Thursday, November 26, 2020

भारतातील डिजिटल शिक्षणातील ट्रेंड आणि ऑनलाइन शिक्षण



भारतातील भविष्यातील शिक्षणाचा दृष्टीकोन 

(देशात तंत्रज्ञान-अधिग्रहण आणि जागतिकीकरणासह, शिक्षण व्यवस्था खूप वेगाने बदलत आहे. विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ हा तंत्रज्ञानावर आधारित  डिजिटल आणि ऑनलाइन शिक्षणाचा असेल. हा लेख भारतातील डिजिटल शिक्षणातील ट्रेंड आणि ऑनलाइन शिक्षणाची स्थिती यावर प्रकाश टाकतो.)

मनुष्य जीवनात ज्ञान, कौशल्ये आणि समजूतदारपणा आणण्यात शिक्षणाचा मोलाचा वाटा असतो. शिक्षण लोकांना चांगले नागरिक बनण्यास शिकवते. मातीच्या गोळ्याच्या खडूपासून, धुळपाट्या, लाकडी पाट्या ते ब्लॅकबोर्ड (फळे), ग्रीनबोर्ड, व्हाईटबोर्ड ते डिजिटल बोर्डपर्यंत शिकवण्याच्या विविध साधनांची क्रांती झालेली आहे. या बरोबरच अध्यापनाच्या पद्धतीतही मोठ्या सुधारल्या झाल्या आहेत. यामुळे शिक्षण अधिक मनोरंजक आणि सुलभ झाले आहे. गेल्या काही वर्षांत पारंपारिक शिक्षणाची संकल्पना मोठ्या प्रमाणात बदलली आहे. आपण आता डिजिटल आणि ऑनलाइन शिक्षणाच्या नवीन युगात प्रवेश करत आहोत. 

भारतातील डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रसार ज्ञानग्रहण आणि ज्ञानदानाच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. डिजिटीकरणामुळे शैक्षणिक कार्यक्रमांची व्याप्ती आणि प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. हे नवीन पद्धतीचे शिक्षण-तंत्रज्ञान शिक्षकांना शिकवण्याची आणि विद्यार्थ्यांना शिकण्याची नवीन संधी उपलब्ध करुन देत आहे आणि त्याद्वारे संपूर्ण शिक्षण प्रक्रियेत त्यांचा परस्परसहभाग वाढत आहे.

स्मार्टबोर्ड, टॅब्लेट, ओव्हर हेड प्रोजेक्टर, लॅपटॉप आणि मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस (एमओओसी- मॉक) इत्यादी तंत्रज्ञानावर आधारित नवीन शिक्षण साधनांमुळे शिक्षण पध्दतीत आमूलाग्र बदल झाला आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) हा तरुणांना शिक्षित करण्याचा सर्वात किफायतशीर मार्ग सिद्ध होत आहे. उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण अनुभवण्यासाठीची ही एक शक्तिशाली प्रणाली आहे. जगभरातील ऑनलाईन अभ्यासक्रम घेणाऱ्या तरुणांची संख्या सतत वाढत आहे. डिजिटल शिक्षणाचा उत्तम भाग म्हणजे आपल्याला  शैक्षणिक संसाधने एकदाच तयार करावी लागतील आणि येणार्‍या कित्येक पिढ्या त्यांचा यथेच्छ वापर करतील. अशा प्रकारे श्रम आणि संसाधने यांची बचत होईल.

(१) डिजिटल शिक्षण; भारतातील शिक्षणाचे भविष्य:

