नाबाद अर्धशतक
माणूस स्मृती जगतो. गोड स्मृती ताण कमी करण्यास मदत करतात. आपल्या प्रियजणांच्या गतस्मृतींना उजाळा देऊन त्या मनाच्या खोल कप्प्यात साठवत वाढदिवस साजरा करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आज (२० मे २०२१) माझा मित्र संजय पन्नाशीत पदार्पण करत आहे. या निमित्ताने त्याच्याबरोबर घालवलेल्या सुवर्णक्षणांचे स्मरण करीत तसेच त्याचा जीवनप्रवास थोडक्यात आठवत शुभेच्छा देण्याचा हा अल्प प्रयास !
विद्यापीठात एम एस्सी ला असताना माझ्या क्रिकेट प्रेमापायी ग्राउंडवर जाण्याचा योग नेहमीचा.. तिथं सातारच्या एका हरहुन्नरी आणि उत्तम क्रिकेट खेळणाऱ्या संजय दत्तात्रय गोडसे या वर्गमित्राची भेट झाली. दोघांच्याही क्रिकेटवेडामुळे आणि त्याच्या राजस स्वभावामुळे आमची मैत्री व्हायला वेळ लागला नाही. तो नेहमी आपल्या सभोवतालचे वातावरण आनंदमय ठेवी. जणू आनंदमय वातावरणात त्याला डुंबायला आवडे ! त्याची विशिष्ट शैलीदार शब्दफेक ऐकली की राग आलेल्या माणसाच्या पण चेहऱ्यावर नकळत हसू उमटे. त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी आणि बोलण्याची शैली कायम मनाला भावे. त्यामुळे मी त्याच्या चेहऱ्यावर कधीच त्रागा बघितला नाही. कायम तो टवटवीत आणि हसरा चेहरा आमचं मन प्रफुल्लित करत असे. त्यामुुुुळे भाग एक मध्येे जरी आम्ही वेगवेगळ्या वस्तीगृहात राहत असू तरी भाग दोन मध्ये समोरासमोरील रूममध्ये राहत होतो.
त्याचा गॉगल, हाफशर्ट आणि चालण्याची नायकदार विशिष्ट ढब घायल सिनेमामधील सनी देओलच्या मोहक व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देई. तो नेहमीच आनंदजनक मूडमध्ये असे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे क्रिकेटव्यतिरिक्त त्याला गाणं गायची फार आवड .. प्रचंड आत्मविश्वासाने त्याला गाताना मी पाहिले आहे. किशोर कुमारच्या आवाजातील बरीच जुनी गाणी त्याने आमच्यासाठी गायली होती. त्याला अनेक गाणी तोंडपाठ आहेत.. तसेच बऱ्याच गाण्याचे बोल आणि चाली त्याला आठवतात.. वेलकम फंक्शन च्या वेळी त्यानं गायलेले .. है अपना दिल तो आवारा.. अजून स्मृतीत आहे. अद्यापही तो ऑनलाइन कन्सर्ट मध्ये गाणी म्हणतो. त्याची बरीच युगलगीतांचे रेकॉर्डिंग फेसबुक वर आहे.
तो नेहमी आपल्या मर्यादेत राहत असे. कुठलीही गोष्ट करत असताना थोडा विचार करत असे. अभ्यासाची मात्र त्याला थोडी भीती वाटे. आपला अभ्यास पूर्ण कधी होणार याची सतत काळजी.. कोण चुकत असेल तर त्याला सुनवायला तो कमी करायचा नाही. तो अनावश्यक खर्च करत नसे. कुणासोबतही जुळवून घेणार एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणा ना !
त्याचा जन्म झाला तेव्हा त्याचे वडील मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे हायस्कूल शिक्षक म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यांचे कुटुंब त्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील संगोल्या जवळील नाझरे मठ या मूळगावी होतं. शिवलीलामृत लिहिणारे श्रीधर स्वामी यांचे नाझरे हे गाव माणगंगा नदीतीरी ग दि माडगूळकर यांच्या माडगूळ गावापासून पाच किलोमीटरच्या अंतरावर वसलेले आहे. त्याच्या वडिलांना दोन सावत्र, दोन सख्खे भाऊ व पाच बहिणी असा मोठा परिवार ! वडिलोपार्जित भरपूर शेती ... पण दुष्काळी परिस्थिती ... त्यामुळे भावंडांपैकी अगदी कष्टातून नाझरे, आटपाडी, आणि तासगाव येथून पदवीपर्यंत हेच शिकले होते.. त्यांना खूप पराकाष्टेने नोकरी मिळाली होती. एक भाऊ शेती करायचे त्याच्या कुटुंबाची जबाबदारीदेखील तेच उचलत.
