Sunday, May 10, 2020

अंजुबाई राजपुरे; प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधू आई


प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधू माझी आई..
(जागतिक मातृदिन, १० मे २०२०)

"बालपण देगा देवा" हे सर्वांनाच वाटण्यामागचे कारण आईच्या मायेच्या ओढीत दडलेल आहे. आई बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच हवीहवीशी असते. मलाही ती हवीहवीशी आहे. आजच्या जागतिक मातृदिनी माझ्या प्रेमस्वरूप आई विषयी...

वैराटगडाच्या पायथ्याशी वसलेल्या जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील सरसूबाई जानू शिर्के यांच्या पोटी माझी आई अंजुबाई उर्फ अंजिरा हिचा साधारण १९३५ ते १९४० दरम्यान जन्म झाला असावा. जावली तालुक्यातील हातगेघर (गोळे) हे आईचे आजोळ ! आईला दोन भाऊ व तीन बहिणी. या भावंडात आईचा दोन नंबर. या गावांमध्ये बावधन येथील कांबळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आईने जेमतेम तिसरीपर्यंत शिक्षण घेतले हे तिला आठवते. आई मराठी वाचू शकते. अतिशय रूपवान व सर्व प्रकारच्या कामांमध्ये तरबेज आईचा त्यावेळी वयाच्या नवव्या ते दहाव्या वर्षीच दरेवाडी येथील साधारण व्यक्तिमत्व यशवंत राजपुरे यांच्याशी बालविवाह झाला. त्यावेळेला अतिशय लहान असल्यामुळे आईला खांद्यावर उचलून दरेवाडीला आणल्याचे सांगतात. या कोवळ्या वयात घरातील कष्टाची कामे पडू नये व माहेरची आठवण येऊ नये म्हणून आईला सुरुवातीची दोन वर्षे आमच्याच भावकीतील दुसऱ्या वाड्यात (खालचा वाडा) ठेवल्याचे सांगितले जाते. 

घरी आल्यापासून अगदी सुरुवातीपासून आईंने घरातल्या सर्व कामात उस्फूर्तपणे समर्पण दिल्याचे सांगितले जाते. दरेवाडी येथील पाच एकर व अनपटवाडी येथील सहा एकर शेती करताना सर्व प्रकारची कष्टमय कामे तिने केली होती. माझे वडील मजुरी करत. आईने वडिलांच्या खांद्याला खांदा लावून पहिल्यापासूनच अतिशय मन लावून संसार केला. वडिलांना आवश्यक ती साथ दिली. तसं बघितलं तर वडील रंगाने सावळे व दिसायला आईइतके रूपवान नव्हते. तरी सुद्धा आपल्या जबाबदारी आणि कर्तव्यापासून आई कधीही हटली नाही. गरीब व भोळ्याभाबड्या नवऱ्याबरोबर संसार कसा करावा त्याचे तीने इतरांना उदाहरण घालून दिलेलं आहे. मोठं घर, मोठं कुटुंब, आणि तशीच शेतीतील जबाबदारीची काम या सगळ्यांचा डोलारा तिने सुरुवातीपासून अगदी यशस्वीपणे सांभाळला आहे.

तिचा दिवस भल्या पहाटे सुरू होई. त्यावेळी गावात पिठाच्या गिरण्या नसायच्या. जात्यावर सर्वप्रकारची दळण ती दळत असे. दळत असताना तिच्या सुमधुर आवाजात गायलेली कित्येक गाणी मला आठवतात. घरात लवकर स्वयंपाक करणे व सकाळच्या प्रहरी शेतात कामाला बसणे हा नित्यनेम. शेतातील पेरणी व मोगणी सारखी गड्याची कामे सुद्धा आईने केलेली मी पाहिली आहेत. दोन्ही वेळचा स्वयंपाक, शेण पाणी व शेताची सर्व कामे करून तिला कधी थकल्याचे मी पाहिलं नव्हतं.

माझ्या आईला पाच मुलं आणि पाच मुली अशी एकूण दहा अपत्य ! यापैकी माझे तीन भाऊ वेगवेगळ्या वयात निर्वतले. आम्हा सर्व भावंडांचा सांभाळ व संगोपन आईने संसार सांभाळत केला. कुटुंबाचा विस्तार झाल्याने गरजा वाढल्या. मुली मोठ्या ! त्यामुळे मुलींच्या मदतीने संसार गाडा चालवण्यास सुरुवात केली. गरिबीत सुद्धा आपल्या मर्यादेत राहून मुलांना शिकवलं. मुली मोठ्या झाल्या.. त्यांचीही लग्न परिस्थितीने गरीब पण सुसंस्कृत घरांमध्ये मागे कोणतेही कर्ज न ठेवता लावून दिली. मुलांना पहिल्यापासूनच चांगली वळणं लावली. फाटक्यात राहा पण नेटके रहा अशी तिची कायम शिकवण.

माझं मूळ गाव दरेवाडी. माझ्या वडिलांनी माझ्या जन्माच्या वेळी गावापासून तीन किलोमीटरवर असलेल्या अनपटवाडी या माझ्या जन्मगावी बामणाची सहा एकर शेती कसायला घेतली होती. घरातील सर्व कामे आटोपून आई सकाळी सकाळी अनपटवाडी च्या शेतात असायची. नंतर या भागदौडीचा त्रास होऊ लागल्यानंतर घरातल्यांच अनपटवाडी तील शेतात वास्तव्य करायचं ठरलं. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी आमचं कुटुंब वाडीतील शेतात छप्पराची वस्ती करून राहिले. नवीन जागा, नवीन गाव व नवीन माणसं या सगळ्यात सामावून जायला सुरुवातीला वेळ लागला. पण हे कठीण आव्हान कुटुंबाच्या साथीने आईने लीलया पार पडल. पुढं ही शेती कुळकायद्याअंतर्गत वडिलांच्या नावे झाली. यांच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन काही जणांनी ही शेती स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनांमध्ये आईने वडिलांना अतिशय खंबीरपणे साथ दिली व सगळ्या घटना निभावून नेल्या. निव्वळ आई त्याठिकाणी होती म्हणून ती जमीन आणि या नवीन गावातील वास्तव्य टिकलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

पहिल्यायापासून कष्ट उपसायची सवय असल्यामुळे व त्या कष्टाच्या मोबदल्यात अवश्यक संसारोपयोगी गरजा भागवता येत नसल्यामुळे नंतर नंतर तिचा स्वभाव कडक बनत गेला. नवीन गावातील माणसांचे अनुभव हेसुद्धा त्याला काही अंशी कारणीभूत होते. ती फार स्वाभिमानी. स्वतःच्या सर्व गोष्टी स्वतः करी. कुणावरही अवलंबून राहिल्याचे मला आठवत नाही. त्यामुळे अन्याय व कपटाची तिला नेहमीच चिड. तिचा आवाज खूप मोठा.. साधी गोष्ट सांगायचं म्हटलं तरी ओरडून सांगायची ही तिची मूळ सवय. तिचा कडक आणि शीघ्रकोपी स्वभाव कायम तिला इतर माणसापासून दूर घेऊन गेला. तिच्या कडक आवाजा पाठीमागची मृदूता कुणालाही कळली नसावी. ती कितीही कडक स्वभावाची असली तरी आतून मात्र कापसासारखी मऊ आहे हे फक्त आम्हा भावंडांनाच माहित आहे.

हौस-मौजे च्या गोष्टी घेण्यासाठी पैसे नसले म्हणून तिने कधीही घरांमध्ये तक्रार केल्याचे आठवत नाही. प्राप्त साधन व आर्थिक स्थितीत घर पुढे चालवणे हे कसरतीचे काम तिने आयुष्यभर केलं. मुलांना नवीन कपडे कुणी पाहुण्यांनी घेतली तरच.. लग्नसमारंभात किंवा कुठे नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर मिळालेली नवीन साडीच तिच्यासाठी हौसेची गोष्ट. घरात अठरा विश्व दारिद्र्य. घरातील गरजा भागवण्यासाठी पैसे नसायचे. अशा परिस्थितीत मुलांना शिक्षणासाठी ती पैसे आणणार कुठून होती ? तरीसुद्धा आपल्या दोन्ही मुलांना आपल्या जोडीदाराच्या मदतीने तिने उच्चशिक्षित केलं म्हणजे फार मोठे काम तिच्यातून झालं आहे हे सर्वजण जाणतात. 

गरज भासल्यास कमाईपोटी बऱ्याचदा नवरा-बायको मजुरीला जात असत. आठवड्याची मजूरी घेत असताना वडील अनपढ असल्याने सही ऐवजी अंगठा करत. जेव्हा आईचा नंबर येई तेव्हा ती सही येत असताना सुद्धा नवऱ्याला कमीपणा वाटायला नको म्हणून अंगठा निशाणी देई. ही गोष्ट मात्र उभ्या आयुष्याात तिने वडिलांना कधीही माहीत होवू दिली नाही. किती तो सालसपणा.आणि किती तो आदर भोळ्याभाबड्या साथीदारा याविषयी !

कुठल्या गावाला किंवा नातेवाईकांच्याकडे जाणे हे तिच्या कधी नशिबात नसे. कारण बारा महिने काम, काम आणि काम! आणि मिळालीच फुरसद तर पैसे नसायचे. पण आपल्या म्हसवे या माहेरची माघ पौर्णिमेची यात्रा मात्र ती कधी चुकवत नसे. जवळ पैसे नसले तरीसुद्धा व्याजवाडी खिंडीतून पायी प्रवास करून मी आणि माझी बहीण कित्येक वेळा तिच्यासोबत गेलेलो अजून मला आठवते. भल्या सकाळी पायी सुरू झालेला हा जवळजवळ पंधरा किलोमीटरचा प्रवास जेवणाच्या वेळेपर्यंत संपे. हा त्रास सहन करून सुद्धा ती जायची कारण यावेळी तिचे भाऊ आणि बहिणी येत असत. त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणं तिला जमत नसे. भावंडांच्या मुलांच्या अंगावर नवीन कपडे व आपल्या मुलांच्या अंगावर जुनी कपडे पाहून तिचा हिरमुसलेला चेहरा कधी माझ्या ध्यानातून जाणार नाही. तरी सुद्धा तिला आपल्या कुटुंबांचा, मुलांचा आणि सासरच्या सर्वांचा खूप अभिमान असायचा व अजुनही आहे.

माहेरची ओढ टाळून आयुष्यभर संसारासाठी व मुलांच्या संगोपनासाठी सासरी राहून आपला चंदनदेह झिजवणारी आई ही विधात्याची सर्वोत्तम भेटच. तिच्यातील काटकपणाचा दाखला द्यायचं म्हटलं तर आत्तापर्यंत तिची चार ऑपरेशन झाली आहेत. आतापर्यंत शेतात काम करत असताना दोन वेळा विहिरीत पडून तसेच एकदा सर्पदंश होऊनही ती वाचलेली आहे. तिने आपल्या मुलांचे खाण्यापिण्याचे लाड केले पण कामासंदर्भात अजिबात लाड केले नाही. सगळ्यांनी काम करायलाच पाहिजे. मुलींना घरातील व शेतातील सर्व कामे आलीच पाहिजेत ही तीची धारणा. आणि याच गोष्टीमुळे लग्नानंतरही मुलींच्या कुठल्याही कर्तव्याबाबतच्या तक्रारी आईकडे आल्या नाहीत. आईसारखे कुठल्याही परिस्थितीत झगडत संसार करण्याचे गुण सर्व मुलींच्यामध्ये यामुळेच तर आले.

आई जर सोबतीस असेल तर कधीच आबाळ होत नाही. तिचे फक्त आपल्यासोबत असण आपल्यातील आत्मविश्वास आणि आत्मबल प्रचंड प्रमाणात वाढवते. काही दिवसापूर्वी आमच्या कुटुंबावर ओढवलेल्या संकटसमयी माझ्या धीरोदत्त आईनेच धाडसानं वेळ सांभाळून नेली आणि सर्व गोष्टी पूर्वपदावर आणल्या. त्यानंतर मुलींना आईची माया दिली व आधार दिला. निव्वळ तिच्या सान्निध्यामुळे आम्ही सर्वकाही विसरू शकलो. आईच्या मायेची शिदोरीच अशी असते की ती उरतही नाही आणि पुरतही नाही.

आई जन्मभर स्वाभिमानी आयुष्य जगली व अजून जगत आहे. आजारपणाचे सर्व त्रास तिने सोसले. वयाच्या ७० वर्षापर्यंत तिला जमत असलेली घरातील व शेतातील सर्व कामे विना तक्रार केली आहेत. तिच्या अगोदर तिच्या मुली थकल्या पण ती अजून थकली नव्हती. दोन वर्षापूर्वी उद्भवलेल्या हृदयविकाराच्या आजारानंतर मात्र ती थोडी खचली आहे. थोडासा आत्मविश्वास कमी झालाय. दिसायला कमी आले आहे व ऐकू कमी येते. यावयात देखील तिला कोणी नाव ठेवलेलं किंवा दोष दिलेलं सहन होत नाही. समोरच्याला जिथल्या तिथं उत्तर देऊन सुनावल्या शिवाय तिला चैन पडत नाही. आपल्या जोडीदारासोबत अतिशय कष्टातून कमावलेली व सांभाळलेली वडिलोपार्जित जमीन आपल्यानंतर आपली अपत्य व नातवंड यांनी त्याच पद्धतीने जपावी व चांगलं कुटुंब म्हणून नाव कमवाव ही तिची प्रांजळ भूमिका. माझ्या कुटुंबाला गावात कोणी नावं ठेवू नये यासाठी तिची कायम धडपड.

आता सुना नातवडांच्या जमान्यात आपणास तेवढं महत्त्व राहिले नाही असं तिला वाटतं. अजूनही स्वतःची काम ती स्वतः करते. ती पहिल्यासारखे काम करू शकत नाही, त्यामुळे तिला वाटतं आपण घरात आयात कसं खावं. त्यामुळे तिची नेहमी खटपट चालू असते. आपल्यानंतर आपल्या मुलांमध्ये सख्य असावं तसेच शेवटपर्यंत एकत्रित कुटुंब रहाव म्हणून तिने दिलेले संस्कार फळाला यावं अशी तिची कायम आराधना असते.

अनेकदा ती स्वत: ला नवीन पिढीशी जुळवून घेण्यात अपयशी ठरते. समोरच्याला अनावश्यक सल्ला आणि कुटुंबावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्रासाला बळी पडते. मला कोणी समजून का घेत नाही असं कधी-कधी तिला वाटतं. वयोमानपरत्वे तिचं चिडण व रागावण बंद झाले आहे. ती आतल्या आत कुढत स्वतःशीच बोलत असते. कदाचित आपण कुठून कुठपर्यंत आलोय याचे परीक्षण करत असावी. पण आमच्या कुटुंबाला ती त्रास नाही तर खूप मोठा आधार आणि मार्गदर्शकस्तंभ आहे. आम्ही तिच्या आशीर्वादाचे आणि मार्गदर्शनाचे कायम याचक राहू. यासाठी आम्ही आमच्या आईच्या ऋणातच राहणे पसंत करू. 

अशा प्रेमळ, सहनशील, काटक, कुटुंबवत्सल, मेहनती आणि स्वाभिमानी आईच्या पोटी आम्ही जन्म घेऊन खूप धन्य झालो. जागतिक मातृदिनी आईस हार्दिक शुभेच्छा. माझ्या आईस निरोगी उदंड आयुष्य मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

© डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाईल नंबर: ९६०४२५०००६
www.rajpure.com
rajpure.blogspot.com 

Thursday, May 7, 2020

श्वेता संभाजी अनपट


श्वेता संभाजी अनपट- एक जबाबदार व निष्ठावंत शुश्रुषिका
(मानवतेचं कार्य करणारी बहुविकलांगांची शिक्षिका)

      श्वेता संभाजी अनपट ही गावातील २४ वर्षीय तरुणी. तिला  'पाकोळी' या नावानेच सर्वजण ओळखतात. तिच्या कारकीर्दीच्या या सुरुवातीच्या वयातच ती मानवतेचे उत्तम काम करीत आहे. मतिमंदांची सेवा ही ईश्वरसेवा मानून तिने अशा गरजूंच्या जीवन उद्धारणासाठी स्वतःला वाहून घेतले आहे ! शिक्षिका म्हंटले की, आपणासमोर पारंपारिक शाळा किंवा हायस्कूलमध्ये शिक्षिका पेशा असलेली तरुणी असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहील. परंतू श्वेता ही वेगळी शक्षिका आहे, ती साधारण मुलांची शिक्षिका नसून बहुविकलांग/ मतिमंद (बौद्धिक क्षमता कमी) असलेल्या मुलांची शिक्षिका आहे. आणि हेच तिच्यातील वेगळेपण आहे. अनपटवाडी गावात तिच्यासारखा वेगळा विचार करून आणि या वेगळ्या क्षेत्रात शिक्षिका असलेली ती पहिलीच. हे करत असताना तिला कसल्याही प्रकारचा कमीपणा अथवा कसलेही वेगळेपण वाटत नाही याचे कौतुक करावेसे वाटते.

