कोल्हापुरातील अंतराळ संशोधनाचे जनक: डॉ. आर. व्ही. भोंसले
थोर विचारवंत, कुशल संशोधक आणि जेष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ. राजाराम विष्णू भोंसले यांनी दिनांक १४ जून, २०२० रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. १९८९ मध्ये इस्रोची जननी समजल्या जाणाऱ्या अहमदाबाद येथील पीआरएल तथा भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा या संशोधन संस्थेमधून भौतिकशास्त्र विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले होते. भारतातील पहिला रेडिओ टेलिस्कोप बनवणारे डॉ. आर.व्ही. भोंसले हे तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा !कोल्हापूर जिल्यातील कागल तालुक्यातील बस्तवडे या छोट्याश्या खेड्यात दिनांक १२ नोव्हेंबर, १९२८ रोजी डॉ. आर.व्ही. भोंसले सरांचा जन्म झाला. १९५० साली कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून त्यांनी पदार्थविज्ञान या विषयातून बी.एस्सी. हि पदवी पूर्ण केली. जन्मजात प्रतिभासंपन्न असल्यामुळे शिक्षणादरम्यान त्यांना प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगची फ्रीशिप व वसतिगृह प्रवेशही मिळाला. वसतिगृहात असताना त्यांना एक रेडिओ मिळाला आणि त्यांच्या कारकीर्दीस वेगळी दिशा मिळाली. एम.एस्सी. साठी त्यांनी पुणे येथील सर परशुरामभाऊ (एस.पी.) महाविद्यालयात प्रवेश घेतला. तत्पूर्वी त्यांनी रेडिओ कम्युनिकेशनचा डिप्लोमा पूर्ण केला होता. यामुळे त्यांना अवकाश विज्ञान, वायरलेस नेटवर्किंग तसेच उपग्रह संपर्क प्रणाली याबाबत कुतूहल निर्माण झाले होते. १९५४ मध्ये त्यांनी पदार्थविज्ञान विषयात प्राविण्यासह एम.एस्सी. पूर्ण केली. त्यानंतर ते गुजरातमध्ये रेडिओ अभियांत्रिकी विषय शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून रुजू झाले.
नोकरी करत असताना त्यांनी संचालक डॉ. के.आर. रामनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांतून उभारलेल्या अहमदाबाद येथील पीआरएल येथे संशोधन सुरू केले. अवकाश विज्ञान विषयातील रेडिओ लहरींवर आधारित आयनांबरचा अभ्यास त्यांनी पी.एच.डी. दरम्यान केला. त्यावेळी डॉ. के.आर. रामनाथन हे पीआरएल चे संचालक म्हणून काम पाहत होते. पी.एच.डी. दरम्यान डॉ. भोसले यांनी एकूण सात शोधनिबंध आंतरराष्ट्रीय मासिकांत प्रसिद्ध केले त्यापैकी तीन शोधनिबंध (१९७५, १९८६, १९८९) नेचर या जगप्रसिद्ध मासिकांत होते. या संशोधनावर आधारित १९६० मध्ये त्यांना गुजरात विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त झाली. या संशोधनासाठी त्यांनी रेडिओ टेलिस्कोप बनवला होता व त्याच्या निरीक्षणांच्या नोंदीवर त्यांनी संशोधन केले. हा भारतातील पहिला रेडिओ टेलिस्कोप ठरला व तो बनवणारे डॉ. भोंसले हे भारतातील पहिले रेडिओलॉजिस्ट होते.
हवामान शास्त्रज्ञ डॉ. के.आर. रामनाथन हे नोबेल विजेते सर डॉ. सी.व्ही.रमण यांचे शिष्य होते म्हणजे डॉ. भोंसले हे अप्रत्यक्षपणे रमण यांचे शिष्य होते. पी.एच.डी. मिळाल्यानंतर पोस्ट डॉक्टरेटसाठी ते दोन वर्षांसाठी कॅनडा येथे गेले. कॅनडा व पीआरएल मधील त्यांच्या संशोधनाची दखल घेऊन स्टॅनफोर्ड विद्यापीठात नासा मार्फत संशोधक म्हणून त्यांची तीन वर्षांसाठी निवड झाली. ते आपल्या कुटुंबासोबत माउंटन व्ह्यू या शहरात राहत होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्यांनी उपग्रहांच्या सहाय्याने पृथ्वीच्या आयनांबर (आयनोस्फीअर) या थराचा तसेच सूर्याप्रमाणे गुरु या ग्रहाकडून येणाऱ्या लहरींचा अभ्यास केला. त्यांच्या कामाची दखल म्हणून डॉ. साराभाई यांनी त्यांना तिथले संशोधन संपल्यावर पीआरएल ला रुजू होण्याचे निमंत्रण दिले. १९७३ ला डॉ. भोंसले हे पीआरएल मध्ये वैज्ञानिक म्हणून रुजू झाले. कॅनडा व अमेरिकेत उच्च दर्जाचे संशोधन केल्यावर पीआरएल मध्ये नेमणूक होणे हा त्यांच्यासाठी मोठा सन्मान होता.