माणसाच्या शिक्षणाची सुरुवात धुळपाटीपासून सुरु होऊन आता डिजिटल पाटीपर्यंत पोहोचली आहे. भारतातील डिजिटल शिक्षण हा उपखंडातील भविष्यातील शिक्षणाचा मुख्य चेहरा ठरणार आहे. स्मार्ट तंत्रज्ञानाने देशातील एकूण शैक्षणिक चौकटीत केलेले बदल पाहून आश्चर्य वाटते. विशेषत: देशाच्या ग्रामीण भागात शिक्षणाची अवस्था चिंताजनक होती. कालबाह्य शिक्षण पद्धती, शिक्षकांची कमतरता, विद्यार्थी-शिक्षकांचे अपुरे गुणोत्तर आणि अध्यापनाची अपुरी साधने यासारख्या गंभीर आव्हानांना सामोरे जाणारे हे क्षेत्र आहे. तथापि, शिक्षणाचे डिजिटायझेशन करून शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागातील विद्यार्थ्यांना एलसीडी स्क्रीन, व्हिडिओ इत्यादी नवीन अध्यापन साधनांच्या सहाय्याने शिकवले जात आहे. या भागात डिजिटल शिक्षणाची प्रगती वेगाने होत आहे. परवडण्याजोगे हाय-स्पीड इंटरनेट आणि डायरेक्ट-टू-डिव्हाइस तंत्रज्ञान ग्रामीण विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्यास आणि त्यायोगे कौशल्ये सुधारण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. तंत्रज्ञानामुळे शिक्षकांना एकाचवेळी बर्‍याच ठिकाणी दूरस्थपणे पसरलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यास मदत होत आहे. 

भारतातील डिजिटल शिक्षणातील कल (ट्रेंड):

सोशल मीडिया: 

लर्निंग टूल म्हणून सोशल मीडियाची मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. प्रभावी सोशल मीडिया हे आहेतः ब्लॉग्ज, ट्विटर, स्काइप, पिंटेरेस्ट, गूगल डॉक्स, विकीस, प्रोजेक्ट मॅनेजमेंट अ‍ॅप्स, लिंक्डइन आणि यूट्यूब इ. आज बरेच शिक्षक तसेच विद्यार्थी सोशल मीडियाचा वापर ई-लर्निंगचा अविभाज्य भाग म्हणून करतात. हल्ली महत्त्वपूर्ण मुद्द्यांविषयी माहितीची देवाणघेवाण करण्याचे सोशल मीडिया हे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे.

इंटरएक्टिव्ह लर्निंग रिसोर्सेस (परस्परसंवादी शिक्षण संसाधने):

फ्लिप्ड क्लासरूम, मोबाइल अँप्स इत्यादी परस्पर-संवादी साधनांच्या आगमनाने शिकणे आता पारंपारिक क्लास-रूम प्रमाणे मर्यादित राहिले नाही. फ्लिप्ड क्लासरूम या मिश्रित शिक्षणाच्या प्रकारात विद्यार्थ्यांना घरात पाठांची ओळख करुन दिली जाते आणि शाळेत सराव करून घेतला जातो. या अभिनव डिजिटल संसाधनांसह हजारो वर्षांची शिकण्याची प्रक्रिया पुनर्वत केली जात आहे. मोबाइल अ‍ॅप्सद्वारे शिक्षण मिळविण्यासाठी टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसचा वापर करावा लागतो. एका जागेवर बसून, लोक असाइनमेंट आणि प्रकल्पांवर काम करताना जगभरातील इतरांशी संवाद साधू शकतात. शिक्षण आता प्रादेशिक न राहता जागतिकप्रारूप बनले आहे. 

मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेस (एमओओसी-मॉक): 

हे व्यासपीठ महत्त्वपूर्ण मार्गाने आत्म-शिक्षण सक्षम करत आहे. भारतातील मॉक कार्यक्रमांद्वारे ऑनलाइन अभ्यासक्रमांची लोकप्रियता वाढत आहे. मॉक देशातील बर्‍याच तरुणांना त्यांची पात्रता, कौशल्ये आणि रोजगारक्षमता सुधारण्यास मदत करीत आहेत. मॉक शिक्षण विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना त्यांच्या सोयीनुसार कोठूनही आणि कोणत्याही वेळी घेणे शक्य करीत आहे. शिवाय, या व्यासपीठाअंतर्गत घेण्यात येणारे अनेक अभ्यासक्रम संस्था आणि कंपन्यांनी मान्य केलेली वैध प्रमाणपत्र देतात. मॉक प्लॅटफॉर्मद्वारे घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी भारत एक मोठी बाजारपेठ बनली आहे. 

