तरुणांचा आयडॉल आदर्श सरपंच नितीन मांढरे (काका)
समाजऋणातून उतराई होण्यासाठी आपण गावासाठी विधायक कार्य केले पाहीजे ही खूणगाठ मनाशी बाळगून काही माणसं वावरत असतात. नितीन या शेतकरी युवकाचा विधायक कार्यात नेहमी सहभाग ! विघ्नहर्ता गणेश मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम असोत किंवा श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी (मुंबई) चे सामाजिक कार्य असो नितीन प्रत्येक गोष्टीत पुढे.. त्याच्या याच कार्यतत्परतेचा व जबाबदारपणाचा अंदाज गावकऱ्यांना आला व मतदान अधिकार मिळाल्या मिळाल्या त्यांनी या युवकाला वयाच्या एकविसाव्या वर्षी बिनविरोध सरपंच केले. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जिल्हा परिषदेचा मानाचा आदर्श सरपंच पुरस्कार तसेच आर आर आबा लोकविकास प्रतिष्ठानचा आदर्श सरपंच पुरस्कार असे दोन पुरस्कार स्वकर्तुत्वावर मिळवणारे तसेच गावच्या विकासासाठी सतत झटणारे अनपटवाडीचे लाडके आदर्श सरपंच नितीन मांढरे (काका) यांच्या विषयी..
दोन भाऊ आणि एक बहीण असणाऱ्या कुटुंबात मालन व कै शिवराम साहेबराव मांढरे यांच्या पोटी २७/१२/१९७९ ला नितीनचा जन्म झाला. नाणी आणि नोटा तयार करण्याचा कारखाना, म्हणजे टांकसाळमध्ये मुंबई येथे त्याचे वडील सेवेत होते. नितीनचे पहिली ते तिसरीचे प्राथमिक शिक्षण अनपटवाडी येथे झाले. चौथीची केंद्र परीक्षा प्राथमिक शाळा कणूर, तर पाचवी ते दहावी बावधन हायस्कूल, बावधन असा त्याचा शिक्षण प्रवास ! तो अभ्यासात थोडा कमकुव होता. १९९२ ला त्याच्या वडिलांचं निधन झालं. थोरले बंधू शशिकांत अनुकंपावर वडिलांच्या जागेवर सर्विसला लागले. दुसरे बंधु माणिक ट्रकचालक, त्यामुळे नेहमी घरापासून लांब. अशा परिस्थितीत कुटुंबाची व शेतीची सर्व जबाबदारी नितीनवर ! त्यामुळे १९९५ ची एसएससी ची परीक्षा त्याला उत्तीर्ण होता आले नाही. अर्थात पुढ त्यानं मुक्त विद्यापीठाची बिए पदवी मिळवली. लहान वयात शेतीची जबाबदारी नितीनवर आली त्यामुळे घरगडी भैय्या मामा व इतर सहकारी यांच्यासोबत घरकाम व शेती केली. तेव्हा त्यांची बावधनची आत्या व कै पोपट पिसाळ (पाटील) मामांचे नितीनवर लक्ष होतेच. उपजतच नेतृत्वगुण असणाऱ्या नितीनला मग समाजकार्याची आस लागली.
दरम्यान १९९८ मध्ये मुंबईतील चाकरमान्यांच्या गावच्या विकासासाठीच्या श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडीची स्थापना झाली. योगायोगाने २००० साली नितीनला मतदानाचा अधिकार प्राप्त होणार होता. त्यावेळेला ग्रामपंचायत निवडणुकाही तोंडावर आल्या होत्या. नितीनचे व्यक्तिमत्व आणि गावच्या विकासासाठी काम करण्याची ऊर्मी, ग्रामस्थांनी हेरली आणि त्याला बिनविरोधपणे गावचे नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यावेळी गावासाठी एक महत्त्वाचा निर्णय झाला. त्यानंतरच्या २० वर्षातील आजतागायतच्या सर्व ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करून गावाने पंचक्रोशीत एक रेकॉर्ड केले आहे. तसं बघायला गेलं तर नितीनच्या कुटुंबियांचा निवडणूक व त्याच्या राजकारणातील प्रवेशास विरोध होता. पण जेव्हा ही निवडणूक बिनविरोध होणार हे समजलेे तेव्हा त्याचे मामा कै पोपट पिसाळ (पाटील) यांच्या सांगण्यावरून घरच्यांनी त्याला परवानगी दिली. पुढे नितीनने आपल्या कर्तुत्वानेेे घरातल्यांचा हा निर्णय सार्थ करून दाखवला.
