Friday, May 21, 2021

संजय गोडसे


नाबाद अर्धशतक

माणूस स्मृती जगतो. गोड स्मृती ताण कमी करण्यास मदत करतात. आपल्या प्रियजणांच्या गतस्मृतींना उजाळा देऊन त्या मनाच्या खोल कप्प्यात साठवत वाढदिवस साजरा करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आज (२० मे २०२१) माझा मित्र संजय पन्नाशीत पदार्पण करत आहे. या निमित्ताने त्याच्याबरोबर घालवलेल्या सुवर्णक्षणांचे स्मरण करीत तसेच त्याचा जीवनप्रवास थोडक्यात आठवत शुभेच्छा देण्याचा हा अल्प प्रयास !

विद्यापीठात एम एस्सी ला असताना माझ्या क्रिकेट प्रेमापायी ग्राउंडवर जाण्याचा योग नेहमीचा.. तिथं सातारच्या एका हरहुन्नरी आणि उत्तम क्रिकेट खेळणाऱ्या संजय दत्तात्रय गोडसे या वर्गमित्राची भेट झाली. दोघांच्याही क्रिकेटवेडामुळे आणि त्याच्या राजस स्वभावामुळे आमची मैत्री व्हायला वेळ लागला नाही. तो नेहमी आपल्या सभोवतालचे वातावरण आनंदमय ठेवी. जणू आनंदमय वातावरणात त्याला डुंबायला आवडे ! त्याची विशिष्ट शैलीदार शब्दफेक ऐकली की राग आलेल्या माणसाच्या पण चेहऱ्यावर नकळत हसू उमटे. त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी आणि बोलण्याची शैली कायम मनाला भावे. त्यामुळे मी त्याच्या चेहऱ्यावर कधीच त्रागा बघितला नाही. कायम तो टवटवीत आणि हसरा चेहरा आमचं मन प्रफुल्लित करत असे. त्यामुुुुळे भाग एक मध्येे जरी आम्ही वेगवेगळ्या वस्तीगृहात राहत असू तरी भाग दोन मध्ये समोरासमोरील रूममध्ये राहत होतो.
 

त्याचा गॉगल, हाफशर्ट आणि चालण्याची नायकदार विशिष्ट ढब घायल सिनेमामधील सनी देओलच्या मोहक व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देई. तो नेहमीच आनंदजनक मूडमध्ये असे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे क्रिकेटव्यतिरिक्त त्याला गाणं गायची फार आवड .. प्रचंड आत्मविश्वासाने त्याला गाताना मी पाहिले आहे.  किशोर कुमारच्या आवाजातील बरीच जुनी गाणी त्याने आमच्यासाठी गायली होती. त्याला अनेक गाणी तोंडपाठ आहेत.. तसेच बऱ्याच गाण्याचे बोल आणि चाली त्याला आठवतात.. वेलकम फंक्शन च्या वेळी त्यानं गायलेले .. है अपना दिल तो आवारा.. अजून स्मृतीत आहे. अद्यापही तो ऑनलाइन कन्सर्ट मध्ये गाणी म्हणतो. त्याची बरीच युगलगीतांचे रेकॉर्डिंग फेसबुक वर आहे.

तो नेहमी आपल्या मर्यादेत राहत असे. कुठलीही गोष्ट करत असताना थोडा विचार करत असे. अभ्यासाची मात्र त्याला थोडी भीती वाटे. आपला अभ्यास पूर्ण कधी होणार याची सतत काळजी.. कोण चुकत असेल तर त्याला सुनवायला तो कमी करायचा नाही. तो अनावश्यक खर्च करत नसे. कुणासोबतही जुळवून घेणार एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणा ना !

त्याचा जन्म झाला तेव्हा त्याचे वडील मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे हायस्कूल शिक्षक म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यांचे कुटुंब त्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील संगोल्या जवळील नाझरे मठ या मूळगावी होतं. शिवलीलामृत लिहिणारे श्रीधर स्वामी यांचे नाझरे हे गाव माणगंगा नदीतीरी ग दि माडगूळकर यांच्या माडगूळ गावापासून पाच किलोमीटरच्या अंतरावर  वसलेले आहे. त्याच्या वडिलांना दोन सावत्र, दोन सख्खे भाऊ व पाच बहिणी असा मोठा परिवार ! वडिलोपार्जित भरपूर शेती ... पण दुष्काळी परिस्थिती ...  त्यामुळे भावंडांपैकी अगदी कष्टातून नाझरे, आटपाडी, आणि तासगाव येथून पदवीपर्यंत हेच शिकले होते.. त्यांना खूप पराकाष्टेने नोकरी मिळाली होती. एक भाऊ शेती करायचे त्याच्या कुटुंबाची जबाबदारीदेखील तेच उचलत. 

तो पाच वर्षाचा असताना काही दिवस वडिलांबरोबर खंडेराजुरी येथे राहायला गेला होता. दिवसभर मुलांबरोबर उन्हात खेळल्यामुळे त्याला रात्री अचानक ताप आला. तसल्या तापातच डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिले आणि दुर्दैवाने त्यादरम्यान त्याच्या पायाची शिर आखडली. आणि ते दुखणं बळावत जात पुढे महिनाभर त्याने जमिनीवर पाय टेकलाच नाही आणि या दुर्दैवी घटनेनंतर एका पायाने तो जन्माचा अपंग झाला. तो जन्मापासून अपंग नव्हता. आपण यास निव्वळ योगायोग मानतो. परंतु लिखित योजना अमलात आणण्याचे नियतीचे स्वतःचे मार्ग असतात हे मात्र खरं..  

त्याचे प्राथमिक शिक्षण खंडेराजुरी येथे झाले. पुढे चौथी ते आठवी परत नाझरे या मूळगावी त्यांचा शिक्षण प्रवास झाला. आठवीतील त्याचे गुणपत्रक अजिबात चांगले नव्हते. म्हणून त्याच्या वडिलांनी पुढे त्यांच्या बदली झालेल्या सातारा या ठिकाणी यांना शिक्षणासाठी हलवले. लहान वयात आईपासून दूर राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. तरीपण आपले मूळ गाव सोडल्यानंतर मात्र तो अभ्यासात खूपच सक्रिय झाला होता आणि त्याच्या गुणपत्रकामध्ये गुणांनी वरची झेप घेतली होती. स्वामी विवेकानंद संस्थेच्या भवानी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये त्याचे बारावी सायन्सपर्यंतचे शिक्षण झाले. वडील मुलाला शिक्षणासाठी स्वतःपासून दूर ठेवण्याच्या विरुद्ध होते म्हणून इतरत्र प्रवेश न घेता त्यांनी संजयला लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात बी एस्सी ला प्रवेश घेतला. तिथं सुद्धा त्याने फिजिक्स सारख्या कठीण विषयात डिस्टिंक्शनमध्ये येवून विद्यापीठाच्या परीक्षेत सातारा केंद्रात प्रथम क्रमांक मिळाला होता.

पायांने अपंग असला तरी त्याच्यात इतरांच्यामानाने अधीकचे कौशल्य भरले होते. त्याच्या क्रिकेटकौशल्यद्वारे आणि गायन प्रभुत्वातून ते दिसून येई. इतर मित्रांबरोबर क्रिकेट खेळण्यास तो तितकाच सक्षम होता. क्रिकेट मधील गोलंदाजी, फलंदाजी तसेच यष्टीरक्षणाचे त्याच्याकडे उत्तम कसब होते. महाविद्यालयीन काळात त्यांने अपंगासाठीच्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा जिल्हा तसेच पुणे विभागाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत त्यांने सफाईदार कामगिरी केली होती.

 
सुट्टीमध्ये त्यांच्या मूळ गावी जाण्याचा योग आल्यानंतर ते लेदर बॉल क्रिकेट खेळायचे. आपल्या दोन भावांसोबत तो तिथल्या क्रिकेट स्पर्धेत खेळत असे. एका स्पर्धेदरम्यान ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते आणि अंतिम सामना सांगोल्याच्या उत्कृष्ट संघाविरुद्ध होता. त्या सामन्यात त्याने सलामीला जात विजय मिळवेपर्यंत टिच्चून फलंदाजी केली होती. गावकऱ्यांनी या विजयाचा आनंद त्या सर्व टीमला खांद्यावर घेऊन गावात मिरवणूक काढत साजरा केला होता. खऱ्या अर्थानं संजय सर्व प्रकारचे क्रिकेटिंग आयुष्य जगला आहे.

