नम्रता कशी असावी हे जर एखाद्याला बघायचं असेल तर त्यांनी टाकळे सरांच्या व्यक्तिमत्वाकडे बघावं. अतिशय देखणं व्यक्तिमत्व लाभलेले, एक विद्यार्थीप्रिय, निगर्वी आणि आजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे टाकळे सर ! सर म्हणजे भौतिकशास्त्र जगणारा कलाकार शिक्षक ! त्यांना विषयाला वाहून घेतलेल्या दुर्मिळ व्यक्तिमत्वांपैकी एक म्हटलं तर वावगं ठरू नये.
सर मिरजेपासून १० किमी दक्षिणेला असलेल्या म्हैसाळ या गावचे ! त्यांनी आपले प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण कर्मवीर विद्यालय म्हैसाळ, महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर व महाविद्यालयीन शिक्षण न्यू कॉलेज कोल्हापूर येथून पूर्ण केले. १९८७ साली थेरेटिकल फिजिक्स मध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एमएससी पूर्ण केली. त्यांचे वडील महाराष्ट्र पोलिसात अधिकारी होते. त्यांना एक भाऊ आणि विवाहित बहीण आहे. जरी ते म्हैसाळ चे असले तरी ते कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेतील आपल्या मामाच्या घरीच घडले. त्यामुळे त्यांच्या व्यंक्तीमत्वात अस्सल कोल्हापुरी बाज आहे.
सरांनी वैयक्तिक आयुष्यात खूप संघर्ष केला. अस्तित्वाची लढाई जन्मभर लढले. वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. जरी ते शिक्षक सेवेत वेळेत रुजू झाले असले तरी ते कायमस्वरूपी शिक्षक होण्यासाठी खूप अवधी जावा लागला. शिक्षकी सेवेतील ३० वर्षाच्या कालावधीतील बराच काळ त्यांनी हंगामी शिक्षक म्हणून सेवा केली. या दरम्यान त्यांनी हायस्कूल, जुनियर कॉलेज, सीनियर कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणि सरते शेवटी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केलं. शिक्षक म्हणून त्यांनी भोगावती, न्यू कॉलेज कोल्हापूर, बिद्री महाविद्यालय आणि मग शिवाजी विद्यापीठ अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला. यापैकी बराच काळ त्यांनी बिद्री महाविद्यालयात सेवा केली.
आयुष्यात इतक्या अडचणी येऊन देखील ते नाउमेद झाले नाहीत किंवा जीवन प्रवासातील कोणत्याही वळणावर ते भरकटले नाहीत. प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला शांत ठेवून त्यांनी नीतिमूल्य आणि माणुसकी याची कायम जपणूक केली. उलट त्यांनी नाती वाढवून ती कायम जतन केली. हे स्नेहबंध वेळोवेळी फोन, समक्ष भेटी आणि स्वतः चित्रीत करून रंगवलेली भेटकार्ड देऊन चिरतरुण ठेवण्याचे काम त्यांनी केलं. ते स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहेत. कुठलेही प्रशिक्षण न घेता त्यांनी निरीक्षणातून चित्रकला आपली केली. कलेशी निगडित कोणताही कार्यक्रम त्यांनी निष्कारण चुकवल्याचे त्यांनाही आठवत नसेल. यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रयत्नातून माझी मोठी कन्या आत्ता आर्किटेक्चर चे शिक्षण घेत आहे.
२००१ दरम्यान सरांची माझी ओळख झाली. तेव्हा ते सौदागर सरांच्या कडे पीएचडी करत होते. आदरणीय पी एस पाटील सर यांचे वर्गमित्र एवढाच त्यांचा मला परिचय होता. त्यांचं बोलणं अतिशय हळुवार आणि पुणेरी पद्धतीच असल्यामुळे मी सुरुवातीला त्यांच्याशी जपून बोलत असे. त्यानंतर त्यांचा मोकळा ढाकळा आणि विनोदी स्वभाव जाणून त्यांच्याशी सलगी वाढली. मी बराच वेळ कम्प्युटर समोर बसे आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करे. सरांचं पीएचडी काम देखील कम्प्युटर वर असल्यामुळे आमची आणखी ओळख वाढली. त्यांचे स्पेशलायझेशन थेरेटीकल फिजिक्स, म्हणजे फिजिक्स मधील सगळ्यात कठीण विषय. त्यात त्यांची पीएचडी देखील थेरी मध्ये असल्यामुळे त्यांच्याविषयी सुरुवातीपासूनच आदर. पीएचडी चा विद्यार्थी ते विद्यापीठातील शिक्षक या प्रवासाचा मी साक्षीदार आहे पण त्यांच्या वृत्तीमध्ये तसूभरही बदल झालेला मला आढळला नाही.
सर श्रद्धाळू आहेत आणि नित्य पूजा अर्चा अगदी भक्तिभावाने करतात. त्यांनी आध्यात्मिकता मनापासून जोपासली आहे. याविषयी त्यांची स्वतःची मत आहेत. टाकळे सर मला आध्यात्मिक विचारांचे बरेच व्हिडिओ पाठवत असत. मी ते कधीतरी बघत असे. कोरोना काळामध्ये मी जेव्हा क्वारंटाईन होतो तेव्हा त्यांनी पाठवलेले अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांचे मी बरेचशे व्हिडिओ पाहिले आणि त्यांचे विचार आणि भाषण यावर खूप प्रभावीत झालो. त्यानंतर मी सद्गुरूंना अनुकरण करू लागलो ते सरांच्या मार्गदर्शनातून. भौतिकशास्त्रासारखा विषय शिकवत असताना अध्यात्माशी नाळ जोडलेला हा दुर्मिळ शिक्षक आहे.