त्यावेळेला तो वयाने आणि अनुभवांने लहान होता. तसेच आवश्यक आत्मविश्वासाची सुद्धा कमतरता होती. अशावेळी मंडळाचे हनुमंत मांढरे, अनिल अनपट तसेच गावपातळीवरील सर्जेराव तात्या, नाना आबा, काका, निवास भाऊ, वसंत काका, हिरा आत्या व इतर वरिष्ठ गावकऱ्यांचे त्याला सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्यावेळचे त्यांचे सर्व पंचायत सदस्य; रजनीकांत अनपट, सविता अनपट, किसन अनपट, किरण सुतार, अरुण सुतार व मंगल सुतार यांनीही त्याला पूर्णपणे सहकार्य करून पाठिंबा दिला. ग्रामविकासाच्या कार्यासाठी मंडळ आणि गावकरी यांच्यातील दुआ नितीनच्या नेतृत्वाखाली मिळाला होता. ग्रामपंचायत चालवण्यासाठी आवश्यक ती सर्व तंत्रे व कार्यपद्धती त्याने अल्पावधीत ग्रहण केली आणि या युवा नेतृत्वाच्या गतिमान ग्रामीण विकासाच्या झंझावातास सुरुवात झाली.
गावच्या विकास कामात नितीनने, आधी केले मग सांगितले, अशी भूमिका घेतल्यानेच गावचा गतिमान विकास होऊ लागला. सुसूत्र ग्रामविकासाच्या अंमलबजावणीसाठी आण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीला सुद्धा नितीनच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी भेट देऊन तिथल्या गावाची आणि कार्यपद्धतीची पाहणी केली होती. तत्कालीन खासदार लक्ष्मणराव पाटील व आमदार मदनराव पिसाळ यांच्या माध्यमातून नाबार्ड योजनेमधून बावधन ते अनपटवाडी या रस्त्याचे डांबरीकरण २००१ मध्ये झाले ते त्याच्या कालावधीत. ग्राम विकास मंडळाने नाबार्ड बँकेशी पत्रव्यवहार करून मंजूर निधी लवकर मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले होते. प्रथमच गावाला पक्का रस्ता मिळाला होता. त्याच्या प्रयत्नातून २००२ मध्ये वाई अनपटवाडी बस सेवा प्रथमच सुरू झाली. राज्य शासनाच्या स्वजलधारा पाणीपुरवठा योजनेतून ग्राम विकास मंडळाच्या सहकार्याने दुष्काळा दरम्यान पाण्याची सोय करण्यामध्ये त्याचे योगदान होते. त्यावेळेला थोरल्या ओढ्या शेजारी स्वतःसाठी बघून ठेवलेली विहिरीची जागा नितीनने मोठ्या मनाने गावासाठी दिली होती ही लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट.
तेव्हा निर्मलगाव व ग्रामविकासाच्या विविध योजना शासनदरबारी चालू होत्या. त्यामधील संत गाडगे महाराज निर्मलग्राम योजनेअंतर्गत गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त होणे ही एक अट होती. तेव्हा बऱ्याच घरांमध्ये शौचालयं नव्हती. मग ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह सोसायटी बँकेच्या मदतीने घर तारण ठेवून पाच हजार रुपयांची कर्ज उपलब्ध करून शोषखड्डेची शौचालये काढण्यात नितीनने पुढाकार घेतला. व गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्यात मोठे योगदान दिले. तोपर्यंत बँका शौचालय काढण्यासाठी कर्ज देत नसत. आपल्या गावाचं उदाहरण बघून बँकांना शौचालय काढण्यासाठी कर्ज देण्यासाठीचा शासनाने आदेश काढला. राज्याला दिशा देणारा निर्णय गावामुळे घेतला गेला. स्वच्छता अभियान चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी २००४ मध्ये गावाने स्व मंगेश नानासाहेब अनपट याच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्वच्छता अभियान कमिटीची स्थापना केली होती. नितीनच्या मार्गदर्शनाखाली या कमिटीने अतिशय उत्कृष्ट काम केलं.
मांढरे भावकीला गणपती धार्जिण नव्हता त्यामुळे १९९४ च्या दरम्यान हनुमंत मांढरे याच्या पुढाकाराने नितीनने गावामध्ये दुर्गा उत्सव मंडळाची स्थापना केली. नवरात्रीच्या उपवासाच्या काळात स्त्रियांसाठी एक धार्मिक उत्सव तसेच समाजात एकोपा वाढावा आणि समाज प्रबोधन व्हावे या उद्देशातून संस्कृतिक कार्यक्रमयुक्त दुर्गा उत्सव साजरा केला जातो. तेव्हापासून या उत्सवाच्या यशस्वी नियोजनामध्ये दुर्योधन मांढरे व इतर भावबंद हे हिरीरीने भाग घेत आहेत. समाजसेवेचा घेतलेला वसा नितीन दुर्गा उत्सव मंडळाच्या माध्यमातून पूर्ण करत आहे. हा उत्सव आता गावचा उत्सव म्हणून साजरा होत आहे.
