तिरंदाज सूरज झाला पोलीस अधिकारी
नुकतीच राष्ट्रीय तिरंदाज तसेच अनपटवाडी गावाचे तरुण आणि उमदे व्यक्तिमत्व श्री सुरज सुनील अनपट याची महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबातील प्रतिकूल परिस्थितीत कारकीर्द घडवायच्या मार्गावर असणाऱ्या प्रतिभेसाठी त्याचे हे यश खरोखर प्रेरणादायी आहे. माझ्या मागील ब्लॉगमध्ये आम्ही त्याच्या तिरंदाजी खेळातील रुची आणि नैपुण्याबद्दल लिहिले आहेच. स्पर्धा परीक्षेतील त्याच्या यशाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी तसेच तरुणांना प्रेरित करण्यासाठी हा ब्लॉग लिहित आहे.
सुरुवातीपासूनच अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेचा असल्याने सुरज प्रतीभेच्या जोरावर या स्पर्धेच्या युगात कायम सर्वोच्च स्थानी राहिला आहे. तिरंदाजी अर्थात धनुर्विद्या हा छंद जोपासत यात उत्कृष्टता मिळवायची तसेच कुटुंबाचे, पंचक्रोशीचे, राज्याचे व पर्यायाने देशाचे नाव मोठे करायचे हे त्याने बाळगलेले सर्वकालीन स्वप्न ! कुटुंबियांकडून याबाबत पूर्ण पाठींबा असल्याने त्याने इतर कुठल्याही क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला नाही. परंतु त्याची आर्थिक परिस्थिती त्याच्या या स्वप्नाचा पाठपुरावा करण्याइतपत मजबूत नसल्याने प्रथमतः त्याने नोकरीत स्थिरस्थावर होऊन कुटुंबाचा आर्थिक बोजा उचलावा असा विचार केला. हल्ली बहुजन समाजातील तरुणांना सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे आणि मिळालीच तर क्षुधाशाती पुरते पैसे मिळतात. त्यामुळे नोकरी करायची आणि आपला छंद देखील जोपासायचा या दुहेरी हेतुतून त्याने आपली कारकीर्द घडवायची हे मनात पक्क केलं होतं.
देशाच्या सैन्य, रेल्वे आणि पोलिस सेवांमध्ये क्रिडा कोटा आहे ज्यायोगे खेळाडूंसाठी काही जागा राखीव असतात हे त्यास समजले. सुदैवाने तो पारंगत असलेला आणि त्याचे स्वप्न पाहिलेला तिरंदाजी हा खेळ क्रिडा कोट्याच्या यादीत असल्याने त्याने स्पर्धा परीक्षांमार्फत पोलीस दलात अधिकारी होण्याचा निर्धार केला. शालांत शिक्षणादरम्यान राष्ट्रीय स्तरावरील पदके मिळवली असल्याने तो यांस पूर्णतः पात्र होता. नोकरी करत असताना क्रीडा स्पर्धेत भाग घेत तो आपली क्रीडाभावना जागृत ठेवू शकतो हे त्याच्या लक्षात आले. यासाठी त्याला कठोर परिश्रम घ्यावे लागणार होते पण यामुळे त्याचे धनुर्विद्येमध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्याचे दीर्घकाळचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार होती.
एप्रिल २०१८ मध्ये पदवीची अंतिम परीक्षा दिल्यानंतर त्याने महाराष्ट्र पोलीस सेवेच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले. इतरांप्रमाणे तोदेखील या स्पर्धा परीक्षा पद्धतीला पूर्णपणे नवखा होता. त्याला तयारीचा प्रारंभ बिंदू माहित नव्हता. इतरांप्रमाणे त्यालाही तयारीसाठी पुस्तके आणि विषय निश्चित करायचे होते. हा निर्णय घेताना सीए विजय अनपट हीदेखील त्याच्यामागे प्रेरणादायी शक्ती होती. दरम्यान वाई येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या महेश थोरवे या मित्राचे त्यास याबाबत मार्गदर्शन लाभले आणि अशा रितीने त्याच्या अभ्यासास सुरुवात झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी शासनाच्या पीएसआय/ एसटीआय/ एएसओ या अराजपत्रित वर्ग दोन च्या पदांसाठी परीक्षा आयोजित करते. यांतील पीएसआय अर्थात पोलीस उपनिरीक्षक या पदासाठीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. त्यात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची पूर्व तसेच मुख्य लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी तसेच मुलाखत यांचा समावेश असतो. मुख्य परीक्षेसाठी सामान्य विज्ञाना व्यतिरिक्त स्वतंत्र विषय निवडावा लागतो.