कै. श्रीरंग बाजाबा अनपट यांना सहा अपत्ये ! नंदकुमार, रजनीकांत, सयाजी, संभाजी, शिवाजी व मंगेश. पैकी संभाजी अनपट हे चौथे सुपुत्र. संभाजी अनपट (आबा) यांना चार अपत्ये, त्यातील श्वेता ही तृतीय कन्या. आबांचे १ ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण अनपटवाडीतच झाले. ५ वी ते ७ वी शाळा क्र- १ मध्ये तर ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण बावधन हायस्कुल बावधन मध्ये झाले. १० वी नंतर त्यांनी शाळा सोडून सुरुवातीला शेतीमध्ये कष्टाचे काम केलें. पुढे पैसे कमावण्यासाठी त्यांचे समवयस्क भाऊ संजय अनपट यांचे बरोबर ते मुंबईला गेले. सुरुवातीला त्यांनी दादर आणि मस्जिद बंदर येथे कापडाच्या दुकानांत ४ वर्षे काम केले, त्यावेळी त्यांना ३०० रुपये इतका तुटपुंजा पगार होता. त्यामुळे साधारण १९८४-८५ ला ते सैनिकी भरतीसाठी एकदा व पोलीस भरतीसाठी दोनदा कुलाबा, मुंबई येथे उतरले होते. सैनिक भरतीमध्ये वयाच्या अटीमुळे ते अयशस्वी झाले, परंतु पोलीस भरतीत दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश आले. यावेळी सर्व परीक्षा ते उत्तीर्ण होऊनही अर्थप्रसाद देऊ न शकल्याने तीही नोकरी हातातून गेली. पुढे बंधू वसंत अनपट यांनी त्यांना अंगमेहनतीच्या व कष्टमय माथाडी सेवेत कामाबद्दल सुचवले. उदरनिर्वाहासाठी दुसरा पर्याय नसल्याने त्यांनी तेही करायचे ठरवले. कारण कष्ट, मेहनत त्यांच्या पाचवीलाच पुजले होते.

२४ मार्च १९८९ या गुडफ्रायडे दिवशी आबांचा विवाह मीना साळुंखे (पांडे) यांचेशी झाला. त्यांना तीन कन्या आणि एक चिरंजीव ! आपण कमी शिकलो असलो तरी मुलं जेव्हढं शिकतील तेवढे त्यांना शिकवायचे असे त्यांनी ठरवले होते. मोठी मुलगी स्नेहल ही कला शाखेतून एम.ए झाली आहे (सध्या सी.एन.सी इन्स्टिट्यूट वाई येथे कार्यरत आहे), दुसरी मुलगी स्मिता हिने वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे (सध्या गणेश नागरी सह. पतसंस्था म. वाई येथे कार्यरत आहे), तर तिसरी श्वेता अनपट ही बी.एड करून शिक्षिका झाली. श्वेताचा जन्म २२ जानेवारी १९९६ रोजी पांडे येथे झाला. तिच्या पाठीवर प्रथमेश हा मुलगा झाला. तो सध्या वाईमध्ये रिव्हाका साहिल अक्षर इन्स्टिट्यूट येथे ऐच्छिक व्यवसाय शिक्षण घेत आहे.

श्वेताचे १ ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण अनपटवाडीच्या प्राथमिक शाळेत झाले. पुढे ५ वी ते ७ वी पर्यंत बावधन मध्ये शाळा क्र- ३ मध्ये (भैरवनाथ मंदिरांत), तर ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण कन्याशाळा बावधन येथे झाले. त्यानंतर ११ वी, १२ वी चे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण किसन वीर महाविद्यालय येथे  वाणिज्य शाखेतून पूर्ण केले. पुढे तिथेच २०१७ साली बी कॉम पदवी प्रथम श्रेणीत मिळवली. श्वेता पहिल्यापासूनच हुशार, संस्कारी आणि मनमिळाऊ मुलगी आहे. तिच्या सहकार्यभावामुळे ती पटकन कुणालाही आपलेसे करून टाकते.

शिक्षिका होण्याच्या दृष्टीने पुढे तिने बी. एड करायचे ठरवले. त्याकरिता सातारामध्ये प्रवेश घ्यावा लागणार होता. पण तिथले राहणे, त्यासाठी लागणारी फी परिस्थिती पाहता परवडणारी नव्हती. दुसरीकडे प्रथमेश अनपटवाडी शाळेत शिकत होता, बाकीचे विद्यार्थी पुढे जात होते, परंतु प्रथमेश मात्र मागे पडत होता, त्यावेळी लक्षात आले की तो हे मुद्दाम करत नाही, तर तो शिकण्यासाठीच असमर्थ आहे (लर्निंग डिसॅबिलिटी). मग पुढच्या शिक्षणासाठी त्याला वाईमध्ये बौद्धिक क्षमता कमी असलेल्या रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिट्यूट, येथे प्रवेश घेतला. श्वेताचे कॉलेज पुर्ण झाले असल्यामुळे ती त्यास शाळेत सोडायला व आणायला जात असे. त्याला एकटे पडू द्यायचे नाही असे तिने ठरवले होते. त्यात शाळेत गेल्यावर तेथील बहुविकलांग मुलं पाहून तिला दुःख वाटायचे व दया यायची. या अवस्थेस ते जबाबदार नाहीत हे समजल्यावर आपण या मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे अशी तिची भावना झाली. तिने ही भावना तिचे वडील आबा यांच्याकडे व्यक्त केली. तिच्या सांगण्यावरून आबांनी शाळेतील टापरे मॅडमकडे चौकशी केली असता त्यांनी याच शाळेत डी.एड कॉलेजच्या शाखेत प्रवेश घेण्यास सांगितले. तिला डी.एड इन स्पेशल एज्युकेशन (मेंटल रिटार्डेशन) हा कोर्स करण्यास सांगितले. प्रथमेशवर असलेल्या प्रेमापोटी आणि बौद्धिक क्षमता कमी असलेल्या मुलांसाठी काहीतरी करण्याच्या इर्षेने तिने पारंपारिक शिक्षण न घेता येथे प्रवेश घेण्याचे ठरवले. घरच्या परिस्थिची तिला जाणीव होती तसेच हि संस्था वाईमध्ये असल्याने आणि फी योग्य असल्याने तिने प्रवेश घेतला आणि दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केला. तिच्यातील याच जिद्दीमुळे आई वडिलांनी तिला परवानगी दिली होती. 
कोर्स पूर्ण झाल्यावर स्वतःला सिद्ध करायची वेळ आली होती. बहुविकलांग मुलांची शिक्षिका म्हणून तिला रुजू व्हायचे होते. त्यासाठी तिने पाचवड, सातारा, कराड या ठिकाणी अशा शाळांची चौकशी केली, फोन केले आणि तिला या शाळांमध्ये मुलाखतीसाठी बोलावले. तिची पांचवड, कराड येथे मुलाखत उत्तम रित्या झाली परंतु येथे शिक्षिका पदाच्या जागा रिक्त नसल्याने नोकरी मिळाली नाही. यावेळी कराडला मुलाखतीसाठी असलेल्या देवधर मॅडम ह्या श्वेताच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी परीक्षिका म्हणून आल्या होत्या. श्वेतातमधील मुलांना सांभाळण्याचे कौशल्य आणि मुलांविषयीची आस्था त्यांनी पाहिली होती. त्यामुळे कराडला जागा रिक्त नसल्या तरी पुण्यामध्ये एका शाळेवर शिक्षिका असलेली जागा रिक्त असल्याचे त्यांनी सांगितले. तिथल्या शाळेचा पत्ता व फोन नंबर त्यांनी दिला. या नंबरवर फोन करून तिने मुलाखत दिली आणि या पात्रतेचे दुर्मिळ शिक्षक असलेने तिची तिथे शिक्षिका म्हणून निवड झाली. तिच्यासाठी ही आनंददायी गोष्ट होती, पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांना सोडून अनोळखी शहरात वास्तव्यास जाण्याचे आव्हानदेखील होते.
घरापासुन आणि कुटुंबियापासून दूर राहण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे श्वेताला शाळेत सोडण्यासाठी मी गेलो होतो, सोबत आबाही होते. शाळेने तिची सोय शाळेतच सर्वात वरच्या मजल्यावर केली होती. तिला तिच्या इतर शिक्षिका राहत असलेल्या रूमवर सोडले, पण त्यातही तिथले नियम आणि अटी ऐकून आम्ही थक्क झालो. शाळा, तेथिल वर्ग, शाळेच्या गेटपासून जिना, पॅसेज सर्व कॅमेरा कक्षेखाली होते. शाळेच्या वेळेत फोन वापरायचा नाही. त्यात तिच्यासोबत राहत असलेल्या सहकारी मुलींनी तिला तेथील कडक शिस्त, वरिष्ठांचा दबदबा, शाळेतील राजकारण याबाबत अप्रत्यक्षरीत्या भीती दाखवली, पण श्वेताने न डगमगता परिस्थिती हाताळली. आपण आपले काम उत्तमरीत्या करत राहिलो आणि आपले १०० % योगदान दिले तर कोणतीच गोष्ट अवघड नसते हे तिने दाखवून दिले. तेथील शिक्षक आणि सेविका यांचा विश्वास जिंकला आणि बिग बॉस टीव्ही सिरीयलसारखे २४ तास कॅमेरा कक्षेखाली राहून ती आपले काम चोख बजावत आहे. 
तिचा हा प्रवास शब्दात सांगणे ही अवघड गोष्ट आहे असे ती सांगते. कारण साधरण मुलांना शिकवणे ही सोपी गोष्ट असते परंतु या बहुविकलांग मुलांना शिकवणे ही तितकीच अवघड गोष्ट आहे. साधारण मुलांना ओरडले, रागावले तर ते समजतात, परंतु बहुविकलांग मुलांना ओरडताही येत नाही, त्यात श्वेता ज्या शाळेत शिक्षिका आहे, तिथे सर्व उच्चवर्गीयांची मुले असल्याने तिची तारेवरची कसरत व्हायची. सुरुवातीला मुलांना ओळख होईपर्यंत ते कुणालाही जुमानत नाहीत, किमान दोन आठवडे शिक्षकांना खूप त्रास होतो, प्रसंगी ही मुले मारहाणही करतात. हे आपले शिक्षक आहेत हे समजयलाच त्यांना दोन आठवडे जातात. त्यामुळे प्रसंगी या मुलांकडून मार खाऊन, त्यांचे ओरडणे ऐकून त्यांच्यावर तिने अखेर ताबा मिळवला. कधी गोड बोलून, कधी कठोर पवित्रा घेऊन किंवा त्यांच्या कलेने घेऊन त्यांना शिकवणे चालूच ठेवले त्यामुळे आता ही मुले पालकांचे जसे ऐकतात तसे श्वेताचेे ऐकू लागली आहेत. यामागचे तिचे कठोर श्रम, चिकाटी व बहुविकलांग मुलांविषयीची तळमळ दिसून येते.

बौद्धिक क्षमता कमी असलेल्या मुलांना मराठी, गणित, विज्ञान, सामान्य ज्ञान असे विषय वस्तू किंवा चित्राद्वारेच शिकवावे लागतात. गणित शिकवताना रंगीत प्रिंट किंवा फ्लॅश कार्ड चा वापर करावा लागतो. प्रत्येकाला त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार शिकवावे लागते. त्याचप्रमाणे शारीरिक शिक्षण हा विषय शिकवताना त्यांना योगाचे चित्र किंवा शिक्षकांना स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवावे लागते. तेव्हा त्यांच्या लक्षात येते. अशा या वेगवेगळ्या बौद्धिक क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार शिकवायचे म्हणजे अवघड नव्हे केवळ अशक्यच. हे अवघड काम करताना श्वेताची दमछाक होत असली तरी ती हे काम अविरतपणे उत्तमरीत्या पार पाडत आहे. तिच्या या उत्कृष्टतेची दखल घेत श्री ग्रामविकास मंडळाने नुकत्याच झालेल्या वाकडेश्वर यात्रेनिमित्तच्या सत्कारसंरभात (फेब्रुवारी २०२०) श्वेता हीचा शाल व श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला आहे. त्याचप्रमाणे श्वेताने शिक्षिका असून संस्कारभराती रांगोळी काढण्याची कालासुद्धा  आत्मसात केली आहे. श्वेता  सुंदर रांगोळी  काढते. ग्रामविकास मंडळाने दिवळीनिमित्त आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत श्वेताने १ ला नंबर मिळवला होता, त्यामुळे मंडळाने तेव्हादेखील तिचा पारितोषिक देऊन सत्कार केला होता.

श्वेता हे काम तिच्या भावावरील प्रेमापोटी आणि भविष्यात त्याला मदत व्हावी म्हणून जरी करीत असली तरी तिच्या जिद्दीला आणि धैर्याला दाद दिली पाहिजे. बौद्धिक क्षमता कमी असलेल्या मुलांना शिकवण्याचे अवघड आणि अशक्य वाटणारे काम करून श्वेता एक प्रकारे मोठे समाजकार्य करत आहे. त्याचप्रमाणे तिचे आई वडील ज्यांनी श्वेताला हे काम करण्याची परवानगी दिली, प्रोत्साहन दिले त्यांनाही सलाम. त्यामुळे ती हे अशक्य वाटणारे कार्य सहजपणे शक्य करू शकली. 

श्वेताचे मुलांना सांभाळून घेणे आणि शिकवणे याबाबतचा प्रवास, अनुभव आणि त्यामागचे कष्ट शब्दात न सांगता येणारे आहेत. कारण हे अनुभव जोपर्यन्त आपण स्वतः घेत नाही तोपर्यंत त्याचे गांभीर्य, धडपड आणि त्यामागच्या भावना आपल्याला कळत नाहीत. ती या सर्व परिस्थितीला धैर्याने सोमोरी जात आहे, आणि आपले काम उत्तमरीत्या पार पाडत आहे. ही खरंतर सर्विस नसून समाजसेवा आहे. आणि फार मोठे मानवतेचे कार्य ती करत आहे. या कार्यासाठी श्वेताचा अनपटवाडी करांना गर्वच वाटेल. अशा या समाजकार्य करणाऱ्या श्वेतास भविष्यात अशा विद्यर्थ्यांसाठी स्वतःची एखादी छोटी का होईना संस्था किंवा इन्स्टिट्यूट सुरू करण्याचा मानस आहे. तिच्या या प्रयत्नांना आणि जिद्दीला यश मिळो आणि तिची महत्वकांक्षा प्रत्यक्षात येवो हीच वाकडेश्वर चरणी प्रार्थना ! आशा आहे की तुझ्याकडून प्रेरणा घेऊन आपल्यातील काहीजण करिअर निवडण्यासाठी असे धिटाईचे नाविन्यपूर्ण निर्णय घेतील आणि देशसेवेच्या पवित्र कार्यात सहभाग होतील.

खरोखरच आम्हाला अभिमान आहे की तुझ्यारूपाने आमच्यात अशी मोठी प्रतिभावंत तरुणी आहे. श्वेता तू कुणालाही गर्व वाटावा असे मानवतेच कार्य करून समाजसेवा करत आहेस, तुझ्या कार्यास सलाम. तुला तुझ्या या समाजकार्यात यशस्वी होण्यासाठी आई वडिलांसोबत अनपटवाडीकरांचे आशिर्वादही तूझ्यासोबत नेहमीच असणार आहेत. तुझ्या यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

तात्पर्य: वेड्या बहिणीची वेडी माया.
दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.- स्वामी विवेकानंद..