पुढे एम एस्सी ला प्रवेश मिळवण्यासाठी त्याने शिवाजी विद्यापीठात अर्ज केला होता परंतु त्याच्या कमी गुणांमुळे त्याला प्रवेश मिळाला नाही. पण अपंग कोट्यातून त्याच्यापेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला आहे हे एका मित्राने त्याच्या लक्षात आणून दिले होते. मग या गोष्टीसाठी संबंधितांना भेटल्यानंतर त्याला अपेक्षित मदत मिळाली नाही. शेवटी अगदी आत्मविश्वासानं त्याने यासंदर्भात कुलगुरू यांच्याकडे दाद मागण्यासाठी त्यांची भेट घेतली. कुलगुरुंनी माहिती घेतली आणि त्याला न्याय मिळवून देत एम एस्सी फिजिक्स ला प्रवेश मिळवून दिला होता. त्याने दाखवलेल्या धाडसाने आणि समयसुचकतेमुळे त्याला उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती.


एमसी भाग दोन मध्ये तो ऊर्जा अभ्यास ह्या स्पेशलायझेशनला गेला, आम्ही मात्र सॉलीड स्टेट फिजिक्स मध्ये... स्पेशलायझेशन वेगळं असलं तरी होस्टेलवर मात्र एकत्र असू. वाढदिवस साजरा करणं आम्ही तिथे शिकलो. आम्ही सर्व मित्रांचे वाढदिवस साजरे केले होते. त्यांच्या स्पेशलायझेशनला ज्यादा संशोधक विद्यार्थी असल्यामुळे त्यांना खूप मार्गदर्शन होई. तिथे प्रोजेक्ट, कॉन्फरन्स, सेमिनार मध्ये सहभागी होता यायच त्यामुळे त्यांचा हेवा वाटे. 


आमची मैत्री तेव्हा संशोधन करणाऱ्या आदरणीय शिंदे सरांना देखील माहिती होती त्यामुळे त्यांच्या स्पेशलायझेशन मधील त्याचे तीन मित्र व मी अशी पाच जणांची सरांनी राधानगरी धरण आणि दाजीपूर अभयारण्यात एक दिवसाची निसर्ग पर्यटन सहल काढली होती. तो आमच्यासाठी सुवर्ण दिवस होता. प्रवासात गाणी, भेंड्या, कॅसेट प्लेअर, डान्स, धाब्यावरील जेवण, टेम्पो मधील प्रवास, पाच किलोमीटरचा दाजीपुर ट्रेक हे सगळं संस्मरणीय आहे. मला आठवतेे कोल्हापूर गोवा रस्त्यापासून दूरवर दाट अभयारण्याात बरेच अंतर चालत जाऊन सुद्धा आम्हाला रानगवे दिसले नाहीत. शेवटी अंधार पडू लागल्याने नाईलाजास्तव परत फिरलो होतो. एसटी स्टॅण्डवरील हॉटेलमध्ये आम्ही उशीरा रात्रीचे जेवण घेतले होते. त्यादिवशी दिवसभर कंटाळा आल्यामुळे झोप मात्र गाढ लागल्याच आठवते.वसतिगृहात असताना संजयचे मामा बऱ्याचदा त्याला भेटायला यायचे. त्यांच्या एक दोन दिवसांच्या मुक्कामात त्यांनी खूप विनोदी किस्से आणि वैयक्तिक जीवनातील काही प्रसंग सांगितले होते. त्यांच्या दिलदार व्यक्तिमत्त्वामुळे व विनोदी स्वभावामुळे आमची चांगली गट्टी जमली होती. पण त्यांना परत भेटण्याचा अजून योग आला नाही. जुने फोटो अल्बम चाळताना फोटो दिसल्यानंतर मात्र त्यांची तीव्र आठवण नक्की येते. त्यानंतर संजय आणि माझी जोडी घट्ट झाली.

एकदा शनिवार-रविवार त्याने मला त्याच्या साताऱ्यातील घरी मुक्कामी न्यायचे ठरवले. मी ही म्हटलं एक दोन दिवस सातारला राहून पुढे माझ्या गावी जावं. तेव्हा बसने कोल्हापूरवरून सातारला जायला अडीच तास लागत पण निव्वळ पैशाची बचत व्हावी म्हणून आम्ही तेव्हा ट्रेनने प्रवास केला होता. दुपारी दोन वाजता निघालेली ट्रेन रात्री नऊला सातारा स्टेशनवर पोहोचली होती. पुढे सातारा स्टॅन्ड अर्ध्या तासाच्या अंतरावर ! खूपच दीर्घ प्रवास होता परंतु तो सोबत असल्यामुळे कंटाळा वाटला नाही. मुळगाव नाझरे तरीपण वडिलांच्या शिक्षकी व्यवसायामुळे तेव्हा त्यांचे कुटुंब सातारा येथे स्थायिक झाले होते. २०११ साली माझ्या आप्पासाहेब बाबर या विद्यार्थ्याच्या लग्नासाठी या गावी पहिल्यांदा जाण्याचा योग आला होता.
एलबीएस महाविद्यालयाच्या शेजारी त्यांचं भाडेतत्त्वावरील छोटंसं बैठं घर होतं. त्याचे वडील तेव्हा एलबीएस ज्युनियर महाविद्यालयात इंग्रजीचे शिक्षक होते. घरी मावशी आणि त्याचे दोन भाऊ विजय आणि अनिल ! बहीण सुषमा हीचा त्यांच्या मामाशीच विवाह झाला होता.. बंधू तेव्हा शिक्षण घेत होते. मावशींनी तेव्हा दिलेला स्नेहमय घरगुती पाहुणचार अजून आठवतोय. तिथे सुद्धा आम्ही क्रिकेट खेळण्याचा योग घडवून आणला होता. त्याचा भाऊ विजय सुद्धा उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. तो वेगवान गोलंदाजी करी. त्या भेटीत संजयने मला सातारा मधील महत्त्वाची ठिकाणे दाखवल्याचे आठवते. 

(बंधू विजय: नाझरे ग्रामपंचायत सदस्य)

एम एस्सी नंतर नोकरी शोध न करता त्याने हायस्कुल किंवा जुनियर महाविद्यालयात शिक्षकी नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने सरळ बीएडला प्रवेश घेतला. एका वर्षात बी एड केल्यानंतर सातारा येथे शाहूपुरी माध्यमिक विद्यालयांमध्ये वर्षभर विनापगार नोकरी केली. तीही सुटल्यानंतर पुढे खाजगी शिकवणी घेऊ लागला. नोकरीचा प्रश्न ऐरणीवर होताच त्यात अपंगत्वामुळे त्याला लग्नाला मुली होकार भरत नव्हत्या. १९९९ मध्ये त्याच्या सुदैवाने कोल्हापूर येथील नंदीनी वहिनींनी त्या परिस्थितीतही त्यास स्वीकारून जीवनभर साथ देण्याचा निर्णय घेतला आणि मे महिन्यात त्याचा विवाह पार पडला.


पुढे काही काळ स्वामी संस्थेच्या सुशिलादेवी हायस्कूल तसेच भवानी नाईट हायस्कूलमध्ये त्याने तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी केली. सप्टेंबर २००० मध्ये मात्र त्याची हिंगणेच्या कन्याशाळा सातारा येथे इतर मागास प्रवर्गातून नियमित शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली. तो आपल्या सहकार्‍यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. अद्याप त्याने गाण्याची आणि क्रिकेटची आवड जपली आहे. अलीकडेच त्याची शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.एम एस्सी झाल्यानंतर त्याला भेटण्याचे क्वचितच प्रसंग आले. त्याची सासुरवाडी कोल्हापूर असल्यामुळे नंतर आमच्या भेटी होऊ लागल्या. मीही कार्यालयीन कामानिमित्त सातारा भेटीत त्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या राहत्या घरी भेट दिल्याचे आठवते. त्याच्या कुटुंबाला भेटलो. त्यांना भेटल्यानंतर आनंद झाला. त्याला ओम आणि भक्ती ही दोन अपत्ये आहेत. ओम अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे तर भक्ती दहावीमध्ये आहे.
"तमसो मा ज्योति र्गमय" या पायावर उभी असलेली आपली संस्कृती त्याच्या कुटुंबाने सकारात्मकता राखत जपली आहे. गेले कित्येक वर्ष अध्यात्माच्या मार्गातून त्याचे कुटुंब ऐश्वर्यमय आनंदी जीवन जगत आहेत. हे त्यांच्या दिनचर्येतून आणि आत्मिक समाधानातून प्रतीत होते. पण मला एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते की अद्यापही त्याने स्वतःतील लहानपण आणि निरागसता जतन केली आहे की जी आनंद साधनेची गुरुकिल्ली आहे..