कॉलेजमध्ये असताना धनुर्विद्येस वाहून घेतले असल्यामुळे त्याला परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता. अशा प्रकारे त्याने फक्त परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान भागाचा अभ्यास केला होता. या कारणास्तव स्पर्धा परीक्षेसाठी त्यास शून्यातून सुरुवात करावी लागणार होती. त्याने आवश्यक शालेय पुस्तकांचा संदर्भ घ्यावयाचे ठरवले. यात सहावी ते दहावी पर्यंतच्या इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राच्या शालेय क्रमिक पुस्तकांचा अभ्यास केला. बारावीपर्यंत तो विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता त्यामुळे त्याला विज्ञान आणि गणिताचा फारसा अभ्यास करावा लागला नाही. पण अर्थशास्त्र हा संकल्पना तर कायदा हा न्यायविषयक विषय असल्याने यांच्या अभ्यासासाठी काही काळ त्याला खासगी शिकवणी लावावी लागली.
तो पुण्यात वसतिगृहात राहत असल्याने घरच्या आरामदायी गोष्टींपासून दूर होता. तसेच स्वतःला सोशल मीडियापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. या काळात तो निश्चयवादी होता. त्याने एक वर्षभर दिवसातून सुमारे बारा तास सततचा आणि परिश्रमपूर्वक अभ्यास केला. त्यामुळे वर्षभराच्या कठोर मेहनतीनंतर तो पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला. साधारणपणे पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा यशस्वी झालेले विद्यार्थी अत्यल्प असतात. पण सुरज त्याच्या अंगभूत प्रतिभा, खेळाच्या भावनेतून मिळालेली शिस्त आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने हे करू शकला अशी माझी धारणा आहे. यशाने हुरळून तर अपयशाने खचून जाणारा तो विद्यार्थी नाही. परीक्षा निकालास स्वीकारताना त्याच्याकडे विविध पर्याय उपलब्ध असत. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेचे आव्हान त्याला पेलायचे होते. पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला होता. त्यामुळे जोमाने तो मुख्य परीक्षेची तयारी करू लागला.
मुख्य परीक्षा ही एकूण ४०० गुणांची व दोन पेपर्सची होते. त्यात मराठी, इंग्रजी व सामान्यज्ञान हा पहिला पेपर आणि सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्त्यव्यासाठी आवश्यक ज्ञान हा दुसरा स्वतंत्र पेपर असतो. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी त्यास मुलभूतरित्या "कायदा" हा स्वतंत्र विषय होता. यासाठी त्याने खाजगी शिकवणी लावली होती मात्र भाषा विषयाचा त्याने स्वतः अभ्यास केला होता. सूरजला इतका आत्मविश्वास असे की तो पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षा नक्की उत्तीर्ण होईल असे त्याला निकाल जाहीर होण्यापूर्वीच माहित होते. आणि झालंही तसंच ! तो मुख्य परीक्षा देखील उत्तीर्ण झाला. मुख्य परीक्षा हा या परीक्षेतील महत्त्वाचा टप्पा असल्याने निकाल जाणून त्याला खूप आनंद झाला. क्रीडापटू असल्याने उरलेल्या तिसऱ्या टप्प्यात शारिरीक चाचणीतून जाणे ही त्याच्यासाठी केवळ औपचारिकता होती असे त्याला वाटले.
पीएसआय पदासाठी २०० गुणांची मुख्य, १०० गुणांची शारीरिक चाचणी आणि ४० गुणांची मुलाखत अशी एकूण ३४० गुणांची विभागणी असते. शारीरिक चाचणीत उमेदवाराचे गोळाफेक, पुल अप्स, लांब उडी तसेच धावणे यातील कामगिरीवर एकूण १०० पैकी गुण दिले जातात. मुलाखतीस पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० गुण मिळविणे आवश्यक असते. जरी सूरजने जुलै २०१९ मध्ये पीएसआय मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी, शारिरीक चाचणी आणि मुलाखतीसाठी डिसेंबर २०२१ उजाडला होता. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया स्थगित होती आणि परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी अडीच वर्षे लागली.
