Saturday, July 5, 2025
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अनास्था
Tuesday, July 1, 2025
माझ्या मराठीची बोलू कौतुके
आपल्याकडे चिमुकल्यांवर तीन भाषांचे ओझे लादण्याचा प्रकार चालू असताना दक्षिण कोरिया सारखा देश मातृभाषेत शिक्षण घेऊन स्वयंपूर्ण का झाला याचा आपण कधीच विचार केला नाही. मातृभाषेतील ज्ञान खोलवर रुजतं याचं जीवंत उदाहरण म्हणून आपण दक्षिण कोरियाकडे पाहू शकतो. भारतात शेपाचशे वर्षापूर्वी तयार झालेली हिंदी अनेक भाषांसाठी मारक ठरली आहे. पण तरीही आपल्याकडे हिंदी लादण्याचा प्रयत्न होत आहे. बहुभाषांचे ओझे न देताही आपण प्रगतीकडे वाटचाल करू शकतो याच्यासाठी हा लेखप्रपंच..
मायमराठी: आपली मातृभाषा, आपली ताकद
सध्या महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीचा विषय चांगलाच गाजतोय. विविध सामाजिक स्तरांतून विरोध होऊ लागल्यावर सरकारला यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं. निर्णय, आंदोलनं, स्पष्टीकरणं, अंमलबजावणी या साऱ्या राजकारणापलीकडे जाऊन विचार केला, तर मुळात हिंदीची गरज काय, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. मातृभाषा, ज्ञानभाषा आणि रोजगारभाषा या तिन्हीपैकी हिंदी आपल्यासाठी काहीच नाही. मी सध्या ज्या देशात राहतो, त्या दक्षिण कोरियाने कोरियन भाषेला ज्ञानभाषा व रोजगारभाषा करून, मातृभाषेतूनही प्रगती साधता येते हे दाखवून दिलं आहे. सॅमसंग, ह्युंदाई, पोस्को, किया, एलजी यांसारख्या जगावर राज्य करणाऱ्या कंपन्या याची उत्तम उदाहरणं आहेत.
महाराष्ट्राच्या एक तृतीयांश क्षेत्रफळाचा आणि अवघ्या पाच कोटी लोकसंख्येचा, जगाच्या नकाशावर भिंग लावून शोधावा लागणारा हा चिमुकला देश, अवघ्या पंधरा-वीस वर्षांत जागतिक प्रगत देशांच्या यादीत स्थान मिळवतो. १९९५ पर्यंत गरीब असलेला हा देश २०१० पर्यंत यशाची अनेक शिखरं सर करतो. याची कारणमीमांसा करण्यासाठी त्यांच्या शिक्षणव्यवस्थेच्या मुळाशी जावं लागतं. प्रगत होण्यासाठी जेव्हा त्यांनी पहिलं पाऊल टाकलं, तेव्हा त्यांनी सर्वात आधी काय केलं असेल तर सर्व ज्ञानस्रोत मातृभाषेत उपलब्ध केले. माणूस मातृभाषेत जितकं ग्रहण करू शकतो, तितकं अन्य कोणत्याच भाषेत करू शकत नाही. इथल्या विद्यार्थ्यांना कदाचित इंग्रजीत व्यक्त होता येत नसेल, पण त्यांचं विषयज्ञान आपल्यापेक्षा कितीतरी खोल आहे, हे पावलोपावली दिसून येतं. मुळात, कोरियन लोकांना त्यांच्या मातृभाषेवर पराकोटीचं प्रेम आहे आणि त्यातच त्यांना हवं ते शिक्षण मिळाल्याने त्यांचं ज्ञान अत्यंत दृढ झालं आहे. मागच्या आठवड्यात आमच्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक चॉई यांचं आम्हा भारतीय संशोधकांसाठी व्याख्यान आयोजित केलं होतं. भारत-कोरियाच्या दोन हजार वर्षांच्या प्राचीन ऐतिहासिक संबंधांपासून ते येणाऱ्या भविष्यातील वाटचालीपर्यंत त्यांनी आमच्याशी मनमोकळा संवाद साधला. ते पूर्णपणे कोरियन भाषेत सुंदर सादरीकरण करत होते आणि समाजशास्त्र विषयाच्या एक प्राध्यापिका त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करून आम्हाला सांगत होत्या. पण सरांची विषय मांडणी इतकी प्रभावी होती की, आम्हाला भाषांतराची गरजच वाटली नाही. आता एक क्षणासाठी हीच घटना भारतात गृहीत धरा. जर कोणत्या कुलगुरूंनी आंतरराष्ट्रीय समूहासमोर मराठीत सादरीकरण केलं तर? आपले विचार काय असतील? एका शब्दात सांगायचं तर 'कमीपणा'. का बरं? मातृभाषा कमी असते का?
आज आपल्याला कुणीही कोरियन माणूस परदेशात जाऊन नोकरी मागताना दिसत नाही, कारण मातृभाषेतील शिक्षणामुळे त्यांना इथेच अनंत संधी निर्माण झाल्या आहेत. मातृभाषेतील शिक्षणामुळे इथली प्रतिभा व कौशल्य स्वतःच्या प्रगतीसाठी उपयोगी पडत आहे.
इतर भाषा येत नाहीत किंवा आपल्या सरकारच्या ओझं लादणाऱ्या धोरणाप्रमाणे तीन भाषा येत नाहीत म्हणून एखाद्या कोरियन माणसाचं कुठे काही अडलंय असं कुठेच दिसत नाही. जर त्यांना परदेशात जाण्याची इच्छा झाली, तर ते शिक्षण घेत असताना एखाद्या वर्षाची इंग्रजी शिकवणी घेतात आणि मन लावून, तेही आनंदाने शिकतात, पण मातृभाषेला कधीच दुय्यम लेखत नाहीत.
कोरियन माणसांच्या उदाहरणातून काही शिकावं की नाही, हा आपला प्रश्न आहे. पहिलीपासून हिंदी शिकवून मराठी पोरांना कोणता 'तीर' मारायचा आहे, हेच कळत नाही. कारण हिंदी आपली मातृभाषा नाही, ज्ञानभाषा देखील नाही आणि रोजगारभाषा तर मुळीच नाही. आणि हो, एखादा राजकारणी येऊन अक्कल पाजळू लागला की मुलांनी अनेक भाषा शिकाव्यात, त्यांना संधी निर्माण होतील वगैरे वगैरे, तर आपण त्याला मुळीच बळी पडू नये, कारण आपल्याकडे पाचवीपासून हिंदी पूर्वीपासूनच आहे.
व्यापक विरोध पाहून सरकारने हिंदी सक्ती नसून, अन्य कोणतीही आवडीची भाषा शिकण्याचा पर्याय आपल्यापुढे ठेवला आहे. मुळात, सध्या शिक्षक भरती होत नाहीये. त्यात जर कोल्हापूर सीमाभागात मुलांना कानडी शिकण्याची इच्छा झाली किंवा नांदेड सीमाभागात तेलुगू शिकण्याची इच्छा झाली, तर त्यासाठी सरकार कोणता शिक्षक देणार आहे? की अशा भाषांच्या पर्यायांआडून हिंदी लादण्याचाच डाव आहे, हेच संदिग्ध आहे.
आज महाराष्ट्रात हिंदीला प्रत्येक स्तरावरून विरोध होत आहे. खेळण्याबागडण्याच्या वयात हिंदीचं ओझं लहान मुलांवर देऊ नये, असं अनेकांना प्रामाणिकपणे वाटत आहे. हिंदी सक्तीमुळे मराठी आणखी तळाला जाईल, अशीही भीती अनेक प्रज्ञावंतांनी बोलून दाखवली आहे. ही भीती खोटी नाही. परवा कुठेतरी एक पोस्ट वाचली, ज्यात लिहिलं होतं की, हिंदीच्या तोंडाला रक्त लागलं आहे. तिने अनेक भाषांचा घोट घेतला आहे. हे विधान कुणी केलं, आठवत नाही, पण ते अगदी बरोबर आहे. हिंदी तशी अलीकडची भाषा आहे; मध्ययुगीन परकीय आक्रमणकर्त्यांनी तिला आकार दिला. ज्यांना हे पटत नाही, त्यांनी हिंदीचा इतिहास सविस्तर वाचावा. हिंदीने उत्तर भारतातील अनेक भाषा संपवल्या आहेत, ज्यात ब्रज, अवधी, बघेली, बुंदेली, हरियाणवी, राजस्थानी अशा अनेक भाषांचा समावेश आहे. आज मराठीवरही तिचं अतिक्रमण आपण पाहत आहोत. जर पहिलीपासून ती मुलांवर बिंबवली, तर मराठी आणखी तळाला जाईल.
या विषयावर मी अनेक विद्वानांच्या मुलाखती पाहिल्या. त्यांनी मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे, हे अभिनंदनीय आहे. त्यातल्या एकाने मराठी माणसाला अल्पसंतुष्टी म्हटलं होतं, कारण आपण लगेच खूश होतो. जर एखाद्या हिंदी कलाकाराने मोडकीतोडकी चार मराठी शब्द बोलले, तर आपण अभिमानाने छाती फुगवतो, पण महाराष्ट्राची भाकर खाऊनही त्यांना अजून मराठी का येत नाही, याचा विचार करत नाही, असं त्यांचं मत होतं. महानगरात दोन मराठी माणसं हिंदी का बोलतात, याचं कोडं सुटत नाही. माझा अनुभव तर खूप वेगळा आहे. देश सोडताना मुंबई विमानतळावर विमानात बसेपर्यंत मी सर्वांशी मराठी बोललो. हिंदीने सुरुवात करणारा देखील पुढच्या वाक्यात माझ्याशी मराठी बोलला.
