#वैज्ञानिक_शेतकरी
माझ्या एम. एस्सी. भाग एक मधील वाटचालीत प्रताप वाघ यांचे बहुमोल मार्गदर्शन, सहकार्य आणि कायम प्रोत्साहन लाभल्याचे मला आठवते. ते आम्हाला एक वर्ष सिनियर असल्यामुळे जून १९९३ ला एम. एस्सी. पूर्ण करून आपल्या मूळ गावी आसले येथे राहायला गेले. अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तक उपलब्ध नसल्यामुळे आम्हा सर्वांना तेव्हा अभ्यास करताना अगोदरच्या बॅचच्या मित्रांच्या नोट्स वरच विसंबून राहावे लागे. मग एम. एस्सी. भाग दोन सुरू व्हायच्या अगोदर एक दिवस वेळ काढून मी आणि राजू प्रताप यांच्या कृष्णेकाठी वसलेल्या आसले येथील घरी नोट्स आणण्यासाठी गेलो. त्या वेळेला नोट्स दिल्यानंतर त्यांनी एक गोष्ट सांगितली होती - ज्या पद्धतीने नोट्स न्यायला तुम्ही आला आहात त्याच पद्धतीने परत एकदा पुढच्या वर्षी नोट्स परत करायला कृपया घरी यावे. तो प्रसंग आला नाही कारण पुढे ते कोल्हापुरातच संशोधनास रुजू झाले होते.
प्रताप ने अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातून एम. एस्सी. पर्यंत चे शिक्षण घेतले होते. सुरुवातीला वाईतील सेंट थॉमस इंग्लिश स्कुल मध्ये इंग्रजी माध्यमातून शिकलेला हा विद्यार्थी पुढे विज्ञान विषयातून परंपरागत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन थांबला होता. आईचे आजारपण आणि वडिलांचे पुढारपण यामुळे त्या वेळेला त्यांची आर्थिक स्थिती तशी बेताचीच होती. भरपूर सुपीक जमीन असून देखील निव्वळ राबण्याच्या वाणवेमुळे घर मागे आले होते असे म्हटले तर वावगे ठरू नये. आई-वडील, दोन विवाहित बहिणी आणि एक अविवाहित भाऊ असे त्यांचे कुटुंब होते. त्याने आपल्या बंधूसोबत आईची दीर्घ आजारपणात शेवटपर्यंत सेवा केली होती.
जून १९९४ ला एम. एस्सी. झाल्यानंतर वसतीगृहाचा निरोप घेऊन मी माझ्या गावी गेलो. हातात डिग्री होती.. विद्यापीठाचं बी. एस्सी. आणि एम. एस्सी. ची गोल्डमेडल होती.. मात्र नोकरी नव्हती... या परिस्थितीत काय करायचं ? म्हणून खंडाळ्याला दाजींच्या व्यवसायात हातभार लागावा म्हणून त्यांच्या घरी राहिलो. पण मी पी.एच.डी ला प्रवेश घ्यावा हि प्रतापची कायम इच्छा असायची. तो मला म्हणत असे - तूला नोकरी मिळत असेल तर निर्धास्त रहा पण आता जर काहीच करत नसशील तर संशोधन कामात झोकून दे. यासाठी तो आपले संशोधन मार्गदर्शक राव सर यांच्यामार्फत गावी पत्र पाठवत असे आणि मी संशोधन करावे यासाठी प्रेरित करत असे. पत्रामध्ये - आम्ही तुझ्या राहण्याचा तसेच शिष्यवृत्तीचा बंदोबस्त करू पण कसल्याही परिस्थितीत इथे ये आणि संशोधनास रुजू हो - असा सल्ला असायचा. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत शिक्षण घेणं हीच माझ्या दृष्टीने जिकिरीची गोष्ट होती. पुन्हा त्याच्या पुढे किमान चार वर्ष पीएचडी साठी व्यतीत करणे माझ्यासाठी खर्चिक ठरणार होते. उच्च शिक्षण घेणे मनात होते मात्र घरची परिस्थिती त्यास अनुकूल नव्हती. म्हणून मी द्विधा मनःस्थितीत होतो.