स्वयम:

स्वयम म्हणजे "स्टडी वेबस ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स" हादेखील एक मॉक प्लॅटफॉर्म आहे. एमएचआरडी (मानव संसाधन विकास मंत्रालय) आणि एआयसीटीई (अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद) यांनी संयुक्त विद्यमाने आणि मायक्रोसॉफ्टच्या मदतीने हे २,००० कोर्सनी सुसज्ज विनामूल्य व्यासपीठ विकसित केले आहे. या व्यासपीठावर नववी पासून पदव्युत्तर पर्यंतचे अभ्यासक्रम घेतले जातात. यामध्ये आयआयटी, आयआयएम, आयआयएसईआर इत्यादी केंद्रीय संस्थांचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. 

दृश्य शिक्षण (व्हिज्युअल लर्निंग) माध्यमांमध्ये प्रगती: 

दृक श्राव्य (ऑडिओ-व्हिडिओ) माध्यमांवर आधारित शिक्षण भारतात वेग घेत आहे. व्हिडीओवर आधारित सूचनात्मक शिक्षण शालेय विद्यार्थ्यांमधे खूप लोकप्रिय होत आहे कारण हे हसत खेळत शिक्षण देते. हे अत्यंत परस्परसंवादी आहे. या प्रकारची शिक्षण पद्धती केवळ ऑडिओ-व्हिडिओपुरती मर्यादित न राहता त्यात शैक्षणिक अँप्स, पॉडकास्ट्स, ईपुस्तके इत्यादींचा समावेश आहे. डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने नवीन संकल्पना शिकण्यासाठी मुले खूप उत्साही आहेत.

परस्परसंवादी सॉफ्टवेअर - गेम-आधारित शिक्षण:

गेम-आधारित शिक्षण ही पुढची मोठी गोष्ट आहे जी विशेषत: के १२ क्षेत्रातील शिक्षणाच्या डिजिटल भविष्याची व्याख्या करते. आपल्या विद्यार्थ्याच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी हे सर्वोत्कृष्ट अँप आहे. गेम-आधारित शिक्षण भविष्यातील एक चांगले स्वयं-प्रशिक्षित कार्यबल विकसित करण्यास मदत करेल.

डिजिटल शिक्षण हा भारतासाठी पुढे जाण्याचा मार्ग का आहे ?

इंटरनेट सुविधा अधिक परवडणारी आणि सहज उपलब्ध होत असल्याने, डिजिटल व पारंपारिक 'अध्यापन-शिक्षण' माध्यमांचे अधिक अभिसरण होईल. आगामी काळात बाजारात शैक्षणिक संस्थांसाठी विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण डिजिटल उत्पादने उपलब्ध असतील. देशातील डिजिटल शैक्षणिक बाजाराला चालना देण्यास मदत करणारी धोरणे पुढे आणण्यासाठी सरकारही मूलगामी पावले उचलत आहे. नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधनांचा वापर सुकर करण्यासाठी देशभरातील डिजिटल पायाभूत सुविधांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

डिजिटल तंत्रज्ञान भाषेच्या सर्व अडथळ्यांना दूर करण्यास देखील मदत करीत आहे. आता शिकण्याची सामग्री प्रादेशिक भाषांमध्ये देखील डिजिटल स्वरूपात उपलब्ध केली जाऊ शकते. ई-लर्निंग आणि एम-लर्निंग उपक्रमांच्या माध्यमातून कोणताही विद्यार्थी किंवा शिक्षक ज्ञान सामग्रीच्या अफाट तलावावर (नॉलेज पूल) जात आहेत. डिजिटल शिक्षण हे भारताचे भविष्य आहे कि जे देशाला सामाजिक-आर्थिक वाढ आणि समृद्धीच्या नवीन शिखरावर नेईल.