असो, जास्त काही लिहीत नाही. मराठी माणसांची वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे, असं अनेकजण म्हणतात. जर इथपर्यंत वाचलं असेल, तर मी माझं भाग्य समजतो. अभिजात मायमराठीची सेवा करण्यासाठी, तिला समृद्ध करण्यासाठी गेल्या दोन-अडीच हजार वर्षांत अनेकांच्या लेखण्या झिजल्या. महाराष्ट्रीपासून आधुनिक मराठीचं स्वरूप घेईपर्यंत, म्हणजे लिखित स्वरूपात हालराजाच्या गाथासप्तशतीपासून, पुष्पदंत कवींच्या लोककल्याणभावनेपासून, म्हाइंभटांच्या लीळाचरित्रापासून, मुकुंदराजांच्या विवेकसिंधुपासून, ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेपासून, तुकोबांच्या गाथांपासून आज आपण शेवटचं जेव्हा केव्हा स्वतःचं नाव मराठीत लिहिलं असेल, तिथपर्यंत मराठीमाउलीने अनेक हृदय प्रफुल्लित केली आहेत. अमृताशीही पैजा जिंकल्या आहेत, पण आज मूठभर लोकांना खूश करण्यासाठी चाललेली हिंदीची सक्ती झेलत आपल्याच घरात मराठीने अजून किती हाल सोसावे?
मागच्या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना मिळाला. आपण अनेक आधुनिक मराठी लेखकांची नावं सांगतो, पण त्यांचं साहित्य आपण जगात न्यायला कमी पडलो आहोत. कोरियन लोकांनी हान कांगला डोक्यावर घेतलं. अवघ्या पाच कोटी कोरियन भाषिकांसाठी त्यांनी लिहिलेल्या 'द व्हेजिटेरियन' या अचानक शाकाहारी झालेल्या कोरियन बाईच्या कथेला कोरियन लोकांनी जगात पोहोचवलं. आपण पंधरा कोटी असूनही का पोहोचवू शकत नाही? प्रेम कमी पडतंय का कुठेतरी?
एक संक्षिप्त विचार: महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे, पण मातृभाषा, ज्ञानभाषा आणि रोजगारभाषा म्हणून मराठीचे महत्त्व अनमोल आहे. दक्षिण कोरियासारख्या देशाने मातृभाषेतून प्रगती साधून हे सिद्ध केले आहे. आपल्या मुलांवर हिंदीचे अनावश्यक ओझे लादण्याऐवजी, मराठीला अधिक बळकट करण्याची गरज आहे. शाळांमध्ये मराठीचे महत्त्व रुजवून, तिला ज्ञानभाषा व रोजगारभाषा बनवण्यासाठी प्रयत्न करावेत. विज्ञान-तंत्रज्ञान मराठीतून उपलब्ध करून, करिअरच्या संधी निर्माण कराव्यात. शासकीय आणि खाजगी क्षेत्रांत मराठीचा वापर सक्तीचा करावा. शिक्षकांची भरती करून, विद्यार्थ्यांना आवडीनुसार भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. राजकीय दबावाला बळी न पडता, मराठीच्या हितासाठी ठाम भूमिका घ्यावी. मराठी माणसांनी आपल्या भाषेत बोलण्याचा अभिमान बाळगावा. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी..
शब्दांकन- डॉ. सूरज मडके (योंगनम विद्यापीठ, दक्षिण कोरिया)
संपादन- प्रा. डॉ. केशव राजपुरे
Tuesday, May 6, 2025
थोरात सर: एक प्रेरणादायी गुरु
थोरात सरांचा प्रेरणादायी जीवनप्रवास
कालवडे येथील प्राथमिक शाळेत त्यांनी आपले पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्यामुळे, त्यांना जवळपास ५ किलोमीटर दूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वाठार येथील दानशूर बंडो गोपाळ मुकादम हायस्कुल शाळेत जाऊन शिक्षण घ्यावे लागले. शाळेत ये-जा करण्यासाठी त्यांना दररोज पायी जावे लागत असे . शाळेतील विज्ञान शिक्षक अशोक घाडगे सर यांनी त्यांच्या मनात विज्ञानाबद्दल आवड निर्माण केली. विशेषतः भौतिकशास्त्र विषयातील त्यांची उत्कृष्ट समज पाहून, जयवंत सरांनी उच्च शिक्षणामध्ये भौतिकशास्त्र विषयात स्पेशलायझेशन करण्याचा निर्णय घेतला.
१९८१ मध्ये, त्यांनी प्रथम श्रेणीत दहावी उत्तीर्ण करून शाळेत प्रथम क्रमांक मिळावीला आणि पुढील शिक्षणासाठी कराडमधील एसजीएम महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९८३ ते १९८६ या काळात त्यांनी जुनियर आणि नंतर सिनियर कॉलेज मध्ये विज्ञान शाखेतील पदवी शिक्षण (बी.एस्सी.) विशेष प्राविण्यासह पूर्ण केले. या काळात त्यांना एम. एम.कदम सर, व्ही. के. निकम सर व मिरजकर सर यांसारख्या समर्पित शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. थोरात सरांनी बी.एस्सी. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर, त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एम. एस्सी. पदवी मिळवली, जिथे त्यांनी ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स या स्पेशलायझेशन मध्ये डिस्टिंगशन मिळवीत विद्यापीठ गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक मिळवला. एम. एस्सी. मध्ये शिक्षण घेत असताना, त्यांनी आपल्या आवडीच्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स विषयावर प्रभुत्व मिळवले.
एम. एस्सी. पूर्ण झाल्यावर, नोकरीच्या शोधात असताना, ते आपल्या वडिलांसोबत लोणंद येथील सायन्स कॉलेजचे मध्ये हजर झाले व तेथेच प्राचार्य आदरणीय प्राध्यापक दीपा महानवर यांना भेटले. महानवर सरांनी त्यांच्यातील क्षमता ओळखून रयत शिक्षण संस्थेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी, संस्थेत पार्ट-टाइम, फुल-टाइम आणि स्थानिक नियुक्त्यांसारख्या विविध प्रकारच्या नियुक्त्या होत्या. सुरुवातीला त्यांची इलेक्ट्रॉनिक्स विषयासाठी पार्ट-टाइम नियुक्ती झाली, परंतु काही कारणांमुळे त्यांना कायमस्वरूपी नोकरीची ती संधी मिळाली नाही. त्यानंतर, १९९१ मध्ये त्यांची भौतिकशास्त्र विषयावर पुनर्नियुक्ती झाली आणि त्यांना परिवीक्षा आदेश (प्रोबेशन ऑर्डर) मिळाली. परंतु, काही कालावधीनंतर संस्थेतील काही शिक्षक सरप्लस झाल्याने अन्य ठिकाणी स्थानांतरण झाले, ज्यात थोरात सरांचाही समावेश होता.
अशा प्रकारे, थोरात सरांना सुरुवातीच्या काळात कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. इतर सहकारी शिक्षकमित्र संस्थेत कायम झाले असताना, ते मात्र तुटपुंज्या पगारात काम करत राहिले. परंतु, त्यांनी खचून न जाता, आपल्या प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवत तसेच कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेवरील निष्ठेपोटी आणि महानवर सरांनी दिलेल्या शब्दाचा आदर करत संस्थेत काम करत राहिले. अखेरीस, १९९८ पासून खऱ्या अर्थाने अनुदानित महाविद्यालयातील त्यांची शिक्षक म्हणून कारकीर्द स्थिर झाली.
त्यांच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी लोणंद येथे १४ वर्षे, रामानंदनगर येथे ११ वर्षे आणि कराड येथे ६ वर्षे अध्यापन कार्य केले. रयत शिक्षण संस्थेत विविध ठिकाणी कार्यरत असताना, त्यांनी सातारा, पुणे आणि सांगली जिल्ह्यांमध्ये आपली सेवा दिली. परंतु, त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक काळ सातारा जिल्ह्यातच व्यतीत झाला आणि त्यांना आपल्या मातृसंस्थेतून, म्हणजेच एस.जी.एम. महाविद्यालयातूनच म्हणजे जेथून शिकले तिथूनच भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख व महाविद्यालयाचे उप प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त होण्याचे भाग्य लाभले.
पीएच.डी. मध्ये प्रवेश घेतल्यानंतरही त्यांच्या अडचणी संपल्या नव्हत्या. त्यांना मिळालेल्या मार्गदर्शकांकडे स्वतःची प्रयोगशाळा नसल्यामुळे, त्यांना इस्लामपूर येथील मित्राच्या प्रयोगशाळेत सोय करून घ्यावी लागली. त्यानंतर, प्रतिनियुक्तीवर (डेप्युटेशन) शिवाजी विद्यापीठात जाऊन त्यांनी आपले संशोधन प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि वेळेत पूर्ण केले.
सरांचे बंधू गुणवंतराव हे देखील भौतिकशास्त्राचे शिक्षक आहेत आणि ते बत्तीस शिराळा येथे कार्यरत आहेत. सरांना एक मुलगा- संग्राम आणि एक मुलगी- क्रांती अशी दोन मुले आहेत. त्यांची मुलगी एम.फार्मसी असून एका प्रतिष्ठित कंपनीत कार्यरत आहे, तर मुलगा बी.ई. पूर्ण करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे.
निवृत्तीनंतर, सरांचे जीवन समाधानी आणि आरामदायी आहे. तरीही, त्यांनी आपले ज्ञानदानाचे कार्य कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सुरू ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मार्गदर्शन करावे, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. आणि मला खात्री आहे की, सर आपल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी व समाजाच्या कल्याणासाठी नक्की करतील.
डॉ. जयवंत थोरात सरांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून काम केले. त्यांची शैक्षणिक पात्रता खूप उच्च आहे. त्यांनी विज्ञान शाखेचे डीन आणि भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. त्यांचे योगदान शिवाजी विद्यापीठातही महत्त्वाचे होते, जिथे ते भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य होते.