माझ्या आयुष्यातील एक उत्कृष्ट सहचारी मित्र आज त्याचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त मनात दाटलेल्या आठवणींना वाट मोकळी करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. संजय तुला सुवर्णमहोत्सव वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझं भावी आयुष्य आनंदी, सुखमय आणि निरामय होओ हीच सद्गुरु चरणी प्रार्थना. तुला कीर्तीरूपी अमरत्व लाभो व हा सुवर्णदिन अविस्मरणीय होवो ही सदिच्छा !

- प्राध्यापक डॉ केशव राजपुरे, कोल्हापूर
मोबाईल: ९६०४२५०००६


Monday, May 17, 2021

कृष्णविवराभोवतालचे प्रकाशमान वलय


क्वासर; विश्वातील सर्वात चमकदार ज्ञात वस्तू

(वाचन वेळ: १० मिनिट)
 

अंतराळविज्ञान हा वैज्ञानिक समुदायासाठी नेहमीच जिज्ञासेचा आणि आसमंताची गुपिते उलघडणारा विषय ठरला आहे. या विषयातील संशोधनाने अज्ञात वस्तूंच्या शोधाद्वारे विश्वाचा ठाव घेणे शक्य झालं आहे. असंख्य आकाशगंगांनी बनलेल्या या ब्रह्मांडातील बऱ्याच गोष्टी अद्याप मानवजातीस ठाऊक नाहीत. विश्वाची उत्पत्ती आणि ऱ्हासाची कारणे जाणून घेण्यासाठी हा अभ्यास ही एक काळाची गरज बनली आहे. अलीकडेच इवेंट हॉरीझॉन दुर्बिणीतून दिसलेले व हजारो तारे गडप करण्याची क्षमता असलेले कृष्णविवर हे या अभ्यासातील महत्वपूर्ण निरीक्षण तसेच विश्लेषण मानले जातेय. आकाशगंगेच्या केंद्रस्थानी आढळणारी कृष्णविवर ही काही ताऱ्यांची अंतिम स्थिती असते. सूर्याच्या १.४ ते ३ पट वस्तुमान असलेले तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत कृष्ण विवरात रुपांतरीत होतात. कृष्णविवरांच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे प्रकाश देखील त्यांच्यापासून सुटू शकत नाही आणि यामुळेच अशा ताऱ्यांना कृष्णविवर म्हणतात. 
 
 
 कृष्णविवराची प्रतिमा
नुकतेच इवेंट हॉरीझोन टेलीस्कोपचा उपयोग करून वैज्ञानिकांनी आकाशगंगा एम८७ (पृथ्वीपासून सुमारे ५४ दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर स्थित एक महाकाय आकाशगंगा)  च्या मध्यभागी असलेल्या कृष्णविवराची एक प्रतिमा प्राप्त केली आणि त्याच्या सभोवताली तीव्र गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली फिरणारा अतिउष्ण वायु प्रकाशाचे उत्सर्जन करत आहे (१० एप्रिल,२०१९).


आत्तापर्यंत ब्रह्मांडातील ज्ञात असलेल्या सर्वात प्रकाशमान गोष्टी म्हणजे सेरियस आणि आर१३६ए१ हे तारे होत की जे सूर्यापेक्षाही २२ आणि ८६ लाख पट प्रकाशमान आहेत. पण यांच्यापेक्षा देखील आकाराने महाकाय आणि हजारो पटीने प्रकाशमान असलेली गोष्ट म्हणजे क्वासर. क्वासर (क्वाझी-स्टेलर रेडियो सोर्स अर्थात अर्ध-ताऱ्यांचा रेडिओलहरी स्त्रोत) हा अतिशय तेजस्वी सक्रिय आकाशगंगेचा मध्यवर्ती भाग असतो. हे कृष्णविवराभोवतालचे वायुमय संचय-चक्र म्हटले वावगं ठरू नये. जेव्हा या चक्रातील वायु कृष्णविवरात पडतो तेव्हा त्यापासून विद्युत चुंबकीय किरणांद्वारे (प्रकाश, अतिनील किरणे, एक्स किरणे, गामा किरणे इ.) ऊर्जा बाहेर फेकली जाते.

१९६३ साली मार्टेन श्मिड या खगोलशास्त्रज्ञाने पहिल्यांदा अशा क्वासरचे निरीक्षण केले. हे क्वासर सूर्यापेक्षा ४००० अब्ज पटीने मोठे आणि आपल्या आकाशगंगेपेक्षा शेकडोपट प्रकाशमान होते. खगोलतज्ञांच्या मते, जेंव्हा दोन आकाशगंगा एकमेकांवर आदळतात तेव्हा सक्रिय आकाशगंगेच्या मध्यवर्ती भागाची (अ‍ॅक्टिव्ह गॅलंनटिक न्यूक्लिआय) अर्थात क्वासारची निर्मिती होते. क्वासारमध्ये केंद्रस्थानी विशाल कृष्णविवर असून त्याचे वस्तुमान हे सूर्याच्या वस्तुमानाच्या कित्येक कोट पटीने मोठे असते. हे कृष्णविवर त्याच्या अफाट गुरुत्वाकर्षणामुळे सभोवतालच्या गोष्टींना स्वत:कडे आकर्षित करताना या द्रव्यास प्राप्त झालेल्या त्वरणामुळे कृष्णविवराभोंवती चकतीसारखे वलय बनवते त्याला वृद्धी चकती (अक्रीशन डिस्क) असे म्हणतात. या चकती मधील सर्व द्रव्य कृष्णविवरातील इवेंट हॉरीझॉन (अफाट द्रव्यमान असलेले कृष्णविवराचे केंद्र) कडे पाठवले जाते. तीथे त्याचे विघटन होऊन हा द्रव्य जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने कृष्णविवराच्या ध्रुवामधून बाहेर फेकला जातो. त्यानंतर या चकतीमधील वायु आणि धूळीकण हे प्रचंड वेगाने कृष्णविवराभोवती फिरताना होणाऱ्या घर्षणामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा प्रकाशाच्या (विद्युत चुंबकीय किरणे) रूपात संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरली जाते. या प्रक्रियेमध्ये ६-३२% वस्तुमानाचे रूपांतर हे बाहेर फेकल्या जाणाऱ्या ऊर्जेमध्ये होते. आपल्या सूर्याशी तुलना करता फक्त ०.७% वस्तुमान उर्जेद्वारे बाहेर फेकले जाते. ही ऊर्जा जेव्हा वातावरणाबरोबर परस्पर क्रिया करून कमी वारंवारतेच्या तरंगामध्ये रूपांतरीत होते तेव्हा हे तरंग रेडियो दुर्बिणीच्या सहाय्याने पृथ्वीवर प्राप्त होतात.
 
 
पहिले क्वासर
हबलच्या सहाय्याने टिपलेले ३सी२७३ हे सर्वात पहिले आणि तेजस्वी आकाशगंगेमध्ये स्थित विशाल लंबवर्तुळाकार क्वासर आहे. त्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास सुमारे अडीच अब्ज वर्षांचा कालावधी लागला आहे. इतके मोठे अंतर असूनही, हे अद्याप पृथ्वीपासून सर्वात जवळचे क्वासर आहे.
 
 सूरवातीच्या काळात क्वासर हे ताऱ्यापासून भिन्न नव्हते कारण ते प्रकाशाचा बिंदू स्त्रोत म्हणून दिसत असत. कालांतराने अवरक्त (इन्फ्रारेड ) दुर्बिणीच्या आणि हबल दुर्बिणीच्या आगमनाने तसेच प्रगत तंत्रज्ञान आणि डेटा विश्लेषणाच्या आधुनिक पद्धतीमुळे अखेर त्यांना क्वासर ही वेगळी ओळख मिळाली. क्वासरच्या अभ्यासामुळे आपणास आकाशगंगांची उत्पत्ती आणि उत्क्रांती याचा उलघडा होतो. विविध क्वासरची चमक ऑप्टिकल श्रेणीमध्ये कमी तर एक्स-रे श्रेणीत जास्त असते. क्वासरच्या शोधामुळे खगोलशास्त्राच्या धारणेत प्रचंड बदल झाले कारण यामुळे भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र एकबद्ध झाले होते.