समाज प्रबोधनासाठी गावात एक मध्यवर्ती गणेश मंडळ असाव, अशी कल्पना स्व मंगेश नानासाहेब अनपट याच्या मनात २००० दरम्यान आली. मग विशाल अनपट याच्या अध्यक्षतेखाली गावातील इतर सहा मित्रांच्या मदतीने विघ्नहर्ता गणेश मंडळाची स्थापना झाली. या अगोदरही गावामध्ये गणपतीचे मंडळ अस्तित्वात होते पण त्याचे कामकाज पुढे चालू राहिले नाही. नितीन सुरुवातीपासूनच विघ्नहर्ता मंडळाचा मार्गदर्शक व सक्रिय कार्यकर्ता राहिला आहे. सुरुवातीला ठराविक समूहापुरतं मर्यादित असलेलं हे मंडळ आता गावाचं मंडळ म्हणून नावारूपास आल आहे. या मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वेगवेगळ्या समाजोपयोगी स्पर्धा नेहमीच आयोजित केल्या जातात. या मंडळाच्या कार्यक्रमातून गावांमध्ये समाज प्रबोधनाबरोबरच एकोपा वाढला व माणसं हेवेदावे विसरले. ग्राम विकास मंडळ व ग्रामस्थ यांच्या कल्पना सत्यात उतरवून योग्य अंमलबजावणीचे काम नितीनच्या नेतृत्वाखाली या मंडळाचे कार्यकर्ते नेहमीच करत आले आहेत. त्यामध्ये गावची स्वच्छता असेल, बाहेरील भिंतींना रंग देण्याचे काम असेल, महसूल वसुली असेल, नितीनच्या देखरेखीखाली काम करण्यास ही मंडळी कायम तत्पर..
नितीनच्या यशस्वी कारकीर्दीमध्ये ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन २००४-२००५ साली प्रथम क्रमांक मिळवला. सातारच्या आर आर आबा लोकविकास प्रतिष्ठानच्या सचिव प्रा संध्याताई चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सांडपाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतीला सातारा जिल्हा परिषदेच्या पाणी, सांडपाणी व्यवस्थापनासाठीच्या वसंतराव नाईक पुरस्काराने गौरवण्यात आले. शंभर टक्के वसुली व वेगवेगळ्या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीच्या कामासाठी २००४ साली गावाला यशवंत ग्राम पुरस्कार या सन्मानाने गौरवण्यात आले. याकामी विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या सर्वच सदस्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले.
या पुरस्काराने गावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली. इतर गावचे ग्रामस्थ मार्गदर्शनासाठी गावाला भेटी देऊ लागले. यामुळे इंडोनेशियातील जागतिक बँकेच्या उच्चस्तरीय समितीने या आदर्श गावास भेट दिली होती व समाधान व्यक्त केले होते. यामध्ये बँकेचे सीनियर सोशल डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट आर आर मोहन, इंडोनेशियातील प्रतिनिधी ए वी हर्मिवासरी व श्रीमती सुमा सलीम हे तीन सदस्य होते. गावातील स्वच्छतागृहे पाहून ते फारच प्रभावित झाले होते. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या नाबार्ड समितीने सुद्धा गावाला भेट देऊन कौतुक केले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदाळेेे साहेेब व जगदीश पाटील साहेब यांनी देेेेखील निर्मल गावास भेट देऊन कौतुक केले होते. या कार्यकालामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष हेमलता ननावरे व पंचायत समिती उपसभापती ललिता पिसाळ यांचे सहकार्य मिळाले.
नितीनने अनपटवाडीला निर्मलग्राम करून वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेच परंतु बावधन शेजारील अनपटवाडीस स्वतःचे वेगळे अस्तित्व आणि ओळख निर्माण करून दिली. नितीनच्या कार्याची दखल घेऊन आकाशवाणीच्या अठरा केंद्रांवर संपूर्ण राज्यभर त्याची ग्रामस्वच्छता व निर्मलग्रामविषयी मुलाखत १६ मार्च २००६ रोजी प्रसारित करण्यात आली. तसेच पुणे व सातारा आकाशवाणी केंद्रावर गांडूळ खत निर्मिती बाबतची नितीनची मुलाखतही यानंतर प्रसारित झाली होती. नितीन ला निर्मलग्राम राज्यस्तरीय समितीत सदस्य म्हणून निवडण्यात आले होते त्यामुळे त्याला राज्यभर फिरता आले व राज्यातील इतर गावांमधल्या सुधारणांचा अभ्यास करता आला. त्याच्या कार्यकालात त्याने यशदा, पुणे येथे पंचायत समिती मार्फत ग्रामसुधाराविषयी सूक्ष्म नियोजनावर सोळा दिवसांची एक कार्यशाळा पूर्ण केली होती. यातील अनुभव गावपातळीवर काम करताना त्याला फार उपयोगी आला.
