अखेर मनोज राजपुरेने कोरिया गाठलं
दरेवाडी (ता-वाई) येथील एका सर्वसामान्य मजूर शेतकरी
कुटुंबात जन्मलेला मनोज महादेव राजपुरे याचा दरेवाडी ते दक्षिण कोरिया
पर्यंत चा प्रवास तसा अवघड नव्हता परंतु घरची आर्थिक दुर्बलता, गावाकडे
असणारी वैचारिक मागास विचारसरणी याचा विचार केला तर तो
तसा सोपाही नव्हता.
१४ नोव्हेंबर १९९५ रोजी बालदिनी श्री. महादेव बापू राजपुरे
आणि सौ. सुवर्णा राजपुरे यांच्या पोटी जन्मलेले मनोज हे बहिणीनंतरचे दुसरे
अपत्य ! घरची परिस्थिती जेमतेम होती. सुरवातीला त्यांनी काही दिवस
दुसऱ्याच्या ओसरीला संसार थाटला, त्यांनतर वडिलोपार्जित
घर मिळाले. जवळपास १० बाय १० च्या च्या दोन खोल्या; एका मध्ये आज्जी
राहायची दुसऱ्या खोलीत हे चौघेजण!
त्याचे आई-वडील अल्पशिक्षित; जेमतेम ९ वी शिकलेले! कमी
शिक्षणामुळे महादेव यांना नेहमीच कष्टाची कामे करावी लागली. आजोबा बापूराव
यांचा स्वर्गवास महादेव ४ वर्षाचे असतानाच झाला होता. त्यांनतर सर्व
जबाबदारी महादेव यांची आजी श्रीमती बाई बापूराव राजपुरे
यांच्यावर पडली. त्यांनी दुसऱ्याच्या शेतात मोल मजुरी करून पाच ही मुलांचा
सांभाळ केला आणि त्यांना देता येईल तेवढं शिक्षण दिले. महादेव यांना
शिक्षणात आवड नसल्यामुळे त्यांनी १९८५ साली नोकरीसाठी मुंबईचा मार्ग
निवडला. शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना माथाडी म्हणून
अवघड काम करावे लागले. दरम्यान मनोजच्या आई सौ सुवर्णा गावाकडे
दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून मनोज व त्याची बहीण मोनाली यांचा सांभाळ आणि
शिक्षण करत होत्या. त्यांनी १० बाय १० च्या खोलीत राहून २७ वर्ष संसार
केला. महादेव यांना मुंबई मध्ये राहून एवढं अवजड काम करूनही
योग्य मोबदला मिळत नव्हता, म्हणून २००४ साली अखेर त्यांनी मुंबई सोडली. क्षुधाशांती साठी मोलमजुरी करून चरितार्थ चालवला.
मनोजच्या प्राथमिक शिक्षणाची सुरवात जिल्हा परिषद प्राथमिक
शाळेत झाली. त्याने ३ री पर्यंतचे शिक्षण दरेवाडी येथे पूर्ण केले. तो
अभ्यासात नेहमीच चुणूक दाखवत असे, वर्गात नेहमी उत्तम गुण मिळवायचा परंतु
घरची परिस्थिती आणि सभोवातलाचे वातावरण हे शिक्षणासाठी
पोषक नव्हते. अश्या परिस्थितीत हा हुशार मुलगा पुढे शिकणार नाही हे मनोजचे
मावस बंधू इंद्रजीत आणि अभिजित भिलारे यांनी हेरलं आणि त्याला पुढील
शिक्षणासाठी स्वतः च्या गावी दरेखुर्द (ता. जावली) येथे नेले. त्यांची
मावशी सुलावती व काका मोहन भिलारे यांनी त्याच्या
पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली. नंतर ४ थी जि. प. प्रा शाळा दरेखुर्द
येथे पूर्ण करून माध्यमिक शिक्षण जवळच असणाऱ्या रयतच्या न्यू इंग्लिश स्कूल
पवारवाडी या छोट्या शाळेतून (२००६-२०११) एस एस सी मध्ये ८९.८२% गुण मिळवून
पूर्ण केले. गणित हा त्याच्या आवडीचा विषय होता.
१० वी मध्ये बोर्डाच्या परीक्षेत गणित विषयात त्याने १५० पैकी १४४ गुण
मिळवले होते. जेवढा तो शाळेत हुशार होता त्यापेक्षा जास्त आगाऊ पण होता.