पुरेशी द्रव्य असणाऱ्या तरुण आणि एकमेकांवर आदळणाऱ्या आकाशगंगा क्वासर तयार करतात. क्वासर नेहमी जिथे कृष्णविवर मोठ्या प्रमाणात वेगाने वाढत आहेत अशा ठिकाणी तयार होतात. आत्तापर्यंत निरीक्षण केलेली सर्वात दूरवरचे (२९०० कोटी प्रकाशवर्ष) आणि सर्वात जवळचे (७३ कोटी प्रकाशवर्ष) क्वासर हे अनुक्रमे यूएलएएसजे ११२० + ६४१ आणि आयसी२४९७ ही होत. तर आत्तापर्यंतचे सर्वात प्रकाशमान क्वासर पृथ्वीपासून १२८० कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील  जे०४३९४७.०८ + १६३४१५.७ हे असून त्याची प्रकाश उत्तेजित करण्याची क्षमता ही सूर्याच्या ६,००,००० अब्ज पट आहे. आजपर्यंत समान गुणधर्माचे सुमारे २,००,००० क्वासर्स ज्ञात आहेत. साधारणपणे क्वासरचा काहीच भाग हा प्रकाशकिरणे बाहेर टाकतो आणि त्याची शिस्तबद्धता ही काही तास ते काही महिन्यापर्यंत असू शकते.
 यूएलएएसजे ११२० + ६४१

जे०४३९४७.०८ + १६३४१५.७

 
 प्रारंभीच्या विश्वात क्वासर अधिक सामान्य होते, कारण जेव्हा विशाल वस्तुमान असलेला कृष्णविवर वायू आणि धूळ गिळंकृत करतो तेव्हा क्वासरमधील उर्जा समाप्त होते. आपला इंधन पुरवठा संपविल्यानंतर, क्वासर अस्पष्ट आकाशगंगेत रूपांतरित होते. या क्वासरना साधारणपणे १००-१००० दशलक्ष वर्षांपर्यंतचे सामान्य जीवनकाळ लाभते. अनेक खगोलशास्त्रज्ञ फक्त क्वासर्सचा समर्पित अभ्यास करण्याव्यतिरिक्त, दरम्यानच्या आकाशगंगा आणि विखुरलेल्या वायूचा अभ्यास करण्यासाठी प्रकाशस्रोत पार्श्वभूमी म्हणून देखील क्वासरचा वापर करतात.

२०२१ च्या फेब्रुवारीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की बहुसंख्य क्वासर हे एका दिशेने प्रवास करत असून आपली आकाशगंगा सुद्धा त्याच दिशेने अग्रेसर आहे. खगोलशास्त्रज्ञाच्या मते भविष्यामध्ये शेकडो कोटी वर्षानंतर जेंव्हा आपली आकाशगंगा शेजारील एंड्रोमेडा आकाशगंगा शी धडकेल तेव्हा नव्या प्रकारच्या क्वासरची निर्मिती होईल.

डबल क्वासर
२०१० दरम्यान स्लोन डिजिटल स्काई या खगोलशास्त्रीय सर्वेक्षणात आकाशगंगांच्या विलीनीकरणात क्वासरची एक चमकदार जोडी प्रथमच स्पष्टपणे आढळून आली. या जोडीचे मॅगेलन दुर्बिणीद्वारे टिपलेले या संदर्भातील छायाचित्र क्वासर जोडी तयार होण्याचा ठोस पुरावा मानला जातो. जॉन्स हॉपकिन्सच्या संशोधन टीम सदस्या नादिया जाकमस्का यांच्या मते, आकाशगंगेच्या निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात डबल क्वासरचे हे वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण होते तसेच मोठ्या वस्तुमानातून कृष्णविवर कसे एकत्र होतात आणि ते दुहेरी (बायनरी) कसे बनतात याचा अभ्यास करण्यासाठी याचा निश्चित उपयोग होणार होता. उर्बाना-चॅम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठाचे मुख्य संशोधक यू शेन यांचे मते, ब्रह्मांडाच्या दुर्गम भागात प्रत्येक १,००० क्वासरपाठीमागे एक दुहेरी क्वासर असतो. त्यामुळेच ही क्वासर जोडी शोधणे म्हणजे एखाद्या गवताच्या खोड्यात सुई शोधण्यासारखे आहे. आजच्या घडीला दुहेरी क्वासरचा शोध महत्वाचा आहे कारण त्यावरून कृष्णविवरे आणि आकाशगंगा एकत्र कसे विकसित होतात यावरही आपल्या धारणेची चाचणी घेता येते.

नुकतेच नासाच्या हबल स्पेस टेलीस्कोपने सुमारे १० अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्त्वात असलेल्या दूरवरच्या क्वासर्सपैकी एक नव्हे तर दोन जोड्या टिपल्या आहेत. दीर्घकाळ सेवा देणाऱ्या स्पेस टेलीस्कोपने घेतलेली प्रतिमा प्रत्येक जोडीमधील क्वासर हे एकमेकांपासून केवळ १०,००० प्रकाशवर्ष अंतरावर आहेत हे स्पष्ट करते. याच्या तुलनेत आपला सूर्य आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या कृष्णविवरापासून २६,००० प्रकाशवर्ष दूर आहे. संशोधकांचा असा विश्वास आहे की हे क्वासर्स एकमेकांच्या अगदी जवळ आहेत कारण ते दोन विलीन होणाऱ्या आकाशगंगांच्या सीमारेषेवर आहेत.
 
 
 हबल ने टिपलेली क्वासरची जोडी
हबल स्पेस टेलीस्कोपने टिपलेल्या या दोन प्रतिमांमधून दोन अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्त्वात असलेल्या क्वाअर्सच्या दोन जोड्या आढळल्या आहेत आणि विलीन होणाऱ्या आकाशगंगांच्या पोटात आहेत. या आकाशगंगा पाहिल्या जाऊ शकत नाहीत कारण हबलसाठी त्या अगदी पुसट आहेत. प्रत्येक जोडीमधील क्वासर हे एकमेकांपासून १०,००० प्रकाशवर्षाच्या अंतरावर आहेत. प्रतिमेत डावीकडील क्वासर जोडी जे०७४९+२२५५ आणि उजवीकडील जोडी जे०८४१+४८२५ म्हणून नोंद केली गेली आहे (६ एप्रिल, २०२१).
 
सर्वात जवळची क्वासर जोडी
आंतरराष्ट्रीय जेमिनी वेधशाळेमधील खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून सुमारे १० अब्ज प्रकाशवर्षांच्या दुरवर असलेली क्वासर जोडी शोधली आहे. दोन क्वासर केवळ १०,००० प्रकाशवर्ष अंतरावर आहेत. ही जोडी आतापर्यंत सापडलेल्या कोणत्याही क्वासर जोडीपेक्षा अधिक जवळ आहेत. जोडीतील प्रत्येक क्वासर हे दोन विलीन झालेल्या आकाशगंगेंच्या सीमारेषेवर आहेत (१६ मे, २०२१).
 
दोन ८.१-मीटर व्यासाच्या जेमिनी उत्तर (हवाई) आणि जेमिनी दक्षिण (चिली) या दोन गोलार्धात स्थित जुळ्या दुर्बिणींने युक्त जेमिनी नामक खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. जेमिनी नॉर्थने अलीकडेच स्पेक्ट्रोस्कोपिक पद्धतीने अतिदूर असलेल्या क्वासर जोडीची उत्कृष्ट प्रतिमा मिळवली आहे. जेमिनी मल्टी-ऑब्जेक्ट स्पेक्ट्रोग्राफ मुळे दोन क्वासरमधील अंतर आणि त्यांची रचना निश्चित करण्यासाठी मदत झाली. ही क्वासर जोडी ज्ञात क्वासरपैकी सर्वात जवळची जोडी मानली जाते. या निरीक्षणासाठी अंतिम प्रतिमा मिळविण्यासाठी जमीन तसेच अवकाशातील विविध दुर्बिणीतील सिंक्रोनिक डेटा एकत्र केला होता. या शोधात सुरुवातीला स्लोन डिजिटल स्काई सर्व्हेद्वारे १५ क्वासर शोधले गेले. मग गाइया अवकाशयानानं चार संभाव्य क्वासर जोड्यांची क्रमवारी लावली आणि शेवटी हबलने त्यांपैकी एक स्पष्ट जोडी शोधली. या नवीन पध्दतीचा सिद्धीनिर्देशांक दर हा ५०% इतका आहे.