शब्दांकन- निलेश अनपट
संपादन: केशव राजपुरे.

Wednesday, May 6, 2020

सदाशिव कुंडलिक मांढरे

गावचे प्रथम सरपंच सदाशिव कुंडलिक मांढरे (आण्णा)
(भारदस्त, निःस्पृह, सभ्य, गरिबांचे आधारवड व एक अजातशत्रू व्यक्तीमत्व)

ज्या बाळाने नुकताच श्वास घेतला होता, फक्त तीन आठवड्यांचं असताना पितृप्रेमाला पोरकं झालं ! आई आणि आजी यांच्या वात्सल्याने त्यास पितृप्रेमाची कमतरता जाणवली नाही. भविष्यात संपूर्ण गाव आणि पंचक्रोशीत ज्या माणसाने आपल्या कर्तृत्वाने, मायेने आणि प्रेमाने लोकांना बापासारखी सावली दिली गरिबांचे आधारवड झाले ते आण्णा म्हणजे सदाशिव कुंडलिक मांढरे. आण्णांची जीवनकथा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय !

मांढरेंच्या जवळजवळ १७५ वर्षांपूर्वी बांधलेल्या खालच्या वाड्यातील काशिनाथ मांढरे यांना नारायण, तुकाराम व सखाराम ही तीन मुलं ! नारायण यांचे चिरंजीव कुंडलिक. कुंडलिक यांना दत्तात्रय व सदाशिव ही दोन अपत्य !  सदाशिव कुंडलिक मांढरे (आण्णा) यांचा जन्म १५.६.१९१७ चा ! वडिलांनंतर या दोन मुलांचे संगोपन आणि पालनपोषण आई आणि आजी गंगुबाई यांनी केले. पाच वर्षांनी मोठे आण्णांचे बंधू दत्तात्रय यांच्यासोबत त्यांचे बालपण गेले. त्यांना पोटभर शेती होती आणि कुस्तीची प्रचंड आवड, यामुळे ते शिकले नाहीत. प्राथमिक शाळेमध्ये जेमतेम आठ महिनेच त्यांनी शिक्षण घेतले. त्या काळात घर चालवण्यासाठी आण्णा आपल्या बंधूसोबत गावातील जनावरे सांभाळून शेतीची सर्व कामे करत. तरीही कौटुंबिक खर्च भागवणे अवघड झाल्याने बंधू दत्तात्रय पैसे कमावण्यासाठी मुंबईला गेले. त्यांना कापड गिरणी मध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांनी आण्णांना सुध्दा मुंबईला नेले व एका कापड गिरणीमध्ये काम मिळवून दिले. बंधू दत्तात्रय यांचे लग्नानंतर लगेच निधन झाल्याने त्यांचा वंश पुढे वाढला नाही.  

आण्णांना लहानपणापासूनच कुस्ती खेळण्याचा छंद होता. वयाच्या अठराव्या वर्षी अण्णांचे शरीर जोर- बैठका मारून, दांडपट्टा फिरवून आणि व्यायामामुळे अत्यंत पिळदार बनले होते. मुंबई मध्ये नोकरी करत असताना आण्णांनी आपला तालमीचा व कुस्तीचा छंद बंधूंच्या मदतीने जोपासला होता. १९३८ दरम्यान आण्णांचे बावधनमधील ताराबाई पिसाळ यांचेशी लग्न झाले. त्यावेळी पाणवठ्याच्या गावविहीरीचा पिंडीसारखा आकार होता. त्यात पाणी आणण्यासाठी उतरण्यासाठी घडीव दगडांत बांधलेला जिना होता. भल्या पहाटे उठून पाणी भरत असताना विहिरीत सर्पदंश होऊन ताराबाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयुष्य हे सायकल चालवल्यासारखे असते संतुलन टिकवण्यासाठी गतिशील राहावे लागते. मग त्यांचा दुसरा विवाह ताराबाईंची चुलत बहीण लक्ष्मीबाई पिसाळ यांचेशी १९४१ दरम्यान झाला. आण्णांची सासुरवाडी बावधन असली तरी बावधनच्या पिसाळ परिवारांशी अनपटवाडीचे आगोदरपासूनचे फार जुने नाते संबंध होते. त्यांच्या पत्नी नावाने जरी लक्ष्मी होत्या तरी स्वभावाने मात्र सरस्वतीचं होत्या. त्यांच्या नऊ भावंडात (७ बहिणी आणि २ भाऊ) त्या सर्वात मोठ्या होत्या. लग्नाआगोदर त्यांनी आई मुक्ताबाई आणि वडिल यांची खूप सेवा केली. लग्नानंतर देखील माहेरी काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर त्यांचे मत घेतले जाई. अतिशय शांत, संयमी आणि विचारी स्वभाव असल्यामुळे सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी त्यांच्या शब्दाला मान असे. घरातीलच नव्हे तर भाव-भावकीत देखील भांडण तंटा सोडवण्याचे खात्रीचे एकमेव ठाणे म्हणजे लक्ष्मी या असायच्या.

मुंबईत कापड गिरणीत जॉबर असताना अनपटवाडीतील अनेक लोकांना त्यांनी गिरणी मध्ये कामाला लावले. त्यांपैकी आत्ता कोणी हयात नसले तरी हे सर्व त्याकाळी आण्णांना अतिशय मानत असत. स्वतःसाठी जगणारे अनेक असतात पण जगत असताना मागे पडलेल्या आणि अडीअडचणी मध्ये असणाऱ्या आपल्याच माणसांना मदत करण्याचा गुण आण्णांमध्ये होता. लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी आण्णांनी नोकरी सोडली. त्यानंतर ते गावी आले व शेतीत रमले. व्यायामाची आवड असल्यामुळे त्यांनी गावचे सध्याचे ग्रामपंचायत ऑफिस जेथे आहे त्याठिकाणी तालीम तयार केली होती. आण्णा अनपटवाडीमधील तरुणांना कुस्ती आणि त्यातील डावपेच शिकवत असत. ताण्याबा दादा, बापू नाना, व्यंकट तात्या इत्यादींना आण्णांनी कुस्ती आणि शरीर कमावण्यामध्ये तरबेज केले होते. तेव्हा गावातील कुस्तीपटूंनी त्यांची विजेती प्रतिष्ठा कायम ठेवली होती. त्यांच्या इतर पहिलवान सहकाऱ्यांमध्ये बापु नाना व मारुती नाना होते. एकदा बापू नाना यांनी एका शक्तिशाली पैलवानाला बावधनमध्ये चितपट केले होते. पुढच्याच वर्षी त्याने गावातल्या कुस्तीगीरांना पुन्हा आव्हान दिलं. त्यावेळी आण्णांनी हे आव्हान उत्सुर्तपणे स्वीकारलं आणि त्याचा पराभव केला. ते किती जिद्दी व जिगरबाज होते हे यावरून दिसते.

त्यांना भौतिकशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक दत्तात्रय (बापू) मांढरे, कै उत्तम मांढरे, सुरेखा लेंभे (पिंपोडे), नलिनी कदम (आरळे) व सुनंदा पवार (वेण्णानगर) ही पाच अपत्ये ! बापूंना दिपक, महेंद्र व मंगेश ही तीन मुलं. यापैकी महेंद्र व मंगेश अभियंता तर दिपकने विज्ञान विषयातून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल आहे. उत्तम भाऊंना हनुमंत, माधुरी इंदलकर (कळंभे, सातारा) व राजेंद्र ही तीन मुलं. हनुमंत एम कॉम असून एका नामांकित कंपनीत अकाउंट्स विभागात डेप्युटी मॅनेजर आहे. राजूचा गाडीव्यवसाय आहे. त्यांच्या नातसुनादेखील उच्च विद्याविभूषित आहेत. आण्णांच्या मुलींची मुलेही उच्च शिक्षित आहेत.

आण्णा घरची शेती करत करत झाडे तोडण्याचे काम करत. झाडांच्या मोठाल्या बागा विकत घेवून वाखारीस सरपण विकत असत. त्याचबरोबर इतरांच्या जमिनी कसण्यासाठी वाट्याने घेत असत आणि ज्यांच्याकडे शेती औजारे आणि बैल नसत यांच्या जमिनीच्या मेहनती करून पैसे कमवत. यातुन बऱ्याच मजुरांना रोजगार उपलब्ध होई आणि त्यातून आण्णानाही उदरनिर्वाहासाठी चार पैसे मिळत. यादरम्यान त्यांनी पुष्कळ लोक जमवले आणि बाहेरही बऱ्याच ओळखी झाल्या.

उत्तम भाऊ चौथीत असताना अभ्यासात डोकं चालत नसलेने त्यांनी शाळा सोडली व आण्णांना शेतीत मदत करू लागले. तशी पत्नी लक्ष्मी, बापू आणि भाऊ या तिघांनीही आण्णांना शेतीत मदत केली. शिक्षणात मन लागत नाही म्हंटल्यावर आण्णांनी भाऊंना कुस्तीची आवड निर्माण केली. सकस आहार व तालमीत सराव दिला. यामुळे भाऊंनी आण्णासाररखीच शरीर संपदा कमावली. भाऊंनी कुस्त्या केल्या होत्या. भाऊंच्या जीवावर आपल्या शेतीसह म्हातेकरवाडीपासून काळ्या रानापर्यंत इतर बऱ्याच जमिनी वाट्याने केल्या. मग वयाच्या १८ व्या वर्षी भाऊ बावधन मधील नातेवाईक गुलाबराव सखाराम भोसले यांच्या सहकार्यातुन मुंबईला वखारीत कामाला लागले. पुढे याचठिकाणी भाऊंनी २२ वर्षापेक्षा जास्त काळ कष्टमय सर्विस केली. त्यादरम्यान बापूंचे शिक्षण चालू होते. प्रतिकूल परिस्थितीत खेडेगावात राहून अतिशय कष्टाने बापू विज्ञानातील भौतिकशास्त्र विषयात उच्चविद्या विभूषित होवू शकले ते आण्णांच्या शिक्षणावरील निस्सीम प्रेमामुळेच. मुलाच्या प्रत्येक यशानं हुरळून जाणारा बाप म्हणजेच आण्णा खूपच आशादायी होते. मुलांन भरपूर शिकून मोठं व्हावं हा त्यांचा ध्यास मात्र कायम असे. त्यांच्या मुलांची व्यक्तिमत्त्व ही आण्णांचीच प्रतिकृती !  

आण्णांनी नेहमीच आपल्या मुलांचा अभिमान बाळगळा. मुलांच्या साथीने आण्णांनी आपल्या तीनही मुलींचे विवाह प्रतिष्ठित घरात देवून केले. भगवान शंकराच्या नावात एकंच शिव होता पण अण्णांच्या नावात सदांच शिव होता आणि त्या शिवाला पत्नी लक्ष्मीची अनमोल व अखंड साथ मिळाली. या दोघांनी आपली कन्या सुरेखा हिचा विवाह पिंपोडे येथील उच्चविद्याविभुषित उपजिल्ह्याधिकारी श्री. वसंतराव लेंभे यांच्याशी १९७८ मध्ये केला. दुसरी कन्या नलिनीचा विवाह आरळे येथील श्री. रमेश कदम  यांच्याशी १५  मे १९७९ रोजी केला तर लहान कन्या सुनंदा हिचा विवाह साबळेवाडी (वेण्णानगर) येथील श्री. अशोक पवार यांच्याशी १३ मे १९८२ रोजी केला. या लग्न कार्यावेळी आण्णांची दोन्ही मुलं जरी कमावती होती, तरी पण आई वडील म्हणून ही आमचीच जबाबदारी आहे, असं मानून झालेल्या खर्चातील निम्मा खर्च आण्णा आणि पत्नी लक्ष्मी यांनी शेतीतील मिळकतीतून केला होता. उरलेला खर्च दोन्ही मुलांनी केला होता. मुलींची लग्न झाल्यानंतरही आण्णांनी जबाबदारपणे दातृत्व जपले होते. ते प्रत्येक महिना दोन महिन्यांतून मुलींच्या घरी जाऊन खुशाली घेत, त्यांच्या अडचणीत मार्गदर्शन आणि आधार देत. मुलींच्या लग्नानंतर देखील त्यांच्या अडीअडचणीत, म्हणजे अगदी त्यांच्या बाळंतपणापर्यंत, शेती संभाळून या उभयतांनी आपल्या जबाबदाऱ्या एक हाती संभाळल्या होत्या. मुलींच्या अपत्यांवर देखील आण्णा आणि आईंचे खूप प्रेम होते. दोन सुना, तीन जावई आणि १५ नातवंड असणाऱ्या आण्णांचा महेंद्र आणि हनुमंत या नातवांवर विशेष स्नेह असायचा. सुनांना देखील मुलीसारखं प्रेम आणि जावयांना मुलाचा आधार देणारा सासरा आण्णा होते. आण्णा एक चालते बोलते ज्ञानपीठ होते. आण्णारुपी रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे.

शेतीची कामे लवकर उरकण्याच्या उद्देशाने त्यांनी वारंगुळा करून शेतीची कामे केली. तान्याबा दादा, रामभाऊ व बावधनमधील आण्णा बाबाचा काका यांचेशी मिळून आण्णांचा अविरत २२ वर्षे वारंगुळा होता. यामुळे त्यांना शेतीतील कामे एकमेकांच्या सहकार्याने उत्साहात व वेळेत पूर्ण करण्यास मदत व्हायची. त्यानंतर काही काळ या गटात बुवा तात्या व बापू नाना देखील सहभागी झाले होते. आण्णांनी त्यांच्या उमेदीच्या काळात शेती सिंचनासाठी स्वत:ची एक व एकत्रीतील एक अशा दोन विहिरी खणून घेतल्या. विहीर तसेच मोटेसाठीची धाव घडीव दगडात बांधण्यात पुढाकार घेतला. याच्या जोरावर त्यांनी बागाईत शेती सुद्धा केली.  

स्वतःच्या अत्यंत निस्पृह, प्रामाणिक आणि भारदस्त व्यक्तिमत्वामुळे आण्णा अनपटवाडीतील घरगुती किंवा भाऊबंदकी मधील भांडणं - तंटे अतिशय मुत्सद्दीपणाने सोडवत असत. आण्णांचा केवळ अनपटवाडीतच नव्हे तर संपूर्ण बावधन पंचक्रोशी मध्ये आदरयुक्त असा दबदबा होता. त्यांच्या विविध गावातील स्नेह्यांमध्ये बावधनमधील; आनंदराव बयाजी पिसाळ, आमदार मदनराव गणपतराव पिसाळ, आनंदराव कृष्णा पिसाळ, आप्पासाहेब दिनकर पिसाळ, यशवंतराव रावजी पिसाळ, गुलाबराव सखाराम भोसले, दत्तात्रय जोशी काका, बुवासाहेब (तात्या) सीताराम भोसले व वसंतराव भोसले, कणूरमधील; पांडुरंग राजपुरे, पोलीस पाटील शंकरराव काळे, म्हातेकरवाडीतील आण्णा म्हातेकर, बिगडा झांजुर्णे, दिनकर झांजुर्णे, तर दरेवाडीतील कोंडीबा राजपुरे, गणपत वाडकर, यशवंत वाडकर व गोविंद गणू राजपुरे हे व इतर. 

पूर्वी कणूर, दरेवाडी आणि अनपटवाडी अशी तीन गावे असलेली गट ग्रामपंचायत होती. आण्णा व इतर ग्रामस्थांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी प्रयत्न केले आणि ते १९७२ मध्ये यामध्ये यशस्वी झाले. १९७२ साली स्थापन झालेल्या स्वतंत्र अनपटवाडी ग्रामपंचायतीचे आण्णा पहिले सरपंच होते. त्यावेळचे त्यांचे इतर सहकारी पंच हिराबाई सोपान शिंदे (उपसरपंच), दत्तात्रय बजाबा अनपट, लक्ष्मण बजाबा अनपट, सोनुबाई साहेबराव मांढरे, सर्जेराव केशव अनपट व शांताराम मारुती अनपट यांचे आण्णांना खुप सहकार्य लाभले. त्यांच्या कारकिर्दीत बारूळी ते अनपटवाडी हा अगोदर बांधावरून पायवाट आणि ओढ्यातून असणारा रस्ता ओढ्याच्या कडेने तयार झाला. तेव्हा लावंड, पांडुरंग मांढरे, दत्तू जोशी यांनी आण्णांच्या शब्दाखातर रस्त्याला विनामोबदला जागा दिली असे सांगीतले जाते. त्यावेळी हा रस्ता गावकऱ्यांनी श्रमदानातून केला होता. तेव्हा इमानदारीच्या जमान्यात संकोच आणि अहंभाव न बाळगता माणसं एकत्र यायची व एकजुटीने कामे व्हायची; याच हे उत्तम उदाहरण.

ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस गावात वीज नव्हती. तेव्हा केवळ शेतीतील वीजपंपासाठी वीज मिळे पण घरगुती वापरासाठी वीज सहजासहजी मिळत नसे. मग आण्णा यांच्या नेतृत्वाखाली विद्युत पंपांसाठी वाडीतील १४ प्रस्ताव तयार करून मंजूर करून घेतले. वायरमनच्या मदतीने त्यांनी हे वीजपंपाचे इलेक्ट्रीक कनेक्शन गावातून वळवून आणण्याची योजना केली आणि गावात वीज आणली. त्यांनी गावाची यात्रा सुरू करण्यासाठी बापू नाना व परबती आप्पा यांच्या प्रयत्नांचे समर्थन केले. त्यांच्या नंतरच्या सर्व पंचायतीना आण्णांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. आण्णांच्या उमेदीच्या काळात अनपटवाडीमध्ये दर महिन्याला ग्रामस्थांची मीटिंग होत असे. त्या मीटिंग मध्ये आण्णा लोकांना उत्तम मार्गदर्शन करत असत. लग्न कार्यासारखी कामे एकजुटीने आणि शिस्तीने होत. प्रत्येक कार्य हे आपले स्वतःच्याच घरचे आहे या भावनेने पार पाडण्यास सांगत असत. आण्णांनी अनेक लग्न स्वतःचा वेळ आणि पदरमोड करून जमविली. स्वतः झळ सोसून इतरांना मदत करण्यामध्ये, इतरांच्या अडीअडचणी सोडविण्यामध्ये आण्णांना निसर्गतःच आवड होती. आण्णांना गावामधे लोकांची एकी, परस्पर बंधुभाव, एकात्मता आणि सहकार्य ही मूल्ये रुजवायची होती. या हेतूनेच आण्णा कायम झपाटलेले असत.

आण्णा म्हणजे जिवापेक्षा शब्दाला किंमत देणारा माणूस, त्यांनी दिलेला शब्द आयुष्यात नेहमी पाळला. जरी कधी जवळ पैसे नसले म्हणून आयुष्यात त्यांचा एकही व्यवहार नडला नाही. जेव्हा पैसे नसायचे तेव्हा वेळप्रसंगी त्यांनी बार्टर व्यवहार (वस्तूच्या बदल्यात वस्तू) केले पण व्यवहार थांबवले नाहीत. १२ बलुतेदारांशी देखील त्यांचे चांगले संबंध होते. अगदी दादू धनगरांनी देखील बापूंच्या शिक्षणावेळी आर्थिक सहकार्य केलं होत. अगदी मजुरा विषयी सुध्दा आण्णांच्या मनात आदर व हृदयात तेव्हढीच जागा असायची जेव्हढी इतरांसाठी असायची. घरी भेटायला येणारा प्रत्येक व्यक्ती निदान एक कप चहा घेऊन तरी जायचाचं. वडिलांचे छत्र न लाभलेले आण्णा कितीतरी जणांचा आधारवड झाले होते. स्वतः निरक्षर असून त्यांनी फक्त स्वतःच्याच मुलांना साक्षर केलं नाही तर कितीतरी जणांना शिक्षणासाठी मदत केली. ते फार शिस्तप्रिय होते, चुकीचं त्यांना काही पटायचं नाही. उत्तम भाऊनी नशेत घरात अपशब्द वापरून दंगा केल्यावेळी ते वयाच्या ६५ टीत देखील काठी घेऊन मारायला गेले होते. आण्णा जेवढं घरातल्या माणसावर प्रेम करत तेवढंच प्रेम सांभाळलेल्या जनावरांवर देखील करत. याच उत्तम उदाहरण म्हणजे पैठण हा बैल आण्णांच्या शब्दावर कृती करायचा. उत्तम भाऊंचा देखील पैठणवर खूप जीव होता. पैठण म्हातारा झाला आणि शेवटच्या घटका मोजत होता पण जोपर्यंत भाऊ मुंबईवरून गावी आले नाहीत तोपर्यंत या मुक्या जिवाने प्राण सोडला नव्हता. म्हणजे या घरात माणसाला तर किंमत होतीच पण मुक्या जनावरांवर देखील तेव्हढीच माया केली जायची.

आपल्या कामाच्या व्यापातून व व्यापक समाजकार्यातून आयुष्यात परमार्थ साधताना आण्णांनी आपल्या आवडीनिवडी आणि छंद जोपासले होते. आण्णांना भजन गायनाचा फार मोठा छंद ! गावातील हौशी भजनी मंडळीत आण्णा, रामभाऊ, घाडगे मामा व आत्माराम सुतार हे होते. आण्णांचा आवाज चांगला होता तसेच ते उत्कृष्ट तबला वाजवायचे तर उत्तम भाऊ सूरपेटी छान वाजवायचे. त्यावेळी परबती आप्पांच्या मार्गदर्शनातून गावचे ढोल लेझीम पथकही चालवले होते. आण्णांना ढोल वाजवायची सुद्धा प्रचंड आवड होती.  

आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना मदत व्हावी म्हणून प्रत्येक महिन्याला ग्रामस्थांची मीटिंग घेऊन ठराविक वर्गणी गोळा करून ती अडचणीत असलेल्या व्यक्तींना देत असत व ती पुढील मीटिंगला जमा करून दुसऱ्या गरजू व्यक्तीला देत असत. हा सर्व आर्थिक व्यवहार लोकांनी एकमताने आण्णांच्या कडे सोपविला होता. आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना पैसे वाटून जर काही पैसे शिल्लक राहिले तर आण्णा ते एका पुडीमध्ये बांधून त्यांच्या देवघरात ठेवायचे आणि पुढील मीटिंगमध्ये ती पुडी सोडायचे परंतु त्या पुडीतील सार्वजनिक पैशातील एक पैसाही वापरण्याचा मोह आण्णांना कधीच झाला नाही. आण्णांना मित्र आणि माणसे जोडण्यात अनोखा हातखंडा होता. त्याचे हे स्वभाववैशिष्ट्य नातू हनुमंतमध्ये आले आहे. सर्वांनी एकत्र राहावे, आपले सुखदुःख वाटून घ्यावे, एकमेकास मदत करावी आणि सर्वांनी सुखी राहावे अशी मानसिकता असणारी आण्णांसारखी व्यक्तिमत्वे समाजात दुर्मिळ. आण्णांचे संपूर्ण आयुष्य या मूल्यांची जोपासना करण्यात गेले. आण्णांचे व अनपटवाडीमधील केशव सावळा अनपट आणि साहेबराव गणपतराव मांढरे यांचे खूप घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे, अगदी रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक म्हटले तरी चालेल, असे खऱ्या मित्रत्वाचे संबंध होते. जगामध्ये खरे मित्र कसे असावेत याचे हे तिघे आदर्श उदाहरण होते. खरचं, म्हणतात ना मैत्रीचे नाते रक्ताच्या नात्यापेक्षा सरस ठरते. याच मित्रांनी गरज पडेल तेव्हा तसेच काहीवेळा आण्णांच्या अनुपस्थितीत आण्णांना गंभीर कौटुंबिक समस्यांदरम्यान आवश्यक ती सर्व मदत केली.

अण्णांचा स्वभावच असा होता की त्यांनी पंचक्रोशीतील असंख्य माणसे जोडली होती. सर्वांशी अत्यंत जिव्हाळ्याने वागले. त्यांचे आर्थिक व्यवहार तर इतके चोख आणि वचनबद्ध असत की स्वतः जवळ अनेक वेळा पैसे नसतानाही त्यांचे कोणतेही व्यवहार कधीही थांबले नाहीत कारण आण्णांनी शब्द टाकला की अनेक मंडळी त्यांना मदत करायला तयार असत कारण पैसे परत करण्यासाठी केलेल्या वायद्याच्या आतच आण्णा ते पैसे परत करत. असे हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गावास लाभले. कित्येक जणांना उपयोगी पडले, कित्येक जणांच्या जगण्यास उभारी दिली, जगण्यास धीर दिला, नवनवीन संकल्प करून ते अमलात आणले, मनुष्याला निसर्गतःच जे दानाचे आणि त्यागाचे पवित्र गुण मिळाले आहेत ते आण्णांच्या ठायी परिपूर्ण दिसले त्यांची त्यांनी मुक्तहस्ताने उधळण केली आणि एक समाजोपयोगी जीवन अण्णांनी जगले.

पुढे मजबूत शरीर यष्टीमुळे उतार वयात त्यांच्या शरीराला अवजडपणा आला आणि त्यांची हालचाल कमी झाली. वयाच्या ६५ व्या वर्षी आण्णांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला. या आजारात बापूंनी आण्णांची तब्येत शेवटपर्यंत सांभाळली. सातारा येथील चव्हाण डॉक्टर यांचे देखरेखीखाली त्यांनी अविरत १५ वर्षे वैद्यकीय उपचार घेतले. आण्णांनी औषधे घेण्यात आजीबात हालगर्जीपणा केला नाही म्हणूनच ह्रदयविकाराचा आजार असूनही १५ वर्षे उत्तम जीवन जगले. त्यांच्या कन्यांचा त्यांच्यावर फार जीव. आयुष्यातील शेवटचे सहा महिने त्यांनी अंथरुणावर काढले. त्यावेळेला धाकटी कन्या सुनंदाने आपला मुलगा लहान असूनही त्यांची अनपटवाडी येथे येऊन सहा महिने सेवा केली. तसेच कन्या सुनंदा आणि नलिनी यांनी आईच्या शेवटच्या  दोन-तीन महिन्यात अशीच सेवा केली.

दोन्ही मुले आपापल्या नोकरीच्या शहरांमध्ये, मुलींची लग्न झालेली आणि आण्णा थकले असल्याने त्यांनी त्यांची शेती इतरांना वाट्याने दिली. त्यामध्ये बावधनमधील त्यांचे नातेवाईक शंकर (बाळू मामा) पिसाळ व संभाजी (काका) अनपट हे सुद्धा होते. बर्‍याच वेळा काकाने त्यांच्या मुलांच्या अनुपस्थितीत आण्णा आणि त्याच्या कुटुंबाची एखाद्या मुलाप्रमाणे सेवा केल्याचे सांगितले जाते. पुढे त्यांनी शेती तसेच घरकामासाठी कर्नाटकातील वसंत मामा यांना घरगडी म्हणून ठेवले. त्यांच्यामार्फत शेती करून घेतली. नंतरच्या काळात सोलापूरचे मोहिते मामा हेदेखील त्यांच्या कुटुंबासह घरी घरगडी म्हणून होते.

आण्णांच्या पत्नी लक्ष्मी यांच्या संपूर्ण आधारावर आण्णांनी आपले आणि गावचे कुटुंब सांभाळले व वाढविले. आण्णा कोणत्याही कार्यक्रम किंवा कामानिमित्त बाहेर असताना घराचा सांभाळ अतिशय समर्थपणे पेलल्यामुळेच आण्णांना समाजसेवेची कामे करता आली. त्यांनी अण्णांना शेतीत मदत तर केलीच पण मुलांना वाढवताना आणि शिक्षित करताना कष्टमय प्रयत्न केले. आण्णांच्या निधनानानंतरही कुटुंबातील समतोल व संसाराची घडी ढळू दिली नाही आणि नातवंडांवर जीवापाड प्रेम केल.

दत्तू बापू यांच्या वाईतील शिक्षणादरम्यान पहाटे लवकर उठून त्यांना जेवण तयार करून देत. तेव्हा बापू सकाळी लवकरच वाईला पायी पोहचत असत. त्याकाळी वेळ पाहण्यासाठी घड्याळ देखील नव्हतं. एकदातर मुलाच्या जेवणाच्या काळजीपोटी त्या मध्यरात्रीच उठून स्वयपाकाला लागल्या होत्या. मग दिवस भर परत शेतातील काम करून परत रात्री घरची काम त्या एकट्या करत. वयाच्या पंचाहत्तरीत देखील त्या शेतातील खुरपणीसह सर्व कामे करत. वयाच्या नव्वदीतदेखील त्या बिना चष्म्याच्या वर्तमान पत्र वाचत. त्या लहानपणापासूनच एकत्र कुटुंबपद्धतीत वाढल्या असल्याने माहेरी आणि सासरी सर्वानी दिलजमाईने व एकजुटीने राहावे असा त्यांचा कयास आणि तळमळ असे. याच तळमळीपोटी एकदा संपूर्ण कुटुंबाचं एक स्नेहसंमेलन त्यांनी सातारा येथे बापूंच्या निवास्थानी घेतलं होत.अशा स्नेहमीलनातून झालेल्या संवादामुळेच कुटुंब एक मताने राहू शकते असा त्यांचा ठाम विश्वास होता.  

आण्णानी जे काही कमावलं किंवा आण्णा जे काही होते त्यामागे पत्नी लक्ष्मी यांचा सिहांचा वाटा होता. अण्णांच्या माघारी देखील खंबीरपणे त्यांनी मुलांच्या आणि मुलींच्या कुटुंबाना योग्य मार्गदर्शन तसेच गरज असेल तिथे शब्दांचा मार देखील दिला. स्वाभिमानी लक्ष्मीबाई एक व्यक्ती म्हणून तर महान होत्याच पण आण्णांच्या कुटुंबाचे प्रेरणास्रोत होत्या. जो पायाकडून जन्म घेतो त्याला पायाळू म्हणतात. या बाळाचा पाय उसण (सिलीक) भरलेल्या पाठीवरून फिरवताच बरे वाटते असे. आण्णा जन्माने पायाळू होते त्यामुळे अशा रुग्णांची देखील घरी कायम रीघ असायची. त्यांनी यासंदर्भात कोणालाही नकार दिला नाही. त्यांच्यातील जन्मजात असलेल्या समाजवादामुळे हे शक्य होते. त्यांच्या झुपकेदार मिश्या आणि भारदस्त शरीरयष्टी त्यांच्या रुबाबदारपणात भर घाली. ते कुणावर रागवत नसत आणि सगळ्या गोष्टी संयमाने करत. दुसऱ्याच्या मदतीस कायम तत्पर. असे हे शांत, संयमी, सभ्य, निस्पृह, भारदस्त, गरीबांचा कैवारी, माणूसकीभाव जपणार अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे आण्णा आपल्यातुन ५ जून १९९५ रोजी अनंतात विलीन झाले !

आण्णा एक व्यक्ती, एक माणूस, एक पती, एक वडील, एक सासरे, एक आजोबा या पेक्षाही खूप काही होते. आण्णा पुन्हा होणं नाही. आण्णांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..

शब्दांकन :
प्रा दत्तात्रय सदाशिव मांढरे 
श्री हनुमंत उत्तम मांढरे 
प्रा डॉ केशव यशवंत राजपुरे 

Monday, May 4, 2020

आकाश बाळासाहेब राजपुरे


प्रज्ञावंत आकाश बाळासाहेब राजपुरे
 
बाळासाहेब यशवंत राजपुरे हे उच्चविद्याविभूषित असूनही तेव्हा योग्य सर्विस न मिळाल्यामुळे वडिलोपार्जित शेती सांभाळत होते. अजुनही सर्व शेती तेच सांभाळत आहेत. बंधू केशव राजपुरे यांचे तेव्हा शिक्षण चालू होतं. कष्टकरी आई-वडिलांना मदत करून गरिबीचा संसारगाडा चालवण्याचे काम ते करत होते. २० मे १९९० रोजी मयुरेश्वर ता. वाई येथील सुरेखा मोरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बाळासाहेबांना आकाश, वृषाली व रिंकू ही तीन अपत्य. सर्व मुलं हुशार.. 