नितीनच्या कारकिर्दीत गावाने केंद्र सरकारच्या निर्मल ग्राम पुरस्कार स्पर्धेत बाजी मारली होती (२००४) पण दुर्दैवाने त्या वेळेला पुरस्काराला गवसणी घालता आली नाही. पण पुढे २००७ मध्ये तत्कालीन सरपंच बाळू सुतार यांना संपूर्ण सहकार्य करून नितीनने गावाला निर्मलग्राम पुरस्कार मिळवून देण्यात खूप मोठा पुढाकार घेतला. गावास मिळालेल्या या सर्वोच्च पुरस्कारात नितीनचे खूप मोठे योगदान होते. गावाला हा पुरस्कार राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिल्ली येथे विशेष समारंभात मिळाला होता. हा सर्वोच्च पुरस्कार खरंतर गावच्या प्रामाणिक प्रयत्नांचा गौरव होता. यामध्ये तत्कालीन ग्रामसेवक श्री संतोष गाढवे (आण्णासाहेब) यांचेही सहकार्य व योगदान असल्याचे नितीन म्हणतो.
समाजात नेहमीच वाद असतात आणि हे कुटुंबातून सुरू होतात. अनपटवाडी गावातही तेव्हा काही वाद होते. परंतु नितीनने ग्रामस्थांच्या मदतीने स्वकौशल्यातून सर्व वाद मिटवून गावात मैत्रीपूर्ण व निरोगी वातावरण तयार करण्यात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे २००९ साली नितीनच्या अध्यक्षतेखाली गावाने महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानात तालुक्यात पहिला पुरस्कार मिळवला. तालुक्यातील बऱ्याच गावांना निर्मलग्राम तसेच तंटामुक्त करण्यात नितीनचे यशस्वी योगदान राहिले आहे.
२००८-२००९ मध्ये नितीन ग्रामशिक्षण समितीचा अध्यक्ष होता. गावातील शिक्षणयोग्य सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतल्याबद्दल शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते कौतुकाचा विशेष पुरस्कार गावास प्राप्त झाला होता. योग्य व नेटके नियोजन तसेच सुयोग्य अंमलबजावणी च्या जोरावर गावाने स्वच्छ आणि सुंदर अंगणवाडी पुरस्कारही पटकावलेला आहेच. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अनपटवाडी प्राथमिक शाळेत निव्वळ आवश्यक पटसंख्येअभावी वर्ग बंद पडण्याच्या मार्गावर असताना, बावधन व परिसरातील पालकांना भेटून नितीनने नवीन प्रवेश मिळवून दिले व वर्ग चालू ठेवण्यास योगदान दिले.
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागासाठी इको व्हिलेज संकल्पना जाहीर केली होती. यामध्ये खेड्यांना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश होता. यामुळे गावांमध्ये पाणी, स्वच्छता, वीज, शाळा आणि बाजारपेठा या किमान मूलभूत सुविधा होणार होत्या. याही प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी गावाला २००९ मध्ये इको व्हिलेज पुरस्कार मिळाला होता. ग्लोबल व्हिलेज बनविण्याच्यादृष्टीने, हे गावाला मिळालेलं एक महत्त्वाचे यश होत. नितीनने पूर्ण सहभाग घेवून या क्रियाकलापास समर्थित केले.
स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, इन्फोटेकचा वापर आणि नूतनीकरणयोग्य उर्जा स्त्रोतांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या खेड्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने तालुका पातळीवर दिला जाणारा स्मार्ट व्हिलेज पुरस्कार ही या गावास मिळाला आहे. हा पुरस्कार म्हणजे गावाने गेल्या दोन दशकांत सर्व क्षेत्रात केलेल्या निरंतर विकासाचे फलित आहे. गावाला आतापर्यंत वेगवेगळ्या पुरस्कारांच्या माध्यमातून पंधरा लाखाच्या वर बक्षिसे प्राप्त झाली आहेत. नितीनने सहकार्यांसोबत समाजाच्या विकासासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा हा परिणाम आहे. नितीन व ग्रामस्थ यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच गाव आज इतक्या उंचीवर आलेलं आहे की ही उंची टिकवून ठेवणे हे सुद्धा नवीन पिढी समोर एक आव्हान आहे.