 

 

जेमिनी नॉर्थ

जेमिनी साऊथ


विश्वामध्ये ज्ञात सर्वात तेजस्वी वस्तूंपैकी एक म्हणजेच क्वासर आहे आणि म्हणूनच ते खूप दूरवरून देखील दृश्यमान आहेत. हे आकाशगंगांचा भाग असल्याने आकाशगंगांची निर्मिती तसेच उत्क्रांती समजून घेण्यास मदत करतील. अशाप्रकारच्या संशोधनातून विश्वातील अज्ञात गोष्टींबाबत उलगडा करण्याच्या पूर्वी ज्ञात नसलेल्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. काळानुसार बदलत्या विश्वामध्ये आपण राहतो याचा उत्तम पुरावा क्वासर देतात आणि म्हणूनच कोट्यावधी वर्षांपूर्वीच्या आणि आत्ताच्या विश्वामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.  

- रुपेश पेडणेकर आणि प्रा. केशव राजपुरे
(भौतिकशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

 
 

Sunday, May 9, 2021

#क्रिकेटपट

#क्रिकेटपट

(सरासरी वाचन वेळ: वीस मिनिटे)

मी चौथ्या इयत्तेत असताना बावधन येथील प्राथमिक शाळेच्या मैदानावर तालुकास्तरीय खो-खोच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्यात बावधन हायस्कूलच्या खो-खोच्या संघाने बाजी मारली होती. खेळाडूंमध्ये कमालीची इर्षा आणि आणि श्रोत्यांमध्ये अनोखा उत्साह दिसत होता. त्यावेळेस मला क्रिडास्पर्धा हा काय प्रकार असतो हे समजले होते. भविष्यात आपणही अशा पद्धतीच्या क्रिडा स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, क्रिडा कौशल्यांमध्ये निपून व्हावं असं वाटलं होतं. शैक्षणिक जीवनात अभ्यासक्रमा व्यतिरिक्तही इतर नैपुण्य मिळवता येतात याची जाणीव झाली होती. विविध स्पर्धा खेळून चुरस जोपासत अव्वल राहण्याचे गुण जोपासायचे होते. माझे बालपण एका खेड्यात आणि डोंगरकपारीत गेल्यामुळे शारीरिकदृष्ट्या तसा मी काटक होतो तसेच खेळास आवश्यक निग्रह, जिद्द आणि चिकाटी नसानसात भरलेली होतीच.

जून १९८१ मध्ये मी पाचवीला बावधन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. शरीरयष्टी सडपातळ असल्यामुळे इतर खेळांच्या मानाने सुरुवातीपासूनच खो-खो क्रिडा प्रकाराकडे मी आकर्षिले गेलो. खो-खोत आपण निपुण व्हावं हा मानस केला होता. वरच्या वर्गातील मुलांच्यात खेळून खो-खोचा सराव करत असे. कठोर सराव केल्यामुळे खेळात तरबेज झालो. आठवी ते दहावी दरम्यान हायस्कूलच्या खो-खो क्रिडा संघात होतो. आदरणीय पी.एन. पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली बावधन खो-खो संघाने तेव्हा वाई, बोरगाव, ओझर्डे तसेच खंडाळा संघांना हरवले होते. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये माझा वर्ग नेहमी पहिल्या दोन क्रमांकामध्ये येत असे. त्यामुळे शाळेपासूनच खेळाचे आकर्षण होते.

पुढे बावधन-खंडाळा-कराड मार्गे वाई येथे किसन वीर महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतल्या नंतर मात्र खो-खोपासून दूर गेलो. दिवसभर व्याख्याने आणि प्रात्यक्षिकांमुळे मैदानावर जाण्याचा क्वचितच योग यायचा. तसा कनिष्ठ महाविद्यालयातील त्या दोन वर्षात अथलेटिकची परिक्षा सोडली तर ग्राऊंडवर जाण्याचा संबंध आलाच नाही. त्यामुळे ज्या खेळात इतकं प्रवीण होतो तो खो-खो खेळ जवळजवळ विसरल्यात जमा होता. कारण खेळातलं प्राविण्य सरावाने कायम राहत.

सुट्टीत सहसा मी बहिणीकडे खंडाळ्याला रहात असे. तिथं राजेंद्र विद्यालयातील मैदानावर टेनिसबॉल क्रिकेट पाहून क्रिकेट या नवीन क्रिडा प्रकाराची आवड निर्माण झाली. अंगी क्रिडाकौशल्य असल्याने या खेळाची तोंडओळख व्हायला वेळ लागला नाही. तेव्हा मी बॅटिंग बरोबर बॉलिंग सुद्धा चांगला करू लागलो होतो. राजेंद्र विद्यालयाच्या बांधकाम चालू असलेल्या तिसऱ्या मजल्यावर चेंडू मारण्याच्या शर्ती लावल्याचे बरेच किस्से आहेत. मला आठवते, खंडाळा कोर्टाच्या इमारतीच्या मागच्या बाजूच्या आयताकृती ग्राउंडवर सतीश काळभोर, विजय गाढवे, जालिंदर यादव, जितेंद्र गोरे, रवींद्र गाढवे, संजय खंडागळे तसेच बाबु शहा यांच्या बरोबर आमचा खेळ रंगत असे. लोणंद महाविद्यालयामध्ये बी. एस्सी.ला प्रवेश घेतल्यानंतर मात्र टर्फवरील लेदर बॉल क्रिकेटची ओळख झाली. यात अंदाज यायला वेळ लागला पण त्यासही परिचित झालो. आत्मविश्वासानं बॅटिंग करत असल्यामुळे आपोआप वर्गाच्या आणि महाविद्यालयाच्या संघामध्ये प्रवेश मिळवला. पण या खेळास आवश्यक नपरवडणारे किट तसेच बॅट्स लागत असल्याने हा खेळ महागडा वाटे.

याखेळासाठी आवश्यक सराव मी खंडाळ्याच्या एकता क्रिकेट क्लबमध्ये कॉर्क बॉल क्रिकेट खेळून करत असे. यावेळी क्रिकेटचे सगळे धडे गिरवले. सकाळ संध्याकाळ भरपूर सराव केला. क्लबमध्ये या खेळाचे मूलभूत तांत्रिक प्रशिक्षण मिळाले. तो तीन वर्षाचा काळ मी बराच वेळ मैदानावर असे. एकता मधील जावेद पठाण, मुन्ना शेख, दत्तात्रय चौधरी, चंद्रकांत वळकुंडे, जावेद शेख, धनंजय देशमुख, बाळाभाई शेख, लहूचंद पवार, अशोक जाधव, विकास गाढवे, जितेंद्र अगरवाल, आणि बंडू चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभलं. शिरवळ, असवली, आनेवाडी, लोणंद, वाठार, पाचवड, करंदी, भादवडे, अहिरे, मोर्वे तसेच सुरूर इथल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतल्याचे आठवते. त्यावेळी मी मध्यमगती बॉलिंग करत असे आणि बॅटिंगला शेवटी जात असे.. एकतामध्ये खेळताना खंडाळा गावातील सुहास जाधव, शिवाजी खंडागळे, मंगेश माने, संतोष जाधव, प्रमोद खंडागळे, मंगेश खंडागळे, महंमद शेख, शकील शेख, दयानंद खंडागळे, जितेंद्र धरू, प्रल्हाद राऊत, प्रदीप जाधव, शशिकांत गाढवे, मुस्ताक शेख, संजय गाढवे, जितेंद्र गाढवे, शैलेश गाढवे, चंद्रकांत खंडागळे, शकील शेख, उन्मेश जगदाळे, सचिन गुळूमकर, विष्णू गाढवे, तुषार ठोंबरे इत्यादी सारखे बरेच सहकारी मित्र लाभले. आम्ही अजून मैत्री जपली आहे.