तो पाच वर्षाचा असताना काही दिवस वडिलांबरोबर खंडेराजुरी येथे राहायला गेला होता. दिवसभर मुलांबरोबर उन्हात खेळल्यामुळे त्याला रात्री अचानक ताप आला. तसल्या तापातच डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिले आणि दुर्दैवाने त्यादरम्यान त्याच्या पायाची शिर आखडली. आणि ते दुखणं बळावत जात पुढे महिनाभर त्याने जमिनीवर पाय टेकलाच नाही आणि या दुर्दैवी घटनेनंतर एका पायाने तो जन्माचा अपंग झाला. तो जन्मापासून अपंग नव्हता. आपण यास निव्वळ योगायोग मानतो. परंतु लिखित योजना अमलात आणण्याचे नियतीचे स्वतःचे मार्ग असतात हे मात्र खरं..
त्याचे प्राथमिक शिक्षण खंडेराजुरी येथे झाले. पुढे चौथी ते आठवी परत नाझरे या मूळगावी त्यांचा शिक्षण प्रवास झाला. आठवीतील त्याचे गुणपत्रक अजिबात चांगले नव्हते. म्हणून त्याच्या वडिलांनी पुढे त्यांच्या बदली झालेल्या सातारा या ठिकाणी यांना शिक्षणासाठी हलवले. लहान वयात आईपासून दूर राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. तरीपण आपले मूळ गाव सोडल्यानंतर मात्र तो अभ्यासात खूपच सक्रिय झाला होता आणि त्याच्या गुणपत्रकामध्ये गुणांनी वरची झेप घेतली होती. स्वामी विवेकानंद संस्थेच्या भवानी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये त्याचे बारावी सायन्सपर्यंतचे शिक्षण झाले. वडील मुलाला शिक्षणासाठी स्वतःपासून दूर ठेवण्याच्या विरुद्ध होते म्हणून इतरत्र प्रवेश न घेता त्यांनी संजयला लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात बी एस्सी ला प्रवेश घेतला. तिथं सुद्धा त्याने फिजिक्स सारख्या कठीण विषयात डिस्टिंक्शनमध्ये येवून विद्यापीठाच्या परीक्षेत सातारा केंद्रात प्रथम क्रमांक मिळाला होता.
पायांने अपंग असला तरी त्याच्यात इतरांच्यामानाने अधीकचे कौशल्य भरले होते. त्याच्या क्रिकेटकौशल्यद्वारे आणि गायन प्रभुत्वातून ते दिसून येई. इतर मित्रांबरोबर क्रिकेट खेळण्यास तो तितकाच सक्षम होता. क्रिकेट मधील गोलंदाजी, फलंदाजी तसेच यष्टीरक्षणाचे त्याच्याकडे उत्तम कसब होते. महाविद्यालयीन काळात त्यांने अपंगासाठीच्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा जिल्हा तसेच पुणे विभागाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत त्यांने सफाईदार कामगिरी केली होती.
सुट्टीमध्ये त्यांच्या मूळ गावी जाण्याचा योग आल्यानंतर ते लेदर बॉल क्रिकेट खेळायचे. आपल्या दोन भावांसोबत तो तिथल्या क्रिकेट स्पर्धेत खेळत असे. एका स्पर्धेदरम्यान ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते आणि अंतिम सामना सांगोल्याच्या उत्कृष्ट संघाविरुद्ध होता. त्या सामन्यात त्याने सलामीला जात विजय मिळवेपर्यंत टिच्चून फलंदाजी केली होती. गावकऱ्यांनी या विजयाचा आनंद त्या सर्व टीमला खांद्यावर घेऊन गावात मिरवणूक काढत साजरा केला होता. खऱ्या अर्थानं संजय सर्व प्रकारचे क्रिकेटिंग आयुष्य जगला आहे.
