Saturday, March 7, 2026

माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक लेखनाचे व्यासपीठ




'दीपस्तंभ' ब्लॉगवरील पोस्ट्स:

'दीपस्तंभ' ब्लॉग विविध विषयांवरील माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक लेखनाचे व्यासपीठ आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे प्रमुख विषय असले तरी, सामाजिक, वैयक्तिक आणि सांस्कृतिक विषयांवरील लेख ब्लॉगला एक व्यापक दृष्टिकोन देतात. लेखनशैली शक्यतोवर माहितीपूर्ण, विश्लेषणात्मक आणि वाचकांशी संवाद साधणारी आहे, ज्यामुळे विविध प्रकारच्या वाचकांना ब्लॉग आकर्षक वाटू शकतो.
(ब्लॉग वाचण्यासाठी शीर्षकावर क्लिक करा)

शिक्षण आणि संशोधन:

विज्ञान आणि तंत्रज्ञान:

आरोग्य आणि जीवनशैली:

सामाजिक आणि प्रेरणा:

व्यक्ती विशेष:

प्रवास आणि संस्कृती:

इतर:

 
👉 तुमच्या नावासह प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका! तुमच्या अभिप्रायामुळे मला अधिक सुधारणा करण्याची प्रेरणा मिळेल आणि प्रोत्साहन लाभेल.

Tuesday, February 24, 2026

आत्मचिंतन


 
ज्ञानजिज्ञासेचा अभाव

संशोधनाचा मुख्य उद्देश 'ज्ञाननिर्मिती' हा असतो. हे करत असतानाच संशोधकाची जडणघडण व्हावी, त्याचा व्यक्तिमत्व विकास व्हावा आणि वैचारिक क्षमता प्रगल्भ व्हावी, हा देखील त्यामागचा महत्त्वाचा हेतू असतो. यालाच जर आपण 'कौशल्याधिष्ठित ज्ञाननिर्मिती' म्हटले, तर ते वावगे ठरू नये. मात्र, हल्ली मुले संशोधनाकडे केवळ एक गरज किंवा पात्रता म्हणून वळताना दिसतात. पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी असूनही नोकरी मिळत नाही, मग आता काय करायचे? या विवंचनेतून केवळ पदवीसाठी संशोधनाकडे वळणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

संशोधनाला प्रवेश घेतल्यानंतर अनेकांचा असा समज असतो की, आपण काहीतरी 'जगावेगळा' शोध लावला पाहिजे, जे आजवर कोणीच केले नाही असे काहीतरी करून दाखवले पाहिजे. यामागे नाव कमावण्याची आणि समाजात 'ग्रेट' ठरण्याची सुप्त इच्छा असते. मला वाटते, समाजात संशोधनाविषयी खरी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. संशोधनामुळे माणसाची तार्किक आणि विश्लेषणात्मक दृष्टी सुधारते, हे त्यांना कोणीही सांगत नाही. ज्यांनी प्रामाणिकपणे पीएचडी केली आहे, त्यांना याचा अनुभव नक्कीच येतो.

संशोधनाला सुरुवात करताना, कमी वेळात संशोधन कोणत्या गाईडकडे पूर्ण होईल किंवा कोणत्या क्षेत्रात लवकर निकाल मिळतील, याचा विचार करूनच अनेकजण प्रवेश घेतात. म्हणजेच, या निवडीमध्ये ते अत्यंत व्यावहारिक (निवडक) असतात. याचे कारणही तसेच आहे: त्यांना कमीत कमी श्रमात पदवी मिळवायची असते, इतरांचे रेकॉर्ड तोडायचे असतात आणि स्वतःला सरस सिद्ध करायचे असते.

सुरुवातीला मार्गदर्शक किंवा लॅबमधील वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून विषयाच्या 'टिप्स' घेतल्या जातात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून श्रम वाचवत, निवडक प्रयोग करून उत्तम निकाल मिळवणे, हेच एकमेव ध्येय समोर ठेवले जाते. या पिढीला धीर नाही; त्यांचे लक्ष शिकण्यापेक्षा 'एक्सीलंट रिझल्ट' मिळवण्यावर असते. 'येनकेन प्रकारेण' शोधनिबंध  आणि प्रबंध पूर्ण झाला पाहिजे, एवढाच त्यांचा मर्यादित उद्देश असतो. शिकण्याच्या नावाने मात्र आनंदीआनंदच असतो. लॅबमधील सिनिअर विद्यार्थ्यांना स्वतःचे काम असते, तर मार्गदर्शकांवर शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा बोजा असतो. त्यामुळे विद्यार्थ्याने काढलेले निष्कर्ष किंवा आकडेमोड मुळापासून तपासली जाईलच असे नाही. केवळ अंतिम निकाल पाहिला की काम भागते. पण या प्रक्रियेत विद्यार्थी ज्ञानाच्या बाबतीत 'कोरा'च राहतो, हे आजचे दुर्दैवी वास्तव आहे.