गावामध्ये नितीनने एक गाव एक गणपती, दारूबंदी, गुटखाबंदी, वनराई बंधारे, वृक्षारोपण, श्रमदानातून रस्ते बांधणे, महिला बचत गटांची निर्मिती, जनावरांची शिबिरे, वाई अनपटवाडी एसटी सुरू करणे, लोकवर्गणीतून पीक पाणी योजना, विहीर खोदाई, पाणीपुरवठा योजना, गटारे व सांडपाणी व्यवस्थापन, भूकंपग्रस्त व पूरग्रस्तांना मदत, मंदिर जीर्णोद्धार, ग्रामपंचायत कार्यालयाची बांधणी, पूल बांधणी, पतीसह पत्नीच्या नावे घर करणे, निर्मल ग्राम, यात्रे वेळी तमाशा प्रथेला बंदी घालून तो निधी ग्राम विकासासाठी व देवाच्या मिरवणुकीसाठी वापरणे, अनपटवाडी गावाचा रस्ता डांबरीकरण करणे इत्यादी अनेक विधायक कामे करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. वयाच्या तिशीतले दशक; त्याच्या उमेदीचा काळ त्याने स्वतःचा संसार उभा करण्याएवजी गावाचा विकास करण्यासाठी खर्च केला होता. सर्वांच्या दृष्टीने सर्वोच्च त्याग देऊन केलेली आदर्श सरपंच नितीनची ही एक यशस्वी कारकीर्द मानली जाते.
जननायक आमदार मकरंद (आबा) पाटील यांनी नितीनची सामाजिक कार्याची आवड तसेच ग्रामविकासाची धडपड, कार्यकुशलता व क्षमता ओळखली व तात्काळ आपल्या विश्वासू गटात त्याला सामील करून घेतले. त्यांनी त्याला पक्षामध्ये काम करून मोठ होण्याची संधी दिली असे म्हणायला काहीच हरकत नाही. नितीनने संधीचं सोनं केलं व आपल्या कार्याच्या जोरावर आबांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. नितीन आबांसाठी एक विश्वासू व एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. आजपर्यंत आबांनी सोपवलेल्या सर्व कामांचा त्याने निपटारा केला आहे. आबांनीही आज पर्यंत नितीन घेऊन गेलेल्या सर्व कामासाठी वेळ देऊन, काम यशस्वी करण्यामध्ये योगदान दिले आहे. नितीन गावांमध्ये झालेल्या विकासकामांचे श्रेय आबांचेच आहे हे मानतो.
नंतरच्या काळामध्ये तालुक्यांमध्ये त्याची एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली. २००७ च्या पंचायत समिती निवडणुकीत त्याने बावधन गणातून सेवा करण्याची पक्षाला मागणी केली होती पण तेव्हा त्याला संधी मिळाली नाही. पण पुढे त्याच्या अनुभवामुळे व पक्षश्रेष्ठींची विश्वासाहर्ता जपल्याचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी त्याची निवड झाली (२००६) आणि त्याच्या कार्याचा गौरव झाला. या पदावर कार्यरत असताना त्याने पक्षादेशाप्रमाणे वेगवेगळ्या पातळ्यांवर सर्व जबाबदाऱ्या यथायोग्य रीतीने पार पाडल्या, पक्षाचा प्रचार व प्रसार केलाच व पक्षामध्ये आपली पत राखून ठेवण्यात यशस्वी झाला. यामध्ये वेगवेगळ्या गावातील युवक मेळावे, रक्तदान शिबीरे, नेत्र चिकित्सा शिबीरे, स्त्री-भ्रूणहत्या विरोधी अभियानात भाग, मुलांना प्रवेश मिळवून देन, त्यांच्या फीमध्ये सवलत मिळवून देणे, गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देणे तसेच व्यसनमुक्तीसाठी अध्यात्मिक प्रवचनांचे यशस्वी आयोजन त्या दरम्यान त्याने केले. स्त्रीभ्रूणहत्या विरोधी अभियानातील त्याच्या कार्याची श्री सद्गुरु धार्मिक यव परमार्थिक ट्रस्ट इंदोर या संस्थेने देखील नोंद घेतली होती. त्याबद्दल संस्थेने त्याचे कौतुक केले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या होत्या. यादरम्यान तालुक्यातील बऱ्याच गरजूंना संजय गांधी निराधार योजनेतून पेन्शन चालू करून दिल्या आहेत. तसेच आबांच्या माध्यमातून बऱ्याच गरजूंना वाई तसेच खंडाळा येथील एमआयडीसीमध्ये व इतर ठिकाणी नोकरीसुद्धा लावल्याचे तो सांगतो.
माजी मंत्री आमदार मदनराव पिसाळ, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील, कृषी सभापती शशिकांत पिसाळ, माजी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ तसेच दिलीप बाबा पिसाळ या सर्वांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभल्यामुळेच नितीन त्याच्या कारकीर्दीत गावाच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करू शकला.