लिप वर्षामध्ये जन्मलेल्या मुलांना ‘लिपलिंग्ज’ किंवा ‘लिपर्स’ म्हटले जाते. आकाश चा जन्म २९ फेब्रुवारी १९९२ चा. लिप वर्ष चार वर्षातून एकदा येत असल्याने २९ फेब्रुवारी रोजी जन्म घेणाऱ्या बालकांचा वाढदिवस हा चार वर्षानंतर एकदा येतो. यामुळेच आजपर्यंत त्याचा फक्त आठ वेळा वाढदिवस आला आहे. असं म्हटल जातं- गगनं गगनाकारं सागर: सागरोपम:, अर्थात आकाशाची उपमा आकाशाला आणि समुद्राची उपमा समुद्रालाच द्यायला हवी. तसं आकाश हे नावच मुळता सर्वगुणसमावेशक आहे आणि आकाशाचे गुण असलेले हे व्यक्तिमत्व कर्तृत्ववान आहे. शैक्षणिक कारकीर्दीत त्याने आकाशाला गवसणी घालणारे यश संपादन केले व त्याला दिलेले नाव बरोबर असल्याचे सिद्ध केले.

आकाश चे प्राथमिक शिक्षण अनपटवाडीच्या प्राथमिक शाळेत सन १९९७ ते २००१ या दरम्यान खोपडे बाईंच्या मार्गदर्शनाखाली झाले. आकाश सुरुवातीपासूनच अभ्यासात चुणचुणीत असल्यामुळे तो नेहमी वर्गामध्ये प्रथम यायचा. त्याची आत्मग्रहणशक्ती इतकी चांगली होती की तो एकपाठी असे. तो गणितात फार हुशार होता, बऱ्याचदा हवेत आकडेमोड करून गणिताचे त्वरित उत्तर देई. तो लहान असताना आजोबा यशवंत तात्या शेतातील कामे करत असताना रामायण, महाभारत किंवा इतर दिर्घकथा सांगत. आकाश या कथा जशाच्या तशा आठवूण सांगायचा हे विशेष. तेव्हाच त्याच्यातील बुद्धीमत्तेची घरातल्यांना जाणीव झाली होती. मुलाचे पाय पाळण्यात दिसत होते.

घरात वडील व चुलते दोघेही उच्चविद्याविभूषित असल्यामुळे शिक्षणाचा वारसा आणि प्रेरणा घरातूनच ! त्याच्यात पहिल्यापासूनच कल्पकता असल्याने डोळसपणे शिक्षण घेतले. या त्याच्या जडणघडणीच्या काळात वडील बाळासाहेब यांनी त्याला प्रारंभिक प्रशिक्षण दिले. त्याच्यातील कल्पनाविलासाला चालना दिली. त्याला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन प्रश्न विचारून त्याची शिक्षण घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवली. नव्याने माहिती झालेल्या सगळ्या गोष्टींचे त्याला कुतूहल असे. त्याला नेहमी प्रश्न पडत त्यामुळे कुतूहलासह शिक्षण हा त्याच्या दिनचर्येचा भाग बनला. त्यामुळे शिक्षकांच्या नजरेत आकाश नेहमी आदर्शवत राहीला.

८५ टक्के गुण मिळवून तो चौथीत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला होता. याद्वारे अभ्यासामधील उत्कृष्टतेची मशाल पालकांकडून घेऊन मार्गक्रमण सुरु केले होते. चौथीनंतर त्याच्या शिक्षणामध्ये गैरसोय होऊ नये म्हणून त्याला त्याच्या खंडाळा येथील आत्या फुलाबाई व मामा कै सदाशिव शिर्के यांच्याकडे पुढील शिक्षणासाठी ठेवले. २००२ ते २००९ दरम्यान आकाशने राजेंद्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, खंडाळा येथे आपल्या शैक्षणिक आयुष्यातला होतकरू टप्पा पूर्ण केला. यादरम्यान आत्या फुलाबाई यांनी त्याला आपल्या मुलाप्रमाणे स्नेह दिला, माया लावली व संगोपन केलं. मामांच्या नंतर दाजी राजेंद्र शिर्के यांनी आकाश च्या पालकाची भूमिका निभावली. शाळेमध्ये असताना घरातच असणाऱ्या कराटे क्लास चा त्याला फायदा झाला. तो नेहमी कराटेचा सराव करी. वेगवेगळ्या टूर्नामेंटमध्ये भाग घेऊन त्याने आतापर्यंत चार बेल्ट मिळवलेले आहेत. शाळेमध्ये एक बुद्धिवंत म्हणून त्याची ख्याती होती. त्याला नेहमी ८५% च्या वरच मार्क मिळत. हि गुणवत्ता त्यांने शेवटपर्यंत टिकवली होती. असं म्हणतात - विद्या विनयेन शोभते ! नम्रतेविना आपण ज्ञान ग्रहण करू शकत नाही. पहिल्यापासून हा गुण त्याच्या अंगी आहे, म्हणून ज्ञानार्जन करणे त्याला सहज शक्य झाले आहे. तसेच केवळ गुण मिळवण्यापेक्षा सद्गुण अंगी बाणवणे, हेच खरे शिक्षण हे त्याला लहानपणापासूनच ठाव आहे. त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर त्याच्या काकांच्या व्यक्तिमत्वाचा व कर्तृत्वाचा प्रचंड परिणाम झाला.

२००७ साली एसएससी ला ९२ टक्के गुण मिळवून तो खंडाळा केंद्रात प्रथम आला होता. त्याने वडील, चुलते तसेच सुनंदा वहिनी या सर्वांचा शाळेमध्ये अव्वल गुणांकाचा वारसा पुढे चालवला होता. तेव्हा त्याने अगदी जिद्दीने जवळचे प्रतिस्पर्धी म्हणजे शाळेतील शिक्षकांच्या मुलांना पाठीमागे टाकले होते. पुढे त्याला इंजिनियरिंग क्षेत्राची आवड असल्यामुळे त्याने अकरावी-बारावी विज्ञान शाखेतून राजेंद्र महाविद्यालयातच पूर्ण केली. तो अभ्यास करत गेला, ज्ञानार्जन करत गेला,  बुद्ध्यांक वाढत गेला, मार्क्सस मिळवत गेला व गुणवत्ता टिकून ठेवली. यादरम्यान काहीवेळ दाजी राजू यांना दुकान व्यवसायात मदती ही केली. २००९ मध्ये बारावीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवून परत एकदा महाविद्यालयामध्ये प्रथम आला. पहिला नंबर मिळवण्याची सवय लागली होती जणू ! त्याच्या इच्छेप्रमाणे पुढं इंजीनियरिंग ला प्रवेश घेण्याचे ठरले.

इंजीनियरिंग प्रवेशाची सीईटी परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाल्यामुळे त्याला आकुर्डी, पुणे येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग मध्ये मेकॅनिकल ट्रेडला प्रवेश मिळाला. त्याला शिक्षणामध्ये आर्थिक मदतीचे महत्त्व लक्षात यावे या हेतूने त्यावेळी पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेण्याचे ठरले. यादरम्यान त्याने स्टेट बँक ऑफ इंडिया च्या कर्ज योजनेतून कर्ज घेतलं होतं. हे कर्ज मिळवत असताना त्याला नितीन मांढरे यांची समय सूचक मदत झाल्याचे तो सांगतो. नोकरी लागल्यानंतर ते कर्ज त्यांन फेडलं. पुणे येथे शिक्षण घेत असताना अतिशय साधी राहणी व किमान गरजा ठेवून विद्यार्थी आयुष्य जगला. अजूनही त्याची साधी राहणी हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. बुद्धी व प्रज्ञेचा त्याला कधीही गर्व नाही. घराच्या गरिबीची जाणीव ठेवत विद्यार्थी दशेत सर्व काळ काटकसरीचे जीवन जगला व अजूनही जगतोय. त्याला लागणारी कुठलीही गोष्ट आई-वडील किंवा चुलते किंवा दाजी यांचेकडे तो स्वतःहून मागत नसे. पहिली ते बीई पर्यंत त्याने अभ्यासात गुणवत्ता टिकवून कायम प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रथम क्रमांक मिळवून तो टिकवणं खूप अवघड काम असतं, हे अवघड आव्हान आकाशने लीलया पेललं होतं. त्याच्यावर झालेल्या शैक्षणिक गुंतवणूकीवर त्याने पालकांना नफा कमावून दिला होता. इंजीनियरिंग दरम्यान देखील प्रामाणिकपणा, जिद्द व चिकाटीने अभ्यास करून त्याने त्याची गुणवत्ता टिकवून ठेवली. २०१३ साली पुणे विद्यापीठाची मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधली बीई ही पदवी डिस्टिंक्शन घेऊन मिळवली.
शेवटच्या सत्रादरम्यान त्याने महाविद्यालयाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये भाग घेतला. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये चांगल्याप्रकारे प्रदर्शन केल्यामुळे त्याची सनमार ग्रुप ऑफ कंपनीज या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये सर्विस साठी निवड झाली. शिक्षण संपल्या संपल्या नितांत गरज असलेली नोकरी त्याला मिळाली होती. त्याने स्‍वकर्तृत्‍वातून ही किमया केली होती ह्या गोष्टीचा त्याला आनंद होता. त्याने चेन्नई आणि तिरुचिराप्पल्ली येथे विद्यावेतनावर कंपनीचे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. पुढे पुणे येथील कंपनीच्या कार्यालयामध्ये सेल्स इंजिनिअर म्हणून जानेवारी २०१४ ला रुजू झाला. यामध्ये त्याला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच कोकण विभागातील कंपनीच्या ग्राहकांना भेटण्याची जबाबदारी होती. तेव्हा त्याला साखर कारखाने, केमिकल कंपनी, फार्मा कंपनी आणि पॉवर प्लॅन्ट इत्यादी ठिकाणी भेटी देण्याचा योग आला. या यादरम्यान महाराष्ट्रभर फिरल्यानंतर आपले अनपटवाडी गाव किती सुधारित आहे याची त्याला जाणीव झाली. आपण अशा विकसित गावात जन्मलो याचा अभिमान त्याला वाटला.

तसं बघायला गेलं तर जरी तो कमवता झाला होता तरी हा जॉब त्याच्या व्यक्तिमत्वासाठी किंवा त्याच्यातील प्रज्ञेच्या तुलनेत सुयोग्य नव्हता. तो नेहमी विचार करी की आपण सरकारच्या प्रशासकीय तसेच अभियांत्रिकी सेवेद्वारे राष्ट्राची सेवा केली पाहिजे. तरीही त्यांने या सनमार कंपनीमध्ये जवळजवळ साडेतीन वर्ष सेवा केली. कंपनीची मोठाली लक्ष्ये, वारंवारचा प्रवास,  कामातील तोचतोचपणा आणि त्यातील किमान आव्हाने यामुळे तो या जॉब मध्ये समाधानी नव्हता. मग पालकांच्या परवानगीने जूूूून २०१७ ला कंपनीतील कामाचा मोठ्या धाडसानं राजीनामा दिला. त्याने आयुष्यात जोखीम घेऊन  आपल्यातील प्रतिभेला आव्हान दिले होते. त्याने यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयईएस (भारतीय अभियांत्रिकी सेवा) या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. या परीक्षेचे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व व्यक्तिमत्व चाचणी असे स्वरूप असते.

याच दरम्यान त्याने अभियांत्रिकी सेवांमध्ये भरतीच्या तयारीसाठी पुण्यातील 'मेड इझी' संस्थेची सहा महिन्यांची खाजगी शिकवणी पूर्ण केली. त्यानंतर अथक प्रयत्न करून आकाशने आयईएस परीक्षेसाठी प्रामाणिकपणे तयारी केली. प्रशासकीय सेेवा आणि चालू घडामोडींबद्दलचे त्यांचे ज्ञान वाढत गेले. पुढे त्याने २०१८ आणि २०१९ च्या आयईएसच्या पूर्व परीक्षा दिल्या पण यशाला गवसणी घालता येत नव्हती. त्याचे अविरत प्रयत्न चालूच होते. दरम्यान या अभ्यासाचा त्याला एमपीएससीच्या परीक्षा सुलभतेने देण्यासाठी उपयोग झाला. 

स्पर्धात्मक परीक्षेसाठी विद्यार्थी म्हणून वेळ घालवणे खूप आव्हानात्मक असते. या परीक्षा शैक्षणिक कालखंडा प्रमाणे वार्षिक नसतात. यांसाठी तज्ञांकडून नियमित प्रशिक्षण दिले जात नाही. स्वत: चा अभ्यास स्वतः करायचा असतो. अयशस्वी झाल्यास पुढील संधी घेऊ शकतो. उदाहरणार्थ सर्वसाधारण संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आयईएस परीक्षेच्या वयाच्या फक्त ३० वर्षापर्यंत फक्त सहाच प्रयत्न-संधी उपलब्ध असतात. वय यश मिळण्याची प्रतीक्षा करत नाही, ते वाढतच राहत. नोकरी संधी कमी होत जातात. परीक्षेतील अपयशामुळे आयुष्यातील ताण तणाव वाढू शकतो. अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना फारच जोखमीने रहावे लागते. पूर्वजांची पुण्याई आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद या वेळी त्याला कामी आली. विशेषतः आजीचे आशीर्वाद आणि आईने केलेले परिश्रमपूर्वक संगोपन यामुळे त्याने आपले उद्दिष्ट साध्य केले.

अशा प्रतिकूल परिस्थितींतून गेल्यानंतर जरी त्याला आयईएस परीक्षेत यश मिळालं नव्हतं तरी शेवटी त्याला इतर स्पर्धा परीक्षांमध्ये भरघोस यश मिळालं आणि एकाच वेळी तीन तीन नोकरी संधी मिळाल्या. मे २०१९ मध्ये मुंबई महानगरपालिकेत सरळ सेवा भरती द्वारे दुय्यम अभियंता म्हणून त्याची निवड झाली. तसेच ऑगस्ट २०१९ मध्ये त्याची राज्य परिवहन महामंडळामध्ये सरळ सेवा भरती द्वारे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली. पुढे सप्टेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवेमधून (एमपीएससी समकक्ष) पंढरपूर नगरपरिषदेमध्ये पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता म्हणून त्याची निवड झाली होती. 

या सगळ्या निवडीच्या पार्श्वभूमीवर त्याने मुंबई महानगरपालिकेत सेवा करण निवडले की जी इतर दोन्हींच्या तुलनेत चांगली संधी होती. ऑक्टोबर २०१९ मध्ये तो मुंबई महानगरपालिकेच्या विद्युत व यांत्रिकी विभागात दुय्यम अभियंता म्हणून सेवेत रूजू झाला. तो सध्या मालाडमधील महानगरपालिकेच्या मलनी सारण व प्रचालन विभागात पंप हाऊस मेंटेनन्स इंजिनीयर (देखभाल अभियंता) म्हणून कार्यरत आहे. मुंबई महानगरपालिकेत शेतकऱ्याच्या मुलाने अभियंता होणे ही अनपटवाडी गावच्या दृष्टीने अभिमानाची व भूषणावह गोष्ट आहे. आकाश प्रमाणेच त्याची बहीण वृषाली हीदेखील पहिल्यापासून अभ्यासात हुशार आणि नेहमी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणारी बुद्धिजीवी विद्यार्थिनी आहे. पुणे विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयातील बीएस्सी पदवी पूर्ण करून ती सध्या यूपीएससी आणि एमपीएससी च्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. 

आकाश स्वभावाने अतिशय शांत, नम्र, उदार, सक्रिय, स्वैच्छिक व श्यामल आहे तसेच नेहमीच इतरांना मदत करून संकटसमयी अचल राहण्याचा त्याचा गुण वाखाणण्याजोगा आहे. पहिल्यापासून तो प्रज्ञावंत व आदर्श विद्यार्थी जीवन जगला आहे. यशाने तो कधी हुरळून जात नाही किंवा अपयशाने खचून जाताना मी त्याला पाहिलं नाही. परंतु भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. यासाठी सर्विस करत भविष्यामध्ये वयाच्या अंतिम मुदतीत या स्पर्धा परीक्षेचे उर्वरित सर्व संधी उपयोगात आणून सर्वतोपरी प्रयत्न करेल यात तिळमात्र शंका नाही. 