बऱ्याचदा विद्यार्थी जे प्रयोग करतात, त्यातील मूलभूत तत्त्वांची माहिती त्यांना नसते. विषयातील क्लिष्टतेमुळे कधीकधी मार्गदर्शकही काही बाबींपासून अनभिज्ञ असतात. "मुले काहीतरी नवीन करतायत ना, मग ते बरोबरच असणार," किंवा "सिनिअर विद्यार्थी सोबत आहेच," असे गृहीत धरून जबाबदारी टाळली जाते. इथेच मुख्य अडचण निर्माण होते. मार्गदर्शकाची बौद्धिक मर्यादा किंवा आळस यामुळेही दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. परिणामी, संशोधनाचा मुख्य उद्देश बाजूला राहतो आणि मुले 'हम करे सो कायदा' या वृत्तीने वाटचाल करू लागतात.

मी गेल्या तीस वर्षांपासून संशोधन क्षेत्रात आहे. भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्रातील बहुतांश संशोधक 'मटेरिअल सायन्स'ची निवड करतात. मूळतः अकार्बनिक रसायनशास्त्र आणि घनअवस्था पदार्थविज्ञान यांच्याशी निगडित हा विषय आहे. पण जेव्हा इतर विषयांतील संशोधकही याच क्षेत्रात गर्दी करतात, तेव्हा कुतूहल वाटते. याची दोन कारणे असावीत: मटेरिअल सायन्सची उपयुक्तता आणि संशोधनातील सुलभता. एकेकाळी थिन फिल्म, PEC सोलर सेल, गॅस सेन्सर, मायक्रोवेव्ह, होलोग्राफी किंवा एरोजेल यांसारख्या विषयांत काम करणारी माणसे 'सुपर कॅपॅसिटर'च्या संशोधनात कधी रमली, हे समजलेच नाही. सुपर कॅपॅसिटरमध्ये संशोधन करायला हरकत नाही, पण इतर क्षेत्रांत वाव नाही का? की ती क्षेत्रे खर्चिक वाटतात? तिथे कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे? विषय बहुविद्याशाखीय असल्याने ठेवलेला हा व्यावहारिक दृष्टिकोन संशोधनाच्या मुळावर येत आहे.

आता मूळ मुद्द्याकडे येऊया: विद्यार्थ्यांची उत्सुकता, क्युरिऑसिटी आणि ज्ञानरचनावाद. सुरुवात उपकरणांपासून होते. उपकरणाला दिलेल्या 'डेटा'साठी आपण कोणत्या सूचना दिल्या आहेत, हे अनेकदा विद्यार्थ्यांना ठाऊक नसते; कारण ते एकतर उपकरण वापरण्यात पारंगत नसतात किंवा त्यांनी दुसऱ्या कोणाकडून तरी निरीक्षणे घेतलेली असतात. "हे असं करायचं, ते तसं करायचं" या पलीकडे त्यांना काहीही माहिती नसते. माहिती करून घेण्याची उत्सुकताही नसते. त्यांच्या दृष्टीने केवळ डेटा आणि त्यावरून काढलेला आलेख महत्त्वाचा असतो. आलेली निरीक्षणे अशीच का आली, याचा शोध घेण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. प्रत्येकजण केवळ आपली भूमिका निभावण्याचे सोंग करतो; तिथेच शिक्षण पद्धती मार खाते.

तीस वर्षांपूर्वी संगणक उपलब्ध नव्हते. आलेख पेपरवर हाताने काढावे लागत. निरीक्षणांच्या बिंदूंमधून जाणारी 'बेस्ट फिट' रेषा काढण्यासाठी तासन् तास खर्च होत. अक्षाचा छेदबिंदू घेताना शून्यापासून सुरुवात करण्याचे भान ठेवावे लागे. लॉग स्केल, लॉग-लॉग स्केल, सेमी-लॉग स्केल यांचा अर्थ समजल्याशिवाय आलेख काढता येत नसत. आता मात्र सॉफ्टवेअरमुळे (एक्सेल किंवा ओरिजिन) डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, पीक फिटिंग ही कामे लीलया होतात. यामुळे आलेख काढण्याच्या मूलभूत पद्धती आणि स्केलचे ज्ञान विद्यार्थ्यांकडे राहत नाही.

गणितातील पाया कच्चा असल्याने विद्यार्थ्यांना डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशनचा 'भौतिक अर्थ' सांगता येत नाही. मॅथेमॅटिकल एरिया आणि ॲब्सोल्युट एरिया यातील फरक त्यांना समजत नाही. "रिझल्ट महत्त्वाचे की या मूलभूत गोष्टी?" असा प्रश्न काहीजण विचारतात. माझ्या मते, आधी पाया भक्कम हवा आणि मगच रिझल्ट.