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांनाही समानतेची वागणूक मिळाली पाहिजे व ग्रामविकासाच्या व स्त्री वर्गाला शासन दरबारच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात या भावनेतून २०१० साली अनपटवाडीमध्ये महिलाराज ग्रामपंचायत स्थापनेत ग्राम विकास मंडळ अनपटवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली नितीनने यशस्वी पुढाकार घेतला होता. तेव्हा गावचे सरपंचपद महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल होत. सौ संध्याताई अनपट यांना सरपंच म्हणून निवडून देण्यात आले होते. पंचायतीमध्ये तेव्हा सर्व सौ नंदिनी घाडगे (उपसरपंच), साधना अनपट, छबुताई अनपट, सुजाता मांढरे व मंगल सुतार या पंच होत्या. त्यावेळच वैशिष्ट म्हणजे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिपाई, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य सर्व महिला होत्या आणि खऱ्या अर्थाने तेव्हा पंचक्रोशीमध्ये महिलाराज येऊन गेल. पुरुषांबरोबरच गावातील स्त्रियांना अभिव्यक्ती-अनुभवसंपन्नता आणि क्षमतावर्धनासाठी फार मोठी संधी निर्माण करून समानतेचं फार मोठं उदाहरण समाजापुढे ठेवल होत.
२०१० मध्ये संसर (बारामती) येथील अश्विनी निंबाळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना शिवांजली व अनिश ही दोन मुलं ! २०१२ मध्ये पंचायत समिती निवडणुकीमध्ये, गण महिलांसाठी आरक्षित असल्याने, बावधन गणामधून अश्विनी वहिनींना नितीन च्या पाठिंब्यावर पक्षातर्फे सेवा करण्याची संधी मिळाली. तसं बघायला गेलं तर नितीनची आर्थिक परिस्थिती एवढी भक्कम नाही. त्यामुळे या निवडणुकीदरम्यान लोकवर्गणीतून व मित्रांच्या मदतीने निवडणुकीस लागणारा निधी उभा केला होता. निवडणुकांवेळी आपण जेवणावळी, पैशांची उधळपट्टी झालेली नेहमी पाहतो पण गावाने ही निवडणूक म्हणजे माझ्या घरातील उमेदवाराची निवडणूक असं समजून अतिशय प्रामाणिकपणे प्रचार केला. गरज पडल्यास ग्रामस्थांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले होते. ह्या निवडणुकीदरम्यान अश्विनी वहिनींना तिकीट मिळण्यासाठी सगळ्यांनीच जिकरीचे प्रयत्न केले व त्यांना त्यांच्या प्रयत्नांत यश आले. शेवटी बावधन गणामधून अश्विनी वहिनी वाई पंचायत समितीच्या सदस्य म्हणून निवडून गेल्या. त्यांच्या या यशामध्ये गावातील प्रत्येक घटकाचा सिंहाचा वाटा होता. तसेच या निवडणुकीच्या दरम्यान वहिनी गरोदर असून देखील त्यांनी सगळ्या प्रचार सभांमध्ये भाग घेतला होता. सद्ध्या त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यरत आहेत.
हा वहिनींचा समाजसेवेचा पहिलाच अनुभव होता तरी या कार्यकालात गावासाठी त्यांनी पंचायत समिती मार्फत जवळजवळ वीस लाखाची विकासकामे करून घेतली. त्यामध्ये अनपटवाडी- वाकडेेेेश्र्वर रस्ता, एसटी पिकअप शेड, स्मशानभूमी दुरुस्ती, बंदीस्त गटर, वस्तीसाठी हातपंप, वाकडेश्वर मंदिराभोवती पेविंग ब्लॉक, मंदिरा समोरील फूटपाथ, सभामंडपावरील पॅरासिट वॉल, मंदिरातील अंतर्गत कमानी, बोलकी अंगणवाडी प्रकल्प तसेेच शाळेसाठी डिजिटल क्लासरूम या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे नितीन आणि वहिनी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडल्याचे आम्हाला माहित आहे. नितीनच्या वीस वर्षाच्या कारकीर्दीमध्ये कुटुंबातल्या सर्व सदस्यांच्या पाठिंब्याचेे महत्त्वाच योगदान आहे असे त्याला वाटते.
ग्राम विकास मंडळ अनपटवाडी च्या दूरदृष्टीतून साकारलेल्या लेक वाचवा लेख वाढवा अभियानात सुद्धा नितीनने शतप्रतिशत योगदान दिलेले आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत गावातील जवळजवळ २२ लेकींच्या नावे प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या ठेवी सैनिक सहकारी बँक वाई येथे ठेवलेल्या आहेत. हे अभियान महाराष्ट्र शासनाने सुरू करण्याअगोदर गावाने सुरू केले होते ही महत्त्वाची बाब आहे. शासनाने या प्रकल्पाचे कौतुक करून नायगाव (ता. खंडाळा) येथील कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या उपस्थितीत गावाला पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. शासनाने हे महत्वपूर्ण अभियान अनपटवाडी गावचे अनुकरण करून केले आहे.