एके दिवशी सणाच्या निमित्ताने मी जेव्हा माझे मुळगाव बावधन-अनपटवाडी येथे गेलो होतो तेव्हा माझे बंधू; दादा यांनी विद्यापीठात जाऊन डॉ. राव आणि प्रताप यांची भेट घेण्याची व त्यांचे पुढील शिक्षणाच्यादृष्टीने मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला तसेच शिष्यवृत्तीवर पीएचडी करता येत असेल तर प्रवेश घ्यावा असे सुचवले. मग मात्र मला थोडा धीर वाटला. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर शेवटी ठरवले शिवाजी विद्यापीठातच फेलोशिपवर फिजिक्समध्ये पीएचडी करायची. ऑक्टोबर १९९४ दरम्यान मी राव सरांच्याकडे यूजीसीच्या प्रकल्पात प्रतापच्या प्रयत्नातून मुलाखतीद्वारे प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून रुजू झालो. तेव्हा खूपच चर्चेत असलेला अत्यंत उपयोगी असा एरोजेएल पदार्थ तयार करण्यावर हा प्रकल्प होता. अगोदरचे संशोधन अजैविक पदार्थांच्या पासून एरोजेएल तयार करण्यावर आधारित होते. माझा प्रकल्प मात्र सेंद्रिय एरोजेएल निर्मितीचा अर्थात आव्हानात्मक होता. प्रतापच्या प्रयत्नातून महिना ८०० रुपये विद्यावेतन मिळू लागले; त्यातील चारशे रुपये माझा खर्च आणि चारशे रुपये गावी अशी आर्थिक व्यवस्था झाली होती. मग आम्ही आंबाई नाक्यावरील अशोक भोसले यांच्या घरी भाडे तत्वावर रूम-पार्टनर म्हणून राहू लागलो. विवेक, अरविंद नंतर प्रताप हा माझा तिसरा रूम-पार्टनर ! माझ्या रूपाने त्याच्या पुढील पीएचडी प्रवासात गावाकडची हक्काची सोबत मिळाली होती. तर मला त्याच्या रूपात अजून एक वडील बंधू, मार्गदर्शक मित्र, व नवीन रूम-पार्टनर लाभला होता.
तेव्हा एरोजेल प्रयोगशाळेत युजीसी, डीएसटी आणि सीएसआयआर असे एकूण तीन प्रकल्प सुरु होते. या तिन्ही प्रकल्पाच्या जमाखर्चाचा आणि कार्यालयीन कामकाजाचा बोजा मी आणि प्रताप दोघांवरच असे. त्यामुळे मैत्र वाढलं. त्याच्यामुळे कार्यालयीन कामकाज शिकायला मिळाले. पत्र मसुदे, प्रशासकीय मान्यता, खरेदी ऑर्डर, तसलमातील रक्कम, देयके, जमाखर्च, लेखापरीक्षण, अहवाल इत्यादीमध्ये तरबेज झालो. मुख्य म्हणजे बऱ्याच प्रशासकीय विभागातील सहकाऱ्यांशी ओळख झाली. प्रयोगशाळेतील प्रयोगांपेक्षा कार्यालयीन कसरती बऱ्याच असायच्या. पण यामुळे प्रशासनातील बारकावे जवळून बघण्याचा योग आला. त्यावेळेला प्रयोगशाळेमध्ये बरीचशी उपकरणं आयात केल्याचे आठवते. कस्टम मधून ही उपकरणं सोडवून घेण्याची जोखमीची जबाबदारी आमच्यावर असायची. मराठी बाणा जपत आणि कसब पणाला लावत आम्ही विमानतळावरून उपकरण कोणत्याही परिस्थितीत सोडवून आणत असू. त्याने कागदावर कस्टम क्लिअरन्स प्रक्रियेचा तपशील आणि फ्लोचार्ट लिहिलेला असे. हा माझ्यासाठी खूपच उपयोगी अनुभव होता. त्यामुळे अधूनमधून ग्रुपमध्ये कौतुकाचे धनी होत असू.