जेव्हा ही मुले सादरीकरण देतात, तेव्हा चाणाक्ष परीक्षकांच्या लक्षात त्यांचे अज्ञान लगेच येते. उदाहरणादाखल, एक्सपीएस च्या आलेखात क्ष-किरणांचा स्रोत बदलला तर 'बाइंडिंग एनर्जी पीक'ची जागा बदलेल, असे चुकीचे उत्तर देऊन विद्यार्थी स्वतःचे हसू करून घेतात. "हे तर इन्स्ट्रुमेंट देते, उत्तर माहित नसले तर काय झाले?" असा त्यांचा युक्तिवाद असतो. मग तुमच्यात आणि बारावीच्या विद्यार्थ्याच्या ज्ञानात काय फरक उरला? ग्रामीण भागातील मुले तरीही आपली चूक मान्य करतात, पण शहरी भागातील मुले प्रश्न विचारणाऱ्याच्याच पात्रतेवर शंका घेण्यास कमी करत नाहीत, असा माझा अनुभव आहे.

बहुतांश मुलांना एक्सआरडी व्यतिरिक्त इन्फ्रारेड आणि रमण तंत्रज्ञान कधी वापरावे, हे सांगता येत नाही. साधे प्रश्न विचारून आपण त्यांच्या अज्ञानाची उकल करू शकतो. मुले पदार्थ तयार करतात आणि कॅरॅक्टरायझेशनसाठी दुसऱ्यांकडे देतात. त्यामुळे या प्रक्रियेतील बारकावे त्यांना समजत नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या प्रश्नांची उत्तरे एआय च्या माध्यमातून क्षणार्धात मिळू शकतात, पण तशी जिज्ञासा किंवा मानसिकता मुलांमध्ये नसते. त्यांच्या मेंदूची मशागत तशी झालेली नसते.

सुपर कॅपॅसिटर संशोधनाबाबत बोलायचे झाले, तर तिथे 'पोटॅशियोस्टॅट' हे प्रमुख उपकरण वापरले जाते. पण अनेकांना या उपकरणाची अंतर्गत कार्यपद्धती माहिती नसते. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर बद्दल विचारले तर अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. इनपुट इम्पेडन्स किंवा इलेक्ट्रोकेमिकल स्केल तर दूरची गोष्ट! खरं तर, या उपकरणाद्वारे वेळानुसार व्होल्टेज किंवा करंट मोजला जातो. मुलांना एलएसव्ही आणि सीव्ही मधील साधा फरक माहीत असणे आवश्यक आहे. 'एरिया अंडर कर्व्ह' घेताना तो 'ॲब्सोल्युट' का घ्यायचा किंवा गणितात त्याला 'दोन'ने का भागायचे, यांसारख्या साध्या प्रश्नांची उत्तरेही मुलांना देता येत नाहीत. जीसीडी कर्व्ह सिमेट्रिक असावा का ? हेही त्यांना ठाऊक नसते.

इलेक्ट्रोकेमिकल इम्पेडन्स स्पेक्ट्रोस्कोपी (ईआयएस) हा विषय तर अधिक क्लिष्ट. यातून एसी करंट वाहतो की डीसी? या अभ्यासातून नेमके काय साध्य होते? "कुठलातरी रेजिस्टन्स समजतो," असे मोघम उत्तर मिळते. नेमकेपणाचा अभाव सर्वत्र दिसतो. ही मुले उत्तम 'इम्पॅक्ट फॅक्टर' असलेल्या नियतकालिकात शोधनिबंध प्रकाशित करतात, पण मूलभूत संकल्पनांचे आकलन मात्र शून्य असते. विद्यार्थी किंवा मार्गदर्शक यापैकी कोणालाही याचे सोयरसुतक नसते, कारण दोघांनाही केवळ पेपर्सची संख्या हवी असते.

अलीकडे स्वतःचे प्रकाशित झालेले पेपर्स जसेच्या तसे प्रबंधात चिकटवण्याची पद्धत रूढ झाली आहे. शोधनिबंधाची प्रस्तावना आणि प्रबंधातील प्रकरणाची प्रस्तावना यात तफावत असते. कधीकधी पेपर दुसऱ्याने लिहिलेला असतो आणि प्रबंध विद्यार्थी स्वतः लिहितो, तेव्हा मोठी गडबड उडते. संदर्भांचे क्रमांक, आकृत्यांचे क्रमांक आणि पुनरावृत्ती या चुका तशाच राहतात. यामुळे परीक्षकांचे आणि कमिट्यांचे काम मात्र वाढते.

