सामाजिक संवेदनशील व्यक्तिमत्व, अर्थात मांढरे हनुमंत(
एक समाजसेवक घडताना)
किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी !
काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी !
उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात !
अन् लावा ह्रुदयात सख्यांनो आशेची वात !
या काव्यपंक्तींतून कविवर्य कुसुमाग्रजांनी अनेक दर्यावर्दीना वाट दाखवणाऱ्या दीपगृहांचे अत्यंत समर्पक वर्णन केले आहे. मानवाच्या प्रेरणा व धारणा स्पष्ट असायला हव्यात. सभोवतच्या घन अंधःकारातून वाटचाल स्पष्ट असायला हवी. आपले कार्य शाश्वताकडे घेऊन जाणारे हवे. जणू आपले कार्य म्हणजे तिमिरात खोदले जाणारे तेजाचे लेणे असायला हवे. आपले कार्य उद्याच्या पिढीचे दीपगृह बनायला हवे... असे विविधांगी कार्य हाती घेतलेले हे उत्तुंग व्यक्तिमत्व..
ज्यांनी गावात चांगली शैक्षणिक सुरुवात केली, जे चांगल्या आकलन क्षमतेमुळे अभ्यासात उत्तम होते, व्यसनाधीनतेतील छळवणुकीचे बळी पडल्याने ज्यांच्या वाट्याला संघर्षमय शैक्षणिक कारकीर्द आली, ज्यांनी स्वतःच्या पायावर शिक्षण घेतले, असहायतेत सर्व संकटांचा सामना केला, जे पुढे जाऊन एक आदर्श व्यक्तिमत्व बनले, ज्यांनी सामाजिक आणि देशसेवेची प्रेरणा आजोबा कै. सदाशिव मांढरे यांच्याकडून घेतली...
ते सर्वांचे प्रेरणास्थान, एक बहुआयामी व्यक्तिमत्व आणि
समाजकल्याणाच्या उदात्त वेडाने झपाटलेलं चालत बोलत यंत्र म्हणजे सामाजिक संवेदनशील हनुमंत उत्तम मांढरे (दादा). ज्यांच्यामध्ये आपण एक प्रामाणिक, कष्टाळू, प्रतिभावंत, मदतनीस, नीतीवंत, निष्ठावंत, विश्वासार्ह आणि सच्चा देशभक्त अशा व्यक्तीमत्वाचा अनुभव करतो. त्यांचे कार्य शब्दबद्ध करणे फार कठीण आहे, तरीपण त्यांचा जीवनप्रवास आणि व्यक्तिमत्व मांडण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे.
हनुमंत दादा यांचा जन्म १८ डिसेंबर १९७१ ला सासवड तालुक्यातील त्यांच्या दौंडज या आजोळी झाला. त्यांना माधुरी इंदलकर (१९७५) आणि राजू (१९७७) हि दोन भावंडे. तेव्हा त्यांचे कुटुंब मुंबईत होते. त्यांचे वडील उत्तम सदाशिव मांढरे हे मुंबईतील मस्जिद बंदर येथे माथाडीत नोकरीला लागले होते. ते तेव्हा ओझी उचलणे, चढवणे, उतरवणे, रचून ठेवणे अशासारखी कष्टाची कामे करत. दिवसभर अथक परिश्रम घेतल्यानंतर मुलांची देखभाल करण्यास त्यांना जमत नसे. तेव्हा दादा आपल्या आजी आणि आजोबांकडे अनपटवाडीत रहात असत. त्यांचे तिसरीपर्यंतचे शिक्षण अनपटवाडीच्या प्राथमिक शाळेत झाले. ही शाळा तेव्हा मारुतीच्या मंदिरात भरायची. केशव आप्पा हे त्यांचे वर्गमित्र. दोघेही अभ्यासात हुशार. आप्पांचा पहिला तर दादाचा दुसरा नंबर ठरलेला. दादा म्हणजे कोदे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली पैलू पडलेला आणखीन एक हिरा. गावात तिसरी इयत्तेनंतर शिकण्याची सोय नव्हती म्हणून दादा चौथीला शिक्षणासाठी मुंबईला गेले. दुर्दैवाने तेव्हा मुंबईचे वातावरण त्यांना सुसंगत झाले नाही त्यामुळे कशीबशी चौथी पूर्ण केली आणि शिक्षणासाठी इतरत्र सोय करायचं ठरलं.
त्यांचे चुलते दत्तात्रय मांढरे (बापू) सर हे सातारा येथे प्राध्यापक होते, म्हणून त्यांना पुढील शिक्षणासाठी त्यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय झाला. त्यांचे पाचवी आणि सहावीचे शिक्षण महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा येथे झाले. त्यांनी अभ्यासामध्ये उत्कृष्टता कायम ठेवली. चुलतीची माया, काकांचे मार्गदर्शन आणि इतर भावंडांच्या सानिध्यात ते आणखीण सुधारले. सातारा येथे दोन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईला परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. सातवीला दादा मुंबईला आले ते न परतण्यासाठी. येऊ घातलेल्या सर्व संकटाना सामोरे जाऊन कारकीर्द घडवण्यासाठी कायमचे मुंबईस्थित झाले. मुंबईत विद्यामंदिर शाळा विक्रोळी इथे प्रवेश घेऊन त्यांचे पुढील शिक्षण सुरु झाले. इतक्या वेळा शाळा, शिक्षक आणि सहाध्यायी बदलून देखील ते अभ्यासात मात्र मागे पडले नाहीत. त्यांचा वर्गात अव्वल नंबर ठरलेला. सातवीत तर ते तब्बल ८७% गुण मिळवून गुणवत्तेत उत्तीर्ण झाले होते. दुर्दैवाने नंतरच्या संघर्षमय आयुष्यात ते आपली शैक्षणिक गुणवत्ता टिकवू शकले नाहीत.