आपल्या कारकिर्दीनंतरचे सरपंच बाळू सुतार, संध्याताई अनपट तसेच मोहन अनपट यांनाही त्याचं अतिशय प्रामाणिक सहकार्य आणि पाठिंबा राहिलेला आहे. या दरम्यान त्याच्या अनुभवाचा व कार्यकुशलतेचा गावाला फायदाच झालेला आहे. त्याला पदाची व प्रतिष्ठेची कधीच हाव नव्हती व नसेल. गावच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी त्याने आपले जीवन समर्पित केले आहे. त्याने नेहमीच शाळेतील शिक्षकांना सहकार्य आणि मार्गदर्शन केले आहे. ग्रामविकासाच्या विविध योजनांच्या मंजुरी व अंमलबजावणीसाठी त्यांने वैयक्तिकरित्या रस घेतला आहे. कुठल्याही केलेल्या कामाचं तो श्रेय घेत नाही. तरीपण नितीनच्या अनुभवाच्या जोरावर आणि त्याच्या प्रामाणिक प्रयत्नातून आणि सहभागातून गावच्या वेगवेगळ्या विकास कामांची अंमलबजावणी झालेली आहे. काहीं नवीन कामे मंजूर करण्यामध्ये सुद्धा सहभाग राहिलेला आहे. वाई तालुका कृषी विभागाचा कृषी मित्र म्हणून गेले तीन वर्ष नितीन काम करत आहे. ही गावाच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे. अलीकडेच पक्षाच्या बावधन गटाचे मीडिया सेलचे अध्यक्ष म्हणून त्याची निवड झाली आहे. तसेच बावधन पंचक्रोशीतील सर्व गावांमध्ये सुसूत्र ग्रामसुधारासाठी स्वतःच्या अध्यक्षतेखाली बुथ कमिटीची स्थापना सुद्धा त्याने केलेली आहे. श्री वाकडेश्वर मंदिर जीर्णोद्धार प्रसंगी पंचक्रोशी तसेच तालुका पातळीवर भरपूर आर्थिक निधी उभा करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. नितीनमधील नेतृत्व गुण त्याच्या आजी ताई मांढरे व आई मालन यांचे पासून आले आहेत. या दोघींनीही करिअरमध्ये नितीनचे मनापासून समर्थन केले आहे. नितीनचे सर्व मित्र आणि सहकाऱ्यांची नितीनपेक्षा जास्त जपणूक या दोघींनी केली आहे. नितीनच्या बालवयातच वडील गेले होते पण त्यांच्या आईंनी त्याला कधीही वडिलांची आठवण येऊ दिली नाही हे वास्तव आहे.
सरपंच बाळू सुतार, संध्याताई अनपट तसेच मोहन अनपट त्यांच्यासोबत काम करत नितीनने केलेल्या प्रयत्नातून आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्या फंडातून जवळ-जवळ *एक कोटी रुपयांची खालील विकास कामे* पूर्ण केलेली आहेत: स्मशानभूमी इमारत आदलाबदल करणे प्रश्न मार्गी, मंदिराचा सभामंडप, मार्बल, मंदीराचे रेलिंग कंपाऊंड, नवीन पाईपलाईन आणि पाण्याची टाकी, बंधारे, रस्ता डांबरीकरण, अंगणवाडी इमारत, शाळेचे वॉल कंपाऊंड, शाळेतील हातपंप, गावातील हायमास्ट लाईट, व्यायामशाळा. तो सहभागी असलेल्या सामूहिक प्रयत्नांतून मंजूर झालेले प्रकल्प (अंदाजे साडेचार कोटी रुपये): अनपटवाडी ते सुतार वस्ती, अनपटवाडी ते वाकडेश्वर मंदिर तसेच अनपटवाडी ते शाळा ही स्ट्रीट लाईट, अनपटवाडी ते सुतार वस्ती रस्ता खडीकरण इ.. नुकताच मंजूर झालेला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील बावधन म्हातेकर वाडी रस्ता व थोरला ओढा पूल साठीसुद्धा नीतीनने आमदार मकरंद आबांजवळ पाठपुराव्याने सकारात्मक प्रयत्न केले आहेत. हे सर्व करत असताना त्याला गावातील प्रत्येक घटकाचा शतप्रतिशत पाठिंबा आणि सहकार्य लाभले आहे आणि म्हणूनच हे सर्व शक्य झालं हा त्याचा दावा आहे. तालुका पातळीवर पंचक्रोशीचे प्रतिनिधित्व करत असताना बावधन व वाड्यांमधील सर्व कार्यकर्त्यांची साथ आणि सहकार्य लाभत असल्यामुळेच नेतृत्व करणं सहज शक्य झालं असे त्याला वाटते. बावधन गणातील जवळजवळ सर्वच गावामध्ये विकास कामे करून नितीनने आपले योगदान दिले आहे.