अर्थात, हे सर्वच विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडते असे नाही, पण बहुतेकांचे हेच वास्तव आहे. याचे मुख्य कारण म्हणजे निष्काळजीपणा आणि व्यवस्थेला गृहीत धरणे. हा लेख कोणाला हिणवण्यासाठी नसून, आत्मपरीक्षणासाठी आहे. आपल्याला माहित नसलेली गोष्ट समजून घेण्याची वृत्ती प्रत्येकाने (माझ्यासकट) जोपासली पाहिजे. 'का' आणि 'कसे' हे प्रश्न विचारले पाहिजेत. फुशारकीमधील अज्ञान दूर झाले, तरच खऱ्या ज्ञाननिर्मितीची कवाडे उघडतील.

वर उल्लेख केलेले 'सुपर कॅपॅसिटर' हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. प्रश्न केवळ एका विशिष्ट उपकरणाचा किंवा एका विषयाचा नाही, तर तो आपल्या एकूणच ज्ञानग्रहणाच्या पद्धतीचा आहे. आज आपण माहितीच्या महापुरात पोहत आहोत, पण ज्ञानाच्या बाबतीत मात्र कोरडे आहोत. याचे मुख्य कारण म्हणजे, आपण 'आपल्याला सर्व काही माहीत आहे' अशा एका आभासी कोषात वावरत असतो.

विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, एखाद्या भांड्यात नवीन द्रव ओतायचा असेल, तर ते आधी रिकामे असावे लागते. तसेच, नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी संशोधकाला आधी स्वतःचे 'अज्ञान' मान्य करावे लागते. जोपर्यंत एखादा विद्यार्थी "मला हे माहित नाही" असे म्हणण्याचे धाडस करत नाही, तोपर्यंत त्याच्यात "हे काय आहे?" आणि "ते कसे कार्य करते?" ही जिज्ञासा जन्म घेत नाही. आपण जेव्हा स्वतःला 'तज्ज्ञ' म्हणवून घेण्याच्या फुशारकीत अडकतो, तेव्हा आपण नवीन काही शिकण्याची दारे स्वतःच बंद करून घेतो.

प्रा केशव राजपुरे 

***

Tuesday, February 3, 2026

लोखंडे सर: एक ज्ञाननिष्ठ दीपस्तंभ आणि ध्येयवेडा मार्गदर्शक


आदरणीय प्राध्यापक लोखंडे सर: एक ज्ञाननिष्ठ दीपस्तंभ
- प्रा. केशव राजपुरे

अलीकडेच आमच्या एका माजी विद्यार्थ्याचा फोन आला. लोखंडे सरांच्या कार्यावर एक 'गौरव अंक' काढला जात असल्याचे त्याने सांगितले आणि सरांच्या सहवासातील काही आठवणींना उजाळा देण्याची विनंती केली. वास्तविक, लोखंडे सरांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वावर लिहिण्याचे अनेक दिवसांपासून मनात होतेच, पण या निमित्ताने तो योग जुळून आला.

१९९२ मध्ये जेव्हा आम्ही एम.एस्सी. भाग १ ला प्रवेश घेतला, तेव्हा सरांची पहिली ओळख झाली. त्याकाळी सरांच्या कडक शिस्तीचे किस्से संपूर्ण विभागात प्रसिद्ध होते. आदरणीय प्रा. एस.एच. पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विक्रमी वेळात पीएचडी पूर्ण करून 'पोस्ट-डॉक' मिळवली होती. त्यांची पीएचडीचा प्रबंध उत्कृष्ट असल्याने त्यांना 'वायवा' (मौखिक परीक्षा) देण्याचीही गरज भासली नव्हती, हे त्यांच्या प्रतिभेचे मोठे उदाहरण आहे. भौतिकशास्त्र विभागातून परदेशात संशोधनासाठी जाणारे ते पहिलेच विद्यार्थी होते. या प्रचंड शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे त्यांच्याबद्दल आदर तर होताच, पण तितकीच भीतीही मनात दाटलेली होती.

एम.एस्सी.ला सरांनी आम्हाला 'स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स' आणि 'सॉलिड स्टेट फिजिक्स' सारखे विषय शिकवले. सर शिकवताना अगदी हळू आवाजात बोलत, त्यामुळे पहिल्या दोन-तीन रांगांतील विद्यार्थ्यांनाच ते ऐकू यायचे. पण सरांना 'आवाज येत नाहीये' असे सांगण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती! सर तल्लीन होऊन शिकवायचे आणि आम्ही सगळे मान हलवून 'समजले' असा इशारा करायचो.

सरांच्या शिस्तीचा आणि गुणदानातील चोखपणाचा अनुभव मी अगदी जवळून घेतला. परीक्षेच्या बाबतीत त्यांचा दर्जा कमालीचा कडक होता; तिथे वशिलेबाजी किंवा ओळखीला थारा नव्हता. मला आजही आठवते, प्रात्यक्षिक परीक्षेत माझा पहिला क्रमांक असूनही सरांनी मला केवळ ६०% गुण दिले होते. त्यांच्या लेखी गुणांची खैरात करणे हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. ते विद्यार्थ्याची खरी कुवत पारखूनच गुण देत असत.