आकाश च्या पुढील सर्व स्पर्धा परीक्षांच्या यशासाठी व महानगरपालिकेतील अभियंता म्हणून कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा..

शब्दांकन:- 
डॉ केशव राजपुरे

Saturday, May 2, 2020

बाळकृष्ण जगदेवराव अनपट


बाळकृष्ण जगदेवराव अनपट; प्रभावी व्यक्तिमत्व

खालच्या वाड्यातील जगदेव विठोबा अनपट यांना बाळकृष्ण, हिंदुराव, शामराव, शिवाजी, संभाजी हे पाच मुलगे आणि विमल ही मुलगी ! हिंदुराव आणि शामराव सुरुवातीला पोलिस सेवेत रुजू झाले होते पण काही कारणास्तव ते स्थिरावू शकले नाहीत म्हणून नंतर त्यांनी शेती व्यवसाय निवडला. शामराव व्यसनात गेले. शिवाजी यांनी मुंबईत सर्व प्रकारची कामे केली. संभाजी सांगलीत स्थायिक आहेत. तर विमल यांचा विवाह अरबवाडीच्या आत्याचे चिरंजीव हरिभाऊ गोळे यांचेशी झाला. थोरले चिरंजीव बाळकृष्ण (पोपट मास्तर) हे केंद्र शासन नियुक्त शारीरिक शिक्षण शिक्षक होते. त्यांच्या पिढीतील विद्वान आणि सुशिक्षित व्यक्तिमत्वांपैकी ते एक होते. पोपट मास्तरांचा जीवनपट उलघडण्याचा हा छोटासा प्रयत्न !

त्यांची जन्मतारीख २४ ऑगस्ट १९३७ म्हणजे जन्म स्वातंत्रपूर्व काळातला ! त्यांचे वडील जगदेवराव अनपट हे मुंबईत गिरणी कामगार होते. त्यामुळे या सर्व मुलांची शिक्षण आई पार्वती यांनी पाहिले. पोपट मास्तर यांचे शालेय शिक्षण प्राथमिक शाळा बावधन येथे व माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल वाई येथे पूर्ण झाले. त्यांचे म्हेवणे हरिभाऊ गोळे हे शाळेत त्यांच्या सोबत होते. त्यांच्याकडे रुबाबदारपणाची नैसर्गिक देणगी होती. मोहक आणि आकर्षक व्यक्तिमत्व होते. शिक्षणादरम्यान त्यांनी सायकलवर वाईचा प्रवास केला तर काही दिवस म्हेवण्यांच्या सोबत वाईत मुक्काम केला. त्यांनी द्रविड हायस्कूल वाई मधून प्रथम श्रेणीसह मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी किसन वीर महाविद्यालयातुन पूर्व पदवी (प्री-डिग्री) पूर्ण केली.

त्या दिवसांत, मॅट्रिक व्यक्तीसाठी नोकरी मिळवणे आताच्या तुलनेत सोपे काम होते. म्हणून त्यांनीं आपले शिक्षण थांबवून शिक्षकी पेशात आपली कारकीर्द बनविण्याच ठरवलं. त्यासाठी त्यांनी शारीरिक शिक्षण पदविका (सीपीई) पूर्ण केली. अभिमानाची बाब म्हणजे त्यांनी तेव्हा केंद्र सरकारच्या अनुदानित शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक पद मिळविले. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वाई येथील सेंट थॉमस इंग्रजी माध्यमिक शाळेत सेवा बजावली. त्यांचा शिक्षकी पेशा ! तेव्हा शिक्षकांना मास्तर म्हणत त्यामुळेच पोपट मास्तर ही कायमची पदवी गावाकडून त्यांना मिळाली होती. 

ते केंद्र सरकारचे कर्मचारी असल्याने त्यांना संपूर्ण भारतभर सेवा करणे आवश्यक होते. त्यातच त्यांची श्रीनगर, जम्मू येथील एका हायस्कूलवर बदली झाली. तेव्हा कुटुंब व घरापासून इतक्या दूर जास्त काळ राहणे फारच आव्हानात्मक होते. त्या दिवसांत जम्मूहून घरी पोहोचण्यास चार दिवस लागत त्यामुळे सुट्टीतील आठवडा प्रवासातच जाई. पण अशातही त्यांनी दृढनिश्चय व समर्पणाने सेवा केली. त्यावेळी चंद्रकांत गणपती अनपट हेदेखील बाहेरील राज्यात सैन्यात (मिल्ट्री) सेवा करत होते. योगायोगाने तेही तेव्हा जम्मू येथे होते. म्हणून हे दोघे समकालीन मित्र एकाच राज्यात वेगवेगळ्या प्रकारे राष्ट्रसेवा करत होते. तिथं तीन वर्ष यशस्वीरित्या सेवा पूर्ण केल्यावर त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात बदलीसाठी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश आले. ते पुढे मुंबईत भायखळा येथील ह्युम हायस्कूल येथे रुजू झाले. त्यांनी तेथे बरीच वर्षे प्रामाणिकपणा आणि निर्धाराने सेवा केली. तरुणांना त्यांच्या आरोग्यासाठी शारीरिक प्रशिक्षण देण्याचे मोठे काम त्याने केले. पुढे त्यांची वांद्रे येथील सेंट अँड्र्यूज हायस्कूलमध्ये बदली झाली. याच हायस्कुलमध्ये त्यांनी बराच काळ सेवा बजावली. या शाळेतूनच ते निवृत्त झाले. त्याच्याकडे वर्ग अध्यापनाचा कोणताही कार्यभार नसायचा. ते नेहमी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन, शालेय स्पर्धा किंवा सामन्यांदरम्यान पंच म्हणून कार्यरत असत.

त्याची उंची सव्वासहा फूट होती. त्याचे तेजस्वी डोळे त्यांच्या रुबाबदारपणात भर टाकत. मराठी टेलिव्हिजन मालिकेतील आण्णा नाईकच जणू ! त्यांची देहबोली इतकी प्रभावी असायची की त्याच्याकडे उत्तम संवाद कौशल्य होते. त्यांचा भारदस्त आवाज, स्पष्ट उच्चार आणि शुद्ध भाषा यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची वेगळी छाप पाडायची. लोकांच्या व्यापक संपर्कामुळे व त्यांच्याशी असलेल्या संवादामुळे कोणत्याही विषयावर त्यांचे स्वतःचे मत असायचे. गावातील इतर लोक तेव्हा तेव्हढे शिक्षित नव्हते आणि त्यांच्या भाषेला खेडवळ बाज असायचा त्यामुळे मास्तरांचा नेहमीच त्यांच्यावर प्रभाव पडत असे. मास्तर सुद्धा तसे मितभाषी, त्यांचा संवाद विरळाच त्यामुळे त्यांच्याविषयीच्या आदरयुक्त भीतीत वाढ ! त्यामुळे पोपट मास्तरांना गावात मान असे.  

१९६६ मध्ये त्यांचा त्यांच्या मामाची मुलगी लक्ष्मी खाशाबा शिंदे (जांब) यांचेबरोबर विवाह झाला. या उभयतांना सुरेखा रामचंद्र निर्मळ (निढळ), साधना मोहन मुरूमकर (सातारा), भारती जनार्दन गोळे (अरबवाडी), अर्चना रमाकांत शितोळे (विटा), शितल प्रशांत पवार (दहिगाव) व कविता या सहा कन्या ! कविताचे आजारपणात निधन झाले. लक्ष्मी वाहिनी यांनी या सर्व मुलींची संपूर्ण जबाबदारी घेतली व त्यांना वाढवून साक्षर केले. पोपट मास्तर सर्व्हिस निमित्ताने मुंबईत असायचे पण त्यांचे कुटुंब मात्र वाडीत. वाहिनीनी मुलींच्या जन्मापासून संगोपनासह लग्नापर्यंत सर्व जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडली आहे.

पोपट मास्तरांचा रुबाबदारपणा कायम होता. वाढलेली दाढी आणि लांबलचक मिश्या म्हणजे दिसायला सरदारजीच जणू ! आपल्या संपूर्ण कारकीर्दीत ते विलासी जीवन जगले. वागण्यात आणि बोलण्यात जरब असायची. इस्त्रीची कपडे, इन शर्ट आणि गॉगल ठरलेले ! नंतर त्यांनी दाढी वाढवली नाही पण लांबसडक मिश्या मात्र असायच्या. गावी आल्यानंतर त्यांचे समकालीन मित्र सर्जेराव अनपट (तात्या) तसेच रमेश मांढरे (भाऊ) यांच्यासोबत त्यांच्या गप्पा रंगायच्या. गावातील राजकारण तसेच ११३ एकर डोंगरच्या मालकीबद्दल चर्चा असायच्या.

वडील जगदेवराव अनपट मुंबईत गावकर्‍यांसह गाळ्यावर राहत असत. एक सद्गृहस्थ असल्याने लोकांचा त्याच्यावर विश्वास असायचा. इमानदारीच्या त्या जमान्यात त्यांच्या शब्दाला मान आणि किंमत असायची. त्यांनी कठीण परिस्थितीत त्याच्याबरोबरच्या गावकऱ्यांना मदत केली. बंधुता आणि स्नेहभाव वाढवला. पुढे नेतृत्वगुण संप्पन्न जगदेव आन्नांनी तो गाळा विकत घेतला. पोपट मास्तर जेव्हा मुंबईत बदलून आले तेव्हा ते इतर गावकऱ्यांबरोबर गाळ्यातच राहू लागले. त्यानंतर शेवटपर्यंत ते तिथेच राहिले. तसेेच त्यांचे कोकणातील घनिष्ठ मित्र विलास सावंत मामा हे देखील शेवट पर्यंत त्यांच्यासोबत होते.

तीस वर्षांहून अधिक काळ यशस्वीरीत्या सेवा केल्यानंतर, ते ३१ डिसेंबर १९९५ रोजी आपल्या शिक्षकी सेवांमधून निवृत्त झाले. तेव्हा त्यांचे कुटुंब गावी होते तरीही दीर्घ सेवेनंतर विश्रांतीसाठी ते गावी परतले नाहीत. त्यांनी समाजकारणाच्या माध्यमातून मुंबईतच आपली सामाजिक सेवा सुरू ठेवली. ते त्यांचे मेव्हणे हरिभाऊ गोळे यांच्या आपुलकी सोसायटीचे संचालक होते. या काळात त्यांनी गावातील तरुणांसाठी व्यवसाय गुंतवणूकीसाठी आर्थिक निधी उभा करून दिला. तसेच त्यांनी स्वत:ची प्रेरणा सहकारी संस्था स्थापन केली. गिरगाव, सातारा आणि वाई येथे प्रेरणाच्या शाखा आहेत. अशा प्रकारे त्यांनी तरुणांसाठी कमाईची साधने आणि ग्रामस्थांसाठी मदतीचा स्रोत तयार केला. पण दुर्दैवाने त्यांनी जे जे काही नवीन सुरू केले त्यात त्यांना तेव्हा अपयश आले. कर्जदारांनी पैसे परत न केल्यामुळे ह्या दोन्ही संस्था दिवाळखोर झाल्या. ठेवी बुडाल्या. त्यांनी गुंतवणूकीची परतफेड करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही. सुदैवाने प्रेरणा संस्था विश्वास सहकारी संस्थेत विलीन झाली आणि प्रतिष्ठा वाचली.

त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गावामधील तरुणांच्या वर्तणुकीवर परिणाम झाला. ते शिकून शिक्षकी पेशा निवडण्यास प्रेरित झाले. त्यांच्या स्टाईलिश जीवनशैलीवर प्रभावित होवून त्यांच्या संपर्कवलयातील लोक त्यांच्यासारखे जीवन जगण्यास प्रवृत्त झाले. ते शेवटपर्यंत कुटूंबापासून दूर होते तरी समाजाप्रती त्यांचे समर्पण प्रचंड होते. प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे लोक त्यांच्याशी भांडण्याच्या भानगडीत पडत नसत. जीवनातील कटू प्रसंगांना सामोरे जाताना त्याच्या अंतर्भूत आत्मविश्वासाची त्यांना खूपच मदत झाली. या रुबाबारदार व्यक्तिमत्वाचा कायम दबदबा राहिला.

नंतर त्यांना तीव्र पाठदुखीचा त्रास झाला. पाठीचा कणा ऑपरेट करण्याचा सल्ला देण्यात आला. सुदैवाने ऑपरेशन यशस्वी झाले. त्या काळात त्याने काही महिने गावात घालवले. नंतर ते मुंबईकडे निघून गेले. ५ ऑगस्ट २००४ ला वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला ज्यामध्ये त्यांंचे देहावसान झाले. हा वाडीतील मोहक, प्रभावी आणि गतिशील व्यक्तिमत्वाचा शेवट होता. ते आता आपल्यात नसले तरी त्यांच्यातील गतिशीलता सर्वकाळ जिवंत राहील. पोपट मास्तरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन !

डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाईल ९६०४२५०००६
www.rajpure.com 

राष्ट्रीय धनुर्धारी खेळाडू: सुरज सुनील अनपट


राष्ट्रीय धनुर्धारी खेळाडू: सुरज सुनील अनपट

सुरज सुनील अनपट हा गावातील २३ वर्षीय उमदा तरुण ! आपण विचार करत असाल की या तरुणाचे व्यक्तिमत्व गावातील इतर बहुआयामी व्यक्तिमत्वांच्या पंक्तीत कसे ? तसेच या तरुण व्यक्तिमत्वाविषयी लिखाण कसे ? तर हो, कारणही तसेच आहे. आपल्या गावामधील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तिमत्वांबरोबरच तिरंदाजी (आर्चरी म्हणजेच धनुर्विद्या) या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेल व्यक्तिमत्व म्हणजे *सुरज सुनील अनपट*. त्याच्या कर्तृत्वाने गावाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. चिमूटभर लोकवस्ती असलेल्या गावातून हा उमदा खेळाडू तयार होतो आणि प्राविण्य मिळवतो हीच मुळी कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे !

सुरजचे आजोबा कै. विनायक शंकर अनपट (बापू नाना) हे गावचे माजी सरपंच (तृतीय पंचायत - इ.स. १९८४- १९८९) आणि नावाजलेले मल्ल होते. आजी कै हिराबाई विनायक अनपट ह्या गृहिणी होत्या ! त्यांच्या आठ अपत्यांपैकी (सरपंच मोहन अनपट, शिवाजी अनपट, हनुमंत अनपट, शहाजी अनपट, सुनील अनपट, सुमिंद्रा जाधव, शारदा मुळीक, लतिका संकपाळ) सुरज हा सुनील काकांचा जेष्ठ चिरंजीव. तसे त्यांच्या घरातील सर्वजण तापट ! परंतु काकांच्या मुदुभाषी आणि प्रेमळ स्वभावामूळे सर्वजण एकसंध, एकमताचे असून एकविचाराणे राहतात.

सुनील अनपट (काका) यांचे पहिली ते तिसरीपर्यंत प्राथमिक शिक्षण अनपटवाडीच्या शाळेत झाले. त्यानंतर चौथी ते सातवी पर्यंत प्राथमिक शाळा बावधन नंबर- १ मध्ये, तर आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण बावधन हायस्कुल, बावधन येथे झाले. १९८५ साली दहावी पूर्ण झाल्यानंतर शिक्षण थांबवून ते नोकरीनिमित्त पुण्यात आले. इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळं करायचे ध्येयं त्यांनी बाळगलेलं. त्यांनी सुरुवातीला अल्प पगारावर लेथ मशीनवर कष्टाचे दीड वर्षे काम केले. त्यानंतर गावातील श्री. विलास विठोबा अनपट यांचेंबरोबर ते मुंबईला आले आणि त्यांच्या खोलीवर राहिले. १९८८ ला त्यांना ज्ञानदीप को-ऑप. सोसायटी लि. चूनाभट्टी, कुर्ला, मुंबई येथे विलास अनपट व चंद्रकांत शिंदे ( मेहुणे ) विठ्ठलवाडी, यांच्या विशेष प्रयत्नांतून सर्व्हीस लागली, आणि त्यांचे नशीब बदलले. त्यांनी ज्ञानदीपच्या मुंबईमधील कांजूरमार्ग, किसननगर, दादर अशा विविध शाखांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांची आपल्या भागात बदली झाली. आपल्या भागात त्यांनी सातारा, वाठार, खंडाळा व महाबळेश्वर येथील शाखांमध्ये काम केले आहे. सर्व्हिसमध्ये त्यांची फार धावपळ व्हायची. त्यात कर्ज वसुली विभाग त्यांच्याकडे होता, त्यामुळे त्यांना बाहेर फिरावे लागत असे. ग्राहकांचा सातत्याने पाठपुरावा करावा लागत असे. कसलीही तमा न बाळगता प्रसंगोपात कठोर व कडक भूमिका घेऊन त्यांना आपले कार्यकर्तव्य करावे लागे. त्यामुळे निष्ठेने काम करून त्यांनी सर्व्हिसमध्ये पदोन्नती मिळवली होती. ते सध्या ज्ञानदीपच्या महाबळेश्वर शाखेत कार्यरत आहेत.  