एव्हाना ते मुंबईत रुळू लागले होते. सकाळी शाळा, दुपारचा आराम, संध्याकाळी खेळ आणि अभ्यास अशी दिनचर्या ठरलेली. ते अभ्यासात जरी हुशार होते तरी त्यांना अवांतर वाचनाची सवय नव्हती. असं असलं तरी प्रत्येकाच्या आयुष्यात अशा घटना घडतात की ज्या आपले आयुष्यच बदलून टाकतात. ते सातवीत असताना अशीच एक घटना त्यांचा आयुष्यात घडली: नेहमीच्या सवयी प्रमाणे ते दुपारी झोपले होते. शेजारच्या काकू त्यांच्या घरी काही कामानिमित्त आल्या होत्या. त्यांना झोपलेले पाहून, त्यांना जागे करून म्हणाल्या "अरे तू सातवीत ना ? मग दुपारचा झोपतोस कसला ? घरी वर्तमानपत्र येते ते वाचत जा, ते वाचून झाल्यावर शेजारच्यांचं वर्तमानपत्र आणून वाचत जा. सभोवतालच्या घडामोडी कळतात. जगातील, समाजातील चांगल्या वाईट गोष्टी कळतात.” दादांनी हा सल्ला फक्त उपदेश न मानता स्वतः अंगिकारला. त्यांना वाचनाची सवय लागली आणि ही सवय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्यांना तेंव्हा पासून वर्तमानपत्रातील चांगल्या गोष्टी रोजनिशीत लिहिण्याची तसेच चांगल्या लेखांची कात्रणं संग्रही ठेवायची सवय लागली. १९८३ साली जडलेली ही सवय, आजदेखील त्यांनी त्याच उत्साहाने जोपासली आहे. यात त्यांना शालेय शिक्षणाबरोबरच समाजातील अनेक सगुण निर्गुण गोष्टींची जाणीव होऊ लागली. आपण समाजाचं काही देणं लागतो आणि समाजाची सेवा केली पाहिजे, ही भावना रुजू लागली होती. ते पुस्तकेही वाचत राहिले. पुढे जाऊन हि वाचनाची आवड इतकी प्रचंड वाढली कि त्यांना एखादा लेख आवडला तर त्या लेखकाशी संपर्क करून विषयाची सखोल माहिती घ्यायची, त्या जागेवर पोहचून ज्या व्यक्तीने ते कार्य केले आहे त्याचे अभिनंदन करायचे हा त्यांचा छंदच बनला. २००६ साली त्यांचेकडे मोबाईल आल्यापासून ते दररोज सकाळी न चुकता एक तरी चांगला, प्रेरणादायी, बोधक असा विचार आपल्या संपर्कवलयात पाठवतात आणि स्वतःसह सहवासातील सर्वांची प्रभात शुभ बनवतात. आज विक्रोळीच्या राहत्या घरी हनुमंत दादांचे विविध विषयांवरील १५० पुस्तकांचे वैयक्तिक संग्रहालय देखील आहे.
हि वैचारिक जडणघडण होत असताना अवलोकन व वैचारिक मंथनातून त्यांची मतं परखड होत होती. आपले विचार परखडपणे मांडण्याची सवय जडली. कुठलीही गोष्ट पटली नाही तर त्यास निडरपणे विरोध करायचे धडस आणि आत्मविश्वास त्यांच्यात आला होता. ते नववीत असताना यासवयीतूनच एक बाका प्रसंग त्यांच्यावर ओढवला: त्यांचे शाळेचे शिबिर कर्जत जवळ भिवपुरी येथे आयोजित केले होते. शिबिराच्या दरम्यान त्यांना जाणवले की जीवन खूप तणावमुक्त आणि उत्साहवर्धक आहे. तिथून परत आल्यानंतर घरातील काही गोष्टी पटत नाहीत म्हणून आपण घर सोडून भिवपुरीतच स्वतंत्र रहावे आणि पडेल ते काम करत शिक्षण घ्यावे असा विचार मनात आला. तेव्हा नितीन मोहिते या मित्राकडे जातो असे सांगून ते घरातून निघाले, मित्राकडे दप्तर ठेऊन, रेल्वे स्टेशनला आले. भिवपुरीला कोणती ट्रेन जाते हेही माहित नव्हते. मग एका प्लॅटफॉर्म वर जाऊन जी ट्रेन आली त्यात बसले. डोक्यात विचार मंथन चालूच होते कि आपण करतोय हे बरोबर कि चूक ? निराशा आणि असहाय्यतेतून हे पाऊल उचलले गेले होते. दैव बलवत्तर म्हणून ती ट्रेन बराच वेळ प्लॅटफॉर्मवरच थांबलेली. शेवटी सद्सद्विवेकबुद्धीने सांगितले कि पळून तर जाशील.. पण जर पकडला गेलास.. तर खुप मार खाशील आणि मग विचार बदलला आणि ते परत घरी परतले. हा प्रसंग जीवनात मोठा धडा शिकवून गेला होता; आयुष्यांत कसलेही ताणतणाव व संकट आले तरी त्यापासून पळून न जाता त्याला धैर्याने सामोरं गेलं पाहिजे.