पुढे जेव्हा मी एम.एस्सी.च्या चारही सत्रांत सुवर्णयश मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तेव्हा सरांचा त्यावर चटकन विश्वासच बसेना. त्यांच्या नजरेत मी सुरुवातीला कदाचित एक सरासरी विद्यार्थी होतो, त्यांच्या 'स्कॉलर'च्या व्याख्येत मी बसत नव्हतो. पण जेव्हा माझ्या यशाचे सातत्य त्यांनी पाहिले, तेव्हा त्या अविश्वासाचे रूपांतर कौतुकाच्या थापेत झाले. सरांच्या त्या 'कडक' भूमिकेमुळेच मला स्वतःला सिद्ध करण्याची खरी प्रेरणा मिळाली.

एम.एस्सी. नंतर नोकरीची संधी हुकली आणि आयुष्यापुढे 'आता पुढे काय?' हा यक्षप्रश्न उभा राहिला. साहजिकच पावले संशोधनाकडे वळली, पण 'पीएच.डी. कोणाकडे करायची?' हा मोठा पेच होता. लोखंडे सरांकडे जाण्याचा विचार मनात आला खरा, पण त्यांच्या कडक शिस्तीची अनामिक भीती आणि त्याकाळी त्यांच्याकडे प्रकल्पावरील शिष्यवृत्ती उपलब्ध नसल्याने मी काहीसा थबकलो. अखेर, आर्थिक निकड म्हणून मी प्रा ए.व्ही.राव सरांकडे पी.एचडी.साठी प्रवेश घेतला.

मात्र, मी लोखंडे सरांकडे विद्यार्थी म्हणून नसलो, तरी त्यांचे माझ्यावर पितृतुल्य बारीक लक्ष होते. 'रजिस्ट्रेशन झाले का?', 'काम कुठवर आले?', 'किती पेपर्स प्रसिद्ध झाले?' अशा विचारपुससह 'लवकर थेसिस सबमिट करा' असा प्रेमळ आग्रह ते नेहमी धरत. दुर्दैवाने, काही अपरिहार्य कारणांमुळे राव सरांकडे माझी पी.एचडी. पूर्ण होऊ शकली नाही. तो काळ माझ्यासाठी अत्यंत कठीण होता. पण अशा संकटाच्या वेळी आदरणीय पी.एस. पाटील सरांची मोलाची मदत आणि लोखंडे सरांचे खंबीर मार्गदर्शन माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्याच पुढाकारामुळे मला सी.एच. भोसले सरांकडे शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळाला आणि माझ्या शैक्षणिक जीवनाचे खऱ्या अर्थाने कल्याण झाले. तो वळणबिंदू माझ्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला.

सरांशी आमचं नातं केवळ वर्गापुरतं मर्यादित नव्हतं, तर ते एका पत्राच्या ओळींइतकं जवळचं होतं. सर जेव्हा 'हंबोल्ड' शिष्यवृत्तीसाठी जर्मनीला गेले होते, तेव्हा आमचा संवाद पत्रांद्वारे आणि त्याकाळी नवख्या असलेल्या ईमेलद्वारे व्हायचा. त्याकाळी सरांकडून येणारी ती 'एअरमेल'ची पत्रं म्हणजे आमच्यासाठी ज्ञानाचा ठेवाच असे. विशेष म्हणजे, पत्रातील महत्त्वाचे मुद्दे सरांनी पिवळ्या हायलायटरने आवर्जून अधोरेखित केलेले असायचे; त्यावरून त्यांची कामाप्रती असलेली अचूकता आणि आमच्याबद्दलची ओढ स्पष्ट जाणवायची.

एका अनपेक्षित कारणामुळे सरांना त्यांचा परदेश दौरा अर्धवट सोडून अचानक मायदेशी परतावे लागले. त्या धांदलीत त्यांची एक ट्रॅव्हल बॅग विमान कंपनीच्या तांत्रिक घोळामुळे पाठीमागेच राहिली. ती बॅग घेण्यासाठी मी कोल्हापूरहून मुंबई गाठली. कस्टम ऑफिसमधील तो तासनतास चालणारा क्लिष्ट सोपस्कार, कागदपत्रांची जुळवाजुळव आणि मोठ्या कष्टाने ती बॅग सोडवून जेव्हा मी कोल्हापुरात आणली, तेव्हा तिथेही जकात नाक्यावर पुन्हा तीच कसरत करावी लागली.