असंच एक उपकरण आणण्यास आम्ही मुंबईला जाणार होतो. त्याच्या आदल्या दिवशी, ३१ डिसेंबर १९९५ रोजी माझ्या वडिलांचं गावाकडे देहावसान झालं. मोठा आधार गेला होता. माझं पीएचडी पूर्ण करण्याचे स्वप्न अधूरच राहणार असं वाटू लागलं होतं. सेंद्रिय एरोजेएल तयार करत असताना मला आठवते प्रयोगशाळेत एक लहानसा अपघातदेखील झाला होता त्यामुळेे एरोजेल पासून काही काळ दूरच होतो. त्यातच राव सर दोन वर्षासाठी संशोधनानिमित्त परदेशी गेल्यामुळे माझे पी.एच.डी साठी नावनोंदणी देखील झाली नव्हती. एअरजेल प्रयोगशाळेत पीएचडी पूर्ण करणे माझ्यासाठी तेव्हा कठीण काम वाटले. तसेच फेलोशिपदेखील संपणार होती. मग मात्र मी संशोधन थांबवून घरी परतण्याचा निर्णय घेतला. आयुष्यातील निर्णायक दोन वर्ष होती ती - फारच महत्वाचा कालावधी होता तो !
दोघांच्या प्रयोगशाळेतील योगदानाविषयीच्या अनेक आठवणी आहेत; प्रयोगशाळेत स्थापित सर्व फ्यूमहूड आम्ही दोघांनीं स्थानिक सुतारांकडून बनवून घेतलेली आहेत. त्याकाळी रिंगरोड नसताना टिंबर मार्केट ते विद्यापीठ आयसोलेशन हॉस्पिटल मार्गे कच्च्या रस्त्याने भर उन्हात छकड्यासोबत चालत आलेलो आहे. हातोड्याच्या सहाय्याने फरशी तोडून प्रयोगशाळा विकसित करण्यात योगदान दिले आहे. अधिकाऱ्यांकडून कित्येक कार्योत्तर मान्यता तसेच देयके मंजुर करून घेतल्याचे आठवते. अधिविभागाच्या मेकेनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वर्कशॉपच्या मदतीने बरीच आयातित उपकरणे कार्यान्वित करून घेतली आहेत. प्रामाणिकपणे, आम्ही दोघांनी प्रयोगशाळा विकसित करण्यात हातभार लावला आहे याचा सार्थ अभिमान वाटतो.
मला आठवते की त्या वेळी प्रकल्पाची अनुदान यायला वेळ लागे. अनुदान आल्यानंतर एकदम विद्यावेतन देयके सादर करावी लागत. तोपर्यंत खर्चाची तजवीज करावी लागे. प्रतापच्या घरात निकड असूनही आपल्या विद्यावेतनातून माझा पगार चालू नसल्याने एक वर्षाचा सर्वच्या सर्व खर्च त्यांने उचलला होता. म्हणून मी विद्यापीठात थांबू शकलो होतो. त्याचा परोपकारी स्वभाव माझ्यासाठी फार मोठा धडा होता. माझ्याकडून परत आलेल्या रकमेतून स्वतःसाठी हौसमौजेच्या गोष्टी न घेता त्यानं गावाकडं तटलेली कामं केल्याचे आठवते. माझ्या आयुष्यात आलेल्या आर्थिक समस्या अशा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सुटत गेल्या म्हणूनच तर त्या त्या वेळेचा शैक्षणिक प्रवास थांबला नाही हे महत्त्वाचं !