पुढे एम एस्सी ला प्रवेश मिळवण्यासाठी त्याने शिवाजी विद्यापीठात अर्ज केला होता परंतु त्याच्या कमी गुणांमुळे त्याला प्रवेश मिळाला नाही. पण अपंग कोट्यातून त्याच्यापेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला आहे हे एका मित्राने त्याच्या लक्षात आणून दिले होते. मग या गोष्टीसाठी संबंधितांना भेटल्यानंतर त्याला अपेक्षित मदत मिळाली नाही. शेवटी अगदी आत्मविश्वासानं त्याने यासंदर्भात कुलगुरू यांच्याकडे दाद मागण्यासाठी त्यांची भेट घेतली. कुलगुरुंनी माहिती घेतली आणि त्याला न्याय मिळवून देत एम एस्सी फिजिक्स ला प्रवेश मिळवून दिला होता. त्याने दाखवलेल्या धाडसाने आणि समयसुचकतेमुळे त्याला उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती.
एमसी भाग दोन मध्ये तो ऊर्जा अभ्यास ह्या स्पेशलायझेशनला गेला, आम्ही मात्र सॉलीड स्टेट फिजिक्स मध्ये... स्पेशलायझेशन वेगळं असलं तरी होस्टेलवर मात्र एकत्र असू. वाढदिवस साजरा करणं आम्ही तिथे शिकलो. आम्ही सर्व मित्रांचे वाढदिवस साजरे केले होते. त्यांच्या स्पेशलायझेशनला ज्यादा संशोधक विद्यार्थी असल्यामुळे त्यांना खूप मार्गदर्शन होई. तिथे प्रोजेक्ट, कॉन्फरन्स, सेमिनार मध्ये सहभागी होता यायच त्यामुळे त्यांचा हेवा वाटे.
आमची मैत्री तेव्हा संशोधन करणाऱ्या आदरणीय शिंदे सरांना देखील माहिती होती त्यामुळे त्यांच्या स्पेशलायझेशन मधील त्याचे तीन मित्र व मी अशी पाच जणांची सरांनी राधानगरी धरण आणि दाजीपूर अभयारण्यात एक दिवसाची निसर्ग पर्यटन सहल काढली होती. तो आमच्यासाठी सुवर्ण दिवस होता. प्रवासात गाणी, भेंड्या, कॅसेट प्लेअर, डान्स, धाब्यावरील जेवण, टेम्पो मधील प्रवास, पाच किलोमीटरचा दाजीपुर ट्रेक हे सगळं संस्मरणीय आहे. मला आठवतेे कोल्हापूर गोवा रस्त्यापासून दूरवर दाट अभयारण्याात बरेच अंतर चालत जाऊन सुद्धा आम्हाला रानगवे दिसले नाहीत. शेवटी अंधार पडू लागल्याने नाईलाजास्तव परत फिरलो होतो. एसटी स्टॅण्डवरील हॉटेलमध्ये आम्ही उशीरा रात्रीचे जेवण घेतले होते. त्यादिवशी दिवसभर कंटाळा आल्यामुळे झोप मात्र गाढ लागल्याच आठवते.
वसतिगृहात असताना संजयचे मामा बऱ्याचदा त्याला भेटायला यायचे. त्यांच्या एक दोन दिवसांच्या मुक्कामात त्यांनी खूप विनोदी किस्से आणि वैयक्तिक जीवनातील काही प्रसंग सांगितले होते. त्यांच्या दिलदार व्यक्तिमत्त्वामुळे व विनोदी स्वभावामुळे आमची चांगली गट्टी जमली होती. पण त्यांना परत भेटण्याचा अजून योग आला नाही. जुने फोटो अल्बम चाळताना फोटो दिसल्यानंतर मात्र त्यांची तीव्र आठवण नक्की येते. त्यानंतर संजय आणि माझी जोडी घट्ट झाली.
एकदा शनिवार-रविवार त्याने मला त्याच्या साताऱ्यातील घरी मुक्कामी न्यायचे ठरवले. मी ही म्हटलं एक दोन दिवस सातारला राहून पुढे माझ्या गावी जावं. तेव्हा बसने कोल्हापूरवरून सातारला जायला अडीच तास लागत पण निव्वळ पैशाची बचत व्हावी म्हणून आम्ही तेव्हा ट्रेनने प्रवास केला होता. दुपारी दोन वाजता निघालेली ट्रेन रात्री नऊला सातारा स्टेशनवर पोहोचली होती. पुढे सातारा स्टॅन्ड अर्ध्या तासाच्या अंतरावर ! खूपच दीर्घ प्रवास होता परंतु तो सोबत असल्यामुळे कंटाळा वाटला नाही. मुळगाव नाझरे तरीपण वडिलांच्या शिक्षकी व्यवसायामुळे तेव्हा त्यांचे कुटुंब सातारा येथे स्थायिक झाले होते. २०११ साली माझ्या आप्पासाहेब बाबर या विद्यार्थ्याच्या लग्नासाठी या गावी पहिल्यांदा जाण्याचा योग आला होता.