अखेर सर्व अडथळे पार करून जेव्हा मी ती बॅग सरांच्या हाती सुपूर्द केली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक तृप्त समाधान होतं. सरांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारत अत्यंत मिश्किलपणे आणि प्रेमाने म्हटले, "राजपुरे, ही बॅग सोडवण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेतलेत आणि ज्या सरकारी प्रक्रियेतून गेलात, ते पाहता तुम्ही एक प्रकारे परदेश प्रवासच करून आलात असं म्हणायला हरकत नाही!" सरांच्या त्या एका वाक्याने माझा सर्व थकवा क्षणात पळून गेला आणि एका शिष्यासाठी ते शब्द कोणत्याही पदवीपेक्षा मोठे ठरले.

शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील 'थिन फिल्म' संशोधनाचे खरे जनक आणि भीष्माचार्य म्हणून आदरणीय लोखंडे सरांकडे पाहिले जाते. आज हे क्षेत्र ज्या उंचीवर पोहोचले आहे, त्याचा पाया सरांनी आपल्या अफाट कष्टाने आणि संशोधक वृत्तीने रचला आहे. विशेषतः 'केमिकल बाथ डिपॉझिशन' या तंत्रज्ञानामध्ये सरांचा इतका हातखंडा आहे की, या विषयात त्यांचे नाव जागतिक स्तरावर आदराने घेतले जाते.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणे ही आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांसाठी भाग्याची गोष्ट ठरली. सरांनी केवळ संशोधन केले नाही, तर संशोधकांची एक अखंड पिढी घडवली; ज्याची साक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पूर्ण केलेले तब्बल ६५ विद्यार्थी देतात. सरांच्या कार्याची व्याप्ती केवळ आकड्यांत मोजणे कठीण आहे, तरीही त्यांची सांख्यिकी थक्क करणारी आहे. ६५० हून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध, ४५,००० पेक्षा जास्त सायटेशन्स (११० एच-इंडेक्स, ५६४ आय१०-इंडेक्स) आणि ५० हून अधिक पेटंट्स ही त्यांच्या बौद्धिक तपस्येची आणि निरंतर परिश्रमांची जिवंत पावती आहे.

केवळ कागदावरचे संशोधन न ठेवता, त्याला पेटंट्सच्या माध्यमातून जागतिक दर्जा मिळवून देण्यात सरांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या अतुलनीय योगदानामुळेच आज शिवाजी विद्यापीठाचे नाव 'मटेरिअल सायन्स'च्या जागतिक नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. भौतिकशास्त्र विभागाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणाऱ्या या महान तपस्वी गुरूच्या ऋणात राहणे, हेच आम्हा सर्व शिष्यांचे परमभाग्य आहे.

१९९९ मध्ये मी जेव्हा शिक्षक म्हणून माझ्या कारकिर्दीची नवी इनिंग सुरू केली, तेव्हा नियतीने माझ्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली. इतर विषयांसोबतच मला 'स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स' हा विषय शिकवण्याची संधी मिळाली-असा विषय जो खुद्द सरांनी आमच्या बॅचला शिकवला होता. एका अर्थाने, माझ्या गुरूंनी जिथे ज्ञानदानाचे कार्य केले, तिथेच उभे राहून शिकवणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान आणि सन्मानही होता.

माझे हे अध्यापन सुकर व्हावे आणि विद्यार्थ्यांपर्यंत अचूक ज्ञान पोहोचावे, यासाठी सरांनी त्यांच्या संग्रहातील 'एस.के. सिन्हा' यांची 'स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स'ची नवी कोरी संदर्भ प्रत माझ्या स्वाधीन केली. विशेष म्हणजे, ते पुस्तक त्या काळात 'आऊट ऑफ प्रिंट' झाले होते; परंतु सरांनी ते मला देऊन माझ्यावरील विश्वास अधोरेखित केला.

सरांचे मार्गदर्शन केवळ पुस्तकांपुरते मर्यादित राहिले नाही. २००२ मध्ये चेन्नई येथे 'हंबोल्ड' परिषदेत 'बोस-आइनस्टाईन कंडेन्सेशन' अर्थात 'व्हेन ॲटम बिकम्स वेव्ह' या विषयावर पिरी मिस्टरी यांचे अत्यंत दर्जेदार व्याख्यान झाले होते. त्या व्याख्यानाच्या मूळ नोट्स सरांनी मला दिल्या आणि त्यावर लेक्चर तयार करण्याची प्रेरणा दिली. सरांच्या त्या अमूल्य नोट्स आणि त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच, आजही मी दरवर्षी विद्यार्थ्यांना 'बोस-आइनस्टाईन कंडेन्सेशन' आणि त्यावरील नोबेल पुरस्कारप्राप्त संशोधन अतिशय प्रभावीपणे आणि सखोलतेने शिकवू शकतो. सरांनी दिलेली ती ज्ञानाची शिदोरी आजही माझ्या अध्यापनाचा मुख्य आधार आहे.