या अनुभवाच्या जोरावर मी महाविद्यालयातर्फे विभागीय क्रिकेट स्पर्धेत सातारा तसेच कराड येथे खेळलो होतो. या खेळामुळे खंडाळा, लोणंद तसेच वाई परिसरातले भरपूर मित्र झाले. महाविद्यालयाच्या संघामधील शाम करमळकर, धनंजय भोसले, अमोद शेळके, अतुल चंद, नाना शेळके, उत्तम कुचेकर, सुरेश पवार, राजू कचरे, अस्लम शेख, आप्पा गायकवाड, भरत जाधव, पापा पानसरे, सुनील शहा, विठ्ठल शिंदे, दशरथ क्षीरसागर, भाऊ धायगुडे, प्रवीण डोईफोडे यांच्याशी परस्परसंवाद वाढून मैत्री झाली. लेदर बॉलवर ताकदीने टोलेबाजी करत नसलो तरी तंत्रशुद्ध बॅटिंग करत असे. आमच्या वर्गाच्या टीममध्ये हेमंत घाडगे, आमोद शेळके, मुकुंद जाधव, संतोष पवार, प्रदीप भोईटे, उत्तम भोईटे, महेंद्र जाधव, राजू चिखले हे समाविष्ट असायचे. कराडमधील सामन्याची आठवण अशी की; मी आणि राजू कचरेने सलामीस जावून दहा षटके खेळून काढत ५० धावांची भागीदारी केली होती. त्यांच्यातील एका गोलंदाजाचे बरेचसे चेंडू माझ्या डाव्या मांडीवर आपटून गोलाकार उठलेले व्रण तीन महिनेतरी गेले नव्हते. नेहमी अटीतटीचे सामने खेळायला आवडायचे. आपल्या आवडत्या मित्रांची बॅटिंग आणि बॉलिंग बघायला मला नेहमी आवडे.

महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात असताना कराडला विभागीय क्रिकेट स्पर्धा खेळायला मी जाणार होतो हे आदरणीय प्राचार्य महानवर सरांना समजले. सरांना माझी एव्हढी काळजी की खेळताना केशवला लेदरचा बॉल लागून दुखापत होईल, मग परीक्षेतील कामगिरीवर परिणाम होईल म्हणून 'यावेळी तू नाही गेलं तर चालणार नाही का ?' असं चिंतातुर नजरेने विचारणारे सर आठवतायंत ... खेळायला मिळणार नाही म्हंटल्यावर माझा हिरमुसलेला चेहरा सरांना पाहावेना. लगेच क्रीडाशिक्षक आदरणीय डीपी ननावरे सर यांना सूचना देऊन दोन दिवसात हेल्मेट, पॅड्स आणि इतर संरक्षक साहित्य आमच्या सेवेस हजर ! याबाबतीत माझ्या सहकारी मित्रांनी माझे खूपखूप आभार मानले होते. विद्यार्थ्याला दुखापत होऊ नये म्हणून कळकळ करणारे सर पुन्हा होणे नाही ! 

उन्हाळी सुट्टीत वाडीला गेलो की क्रिकेट खेळायची पंचाईत होई. कारण खेळण्यासाठी अकराजण तयार नसायचे. एक वर्षी मित्रवर्य हनुमंत मांढरे यांनी खालच्या आळीला जोशी काकांच्या शेतात मधोमध एक खेळपट्टी तयार केली. सभोवताली माती ! तिथं काही दिवस गावातील राजेंद्र मांढरे, निवास अनपट, अनिल अनपट, रवींद्र अनपट, विजय मांढरे, दुर्योधन मांढरे या मित्रांना सराव दिला. झाली आमची टीम तयार ! तेवढ्या तयारीवर लगेच बावधन मधील मुलांसोबत मॅच ठरली. आमचे दोनच बॉलर चांगले ! इतरांची झाली धुलाई.. अपेक्षेप्रमाणं आम्ही मॅच हरलो. परंतु त्यामुळे इतरांना खेळाची आणि मॅचमधील इर्षेचा तसेच पराभव स्वीकारायचा अनुभव आला. पुढच्या वर्षी मात्र आम्ही तयारीनिशी उतरलो. आमच्याकडे यावेळी चार उत्तम बॉलर होते. बॅटिंग चांगली झाली आणि त्या सामन्यात अगोदरच्या वर्षाच्या पराभवाचा आम्ही वचपा काढत दणदणीत विजय मिळवला. विजयाचा आनंद पुरेपूर लुटला होता. असे छोटे छोटे क्षण जरी आठवले तरी फार भावनावश व्हायला होतं.

एम एस्सी. दरम्यान शिवाजी विद्यापीठात शिकत असताना मात्र अपवाद वगळता लेदरबॉल क्रिकेट पासून दूर गेलो. त्या दोन वर्षातील बराच काळ मी मैदानावरच घालवला होता. प्रॅक्टिकलनंतरचा वेळ शक्यतो मी मैदानावरच असे. एकतर अभ्यास नाहीतर मित्रांसोबत क्रिकेट असे समीकरण झाले होते. त्यामुळे मी किती क्रिकेट खेळलो आहे याचा आपणास अंदाज येऊ शकतो. तेव्हा संजय गोडसे, संतोष पोरे, राजू लाटणे, शशिकांत मुळीक यांची क्रिकेटमुळे सलगी वाढली. इथेदेखील बरेच अटीतटीचे सामने खेळलो होतो.

पुढे संशोधनास रुजू झाल्यानंतर दिवसभर जरी खेळायला मिळत नसायचे तरी सुट्टीचा दिवस आणि दररोज सकाळी एक तास हा क्रिकेट साठी ठरलेला. संशोधक सहकाऱ्यांबरोबर खेळण्याचा दुर्मिळ योग येई परंतु विभागाचे एम.एस्सी. चे विद्यार्थी हे माझे ठरलेले सहकारी खेळाडू असायचे. त्यामुळे मी प्रत्येक बॅचच्या फार जवळ यायचो. त्यांचा ग्राउंडवर जादा संपर्क यायचा त्यामुळे जवळजवळ सर्वच्यासर्व विद्यार्थ्यांना मी जवळून ओळखायचो. त्यामुळे अभ्यासात हुशार आणि अवघड विषयात संशोधन करणारे सर आपल्या ओळखीचे आहेत या भावनेतून माझ्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात जरी आदरयुक्त भीती असली तरी लगट वाढायची. इतर विषयाचे बरेचसे विद्यार्थी माझ्या क्रिकेट वेडामुळे माझ्या परिचयाचे आहेत.

याप्रसंगी आठवते ती जून १९९७ ला पास झालेली एम. एस्सी. ची बॅच ! कारण या दरम्यान विद्यापीठाच्या मैदानावर होस्टेलवरील विद्यार्थ्यांनी एक क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली होती. योगायोगाने माझ्या बॉलिंगमुळे भौतिकशास्त्र विभागाच्या टीममध्ये मला खेळायला संधी मिळाली होती. त्या वेळची आमची टीम फारच समतोल होती. चार वेगवान गोलंदाज, दोन ऑलराऊंडर आणि पाच उत्कृष्ट फलंदाज. बाद पद्धतीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत आमचे एकूण पाच सामने झाले होते. फायनलपर्यंत सर्व सामने लिलया जिंकले होते. मला आठवते आमचे जास्तीत जास्त पाच गडी बाद व्हायचे. संघामध्ये चार तंत्रशुद्ध फलंदाज आणि बॉलिंग तर अतिशय शिस्तबद्ध केली जाई त्यामुळे तो चषक आम्हीच जिंकणार हा सर्वाना विश्वास होता.

सर्व सामने अटीतटीचे झाले; विशेषत: केमिस्ट्रीविरुद्धचा उपांत्य सामना आम्ही अगदी जिद्दीने जिंकला होता. तशी तुलना केली तर केमिस्ट्रीचा संघ आमच्यापेक्षा सरस होता, फक्त आमची एकजूट महान होती, त्याचेच हे फळ ! स्पर्धेमध्ये केमिस्ट्री इतका बलवान कुठलाच संघ नव्हता. त्यांच्याच पुढाकाराने स्पर्धेचे आयोजन झालेेे होते. त्यांचा पराजय फक्त आम्हीच करू शकत होतो. प्रथम फलंदाजी करत आम्ही त्यांच्यासमोर सोळा षटकांत ८० धावांचे आव्हान ठेवलं होतं. निव्वळ उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण याच्या जोरावर आम्ही ही मॅच वीस धावांनी जिंकली होती. विभागातील मुला-मुलींचे, विशेषता चंद्रकांत धर्माधिकारी यांचे, जोरदार प्रोत्साहन संघातील खेळाडूंचे मनोधैर्य कमालीचे वाढवत होते. 