पुढे ते १९८७ मध्ये दहावी आणि १९८९ मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. घरातून शिक्षणासाठी अपेक्षित पाठबळ नसल्याने अगदी जिद्दीने त्यांनी बारावी नंतर नोकरी करत स्वतःचा आणि पुढील कॉलेज शिक्षणाचा खर्च भागवायचे ठरवले. मग त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण वाणिज्य शाखेतून डॉ आंबेडकर कॉलेज, वडाळा येथे सुरु केले. या दरम्यान त्यांना मित्रवर्य अनिल अनपट भाऊंनी समयसुचक मार्गदर्शन, पाठींबा आणि साथ दिली. अनिल भाऊ यांनी त्यांना एका ट्रान्सपोर्ट कार्यालयात नोकरी मिळवून दिली. काही दिवस हे काम केल्यावर त्यांना १९९० मध्ये फोर्ट मुंबई येथे डे-नाईट या कुरिअरच्या कंपनीत मासिक ४५० रुपयांची नोकरी मिळाली. ते राहायला विक्रोळीला, प्रवेश घेतलेलं डॉ आंबेडकर कॉलेज वडाळ्याला आणि नोकरीचे ठिकाण फोर्ट. शिक्षण आणि सर्व्हिसच्या वेळेचे व्यवस्थापन करण्याचे खूप कष्टदायक वेळापत्रक होते. पदवीच्या तीन वर्षांच्या काळात ते रोज सकाळी ६:४५ ते ९:३० पर्यंत कॉलेज करायचे. सकाळी १० ला कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी त्यांना पदवीच्या तीन वर्षात शेवटच्या व्याख्यानाला कधीच बसता आले नव्हते. सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजे पर्यंत कुरिअर डिलिव्हरीसाठी त्यांना संपूर्ण मुंबईभर फिरावे लागत असे. बिकॉम च्या शेवटच्या वर्षी त्यांनी दादरच्या गणेश अकादमी मध्ये सायंकाळी ७ ते ९ दरम्यान क्लास लावला. सकाळी कॉलेज, दिवसभर काम व संध्याकाळी क्लास असा दिनक्रम होता. शिक्षणादरम्यान पुस्तक घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने ते मित्रांची अथवा कॉलेज ग्रंथालयातील पुस्तके वापरत आणि त्यातून नोट्स काढून अभ्यास करत. या अशा काटेरी मार्गातून मार्गाक्रमण करत ते १९९२ साली अर्थशास्त्र विषयातून बी.कॉम ची परीक्षा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. सकाळी ६:४५ वाजता कॉलेजला पोहचण्यासाठी ते घरातून ५:४५ ला बाहेर पडायचे, त्यासाठी त्यांची आई दररोज सकाळी चार ते साडेचार वाजता उठून जेवणाचा डबा तयार करायच्या. घरातील अस्थिर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आईने खूप कष्ट सोसले होते.
शारीरिक कमतरता हा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात कधीच अडथळा आला नव्हता. वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे विद्यार्थीदशा हा त्यांच्या आयुष्यातला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अतिशय कष्टमय प्रवास होता. ते कित्येकदा घरात जेवण असून देखील उपाशी राहिले होते. “टोपल्यात असायचं पण पोटात जात नसायचं” - ह्यातली गत. या परिस्थितीत अनेकवेळा कै. विनायक भाऊ अनपट यांनी त्यांना मानसिक आधार दिला आणि सावरलं असे ते सांगतात. या दरम्यानच घरातील त्रासाला कंटाळून त्यांना एकदा आत्महत्या करण्याचाही विचार मनात आला आणि तसा त्यांनी प्रयत्नही केला होता. त्यावेळेस अनिल भाऊ यांनी त्यांना समजावलं, धीर आणि आधार दिला आणि त्यापासून त्यांना परावृत्त केलं होतं. आयुष्यात विनायक भाऊंसारखे आधारवड आणि अनिल भाऊंसारखे मार्गदर्शक मिळणे हे त्यांचे भाग्य आहे कि ज्यांच्यामुळे अगदी संतुलितपणे ते इथंपर्यंत आले आहेत.
पदवी नंतर वृद्ध आजीआजोबा यांना सोबतीच्या उद्देशाने व नातेवाईकांच्या सल्ल्याने ते नोकरीच्या शोधात गावी आले. पण नोकरी काही मिळाली नाही. मग वर्ष वाया न घालवता त्यांनी वाईच्या किसनवीर महाविद्यालयात एमकॉम साठी प्रवेश घेतला. या दोन वर्षात त्यांनी शिक्षणाबरोबरच शेतीची काम केली. अनपटवाडी ते वाई कॉलेज हा जवळजवळ आठ किलोमीटरचा प्रवास ते दोन वर्ष सायकल वरून जाऊन येऊन करत. या दरम्यान त्यांनी गावातील पहिली ते दहावी पर्यंतच्या मुलांच्या शिकवणी घेतल्या. त्यांनी मुलांना सोबत घेऊन गणपती तसेच दुर्गादेवी या सारखे सांस्कृतिक उत्सव सुरु केले. अनपटवाडी प्राथमिक शाळेचे पहिले वहिले स्नेहसम्मेलन, डोर्लेकर बाईंच्या सहकार्याने आयोजित करण्यात त्यांचा सिहांचा वाटा होता. वाडीतील लोकांना एकत्र आणून हेवे दावे कमी करणे हा यामागचा उद्धेश होता. १९९४ साली एम कॉम (अर्थशास्त्र) ची परीक्षा ते ५८ % गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