डिजिटल शिक्षणास वर्ग आणि ऑनलाइन असे दोन पर्याय आहेत यापैकी ऑनलाइन शिक्षण हा अधिक फायदेशीर पर्याय असल्याचे प्रथमदर्शनी वाटते. यामध्ये विद्यार्थी आपला गृहपाठ त्वरित पूर्ण करून छंद जोपासत नोकरीसाठी वेळ काढू शकतात. विद्यार्थ्यांमधील अत्यंत उत्तेजक आणि फायदेशीर स्पर्धा मात्र ऑनलाईन प्रणालीत नसेल. ऑनलाईन शिकण्याचे फायदे आणि तोटे पाहू.

(२) ऑनलाईन शिक्षणाचा विस्तार:

आभासी शिक्षण पद्धती जगभरात लोकप्रिय झाल्या आहेत. २०२१ पर्यंत भारताचा ई-लर्निंग मार्केट एक कोटीहून अधिक वापरकर्त्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा भाग म्हणून या अभ्यासक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. संस्था विद्यार्थ्यांच्यासाठी तांत्रिक आणि सॉफ्ट कौशल्यांसाठीचे व्यासपीठ बनेेल.

यावर्षी साथीच्या आजाराने शैक्षणिक संस्था बंद कराव्या लागल्या आणि शैक्षणिक सातत्य ठेवण्यासाठी सरकारने ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन दिले. या अचानक आलेल्या आपत्तीमुळे सरकारला आपली ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याची क्षमता तपासता आली. झूम, गुगल क्लासरूम, मायक्रोसॉफ्ट टीम इत्यादी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर बर्‍याच संस्थांनी सहजतेने केला आहे. ऑनलाईन शिक्षण यंत्रणेत बहुआयामी आव्हाने आहेत ज्यामध्ये त्याच्या चांगल्या बाजू अधिक सुधारून कमकुवत बाजू भक्कम करणे गरजेचे आहे.

चांगली बाजू:

ऑनलाइन शिक्षण सर्वसामान्यांपलीकडे काहीतरी शिकण्याची संधी देते. ऑनलाईन प्रोग्राम्स विस्तीर्ण वयोगटातील लोकांना त्यांच्या वेगाने, निर्बंधाशिवाय आणि त्यांच्या इतर जबाबदाऱ्यांशी तडजोड न करता शिकण्याची मुभा देते. कदाचित, विद्यार्थ्यांसाठी वर्गात येऊन कठोर वेळापत्रक पाळणे आणि लांब प्रवासातून वाचण्यासाठीचे हे स्वागतार्ह पाऊल असेल. काहींसाठी हा शिक्षणाचा कमी तणावपूर्ण पर्याय असू शकतो. हे शिक्षण उत्साहवर्धक आहे. परंतु ज्या क्षणी ऑनलाइन शिक्षण हा एकमेव पर्याय दीर्घकाळ राहतो तेव्हा हळूहळू तो कंटाळवाणा आणि कुरूप भासू लागतो. याची चव भारताला आता येऊ लागली आहे.

वाईट बाजू:

ऑनलाइन धड्यांसाठी इंटरनेट वापरणे एक मोठे आव्हान असते. सर्वच शिक्षक उत्तम शिक्षण सामग्री तयार करून ती ऑनलाइन पद्धतीने प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात परिपूर्ण नसतील. शारीरिक भाषा आणि नेत्रसंपर्क, जे शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण संकेत मानले जातात, त्यांना ऑनलाइन वर्गात आजमावणे कठीण आहे. एका वर्गात किती विद्यार्थ्यांनी लक्ष दिले? त्यापैकी किती जणांना धडा समजला? अध्यापन वेग ठीक आहे काय? काही विद्यार्थी मागे पडत आहेत काय? हे प्रश्न पारंपारिक वर्गात देखील उद्भवतात, परंतु ऑनलाइन वर्गात त्यांची उत्तरे देणे कठिण आहे. याव्यतिरिक्त, विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रोग्राममध्ये प्रात्याक्षिक अभ्यासासाठी पूरक प्रयोगशाळेतील सत्रे, प्रकल्प आणि फील्ड ट्रिपचा समावेश असतो. या पैलूला ऑनलाइन पद्धतीमध्ये मर्यादा येतात. शेवटी, शिक्षण हे केवळ विषयज्ञानापुरते मर्यादित नाही तर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि क्रीडा कौशल्ये विकसित करण्यासाठी देखील आहे. केवळ ऑनलाइन शिक्षणावर अवलंबून राहिल्यास मुलांच्या सर्वांगीण विकासास अडथळा येऊ शकेल आणि बरेचजण त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील कामगिरीत घसरतील.