आम्ही ज्या संकुलात राहायला होतो तिथं बरेच विद्यार्थी रहात. प्रताप आणि माझी रूम या सर्वांसाठी ताणतणाव दूर करण्यासाठीची हक्काची जागा असायची. ते एक असे शाही व्यक्तिमत्व आहे की त्याचे कुणाशी भांडण झाल्याचे मला आठवत नाही. कायम स्मितहास्य आणि बोलण्यावर विनोदी प्रतिक्रिया ठरलेली ! वयाने आम्हा सर्वांपेक्षा जेष्ठ असल्यामुळे प्रत्येकजण त्याच्याशी आदराने वागे. त्याची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही कायमच माझ्यासाठी प्रेरणा ठरली.
'साधी राहणी' ही त्याची स्वभावनिशाणी होती. नम्रता नसानसात भरलेली ! वडिलधार्यांशी बोलताना केवढी ती आदब ! त्याच्याकडे घेऊन गेलेल्या शंकाचं तो आपल समाधान होईपर्यंत निरसन करण्याचा प्रयत्न करी. संशोधनाचा पूर्ण काळ आम्ही विद्यापीठ कॅम्पस तसेच शहरातून सायकल वरूनच फिरत असू. आम्ही दोघेही दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळांत काम करत होतो तरीही रूम पार्टनर असल्याने कायमचा संवाद ठरलेला ! आमच्या दोघांच्या सायकली कायम सोबत असायच्या. सुरुवातीला माझी सायकल नव्हती. माझे विद्यावेतन येईपर्यंत सायकल घेण्यासाठी त्याने स्वतः पैसे घातले होते. इतका उदार जोडीदार मिळायला भाग्य लागतं.
तो उत्तम क्रिकेट खेळत असे ! माझ्या इतका हौशी नसला तरी खेळाची जाण होती. एम. एस्सी. दरम्यान अंतरविभागीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत भौतिकशास्त्र विभागामार्फत दोन ते तीन सामन्यादरम्यान आकर्षक फलंदाजी केल्याचे आठवते. तसेच पदवीदान समारंभाच्या मैदानावर दुपारी दोन ते अडीच या दरम्यान आयोजित केलेल्या कर्मचाऱ्यांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भेदक गोलंदाजी केल्याचे आठवते. त्याच्या योगदानामुळे याच स्पर्धेत एक वर्ष आम्ही उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. आंबाई नाक्या वरील रूम समोर हमखास आमचा क्रिकेटचा डाव पडलेला असायचाच. या ना त्या कारणाने आम्ही कायम एकत्र असूच क्रिकेट मध्ये सुद्धा..
मेरिट मध्ये थोडासा कमी होता तरी शिकताना परिश्रम मात्र कठोर घेई. मला आठवते भौतिकशास्त्र विभागात एक वर्ष हंगामी शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्याच्याकडे अध्यापनासाठी इलेक्ट्रॉनिक्स हा विषय सोपवण्यात आला होता. त्याच्यासाठी ती थोडी कष्टाची गोष्ट होती. पण शिकायची तयारी कायम. रात्री उशिरापर्यंत व्याख्यानांची तयारी करत बसलेला मी त्याला पाहिलाय. रोजच्या व्याख्यानाचा आदल्या दिवशी अभ्यास ठरलेला. पण त्या बॅचला इलेक्ट्रॉनिक्सचा पूर्ण पेपर शिकवला गेल्याची गोष्ट माझ्या ध्यानात आहे. काहीही म्हणा विद्यार्थ्यांनी त्याच्या विनोदी स्वभावाचा आणि शिकवण्याच्या विशिष्ट शैलीचा पुरेपूर आनंद लुटला होता !