माझ्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर-मग ती गाईडशिप मिळवणे असो किंवा प्रोफेसर पदाची निवड-सरांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन नेहमीच सोबत राहिले. माझ्या संशोधन मार्गदर्शक प्रवासाची सुरुवात सरांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांनी मला त्यांच्या डीएसटी प्रकल्पात सह-संशोधक म्हणून काम करण्याची संधी दिली, ज्यामुळे माझ्यासाठी 'पीएचडी मार्गदर्शक' होण्याचे दरवाजे उघडले. त्या काळात मी हंगामी नियुक्तीवर असलेने आणि प्रशासनाने घातलेल्या तांत्रिक अटींमुळे मला एका पर्मनंट प्राध्यापकांची सह-मार्गदर्शक म्हणून जोड मिळणे आवश्यक होते. लोखंडे सरांनी मोठ्या मनाने ही जबाबदारी स्वीकारली आणि माझ्या पहिल्या विद्यार्थ्याचे सह-मार्गदर्शक होण्यास संमती दिली. पुढे मी स्वतः पर्मनंट पदावर नियुक्त झाल्यावर ती अट शिथिल झाली आणि मी स्वतंत्रपणे कार्य करू लागलो; मात्र करिअरच्या त्या सुरुवातीच्या वळणावर सरांनी दिलेला विश्वास आणि आधार माझ्यासाठी सर्वात मोलाचा आहे. त्यांच्या या पाठिंब्यामुळेच आजवर २२ विद्यार्थ्यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पीएचडी पूर्ण केली आहे. सहकाऱ्यांशी कसे वागावे आणि विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या किती खोलीपर्यंत न्यावे, हे मी त्यांच्याकडूनच शिकलो.

सरांच्या वक्तशीरपणाबद्दल बोलायचे म्हणजे मेणबत्तीने सूर्याच्या प्रकाशाचे वर्णन करण्यासारखे आहे. सकाळी बरोबर १० वाजता सर विभागात हजर असायचे. घरातून जेवण करूनच येत असल्याने दुपारी जेवायला घरी जाण्याचा किंवा कॅम्पसवर वेळकाढूपणा करण्याचा प्रकार सरांनी कधीच केला नाही. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ते आपल्या केबिनमध्ये कामात मग्न असायचे. लेक्चर असो, पेपर सेटिंग असो किंवा निकाल लावणे-सरांचे प्रत्येक काम घड्याळाच्या काट्यावर चालायचे. आज मी स्वतः प्रोफेसर झाल्यावर सरांसारखे वक्तशीर होण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांच्या पातळीला स्पर्श करणे अद्याप तरी अशक्य वाटते.

एखादा विद्यार्थी किंवा सहकारी चुकला, तर सर त्याला फटकारल्याशिवाय सोडत नसत. त्यांच्या रागाचा पारा प्रचंड चढायचा, पण हा राग क्षणभंगुर असे. चूक लक्षात आणून दिल्यानंतर ते लगेच माफ करायचे आणि थोड्या वेळाने काही विनोदी टिप्पणी करून वातावरण पुन्हा हलकेफुलके करून टाकायचे. त्यांच्या मनात कधीही कोणाबद्दल आकस नसायचा.

सरांकडे पीएचडीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकडून शोधनिबंध लिहून घेण्याचे अजब कसब होते. तो विद्यार्थी किती हुशार आहे यापेक्षा, त्याच्याकडून काम करून घेण्यावर त्यांचा भर असे. विद्यार्थ्याचे संशोधन कार्य दोन वर्षांत पूर्ण व्हावे, यासाठी ते स्वतः जबाबदारी घ्यायचे. केवळ शैक्षणिक मार्गदर्शनच नाही, तर आपल्या प्रोजेक्टमधून फेलोशिप देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी आर्थिक मदतही केली. त्यामुळे संशोधनामध्ये कोणतीही 'चणचण' भासली नाही.

सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले विद्यार्थी आज केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील नामवंत विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सरांनी आपल्या प्रयोगशाळेत पेरलेली 'संशोधन संस्कृती' हे विद्यार्थी आज जगभर एका मशालीप्रमाणे मिरवत आहेत. हीच सरांनी आयुष्यभर कमावलेली खरी पुंजी आहे. त्यांचे विद्यार्थी आज कष्टाने काम करत पुढची पिढी घडवत आहेत.

भौतिकशास्त्र विभागातून पी.एचडी. पूर्ण केलेले १७५ हून अधिक संशोधक आज जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्वल करत आहेत. काहींनी परदेशात आपला ठसा उमटवला, तर काही मायदेशी परतून देशाच्या प्रगतीत हातभार लावत आहेत. यावरूनच सिद्ध होतं की, प्रवाहाची दिशा बदलण्यासाठी सरांनी केलेली ती 'खंबीर सुरुवात' किती मोलाची होती...