चिंताजनक बाजू:

आपल्या देशात भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता असली तरी, मोठ्या प्रमाणात सामाजिक व आर्थिक विषमता आहे. सध्या भारतीय लोकसंख्येच्या अगदी छोट्याश्या भागालाच ऑनलाइन शिक्षण मिळत आहे. खंडीत वीजपुरवठा, कमकुवत किंवा अस्तित्वात नसलेली इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि आवश्यक डिव्हाइस खरेदी करण्याची असमर्थता हे चिंतेचे विषय आहेत. या कारणांस्तव ऑनलाइन वर्गामध्ये क्षमतेच्या पन्नास टक्केपेक्षा कमी विद्यार्थी नियमित हजर असतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि डिव्हाइसची उपलब्धता या समस्येला पर्याय म्हणून, बर्‍याच ठिकाणी ‘अध्यापन’ व्हॉट्सअ‍ॅप किंवा यूट्यूब व्हिडीओ सारख्या माध्यमातून होत आहे. यामध्ये मात्र धडे समजून घेण्यात अडचणी आहेत. इतकेच नाही. कुटुंबात उदरनिर्वाहाची मर्यादा असल्यास, ऑनलाईन शिक्षणाचा फटका बहुदा मुलींनाच जादा बसतो. ऑनलाईन शिक्षणाच्या दिशेने घाईत उचलल्या गेलेल्या या अनियोजित पावलामुळे डिजिटल उपलब्धता नसलेला एक मोठा विद्यार्थी वर्ग या आभासी वर्गाबाहेर फेकला गेला आहे. 

ऑनलाइन शिक्षण मुख्यत्वेकरून मोबाईल सारख्या डिव्हाईसवर घ्यावे लागते. हे गॅझेट मुलांच्या हातात पडल्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त अवांछित माहिती शोधणे, गेम खेळणे, असंबद्ध व्हिडिओ पाहणे हे धोके बाल्यावस्थेतील मुलांच्यात संभवतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वाईट हेतूंसाठी वापरले जाऊ शकतात. जोपर्यंत मुलं वैचारिक दृष्ट्या परिपक्व होत नाहीत तोपर्यंत मोबाइल त्यांच्याकडे सोपविणे खूप काळजीचे बनते. ज्यादा वेळेच्या ऑनलाईन शिक्षणामुळे एलईडी डिस्प्ले असलेल्या मोबाईलच्या स्क्रीनचा संपर्क वेळ वाढत असताना आम्ही मुलांना डोळ्यांच्या आजाराचे बळी होण्याचे आमंत्रण देतो. दूरवरून शिकवल्याने मुलांच्यात मूल्यशिक्षण रुजवणे खूप अवघड जाते. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येतेय का हेही विचारात घेणे गरजेचे आहे. 

भारतात एकसमान आणि प्रभावी ऑनलाइन शिक्षण - काय केले जात आहे आणि आणखी काय शक्य आहे?

ऑनलाईन शिक्षण अधिक प्रभावी, सुलभ व सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शैक्षणिक संस्थांसाठी भारत सरकारतर्फे विविध ऑनलाइन संसाधने, प्रशिक्षण कार्यक्रम व योजना विकसित केल्या आहेत. ऑनलाईन टीचिंगच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी आणि आवश्यक स्त्रोतांचा भांडार तयार करण्यासाठी शिक्षण मंडळाने शिक्षकांची राष्ट्रव्यापी अनौपचारिक आणि ऐच्छिक नेटवर्क तयार केले आहे. ऑनलाईन शिक्षणासंबंधीची सर्व धोरणे आणि हस्तक्षेप सर्वसमावेशक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. चांगली दृष्टी, यातील अडथळे समाप्ती, प्रामाणिक प्रयत्न आणि येणारा काळच भारताला पुढील मार्ग दाखवेल.

