल, इथल्या सिस्टीम आणि शहराबद्दल काहीच माहिती नव्हती किंवा खूप कमी माहिती होती. शहरातून आल्यामुळे या छोट्या शहरात रमायला त्याला वेळ लागणार होता. मग आम्ही जिथे सकाळी बॅडमिंटन खेळायला जात असू, त्या हॉलमध्ये तो येऊ लागला. सुरुवातीला त्याच्याकडे रॅकेट नव्हतं, मग आम्ही त्याला रॅकेट देत असू. कधी वापरलेले शटलकॉक देत असू आणि मग त्याला खेळायला घेत असू.


पुढे पुढे त्याला हळूहळू खेळ जमू लागला आणि मग तो आमच्यात खेळू लागला. आमचा मोठा ग्रुप असल्यामुळे आम्हाला नेहमी डबल्सचा गेम खेळण्यासाठी चार जणांची आवश्यकता असायची. कधीकधी आमचे नेहमीचे मेंबर्स आले नाहीत, तर आम्ही या नवीन मुलांना संधी देत असू आणि त्यांना आमच्यात खेळायला घेत असू. त्याचा खेळ सुधारू लागला, मग त्याने चांगलं रॅकेट खरेदी केलं. परंतु साडेतीनशे स्पीड चे योनेक्स कंपनीचे किमती शटल त्याला परवडत नसायचे, त्यामुळे तो आमच्यात खेळत असे. बघता बघता तो बॅडमिंटनमध्ये पारंगत होऊ लागला. आमचे स्मॅश परतावून लावू लागला. ड्रॉप, रॅली शिकला. सर्व्हिस कंट्रोल आणि बिनचूक ड्रॉप शिकला. मग आमच्या ग्रुप मेंबरसारखा तो एक सहकारी म्हणून खेळू लागला.


आमचे काही सहकारी रेग्युलर येत नसत, त्यामुळे त्याला संधी मिळाली आणि तो आमच्या ग्रुपचा रेग्युलर मेंबर झाला. त्याने किट खरेदी केले, इनडोअर शूज खरेदी केले. विशेष म्हणजे माझा आणि त्याचा खेळ जुळला आणि तो माझा मिळताजुळता पार्टनर झाला. आम्ही बऱ्याच गोष्टी त्याला शिकवल्या. तोही बऱ्याचशा गोष्टी युट्युब वर बघून, इतर मुलांसोबत संध्याकाळी खेळून आणि प्रॅक्टिस करून शिकला.


तो एकदम पारंगत झाला म्हणा ना! या खेळामध्ये त्याने आम्हाला क्रॉस केले. कारण वयाच्या मानाने आमचे शरीर तेवढे लवचिक नव्हते आणि तो अधिक वेगाने खेळू शकला. आम्ही तेवढ्या लवकर अडॅप्ट होऊ शकत नसल्यामुळे, आम्ही आमच्या पद्धतीने या खेळाकडे फक्त व्यायाम म्हणून बघायला लागलो. त्यामुळे आम्ही जिथे होतो तिथेच राहिलो, पण तो आमच्या पुढे गेला. त्यामुळे आमच्यासोबत खेळणं त्याला आता स्पर्धात्मक (कॉम्पिटेटिव्ह) वाटत नव्हतं. मग तो आमच्याबरोबर खेळणं टाळायचा किंवा एक-दोनच गेम खेळायचा. नंतर नंतर आमच्या असं लक्षात आलं की, आम्हाला टाळण्यासाठी तो आणि त्याचा मित्र सिंगल्सची मॅच खेळायचे आणि जास्त वेळ कोर्टचा वापर करायचे. शटल आमचं असायचं आणि तो आम्हालाच खेळू द्यायचा नाही. कधी कधी ते स्वतःचे शटल वापरायचे.


हे आमच्या सर्वांच्या लक्षात आल्यानंतर, आम्ही त्या सर्व मुलांचे शटलसाठीचे कॉन्ट्रिब्युशन घेणे बंद केले आणि त्यांना आमच्यात खेळायला बंदी घातली. या सगळ्या प्रकरणाला तेव्हा टर्निंग पॉईंट मिळाला, जेव्हा त्यांच्यातील एका सवंगड्याचा, त्याच्यासारख्याच एका मित्राशी खेळण्यावरून वाद झाला. तो वाद इतका पराकोटीला गेला की तो मित्र दुसऱ्या दिवसापासून यायचा बंद झाला. त्यातच या मुलाची विद्यापीठाच्या झोनल मॅचेस खेळण्यासाठी विद्यापीठाच्या संघात निवड झाली. त्याचा आत्मविश्वास दुणावला होताच, पण त्याला स्वतःबद्दल आपण काहीतरी वेगळे (श्रेष्ठ) आहोत असे वाटू लागले. या सगळ्या निरीक्षणांमधून मग आम्ही या मुलांना आमच्यात खेळवायचे बंद केले आणि या मुलांशी थोडेसे फटकून वागायला लागलो. पण त्यांच्यातील दोन-चार मुले जी नम्र स्वभावाची होती, ती आमच्यासोबत खेळत होती; सर्व व्यवस्थित चालू होतं. तसा त्याचा आणि माझा संपर्क अगदी संपला होताच. कधीतरी आमचा रोष पत्करून तो खेळायला यायचा, पण आमची तक्रार नसे. त्याला खेळायला मिळाले नाही तर तो बाहेर बसत असे.


