काही गोष्टी तुमच्या हातात नसतात तर काही गोष्टी कधीकधी तुमच्या इच्छेप्रमाणे घडत नाहीत.
काल भारताने जिंकायला हवे होते असे बहुतेक भारतीयांना वाटते, पण दुर्दैवाने आपण जिंकू शकलो नाही. विजेतेपद आपल्या नशिबी नव्हते असे मात्र काही नाही ! नाणेफेक, खेळपट्टीचे दुहेरी स्वरूप आणि भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेचा फायदा उठवत, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जिगर आणि संयमाने आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली आणि भारताला भारतात चारीमुंड्या चित करत सहावे विजेतेपद पटकावले.
कोणताही खेळ म्हटलं की हार-जीत आलीच. खेळामध्ये एखाद्या दिवशी एखाद्या दुबळ्या संघाला लॉटरी लागू शकते तर एखाद्या दिवशी बलवान संघास पायधुळ चारली जाऊ शकते. आणि दोन्ही संघ जर तुल्यबळ असतील तर मात्र आपण भाकीत करू शकत नाही. वस्तुतः दोन पैकी एकच संघ जिंकणार असतो आणि दुसऱ्याला पराभव पचवावा लागतो. काल ऑस्ट्रेलियाने सरस खेळ केला तर भारताने नांगी टाकली, त्यामुळे ऑस्ट्रेलिया हा उत्तम संघ जिंकला. एक मात्र नक्की की, भारताच्या पराभवामुळे संघाची गुणवत्ता, त्यांनी मिळवलेले यश आणि त्यांनी निर्माण केलेला दबदबा कमी होणार नाही.
पण कालच्या सामन्यामधील भारताच्या पराभवाची थोडीशी कारण मीमांसा करायची म्हटले तर या पराभवास सर्वस्वी भारतीय क्रिकेट धोरण जबाबदार असल्याचे दिसते. ऑस्ट्रेलिया संघा मधले एक-दोन खेळाडू सोडले तर सर्वच्या सर्व खेळाडू गेले कित्येक वर्षे आयपीएलमध्ये खेळत आहेत. त्यांना भारतीय खेळाडूंच्या खेळाची सर्व माहिती आहे. आयपीएल दरम्यान, प्रशिक्षकांनी विशिष्ट फलंदाजाला गोलंदाजी कशी करावी, दबावाच्या परिस्थितीत भारतीय गोलंदाजी, विशेषत: फिरकीपटूंना कसे हाताळायचे याचे प्रशिक्षण दिले होते तसेच काही क्लुप्त्या दिल्या आहेत कि जे काल कामी आले. इथले वातावरण, खेळपट्ट्या, प्रेक्षकांचा पाठिंबा हे त्यांच्यासाठी नवखे नाही. त्यामुळे जणूकाही ते घरच्या मैदानावरच खेळत आहेत अशा भावनेने मैदानावर उतरले होते. त्यामुळे आत्मविश्वासाची त्यांच्यात कमतरता नव्हतीच.
तसं बघितलं तर ऑस्ट्रेलियन खेळाडू हे नेहमीच अतिशय गुणवत्ताधारी, चिवट आणि लढवय्या वृत्तीचे असतात, हे दुसरे कारण. त्यामुळे या संघात गुणवत्तेची कमी नव्हती. सामन्यामध्ये नाणेफेकीला महत्त्व नसलं तरी हल्ली भारतात खेळल्या जाणाऱ्या दिवस-रात्र सामन्यात दवाच्या प्रभावामुळे आणि प्रकाशझोतात दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकण्याची शक्यता जास्त दिसून आली आहे. विशेषतः आयपीएल मध्ये हे प्रकर्षाने जाणवले आहे. दोन दशकांपूर्वीचे भारतातील सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत खेळवले गेलेले एकदिवसीय सामने आठवले तर, खेळपट्ट्या सामन्याच्या उत्तरार्धात गोलंदाजांना, विशेषतः फिरकीपटूंना अनुकूल होत. पण आजकाल स्पोर्टिंग विकेट्स तयार केल्या जात असल्याने खेळपट्ट्या सामना संपेपर्यंत तशाच राहतात. याचा अर्थ अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती आणि खेळाच्या उत्तरार्धात तिचा रंग बदलणार नव्हता यात शंका नाही.
पण जेव्हा सामना दिवस-रात्रीच्या स्वरूपाचा असतो, तेव्हा असे दिसून आले आहे की रात्री काही काळानंतर, वातावरणातील तापमान आणि थंडगार हवेच्या प्रवाहामुळे खेळपट्टी वेगवान होते आणि फलंदाजीला अधिक पोषक बनते. हे जाणून त्यांच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणे पसंत केले. कारण त्याला माहित होते की ही दुहेरी रूपाची खेळपट्टी आपल्या गोलंदाजांना मदत करणार आहे आणि उत्तरार्धात पडणारे दव फलंदाजी करताना त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. दुर्दैवाने दव आल्याने खेळपट्टीचे दुहेरी स्वरूप गुप्त झाले, सिमेंटची खेळपट्टी झाल्यागत जाणवू लागली आणि ती फलंदाजीचे नंदनवन झाले.