त्यांना ३४ वर्षांचा पदवी स्तरावरचा आणि ५ वर्षांचा पदव्युत्तर स्तरावरचा अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये अनेक महाविद्यालयांमध्ये काम केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लोणंद, मलकापूर, पिंपरी-पुणे, दहिवडी, पुसेगाव, कोरेगाव, रामानंदनगर, कराड येथे सेवा केली त्यामध्ये लोणंद, रामानंदनगर आणि कराड येथे दीर्घ सेवा केली.
सरांनी मटेरियल सायन्स, थिन फिल्म, इलेक्ट्रोडिपॉझिशन आणि होलोग्राफी यांसारख्या विषयात संशोधन केले आहे. त्यांनी अनेक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. सरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अनेक शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांनी कार्यशाळांचे आयोजन केले आणि त्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांचे हे योगदान शिक्षण क्षेत्रात खूप मोलाचे आहे. त्यांना 'प्राचार्य आर. डी. माने निष्ठावान गुणी रयत सेवक पुरस्कार' आणि 'सांगली जिल्हा काँग्रेस सेवादल पुरस्कार' यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या नावावर अनेक पेटंटही आहेत.
डॉ. थोरात सर हे एक निष्ठावान शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी रयत शिक्षण संस्थेत कर्मवीर अण्णांच्या आदर्शांनुसार प्रामाणिकपणे सेवा केली, जी त्यांच्या संस्थेवरील निष्ठेची आणि कामाप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष देते. त्यांच्या चारित्र्याची शुद्धता ही आणखी एक उल्लेखनीय बाब आहे. शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी आपले चारित्र्य जाणीवपूर्वक जपले. त्यांच्या नैतिक आचरणाचा विद्यार्थ्यांवर खूप मोठा प्रभाव होता. महाविद्यालयात त्यांची वेषभूषा आणि नीटनेटकेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप सोडत असे, ज्यामुळे ते विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श ठरले.
सर एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. ते वर्गात येण्यापूर्वी चांगला अभ्यास करत आणि विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चांगले विद्यार्थी घडले, यावरून त्यांची विद्यार्थ्यांप्रति असलेली तळमळ आणि समर्पण दिसून येते. विद्यार्थ्यांवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा ठसा होता आणि त्यांची प्रतिमा नेहमीच एक प्रेमळ आणि मार्गदर्शक शिक्षकाची राहिली.
त्यांच्यातील आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचे आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोन. ते नेहमीच उत्साही आणि सकारात्मक विचार करणारे होते. त्यांनी कधीही कोणत्याही सहकाऱ्याला दुखावले नाही आणि जर कोणी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांचे हे सकारात्मक आणि क्षमाशील व्यक्तिमत्त्व त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये प्रिय बनवते. त्यांनी जिथे जिथे काम केले, तेथील सहकारी त्यांच्यावर प्रेम करत होते, हे त्यांच्या मिलनसार स्वभावाचे आणि इतरांना सोबत घेऊन चालण्याच्या वृत्तीचे द्योतक आहे.
सर केवळ एक चांगले शिक्षकच नव्हे, तर एक कर्तव्यदक्ष मुलगा, भाऊ, वडील आणि पती म्हणूनही आदर्श आहेत. त्यांचे स्वच्छ, पारदर्शक आणि निस्वार्थी मन त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते. ते नेहमीच दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असत आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत.
डॉ. जयवंत थोरात सर एक निष्ठावान शिक्षक, शुद्ध चारित्र्याचे पालन करणारे, विद्यार्थीप्रिय मार्गदर्शक आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेले एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांची सेवानिवृत्ती निश्चितच शिक्षण क्षेत्रात एक पोकळी निर्माण करेल, परंतु त्यांची शिकवण आणि आदर्श नेहमीच इतरांना प्रेरणा देत राहतील. (हा गुणवैशिष्ट्यांचा भाग सरांचे प्राणिशास्त्र विषयाचे रयत मधील सहकारी मित्र प्रा डॉ. रामदास बोडरे यांच्या मनोगतातून घेतला आहे)
*******
सरांशी माझी ओळख लोणंद महाविद्यालयात १९८९ साली झाली. तेव्हा सर हंगामी तत्वावर कार्यरत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य महानवर सरांनी माझी वैयक्तिक काळजी घेण्याची जबाबदारी थोरात सरांवर सोपवली होती. विद्यापीठाच्या मागील प्रश्नपत्रिका माझ्याकडून सोडवून घ्यायच्या, त्यांच्या सूचना नियमित असायच्या. नोट्स देणं असो, अभ्यासाची विचारपूस करणं असो, सरांचं माझ्यावर सतत लक्ष असे. त्यांनी घेतलेल्या काळजीमुळेच मी विद्यापीठातील माझी गुणवत्ता टिकवून ठेवू शकलो. खरंच, सरांचे माझ्या शैक्षणिक जीवनातील योगदान खूप मोठे आहे.
१९८९ ते १९९२ या तीन वर्षांच्या लोणंद येथील मार्गक्रमणात जेव्हढा महानवर सरांचा सहभाग राहीला त्याहून मोठा आणि महत्वाचा सहभाग थोरात सरांचा ! त्यावेळी त्यांना शक्य असलेली सर्व मदत केल्यामुळेच तेव्हा मी यश मिळवू शकलो. सरांनी मला त्यावेळी लागणारी क्रमिक पुस्तके, प्रश्नसंच, नोट्स आणि लागणाऱ्या सर्व गोष्टी अगदी पालकांप्रमाणे पुरवल्याचं आठवतंय. प्रत्येक लहान-सान गोष्ठीसाठी प्रोत्साहन नसतं तर बी.एस्सी.त सुवर्णपदक मिळालं नसतं असं मी मानतो ! त्यांची कष्ट करण्याचे तयारी, सुस्वभाव, विद्यार्थी घडवण्याची जिद्द, नेहमी मदत करण्याची तयारी ही जवळून पाहिलेले गुण ! पाय जमिनीवर ठेवून आभाळाकडे पाहणारं व्यक्तिमत्व म्हणल्यास वावगं ठरू नये.
सरांचा शिकवण्यामध्ये तर हातखंडा होताच, पण त्यासोबतच त्यांचे हस्ताक्षरही अतिशय सुंदर होते आणि ते आम्हाला सुंदर, परिपूर्ण नोट्स देत. त्यामुळे आम्हाला इतर संदर्भ पुस्तकांचा फारसा वापर करावा लागला नाही. केवळ त्यांच्या नोट्सवर अभ्यास करून मी त्यावेळेस विशेष प्रावीण्य मिळवले आणि हे माझ्या आयुष्यातील सरांचे एक अमूल्य योगदान आहे.
मला आठवतं, त्या काळात लोणंद महाविद्यालयाला सरकारकडून अनुदान मिळत नव्हतं आणि त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही तशी कमी असायची. अशा परिस्थितीत महाविद्यालयात असणारे थोरात सरांसारखे सर्व शिक्षक लोणंद आणि परिसरातील गावोगावी जाऊन, बारावीचा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांच्या घरी भेट देत आणि पालकांना महाविद्यालयातील शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगत. यासाठी त्यांनी सायकल आणि दुचाकीवरून केलेला प्रवास मी स्वतः पाहिला आहे.
महाविद्यालयाला अनुदान नसल्यामुळे शिक्षकांचे पगारही खूप कमी होते. मला वाटतं, त्यावेळी महिना पाचशे रुपये पगारावर हे सर्व शिक्षक काम करत होते. पण त्यांच्या कामात कुठेही औपचारिकतेचा अभाव नव्हता. ते पूर्ण प्रामाणिकपणे आणि तन्मयतेने आपले काम करत होते आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत होते. त्यावेळेस प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेल्यांपैकी बरेच जण पुढे रयत शिक्षण संस्थेत माझ्या ओळखीचे प्राध्यापक आणि प्राचार्य झाले, याचा मला आनंद आहे.
मी जेव्हा एम.एस्सी.ला गेलो, तेव्हा सरांचा संपर्क थोडा कमी झाला, पण मला हे माहीत होतं की त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती झाली नव्हती आणि रयत शिक्षण संस्थेतील वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये त्यांची बदली होत होती. त्यानंतर त्यांना नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होण्याची गरज होती. मी विद्यापीठात प्राध्यापक झाल्यानंतर सरांनी एम.फिल.ला प्रवेश घेतला.
एम.फिल.ला प्रवेश घेतल्यानंतर, आपला विद्यार्थी इथे प्राध्यापक आहे आणि त्याची नक्की मदत होईल, असा विचार सरांनी कधीच केला नाही. कारण ते स्वतः एक उत्कृष्ट आणि प्रामाणिक विद्यार्थी होते. दुर्दैवाने, थेअरी परीक्षा पास होऊनही त्यांना त्यांची पदवी पूर्ण करता आली नाही.
त्यानंतर जेव्हा जेव्हा सरांची भेट व्हायची, तेव्हा ते आम्हाला महाविद्यालयात असताना त्यांनी केलेले संस्कार आणि आमच्यासाठी घेतलेले कष्ट याची आवर्जून आठवण यायची. त्यांची ती तळमळ पाहून नेहमीच त्यांच्या या उपकारांची परतफेड करावी, अशी भावना मनात दाटून येई, पण तशी संधी कधी मिळाली नाही. त्यांच्याविषयी माझ्या मनात असलेला आदर केवळ त्यांनी मला मदत केली किंवा माझे पालकत्व स्वीकारले म्हणूनच नव्हता, तर ते एक उत्कृष्ट शिक्षक होते. ते विषयातील अडचणी आणि शंका अतिशय विश्वासात घेऊन विद्यार्थ्याला सहज समजेल अशा भाषेत सांगायचे. आमची प्रत्येक भेट नेहमीच ऊर्जा देणारी असे.