नागेवाडी लघुपाटबंधारे प्रकल्प आपल्या पंचक्रोशीला नवसंजीवनी देणारा ठरला आहे. २००० ला बांधकाम पूर्ण होऊन देखील प्रकल्प रखडला, बऱ्याच दिव्यातून गेला. प्रकल्पाच्या कालव्याचे पूर्ण खोदकाम होऊनही धरणातून कालव्यात पाण्याचा विसर्ग होत नव्हता. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार मकरंद आबा, दिलीप बाबा, शशी दादा, मधू आप्पा व नितीन यांनी पुढाकार घेऊन योगदान दिलेले आहे. या संदर्भातल्या सर्व मिटिंगना नितीन उपस्थित होता. पुणे, सातारा तसेच मंत्रालयात बरेच हेलपाटे झाले. त्यामुळे २०१७ मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आले व आपल्या हक्काचा पाण्याचा स्त्रोत आपल्याला मिळाला. नितीन एवढेच करून थांबला नाही. या कालव्यांनंतरच्या पोटपाटामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्या सर्वांच्या नुकसानभरपाईसाठी संबंधित विभागात प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करून भरपाईच्या निधीचे वाटप करण्यासाठी त्याने सर्वात जास्त प्रयत्न केले आहेत. गेल्यावर्षी गावातील शेतकऱ्यांच्या उसाचा निर्माण झालेला मोठा प्रश्न नितीनने सोडवून दोन दिवसात गावचा ऊस कारखान्याला पाठवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी स्वतःच्या अध्यक्षतेखाली नितिनने वाकडेश्वर शेतकरी मंडळाची स्थापना केलेली आहे.
नितीनचा स्वभाव अतिशय शांत, मितभाषी, सालस, निर्मळ, विवेकशील, व्यक्तिनिष्ठ व नम्र असा आहे. हे सगळे गुण त्याच्या नैसर्गिक सौंदर्यात अजून भर घालतात. तो कोणालाही तोडून बोलल्याचं मी ऐकले नाही. आयुष्यात त्यानं माणसे जोडली आहेत तोडली नाहीत. त्यामुळे नितीन म्हणजे एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व ! त्याच्याकडे कुठलेही काम घेऊन गेलो तरी तो आपल्यासाठी मदतीस नेहमी तयार असतो. त्याला संपर्क कार्यालय लागत नाही, माणूस भेटलं की त्याचं काम सुरू ! गावच्या सामाजिक विकासासाठीची त्याची भक्ती इतकी प्रचंड आहे की त्याचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती व घरच्या आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष झाल्याचे त्याला भान नाही.
नितीनला तालुका स्तरावरच नव्हे तर जिल्हास्तरावर एक मानाचे व आदराचे स्थान आहे. शासन दरबारी कुठल्याही कार्यालयांमध्ये त्याची ओळख असतेच. त्याची कार्यकुशलता वेगळ्या ढाच्याची असल्यामुळे त्याची सर्व कार्यालयांमध्ये पत प्रतिष्ठा आहे. कोणतेही काम करण्याची नितीनची उमेद व पाठपुरावा यामुळे संपूर्ण तरुणाईचा तो आयडॉल ठरत आहे. नितीन हे सगळं कुटुंब, शेती, नातेवाईक, गाव, समाजकारण (८०%)-राजकारण (२०%) या सगळ्यांचा सुवर्णमध्य साधून लीलया करत असतो. त्याचं निस्वार्थी आणि निष्कलंक राजकारण, त्याचा कार्यमग्न, धडपडी, सर्वसमावेशक व विनम्र स्वभाव तालुक्याच्या राजकारणात भविष्यात महत्त्वाचा ठरणार आहे.
चांगली भूमिका, चांगली ध्येय, चांगले विचार तसेच चांगले कार्य असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात .. मनातही .. शब्दातही आणि आयुष्यातही .. नितीन काका त्यातील एक.. स्वकर्तुत्वावर तालुक्यात ओळख असणाऱ्या नितीनला सर्वोत्तम आरोग्य व स्वप्नपूर्तीचा भविष्यकाळ लाभो ह्याच शुभेच्छा.
✍️ डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाईल: ९६०४२५०००६
छान.... सातारा जिल्हाला आदर वाटावा असे काम आहे... छान
ReplyDeleteसरपंच असावा तर असा ! राज्यात गावाची ओळख बनवणे सोपे काम नाही. त्यासाठी घेतलेले कष्ट आणि परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत. तसेच हे कार्य लिखाण बद्ध करताना सर आपण केलेले परिश्रम महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी आहेत. आपणास खूप शुभेच्छा!
ReplyDelete