एलबीएस महाविद्यालयाच्या शेजारी त्यांचं भाडेतत्त्वावरील छोटंसं बैठं घर होतं. त्याचे वडील तेव्हा एलबीएस ज्युनियर महाविद्यालयात इंग्रजीचे शिक्षक होते. घरी मावशी आणि त्याचे दोन भाऊ विजय आणि अनिल ! बहीण सुषमा हीचा त्यांच्या मामाशीच विवाह झाला होता.. बंधू तेव्हा शिक्षण घेत होते. मावशींनी तेव्हा दिलेला स्नेहमय घरगुती पाहुणचार अजून आठवतोय. तिथे सुद्धा आम्ही क्रिकेट खेळण्याचा योग घडवून आणला होता. त्याचा भाऊ विजय सुद्धा उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. तो वेगवान गोलंदाजी करी. त्या भेटीत संजयने मला सातारा मधील महत्त्वाची ठिकाणे दाखवल्याचे आठवते.
(बंधू विजय: नाझरे ग्रामपंचायत सदस्य)
एम एस्सी नंतर नोकरी शोध न करता त्याने हायस्कुल किंवा जुनियर महाविद्यालयात शिक्षकी नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने सरळ बीएडला प्रवेश घेतला. एका वर्षात बी एड केल्यानंतर सातारा येथे शाहूपुरी माध्यमिक विद्यालयांमध्ये वर्षभर विनापगार नोकरी केली. तीही सुटल्यानंतर पुढे खाजगी शिकवणी घेऊ लागला. नोकरीचा प्रश्न ऐरणीवर होताच त्यात अपंगत्वामुळे त्याला लग्नाला मुली होकार भरत नव्हत्या. १९९९ मध्ये त्याच्या सुदैवाने कोल्हापूर येथील नंदीनी वहिनींनी त्या परिस्थितीतही त्यास स्वीकारून जीवनभर साथ देण्याचा निर्णय घेतला आणि मे महिन्यात त्याचा विवाह पार पडला.
पुढे काही काळ स्वामी संस्थेच्या सुशिलादेवी हायस्कूल तसेच भवानी नाईट हायस्कूलमध्ये त्याने तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी केली. सप्टेंबर २००० मध्ये मात्र त्याची हिंगणेच्या कन्याशाळा सातारा येथे इतर मागास प्रवर्गातून नियमित शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली. तो आपल्या सहकार्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. अद्याप त्याने गाण्याची आणि क्रिकेटची आवड जपली आहे. अलीकडेच त्याची शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.
एम एस्सी झाल्यानंतर त्याला भेटण्याचे क्वचितच प्रसंग आले. त्याची सासुरवाडी कोल्हापूर असल्यामुळे नंतर आमच्या भेटी होऊ लागल्या. मीही कार्यालयीन कामानिमित्त सातारा भेटीत त्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या राहत्या घरी भेट दिल्याचे आठवते. त्याच्या कुटुंबाला भेटलो. त्यांना भेटल्यानंतर आनंद झाला. त्याला ओम आणि भक्ती ही दोन अपत्ये आहेत. ओम अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे तर भक्ती दहावीमध्ये आहे.
"तमसो मा ज्योति र्गमय" या पायावर उभी असलेली आपली संस्कृती त्याच्या कुटुंबाने सकारात्मकता राखत जपली आहे. गेले कित्येक वर्ष अध्यात्माच्या मार्गातून त्याचे कुटुंब ऐश्वर्यमय आनंदी जीवन जगत आहेत. हे त्यांच्या दिनचर्येतून आणि आत्मिक समाधानातून प्रतीत होते. पण मला एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते की अद्यापही त्याने स्वतःतील लहानपण आणि निरागसता जतन केली आहे की जी आनंद साधनेची गुरुकिल्ली आहे..
माझ्या आयुष्यातील एक उत्कृष्ट सहचारी मित्र आज त्याचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त मनात दाटलेल्या आठवणींना वाट मोकळी करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. संजय तुला सुवर्णमहोत्सव वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझं भावी आयुष्य आनंदी, सुखमय आणि निरामय होओ हीच सद्गुरु चरणी प्रार्थना. तुला कीर्तीरूपी अमरत्व लाभो व हा सुवर्णदिन अविस्मरणीय होवो ही सदिच्छा !
- प्राध्यापक डॉ केशव राजपुरे, कोल्हापूर
मोबाईल: ९६०४२५०००६