पीआरएल मध्ये त्यांनी ग्रह व तारे यांचा अभ्यास करणारे संशोधक यांना एकत्र करून अवकाश संशोधकांचा एक चमू तयार केला. पीआरएल ने गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर माउंट अबू या थंड हवेच्या ठिकाणी प्रस्तावित अवकाश वेधशाळेसाठी ३० एकर जागा घेतली होती. डॉ. भोंसले यांनी तिथे अवकाश संशोधन प्रयोगशाळा उभारली आणि देशातील पहिलीवहिली रेडिओ दुर्बीण प्रस्थापित केली. या माध्यमातून सूर्याची नियमित निरीक्षणे, सूर्यावरील डाग, सौर वादळे यांची निरीक्षणे नोंदवणे शक्य झाले. याशिवाय आकाशगंगेतील अनेक ताऱ्यांचा व सूर्यमालेतील ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी या दुर्बिणीचा वापर झाला. या रेडिओ दुर्बिणी साठी डॉ. भोंसले यांना इंडो-यूएस प्रकल्पातून निधी मिळाला होता. डॉ. भोंसले यांनी १५ वर्षे या प्रकल्पावर काम केले आणि देशाच्या अंतराळ कार्यक्रमात महत्वपुर्ण योगदान दिले. त्यांनी रेडिओ खगोलशास्त्र संशोधनाचे बीज भारतात रोवले व १९८९ मध्ये ते पीआरएल मधून निवृत्त झाले.
पीआरएल मधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपली जन्मभूमी कोल्हापूर येथे स्थायिक होण्याचे ठरवले. खरंतर त्यांच्या सहकारी मित्रांनी त्यांना पुण्यात स्थायिक होण्याचा आग्रह धरला होता परंतु डॉ. भोंसले यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामार्फत पन्हाळा येथे माउंट अबू प्रमाणे अवकाश वेधशाळा स्थापन करायची होती. तत्कालीन कुलगुरू डॉ. के.बी. पवार यांनी डॉ. भोंसले यांची विद्यापीठात अवकाश संशोधन सुरु करण्याच्या हेतूने पदार्थविज्ञान अधीविभागात मानद प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. सरांच्या दूरदृष्टीतून १९९० पासून अधीविभागात अवकाश विज्ञान हे नवे विशेषीकरण सुरु झाले व अविरतपणे सुरु आहे. आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी अवकाश विज्ञान विषयात पदव्युत्तर व ११ हुन अधिक विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. पदवी संपादन केलेली असून आजही बरेच विद्यार्थी अवकाश संशोधनाचे काम करीत आहेत.
डॉ. भोंसले यांनी विद्यापीठाला पन्हाळा येथे संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी विनवणी केली होती कारण कोल्हापुरातून दिसणारे ग्रह किंवा तारे पन्हाळ्यावरून सहापटीने अधिक चांगले दिसतात. तब्बल २० वर्षांनंतर शासनाने पन्हाळगडावर शिवाजी विद्यापीठाला अवकाश संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी एक एकर जमीन दिली. हि जागा मिळवण्यासाठी डॉ. भोंसले यांनी शासन दरबारी खूप प्रयन्त केले आहेत. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच ही जागा मिळाली आहे हे सर्वश्रुत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) ने भारतीय क्षेत्रीय नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (आयआरएनएसएस) रिसीव्हर पन्हाळा येथील विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये प्रस्थापित केला आहे. आयनोस्फीअर आणि तिची गतिशीलता परीक्षण करून त्याचा अभ्यास करणे हा उद्देश आहे. राष्ट्रीय अभियानात भाग घेत देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मिशनमध्ये विद्यापीठ योगदान देत आहे.
अवकाशविज्ञानाविषयी माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी कोल्हापूर विभागातील अनेक खगोलप्रेमींना एकत्र केले व शाळा, महाविद्यालये व विविध संस्था येथे जाऊन ग्रह, तारे, सूर्य, आकाशगंगा, उल्का वर्षाव यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच रात्रीचे अवकाश निरीक्षणाचे अनेक प्रयोग केले आहेत. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे हे अवकाश संशोधनाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे कारण येथे आययूसीएए व टीआयएफआर च्या माध्यमातून अधिक सक्षम रेडिओ दुर्बिणी बसवण्यात आल्या आहेत तसेच ही केंद्रे सध्या इस्रोच्या सहकार्यातून अवकाश संशोधनात अग्रेसर आहेत. कोल्हापूरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अवकाश संशोधनाचे वेड आहे परंतु त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा तसेच व्यासपीठ येथे नाही हे तेव्हा डॉ. भोंसले यांनी ओळखले होते.