शिक्षण तंत्रज्ञान, डिजिटल आणि ऑनलाईन शिक्षणामुळे पुढील सकारात्मक बदल अपेक्षित आहेत:

विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार आणि वेगाने कधीही आणि कोठेही शिकण घेणे शक्य आहे. शिक्षणाचे मार्ग अधिक लवचिक होतील आणि विषय निवडताना अधिक पर्याय उपलब्ध असतील. ब्लेंडेड लर्निंग, फ्लिप्ड क्लासरूम आणि बीवायओडी (स्वतःचे डिव्हाइस) सारख्या तंज्ञानातील आमूलाग्र बदलामुळे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळेल. प्रकल्प-आधारित शिक्षण विद्यार्थ्यांच्या अनुभवांना शालेय जीवनाशी जोडेल आणि त्यांच्यातील कल्पकतेला वाव देऊन नवीन विचारांना प्रवृत्त करेल. ऑनलाईन क्विझ, ग्रुप प्रोजेक्ट्स आणि परस्परसंवादी चर्चेचा वापर वाढवून परीक्षा प्रणाली पूर्णपणे बदलली जाईल. शिक्षण प्रक्रियेतील विद्यार्थ्यांची मालकी आणि तितकीच महत्वाची जबाबदारी वाढेल. जरी विद्यार्थ्यांनी शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये इतके स्वातंत्र्य दिले गेले तरी, मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या यशासाठी मूलभूत ठरेल. या बदललेल्या शिक्षण प्रणालीत शिक्षकांचे महत्व आणखीण वाढणार आहे कारण प्रणालीची देखरेख, निरीक्षण आणि योग्य अंमलबजावणी तज्ञ् म्हणून त्यांनीच करून घ्यायची आहे.

सध्याच्या काळात जरी तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल व ऑनलाईन शिक्षण हा योग्य पर्याय वाटत असला तरी त्यालाही काही मयादा आहेतच. एखादी सोय ही गैरसोय होऊ नये याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. यामुळे वाचन संस्कृती लोप पावण्याची भीती वाटत आहे. ई-बुक आणि खरी पुस्तके वाचणे यात फार फरक आहे. पुस्तक वाचन अधिक प्रभावीपणे आणि सहजतेने करता येते. डिजिटल शिक्षणात शिक्षकांचे प्रोत्साहनाची वानवा आणि शिक्षक आणि वर्गमित्रांशीचा समोरासमोरील संवाद होणे अशक्य आहे तसेच यात मुख्यत्वे इंटरनेट कनेक्शन आणि विजेची आवश्यकता असते. ऑनलाईन माध्यमातून हे शिकवण्यास शिक्षकांना पुरेसे प्रशिक्षण दिले जात नाही. पालक नसताना घरी शिकणे ही एक मोठी समस्या आहे. 

तंत्रज्ञान-वर्धित शिक्षण या प्रणालीस अमूलाग्रपणे बदलेल. पण ऑनलाईन शिकण्याच्या पद्धती त्रुटींमधील सुधारणा करून योग्य त्या भूमिकेत असतील तरच अंमलबजावणी योग्य होतील.

- प्रा. डॉ. के.वाय. राजपुरे

3 comments:

  1. ऑलाईन शिक्षणात आम्हा विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न उत्तमरित्या मांडणारा लेख आहे सर...

    ReplyDelete
  2. सध्या जगात तसेच शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल आकलनशक्तीच्या बाहेरचे आहेत. तरीदेखील आपण ते बदल आपल्या सुगम भाषेत सादर केलेत, त्याबद्दल ,मनापासून धन्यवाद.

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...