पदव्युत्तर शिक्षण झाल्यायावर एमफिल करण्याचा त्यांचा मानस होता, पण वडिलांची सेवानिवृत्ती जवळ आल्याने नौकरी करून घरची जबाबदारी सांभाळणे गरजेचे होते त्यामुळे तो विचार सोडून दिला. मग नोकरीच्या शोधासाठी ते पुन्हा मुंबईला आले. टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्रात दर बुधवारी नोकरी विषयी येणाऱ्या जाहिराती वाचून प्रत्येक आठवड्यांत २०-२५ ठिकाणी अर्ज करणे चालू केले. त्या दरम्यान त्यांना प्रगती जुनिअर कॉलेज, विक्रोळी या ठिकाणी हंगामी शिक्षक म्हणून तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी मिळाली. या नोकरीचे एक वर्ष पूर्ण झाल्यावर पुन्हा नोकरीसाठीची वणवण सुरु झाली. १९९५ साली अनिल भाऊंनी त्यांना पुन्हा मदतीचा हात पुढे केला आणि स्वतःच्या ट्रान्सपोर्टमध्ये नोकरीस लावले. ती नोकरी त्यांनी ७ ते ८ महिने केली. त्यानंतर त्यांना घाटकोपर येथे रेस्को कॉम्पुटर प्रिंट्स या कंपनीत अकाउंट असिस्टंट म्हणून महिना १५०० रुपये पगाराची नोकरी मिळाली. या दरम्यानही त्यांचे चांगली नोकरी मिळवण्यासाठीचे प्रयत्न चालू होतेच. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांना २० मे १९९६ रोजी आरती इंड्स्टरीज या नामांकित रासायनिक कंपनीमध्ये अकाउंट असिस्टंट म्हणून त्यांच्या योग्यतेप्रमाणे हवी तशी नोकरी मिळाली. शिक्षण संपल्यानंतर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना ही संधी प्राप्त झाली होती त्यामुळे या नोकरीचे त्यांच्यासाठी विशेष महत्व होते. परमेश्वराने दिलेल्या सुवर्णमय संधीचे सोने करीत त्यांनी अतिशय तन्मयता व प्रामाणिकपणे ही नोकरी सुरु ठेवली. नोकरी मिळाल्याने खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनातील रखरख संपली होती.
नंतरच्या काळात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीतही त्यांनी अतिशय प्रभावीपणे मुलाखत देऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवली देखील होती. पण आरती कंपनीमधील मालकांनी त्यांना "तुमच्या सारख्या प्रामाणिक माणसांची कंपनीला गरज आहे म्हणून आम्ही तुम्हाला सोडणार नाही तसेच तुम्हाला रिलायन्स एव्हढाच पगार आम्ही देतो" असे सांगितलं म्हणून मग त्यांनी रिलायन्स मध्ये जाण्याचा निर्णय रद्द केला. पुढे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आरती कंपनीत बढत्या मिळवून आज ते तिथे अकाउंटस मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या प्रामाणिकपणाने आणि कार्य कौशल्यांनी प्रशासनाला प्रभावित केले आहे.
हनुमंत दादा नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर २५ जानेवारी १९९९ साली त्यांचा विवाह त्यांच्या चुलत मामांची मुलगी साधना इंदलकर यांच्या बरोबर पार पडला. २००१ साली त्यांच्या संसारवेलीवर सुबोध हे फुल जन्माला आलं. सुबोध सध्या तेरणा कॉलेज नेरळ येथे कॉम्पुटर सायन्स या शाखेत अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. ते सद्ध्या आपल्या सुयोग्य जोडीदार आणि हुशार मुलासह आयुष्यात आनंदी आहेत.
त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना ते कधीच विसरू शकणार नाहीत: साधारण २००१ साली पावसाळ्याच्या दिवसात हनुमंत दादांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांची मुंबई पासून १२० किमी अंतरावर नगर रोडवर असलेल्या माळशेज घाटामध्ये सहल गेली होती. त्या घाटात बरेच नयनरम्य धबधबे आहेत. मुसळधार पाऊस पडल्यामुळे धबधबे आणि इतर नाले तुडुंब भरून वाहत होते. अशाच एका धबब्याखाली खूप लोकं पावसाचा आनंद घेत होते. धबधब्याच्या दोन्ही बाजूला मिळून साधारण २०० ते २५० लोकं असतील. त्या गर्दीत अचानकपणे पाच ते सहा वर्षांचा एक मुलगा पाय घसरून पडला आणि धबधब्याच्या प्रचंड वेगात वाहणाऱ्या पाण्याबरोबर वाहू लागला.. धबधब्याच्या दोन्ही बाजूला असलेले लोकं तो मुलगा वाहताना पाहत होती.. तो मुलगा अजून थोडं अंतर वाहत गेला असता तर नक्कीच पाण्याबरोबर तो देखील खोल दरीत गेला असता.. काय होणार आता ? या विचाराने सगळेच घाबरून गेले. त्या मुलाला कोण वाचवणार ? दादांनी क्षणाचाही विचार न करता, त्या मुलाला वाचवण्यासाठी ताबडतोब पाण्यात उडी घेतली आणि मुलाला पकडले. त्यानीं त्या वाहत्या मुलाला फक्त एका हाताने घट्ट धरुन ठेवले आणि अशा प्रकारे उभा राहिले की पाण्याच्या प्रवाह शक्तीला विरोध होईल. थोडाजरी अंदांज चुकला असता तरी त्या मुलासहीत ते देखील त्या खोल दरीत गेले असते. पण लगेचचं इतर सहकारीही ताबडतोब मदतीला धावले आणि त्या दोघांना बाहेर ओढून काढले आणि त्या मुलाचा जीव वाचला. शारीरिक कमतरता असूनही त्यांच्याद्वारे हे मानवतेचे सर्वात मोठे कार्य झाले होते. त्यांना वाटते की सर्वशक्तिमान परमेश्वराने हे त्याचे कार्य त्यांच्याद्वारे करून घेतले होते. या घटनेमुळे त्याची मदतनिस, परोपकार आणि काळजीवाहू या वृत्ती वृद्धिंगत झाल्या.