एक वर्षाचा अनुभव पाठीशी असल्यामुळे दुसऱ्या वर्षीच्या हंगामी नियुक्तीच्या वेळी त्याचाच विचार होणार हे अपेक्षित होते. पण विभागाच्या निकडी नुसार दुसऱ्या वर्षी त्याला संधी मिळाली नाही. त्यामुळे मात्र अपयशाने आयुष्यात पहिल्यांदा प्रचंड तुटलेला प्रताप मी पाहिला होता. तरी तो खचून गेला नाही. पुढे प्रावीण्यासह भौतिकशास्त्रातील पीएचडी मिळवली. एव्हाना पलूस महाविद्यालयातील शकुंतला चव्हाण या हिंदीच्या मॅडमबरोबर त्याचे लग्न झाले. तिथपर्यंत आमची चार वर्षांची रूमपार्टनरशीप होती. माझ्यासाठी ती काळजीदायी, आधार देणारी, संस्कारी आणि अविस्मरणीय सोबत होती. तेव्हा त्याला कायमची नोकरी नव्हती. सांगली येथील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात त्याने हंगामी नोकरी केली. भविष्यातील आपल्या नोकरीमुळे आपल्या पत्नीस कायमस्वरूपी नोकरी सोडावी लागू नये अशी खूणगाठ बांधत तडजोड करायची त्याने तयारी ठेवली होती.
एकदा मी त्याला त्याची चूक नसतानाही विनाकारण कुणीतरी छळल्याने निराश झालेला पाहिले होते. तो ज्या प्रकल्पाशी संबंधित होता त्यातील अटी व शर्तींनुसार पायाभूत सुविधा हस्तांतरित करणे क्रमप्राप्त होते. त्यावेळी निव्वळ हट्टापायी त्यास त्रास दिला गेला. म्हणतात ना 'वेळ प्रत्येकाची येते'. नंतर जेव्हा तीच व्यक्ती मोठ पद मिळण्यासाठी शिफारसीसाठी त्याची विनवणी करत होती तेव्हा त्याने समोरच्याचे सानपण सिद्ध केले होते. कधी कधी आपला आत्मसन्मान जपताना कमीपणाचे पडदे बाजूला करावे लागतात हेच खरे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानतर बीएआरसी मध्ये वैज्ञानिक अधिकाऱ्यांसाठीच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. प्रतापने या नोकरीसाठी आवश्यक कौशल्य प्रकल्पातून प्राप्त केले होतेच. तसेच त्याला मुलाखतीच्या वेगवेगळ्या कठोर टप्प्यातून जावे लागले. सुदैवाने त्यात त्याला यश आले. आणि अशा तऱ्हेने २००१ मध्ये थेट भरतीद्वारे बीएआरसी मध्ये त्याची वैज्ञानिक अधिकारी म्हणूूून नियुक्ती झाली.
नोकरीवर रुजू होण्यासाठी त्याला मुंबईत शिफ्ट व्हावे लागले. परंतु त्याने पत्नीला पलूस येथेच आपली नोकरी सुरु ठेवण्याची मुभा दिली. गेली २३ वर्षांपासून दिलेला शब्द पाळत तो जीवनातील तडजोडीशी बांधील आहे. त्यांचा मुलगा शंतनू अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. भौतिकशास्त्रातील बी.एस्सी. असलेला प्रतापचा भाऊ; धनंजय आपला कबड्डीचा छंद बाजूला ठेवत शेतीचे संगोपन करत आहे. संसार आणि कर्तव्य यात आवश्यक सामंज्यस्य ठेवत केलेला केवढा मोठा यज्ञ ! 'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' हे वचन त्याच्या जीवनाला पुरेपूर लागू पडते.