एकदा सुट्टीत गपचूप ऊस खायला गेला म्हणून मुख्याध्यापकांनी अख्ख्या
शाळेसमोर त्याला ऊसाने मारले होते याची आठवण अजूनही त्याला
होते.
दहावी मध्ये मिळवलेल्या भरभरून यशानंतर ११ वी सायन्ससाठी
त्यांनी अव्वल असणाऱ्या यशवंतराव चव्हाण इस्टिटयूट सातारा येथे गुणवत्ता
यादीमधून प्रवेश मिळवला. पण तो काळ खरंच कठीण होता शिक्षणाचा खर्च
घरच्यांना झेपणार नाही म्हणून त्याने पुढे बी एस्सी करायचंय
ठरवलं. २०१६ मध्ये त्याने रसायनशास्त्र या विषयात ७७.८२% गुण मिळवून
पदवी व नंतर २०१८ मध्ये ७२.२५% मिळवून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
त्याचे इंजिनीरिंग च स्वप्न अपूर्ण राहिले, सैन्य भरती चे पण
खूप अयशस्वी प्रयत्न झाले होते. घरची जबाबदारी असताना देखील त्यानं असं
ठरवलं की आपण निवडलेल्या क्षेत्रात पी. एचडी. करायची. भारतात हे शिक्षण
उपलब्ध होतं, परंतु परिस्थितीचा विचार करता अजून
४-५ वर्ष शिकणे शक्य नसल्यामुळे त्याने परदेशात शिष्यवृत्तीवर असणाऱ्या
संधींचा शोध घेणे सुरु केले.
दरम्यान त्याने नोकरीला सुरवात केली. त्यावेळी त्याचा पगार
११००० रुपये होता. दोन वर्षांनंतर तुलनेने चांगला पगार असूनही नोकरीत
त्याचे मन रमत नव्हते कारण त्याचा ओढा हा संशोधनकडेच होता. लॉकडाऊनच्या काळात त्याने सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून
परदेशात विविध ठिकाणी पी. एचडी. प्रवेशासाठी अर्ज केले. वायसी चे माजी विद्यार्थी तसेच क्षेत्र माहुलीचे रहिवासी व माझे विद्यापीठातील एम.एस्सी चे विद्यार्थी हर्षराज जाधव तेव्हा दक्षिण कोरिया येथे पीएच डी करत होते. त्यांच्या प्रयत्नांतून १४ जून २०२० ला
प्रोफेसर हर्न किम यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण कोरिया मधील नामांकित
म्योंग्जी विद्यापीठात शिष्यवृत्तीवर पी.एचडी साठी निवड झालेले पत्र त्याला
मिळाले. स्वप्नपूर्तीसाठी त्याने चांगल्या पगाराची नोकरी हसत हसत सोडली.
सर्व तयारी केल्यानंतर तो २६ ऑगस्ट २०२० रोजी दिल्लीमध्ये पोहोचला,
कोरियाला जाण्यासाठी विमान सुटायच्या वेळेच्या ४ तास आधी सर्व भारतीयांना
कोव्हीड १९ च्या साथीमुळे कोरियात येण्यासाठी निर्बंध लावल्याचे कळले आणि विमान
रद्द झाले. हातातोंडाशी आलेला घास गेला, नोकरी नाही व परदेश संधी सुद्धा
हुकली यामुळे हताश मनाने दिल्लीतुन माघारी येताना त्याचे डोळे अश्रूनी भरले
होते. घरी जायची इच्छा नव्हती. तो २ दिवस पुण्यातच राहिला. नंतर
म्योंग्जी विद्यापीठात संपर्क केल्यावर समजलं की ६ महिने जाता
येणार नव्हते.
त्याने तर नोकरी सोडून दिली होती, नवीन घर बांधायचं काम चालू
होतं, पैशाची गरज तर खूपच होती, ६ महिने घरी बसणे शक्य नव्हतं. मग त्याने ६
महिन्यासाठी छोटी-मोठी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. नोकरी मिळाली पण
त्यांचा पगार परवडणारा नव्हता. नंतर सुदैवाने
ग्लेनमार्क लाईफ सायन्स या चांगल्या कंपनी कडून संधी मिळाली. त्याची गरज
ओळखून त्यांनी त्याला मुद्दाम गुजरात मध्ये पाठवलं. गरज असल्यामुळे तोही
तयार झाला. त्या कंपनीने त्याला आधीच्या पगारापेक्षा जास्त पगार दिला.