गावातील इतर शहरात काम करणारे चाकरमानी बगाड यात्रेला गावी येत, पण आपल्या गावच्या वाकडेश्वराच्या यात्रेला येत नसत. पूर्वी कणुर आणि अनपटवाडीची एकत्रित यात्रा कणुर मध्ये भरत असे. बापू नाना आणि परबती आप्पा यांनी अनपटवाडीची स्वतंत्र यात्रा मोठ्या इर्षेने सुरु केली होती. कमी लोकसंख्या आणि मर्यादित निधी संकलनामुळे यात्रेचे स्वरूप फारसे मोठे नसे. पण पूर्वजांच्या या प्रयत्नांना तत्कालीन पिढीकढून फारसा प्रतिसाद मिळत नाही ही गोष्ट मोहनदादा, अनिल भाऊ, हनुमंत दादा इत्यादी चाकमान्यांना सलत असे. यासाठी काहीतरी करायला हवं, बापूनाना आणि परबती आप्पा यांचा संघर्ष वाया जाता कामा नये, या विचारातून मोहनदादा अनपट यांच्या मार्दर्शनाखाली १९९८ साली श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी (मुंबई) या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून या संस्थेचे अनिल भाऊ अध्यक्ष तर हनुमंत दादा सचिव आहेत.
त्याकाळी लोकांच्या घरोघरी जाऊन, त्यांना भेटून गावाच्या यात्रेसाठी तसेच विकासासाठी एकत्र आणण्याचे काम श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी या संस्थेच्या माध्यमातून अनिल भाऊ आणि हनुमंत दादा यांनी सुरु केले होते. त्यावेळी काही लोकांनी सकारात्मक तर काहींनी नकारात्मक प्रतीसाद दिला. त्यांच्या या प्रयन्तांतून गावात एकोपा तर वाढलाच पण गावच्या यात्रेबरोबर गावातील अनेक विकास कामे मार्गी लागली. गावातील कर्तबगार तरुण मंडळी एकत्र आली की गावचा कायापालट कसा होऊ शकतो हे ग्राम विकास मंडळ अनपटवाडी ने दाखवून दिले आहे. गावाच्या विकासासाठी शैक्षणिक सुविधांवर भर देऊन शाळेचा विकास घडवून आणण्यात त्यांनी हातभार लावला. मंडळाच्या माध्यमातून शाळेला बऱ्याच सुविधा पुरवून आदर्श शाळा पुरस्कार मिळवून देण्यात पुढाकार घेतला. मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून यात्रेदरम्यान गुणिजनांचा गौरव समारंभ आयोजन सुरु केले. ग्रामदेवतांची मंदिरे ही श्रद्धेची आणि एकीची शक्तिपीठे असतात हे हेरून मारुती मंदिराचा जीर्णोद्धार आणि वाकडेश्वर मंदीराचे नवनिर्माण मंडळाच्या माध्यमातून झाले. हे सर्व करत असताना गावातील मोहन दादा, अनिल भाऊ, हनुमंत दादा, अर्जुन दादा, केशव आप्पा, दिलीप बापू, चेम्बुरचा राजू या सारख्या मंडळींनी मुंबई ते अनपटवाडी अशा असंख्य फेऱ्या केल्या आहेत.
एव्हाना ते मुंबईत स्थिर झाले होते. लहानपणापासूनच्या वाचनाच्या आवडीमुळे त्यांना सामाजिक प्रश्नांची जाण तर होतीच पण ते सोडवण्याची आवडही निर्माण झाली होती. या छंदामुळे त्यांना नवीन माणसे जोडण्याची आवड निर्माण झाली. समाज तत्पर आणि सज्जन माणसांची माला गुंफण करणं हा त्याचा छंद झालाय. "सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो " या मोरोपंताच्या कवितेतील पंगतीप्रमाणे जर आपण सुयोग्य लोकांच्या संगतीत राहिलो तर आपल्या व्यक्तिमत्व विकसास नेहमीच चालना मिळते. समर्थ रामदास स्वामी देखील सत्संगाचे महत्व आपल्या श्लोकातून देताना लिहितात:
धरी रे मना संगती सज्जनांची ।
जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनांची ॥
बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे ।
महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥
अर्थात; सत्संगतीने दुष्ट मनुष्याची वृत्ती सुद्धा पालटते. सद्भाव, सद्बुद्धी व सन्मार्ग प्राप्त होतो व महाभयंकर अशा मृत्यूचे सुद्धा भय रहात नाही. असे सज्जन आणि सुसंस्कृत लोकच समाजोपयोगी विचारांच्या प्रसारासाठी उपयुक्त आहेत हे हनुमंत दादा जाणतात. म्हणूनच त्यांना नेहमीच सुसंस्कृत लोकांच्या सहवासात आणि समुदायात असावेसे वाटते. किंबहूना समाजतत्पर आणि सज्जन माणसं जमवणं हा त्यांचा छंदच होऊन बसलाय. त्यानि आत्तापर्यंत खूप माणसे जोडली आहेत आणि जपलेली देखील आहेत. हे जोडण आणि जपणं अविरत चालूच आहे. समोरच्याला अचूकपणे पारखण्याचं अवघड काम ते फारच लीलया करतात. जर एखादा समविचारी त्यांच्या चौकटीत तंतोतंत बसत असेल तर ते ओळख करून संपर्क तसेच संवाद वाढवितात आणि समोरच्याशी आपले संबंध घट्ट करतात. शेवटी सामाजिक कार्यासाठी त्यांना प्रेरित करण्यात ते यशस्वी होतात. मग सुरु होते ते सत्कार्य करणाऱ्यांची माला-गुंफण. त्याच्या या कर्तुत्वातूनच मायमराठी सारखा अतिशय प्रबोधनात्मक असा व्हाट्सअप समूह सुरू आहे. दादांच्या संपर्कवालयात विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. यात पत्रकारिता, सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, कला आणि संरक्षण क्षेत्राचा समावेश आहे. ते फक्त लोक जोडत नाहीत तर ते त्यांच्याबरोबर आपुलकीचे ऋणानुबंध निर्माण करतात. वाढदिवसासारख्या विशेष प्रसंगी, तर राष्ट्रीय सणाच्या, सांस्कृतिक सणाच्या निमित्ताने ते या सर्वांना फोन करून शुभेच्छा देतात.