पुढे, ज्या वेळेला सरांनी पुन्हा पीएच.डी.ला प्रवेश घेतला, तेव्हा ते माझे विद्यार्थी नसतानाही आमच्या प्रयोगशाळेत (लॅब) रुजू झाले. रुजू झाल्यानंतर त्यांनी स्वतःला माझा विद्यार्थी मानण्यास सुरुवात केली आणि एका विद्यार्थ्याप्रमाणे सर्व गोष्टी माझ्याकडे घेऊन येत. आपले संशोधन निकाल (रिझल्ट) दाखवत, ते माझ्याकडून तपासून घेत आणि त्यावर मनमोकळी चर्चा करत. त्यांनी स्वतः लिहिलेले शोधनिबंध (पेपर) देखील सरांनी माझ्याकडून तपासून घेतले आहेत. मला कधीकधी थोडं संकोचल्यासारखं व्हायचं, पण त्यांच्या त्या वृत्तीचा मला खूप अभिमान वाटायचा आणि आपल्या मार्गदर्शकाला मार्गदर्शन करण्याची संधी मिळते, याचा एक वेगळा आनंद आणि सार्थ अभिमान वाटायचा. सरांचे केवळ समर्पित कार्यच प्रेरणादायी नाही, तर त्यांची माणुसकी, नम्रता, परोपकार करण्याची भावना, स्नेह आणि नैतिकता खरोखरच अनुकरणीय आहेत.
मला वाटतं, मी आणि सर जवळजवळ एकाच काळात नोकरीत कायम झालो. त्यानंतर मात्र त्यांनी केलेल्या उच्च दर्जाच्या संशोधनामुळे त्यांची पुढील पदोन्नती सहज झाली. सरांच्या प्राध्यापक पदाच्या मुलाखतीसाठी मी तज्ञ म्हणून उपस्थित होतो, असे मला आठवतं. सरांनी सर्व प्रश्नांची अतिशय छान उत्तरे दिली. माझ्या बाबतीत एक वेगळाच योगायोग घडला होता – ज्या शिक्षकांनी मला घडवलं, त्यांना पदोन्नती देताना मी परीक्षक होतो!
पुढे, विविध महाविद्यालयांतील शिक्षकांच्या नियुक्तीच्या निवड समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा मी विद्यार्थ्यांना विचारलेले प्रश्न त्यांना खूप आवडायचे. ते नेहमी त्या प्रश्नांचे कौतुक करत आणि अशा विचारांचा विद्यार्थी आपण घडवला याचा त्यांना नेहमी अभिमान वाटे. मुलाखतींदरम्यान विषयाचे आकलन आणि भौतिकशास्त्रात मी किती प्रगती केली आहे, याचा ते अचूक अंदाज लावू शकत होते. मी विभागप्रमुख किंवा भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर ते वेळोवेळी कोल्हापूरला माझी भेट घेतात आणि अभिनंदन करतात, हे ठरलेलेच असते.
माझ्या खासगी आयुष्यातील अडचणींवर कसे मार्ग काढायचे, याविषयी सरांनी वेळोवेळी मला मौल्यवान मार्गदर्शन केले आणि आधार दिला. त्यांच्या त्या सूचना खरोखरच खूप महत्त्वाच्या आणि उपयुक्त ठरल्या. नोकरीतील चढ-उतार, बदल्या आणि संसारातील नेहमीच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सरांना मध्येच आजाराने गाठले होते, पण त्यांनी त्यावरही अतिशय खंबीरपणे मात केली, हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे.
मी जेव्हा कराडला त्यांच्या गावी जातो, तेव्हा त्यांची नक्की भेट घेतो. आमचे एकमेकांच्या घरी नियमित येणे-जाणे असते. सरांनी आपल्या वागण्यातून आणि कृतीतून माझ्यावर केलेले अनेक चांगले संस्कार मी आजही जपून ठेवले आहेत आणि माझ्या स्वभावात सकारात्मक बदल घडवले आहेत. त्यामुळे सरांशी केवळ विद्यार्थी-शिक्षक एवढेच नव्हे, तर मार्गदर्शक, मित्र आणि आधारवड असे अनेक प्रकारचे नाते आहे.
सरांच्या पावलावर पाऊल ठेवून हेच ज्ञानदानाचे आणि मार्गदर्शनाचे कार्य पुढे नेण्याचा माझा संकल्प गेली काही वर्षे सुरू आहे आणि तो पुढेही सुरू राहील. खऱ्या अर्थाने हीच त्यांना त्यांच्या सेवापूर्ती दिनी माझी खरी सद्दिच्छा ठरेल. पुन्हा एकदा, सरांना सेवापूर्ती समारंभाच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन जीवनप्रवासासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा! येणारा काळ आपल्यासाठी सुख-समृद्धीचा आणि आनंदाचा असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
आपला नम्र विद्यार्थी,
केशव
*******
*******
Wednesday, April 30, 2025
शिकण्याची ओढ आणि एका शिक्षकाचा आदर्श
ज्ञानदानाची ज्योत (पिढी घडवणारा शिक्षक)
(माझ्या शैक्षणिक प्रवासात, एका प्रामाणिक प्राध्यापकापासून ते संशोधकापर्यंतचा अनुभव आहे. शाळेतील आवड, चांगल्या शिक्षकांचा प्रभाव आणि खरं ज्ञान समजून घेण्याचं महत्त्व यात आहे. भौतिकशास्त्र शिकवतानाचे आव्हान आणि सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न यात समाविष्ट आहे. अध्यापनासोबतच संशोधन आणि सामाजिक बांधिलकीतून एक शिक्षक मार्गदर्शक कसा असतो हे दिसते. विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी यावर भर दिला आहे. प्रामाणिकपणा आणि निष्ठा एका आदर्श शिक्षकासाठी महत्त्वाचे आहेत.)
काल एका विद्यार्थ्याचा अनपेक्षितपणे आलेला फोन भूतकाळाच्या दालनात घेऊन गेला. दहा वर्षांपूर्वी एम.एस्सी. पूर्ण केलेला तो तरुण, आज एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याच्या आवाजातील शिकवण्याची तीव्र तळमळ आणि माझ्या अध्यापन शैलीबद्दलची आदरयुक्त उत्सुकता माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण करून गेली. त्याच्या प्रश्नांमधून त्याला कदाचित माझ्या पावलावर पाऊल ठेवून तरुण पिढी घडवण्यासाठी योगदान देण्याची इच्छा स्पष्टपणे जाणवत होती. त्याला मी एका प्रामाणिक प्राध्यापक आणि समर्पित संशोधकाच्या जीवनाची, अर्थात माझी यशोगाथा सांगितली. ही केवळ एक कथा नाही, तर ज्ञान निर्मितीच्या पवित्र कार्यात आणि राष्ट्राच्या प्रगतीमध्ये निस्वार्थपणे योगदान देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक नवोदित शिक्षकाला दिशा दाखवणारी एक प्रेरणादीप आहे.
माझ्या शालेय जीवनात अभ्यासाची असलेली नैसर्गिक ओढ आणि कठोर परिश्रमाची तयारी यामुळे मी नेहमीच उत्कृष्ट यश संपादन केले. सातत्यपूर्ण चिकाटीच्या जोरावर वर्गात अव्वल स्थान टिकवून ठेवण्यात मला यश मिळाले. या शैक्षणिक प्रवासात मला अनेक ज्ञानयोगी भेटले. त्यांनी मला केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर विज्ञानाची गोडी लावली. त्यांच्या सोप्या शिकवण्याच्या पद्धतीमुळेच मला हे यश प्राप्त करणे शक्य झाले, याबद्दल माझ्या मनात आजही कृतज्ञतेची भावना आहे. भविष्यात आपणही याच ज्ञानयज्ञामध्ये आपले जीवन समर्पित करावे, अशी तीव्र इच्छा तेव्हा माझ्या मनात अंकुरली होती, परंतु हे स्वप्न साकार करणे किती कठीण आहे याची मला जाणीवही होती.
अकरावी आणि बारावीमध्ये गणित आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या विषयांची चांगली तयारी असल्यामुळे इतरांच्या तुलनेने मला भौतिकशास्त्र अधिक सोपे वाटले. याच कारणामुळे, बीएससीसाठी मी भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि गणित या ग्रुपची निवड केली. माझ्या शैक्षणिक जीवनातील हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरदृष्टीचा निर्णय ठरला, ज्याने मला भविष्यात भौतिकशास्त्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी भक्कम पाया तयार करून दिला.
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणामध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत मानाचे स्थान मिळवले असले तरी, आज मागे वळून पाहताना मला स्पष्टपणे जाणवते की त्यावेळी मी केवळ एक निष्ठावान परीक्षार्थी होतो. अभ्यासक्रमातील गोष्टी कंठस्थ करून परीक्षेत चांगले गुण मिळवणे हेच माझे प्राथमिक ध्येय होते. विषय नेमके का शिकायचे आहेत आणि त्यांचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर कसा आणि किती प्रभाव पडणार आहे, याचा सखोल विचार त्यावेळी माझ्या तरुण मनात डोकावलाही नव्हता. त्यामुळे मी एका पारंपरिक पद्धतीने, पाठांतरावर अधिक भर देऊन माझा शैक्षणिक प्रवास सुरू ठेवला. असे नाही की मला विषयातील संकल्पना किंवा अभ्यासक्रम समजत नसे. मला तो समजत असे, पण तो कसा समजायला हवा होता आणि त्यावर विचार करून आपले मत कसे तयार करायचे, हे त्यावेळी समजत नव्हते, असे मला म्हणायचे आहे.