अवकाश संशोधनाची फक्त प्रेरणा देऊन काम चालणार नाही त्यासाठी आवश्यक उपकरणेही कोल्हापूरमध्ये उपलब्ध व्हायला हवीत म्हणून त्यांनी मुंबई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम (आयआयजी) या संस्थेशी शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार घडवून आणून विद्यापीठ परिसरात राजाराम तलावाजवळ वातावरणातील वेगवेगळ्या थरांचा अभ्यास करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानानेयुक्त रडार बसवण्यात आले आहे. अशाप्रकारचे रडार देशात कोल्हापूर आणि दक्षिण तामिळनाडूतील तिरुनेलवेली या दोनच ठिकाणी आहेत. रडार सोबत आणखीन चार उपकरणे या केंद्रामध्ये बसवण्यात आलेली आहेत. याचा सर्वात जास्त फायदा पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना होत असतो. याशिवाय डॉ. भोंसले यांनी पीआरएल मधून आणलेल्या काही रेडिओ दुर्बिणी (मोठे डिश अँटेना) भौतिकशात्र विभागाच्या टेरसवर लावल्या होत्या. यावरील निरीक्षणावरून काही प्रयोग आयोजित केले गेले होते. निवृत्तीनंतर डॉ. भोंसले यांनी कोल्हापूरच्या अवकाश संशोधनाच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. यासाठी पन्हाळ्यावरील अवकाश संशोधन केंद्राच्या भविष्यातील योजना आराखडा त्यांनी दिला असून त्यामुळे अवकाश संशोधन योगदानासाठी शिवाजी विद्यापीठाला जगाभरात मान्यता मिळणार आहे. याशिवाय शिवाजी विद्यापीठाचे नाव इस्रो व नासा यांच्याबरोबर जोडले गेले आहे.
इस्रो मध्ये नोकरी करत असल्यामुळे डॉ. भोंसले यांना डॉ. विक्रम साराभाई, डॉ. रामनाथन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. यू. आर. राव, डॉ. कस्तुरीरंजन, डॉ. गोवारीकर, डॉ. चिटणीस, डॉ. प्रमोद काळे अशा अनेक प्रख्यात खगोल शास्त्रज्ञांबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. निवृत्तीनंतरही त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या हेतूने त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस.सी.) ही मानाची पदवी २०१५ मध्ये बहाल केली होती. कोल्हापूर महानगरपालिकेने डॉ. भोंसलेना २००३ चा कोल्हापूर भूषण हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. ते महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्स व इंडियन अकादमी ऑफ सायन्स चे फेलो होते. फेब्रुवारी २०२० मध्ये संजय घोडावत विद्यापीठाने डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्नेह धाम आश्रमामध्ये डॉ. भोंसले यांचा सन्मान शिवाजी विद्यापीठाचे विद्यमान प्रकुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थतीत केला होता. डॉ. भोंसले यांच्या जीवन प्रवासातील हा अखेरचा सत्कार ठरला.
उत्तम व्यक्तिमत्त्व लाभलेले डॉ भोसले शेवटपर्यंत तंदुरुस्त होते. हसतमुख आणि विनोदबुद्धी जपलेल्या या कोल्हापूरच्या सुपुत्राने नेहमी विज्ञान प्रसार व प्रचाराच्या माध्यमातून तरुण पिढी घडवण्याचा ध्यास जपला होता. सर्वांसाठी ते एक प्रेमळ मित्र, प्रज्ञावंत मार्गदर्शक आणि सज्जन तत्वज्ञ होते. दर्जेदार शिक्षण तळागाळापर्यंत पोचले पाहिजे हीच त्यांची कायम धारणा होती. आज डॉ. आर. व्ही. भोंसले आपल्यात नाहीत परंतु त्यांनी लावलेल्या अवकाश संशोधनाचे रोपटे लवकरच वटवृक्षात रुपांतरीत होईल यात तिळमात्र शंका नाही. आज प्रथम पुण्यस्मरण दिनी त्यांच्या जीवन प्रवासाचा घेतलेला आढावा हीच त्यांच्यासाठी आदरांजली.
शब्दांकन:- डॉ. दादा नाडे, प्राध्यापक डॉ केशव राजपुरे