कडक लॉकडाऊन असतानाही सूरजने शारिरीक चाचणीसाठी धावण्याचा महत्वाचा सराव सुरू ठेवला होता. या चाचणीसाठी व्यायाम करून त्याने जवळपास ११ किलो वजन कमी केले होते. कोल्हापुर जिल्हा पोलिस मुख्यालयात १ डिसेंबर २०२१ ही त्याची शारीरिक चाचणीची तारीख ठरली. त्याने मोठ्या जिद्दीने शारीरिक चाचणी दिली. सर्व चाचण्या निर्धारित निकषात पूर्ण केल्या. शारीरिक चाचण्यांमध्ये त्याला ९३ गुण मिळाल्यामुळे तो मुलाखतीसाठी पात्र ठरला. मोठ्या जिद्दीने मुलाखतीला तोंड दिले आणि सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत ४० पैकी सर्वोच्च २६ गुण प्राप्त केले. शेवटी ८ मार्च २०२२ रोजी त्याची पीएसआय पदावर निवड झाल्याचे पत्र प्राप्त झाले आणि सरकारी नोकरी मिळाल्याने केलेल्या कष्टाचे चीज झाले.
अशा पद्धतीने अथक परिश्रमाच्या जोरावर सुरज ने यशश्री खेचून आणली आहे. पीएसआय पदी निवड झाल्यानंतर सुरजला एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिकमध्ये रुजू व्हावे लागेल. पुढे शारीरिक आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला एक वर्षाच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी कोणत्यातरी जिल्ह्यात पाठवले जाईल व नंतर समाधानकारक कामगिरीनंतर तो नियमित पीएसआय म्हणून रुजू होईल.
अनपटवाडी गाव हे एकी आणि विविध क्षेत्रांतील कारकीर्दीतील विविधतेसाठी ओळखले जाते. गावातील लहान सान यशाचे कौतुक तसेच सन्मान केला जातो तर पुढील वाटचालीसाठी नेहमी प्रोत्साहित केलं जातं. धनुर्विद्येमधील यशाच्या विविध टप्प्यांवर गावकऱ्यांकडून मिळालेले प्रोत्साहन आणि कौतुक यामुळे आत्मविश्वास वाढण्यास खूप मदत झाली असे त्याला वाटते. कोरोना लॉकडाउन दरम्यान गावकऱ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर यशस्वी व्यक्तिमत्त्व आणि पंचक्रोशीतील देवस्थानं या विषयी केलेल्या लिखानामुळे इथली माती वेगळ्या दृष्टिकोनातून जाणून घेण्यास मदत झाली असे तो सांगतो. ज्याचा मुलाखतीदरम्यान आत्मविश्वासाने उत्तरे देण्यास खूपच उपयोग झाला अशी सूरज ची धारणा आहे.
अनपटवाडी सारख्या छोट्याश्या खेड्यातून स्पर्धा परीक्षा मार्फत स्पोर्ट कोट्यातून पोलीस उपनिरीक्षक होण्याचा प्रथम बहुमान सुरज ला जातो. सुरजने खेड्यातील जीवन जवळून अनुभवले आहेत. प्रतिकूल पार्श्वभूमीवर निव्वळ वडिलांच्या दांडग्या इछाशक्तीच्या आणि स्वतःतील हिमतीच्या जोरावर तो आज पोलीस अधिकारी झाला आहे. या नोकरीच्या माध्यमातून त्याने लहानपणापासून जोपासलेला तिरंदाजीचा छंद जोपासत त्यात उत्कृष्टता मिळवण्याची त्याला संधी प्राप्त झाली आहे. सूरजच्या या यशामुळे ग्रामीण पार्श्वभूमीतील तरुण प्रतिभांच्या मनामध्ये "हे शक्य असल्याचा" विश्वास निर्माण झाला आहे.
प्रत्येक तरुणामध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी ती जपावी, अशी सूरजची इच्छा आहे. तरुण वयातील व्यायाम आणि खेळ ही तुमच्या भावी आयुष्याची गुंतवणूक असते, असे त्यास वाटते. खेळामुळे जीवन संतुलित आणि शिस्तबद्धपणे जगण्यास मदत होते. चयापचय सुधारुण आपणास निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी खेळाची मदत होते. जर आपण खेळाची भावना सतत जपली तर हा छंद तुमची कारकीर्द घडवण्यास मदत करू शकतो हे त्याच्या यशाने सिद्ध झाले आहे.
चिकाटी आणि निर्धाराने मिळवलेल्या या यशाबद्दल सूरजचे हार्दिक अभिनंदन आणि त्याच्या भावी कारकिर्दीसाठी सहृदय शुभेच्छा. याद्वारे आपल्या ध्येयाचा पाठलाग करत जोपासलेल्या छंदाचे अनुसरण करण्याची तसेच मानवजातीची सेवा करण्याची नामी संधी सूरज ला प्राप्त झाली आहे. सुरजने अवलंबलेला यशाचा मार्ग इतरांना प्रेरणास्रोत तर होणार आहेच पण त्याचे मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अडीअडचणीवर मात करून शासकीय सेवेत नोकरी मिळवण्यात नक्कीच उपयोगी पडेल.
- डॉ केशव यशवंत राजपूरे