काकांचा विवाह १७ मे १९९५ साली तासगाव, जाधववाडी येथील माधवी जाधव यांच्याशी झाला. सुरज व चेतन ही त्यांच्या संसारवेलीवर उमललेली दोन फुले. सुरज चा जन्म १३ फेब्रुवारी १९९७ ला झाला तर चेतन चा जन्म ०५ नोव्हेंबर १९९९ चा. दोघांचाही जन्म अनपटवाडीतलाच. कांकाचे पूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले होते. पण भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्या मुलांनी इंग्रजी माध्यममधूनच शिकावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामूळे त्यांनी सुरजला ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कुल पसरणी (वाई) येथे ऍडमिशन घेतले. सुरजचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण ज्ञानदीप स्कुल मधेच झाले. सुरज अभ्यासात हुशार होता, शाळेत असताना तो नेहमी अभ्यासात प्राविण्यासह उत्तीर्ण होई. सुरजला पहिल्यापासूनच शिक्षणाबरोबर खेळाचीही तितकीच आवड होती. पहिली ते तिसरी पर्यंत त्याने कराटे मध्ये तीन बेल्ट प्राप्त केले होते. पुढे चौथी पासून त्याला आर्चरी (तिरंदाजी) खेळात विशेष आवड निर्माण झाली. तिरंदाजी म्हणजे एका निश्चित ठिकाणी लक्ष केंद्रित करून धनुष्याच्या साहाय्याने बाण मारणे (नेमबाजी) होय. शाळा, तालुका पातळीवर खेळता खेळता, त्याच्या खेळातील प्रविण्यामुळे त्याला जिल्हा आणि राज्यस्तरावर खेळण्याची संधीही उपलब्ध झाली. आपल्यातील कौश्यल्याच्या जोरावर या पातळीवरही तो चमकला. त्याचे खेळातील कौशल्य पाहून शाळेतील शक्षकांनी सुद्धा त्याला विशेष मार्गदर्शन केले, आणि काकांनाही त्याला खेळात प्रोत्साहन देण्यास सांगितले. सुरजने अभ्यासाबरोबर मैदानीही खेळ खेळावे आणि त्यात नैपुण्य मिळवावे म्हणून काका नेहमीच भर देत होते. काकांनी त्याला उत्कृष्ट धनुर्धारी बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. यामध्ये शिक्षक (कोच) म्हणून सुरजला श्री. सचिन लेंभे सर, रणजित चामले सर व प्रवीण सुतार सर यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सुरजला पहिली ते नववी पर्यंत ९५ % पेक्षा कमी गुण कधीच मिळाले नाहीत. तसेच दहावीला त्याने ८१ % गुण मिळवून डिस्टींकशन मिळवले होते. तदनंतर त्याच्या क्रीडा कारकीर्दीसाठी चांगल्या संधी.शहरात उपलब्ध असल्याने, ११ वी व १२ वी चे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण त्याने पुणे येथे मॉडर्न कॉलेजमध्ये विज्ञान शाखेमधून पूर्ण केले. या काळात त्याने सर्व तिरंदाजी स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदविला. दिवसेंदिवस सुरज या कलेत निपुण होत चालला होता. तो पुरस्कार व पदके पटकवतच होता, सुरुवातीला तिरंदाजीसाठी त्याने बेसिक किट घेतले त्याची किंमत चार हजार रुपये होती. परंतु नंतर मात्र राष्ट्रीय स्तरावर खेळताना त्याला रिकव किट (राष्ट्रीय खेळ खेळण्यासाठी आणि दूरच्या अंतरावर तीर मारण्यासाठी लागणारे विशीष्ट किट) घ्यावे लागणार होते, परंतु त्याची किंमत सुमारे अडीच लाख एवढी होती, त्यावेळची परिस्थिती ते किट घेण्यासारखी नव्हती, परंतु काकांनी सुरजला राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी पाठवायचेच या जिद्दीने ते किट घेण्याचे ठरवले, व ही इच्छा चार्टर्ड अकाउंटंट श्री. विजय अनपट यांना बोलून दाखवली, त्यावेळी त्यांनीही सुरजला राष्ट्रीय स्तरावर खेळत यावे म्हणून तत्परतेने मदत केली. सुरजने त्यांच्या या परिश्रमाला आणि कसोटीला सार्थ असे राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवले आणि त्यांच्या कष्टाचे चीज केले. सुरजला त्याच्या या खेळात जादा वेळ दयावा लागल्यामुळे १२ वीत त्याला ६८ % गुण मिळाले. त्यानंतर त्याने पदवीच्या पहिल्या वर्षासाठी शाहू कॉलेज पुणे या वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. यावेळी त्याला आर्चरी (तिरंदाजी) खेळामध्ये विशेष वेळ द्यायला यावा म्हणून त्याने विज्ञान शाखा बदलून कला शाखेत प्रवेश घेतला. तदनंतर पदवीच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी त्याने सोयीच्या एस. पी. कॉलेज पुणे येथे प्रवेश घेतला व बी ए पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
जिल्हास्तरावर खेळताना सुरजला सातारामध्ये, पैलवान खाशाबा जाधव, सातारा जिल्हा मित्र पुरस्कार व सातारा जिल्हा परिषद गुणवंत खेळाडू पुरस्कार मिळाला होता. त्याचप्रमाणे पुणे येथे पुणे विद्यापीठ गुणवंत खेळाडू पुरस्कार असे आणि बरेच उल्लेखनीय पुरस्कार मिळाले आहेत. याचबरोबर सुरजने अमरावती, वाशीम, औरंगाबाद, नांदेड, जालना, नाशिक, अहमदनगर, इस्लामपूर, कोल्हापूर, बीड, कराड, नागपूर, सोलापूर, पुणे आणि मुंबई आशा विविध ठिकाणी त्याचे आर्चरी मध्ये असलेले नैपुण्य दाखवलेे, आणि सदर खेळामध्ये त्याने १५० च्या वर मेडल मिळवले आहेत. याचप्रमाणे राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर आर्चरी खेळामध्ये खेळताना त्याने प्रामुख्याने आंध्रप्रदेश- विजयवाडा-  २ वेळा, झारखंड-  रांची-  ३ वेळा, शिकाँग-  आजम-  १ वेळा, राजस्थान- अजमेर- १ वेळा, पंजाब- पटियाला- २ वेळा, हरियाणा-  रोधक-  ३ वेळा, ओडिसा-  भुवनेश्वर-  २ वेळा, आंध्रप्रदेश-  मथलिपटटंम-  २ वेळा, या राज्यांमध्ये खेळून ३५ पेक्षा जास्त मेडल मिळवले आहेत. सुरजला या मेडल्स बरोबर शासनातर्फे दहा हजार रुपयापर्यंतचे धनादेश बऱ्याच वेळेस मिळालेले आहेत.

राष्ट्रीय स्पर्धाबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरही आर्चरी खेळात ४ वेळा सहभाग घेतला आहे. पंजाब-हरियाणा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी मध्ये वयोगटानुसार त्याने पहिले सुवर्णपदक मिळवले होते. हा त्याच्या उत्कृष्टतेचा, समर्पणाचा आणि धनुर्धारीतील तज्ञतेचा परिणाम होता. आजोबा आणि आई-वडिलांची पुण्याई व लाभलेले आशीर्वादही त्याला उपयुक्त ठरले होते. ही खरच त्याच्या आई वडिलांसाठीच नव्हे तर अनपटवाडीकरांसाठी व आपल्या भागासाठी मोठ्या गर्वाची व अभिमानाची गोष्ट आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना धनुर्धारी (आर्चरी) हा सुद्धा खेळ असतो हे माहीत नसेल किंवा क्वचितच ऐकले किंवा पाहिले असेल. पण अशा कमी ज्ञात खेळात विशेष प्राविण्य मिळवून सुवर्णपदक मिळवणे ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. सुरजने हे सुवर्णपदक मिळवून अनपटवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तसेच नवीन पीढीसमोर आपण जिद्द आणि चिकाटी कायम ठेवली तर जिल्हा किंवा राज्यस्तरीयच काय, राष्ट्रीय स्तरावरदेखील सुवर्णपदक मिळवू शकतो हे दाखवून दिले आहे. 
सुरज आता त्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण करून एम.पी.एस.सी च्या स्पर्धा परीक्षा देत आहे. दुसरीकडे काकांचा दुसरा मुलगा चेतन देखील अभ्यासात हुशार आहे. त्यानेही १ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम या स्कुल मधून घेतले. दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने ११ वी व १२ वी द्रविड हायस्कुल मधून, कॉमर्स शाखेतून पूर्ण केली. चेतन ने सुद्धा आर्चरी या खेळामध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर भाग घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावर तो रांची आणि मध्यप्रदेश येथे खेळला आहे तर इंदोर मध्ये या स्पर्धेत त्याने रोप्य पदक देखील मिळवले आहे. परंतु आता सी. ए. या पदवीसाठी लागणाऱ्या परिक्षेवर त्याने आपले लक्ष केंद्रित केले आहे. तो आता कॉमर्सच्या पदवी परिक्षेसाठी दुसऱ्या वर्षात शिकत आहे. पदवीचे शिक्षण घेता घेता सी. ए. पदासाठी असलेल्या दोन परीक्षा देखील तो पास झाला आहे. घरची परिस्थिती बेताची, त्यात दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करणे म्हणजे काकांची तारेवरची कसरत होत होती. काकीही त्यांना शेतीमध्ये काम करत करत भाजी वयवसाय देखील करत होत्या. काकींनीही काकांना मदत करून त्यांना मोलाची साथ दिलीे. मुलांना क्रीडा नैपुण्य जोपासून उच्चशिक्षित करताना काही कमी पडु द्यायचे नाही अशी त्यांची धारणा ! त्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, परंतु आर्थिक अडचणी बऱ्याच वेळेला आल्या. या आर्थिक अडचणीत चार्टर्ड अकाउंटंट (सनदी लेखापाल) श्री. विजय बाबुराव अनपट यांनी त्यांना समयसूचक मदत केली आणि आता चेतन सी. ए. सारखी अवघड परीक्षा देतानाही त्यांचे मोलाचे मार्गदर्शन, मदत आणि साथ वेळोवेळी मिळत आहे. 

सुरजचे आर्चरी मध्ये असलेले कौशल्य आणि त्याने मिळवलेली मेडल्स याबाबत त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. यामध्ये काका, काकी, कुटुंबातील सदस्य यांची मिळालेली साथ, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन उल्लेखनीय आहे. अजूनही आपल्यापैकी मोजकेच पालक असे आहेत की मुलाला - तू खेळात करियर कर - असे संगणारे आहेत. पण सुनील काकांनी मुलांना उच्चशिक्षित करता करता त्यांच्या कारकिर्दीबाबत असा आऊट ऑफ बॉक्स निर्णय घेतला. आपल्या मुलाला त्याच्या आवडत्या क्षेत्रात कौशल्य दाखवण्यासाठी प्रोत्साहन दिले. अभ्यासाबरोबर खेळात ही प्राविण्य मिळवं असे सांगितल्यामुळेच सुरज एवढी मोठी गरुडझेप घेऊ शकला आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेपावला. तिथे विशेष कौशल्य दाखवून तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

खरंच, आपल्या मुलांना उच्चशिक्षीत करणे असो, खेळामध्ये प्रोत्साहन देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा करणे असो किंवा आपल्या सुखाचा विचार न करता आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेणे महत्वाचे असा विचार करणे असो, काका-काकी आपण ग्रेट आहात आणि आपले विचार समृद्ध आहेत. आपल्या या नाविन्यपूर्ण विचारांमुळेच हे शक्य झाले आणि आर्चरी सारख्या खेळात सुरज ने सुवर्णपदक मिळवून अनपटवाडीच नाव मोठं केलं. सुरज आता देत असलेल्या स्पर्धा परीक्षेत देखील उत्तम यश संपादन करेल, त्याचप्रमाणे चेतनदेखील भविष्यात सी.ए ची परीक्षा पास होऊन गावचे नाव रोशन करेल यात तिळमात्र शंका नाही.

लहान वयात सततच्या प्रामाणिक आणि परिश्रमपूर्वक प्रयत्नातून आर्चरी खेळात केलेल्या आश्वासक कामगिरीमुळे कुटुंबाचे, गावाचे, पंचक्रोशीचे, राज्याचे व पर्यायाने देशाचे नाव उज्वल करणाऱ्या सुरज चे हार्दिक अभिनंदन. आम्हाला सूरजचा अभिमान आहे. त्याचे हे यश तरुणांना 'खेळ' हा करिअरचा पर्याय म्हणून निवडण्यास प्रोत्साहित करेल. त्याने मिळवलेल्या पदकांचा आणि कौश्यल्याचा त्याला उत्कृष्ट सर्व्हिस मिळवण्यासाठी व एक चांगला माणूस म्हणून बनण्यास उपयोग होईल.

सुरजचा हाच आदर्श डोळयांसमोर ठेवून वाडीतील इतर खेळाडू मुलंही तयार होतील.  राज्यस्तरीय स्तरापर्यंत पोहोचलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये कु. संकेत निकेश अनपट, सोहम संतोष अनपट व साक्षी रामचंद्र अनपट यांची नावे आहेत. यामध्ये संकेत थाय बॉक्सिंग मध्ये जिल्हा व राज्य स्तरावर पुणे व सांगली( शिकाई ) येथे खेळला आहे, व त्याला प्रामुख्याने रोप्य व सुवर्णपदक मिळाले आहे. तर सोहम ही शाळेतून त्याच्या वयोगटानुसार हॉकी या खेळामध्ये जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धा सातारा व कोल्हापूर येथे खेळला आहे आणि साक्षी अनपट ही सुद्धा कबड्डी या खेळामध्ये जिल्हास्तरावर खेळत आपले कौशल्य दाखवत, उत्स्फुर्तपणे खेळत आहे. हे खेळाडू आणि वाडीतल्या इतर खेळाडूंनाही सुरजकडून नक्कीच प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही. फक्त त्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देण्याची गरज आहे.

सुरजला आणि चेतनला त्यांच्या भावी आयुष्यात प्रगतशील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर काका आणि काकींबरोबरच सर्व अनपटवाडीकरांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा दोघांच्या पाठिशी नेहमीच असणार आहेत. आपण निवडलेल्या क्षेत्रात उंच गगनभरारी घ्यावी आणि अनपटवाडीचे नावही उंचावर न्यावे यासाठी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा..!!

सुबोध: कोणतेही कार्य अडचणींवाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात, त्यांनाच यश प्राप्त होते- स्वामी विवेकानंद..