चांगल्या माणसांचा ते नेहमी आदर आणि कदर करतात. त्यांचे अनुयायी होतात. उत्कृष्ट कामगिरीचा येथोचित सन्मान व्हावा ही त्यांची नेहमी धारणा असते. आणि म्हणूनच श्री ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून गावच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या वार्षिक कार्यक्रमात आपल्या गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील विशेष अशा व्यतिमत्वांचा सुयोग्य सन्मान केला जातो. गावच्या विकासासाठी कुठली गोष्ट उपयुक्त ठरेल हे ते नेमकेपणाने जाणतात. नेहमीच त्यांच्या डोक्यात गाव आणि गावकऱ्यांच्या विकासाबद्दल काहीतरी नवीन कल्पना असतेच.
आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेने ते सर्वतोपरी समाजासाठी काम करतात. त्यांना लहान असताना स्वतःचा वाढदिवस साजरा केलेला कधीही आठवत नाही पण २००६ पासून ते स्वतःचा वाढदिवस वात्सल्य ट्रस्ट कांजूर मार्ग मुंबई या सामाजिक संस्थेत आवर्जून साजरा करतात. वात्सल्य संस्था समाजातील अनाथ आणि अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलांचा सांभाळ करते. आपला वाढदिवस हा याच मुलांचा वाढदिवस आहे असं मानून दादा तिथे साजरा करतात. या समारंभातून त्या मुलांच्या चेहऱ्यावर उमलणारा आनंद त्यांना खुप ऊर्जा आणि प्रेरणा देऊन जातो. हे कार्य त्यांच्यातील सामाजिक जबाबदारी, दातृत्व आणि मानवता प्रतिबिंबित करते.
२००८ साली मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्यात आपले पोलीस, अधिकारी आणि सैनिक शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर दादा फार व्यथित झाले होते. "आपण आपल्या देशाच्या रक्षणार्थ शहिद होणाऱ्या सैनिकांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी काहीतर करू शकलो तर ती महान देशसेवा ठरेल आणि आपण ते करायला हवे" असे त्यांना सतत वाटत होते. हि संकल्पना त्यांनी अनिल भाऊ यांना सांगितली. मग कामाला सुरवात झाली, अनेक लोकांना याबाबत सांगितले पण त्याला मूर्त स्वरूप मिळत नव्हते. समाजसेवा एकट्यानं करणं अवघड गोष्ट आहे. किंबहुना ती प्रभावीपणे करायची असेल तर ती समूहाने करायला पाहिजे हा त्यांचा ठाम विश्वास. यासाठी समविचारी माणसांचा संच तयार करून त्यांना समाजसेवेस प्रवृत्त करण्याचे काम ते करतात. हेच काम दादांनी आता पुन्हा जोमाने सुरु केलं आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना एकत्र आणायला सुरुवात केली. अखेरीस ८ वर्षांनी म्हणजे २०१६ साली त्याचें पनवेलचे घर विकत घेताना त्यांची ओळख संदीप माने यांच्याशी झाली आणि त्यांनी हि संकल्पना त्यांना बोलून दाखवली. ती संदीप मानेंना फार आवडली आणि त्यांनी सोबत काम करण्यास तयारी दर्शविली.
त्यांच्या या प्रयत्नातूनच संदीप माने यांच्या अध्यक्षतेखाली, जयहिंद फाऊंडेशन या सैनिक आणि शाहिद जवानांच्या परिवारासाठी काम करणाऱ्या संस्थेची २०१७ साली स्थापना झाली. हनुमंत दादा या संस्थेचे देखील सचिव म्हणून काम करतात. तीनच वर्षात या संस्थेने महाराष्टाबाहेर जात, गोवा, उत्तर प्रदेश, जम्मू या राज्यात आपला प्रचार आणि प्रसार केला आहे आणि हि संस्था निस्वार्थ भावाने सैनिकांसाठी सर्वतोपरी काम करत आहे. हि संस्था शहीद परिवाराचा सन्मान सोहळा, सैनिकांबरोबर रक्षाबंधन, दिवाळी सारखे सण साजरे करणे, सैनिकांच्या आई वडिलांकडे लक्ष देणे, त्यांच्या मुलांचे वाढदिवस साजरे करणे, त्याच्या अडीअडचणी दूर करणे, हे आणि असे बरेच उपक्रम यशस्वीपणे राबवते. समाजात सैनिक आणि सैनिक परिवार यांना मान सन्मान मिळवून देण्याचं, नवीन पिढीत देशप्रेम, देशाभिमान जागृत करण्याचं काम जयहिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून केलं जात. जयहिंदच्या कार्याला हनुमंत दादांनी इतकं समर्पित केलं आहे कि, जयहिंदच्या माध्यमातून असं जग निर्माण करावं कि जिथं जमिनीचा तुकड्यासाठी लढाया होणार नाहीत आणि जवानांना त्यांचे प्राण गमवावे लागणार नाहीत अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी ते सतत काम करत असतात. जगात शांतता प्रस्थापीत करणं हे जयहिंद फाऊंडेशनचे उद्धिष्ट आहे आणि त्यासाठी पुढील आयुष्यात आणखी जोमाने काम करण्याची त्यांची इच्छा आहे. अनिल अनपट हे या राष्ट्रीय संस्थेचे उपाध्यक्ष तर हनुमंत मांढरे हे या संस्थेचे सचिव आहेत आणि हि गोष्ट आपल्या अनपटवाडी गावासाठी अभिमानास्पद आहे.