पदव्युत्तर शिक्षण घेत असताना माझ्या ज्ञानात भर पडली आणि मला एक महत्त्वपूर्ण सत्य उमगले की काही विषयांचा अभ्यास केवळ अभ्यासक्रमाच्या चौकटीत मर्यादित न ठेवता, त्यांची मुळे खोलवर रुजवून सखोलपणे अभ्यासणे अत्यावश्यक आहे. किंबहुना, त्या विषयांमध्ये खरी रुची निर्माण करून स्वतःहून अधिक ज्ञान मिळवणे हे यशाचे गमक आहे. जेव्हा मला हे स्पष्टपणे जाणवले की विषय स्वतः समजून घेतल्यास आणि त्यावर मनन केल्यासच आपण सेट किंवा नेटसारख्या प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षांमध्ये सहज यश मिळवू शकतो, तेव्हा माझ्या अभ्यासाची दिशा पूर्णपणे बदलली.
जेव्हा मी खऱ्या अर्थाने संकल्पना आणि सिद्धांतांचा अर्थ लावत, विचारपूर्वक वाटचाल करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या लक्षात आले की मूलभूत संकल्पना स्पष्ट असणे किती महत्त्वाचे आहे, ज्यावर मी पूर्वी कधी गंभीरपणे विचारच केला नव्हता. माझ्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला, कारण याच काळात मला जिथे शिकलो त्याच विद्यापीठात शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा माझ्यावर तुलनेने महत्वाचे आणि क्लिष्ट विषय शिकवण्याची मोठी जबाबदारी विभागाने सोपवली—विशेषतः क्लासिकल मेकॅनिक्स, ॲटॉमिक फिजिक्स, क्वांटम मेकॅनिक्स, इलेक्ट्रोडायनामिक्स आणि स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स यांसारख्या पूर्णपणे सैद्धांतिक विषयांतील अध्यापनाची, ज्यामध्ये वस्तूंच्या हालचाली, अणूंची संरचना, कणांचे जग, विद्युत-चुंबकीय क्षेत्र आणि मोठ्या प्रणालींच्या गुणधर्मांचा अभ्यास समाविष्ट होता, ज्या भौतिकशास्त्राच्या पुढील अभ्यासासाठी आणि उपयोजनांसाठी आवश्यक असतात.
माझ्यासारख्या नवख्या शिक्षकांसाठी ही एक अत्यंत प्रभावी युक्ती ठरली. या अध्यापन काळात अनेक मूलभूत आणि क्लिष्ट संकल्पना माझ्याही अधिक स्पष्ट झाल्या. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान माझ्या मनात असलेल्या अनेक शंका या दोन वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवातून आपोआप दूर झाल्या. याचा सर्वात आश्चर्यकारक आणि सकारात्मक परिणाम असा झाला की मी व्याख्यातापदासाठीची अत्यंत महत्त्वाची SET परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालो. माझ्या कायमस्वरूपी नोकरीसाठी ही परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा होती. अध्यापनातूनच माझ्या ज्ञानात भर पडली.
आजतागायत माझ्या कारकिर्दीत मी कधीही ज्ञानदानाच्या कामात निष्काळजीपणा दाखवला नाही. शिकवताना मी कधीही तयार केलेल्या लेक्चर नोट्स किंवा पाठ्यपुस्तक सोबत ठेवलेले आठवत नाही आणि बहुतेक वेळा मी प्रत्येक तासाच्या तयारीसाठी दोन ते तीन तास समर्पित करत असतो. विषयाची उत्तम तयारी, विद्यार्थ्यांप्रती प्रामाणिकपणा आणि वक्तशीरपणा ही त्रिसूत्री माझ्यासाठी भौतिकशास्त्राचा एक प्रामाणिक आणि निष्ठावान शिक्षक बनण्यास निश्चितच मदतगार ठरली. ज्ञानदानातील निष्ठा, तयारी आणि प्रामाणिकपणामुळे आदर व विश्वास मिळाला.
मी हळूहळू कठीण आणि गुंतागुंतीचे विषय सोप्या आणि सहज समजेल अशा पद्धतीने शिकवण्याचे खास कौशल्य आत्मसात केले आणि विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञानावर आधारित नव्हे, तर न्यूमरिकल आणि प्रॉब्लेम वर आधारित प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, वर्गात प्रत्येक विषयाचे १०० पेक्षा जास्त गणिते सोडवली ज्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थी SET आणि NET सारख्या प्रतिष्ठित परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवू शकले. याचमुळे माझ्यात अध्यापनाच्या प्रभावी आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनाची निर्मिती झाली.
आजही बरेच विद्यार्थी भौतिकशास्त्र विषयाला खूप कठीण समजतात. जे डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्यासाठी तयारी करत आहेत, त्यांना तर हा विषय नकोसा वाटतो. कारण अनेकदा त्यांना चांगले शिक्षक मिळत नाहीत. एका चांगल्या शिक्षकाचे काम फक्त अभ्यासक्रम संपवणे नसते, तर विद्यार्थ्यांना या विषयात आवड निर्माण करणे, अवघड गोष्टी सोप्या पद्धतीने शिकवणे आणि त्यांच्या मनात आत्मविश्वास भरणे हे असते. म्हणूनच, गरज आहे अशा शिक्षकांची जी केवळ माहिती न देता, विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्राच्या अभ्यासात रमवून टाकतील आणि त्यांच्या यशाचा मार्ग सुकर करतील.
मला क्रिकेट खेळायला खूप आवडते. मी विद्यार्थ्यांमध्ये लहान होऊन क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे मैदानावर विद्यार्थ्यांशी माझी मैत्री व्हायची. वर्गात मी थोडा शिस्तप्रिय असलो तरी मैदानावर विद्यार्थी माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत. खेळामुळे आमच्यात विश्वास आणि आपुलकीचे नाते तयार झाले. त्यामुळे ते माझे व्याख्यान कधी चुकवत नसत आणि त्यांना फिजिक्स मध्ये पुन्हा रुची निर्माण व्हायला मदत व्हायची. तसेच, विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करणे, सहली काढणे आणि त्यांना वसतिगृहात भेटणे यामुळे आमची जवळीक आणखी वाढली. एका चांगल्या शिक्षकासाठी विद्यार्थ्यांशी असे मैत्रीपूर्ण आणि विश्वासाचे नाते असणे खूप महत्त्वाचे आहे.
आताच्या काळात मी शिकवण्याच्या पद्धतीत नवीन तंत्रज्ञान वापरणे सुरू केले. आधी ट्रान्स्परन्सी प्रोजेक्टर, मग एलसीडी प्रोजेक्टर आणि आता पॉवरपॉइंट वापरतो. त्यामुळे शिकवणे अधिक सोपे आणि प्रभावी झाले आहे. भौतिकशास्त्रातील अवघड समीकरणे आणि आकृत्या दाखवण्यासाठी मला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि विद्यार्थ्यांनाही विषय समजायला सोपे जाते, त्यांची भीती कमी होते. म्हणूनच, एक चांगला शिक्षक वेळेनुसार बदल स्वीकारतो आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून सांगतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा विषयातील रस वाढतो.
मी माझ्या पीएचडीपासूनच संशोधनात पूर्णपणे गुंतलो होतो. शिक्षक झाल्यावरही अनेक विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी माझ्यासोबत संशोधन केले आणि अजूनही माझे पीएचडी विद्यार्थी संशोधन करीत आहेत. आत्तापर्यंत आमचे दोनशेहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आणि त्यांना जगात खूप लोकांनी मान्यता दिली, ज्यामुळे मी जगातील टॉपच्या दोन टक्के संशोधकांच्या यादीत आलो. गेले ५ पाच वर्षे झाले या यादीत माझे नाव टिकून आहे. यामुळे मला फक्त चांगला शिक्षक नाही, तर एक चांगला संशोधक-शिक्षक म्हणून ओळख मिळाली. त्यामुळे शिकवण्यासोबतच माझ्या संशोधनाच्या कामाचाही माझ्या विद्यार्थ्यांवर चांगला आणि दूरगामी परिणाम झाला. म्हणूनच, एक आदर्श शिक्षक केवळ शिकवत नाही, तर तो स्वतःच्या कामातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीस दिशा दाखवतो.
मी 'जयहिंद फौंडेशन'च्या माध्यमातून शहीद सैनिकांच्या कुटुंबांसाठी काम करतो. यातून मी माझ्या विद्यार्थ्यांना समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो. त्यांना सामाजिक बांधिलकी आणि देशसेवेचे महत्त्व पटवून देतो, जेणेकरून ते मोठे झाल्यावर चांगले नागरिक बनून देशाच्या कामात मदत करतील. म्हणूनच, एक शिक्षक म्हणून मी केवळ शिकवण्यावर लक्ष केंद्रित करत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार आणि सामाजिक जाणीव रुजवण्यासाठीही प्रयत्नशील असतो. यामुळे ते केवळ चांगले विद्यार्थी नव्हे, तर चांगले माणूसही बनतात.
शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या मनात कायम आदर आणि प्रेम मिळवायचे असेल, तर त्याला नेहमी नवीन गोष्टी शिकत राहावे लागते. आजकाल जग खूप बदलत आहे, त्यामुळे शिकवण्याच्या पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या गरजाही बदलतात. शिक्षकाने नवीन ज्ञान आणि तंत्रज्ञान शिकले, तर तो विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवू शकतो. त्यासाठी कार्यशाळांमध्ये भाग घेणे, नवीन पुस्तके वाचणे किंवा ऑनलाइन अभ्यासक्रम करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच, सतत शिकत राहणे आणि बदलत्या जगासोबत जुळवून घेणे हे एका आदर्श शिक्षकाचे महत्त्वाचे लक्षण आहे.
शिक्षकाच्या जीवनातही चढ-उतार आणि अपयश येतात. एका चांगल्या शिक्षकाची ओळख म्हणजे तो आपल्या अपयशातून काय शिकतो. शिक्षकाने विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगून अपयशावर मात कशी करायची हे शिकवावे. आपल्या उदाहरणातून, शिक्षक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करण्यासाठी धैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास प्रवृत्त करू शकतो.