✒️शब्दांकन-
निलेश अनपट व दिलीप अनपट.
संपादन: केशव राजपुरे

Friday, May 1, 2020

महेश विनायक अनपट; निर्धारी आणि संवेदनशील



महेश विनायक अनपट; निर्धारी आणि संवेदनशील

केशव अनपट यांचे घर म्हंटलं की पोलिस सर्विस हे समीकरण तयार झाल आहे. त्यावेळी केशव अनपट यांचे ४ चिरंजीव आणि एक नातू पोलिस डिपार्टमेंट मध्ये सेवा बजावत होते. अजूनही त्यांचे १ चिरंजीव ३ नातू पोलिसी सेवेत आहे. तेव्हा विनायक केशव अनपट (विनायक भाऊ) हे पोलिसमध्ये वाहक पदावर कार्यरत होते. भाऊ घरात ज्येष्ठ असल्याने, एकत्रित कुटुंबात, इतर भावंडं तसेच गावाकडील घराची नैतिक आणि आर्थिक पातळीवर जबाबदारी सांभाळत होते. १९७७ मध्ये विनायक भाऊ यांचे पुष्पा चव्हाण (देगाव) यांचेशी लग्न झाले. विनायक भाऊ यांना तीन अपत्य; महेश, रमेश आणि विद्या. त्यातील रमेशचा अलीकडेच रेल्वे अपघातात मृत्यू झाला. महेशचा जन्म १४.१०.१९८० रोजी झाला होता. महेश जन्मापासूनच सडपातळ आणि देखणं व्यक्तिमत्व आहे. वडील पोलिस सेवेत असल्याने सुसंस्कृतता व शिस्त घरातूनच होती. भाऊंचा तोटका पगार व वडिलोपार्जित अल्प जमीन असल्याने, त्यांच्या भावी पिढीच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना सर्विस वरच अवलंबून राहावं लागणार होते, म्हणून महेशसाठी सर्विस मिळवणे आवश्यक होत. वडिलांच्या निवृत्तीनंतर महेशची पोलिस सेवेतच निवड झाली आणि तो देशसेवेचे मोठे काम करत आहे. अशा निर्धारी आणि संवेदनशील महेश विनायक अनपट उर्फ बाळूबद्दल आज..

विनायक भाऊंच्या लग्नानंतर त्यांचे कुटुंब बाळूच्या शिक्षण प्रवास सुरुवातीपर्यंत गावीच होते. १९८३ च्या सुमारास त्यांचे कुटुंब मुंबईत शिफ्ट झाले आणि नायगाव येथे पोलिस क्वार्टरमध्ये वास्तव्य करू लागले. बाळूचे प्राथमिक आणि हायस्कूलचे शिक्षण नायगावच्या डॉ. डी बी कुलकर्णी विद्यालयात झाले. तो अभ्यासात जरी सर्वसाधारण असला तरी गणितात चांगला होता. १९९५ मध्ये तो प्रथम वर्गात एसएससी उत्तीर्ण झाला. बँकिंग हे त्यांचे आवडते क्षेत्र आणि तो गणितामध्ये चांगला त्यामुळे त्याने वाणिज्य शाखेत शिक्षण घेण्याचे ठरविले. सर्व्हिस मिळवणे त्याच्यासाठी आवश्यक असल्याने, पुढील महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान सर्व्हिसचा अनुभव घ्यावा असा विचार त्याने केला. शिक्षणाबरोबरच सर्व्हिस अनुभव आणि घरात आर्थिक सहकार्य होईल हा उद्देश होता. त्याचे चुलतबंधू रवींद्रच्या मार्गदर्शनाने त्याने नायगाव मध्येच कॉलेज करून एका सहकारी संस्थेत अर्धवेळ सेवा सुरू केली. तेव्हा त्याने लिपीक तसेच बँकेचे डेली कलेक्शन केले. त्यावेळी महिना दोन हजार रुपये वाचायचे. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच त्याच्यात सेवा संस्कृतीची पेरणी झाली होती.

पुढील अभ्यासासाठी त्याने टी एम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, परळ येथे प्रवेश घेतला. त्याने द्वितीय श्रेणीमध्ये एचएससी उत्तीर्ण केली. त्यावेळी सर्व्हिस मिळण्यासाठी ते पुरेसे शिक्षण नव्हते. पण अर्ध-वेळ नोकरीमुळे आवश्यक अनुभव व आर्थिक मदत मिळत होती. बँकेत चांगलं पद मिळवायला किमान पदवी हवी होती म्हणून पुढील शिक्षण घेणे गरजेचे होते. उच्च शिक्षणासाठी त्याने फर्स्ट इयर बीकॉम क्लासमध्ये प्रवेश घेतला. भाऊंची तिन्ही मुले शिक्षण घेत होती. एकत्रित कौटुंबिक जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर, मुलांची शिक्षण आणि घर सहजतेने चालवण्यास भाऊंचा अल्प पगार पुरेसा नव्हता. म्हणून त्यांनी मुलांच्या शिक्षणाचा ठराविक प्राधान्यक्रम ठरवला. त्यामुळे भावंडांच्या शिक्षणास मदत व त्यांचा सांभाळ यासाठी बाळूने त्याचे शिक्षण बी कॉम पहिल्या वर्गातच अर्धवट सोडून दिले. शिक्षण अर्धवट झाल्यामुळे कंपनी तसेच शासनाच्या आस्थापनात त्याला नोकरी मिळणे अवघड होते. 

ते १९९८ होते आणि बाळूला माहित होते की भाऊ २००३ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. भाऊंच्या निवृत्तीनंतर त्यांना गावी परतण्याशिवाय पर्याय नव्हता. अजूनही इतर भावंडांचे शिक्षण चालू होते. अशा परिस्थितीत त्याच्या दृष्टीने भावी सर्व्हिस म्हणजे वडिलांसारखे पोलिस दलात भरती होणे. दुर्दैवाने तोपर्यंत त्याच्याकडे पोलिस खात्याचे प्रतिनिधित्व करण्यायोग्य शरीर संपदा नव्हती. तेव्हा कोणीतरी थट्टा करुन भाऊंना विचारले होते की बाळूला ते व्यवस्थित खाऊ-पिऊ देत नाहीत की काय ? बाळूने ती टिप्पणी गंभीरपणे पण सकारात्मकतेने घेतली आणि व्यायामशाळेत कसरत सुरु केली. त्याने आवश्यक व्यायाम अतिशय कष्टाने केले आणि शरीर पोलीस भरती योग्य केले. त्या टप्प्यात त्यांच्या वाड्यातील चुलते भिकू नानांनी त्याला परिस्थिती नसताना सुद्धा सर्वस्वी पाठबळ दिलं आणि त्यास प्रेरीत केले.
म्हणून तो पोलिस भरतीसाठी सहभागी झाला. तेव्हा सव्वा लाख उमेदवारांपैकी तो बावन क्रमांकावर निवडला होता (२००१). या निवडीमध्ये त्याला वडिलांच्या पोलिसांतील पदाचा अजिबात वापर झाला नसल्याचे तो अभिमानाने सांगतो. शिक्षण सोडल्यानंतर तीन वर्षानंतर त्याला नोकरी मिळाली होती. तो तीन वर्षांचा कालावधी त्याच्यासाठी निर्णायक होता. त्यादरम्यान तो विनायक भाऊंचा चिरंजीव ते परिपक्व महेश झाला होता. त्यानंतर तो नागपूर येथे नऊ महिन्यांच्या पोलिस प्रशिक्षण शिबिरात (२००२-२००३) सहभागी झाला. तिथून परतल्यावर त्याची वरळी पोलिस ठाण्यात पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर २००३ मध्ये विनायक भाऊ सेवानिवृत्त झाले. पोलिस क्वार्टर रूम आता त्याच्या नावावर केली होती व त्यांचा मुक्काम नायगाव येथेच होता. वरळी ठाण्यात दीड वर्ष काम केल्यानंतर त्याची नायगाव ला बदली झाली.

दरम्यान २००४ मध्ये तो गावाच्या विकासासाठी स्थापन झालेल्या श्री ग्राम विकास मंडळाच्या कार्यक्रमात वडील विनायक भाऊ यांच्या सूचनेवरून सहभागी झाला. त्यानंतरच्या मंडळाच्या सर्व बैठका, सोपवलेल्या जबाबदाऱ्या तसेच कार्यक्रमांत सहभागी झाला. त्याने मंडळाच्या सर्व कामांमध्ये प्रामाणिकपणे योगदान दिले आहे. मंडळाच्या व्यासपीठावर चालणार्‍या सामाजिक कार्यामुळे त्याच्यात मानवी मूल्ये टिकून राहिली. तो खूपच सामाजिक झाला. गरजूंना आणि सामाजिक कार्याला मदत करणे ही त्याची प्राथमिकता झाली. मंडळ आणि सर्व सभासद मित्रांनी बाळूला कौटुंबिक पातळीवरील सर्व प्रकारच्या अडचणींत सर्व प्रकारे मदत केली आहे, जी तो विसरत नाही. बहिण विद्याचे लग्न निव्वल मित्रांच्या पाठिंब्यावर होऊ शकले हे तो जाणतो. २००५ मध्ये त्यांनी पनवेलमध्ये फ्लॅट घेतला. सुरुवातीला त्यांनी तो भाड्याने दिला होता. 
पोलीस मध्ये कायमस्वरूपी नोकरी असताना देखील बाळूचे लग्न ठरत असताना काही अंतर्गत अडचणीमुळे योग घडून येत नव्हता. तेव्हा मित्र हनुमंत मांढरे यांनी पुढाकार घेऊन बाळूचे लग्न पार पडले. २००९ मध्ये त्याचे आता मुंबईस्थित कराडच्या अर्चना डेरे यांचे बरोबर लग्न झाले. त्यांना दोन अपत्ये आहेत; आदित्य (अकरा वर्ष, सहावी) आणि मनोमय (सहा वर्षे, पहिली). प्रत्येक पोलिस कर्मचार्‍याची बायको मुलांच्या संगोपन व उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित करते, अर्चना यांनीही ते केले. त्यांनी बाळूला सर्व पातळीवर पाठींबा दिलेला आहे. बाळूच्या सर्व्हिसमधील वेळेच्या अनिश्चिततेमुळे मुलांसाठीची त्याची रिक्तता भरून काढली आहे. लग्नानंतर ते पनवेलमधील नवीन घरात शिफ्ट झाले.

२००९ ते २०१३ दरम्यान त्याने वडाळा पोलिस ठाण्यात चार वर्ष सेवा बजावली. मग त्याला आतंकवादविरोधी पथक (एटीएस) मध्ये काम करण्याची आव्हानात्मक संधी मिळाली. या पोलिस विभागात काम करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न आहे. कर्तव्यामध्ये जोखीम असल्यामुळे तिथे तुलनेत पगारही जास्त असतो त्यामुळे सर्वांनाचं येथे संधी मिळते असे नाही. देशाची वेगळ्या अंगाने सेवा करण्याची संधी मिळणार म्हणून त्याने ही आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारली. तिथे त्याने अत्यंत प्रामाणिकपणे विभागाच्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये मोठे योगदान दिले. त्याने धोकादायक आरोपीस अटक करण्याच्या धाडसी कार्यांत भाग घेतला होता. गतिमान कामगाराची प्रतिष्ठा मिळविली. त्याच्या एटीएसमधील योगदानाबद्दल त्याला पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. आतापर्यंत त्याने पोलीस सेवेत ७३ पदके कमावली आहेत, त्यापैकी फक्त एटीएसची ६० आहेत. त्यामुळे एटीएस मध्ये त्याने किती जोरदारपणे योगदान दिले आहे याची प्रचिती येते. चार वर्षानंतर (२०१३-२०१७) त्याची पुन्हा नायगाव पोलीस ठाण्यात बदली झाली, तेव्हापासून तो तिथे आपले कर्तव्य बजावत आहे.
त्यानंतर त्याने पोलिस पतसंस्थेच्या कामात सहभागी होऊन आपल्या सहकाऱ्यांसाठी काम करण्याचे ठरवले. नायगाव मध्येच शंभर वर्ष जुनी व पस्तीस हजार सभासद संख्या असणारी बृहन्मुंबई पोलीस पगारदार पतसंस्था आहे. ही आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था आहे. पोलिस आयुक्त हे संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात व यामध्ये १३ संचालक असतात. संचालकांच्या निवडणुकीत जरी आपणास १००० मते मिळाली तरीही आपण निश्चितपणे विजयी होऊ शकता. तो २०१६ ते २०२१ या पंचवार्षिक कार्यकाळाच्या निवडणुकीत ३८०० मते मिळवून जादाच्या मताधिक्याने निवडून आला. आशिया खंडातील सर्वात मोठ्या पतसंस्थेचा संचालक होण ही अनपटवाडी गावच्या दृष्टीने ही फार अभीमानाची गोष्ट आहे. गेल्या चार वर्षात पतसंस्थेचा व्यवहार तिप्पट वाढवण्याचे तो सांगतो. यावेळी तत्कालीन सहकार मंत्री यांनी यांच्या संस्थेला भेट देऊन कामाचे स्वरूप पाहिले व प्रयत्नांची प्रशंसा केली. अकरावी-बारावी दरम्यान पतसंस्थेत काम केल्याचा अनुभव आणि त्याच गणितातील कौश्यल्य येथे कामी येतंय. तो गरजू सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. वाडीतील गरजूंच्या अडचणीत पतसंस्थेच्या माध्यमातून मदत करायला तो नेहमी तयार असतो. आणि ही गोष्ट त्याच्या सामाजिक कार्याच्या यादीत भर घालत आहे. 
त्याच्या आयुष्यातील दोन घटनांनी आयुष्याकडे पाहण्याची त्याची मानसिकता पूर्णपणे बदलली होती; दुर्दैवी रेल्वे अपघातात त्याचा भाऊ रमेश (पिंटू) याची अर्ली एक्सिट आणि गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने झालेलं वडिल विनायक भाऊंचे निधन. त्याचे आयुष्यातील मोठे आधार नाहीसे झाले होते. पिंटूने तर संसारात नुकतीच सुरुवात केली होती. तर आयुष्याच्या मध्यावर वडिलांची हक्काची साथ गायब झाली होती. विनायक भाऊंच्या आजारा दरम्यान सुरुवातीला त्यांना वाई मध्ये ऍडमिट केले होते. पण अनिल भाऊंनी पुढाकार घेऊन पेशंटला पनवेल येथे हलवले. पुढे पनवेलहून त्यांना मुंबईत हलवले. याप्रसंगी मित्र संदीप माने साहेब, अनिल अनपट, हनुमंत मांढरे, दिलीप अनपट यांनी समयसूचक नैतिक व आर्थिक मदत केली होती. ही मदत बाळू कधी विसरू शकत नाही. भाऊंच्या ह्या शेवटच्या काही दिवसात बाळूला अंतर्गत अडीअडचणींना सामोरे जावं लागलं होतं त्यामध्ये अनिल आणि हनुमंत यांनी मोठे पाठबळ दिलं होतं. या दोन्ही घटनांनंतर मित्र व त्याच्या आईने  धीराने साथ दिल्याने तो आयुष्यात सकारात्मकतेने वाटचाल करून शकत आहे. 

श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी चे अध्यक्ष अनिल अनपट व सचिव हनुमंत मांढरे यांची बाळूला त्याच्या प्रत्येक कार्यात थोरल्या बंधूं प्रमाणे मदत झाली आहे. त्याच्या सुखदुःखात हे दोघं कायम त्याच्या पाठीमागे आहेत असं तो म्हणतो. मग ते राणीचे लग्न असो, त्याच लग्न असो, मंडळांमधील त्याचा प्रवेश असेल किंवा पतसंस्थेची निवडणूक असेल ह्या दोघांनी खूप पाठिंबा दिला आहे त्याला. त्यामुळे मंडळ म्हणजे त्याच्यासाठी दुसर कुटुंबच आहे व सभासद त्यातील कुटुंबीय. अनिल आणि हनुमंत चा तो सदैव ऋणी राहील असं तो म्हणतो.

नुकतच त्याने ग्राम विकास मंडळ आणि पोलीस पतसंस्थेच्या कार्याबरोबरच आपल्या सामाजिक कार्याच्या कक्षा रुंदावल्या आहेत. ज्या सैनिकांनी देशरक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली आणि शहीद झाले व ज्या कुटुंबाने आपलं सर्वस्व गमावलं आहे अशा कुटुंबांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या जयहिंद फाऊंडेशन संस्थेचा तो सभासद आहे. आपलं आचरण हे देश, देव आणि धर्म अशा पध्द्तीने करण्याचा वसा घेऊन देशसेवेच पवित्र कार्य करण्यात बाळू व्यस्त आहे. असं हे निर्धारी, शोषिक, जबाबदार आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील व्यक्तिमत्व या मोठ्या धक्क्यांमधून सावरून पूर्ववत समाजजीवन जगत आहे. 

बाळूस त्याच्या भावी कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा !

✍️ डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाइल: ९६०४२५०००६
राजपुरे.कॉम 

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...