समाजसेवा हनुमंत दादाच्या नसानसात भिनलेली आहे. आपण ज्या समाजात घडलो, मोठं झालो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही त्याची धारणा. "देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण या देशाचे देणं लागतो"- हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महान विचार ते इतरांना सांगतच नाहीत तर ते नित्य जगतात. "खुप काही करत असतो स्वतःसाठी आता वेळ आलीय देशासाठी काहीतरी करण्याची" - ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आहे. जसे दैनंदिन देवपूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे तसेच देशभक्ती देखील आपल्या सत्कृत्याची निष्पत्ती आहे ही गोष्ट त्यांच्या रक्तात भिनली आहे.
२०१३-२०१४ च्या दरम्यान नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नाम फाऊंडेशन हि सामाजिक संस्था उभी केली होती. विशेषकरून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा आधार बनत हि संस्था मदत करत होती. तेव्हा नाना पाटेकर यांनी लोकांना या संस्थेसाठी आर्थिक मदतीचे अवाहन केले होते. हनुमंत दादा शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे त्यांना शेतकऱ्याचे दुःख माहित होते. मग त्यांनी देखील ठरवले की आपण या संस्थेसाठी आर्थिक मदत जमवायची. त्यांनी त्यांच्या कार्यालयातील आपल्या सहकाऱ्यांना हा विचार सांगितला. सर्वांनी मदतीसाठी होकार दिला. कुठून तरी ती गोष्ट त्यांच्या आरती कंपनीचे मालक श्री. चंद्रकांत गोगरी यांना समजली. तेव्हा त्यांनी दादांना बोलवले आणि म्हणाले कि "तू फार छान काम करत आहेस. तू एक काम कर. तू जेवढी रक्कम जमा करशील त्याच्या दुप्पट रक्कम मी माझ्याकडून देईन आणि मग आपण एक मोठी रक्कम नाम फौंडेशनला देऊ". हे म्हणणे ऐकल्यानंतर ते खूप उत्तेजित झाले आणि त्यानी आपले कार्य अत्यंत उत्साहाने सुरू केले. अगदी प्रामाणिक प्रयत्नांतून त्यांनी तीन लाख रुपये एवढी रक्कम फक्त दहा दिवसात जमा केली. मग मालकांनी त्या मध्ये सात लाख रुपये देऊन रुपये १० लाख निधी जमा झाला. मग महेश अनपट यांच्या सहकार्याने नाना पाटेकर यांची भेट ठरली. आणि दादा, त्यांचे दोन सहकारी व महेश अनपट हे नाना पाटेकरांच्या अंधेरी येथील घरी गेले आणि जमा केलेल्या १० लाख रुपयांचा धनादेश नाना पाटेकर यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी नाना पाटेकरांच्या बरोबर सामाजिक विषमतेवर जवळ जवळ दोन तास चर्चा झाली असं ते सांगतात. आज देखील दादा नाना पाटेकर यांच्या संपर्कात आहेत. सामाजिक कार्यासाठी लोक आणि निधी गोळा करणे ही त्याची आवड त्यांनी अजून जपली आहे.
आपली नौकरी, कुटुंब सांभाळून इतकं सामाजिक कार्य; मग ते ग्राम विकास मंडळ अनपटवाडी असो किंवा जयहिंद फौंडेशन असो; ते अविरतपणे न थकता करत आहेत. विशेष म्हणजे ते या दोन्ही संस्थेचे सचिव म्हणून काम करत आहेत. यासाठी प्रसंगी सकाळी ४:३० -५ ला उठून कामाचे नियोजन करतात. ऑफिसला एक तास लवकर जाऊन तिथूनही या संस्थासाठी काम करतात. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर विविध लोकांच्या गाठी भेटी घेणे, आखून दिलेली कामे झाली कि नाही याचा आढावा घेणे, हे सगळं करून रात्री १२ -१ वाजता त्यांचा दिवस संपतो. शनिवार आणि रविवार हे सुट्टी चे दिवस तर ते पूर्णपणे समाजकार्यासाठी देतात. या संस्थांव्यतिरिक्त वैयक्तिक पातळीवर देखील ते बऱ्याच मुलांना शिक्षणासाठी मदतही करतात. बर हे सर्व करून त्याना कंटाळा आलेला आपण पाहत नाही. नेहमी प्रसन्न चेहऱ्याने आणि मनाने खळखळून वाहणारे, विविध क्षेत्रात उत्साहाने वावरणारे दादांसारखे लोक दुर्मिळच. समाजसेवेस नेहमी तत्पर ! ते काम न करण्यासाठी कोणतेही कारण देत नाहीत. त्यांनी सामाजिक कार्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांना त्यांच्या ठाम हेतूपासून कोणीही व काहीही विचलीत करू शकत नाही. *समाजकल्याणाच्या उदात्त वेडाने झपाटलेल चालत बोलत यंत्रच जणू*.