आणि फायनल चा सामना आला ! लायब्ररी विरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात सोळा षटकात त्यांना मात्र ६४ धावांमध्ये आम्ही रोखले होते. सर्वांना वाटत होतं आता आम्ही सहजासहजी हा सामना जिंकणार... पण झालं उलटच ! धावांचा पाठलाग करताना आमचे समीर शेख, पवन गोंदकर, रणजीत देसाई, आशुतोष अभ्यंकर, विजय खुळपे असे पाच फलंदाज अवघ्या ३ धावांत बाद झाले होते. पराभव समोर दिसत होता. माझ्या अगोदर फलंदाजीस गेलेला सोलापूरचा राजू गायकवाड चौकार-षटकार मारण्यात पटाईत होता. परंतु त्यापरिस्थितीत मात्र त्याची फलंदाजी बेभरवशाची वाटू लागली..
 
त्याच्या जोडीला मी गेलो. आमच्याकडं अजून बारा षटक बाकी होती. मी त्याला सांगितलं - धावा झाल्या नाही तरी चालतील पण खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहायचं. आपण जर दोघांनीच ही षटके खेळून काढली तर धावा आपोआप होतील आणि सामना आपणच जिंकू... राजूच्या सर्व खेळाचे मी नॉनस्ट्राईकवर उभा राहून नियंत्रण केले. मीदेखील बॉलच्या रेषेत जाऊन बचावात्मक पवित्रा घेतला. एकेरी दुहेरी धावांवर भर दिला. क्षेत्ररक्षकांमधील गॅप शोधत मध्येच चौकार वसूल केले. बघता-बघता धावसंख्या ५० झाली. आव्हान आवाक्यात आल्याने मात्र राजूचा संयम सुटला. राजूने हवेत उंच मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाने पकडला आणि राजू झेलबाद झाला. नंतर आलेला प्रशांत शिंदे देखील लगेच बाद झाला. विजय समीप असताना दुहेरी धाव घेताना मीही धावबाद झालो. लायब्ररीला आता विजय दृष्टीक्षेपात वाटू लागला.... नंतर आलेल्या प्रशांत ढगेने मात्र षटकार मारून विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे अजून आमचे अविनाश ढेबे आणि आणि संदेश कांबळे हे गडी बाद व्हायचे बाकी होते. हा सामना माझ्या दृष्टीने अतिशय अविस्मरणीय आहे. फटकेबाजी केली नसली तरी सुरुवातीला मी अचूक गोलंदाजी व नंतर नियंत्रित फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिले होते. आवर्जून हा सामना बघायला आलेल्या आमच्या सरांना देखील माझ्या खेळाचे आश्चर्य वाटले होते. शैक्षणिक प्राविण्याव्यतिरिक्त त्यांना या निमित्ताने माझ्या व्यक्तिमत्वाचा दुसरा पैलू पाहायला मिळाला होता. मनाच्या खोल कप्यात हा सामना मी कोरून ठेवलेला आहे कारण सर्व अडचणीतून शांत डोक्याने मार्गक्रमण केल्यानंतर बाहेर येता येते हा धडा मला यातून मिळाला होता.

त्यानंतर संशोधक विद्यार्थीदशेतच मी विद्यापीठाच्या कर्मचारी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दर रविवारी सरावाच्या दृष्टीने विद्यापीठाच्या मैदानावर आम्ही लेदर बॉलवर स्थानिक क्रिकेट क्लब विरुद्ध पन्नास षटकांचा सामना खेळत असू. मी अतिशय किफायतशीर अशी मध्यमगती गोलंदाजी करत असे. एका सामन्यामध्ये आमच्या सागर पवार या कप्तानाने मला सलग सहा षटके एका बाजूने गोलंदाजी करायला लावली होती. अधिक टिच्चून गोलंदाजी करत केवळ पंधरा धावा देत मी दोन बळी घेतल्याचे आठवते. तेव्हा मी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेत त्यांच्या विविध स्पर्धेत भाग घेता यावा म्हणून नावनोंदणी देखील केली होती. त्यावेळी विद्यापीठातील कॅप्टन आनंदराव पाटील, मोहन मिस्त्री, यशवंत साळोखे (सिडने), प्रियेदाद रॉड्रिक्स, आप्पा सरनाईक, उदय करवडे, शिंगे इत्यादी अनुभवी सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले तसेच राजू कोळी, रमेश ढोणुक्षे, राजेश चव्हाण, अजय आयरेकर, योगेश दळवी, अनिल साळोखे,  अनिल पाटील, अवधूत पाटील, अभिजीत लिंग्रस, सुरेश बंडगर, अनिल जाधव, दिवंगत विजय जाधव सारखे सहकारी मित्र लाभले. दुपारच्या सुट्टीत व स्थानिक स्पर्धा खेळत खेळत मी तेव्हा भाग असलेला कर्मचारी संघ आता देश पातळीवर खेळू लागला आहे (मुंबई, नाशिक, जळगाव, अमरावती, नागपूर, गोरखपूर, दिल्ली, लुधियाना, पतियाळा, श्रीनगर). आता मात्र या संघात खेळता येत नसल्याच श्यल्य आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलो की मित्र अजित पिसाळ बरोबर बावधनसाठी वाई, ओझर्डे, भुईंज, पाचवड येथे क्रिकेट स्पर्धा खेळल्याचं आठवतं.

पुढे भौतिकशास्त्र विभागात शिक्षक झाल्यानंतर विभागातील विद्यार्थ्यांच्या सोबत भरपूर क्रिकेट खेळायचो. सुट्टीच्या दिवशी आम्ही ज्या गल्लीत राहत असू तिथल्या मित्रांसोबत दोन तासांच क्रिकेट ठरलेल. या सकाळच्या खेळाला मी व्यायाम म्हणून बघायचो. खेळाचा पुरेसा अनुभव असल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाबरोबरच मैदानावर देखील खेळाने प्रभावित करायचो. मी कधी पुढे सरसावत तसे उंच फटके मारायचो नाही. पण मला आठवते मी दिपक गायकवाडच्या एका षटकात लागोपाठ चार षटकार खेचले होते. दिपकची लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी माझ्या हिटिंग झोनमध्ये पडत होती. त्यानंतर त्याने मला नेहमी अराउंड द विकेट गोलंदाजी केली होती.

विद्यार्थ्यांसोबत खेळतानाचे काही कटू प्रसंग देखील आठवतात; धाव घेत असताना सध्या पोलिस अधिकारी असलेला रवींद्र पाटील क्षेत्ररक्षकाकडे बघत धाव घेताना त्याची विकेटकिपरशी धडक झाली व घसा दुखावल्याने काही महिने त्याचा आवाज गेला होता. सुदैवाने उपचारांती त्याचा आवाज परत आला. वेगवान गोलंदाजी करताना पाटण येथील प्रमोद कुंभार या विद्यार्थ्याचा हात खांद्यातून निखळला होता. त्याच्या खांद्यावर दोन्ही पाय ठेवून हाताने त्याचा हात फिरवून आश्चर्यकारकरित्या मी बसवला होता. त्यानंतर आयुष्यात त्याने वेगवान गोलंदाजी केली नाही. अभ्यासात अत्यंत हुशार आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू असलेल्या दिवंगत युवराज गुदगेची आठवण अविस्मरणीय आहे. तांत्रिकदृष्ट्या अतिशय मजबून असलेल्या या डावखुऱ्या क्रिकेटपटूने कोल्हापुरात भरपूर क्लब क्रिकेट खेळले होते. साडेसहा फूट उंचीच्या युवराजने विद्यापीठाच्या मैदानावर कित्येक षटकार सहज मारले होते. खेळायला गेला कि सामना जिंकूनच येई. त्याने अनेक सामन्यात अर्धशतक ठोकले होते. पुढे तो प्राध्यापक झाल्यावर सहलीवर असताना आपल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समुद्रात बुडताना वाचवताना बुडून त्याचा दुर्दैवी देहांत झाला. आमचा एक विद्वान, आज्ञाधारक आणि सदगृहस्थ विद्यार्थी नियतीने हिरावून नेला.