कसेबसे सहा महिने संपवून विसा वगैरेची प्रक्रिया आटपून
नुकताच १३ फेब्रुवारीला मुंबई-दुबई-सेवूल असा प्रवास करत तो शेवटी १४
फेब्रुवारी २०२१ ला कोरियामध्ये पोहोचला.
त्याच्या या यशामध्ये त्याचे आई-वडील महत्त्वाचे आहेत कारण
त्यांनी त्याला कधीच जबाबदारीचे ओझे दिले नाही. म्हणूनच त्याला अभ्यास करता
आला आणि एवढी वर्षं शिकता आलं. त्याच्या मावशी-काकांनी १४-१५ वर्ष त्याचा
सांभाळ केला त्याला कोणत्याही गोष्टीची कमी
पडू दिली नाही. त्यांनी शैक्षणिक वातावरण तयार करून दिले. मावस भाऊ अभिजित
याने तेव्हा स्वतःच्या कमी पगारातून त्याच्या सर्व गरजा भागवल्या, सख्या
भावाप्रमाणे त्याने लक्ष दिले. त्याची बहीण व दाजींनीही त्याला नेहमी
प्रोत्साहन दिले तसेच लाखमोलाचे संस्कार दिले आणि
प्रत्येक वेळी त्याच्या पाठीशी उभे राहिले.
महाविद्यालयीन काळात त्याला अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन
लाभले. मित्रांची संगतही योग्य मिळाली. त्याचे अनेक वर्गमित्र आयआयएससी,
आयसर, गोवा विद्यापीठ, बिट्स पिलानी अशा नामांकित संशोधन संस्थांमध्ये पी.
एचडी. करत आहेत. तसेच काही वर्गमित्र मोठ्या कंपन्यांमध्ये
कार्यरत आहेत. त्याची व त्याच्या मित्रांची कामगिरी पाहता, शिक्षकांचे
योग्य मार्गदर्शन व कष्टाळू मित्रांची साथ असेल तर आपण काहीही साध्य करू
शकतो हे सिद्ध होते.
ही एका मनोजची गोष्ट नाही, असे अनेक होतकरू मनोज आपल्याला
समाजात दिसतात. अनेकांनी मोठी यशशिखरे गाठल्याचे आपण पाहतो, त्यांचे
सध्याची पदप्रतिष्ठा आपल्याला दिसते पण बहुतेकदा त्यांनी ते मिळवण्यासाठी
केलेल्या संघर्षाकडे लक्ष जात नाही. मोठं
होण्याची स्वप्नं सगळेच बाळगून असतात. पण परिस्थितीनुरूप काहींना
स्वप्नपूर्तीचा खडतर मार्ग सोडवा लागतो. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मणारे
खूप कमी असतात व त्यांना सक्सेस स्टोरीही नसते. ज्यांना शून्यातून स्वतःचं
विश्व निर्माण करायचं असतं त्यांच्या वाटेत अनेक दगड
असतात, अनेकदा त्यांमुळे ठेच लागते. म्हणून त्या दगडांना दोष देण्यात
किंवा त्यांना लाथा घालण्यात काहीही अर्थ नसतो, त्यात आपला वेळ व शक्ति
वाया जाते, आणि वेदनाही होतात. त्याऐवजी ते दगड गोळा करून त्यांच्या
पायऱ्या करणं आपल्याला जमलं पाहिजे. छोट्या लोकांच्या मोठ्या
कामगिरीच्या कथेतून आपण हाच बोध घेतला पाहिजे.
मनोजला आता संशोधन कार्यासाठी हवी तशी जागा मिळाली आहे. तिथं
त्यानं मन लावून करावं, त्याच्या ज्ञानात भर पडावी, तेथून परत येताना
डॉक्टरेट पदवीसोबत मोठा अनुभवही मिळवा. इथे त्याने आयुष्यात आपुलकीची अनेक
नाती जोडली आहेत, त्यांचा तो नेहमीच सन्मानही करतो.
तिथेही त्याने सर्वांना आपलंस करावं. त्याच्या भावी आयुष्यासाठी अनेक
शुभाशीर्वाद.