दादांना बऱ्याचदा "घरचे काम हे ओझे" तर "समाजकार्य हे कर्तव्य" वाटते. ते देवपूजा करत नाहीत, त्यांच्यामते समाजसेवा हीच ईश्वरसेवा आहे. हे सर्व करत असताना साहजिकच कुटुंबासाठी त्यांना फारसा वेळ देता येत नाही. साधना काकी आणि सुबोध हे दोघेही त्यांना त्यांच्या कामासाठी साथ देतात आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे सर्व शक्य आहे असं दादांना वाटतं.
स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे आदर्श. त्यांच्या प्रतिभेचे ते नित्य पूजन करतात. आध्यत्म हा देखील त्यांच्या जीवनाचा भाग आहे. ते दरवर्षी अनिल भाऊ यांच्यासह संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात निमगाव केतकी ते इंदापूर असा पायी प्रवास कमीत कमी एक दिवस तरी पालखीबरोबर करतात. तसेच जीवन विद्या मिशन मध्ये अनेक प्रबोधनकार आणि प्रवचनकारांची प्रबोधने वेळ काढून ऐकतात.
दादाच्या जडणघडणीत त्यांच्या आजी कै. लक्ष्मीबाई मांढरे याचे मोठे योगदान आहे. एकीचे आणि एकात्मतेचे धडे दादा त्यांच्याकडूनच शिकले. त्यांच्या सर्वांगीण विकासात त्यांच्या मातोश्री तारामती यांचा तर सिंहाचा वाटा असल्याचे ते सांगतात. त्यांनी या महान व्यक्तिमत्वाला फक्त जन्मच दिला नाही तर वडिलांच्या व्यसनाधिनतेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रतिकूल परिस्थितींचा सामना करून योग्य आधार देऊन त्यांचे पालन पोषण केले. त्यांनी आयुष्यात दादांपेक्षा जास्त धक्के पचवले आहेत. दादांसाठी सर्व परिस्थितीत जीवन जगण्याची प्रेरणा त्या ठरल्या. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले, प्रेरणा दिली आणि त्यांचे समर्थन केले. आई बरोबरच बहीण माधुरी व बंधू राजेंद्र यांचा देखील दादांना सदैव पाठिंबा आणि सहकार्य लाभले आहे. आज आपण जे कोण आहोत ते संपूर्ण कुटुंबाच्या बळावर आणि आधारावरचं आहोत असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
अनिल भाऊ हे तर त्यांना वडील बंधूच नव्हे तर गुरुवर्यचं आहेत. आयुष्यातील प्रत्येक वळणावर त्यांनी मदतीचा हात दिल्यामुळेच आपण आज पर्यंतचा प्रवास व्यवस्थित केला आहे असे ते मानतात. आयुष्यातील कोणतीही गोष्ट ते अनिल भाऊंना सांगितल्या शिवाय करत नाहीत असेही ते प्रामाणिकपणे सांगतात. सहकारी मित्र अर्जुन दादा, चेम्बुरचा राजू, दिलीप व केशव यांचे देखील वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले असेही ते सांगतात. तसेच अनेक ज्ञात अज्ञात, लहान थोर व्यक्तित्वांनी वेळोवेळी आधार, सहकार्य, मार्गदर्शन केले आहे हे सांगायला ते विसरले नाहीत.
आता दादांच्या परिवार परिघाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. ते फक्त त्यांच्या घरच्याच कुटुंबाचा भाग राहिले नाहीत तर ते आता एका मोठ्या राज्यस्तरीय अशा मायमराठी परिवाराचा, आणि त्याहून ही मोठ्या अशा जयहिंद या राष्ट्रीय परिवाराचा एक अविभाज्य भाग झाले आहेत.
आयुष्याचे मुसाफिर सगळेजण असतात पण आपण आपले कोलंबस व्हायचे असते. आपल्यावर कुणाचा विश्वास नसला तरी स्वतः आत्मविश्वासाने चालायचे असते. आयुष्यात अवघड वळणवाटा नेहमीच सुंदर ठिकाणावर पोहोचतात आणि असेच स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर व आपल्या सवंगड्यांच्या असणाऱ्या विश्वासावर गाव पातळीवर लोकांना एकत्र आणून त्यांनी गावच्या विकासास हातभार लावला. शिक्षण क्षेत्रात मागील २४ वर्षात गावाने भरीव कामगिरी केली आहे. नुकताच स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळालेल्या आपल्या गावाला हाय टेक करण्यासाठी तरुण पिढीने पुढाकार घ्यावा अशी त्यांची इच्छा आहे. प्रत्येकाने "मी आणि माझं" या विचारांच्या बाहेर येऊन समाजासाठी काही तरी करणं गरजेचं आहे, किंबहुना ते आपलं कर्तव्यचं आहे असं प्रत्येकाला वाटायला हवं. त्यामुळे आपली, गावाची, राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांना वाटत.
समाजसेवक म्हणून नव्हे तर समाजात क्रांतिकारी विचारांनी बीज रोवून, समाजाच्या कल्याणासाठी, भल्यासाठी अविरत काम करणाऱ्या या अवलियाला शतशः प्रणाम. हनुमंत दादा, आपले मानवतेच पवित्र कार्य अविरतपणे चालू राहावे यासाठी आम्ही सर्वजण आपणास सामर्थ्य, दीर्घायुष्य व सकारात्मक विचार देण्याची परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आपल्या भावी आयुष्यास हार्दिक शुभेच्छा.
शब्दांकन: शशिकांत (अमित) भास्कर अनपट
संपादन: डॉ केशव यशवंत राजपुरे