परवा तर कहरच झाला. त्याने मला थेट, "तुम्ही थोडं थांबा, आम्हाला सिंगल्स खेळायचं आहे," असं सांगितलं. एकतर मला माझ्या वैयक्तिक कामामुळे गडबड होती आणि मी त्याला कोर्ट देऊ शकत नव्हतो; पण तो काही त्याचा हट्ट सोडत नव्हता. मग मी त्याला स्पष्ट नाकारलं. पण या गोष्टीसाठी आधीची पार्श्वभूमी मात्र नक्कीच कारणीभूत होती. यावरून मी त्याला थोडंसं सुनवलं, पण तरीसुद्धा त्याला आमच्यासोबत डबल्सची बॅडमिंटन मॅच खेळायला परवानगी दिली आणि आम्ही खेळलो.


खेळत असताना तो थोडा आक्रमक होता. त्याने माझ्यावरचा राग खेळात काढला आणि अनावश्यक चार-पाच स्मॅश मारले, तेही आमच्या दोघांच्या अंगावर. मी समजून गेलो आणि खेळ लगेच थांबवला. त्याला चांगलेच सुनावले, आमचे भांडण झाले, अगदी गरमागरम बहस झाली. मला वाटते, त्याच्यात अहंकार निर्माण झाला होता, नम्रता कधीच निघून गेली होती. 'अतिपरिचयात अवज्ञा' ती हीच!


या गोष्टीनंतर मला खूप त्रास झाला, स्वतःचाच राग आला. वाटलं, आपण ज्या मुलाशी सलगी केली, तिथे आपली निवड चुकली. भांडणं होतात, मतभेद होतात, पण ते आमच्या समवयस्क जोडीदारांशी. वयाने लहान असलेल्या मुलांशी इतक्या टोकाची भांडणं कधीच झाली नव्हती. आणि तो विषय दोन-तीन दिवस माझ्या डोक्यातून जात नव्हता. मग माझ्या लक्षात आलं की, मी माझ्या निवडीच्या निर्णयावर, चुकीवर पश्चात्ताप करत होतो. मी भूतकाळ बदलू शकत नाही; पण भविष्यात मात्र अशा पद्धतीच्या मुलांची पारख करूनच त्यांच्याशी सलगी वाढवायला पाहिजे. नाहीतर अशा मुलांशी सलगीच करायला नको. अर्थात, हा माझा स्वभावदोष असू शकेल, पण या सर्व प्रकारात मला खूप मानसिक त्रास झाला होता. मी तर मुलांना प्रेरणा देण्यासाठी माझ्या ब्लॉगवरून मोठे-मोठे लेख लिहितो. मुलांनी मानवी मूल्यं जपायला पाहिजेत, त्यांच्यावर चांगले संस्कार रुजावेत यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्यांच्यात खेळभावना जागृत व्हावी, त्यांचे व्यक्तिमत्त्व घडावे म्हणून मी सातत्याने प्रयत्न करतोय.

पण हा माझा प्रयत्न अयशस्वी झाला, कारण मी त्याला अजिबात संस्कारी बनवू शकलो नाही, याचा मोठा खेद मला वाटला. शेवटी, हा अनुभव आपल्याला जीवनाचा एक मोठा धडा देऊन गेला आहे. आपण कोणाला मदत करावी आणि कोणाशी किती जवळकीने वागावे, याची एक मर्यादा आखणे किती गरजेचे आहे, हे यातून स्पष्ट होते. एखाद्याला संस्कारक्षम बनवणे हे केवळ आपल्या हातात नसते, तर समोरच्याची स्वीकारण्याची वृत्तीही तितकीच महत्त्वाची असते. हा प्रसंग म्हणजे आपल्या ध्येयाचा पराभव नसून, तो मानवी स्वभावाच्या एका वेगळ्या पैलूची ओळख आहे. अनुभवांतून आलेली ही शहाणीव भविष्यात योग्य व्यक्तींची निवड करण्यासाठी उपयुक्त ठरेल.  मी जे पेरले ते 'प्रेम' होते, पण त्याने जे उगवले तो 'अहंकार' होता. यात पेरणाऱ्याचा दोष नसून जमिनीच्या पोताचा (त्याच्या मानसिकतेचा) दोष आहे. त्यामुळे स्वतःला त्रास करून न घेता, मार्गक्रमण सुरु ठेवणे महत्वाचे.

No comments:

Post a Comment

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...