२००१ पासून, त्याने प्रामाणिक कर्तृत्वातून स्वत: ला वैज्ञानिक "डी" पासून "जी" पातळीपर्यंत उंचावले आहे. बीएआरसीच्या कल्याण केंद्रामध्ये ईएचपीपीएल प्रयोगशाळेच्या विकासातील महत्वपूर्ण योगदानासाठी त्यास तीन ग्रुप पुरस्कार आणि दोन विशेष योगदान पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ही नवीन प्रयोग शाळा उभारताना भूसंपादनापासून ते पूर्ण बांधकाम व पायाभूत सुविधांच्या विकासापर्यंत त्याने आपल्या पातळीवर कसून योगदान दिले. राष्ट्रीय प्रयोगशाळेत अशा स्तरावर आपला मित्र वैज्ञानिक असणे हा आम्हा सर्वांचा सन्मान आहे. तो संस्थेच्या विविध मोहिमेद्वारे देशसेवा करीत आहेच. महत्त्वाचं म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध जपलेल्या आपल्या सहकाऱ्यांकडून काम पूर्ण करून घेण्याची त्याच्याकडे हातोटी आहे. निगर्वी, मितभाषी प्रतापने ज्ञान आणि पदाच्या अहंकाराचा दर्प कुशलतेने दूर ठेवलाय. अजून तो आपल्या क्षेत्रात उच्च स्थान मिळवणे बाकी आहे. पण यथावकाश तेही शक्य होईल . आम्ही दोघेही आपापल्या कर्तृत्वाने यशस्वितेत आहोत. पण इथवर येण्यासाठी आम्ही केलेले प्रयास आणि आर्थिक तसेच बौद्धिक पातळीवर केलेला संघर्ष सारखाच आहे हे तथ्य मिळवलेल्या यशास आणखीन सुवर्णमय करत आहे.
त्याला शेतीचा विकास करण्याचा मोठा छंद ! ती त्याची लहानपासूनची आवड ! जमीन समतल करणे, विहीर खोदणे, पाईपलाईन, ऊस बागाईत ही त्यांची शेतीतील प्राथमिकता असे. आईवडील गेल्यानंतरही तो लहान भावाच्या मदतीने आधुनिक शेती करत आहे. नगदी पिकांची शेती करून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल म्हणून मला तो कायम अनपटवाडी येथे बंधूंना एखादे डबर खोदून देण्याचा सल्ला देई. नोकरीतील अनिश्चिततेमुळे बराच काळ मला ते शक्य झाले नाही. गावी सिमेंटमधील पक्के घर बांधण्याऐवजी मी विहिरीचे काम प्राधान्याने पूर्ण केले. अलीकडेच त्याने अनपटवाडी येथे ते फुललेले नंदनवन पाहिले; कांक्रीट रिंग युक्त चाळीस फूट खोल विहीर, जमीन सपाटीकरण, प्रत्येक शेतात केलेली पाईपलाईन आणि ऊस बागाईत पाहून त्याला आभाळ ठेंगणे झाले. गेल्याच वर्षी आवर्जून मला त्यानेही आसले येथे शेतीत केलेली कामे, विहीर, आणि प्राप्त केलेली प्रगती अभिमानाने दाखवली. त्याचे म्हणणे असे की एकवेळ नवीन जमीन खरेदी करता आली नाही तरी चालेल पण वडिलोपार्जित असलेली ही काळी माता टिकवता आणि जपता आली पाहिजे.
देव कुणाच्या आयुष्यात कुणाला जागा देईल हे सांगता येत नाही मात्र ही सारी किमया प्रायोजीत असते हे मात्र खरं आहे. आम्हाला वेळेवर याची जाणीव होणे गरजेचे आहे आणि समोरच्याच्या ह्रदयात आपले स्थान टिकवणं महत्वाचं आहे. संशोधन करत असताना लाभलेला लाखमोलाचा जोडीदार मला भाग्यानेच मिळाला आहे. अन्यथा आम्ही एकत्र संशोधन करीत रूम-पार्टनर बनणे हा निव्वळ योगायोग होता. त्याने तो प्रयासाने घडवून आणला होता. केवळ त्याच्यामुळेच मी संशोधनात प्रवेश करून माझी मध्यंतरी हरपलेली लय परत मिळवू शकलो होतो. आपल्या सदाचरणातून त्याने माझ्यात मानवी मूल्ये रुजविली आहेतच. खऱ्या अर्थाने प्रताप माझ्या आयुष्यातील सुवर्ण व्यक्तिमत्व बनले आहे !
डॉ केशव यशवंत राजपुरे (९६०४२५०००६)