अत्यंत ताज्या आणि वेगवान खेळपट्ट्यांवर भारताने प्रथम किंवा नंतर फलंदाजी करत सर्व दहा सामने जिंकले होते. अशा खेळपट्ट्यांसाठी भारताकडे उत्कृष्ट गोलंदाज होते आणि भारतीय फलंदाजही अशा खेळपट्ट्यांवर धावा काढत होते. पण अंतिम सामन्यासाठी कदाचित विचार गटास प्रतिस्पर्धी आणि भारतीय संघासाठी कठीण आणि वेगळी खेळपट्टी हवी होती, खरं तर ही संथ आणि निस्तेज खेळपट्टी आयसीसीलाही नको होती. पण विचार गटाने आपल्याच संघावर जुगार खेळला आणि हरला. पण विचार गटाच्या या जुगाराचा फायदा भारताला नाही तर ऑस्ट्रेलियाला झाला! कदाचित इतर खेळपट्ट्यांप्रमाणे ही खेळपट्टीही वेगवान असती आणि भारताने प्रथम फलंदाजी करून इतर सामान्यांप्रमाणे धावा चोपल्या असत्याच. किमान, सामना एकतर्फी तरी झाला नसता.
जगज्जेता आणि भारतीय संघ यांच्यातील आणखी एक फरक म्हणजे- खेळाडू आणि क्रिकेट मंडळाने स्पर्धा खेळण्याच्या निवडीला दिलेले प्राधान्य ! जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि विश्वकपच्या तयारीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी आयपीएल किंवा तत्सम स्पर्धा खेळणे टाळले होते. 'आधी देश मग पैसा' हे त्यांचे धोरण. याउलट आपल्या खेळाडूंवर खेळण्याचे दडपण आणि ताण प्रचंड असते आणि बोर्ड त्यांच्या वोर्कलोडकडे आवश्यक लक्ष देत नाही असे दिसते. ऑस्ट्रेलियन संघ या स्पर्धेत प्रबळ दावेदार नव्हता तरी बाद फेरीत त्यांनी मोक्याच्या क्षणी इर्षेने खेळ उंचावत विजयाची संधी सोडली नाही.
मान्य आहे, शेवटी आम्हाला असे वाटते की शुभमन आणि श्रेयस ने स्थिर खेळ करायला हवा होता, रोहितने चांगली सुरुवात करूनही चेंडू हवेत मारायला नको होता, राहुल-विराटला धावगती आणि धावसंख्या वाढवता आली असती, सूर्यकुमारचे हुकमी फटके बसायला हवे होते आणि महत्वाचे म्हणजे गोलंदाजांनी त्यांची गेल्या दहा सामन्यातील घातकता सिद्ध करायला हवी होती. पण सामन्यांचा निकाल 'जर तर' वर अवलंबून नसतो आणि होऊन गेलेला सामना परत होत नाही. आता होऊन गेलेल्या गोष्टी चघळण्यात काय अर्थ आहे ? भूतकाळ बदलता येतोय का? नाही ना ? मग आता आपल्या हातात उरतो तो भविष्यकाळ ! भविष्यात काय करायला पाहिजे ? झालेल्या चुकातून काय शिकायचे याचा विचार खेळाडू, संघ व्यवस्थापन आणि मंडळ करेल ना. आपण मात्र भविष्यात येऊ घातलेल्या सामन्यांचा आनंद लुटायचा व गुणवत्ता आणि प्रतिभेचे कौतुक करायचे. माणसाने चिकित्सक असावे पण किती ?
आपल्या खेळाडूंनी सामना जिंकण्याचा प्रयत्न केला नाही किंवा ते कमी पडले, मुद्दामून हरले किंवा ऐनवेळी माघार घेतली असा अर्थ होत नाहीच. पण परिस्थितीजन्य वास्तव आपण नजरेआड करता कामा नये. गुणवत्ता, चिकाटी, आयपीएल मधील अनुभव, आत्मविश्वास आणि त्यात खेळपट्टीने केलेली मदत या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा झाला की ऑस्ट्रेलियाने भारताला एकहाती पराभूत केलं.
भारतीय संघाने स्पर्धेत सर्वाधिक ३१६० धावा केल्या, सर्वाधिक १०० बळी घेतले, सात शतकांसह सर्वाधिक २५ अर्धशतके केली, सर्वाधिक फलंदाजीची सरासरी, सर्वाधिक धावा, सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक बळी भारतीय खेळाडूनेच घेतले. आणखी काय हवे ? हताश होऊ नका, या भारतीय संघाचा आनंद साजरा करूया. तो कोणीही आपल्यापासून हिरावू शकत नाही. भारतीय संघावर आमचा सदैव विश्वास आहे.
रोहित आणि मित्रहो, तुम्ही गेल्या दहा सामन्यात दाखवलेली गुणवत्ता आणि चमक आम्हाला खूप सुखावून गेलीय. काल तुम्ही तुमची प्रतिभा सिद्ध करू शकला नाही, एव्हढच.. आयुष्यातील हा दुर्दैवी दिवस लवकरात लवकर विसरा पण पराभव कधीही विसरू नका. तुमची वेळ नक्कीच येईल.
- केशव राजपुरे