भौतिकशास्त्र विभागातील शिक्षक कायम उत्तम क्रिकेट खेळत. याप्रसंगी आठवण येते ती विभागाच्या वेलकम तसेच सेंडऑफ निमित्ताने शिक्षक विरुद्ध विद्यार्थी अशा आयोजित सामन्यांची.. वयोमानपरत्वे तसेच सराव नसल्यामुळे शिक्षकांच्या बॅटला चेंडू लागत नसे. मुलं शिक्षकांविषयीच्या आदरापोटी त्यांना लवकर बाद करत नसत. चुकून बाद झालेच तर त्यांच्या पोटात गोळा येई. तो एक सामना पूर्ण करमणूक असे. एकदा या प्रसंगी मुलांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. या सामान्याच्या नाणेफेकीसाठी एकाच वर्गाचे चक्क दोन कॅप्टन आपल्या दोन संघासह आले होते. यासंदर्भात आदल्यारात्री विद्यार्थ्यांच्यात काहीतरी वाद झाला होता. मैदानातही थोडासा गोंधळ झाला. शिक्षकांनी मध्यस्थी करत तो वाद मिटवला आणि स्पर्धा सुरळीत पार पडल्या. आता शिक्षकांच्या टीम ची जागा संशोधक विद्यार्थ्यांच्या टीमने घेतली आहे आणि सतत हा सामना ते जिंकत आले आहेत.

माझ्या क्रिकेटप्रेमामुळे आमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट खेळ माझ्या स्मरणात आहे. क्रिकेटमुळं लक्षात राहिलेले आमचे काही विद्यार्थी असे; दत्तात्रय पन्हाळकर, विजय खुळपे, सुदर्शन शिंदे, प्रशांत शिरगे, शिवाजी सादळे, शिवाजी जमदाडे, राजू तांबेकर, प्रशांत जाधव, शरद भगत, रूपेश देवण, सर्फराज मुजावर, विनायक राजपूत, प्रशांत पाटील, प्रदीप कांबळे, दिपक पाटील, राम कलुबरमे, मुरलीधर चौरशिया, जयवंत गुंजकर, उमाकांत पाटील, विजय रासकर, निषाद देशपांडे, माणिक रोकडे, अवधूत वेदपाठक, सचिन पोतदार, सुनील आणि रमेश फासे, दिवंगत सुनील भोसले, सिकंदर तांबोळी, सुनील काटकर, गुरुदास माने, गजेंद्र राऊत, परवेज शेख, रुपेश बनसोडे, हर्षराज जाधव, सदानंद जाधव, दत्तात्रय जगदाळे, महेश शेलार, संदीप कामत, प्रशांत शेवाळे, इंद्रजीत बागल, विनायक पारळेे, गोविंद कदम, राहुल पाटील, गोपाळ कुलकर्णी, सचिन पवार, विशाल साळुंखे, रोहित कांबळे, सतीश रेपे, गौरव लोहार, श्रेयस गुजर, प्रशांत कांबळे, प्रतीक माने, गणेश करपे, किरण हुबाळी इत्यादी.. अर्थात ही संपूर्ण यादी नाही.

  
त्यानंतर विद्यापीठातील बॉटनी विभागाच्या संशोधक विद्यार्थ्यांचा एक गट दररोज सकाळी सहा ते आठ दरम्यान भवन जवळील छोट्या ग्राउंडवर नित्याने क्रिकेट खेळत असे. मग त्या गटात सामील झालो. सातत्यानं पाच वर्ष आम्ही एकत्र क्रिकेट खेळत होतो. यादरम्यान देखील संदीप पै, मानसिंग निंबाळकर, जय चव्हाण, निवास देसाई, निलेश पवार यांसारखे बरेच सहकारी मित्र लाभले. या चमुतील राजाराम पाटील या मित्राची 'अर्ली एक्झिट' मात्र मनाला चटका लावून जाणारी ! यादरम्यान फलंदाजीचे उत्तम कौशल्य मी जपले होते. इथल्या मैदानाच्या आयताकृती आकारामुळे त्यादरम्यान माझ्यात 'लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव' चे कौशल्य विकसित झाले. एकदा धाव घेताना पाय घसरून हातावर सर्व बोजा आल्याने खाद्यातील स्नायूमध्ये ताण आल्यापासून मी माझ्या गोलंदाजीत बदल करत फिरकी गोलंदाजीकडे मोर्चा वळवला होता तो आजतागायत आहे. फिरकी गोलंदाजी ही उत्कृष्ट करू लागलो. बरेच चेंडू निर्धाव टाकल्याचे आठवते.  
 
यावेळी आठवते ती कर्मचाऱ्यांची दोन ते अडीच दरम्यानची पदवीदान समारंभाच्या मैदानावरील क्रिकेट स्पर्धा ! एक सामना दोन दिवस चाले. आज आमची फलंदाजी तर उद्या गोलंदाजी. संशोधक विद्यार्थी असताना प्रकल्पावर रिसर्च फेलो असल्याने विद्यापीठाचा कर्मचारी म्हणून भौतिकशास्त्र विभागामार्फत खेळायला मिळे. डोंगरे सर, सावंत सर, कदम सर, संकपाळ सर, मांगोरे पाटील सर यांची नेहमीच माझ्या खेळावर भिस्त असायची. या स्पर्धेची दोन चषक पटकावणाऱ्या चमूचा मी सदस्य होतो याचा अभिमान आहे. त्यानंतरच्या काळामध्ये पीटी पाटील, प्रताप वाघ, प्रशांत शिरगे, सागर पवार, पप्पू चव्हाण, शरद भगत, प्रशांत पाटील, प्रकााश चौगुले, मनोज कुंटेे यांच्या योगदानातून आम्ही तीनदा उपांत्य फेरी गाठली होती.

मैदानात खेळायला उतरल्यानंतर प्रत्येक वेळी मी अतिशय ईर्षेने आणि आत्मीयतेने खेळल्याचे आठवते. 'कुलगुरू एकादश' विरुद्ध 'प्र-कुलगुरू एकादश' या विद्यापीठातील प्राध्यापकांमधील क्रिकेट सामन्यात विद्यमान प्र-कुलगुरू पीएस पाटील सर आणि मी कुलगुरू एकादश संघात खेळलो होतो. मी सर्वांपेक्षा तरुण होतो. जिंकायला आठ षटकात १२० धावांची गरज असूनही मी आणि पाटील सरांनी सातव्या षटकातच संघाला मोठा विजय मिळवून दिला होता. पाटील सर देखील उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत.
 

वयोमानपरत्वे ग्राउंडवर जाण्याचा योग कमी येऊ लागला. फक्त रविवारी किंवा वेलकम आणि सेंडऑफ च्या मॅचेस वेळी ग्राउंड वर जाऊ लागलो. विभागाच्या स्पोर्ट डे निमित्त आयोजित केलेल्या मॅचेस दरम्यान संशोधक विद्यार्थी मला त्यांच्या टीममध्ये सामील करू लागले. वाद टाळण्यासाठी सर्व सामन्यादरम्यान पंच म्हणून मी उपस्थित राहतोच. कधी कधी विद्यार्थ्यांना माझे निर्णय रुचत नाहीत. कित्येकदा या मॅचेस इतक्या अटीतटीच्या आणि चुरशीच्या व्हायच्या की विद्यार्थी चिडीला जाऊन आपापसात भांडण करायची. अर्थात हे वाद मैदानापुरतेच मर्यादित असायचे. या अनुषंगाने मुरली, सचिन, प्रद्युम्नन, सदानंद, विनायक हे विद्यार्थी कायम लक्षात राहिले आहेत. पण त्यांना दिलेले निर्णय खिलाडीवृत्तीने घ्यायची सवय लावली आहे. विद्यार्थ्यांमध्ये एकता दृढ व्हावी आणि निर्माण झालेली कटुता कमी व्हावी यासाठी कायम आग्रही असतो. अजुनही खेळण्याची कुवत आणि जिद्द आहे. 

 
विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये अजूनही सहभागी होत असतोच. दोन वर्षांपूर्वी आमच्या युसिक विभागाच्या संघाने माझ्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. 

 
 
वर्षानुवर्षे या खेळाने माझ्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित केला आहे तसेच जीवनातल्या कठीण परिस्थितीला तोंड देण्याची किंवा अडचणींवर मात करण्याची मानसिकता विकसित केली आहे. आपल्या वैयक्तिक जीवनात अंगभूत गुण आणि कौशल्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. खेळामुळे व्यक्तिमत्व विकास होतोच पण त्याच बरोबर आपले मनोबल उंचावते आणि शारीरिक क्षमता दृढ होते. याद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमापलीकडील ज्ञान देण्याचा हा माझा प्रयत्न असतो. दैनंदिन जीवनातली सकारात्मकता या अशा क्रीडा कौशल्यातून येते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सुदृढ होतो.

- डॉ. केशव यशवंत राजपुरे (९६०४२५०००६)
 

 अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...