आजच्या शिक्षण पद्धतीत अनेक महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. केवळ पुस्तकातील कोरडे ज्ञान न देता, विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करायला शिकवणे आणि त्यांच्यातील जन्मजात कौशल्यांचा विकास करणे ही काळाची गरज आहे. शिक्षकांनी केवळ ज्ञान देणारे मार्गदर्शक न राहता, एक मित्र आणि विश्वासू सल्लागार म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली पाहिजे.
जेव्हा यशस्वी विद्यार्थी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात, तेव्हा ते इतरांना प्रेरणा देतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी चांगले संबंध ठेवावेत. शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचे यश-अपयश एकमेकांशी जोडलेले असते. त्यामुळे, विद्यार्थी नापास झाल्यास शिक्षकांवरही प्रश्न येतो. अर्थात, विद्यार्थ्यांची निष्काळजीपणा हे एक कारण असू शकते, पण शिक्षकाचे काम केवळ शिकवणे नसून मार्गदर्शन करणे देखील आहे.
शिकवताना विनोदी दृष्टिकोन ठेवल्यास, कठीण विषयही सोपे वाटतात. आनंदी वातावरणात विद्यार्थी उत्साहाने शिकतात आणि शिक्षकालाही आनंद मिळतो. सतत नवीन ज्ञान मिळवणे, अपयशातून शिकणे, शिक्षण पद्धतीवर विचार करणे, विद्यार्थ्यांच्या मतांचा आदर करणे आणि विनोदी स्वभाव यांसारख्या गुणांमुळे शिक्षक विद्यार्थ्यांचे आवडते बनतात.
आजकाल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे झटपट उत्तर देते. जरी प्रत्येक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट झाली नाही, तरी AI आपल्याला आवश्यक माहिती नक्कीच देते, ज्यामुळे आपण अंदाज लावू शकतो. असं वाटतं की AI शिक्षणाचं काम करतं, पण ते शिक्षकांची जागा कधीच घेऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःला अपडेटेड ठेवणं आणि AI च्या तुलनेत आपलं महत्त्व टिकवणं आवश्यक आहे. असं झाल्यास, विद्यार्थी शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच आदर देतील.
जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फेनमन हे एक महान शास्त्रज्ञ तसेच शिक्षक होते. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप प्रभावी आणि आकर्षक होती. ते कठीण संकल्पना सोप्या उदाहरणांच्या मदतीने विद्यार्थ्यांना सहज समजावून सांगायचे. त्यांच्या वर्गात विद्यार्थ्यांना कधीही कंटाळा येत नसे, कारण ते त्यांच्या विनोदी आणि उत्साही शैलीने त्यांना बांधून ठेवायचे. त्यांनी विद्यार्थ्यांना फक्त ज्ञान दिले नाही, तर त्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि प्रश्न विचारण्याची प्रेरणाही दिली. त्यांच्या मते, शिक्षकाला विषयाचे सखोल ज्ञान आणि शिकवण्याची तीव्र इच्छा असणे आवश्यक आहे. जरी मी स्वतःला फेनमन यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत ठेवण्याचा विचारही करणार नाही, तरी त्यांच्या असामान्य क्षमतांवर विचार केल्यास जगातील महान भौतिकशास्त्राच्या शिक्षकांमध्ये सातत्याने दिसणाऱ्या गुणांवर प्रकाश पडतो.
म्हणूनच, माझ्या एका विद्यार्थ्याचा आलेला फोन आणि त्याला सांगितलेली माझी गोष्ट हेच दर्शवतात की शिक्षक फक्त ज्ञान देणारे नसतात, तर ते विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवणारे मार्गदर्शक असतात. एक चांगला शिक्षक होण्यासाठी खूप प्रयत्न, विषयाची चांगली तयारी आणि विद्यार्थ्यांप्रती निष्ठा आवश्यक आहे. अशा शिक्षकांकडूनच प्रेरणा घेऊन अनेक तरुण विद्यार्थी यशस्वी होतात आणि आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये मदत करतात.
__\*|*/__
Tuesday, April 22, 2025
माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक लेखनाचे व्यासपीठ
'दीपस्तंभ' ब्लॉग विविध विषयांवरील माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक लेखनाचे व्यासपीठ आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे प्रमुख विषय असले तरी, सामाजिक, वैयक्तिक आणि सांस्कृतिक विषयांवरील लेख ब्लॉगला एक व्यापक दृष्टिकोन देतात. लेखनशैली शक्यतोवर माहितीपूर्ण, विश्लेषणात्मक आणि वाचकांशी संवाद साधणारी आहे, ज्यामुळे विविध प्रकारच्या वाचकांना ब्लॉग आकर्षक वाटू शकतो.
(ब्लॉग वाचण्यासाठी शीर्षकावर क्लिक करा)
शिक्षण आणि संशोधन:
- सृजनाचा मार्ग: संशोधनाचे सार आणि सामाजिक बांधिलकी
- जागतिक संशोधकांच्या यादीत सलग तिसऱ्यांदा
- शिवाजी विद्यापीठाचे दहा प्राध्यापक जागतिक यादीत
- हुब्बळी शून्य सावली दिवस कार्यशाळा
- शिवाजी विद्यापीठाला नॅकचे अ++ मानांकन
- विद्यापीठाच्या संशोधनात राजपुरे यांचे योगदान
- भारतातील डिजिटल शिक्षणातील ट्रेंड
- उच्च शिक्षणाची पुनर्रचना: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
- शीर्ष २% शास्त्रज्ञांची यादी का प्रकाशित केली?
- अस्तित्वाचा संघर्ष: आपल्या शाळेला आपल्या मदतीची गरज आहे!
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अनास्था
- ज्ञानदानाची ज्योत (पिढी घडवणारा शिक्षक)
विज्ञान आणि तंत्रज्ञान:
- नॅनोमटेरियल्स: भविष्यवेध
- कृत्रिम बुद्धिमत्ता: २०२४ चे नोबेल पारितोषिक
- न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग
- अॅटोसेकंद भौतिकशास्त्र ज्ञानशाखेचा सन्मान
- पुंज कणांची अद्भुत दुनिया: अब्जांश तंत्रज्ञानाचा चमत्कार
- भौतिकशास्त्रातील २०२१ चा नोबेल पुरस्कार; अनावरण जटिळतेचे
- आइनस्टाइनच्या स्थळ‒काळ सिद्धांताचा विवाद
- कृष्णविवराभोवतालचे प्रकाशमान वलय
- भौतिकशास्त्राची विलक्षणता
- अणुउर्जेचे 'अक्षय पात्र'
- कृष्णविवर नोबेल प्रवास
- भारताचे (चंद्रावर) यशस्वी पाऊल
- तेजोमय सूर्याचा वेध: आदित्य एल-१
आरोग्य आणि जीवनशैली:
- निरोगी हृदयासाठी जीवनशैली मंत्र
- स्मृतीची द्वंद्व: आठवणींचा भार की ज्ञानाचा आधार?
- देहभान ते आत्मभान: सुखाच्या प्रवासातील टप्पे
सामाजिक आणि प्रेरणा:
- इलेक्शन ड्युटी मधील विलक्षण अनुभव
- मुलं, जबाबदाऱ्या, वाईट सवयी, वाद आणि उपाय
- चांगुलपणा: सत्कर्म- नात्यांची अक्षय ठेव
- पराभव; भावी विजयाची आधारशिला
- पालकांची जबाबदारी; समाजाचा आरसा
- आनंदाचा डोह: माणूस गप्प का होतोय ?
