Total Pageviews

Friday, September 8, 2017

एक प्राध्यापक विद्यार्थ्याच्या नजरेत पाहताना

एक प्राध्यापक विद्यार्थ्याच्या नजरेत पाहताना

आपल्या स्वप्नांना आकार देण्याचे खरे सार्मथ्य शिक्षणामध्ये आहे. उचित शिक्षण ज्ञाननिष्ठ आणि चारित्र्यनिष्ठ अशा आदर्श शिक्षकांमुळेच शक्य आहे. शिक्षणामुळे जीवन उन्नत, परिपूर्ण, सुसह्यदायी तर होतेच याबरोबरच वर्तनात परिवर्तन, कौशल्यविकास आणि जीवन जाणीव अधिक समंजसही व्हायला मदत करते. शिक्षण म्हणजे समजून घेणे, स्वतंत्र विचारांची कला, समाजसेवा, कमवा आणि शिका आणि चांगला मनुष्य बनणे ! बाल्यावस्थेत शिक्षण सहज शक्य वाटते. सुरुवातीला आपण प्रश्न विचारून स्वतःला शिक्षित करतो. जसजसे आपण शिक्षण प्रक्रियेतील शिडी चढत जातो तसतसे ते तुलनेने कठीण बनू लागते. मग आम्ही कप्यांमध्ये शिक्षण घेण्यास प्रारंभ करतो. सुरुवातीला भाषा, गणित आणि विज्ञान ! पुढे विषयांचा अभ्यास सुरू. नंतर आपल्याला हे लक्षात येते की कठीणता ही सापेक्ष आहे. कोणत्याही विषयाची अवघडता ही खरी समस्या नाहीच, समस्या आहे ती अशा दुर्मिळ शिक्षकांची कमी की जे हा विषय योग्य रीतीने समजावून शिकवतील. इथे लोक परीक्षेत उत्तीर्ण होतात आणि इतरांना परीक्षा उत्तीर्ण होण्यास शिकवितात आणि कुणालाच काही कळत नाही. शिक्षणाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक होण्याच्या दृष्टीने चांगले शिक्षक तयार व्हायला हवेत.

शिक्षकाने विद्यार्थ्याला ज्ञान चमच्याने भरवू नये तर ज्ञान घेण्यायोग्य बनवावे. जसे भुकेलेल्याला भाकरी न देता भाकरी कशी मिळवायची हे शिकवावे तसे. आठवा आपण प्रश्न विचारून शिक्षण घ्यायचं कधी थांबवलं ? किशोरवयात आमच्या प्रश्नांची प्रशंसा केली जाते. जसं जसं पुढ जातो तस-तसं आपल्या सर्व प्रश्नांची समाधानकार उत्तर मिळतं नाहीत. त्यांच्या अहंकारामुळे म्हणा किंवा अज्ञानामुळे असेल, पण हे होतं. मग आम्ही शिक्षण घेणे थांबवतो. प्रश्न विचारून शिक्षण प्रवास सुरू ठेवावा. उत्तरं मिळो आथवा ना मिळोत हे चिरंतन चालू राहावं. विचारांवर विचार व्हावा. नेहमी अभिनव कल्पनांमध्ये स्वत: ला गुंतवून घ्यावे.

जर आम्ही परदेशी शिक्षण व्यवस्थेचा संदर्भ घेतला तर व्याख्यानाच्या तासांच्या ६० मिनिटांमधील, शिक्षक फक्त २० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी बोलतो. बाकीच्या वेळी विद्यार्थी चर्चा करतात. नाविन्यपूर्णता, अद्भुतता, सध्याच्या गरजा, समस्या आणि उपाय यावर त्यांचे अभ्यासक्रम आधारीत असतात. संपूर्ण मूल्यमापन यंत्रणा पारदर्शी असते.

आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा झाकाळून गेलेला भविष्यकाळ आणि विस्कटलेला वर्तमान यांना आकार देणारा शिक्षक केवळ अक्षर ओळख करून देणारा आणि चार गणिते, दोन कविता शिकविणारा नव्हे तर सामाजिक ऋणाची परतफेड करण्याच्या भूमिकेने कर्तबगार नवी पिढी घडविणारा साधक असायला हवा. शिक्षक विद्यार्थीनिष्ठ असावा, विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावा, ज्ञान समाजनिष्ठ असावे आणि समाज समतानिष्ठ असावा. अपार निष्ठेने आणि त्या निष्ठेला साजेश्या कौशल्यपूर्ण परीश्रमाने असामान्य यश प्राप्त करून भारताचे कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर व सुजान नागरिक घडवणारे अनेक आदर्श शिक्षक सभोवताली तयार होवोत अशी सर्वसाधारण विद्यार्थ्याची माफक अपेक्षा.. शिक्षणाकडे आणि शिक्षकांकडे पाहण्याचा शासन आणि समाजाचा दृष्टिकोन बदलायला हवा.

-डॉ केशव राजपुरे

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. जगण्याला ज्यामुळे अर्थ प्राप्त होतो.त्यामध्ये शिक्षणाबरोबरच शिक्षकालाही अनन्यसाधारण महत्व आहे कारण तेच आपल्याला जगण्याची कला शिकवत असतात.ते अन्न पूर्णेच्या थाळीप्रमाणे सतत पुरून उरणारे असतात....हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल की आपल्यासारखे गुरू आम्हाला लाभले.सर आपल्या लिखणीने खुप सुंदर पणे आपल्या मनातील विचार सर्वांसमोर आणले आहेत.

    ReplyDelete