सर जेव्हा विभागप्रमुख झाले, तेव्हा विभागातील पाण्याच्या गळतीचा प्रश्न गंभीर होता. त्यासाठी त्यांनी 'भगीरथ' प्रयत्न केले. आज जो तिसरा मजला गळतीमुक्त होऊन लोखंडी शेडने सुरक्षित झाला आहे, त्याचे मूळ सरांच्या प्रयत्नांत आहे. त्यांनी विभागात साचलेली जुनी उपकरणे, रद्दी पेपर्स आणि अडगळ श्रमदानाने काढून टाकली. नियमांचे पालन करून विभाग आणि परिसर नीटनेटका, स्वच्छ आणि 'सकारात्मक वाईब्स' देणारा ठेवला.

विभागाच्या प्रगतीसाठी सरांनी घेतलेला आणखी एक क्रांतीकारी निर्णय म्हणजे 'फिजिक्स इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी सेंटर' (PIFC) ची स्थापना. यूजीसी आणि डीएसटी सारख्या शिखर संस्थांच्या अनुदानातून विभागाला अनेक मोठी आणि अत्याधुनिक उपकरणे प्राप्त झाली होती. मात्र, ही उपकरणे वेगवेगळ्या लॅब्समध्ये विखुरलेली असल्याने त्यांचा सर्वांना समान पद्धतीने वापर करता येत नव्हता.

सरांच्या कल्पनेतून ही सर्व उपकरणे एकाच छताखाली आणली गेली आणि त्यातून 'PIFC' नावाची एक मध्यवर्ती सुविधा लॅब अस्तित्वात आली. या सुविधेमुळे केवळ उपकरणांची निगा राखणे सोपे झाले असे नाही, तर विभागातील संशोधनाला एक नवी गती आणि दिशा मिळाली. या केंद्रामुळे संशोधनासाठी मोठा निधीही उपलब्ध झाला. इतर विभागांसाठी आणि संस्थांसाठी ही लॅब एक 'रोल मॉडेल' ठरली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

सरांनी विकसित केलेली 'थिन फिल्म फिजिक्स'ची सर्व प्रात्यक्षिके आणि उपकरणे आजही एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरत आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी कधीही विद्यापीठातील आपल्या पदाचा किंवा अधिकाराचा हट्ट धरला नाही. निवृत्त झाल्यावर आपला वावर पुढच्या पिढीला अडथळा ठरू नये, हा त्यांचा व्यवहारी आणि प्रगल्भ विचार त्यांच्या थोरवीची साक्ष देतो.

भारतातील 'मटेरिअल सायन्स' क्षेत्रात संशोधन करणाऱ्या आघाडीच्या शास्त्रज्ञांच्या यादीत सी.एन.आर. राव यांच्यानंतर लोखंडे सरांचा बायोडाटा दुसऱ्या क्रमांकावर येतो, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. विज्ञानातील इतके मोठे योगदान, हजारो उद्धरणे आणि शेकडो यशस्वी विद्यार्थी घडवूनही, सरांना एखाद्या विद्यापीठाच्या 'कुलगुरू' पदाचा मान मिळाला नाही, ही खंत मनात कुठेतरी नक्कीच राहते.

पण तटस्थपणे विचार केला तर असे वाटते की, प्रशासकीय कुलगुरू पद आणि जागतिक दर्जाचा संशोधक या दोन भिन्न वाटा आहेत. कुलगुरू पद हे काळाच्या मर्यादेत असते, मात्र सरांनी संशोधनातून निर्माण केलेले साम्राज्य हे चिरंतन आहे. आज ते ज्या उंचीवर विराजमान आहेत, ती उंची कोणत्याही पदापेक्षा कितीतरी मोठी आहे. त्यांनी पदापेक्षा 'ज्ञानाला' प्राधान्य दिले आणि म्हणूनच ते आज जागतिक स्तरावर एक स्वतंत्र ओळख राखून आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील 'वासुद' सारख्या छोट्या खेड्यातून येऊन जागतिक स्तरावरील संशोधक बनण्याचा सरांचा प्रवास थक्क करणारा आहे.  १० वर्षांपूर्वी विद्यापीठातून निवृत्त झाल्यावरही ते थांबले नाहीत; आजही डी.वाय. पाटील विद्यापीठात संशोधन संचालक म्हणून ते कार्यरत आहेत.

सरांनी लावलेली ही ज्ञानाची रोपे आज वटवृक्ष झाली आहेत. ते केवळ शिक्षक नाहीत, तर ते माझे मेंटर, रोल मॉडेल आणि खऱ्या अर्थाने 'दीपस्तंभ' आहेत. आदरणीय सरांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!



***************************************

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...