- विद्यार्थी घडवतानाचे विचार मंथन
- आत्म-मग्नतेचा अंधःकार: कमी लेखण्याची शोकांतिका
- उत्कृष्टतेचा ध्यास: परिपूर्णतेच्या शोधाची कथा
- ज्ञानदानाची ज्योत (पिढी घडवणारा शिक्षक)
- माझ्या मराठीची बोलू कौतुके
व्यक्ती विशेष:
- प्रेमस्वरूप आई
- आईची चारित्र्यासाठीची शिदोरी
- कणखर कार्यमग्न माऊली- आई
- यशवंत राजपुरे (स्मृतिगंध: माझ्या वडिलांच्या अस्तित्वाचा दीप)
- अनिकेतच्या लेखणीतून राजपूरे सर; एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा 'दीपस्तंभ'
- जगातील अव्वल संशोधकांच्या यादीत शिखर
- वडील भाऊ - बाळासाहेब राजपुरे
- आकाश राजपुरे; प्रज्ञावंत : जिद्द आणि यशाची कहाणी
- रूम नंबर २/८७ संस्कारगृह: विवेक; माझी प्रेरणा
- अरविंद तावरे माझा पार्टनर
- संशोधनारंभ : वैज्ञानिक_शेतकरी, डॉ प्रताप वाघ
- संजय गोडसे: नाबाद अर्धशतक
- माणुसकीचा दीपस्तंभ: हनुमंत मांढरे यांची समाजसेवेची ज्योत
- राष्ट्रीय धनुर्धारी खेळाडू: सुरज अनपट
- पोलीस उपनिरीक्षक सूरज: धनुष्यातून वर्दीकडे- सूरजच्या जिद्दीचा प्रवास
- महेश विनायक अनपट; समर्पित
- गावचे प्रथम सरपंच सदाशिव कुंडलिक मांढरे
- बाळकृष्ण जगदेवराव अनपट; प्रभावी व्यक्तिमत्व
- विनायक शंकर अनपट (नाना)
- ध्येयवेडा अमित (शशिकांत) भास्कर अनपट
- अमित, स्वप्नांना गवसणी: मराठी तरुणाईची डिजिटल क्रांती
- जनार्दन संपतराव गोळे; निस्वार्थी दातृत्वशिल व्यक्तिमत्व
- रवींद्र एकनाथ अनपट; आश्वासक आणि खंबीर
- कै भीमराव रामचंद्र अनपट; अल्पायुषी स्थितप्रज्ञ
- नितीन शिवराम मांढरे; आदर्श सरपंच
- दिलीप आनंदराव अनपट; रूपांतरण शेठ
- भास्कर तानाजी अनपट; डायनॅमिक पोलीस उपनिरीक्षक
- नशीबवान बाळासाहेब वामन सुतार
- कर्तृत्ववान लालसिंग विष्णू मांढरे
- राजेंद्र लक्ष्मण अनपट; संघर्षातून सुसंस्कृतता
- अनिल मारुती अनपट; एक उद्योजक घडताना
- राजेंद्र परबती मांढरे; स्वकर्तुत्ववान मुख्याध्यापक
- निवास दत्तात्रय अनपट; चित्रकार, सर्वसमावेशक नेतृत्व
- दत्तात्रय मांढरे; संघर्षवेडा शिक्षक
- लेखापरीक्षणातील 'फायटर', जीवनातील 'आयर्नमॅन': विजय अनपट
- सीए विजय अनपट; जिद्दीचा 'विजय', सीए ची यशोगाथा
- श्वेता संभाजी अनपट ('पाकोळी'- मायेची ऊब, मानवतेचा दीपस्तंभ)-
- 'बुवा दादा': अनपटवाडीचे बहुआयामी नेतृत्व
- दीपा महानवर सर: एका प्राचार्यांच्या मार्गदर्शनाची तेजस्वी गाथा
- प्रा के सुरेश : साधेपणातील विलक्षण मोठेपण
- बार्डीन : "पुन्हा येईन" म्हणालेला शास्त्रज्ञ
- भौतिकीचा रंग जीवनात भरणारा शिक्षक-कलाकार ; डॉ. टाकळे
- मायकेल न्यूमन-स्पेलार्ट: प्रतिभा आणि साधेपणा:
- गुरुवर्य प्राध्यापक चंद्रकांत हरी भोसले; संघर्षातून सिंचिले ज्ञान
- वात्सल्यमूर्ती: सिंधुताई - एका प्रेरणादायी जीवनगाथेचा स्मरणोत्सव
- आकाशाला गवसणी घालणारा कोल्हापूरचा तारा: डॉ. आर. व्ही. भोंसले - एका अंतराळयात्रेचा स्मरणपट
- ध्येयवेडा डॉ संभाजी शिंदे (तपस्या यशाची: शेतकरी पुत्र ते 'नेचर' चा मानकरी)
- सौरभ पाटील: ग्रामीण रोषणाई, यशाचा तेजस्वी आविष्कार
- शून्यातून शिखर: मनोज राजपुरेची कोरियापर्यंतची प्रेरणादायी यात्रा
- कर्तव्याचा हुंकार: हुतात्मा अनिकेत मोळे
- थोरात सर: एक प्रेरणादायी गुरु
- जिद्द आणि नेतृत्व: आदरणीय डॉ. विजय फुलारी नावाचे व्यक्तिमत्व
प्रवास आणि संस्कृती:
- दैवी हस्तक्षेप: माझ्या पहिल्या पंढरीच्या वारीची अनपेक्षित कहाणी
- बगाड: बावधनची मान, संस्कृती आणि परंपरेचा जिवंत ठेवा
- सह्याद्रीच्या कुशीतील स्वर्ग- माझ्या सुंदर गावाची गाथा
- भैरवनाथ देवस्थान बावधन
- श्री क्षेत्र सोनेश्वर
- श्रीक्षेत्र वाकेश्वर बावधन
- सोनजाई देवस्थान बावधन
- अगस्तेश्वर, पांढरेचीवाडी- बावधन
- श्री क्षेत्र राजपुरी
- कोरिया डायरी; सुवर्ण कांचन योग (विद्यार्थी, संशोधन आणि आठवणींचा इंद्रधनुष्य)
इतर:
- मुंगरवाडी हायस्कुल (खेडेगावात विज्ञानाचा 'उजाळा': कळविकट्टेतील बाल वैज्ञानिक पर्वणी)
- 'आला एकदाचा पासपोर्ट': लाल फितीशाही आणि नावांच्या चक्रव्यूहात हरवलेला प्रवास
- सप्तरंगी योग (एम एस्सी च्या ७ मित्रांचा गेटटुगेदर)
- डॉ. राजपुरे यांचा 'क्रिकेटपट': खेळ, आठवणी आणि जीवनदृष्टी
- माती, पंख आणि आकाश माझा अनुभव..
- व्हाट्सएप ग्रुपअड्मीन : एक आव्हान
- ज्ञानदीप: विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि शिक्षकांचा आदर्श
- अदृश्याची आस: माणूसकीतच परमेश्वर
- निवडीचे महत्त्व: आयुष्यातील गोडव्याचा क्रम
Monday, February 24, 2025
नॅनोमटेरियल्स भविष्यवेध
नॅनोमटेरियल्स: वर्तमान संशोधन स्थिती आणि भविष्यवेध
न्यू कॉलेज कोल्हापूर येथे नॅनोमटेरियल्स या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मला अत्यंत आनंद होत आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्य, आयोजक, संयोजक आणि महाविद्यालयाला मी धन्यवाद देतो. आजच्या या चर्चासत्रात 'सध्याची संशोधन स्थिती आणि भविष्याचा वेध' या अनुषंगाने नॅनोमटेरियल्समधील संशोधनावर मार्गदर्शन करणे, ही माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे.
बंधु आणि भगिनींनो,
आजकाल शिवाजी विद्यापीठात आणि महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक विद्यापीठांमध्ये मटेरियल सायन्समध्ये संशोधन चालते. हे संशोधन जरी भौतिकशास्त्राशी संबंधित असले, तरी ते बहुविद्याशाखीय आहे. मला असे वाटते की, भौतिकशास्त्र हा मूलभूत विज्ञानाचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्यात संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे.
शिवाजी विद्यापीठातील संशोधनाचा इतिहास पाहिल्यास, तीस वर्षांपूर्वी फेराईट, लुमिनिसंट पदार्थ, सुपरकंडक्टर, सोलर सेल आणि त्यानंतर गॅस सेन्सर, इलेक्ट्रॉनिक मटेरियल, एमई कंपोझिट, मेमरीस्टर, फोटो कॅटेलासीस आणि आता सुपर कॅपॅसिटर असे विषय संशोधनासाठी निवडले गेले. प्रत्येक कालखंडात जो विषय 'हॉट टॉपिक' म्हणून चर्चेत असे, तोच संशोधनाचा विषय निवडण्याची पद्धत रूढ झाली. विद्यार्थ्यांनाही त्याच विषयात रस वाटे आणि शिक्षकही संशोधनासाठी तेच विषय देत असत. माझ्या मते, संशोधनाचा विषय हा कालसुसंगत बदलणे आवश्यक नाही. एकाच विषयात अतिशय सखोल संशोधन केल्यास चांगली प्रकाशने होऊ शकतात आणि ज्ञाननिर्मितीही होते.
आजकाल आपण नॅनो-नॅनो हा शब्द प्रत्येकाच्या तोंडून ऐकतो. नॅनो फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याचे गुणधर्म उत्कृष्ट असतात हे खरे आहे, पण ते तसेच का असतात? त्यामागील भौतिकशास्त्र काय? त्याचे क्वांटम मेकॅनिकल स्पष्टीकरण काय? याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
नॅनो मटेरियल तयार करणे हा संशोधनाचा विषय निवडल्यावर, सध्याच्या काळात या नॅनो मटेरियलमध्ये काय संशोधन होत आहे आणि कोणत्या ऍप्लिकेशन्ससाठी नॅनो मटेरियल तयार केले जात आहेत, याचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे. आजकाल कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, इको-फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल नॅनो मटेरियल, औषधांमध्ये विशेषतः टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी, स्पेस ऍप्लिकेशन्ससाठी नॅनो मटेरियल अशा क्षेत्रांमध्ये संशोधन करणे गरजेचे आहे.
नॅनो मटेरियल तयार करण्यासाठी बरीच रसायने वापरावी लागतात आणि या प्रक्रियेत आपण पर्यावरणाचा समतोल बिघडवतो. त्यामुळे नॅनो पार्टिकल मटेरियल तयार करण्याचे 'ग्रीन सिंथेसिस रूट' अवलंबणे आवश्यक आहे, जे कॉस्ट इफेक्टिव्ह आणि पर्यावरणास अनुकूल असेल.
आजकाल अनेक विद्यार्थी नोकरी नसल्यामुळे किंवा परदेशात चांगली फेलोशिप मिळते म्हणून पीएचडीकडे वळतात. पैसा मिळवणे हा उद्देश असला तरी, संशोधनात आपले शंभर टक्के योगदान देणे अपेक्षित आहे. नॅनो मटेरियल क्षेत्रात संशोधन करताना आपण ते तयार करतो, त्याचे गुणधर्म तपासतो आणि त्याचे ऍप्लिकेशन्स पाहतो. पण 'ते तसेच का मिळाले' याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देणे महत्त्वाचे आहे, जे आपण विसरतो.
संशोधन मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे वेळोवेळी अपडेट घेणे गरजेचे आहे. त्यांनी केलेल्या संशोधनावर लक्ष ठेवून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यांनी लिहिलेले पेपर किंवा थीसिस वाचून त्यात सुधारणा सुचवणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना 'कॉपी कॅट्स' बनवण्याऐवजी 'थिंक टॅंक' बनवण्यावर भर द्यावा. जेणेकरून एकदा का विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी झाला, तर तो स्वतंत्रपणे संशोधनाचा विषय निवडू शकेल, संशोधन प्रकल्प लिहू शकेल, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकेल आणि स्वतंत्रपणे पब्लिकेशन करू शकेल.
आजकाल प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांनी याचा उपयोग संज्ञा समजून घेण्यासाठी, टेक्निकचे मूलभूत नियम समजून घेण्यासाठी किंवा थेअरी समजून घेण्यासाठी करावा. तसेच पेपरच्या पॅराग्राफचा ड्राफ्ट किंवा व्याकरण दुरुस्त करण्यासाठी करावा. परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पेपर किंवा थीसिस लिहिण्यासाठी किंवा प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी करू नये.