बोलताना भौतिकशास्त्राची परिभाषा सर सहज वापरतात. उदा. 'तुमची आमची वेव्हफक्शन ओव्हरलैप होतायत म्हणून आपलं जमतं' किंवा 'अमुक एक गोष्ट अशी इव्हॉल्व्ह होते', 'जगताना कमीत कमी फ्रिक्शन व्हावं असं पहावं', 'परटरबेशन फार ठेऊ नयेत' इ. थिअरीचा माणूस उत्तरोत्तर तत्वज्ञानाकडे वळतो असा आपला अनुभव. भौतिकशास्त्रामधील निरीक्षक आणि तत्वज्ञानामधील साक्षीभाव यावर सरांकडून ऐकतांना खूपच नवल वाटतं. सरांकडे दोन्ही गोष्टींची प्रगल्भता आहे आणि ती प्रत्यक्षपणे ते जगतात. एवढं सारं सांगूनही ते त्यांच्या पहाडी शैलीत खळखळून हसत 'सोडून दे फार विचार करु नकोस' असं सहज सांगतात.
त्यांचा सहवास नेहमीच प्रेमळ असतो. त्यांचे सानिध्य नेहमीच खळखळत्या झऱ्यासारखं वाहणारं आहे. त्यात त्यांचे विनोदी चुटके वातावरणातील गंभीरता कधी घालवून टाकतात ते समजत नाही. सर पराकोटीचे प्रामाणिक.. छक्के पंजे त्यांना माहीत नाहीत. त्यांच्या बोलण्यात कुठली गुपित रहस्य नसतात किंवा ते कधी गॉसिप केलेल मला आठवत नाही, अतिशय मोकळ ढाकळ व्यक्तिमत्व आम्ही अनुभवल आहे. ते आमच्या सहकाऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचं कोणाशीही वैर नाही.
कौटुंबिक पार्श्वभूमीवर सुद्धा सरांचं ईतरांशी फार छान जुळतं. त्यांचे स्फूर्तीस्थान त्यांचे मामा कै. उदय पवारसाहेब यांचंदेखील सरांवर पुत्रवत प्रेम होतं आणि त्यांच्या ईच्छेबाहेर सर कधीच वागल्याचं स्मरत नाही. अंथरुणाला खिळलेल्या आईची सुश्रुषा करत ते दैवी काम करत आहेत. त्यांनी आपल्या बंधूना आहे तसा स्वीकारला आहे. सरांच्या अर्धांगिनी सौ. टाकळे वहिनींनी देखील सरांना त्यांच्या जीवन प्रवासात मोलाची साथ हसतमुखाने दिली आहे. त्यांचा उल्लेख करणं अगदी आवश्यकच आहे. सरांबरोबरचं प्रपंचाचं इंटिग्रेशन यशस्वीपणे हाताळण्यात त्यांच महत्वाचं योगदान आहेच.
भौतिकशास्त्र विभागात ज्ञानदानाच्या कार्याव्यतिरिक्त त्यांनी विभागास फार मोलाचे योगदान दिल आहे. इटली येथील थेर्टिकल फिजिक्स च्या इंटरनॅशनल सेंटर मधून विभागास थेरीची कित्येक पुस्तके मिळवून देण्यात त्यांनी स्वतः प्रयत्न केले होते. विभागात आल्यापासून थेरी स्पेशलयझेशन चे ते आधारस्तंभ झाले आहेत. थेरी अर्थात सैद्धांतिक भौतिकशास्त्र हा भौतिकशास्त्राचा कणा मानला जातो. या विषयात मुलांना तयार करणे व या विषयाची गोडी लावणे ही फार मोठी जबाबदारी त्यांनी पेलेली आहे तसेच याच विषयात संशोधन करणारे ते एकमेव आहेत. अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी नॅक चे समन्वयक म्हणून अतिशय प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडली आहे. विभागातील शिक्षक सचिव म्हणून त्यांनी बराच वेळ काम बघितले आहे. आतापर्यंत त्यांचे पन्नास शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी सात विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले आहे. डेन्सिटी फंक्शनल थेरी चा वापर करून भौतिकशास्त्रातील आकडेमोड करण्यासाठी त्यांनी मॅथेमॅटिका तसेच क्वांटम एस्प्रेसो व बुराई या सॉफ्टवेअर चे ज्ञान आत्मसात केले आहे. आधुनिक तंत्रज्ञान शिकताना पेन व पेपरची गोडी मात्र त्यांनी सोडली नाही. अंतरंगात मूळचे कलाकार असल्याने की काय पण त्यांचं बोर्ड रायटिंग म्हणजे "फिजिक्स मधील कलेचा"एक उत्तम नमुनाच. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन विभागाने देखील सेवानिवृत्तीपूर्वीच रिसर्च प्रोफेसर म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.
त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यपैकी एक म्हणजे ते एक आधार देणारे व्यक्तिमत्व आहे, ते आपली चूक प्रामाणिकपणे कबूल करतात, ते लगेच भावनावश होतात त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. मिल्या, मंद्या, पम्या, अन्या आणि सच्या अशी मित्रांना संबोधन वापरून ते कधी दुरवू देत नाहीत. नात्यांची जपणूक त्यांनीच करावी. असे हे उत्कृष्ट व्यक्तिमत्व सेवानिवृत्त होत आहे. नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे ‘सेवानिवृत्तीचा. मी तर म्हणेन यानंतर सरांना चुकल्यासारखं न वाटता अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला असे वाटावे. त्यांनी जे जे ठरवलंय ते सगळं करावं. सरांना जे जे हवे ते सारे मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो ! सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ईश्वराने त्यांना निरोगी दिर्घाआयुष्य प्रदान करावं हीच अपेक्षा.
- केशव राजपुरे