विद्यार्थ्यांनी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर भर द्यावा. जास्त पब्लिकेशन करण्याऐवजी थोडे पण चांगले पब्लिकेशन कसे होतील यावर लक्ष केंद्रित करावे. आणि हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही वापरलेली पद्धत, त्यातील सूक्ष्म निरीक्षणे, तुमचे मत आणि पदार्थाचे गुणधर्म तपासण्यासाठी वापरलेले टूल्स; जसे की एक्सआरडी, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप्स, रमन, इन्फ्रारेड, एक्स-रे फोटोइलेक्ट्रॉनिक्स स्पेक्ट्रोस्कोपी यांसारख्या टेक्निक्सची थेअरी आणि त्याचे बारकावे तुम्हाला माहीत असतील. हे तुम्हाला माहीत असेल, तर नक्कीच तुमच्याकडून चांगले पब्लिकेशन मिळतील, चांगले संशोधन होईल आणि तुम्ही ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये हातभार लावाल. आणि विशेष म्हणजे, या संशोधन प्रक्रियेमध्ये तुम्हाला चांगले संशोधन संस्कार होतील.
धन्यवाद !
Wednesday, January 29, 2025
heart-strok
निरोगी हृदयासाठी जीवनशैली मंत्र
माझ्या वर्गमित्राच्या अकाली जाण्याने माझ्या मनाला चटका लावून गेला. त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनपेक्षितपणे ओढावलेल्या अशा प्रसंगास तोंड देण्यास कोणीही सज्ज नसते. मन हे स्वीकारायला तयार नसतं, मग भविष्याचा विचार कोण करेल? परंतु, नियती कोणालाही आपल्या भविष्याचा अंदाज बांधू देत नाही.
आजकाल हृदयविकार, म्हणजेच हार्ट अटॅक आणि स्ट्रोक, म्हणजेच कार्डियाक अरेस्टमुळे अचानक मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, विशेषतः तरुणांमध्ये. हृदयविकारात रुग्ण वाचू शकतो, पण कार्डियाक अरेस्टमध्ये नाही. याचे मुख्य कारण म्हणजे रक्तदाबात अचानक वाढ होणे, ज्यामुळे हार्ट ब्लॉकेजेस होतात आणि रक्तातील ऑक्सिजनचा स्नायूंना होणारा पुरवठा खंडित होतो. हृदयाचे ठोके वाढणे किंवा चक्कर येणे आणि दवाखान्यात नेईपर्यंत सर्व काही संपणे हे देखील यात समाविष्ट आहे. सामान्यतः उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल, मधुमेह, आनुवंशिकता, आहारातील मिठाचे वाढीव प्रमाण, व्यसन, लठ्ठपणा, थायरॉईड, बैठी जीवनशैली, जन्मजात हृदयदोष, औषधांचा गैरवापर, 'प्रो-ॲरिथमिक' औषधे, कोविडची पार्श्वभूमी आणि व्यायामाचा अभाव अशी अनेक कारणे आहेत.
उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा. आपल्या जेवणात मुख्यत्वे भाज्या, फळे आणि धान्ये असावीत. शेंगा आणि नट्सपासून मिळणारी प्रथिने शरीरास आवश्यक असतात. आणि महत्त्वाचे म्हणजे जेवण नियंत्रित प्रमाणात ठेवावे. आहारात मीठाचे प्रमाण कमी करावे, फळे आणि भाज्या अधिक खाव्यात, नियमित व्यायाम करावा, वजन नियंत्रणात ठेवावे, ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करावी, डॉक्टरांसोबत नियमित फॉलो-अप भेटी घेणे आवश्यक आहे. तसेच धूम्रपान आणि मद्यपान टाळावे.
हृदयविकार आणि ऍसिडीटी ची लक्षणे सारखीच असू शकतात हे विशेष आहे. ऍसिडीटी मध्ये श्वासोच्छ्वास, हृदयाचे ठोके वाढणे आणि छातीत दुखणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. हृदयविकाराच्या झटक्यामध्ये देखील छातीत दुखणे, श्वास लागणे आणि घाम येणे अशी लक्षणे दिसू शकतात. या दोन स्थितींमधील फरक ओळखणे महत्त्वाचे आहे, कारण दोन्हीसाठी वेगवेगळे उपचार आवश्यक असतात.
पन्नाशीनंतर आपल्या शरीराला गृहीत धरणे योग्य नाही. शरीरातील लहान बदलांकडेही दुर्लक्ष करू नये, कारण शरीर आपल्याला नेहमीच काहीतरी संकेत देत असते. आपण त्याची नोंद ठेवली पाहिजे. आपणच आपले डॉक्टर असतो, कारण आपल्या शरीरात होणारे बदल सर्वप्रथम आपल्यालाच जाणवतात. त्यामुळे, कोणताही बदल जाणवल्यास त्याची नोंद घेणे आणि आपल्या कुटुंबाचा, मित्रांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आजाराकडे दुर्लक्ष बिलकुल करू नये.
दिवसातून किमान एक तास स्वतःसाठी राखून ठेवावा. त्यात दोन ते पाच किलोमीटर चालणे, योगासने, व्यायाम किंवा खेळांचा समावेश असावा. खेळ खेळताना आवश्यक खबरदारी घ्यावी. खेळल्यानंतर स्ट्रेचिंग व्यायाम करावा. ध्यानधारणा करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही तणाव असतोच. जोपर्यंत आपण तरुण आहोत, तोपर्यंत आपण त्या तणावांना समर्थपणे तोंड देऊ शकतो, परंतु वृद्धापकाळात आपले शरीर त्या ताणांना तोंड देऊ शकत नाही. यामुळे शरीराच्या रासायनिक संतुलनावर अनावश्यक ताण येतो, ज्यामुळे मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे, वेळेवर सावध होऊन योग साधना करणे आवश्यक आहे.
खबरदारी म्हणून वर्षातून एकदा आपल्या सर्व वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्यात. त्रास होत असेल तरच चाचण्या करून घेईन, असा विचार करू नका. चाचण्या केल्याने आजारांची पूर्वसूचना मिळू शकेल. वेळेवर जागे व्हा आणि आपल्या निकटवर्तीयांना याबद्दल माहिती द्या. वेळ निघून गेल्यावर आपल्या हातात काहीही उरत नाही, म्हणून वेळ जाऊ देऊ नका कारण वेळ कोणाचीही वाट पाहत नाही.
हृदयविकार हा एक गंभीर आणि वाढता धोका आहे, जो कोणालाही होऊ शकतो. अनेकजण उत्तम जीवनशैली जगत असताना, नियमित व्यायाम करत असताना आणि संतुलित आहार घेत असताना देखील हृदयविकाराचे बळी ठरतात. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरात होणारे सूक्ष्म बदल, ज्यांना आपण सहजपणे ओळखू शकत नाही. शरीरात होणारे बदल इतके हळू असतात की अनेकदा लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत आणि त्यामुळे धोका वाढतो. काहीवेळा आनुवंशिकतेमुळे देखील हृदयविकार होऊ शकतो. ज्या कुटुंबांमध्ये हृदयविकाराचा इतिहास असतो, त्या कुटुंबातील सदस्यांना हा धोका अधिक असतो. याव्यतिरिक्त, काही लोकांच्या मनात हृदयविकाराबद्दल चुकीच्या कल्पना असतात. उदाहरणार्थ, 'मला कधीच छातीत दुखलं नाही, त्यामुळे मला हृदयविकार होणार नाही,' असा विचार करणे धोक्याचे ठरू शकते. हृदयविकार कधीही कोणालाही होऊ शकतो. आजच्या धावपळीच्या जीवनात वाढलेला ताणतणाव हे देखील हृदयविकाराचे एक प्रमुख कारण आहे. या सगळ्या कारणांमुळे, हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी नियमित तपासणी करणे, हृदयविकाराची लक्षणे ओळखणे, जीवनशैलीत आवश्यक बदल करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हृदयविकार गंभीर असला तरी तो टाळता येऊ शकतो, यासाठी जागरूकता आणि नियमित काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
पण एक मात्र नक्की कितीही मोठे डॉक्टर असले तरी हृदयविकार कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. डॉ नित्यानंद मांडके हे मुंबईतील एक प्रसिद्ध आणि यशस्वी हृदयरोग शल्यचिकित्सक होते. त्यांनी १०,००० हून अधिक हृदयरोग शस्त्रक्रिया केल्या, जो एक विक्रम आहे. वीस वर्षांपूर्वी मांडके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तसेच गुजरातमधील जामनगर येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ गौरव गांधी यांचे गेल्या वर्षी वयाच्या ४१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते एक प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक होते ज्यांनी १६,००० हून अधिक हृदय शस्त्रक्रिया केल्या. अर्थात, जर एखाद्याची घटका भरली असेल, तर वरील सर्व उपाय फोल ठरतात आणि नियतीचा विजय होतो, तिथे मात्र या उपाययोजना लागू होत नाही. मृत्यू अटळ आहे, हेही खरे आहे.
- प्रा केशव राजपुरे
अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर
यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...

-
कृत्रिम बुद्धिमत्ता: आपल्या दैनंदिन जीवनात बदल घडवणारी क्रांती आणि २०२४ चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक दररोज जाणतेअजाणतेपणे आपण आर्टिफिश...
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (संशोधनावर आधारित उच्च शिक्षण) दोन महिन्यापूर्वी भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने नवीन ...
-
ज्ञानदानाची ज्योत (पिढी घडवणारा शिक्षक) ( माझ्या शैक्षणिक प्रवासात, एका प्रामाणिक प्राध्यापकापासून ते संशोधकापर्यंतचा अनुभव आहे. शाळेतील आवड...